गुरुवार, ३१ मार्च, २०२२
पिंजऱ्यातला मास्तर अन् मीनाकुमारी एक विलक्षण योगायोग..!
शनिवार, २६ मार्च, २०२२
" एका तीर्थस्थळाला, भेट द्यायची राहूनच गेली..! " 😔
शनिवार, १९ मार्च, २०२२
धावती भेट, निवातंपणा देऊन गेली..!
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
धावती भेट, निवातंपणा देऊन गेली..!
==================================
निवांतच भेट व्हायला हवी असं काही नसतं, भेट ही भेट असते.ती जर आपल्या हृदयाला भिडणारी असेल तर अशा भेटी धावत्या भेटीत जरी झाल्या तरी निवांतपणातील निर्भेळ आनंद नक्कीच देऊन जातात..! फक्त भेट देणारं व्यक्तिमत्व अन् ज्यांची भेट घ्यायची असेल ते व्यक्तिमत्व एकमेकांना निर्भेळ आनंद देणारे हवे इतकेच..!
आज दिनांक १९ मार्च २०२२ , शनिवार रोजी काही कामानिमित्त पुणे येथून देवाची आळंदी येथे जाण्याचा योग्य आला.औरंगाबाद येथून निघतानाच माझ्या मनात विचार आला होता की, देवाची आळंदी येथे माझे प्रिय फेसबुक मित्र आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू राहतात, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू..! भर उन्हात सावलीतल्या मोठ्या गाडीत पुणे गाठले. पुण्यात पाय ठेवल्या ठेवल्या मराठवाड्यातला माणूस, पुण्यात आला होता, यांचं माझ्या मलाच अप्रूप वाटायला लागले होते.पुण्याहून देवाची आळंदी गाठली. देवाची आळंदी आल्यावर माय माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या चिरंजीव समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शन आटोपल्यावर माझ्या फेसबुक मित्र यादीतील प्रिय मित्र कल्याण भाऊ भोगे गुरू यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला.मला न्यायला कुठे येणार ते ठिकाण ठरले अन् काही वेळातच आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू स्कूटी घेऊन हसतमुखाने स्वागत करायला उपस्थित झाले. दुचाकीवर बसून त्यांच्या घरी गेलो.घरात प्रवेश केल्या केल्या समोर आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांचे तीर्थरूप वडील दिसले अन् त्यांच्या समोर नतमस्तक झालो.कुणाच्याही घरात ज्येष्ठ , वयोवृध्द माणूस दिसला की, त्या घराचे घरपण स्वर्गाहून सुंदर दिसते,अगदी तसेच आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांचं घर मला जाणवत होते.
धावती भेट म्हणता म्हणता कधी निवांत झाली हे मला, तीर्थरूप काकांना अन् आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू आम्हाला जाणवलेच नाही. आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू विद्वान व्यक्तिमत्व..! हिंदू धर्मातील शास्त्रानुसार वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व..! प्राथमिक शाळेतील वयोगटात असल्यापासून वैदिक शाळेत देवाची आळंदी येथे प्रवेश घेतला अन् पाहता पाहता एक वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व आकाराला आले.वेदशास्त्रात एवढे संपन्न झाले आहेत की, यांच्या हस्ते हिंदू धर्मातील विविध विधींचे पूजन थेट दुबई येथील हिंदू धर्मातील कार्यक्रमात यशस्वीरीत्या संपन्न झालेले आहेत. ' विद्वान सर्वत्र पुज्यते ' हे ब्रीद अंगिकारून आयुष्य व्यतीत करणारे प्रिय व्यक्तिमत्व वेदशास्त्रसंपन्न आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू होय..! मूळचे आमच्याच मराठवाड्यातील बीडचे ,पण आता देवाची आळंदी येथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत.
काही वेळ भेट घ्यायची असे नियोजित असताना, धावती भेट कधी मनाचा निवांतपणा देऊन गेली हे आम्हा दोघांच्या लक्षातही आले नाही.तीर्थरूप काकांनी माझ्याशी जो संवाद साधला,तो माझ्या स्वर्गीय वडिलांच्या अन् माझ्या नेहमी होणाऱ्या चर्चेच्या भेटीच्या आठवणीत घेऊन गेला.घरातील ज्येष्ठ माणसं, खूप मोठाली धर्मग्रंथ असतात, हे आम्ही आमच्या घरात माझ्या स्व.आई वडिलांच्या सानिध्यात होतो तेंव्हा नेहमी अनुभवयाचो.आज तोच आयुष्याच्या अनुभवाचा धर्मग्रंथ मला आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांच्या घरी जाणवत होता, तीर्थरूप भोगे काकांच्या सहवासातून..!
अखेर मला पुढील कामानिमित्त जाण्याचे नियोजन असल्याने मी तीर्थरूप काकांचे दर्शन घेतले अन् निघालो. आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांनी पुन्हा एकदा सहपरिवार आवर्जून येण्याचे निमंत्रण दिले अन् मीही ते हक्काने स्वीकारले. मला पुन्हा थेट देवाची आळंदी बस स्थानकावर नेऊन सोडले.आम्ही एकमेकांचा निरोप घेतला,पुन्हा सहपरिवार भेटण्यासाठी..!
फेसबुक हे कुणाला आभासी विश्व वाटते, नव्हे नव्हे आहेच..! पण याच आभासी विश्वात असे काही सजीव नातेसंबंध दृढ होतात,जे प्रत्यक्षातील नात्यानाही लाजवतात..! फेसबुक या आभासी विश्वात अनेक आभासी मित्र भेटतात.त्यापैकी काही आभासी वाटतात तर काही आभासी विश्वातील असूनही प्रत्यक्षातील वाटतात, जसे की, आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू..!
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -१९/३/२०२२, शनिवार.






