रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

आई, गंगेची आरती अन् सारनाथ भेट..! " ( भाग क्रमांक -३ )



 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" ये बनारस हैं..! "

" आई, गंगेची आरती अन् सारनाथ भेट..! "
( भाग क्रमांक -३ )

===================================

दिनांक ४/१/२०२२ मंगळवार रोजी आम्ही काशी विश्वनाथ महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले होते. उत्तर भारतातील थंडी  भयंकर असते हे आतापर्यंत फक्त ऐकून होतो, त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत होती. वाराणसी येथे खूपच थंडी पडलेली होती. उत्तर भारतातील थंडी कोणत्या रंगाची असते हे सांगण्यापेक्षा ती रक्त गोठविणारी नक्कीच असते हे प्रत्यक्ष अनुभवानुसार जाणवत होते.

दिनांक ४/१/२०२२ रोजी काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन साधारणतः दुपारी २ वाजता आटोपले होते.आता अन्नदेवता  आम्हाला साद घालत होती.खूप भूक लागली होती. काशी विश्वनाथ महादेव अन् अन्नपूर्णा यांचं असणारं भक्तीचं नातं आम्हाला जाणीव करून देत होते की, अन्नपूर्णेचा भोजन प्रसाद हा सर्वोत्तम प्रसादांपैकी एक होता. चौकशी करत करत आम्ही अन्नपूर्णा प्रसादालयाच्या परिसरात आलो होतो.खूप अरुंद गल्लीतून मुख्य भोजन कक्षेकडे जायचे होते.रांगेत बरीच भक्त मंडळी उभी होती.आम्हीही भक्त असल्याने रांगेत उभा राहिलो अन् आम्हाला आतमध्ये कधी सोडतात याची प्रतीक्षा करू लागलो होतो.अखेर आम्ही अन्नपूर्णा प्रसादलायात प्रवेशित झालो होतो. तेथील अन्नदान फलकावर नजर टाकल्यावर असे लक्षात आले की, त्यातील बहुतांशी अन्नदान करणारे दक्षिण भारतातील नागरिक होते.कदाचित याचमुळे भोजनात सांबर अन् भात भरपेट होते. मस्तपैकी जेवण झाल्यावर आम्ही भोजन कक्षाच्या बाहेर पडलो होतो. अन्नपूर्णा भोजन कक्षाच्या लगतच काशी विश्वनाथ मंदिर होते.पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले अन् पुढील मार्गाला लागलो.

आम्ही गुरुवर्य नारायणराव औंढेकर गुरूंच्या घरी मुक्कामी असल्याने त्यांच्या घराकडे निघालो होतो.संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी दशाश्वमेध घाटावर जाण्याचे नियोजन होते. मुक्कामाच्या खोलीवर आल्यावर फ्रेश झालो होतो.थंडी खूप पडलेली होती.दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार होती.आम्ही पाच वाजता बाहेर पडलो अन् त्याच वाराणसीच्या गर्दीतून फिरत फिरत अखेर दशाश्वमेध घाटावर पोहोचलो होतो.

दशाश्वमेध घाटावर सर्वत्र अतिशय पवित्र वातावरण जाणवत होते,मात्र अतिशय कडाक्याच्या थंडीने शरीर पार गारठून जात होते.समोर आई गंगेचे विशाल पात्र कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरल्यासारखे भासत होते.बरीच शिवभक्त मंडळी होडी, नावेत बसून गंगेच्या पात्रातून गंगेच्या आरतीचे पूजन, दर्शन करणार असल्याने अगोदरच गंगा नदीत असणाऱ्या होडी, नावेत बसलेली होती.आम्ही मात्र ज्याठिकाणी गंगा आरती होणार होती, त्याच्या बाजूलाच बसण्याचे ठरवले होते.गंगा आरती करणारे तरुण एकाच गणवेशात एका कमी उंचीच्या पण साधारणतः पाच बाय पाचच्या  लाकडी चौरंगावर विराजमान झालेली होती.त्यांच्या प्रत्येकाच्या समोर एक मोठा दिवा पेटलेला होता. गंगा आरती करणाऱ्या तरुणांच्या पाठीमागे काही  स्री , पुरुष शिवभक्त मंडळी बसलेली होती.विशेष म्हणजे यात काही विदेशी स्री, पुरुष देखील कपाळावर चंदनाचा लेप ,गंध लावून श्रद्धेने बसलेली होती.

अखेर विविध मंत्रपुष्पांजली होऊन  गंगा आरती प्रारंभ झाली होती. ज्यावेळी गंगा आरती सुरू झाली,त्याचवेळी आपल्या सभोवती नादब्रह्माचं अस्तित्व जाणवायला लागले होते.एकच लयबध्द कृतीतून गंगा आरती करणारे तरुण,एका श्रद्धेय शिस्तीचे पाईक म्हणूनच दिसत होते.गंगा आरती करणाऱ्या प्रत्येक तरुणांची प्रत्येक कृती अगदी एकसारखीच होत होती.मी गंगा आरतीचे फोटो अन् व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी अगदी गंगेच्या काठावर आलो होतो.समोरून गंगा आरती आणखीनच सुशोभित वाटत होती.हिंदू धर्माद्वारे पंचमहाभूतांचे वेळोवेळी होणारे पूजन याची साक्ष पटवून देत होते की, हिंदू धर्म हा निसर्गपूजक आहे म्हणून..! जसे काशी येथे दररोज संध्याकाळी होणारी गंगा आरती होय..!

अखेर रात्री आठ वाजता गंगा आरती समाप्त झाली होती.  प्रत्येक शिवभक्त आपल्या अंतर्मनात जलदेवतेचे आपल्या आयुष्यातील अनमोल अस्तित्व जाणून त्याचे श्रद्धेय पूजन करून कृज्ञतापूर्वक निरोप घेऊन मार्गपंथस्त झाला होता.

दुसऱ्या दिवशी दिनांक ५/१/२०२२ बुधवार रोजी पहाटे लवकर उठून पुन्हा एकदा काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन घेण्याचे नियोजन होते. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सारनाथ येथे श्रद्धेय भेट देण्याचे देखील नियोजित होते.

पहाटे लवकर उठून स्नान आटोपून काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन घेतले अन् पायी चालत चालत जाऊन काशीच्या कोतवालाचे , कालभैरवाचे आम्ही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले. तिथून रिक्षा लावून तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. एक ओढ लागली होती, आपल्या भारतातील एका विद्वत्तापूर्ण श्रध्येय व्यक्तिमत्त्वाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीला भेट देण्याची..!

कालच्या पेक्षा आज जास्तच थंडी जाणवत होती.मुख्य वाराणसीच्या बाहेर पडल्यावर थंडीचे प्रमाण अजुन जास्त वाढले होते.थंडी एवढी कडाक्याची होती की, अक्षरशः रस्त्याने प्रवास सुरू असताना काही गायी, म्हशी, बैल, पाळीव कुत्रे यांना अंगावर बारदाण्याचे , रिकाम्या पोत्यांचे स्वेटर घातलेली दिसत होती. अखेर सारनाथ क्षेत्र आले होते.बौद्ध धर्माच्या चार धामांपैकी एक सारनाथ क्षेत्र आले होते.आम्ही ऑनलाईन तिकीट काढून सारनाथ येथील मुख्य स्तूपाच्या दिशेने निघालो होतो.

धमेख स्तूप

आमच्या समोर प्राचीन भारताचा दैदिप्यमान इतिहास, वर्तमानातील आपल्या अस्तित्वाला दाखवत होता. भव्य स्वरूपातील धमेख स्तूप ज्याला धर्म चक्र स्तूप देखील म्हणतात तो दिमाखात उभा होता.याच धमेख स्तूप म्हणजेच धर्म चक्र स्तूपाच्या स्थळी महान तत्वज्ञ तथागत गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यातील पाहिले प्रवचन आपल्या साधकांच्या समोर दिले होते. धमेख स्तूपाचा व्यास २८.५ मीटर तसेच उंची ३३.३५ मीटर आहे.

मुलगंध कुटी

सारनाथ येथील मुलगंध कुटी परिसरात गेल्यावर तेथील प्राचीन काळी असणाऱ्या भव्यतेची कल्पना येत होती.याच ठिकाणी तथागत गौतम बुद्ध ध्यानधारणा करत असे.तेथील शिलालेखांत असे लिहिलेले आहे की, चिनी प्रवासी हुएनश्वांग च्या मते या मुलगंध कुटीची उंची ६१ मीटर होती.समोर भव्य स्वरूपात आयाताकृती मंडप होता.आपल्या भारतातील प्राचीन इतिहास कालखंडातील गुप्तकालीन राजवटीचा हा दैदिप्यमान इतिहास आमच्या समोर होता.आम्ही तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीला श्रद्धेय वंदन केले. सारनाथ येथील धमेख स्तूप  परिसराच्या बाहेर आल्यावर माझे खूप जिवलग मित्र प्रकाश सूर्यभान त्रिभुवन सर ( रा. वैजापूर ) यांना श्रद्धेय भेट देण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांची अस्सल दगडातील कोरीव मूर्ती खरेदी केली. एका व्रतस्थ अन् महान तत्ववेत्त्याच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीला पुन्हा एकदा डोळे भरून पाहून आम्ही   वाराणसीकडे मार्गस्थ झालो होतो..! आज देखील पुन्हा संध्याकाळी गंगा आरतीचे साक्षीदार व्हायचे होते.तोच कालचा श्रद्धेय अनुभव घ्यायचा होता, कडाक्याच्या थंडीत..!
🕉️🙏🏻🕉️

ता.क. - मला प्रवासात भेटलेली माणसं ©️  
" ये बनारस हैं..! "  अंतर्गत एकूण तीन लेख लिहिलेले आहेत.याच लेखमालेतील आज शेवटचा लेख क्रमांक ३ लिहिला आहे.

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक -२७/२/२०२२, रविवार.

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

थोरवी, थोरल्या महाराजांची..!


 

चिंतन ©️


" थोरवी, थोरल्या महाराजांची..! "🙏🏻


=========================


स्वकर्तूत्व सिध्दशिरोमनी,इतिहासातील आजतागायत एकमेव चारित्र्यसंपन्न राजा..!


रानटी मूघलांना,हिदवी स्वराज्याच्या शत्रूंना त्यांची जागा दाखविणारे शौर्यशील धूरंधर..!


एका स्रीच्या ,आईच्या मार्गदर्शनाने एक मूर्तीमंत,स्वराज्यप्रेमी व्यक्तिमत्व कसे आकारास येते याचे ज्वलंत उदाहरण..!


 तळागाळातील सर्व जातीधर्माच्या माणसांना आपल्या संघटनचातूर्याने एकत्र करणारा एकमेवद्वितिय जाणता लोकराजा..!


लोकशाहीची मूल्ये प्रथमत:स्वत:मध्ये अनुकरण करून मग राजपध्दतीत राबविणारे थोर मूल्यपूजक,अखंड सावध असणारे एकमेव अष्टावधानी..!


 देहापेक्षा...आप्तस्वकियांपेक्षा देशहितास प्रथम प्राधान्य देणारे देशाभिमानी सेवक..!


देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो याचे सदैव भान असणारे महान राष्ट्रपूजक..!


लोकांच्याकरिता लोककल्याणकारी योजना लोकांमध्ये जाऊन यशस्वीरित्या राबविणारे लोककल्याणकारी राजे..!


नरवीर तयार करण्याचे सामर्थ्य सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगभूत स्वभाव अन् कौशल्यात होते.एका शब्दाखातर प्राणाची आहुती देणारे अनेक शुर - वीर फक्त आणि फक्त थोरल्या महाराजांवर असणाऱ्या निस्सीम प्रेमाखातर तयार झाले..! असे तयार होणारे नर - वीर स्री अन् पुरुष कोणत्याही श्रीमंतीत वाढलेले नव्हते . अशा अनेक शुरांची श्रीमंती एकच होती अन् ती म्हणजे आपल्याला अगदी प्रेमानं,मायेनं, भेदभाव न करता आपलंस करणारं थोर व्यक्तिमत्व अन् ते म्हणजे शिवराय..!


रयतेचे प्रतिनिधित्व करत असताना अष्टावधानी असणं अजिबात सोपे नाही,पण छ्त्रपती शिवाजी महाराज असे फारच मोजक्या थोरांपैकी एक होते ज्यांनी अष्टावधान प्राप्त केलेलं होतं. 


रयतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींमध्ये, प्रभू श्रीराम, योगेश्वर श्रीकृष्ण यांच्यानंतर अष्टावध्यानत्त्व फक्त आणि सदा सर्वदा वंदनीय छ्त्रपती शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापसिंह महाराज यांनाच शक्य झाले होते.


आपण मराठी माणसं ज्यावेळी मराठी मुलुख सोडून ज्यावेळी बाहेर जातो,त्यावेळी आपली ओळख सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओळखीनेच होते,हा माझा स्वानुभव आहे..! स्वच्छ चरित्र अन् स्वच्छ चारित्र्य यांचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे शिवराय..!


थोरले महाराज होते म्हणून आपला आज ," आज " आहे..!

सामाजिक सौहार्द टिकविण्याचे संस्कार थोरल्या महाराजांनी आपल्याला दिलेत याचा अर्थ त्याची जबाबदारी सर्व भारतीयांची ठरते; फक्त काही विशिष्ट मानवी घटकांचीच नव्हे..!🙏

                                                                                                                                 

समस्त सृष्टीतील मानवी संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मानवी घटकांना शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹


सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवरायांना शिव जयंती निमित्त माझ्या कुटुंबाकडून विनम्रपूर्वक श्रद्धेय त्रिवार अभिवादन.! 

🙏🙏🙏


आमचे आमच्या घरातील देवघरातील दररोजचे देवपुजन झाले की, माणसातल्या देव माणसाला म्हणजेच सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी फुल श्रद्धेने अर्पण केल्यावर , आपण अजूनही हिंदवी स्वराज्यात आहोत याची अनुभूती येते..!


ता.क. - होते म्हणून आहोत..!


वंदे मातरम्..! 


शब्दांकन तथा अभिवादक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -१९/२/२०२२, शनिवार

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

दर्शन, काशी विश्वनाथ महादेवाचे ..! " 🕉️ ( भाग क्रमांक -२ )


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

" ये बनारस हैं..! "


🕉️ " दर्शन, काशी विश्वनाथ महादेवाचे ..! " 🕉️

( भाग क्रमांक -२ )

=============================


माणसाचं आयुष्य ज्यावेळी पूर्णविराम शोधत असते त्यावेळी त्याच्या आयुष्यातील अनेक स्वल्पविराम त्याला कधी प्रश्नचिन्ह तर कधी उद्गारवाचक चिन्ह बनून खुणावत असतात.ज्यावेळी आपण काशी स्थित परिसरात भ्रमंती करतो,त्यावेळी तिथलं आयुष्य , सतत आपल्यातील अनेक प्रश्नचिन्ह तसेच उद्गारवाचक चिन्हांच निराकरण करत असते.


दिनांक ४/१/२०२२ रोजी आम्ही गंगा स्नान व माझ्या तीर्थरूप वडिलांचे वर्षश्राध्द विधी आटोपून काशी विश्वनाथ महादेवाच्या दर्शनाला निघालो होतो. वाराणसी, गल्ली अन् गर्दी यांचं अतूट नातं पदोपदी दिसत होते.गर्दीतील प्रत्येक माणूस आपापल्या कामात मग्न होता.आमच्या सारखे असंख्य प्रवासी आपापल्या परीने घाईत दिसत होते.वाराणसी अन् गर्दी यांचं अतूट नातं पदोपदी दिसून येत होते.काही दिवसापूर्वीच भारताचे महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या कर कमलाद्वारे ज्या पवित्र सांस्कृतिक अस्तित्वाचं पूजन केले होते त्या श्रध्येयाच्या दर्शनाची ओढ लागली होती. जुन्याच गल्लीतून काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या दर्शनाला निघालो होतो.मुख्य तपासणी कक्षा जवळ आलो होतो.तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईल मुख्य मंदिर परिसरात नेता येणार नाही.आम्ही त्यांच्या अटींचे पालन करत बाजूलाच असलेल्या एक दुकानातील लॉकर मध्ये मोबाईल ठेवून बेलाची पानं अन् इतर पूजेचं साहित्य घेऊन पुढे निघालो होतो.


काशी विश्वनाथ कॉरिडॉर मध्ये प्रवेश केल्या केल्या एका वेगळ्याच अध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव यायला लागला होता. माझ्या पालखेड जन्मगावात ज्या श्री.पारेश्वर महादेवाची आत्मिक आस्था मनी बाळगून होतो, तोच पारेश्र्वर महादेव ,काशी येथे भेटणार याची ओढ लागली होती. काशी विश्वनाथ कॉरिडॉर मध्ये प्रवेश केल्या केल्या तिथलं भव्य स्वरूप पाहून मन अतिशय प्रसन्न झाले होते.मी यापूर्वी माझ्या स्वर्गीय आईच्या वर्षश्राध्दाच्यावेळी काशी विश्वनाथ महादेव मंदिराला सहपरिवार भेट दिली होती. त्यावेळी सर्वत्र दाटीवाटीने वसलेला परिसर नजरेच्या स्मरणात येत होता.मी यापूर्वी प्रत्यक्ष सहपरिवार बघितलेला काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसर अन् आत्त्ताचा अतिशय विस्तीर्ण, सुनियोजित परिसर यात कमालीचा बदल जाणवत होता.


काशी विश्वनाथ कॉरिडॉर मध्ये प्रवेश केल्या केल्या समोर विस्तीर्ण सुनियोजित परिसर नजरेत भरला.सर्वत्र कमालीची श्रद्धा बाळगून असणारी माणसं वावरत होती.चौरसाकृती परिसरात मधोमध काशी विश्वनाथ महादेव आपल्या मंदिरात विराजमान होते. सर्व भाविक श्रद्धेने रांगेत काशी विश्वनाथ महादेवाच्या दर्शनाला हळूहळू पुढे पुढे सरकत होते.मुख्य मंदिर गाभाऱ्याच्या परिसरात आल्यावर उत्पत्ती, स्थिती आणि लय यातील लय म्हणजेच शेवट याचं माणसाच्या आयुष्यात प्रतिनिधीत्व करणारं तेज आमच्या समोर आले होते.ज्याला जन्म आहे त्याचा कधी ना कधी लय होणारच या शाश्वत सत्याचं अस्तित्व आमच्या समोर दिसत होते.काशी विश्वनाथ महादेवाची पवित्र पिंड आमच्या नजरेच्या कक्षेत आली होती. काशी विश्वनाथ महादेवाची पवित्र पिंड आमच्या नजरेच्या कक्षेत आली अन् त्याचवेळी माझ्या अंतर्मनात आई अहिल्याबाई होळकर यांचं पवित्र स्मरण झाले..! आज जी काशी विश्वनाथ महादेवाची पवित्र पिंड आम्ही बघत होतो, त्याच्या आजच्या अस्तित्वाला जी माऊली निमित्त होती ती आई अहिल्याबाई होळकर श्रद्धेने स्मरणात येत होती.माझ्या अंतर्मनात एकाच वेळी काशी विश्वनाथ महादेव अन् आई अहिल्याबाई होळकर श्रद्धेने येत होते.यातील काशी विश्वनाथ महादेव समोर दिसत होते तर आई अहिल्याबाई होळकर यांचं त्याच श्रद्धेने माझ्या हृदयात त्यांचं पूजन सुरू होते.आज माझ्या समोर दिसत असणाऱ्या काशी विश्वनाथ महादेवाच्या दार्शनिक अस्तित्वाला जी माऊली निमित्त होती तिचं स्मरण ,अगदी काशी विश्वनाथ महादेवाच्या पवित्र स्मरणा एवढेच सर्वोच्च स्थान माझ्या हृदयात सुरू होते.आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचे स्थान काय असते याची प्रत्यक्ष अनुभूती मी याचि देही याचि डोळा घेत होतो. आई अहिल्याबाई होळकर नसत्या तर काशी विश्वनाथ महादेवाच्या आजच्या भौतिक पिंडीच्या अस्तित्वालाच आपण नक्कीच मुकलो असतो याची सतत जाणीव होत होती.दर्शन रांगेत असताना व दर्शन घेताना मी मोठ्याने घोषणा दिली " हर हर महादेव..!" माझ्या पाठोपाठ इतर भक्तांनी देखील " हर हर महादेव..!" अशी घोषणा दिली.


अखेर आमच्या समोर काशी विश्वनाथ महादेवाची पिंड नजरेत आली होती. काशी विश्वनाथाला श्रद्धेने डोळयात सामावून घेतलं. आपल्या आई अहिल्याबाईने याच काशी विश्वनाथाला श्रद्धेने जपून ठेवलं याचं आत्मिक समाधान लाभले होते.काही श्रध्येयांचे दर्शन झाले की आंतरिक ऊर्जा निर्माण होते तोच अनुभव काशी विश्वनाथाच्या दर्शनाने लाभला होता.मुख्य मंदिर गाभाऱ्यातून आम्ही बाहेर पडलो होतो. खूप विस्तीर्ण सुनियोजित परिसराच्या मधोमध काशी विश्वनाथ महादेव मंदिर अगदी कपाळावरील भस्माच्या मधोमध लावलेला केशरी गंधासारखे उठून दिसत होते.मुख्य मंदिराच्या आवारात सर्वत्र कमालीची स्वच्छ्ता नजरेत भरत होती. आम्ही काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसरातील ज्ञानवापी विहिरीच्या जवळ आलो होतो.तिथे पुरातन नंदीची मूर्ती दिसून आली. पुरातन नंदीचे मुख, ज्या दुसऱ्या बाजूला लगतच मशीद आहे तिकडे होते. नंदीचे श्रद्धेने दर्शन घेतले. प्रत्येक शिवमंदिरात नंदीचे मुख महादेवाच्या पिंडीकडेच असते हे विशेष..! पुरातन नंदीच्या बाजूलाच ज्ञानवापी विहीर दिसून आली.शिवभक्त श्रद्धेने त्या ज्ञानवापी विहिरीचे दर्शन घेत होते.आम्हीही श्रद्धेने दर्शन घेतले.तेथील सेवेकरींना या विहिरीविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, औरंगजेबाने ज्यावेळी काशी विश्वनाथ महादेव मंदिराला क्षति पोहोचविली त्यावेळी काही भक्तांनी मूळ काशी विश्वनाथ महादेवाच्या पिंडीचे याच ज्ञानवापी विहिरीत सुरक्षितपणे विसर्जन केले आहे.त्यामुळे या ज्ञानवापी विहिरीचे शिवभक्तांच्या हृदयात खूप श्रद्धास्थान आहे.


आमचे दर्शन आटोपले होते.मी माझ्या सोबत संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची विविध मंत्र असलेली विधी पुस्तिका सोबत आणलेली होती.काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसरातील कडेच्या बाजूला आम्ही निवांत बसलो होतो.मी श्रद्धेने विधी पुस्तिका वाचत बसलो होतो. बराचसा भाग मुखोदगत असल्याने डोळे मिटून मंत्राचे उच्चारण सुरू केले होते.ज्यावेळी पालखेड येथील ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेवाच्या मंदिरात पुजारी नव्हते त्यावेळी मी अन् आमच्याच पालखेड गावातील आदरणीय सदाशिव आण्णा पाटील जगताप ( कृषी सहायक अधिकारी ) आम्ही ज्या श्रद्धेने दररोज पहाटे मंदिरात मंत्रोच्चारात महादेवाचे पूजन केले होते त्याची पुनश्च अनुभुती येत होती. आमची विधी पूजा आटोपली होती.आम्ही सर्वांनी साष्टांग दंडवत घालून काशी विश्वनाथ महादेवाला प्रणाम केला.


संपूर्ण मंदिर परिसर फिरत असताना आम्ही, ज्याठिकाणी उभा राहून भारताचे महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी याच काशी विश्वनाथ महादेव कॉरिडॉरचे उद्घाटन प्रसंगी भाषण केले होते त्या ठिकाणी आलो होतो.एका महान सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाने या आजच्या भव्य अन् दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या काशी विश्वनाथ महादेव मंदिराला आपल्या सर्वांच्या समोर प्रस्तुत केले होते.त्याक्षणी अंतर्मनातून वंदनीय नरेंद्र मोदी यांना वंदन केले..! उर्वरित परिसरात अजुन सुशोभीकरण सुरू होते.तिकडे जाण्यास परवानगी नव्हती. सुशोभीकरण सुरू असणाऱ्या याच परिसरात आई अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र पुतळ्याचे दर्शन घेण्याचे राहून गेले.भविष्यात जेंव्हा जाऊ तेंव्हा आई अहिल्याबाईचे दर्शन नक्कीच होईल ,कारण सध्याच्या काशी विश्वनाथ महादेवाच्या अस्तित्वाला हीच माऊली निमित्त होती..!


हर हर महादेव..!🕉️

वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -१३/२/२०२२, रविवार.


क्रमशः