गुरुवार, ३१ मार्च, २०२२

पिंजऱ्यातला मास्तर अन् मीनाकुमारी एक विलक्षण योगायोग..!



 

चिंतन ©️

पिंजऱ्यातला मास्तर अन् मीनाकुमारी एक विलक्षण योगायोग..!

=============================

महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी अन् व्ही. शांताराम यांच्या पिंजरा या मराठी चित्रपटातील मास्तर, ही दोन्ही व्यक्तिमत्वे आपापल्या दुर्दैवाचे प्रतिनिधीत्व करत राहिली. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना मदिरा ( दारू ) अन् मीनाक्षीने ( स्री ) आपापल्या आयुष्यातून पुरते उध्वस्त केले. महजबींन बानो उपाख्य मीना कुमारीला मानसिकरीत्या उध्वस्त करायला तिचे वैवाहिक आयुष्य देखील निमित्त ठरले.

पिंजरा चित्रपटातील मास्तर अन् महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी या दोन व्यक्तिरेखा फक्त त्यांच्या पुरत्याच मर्यादित नव्हत्या तर त्यांनी त्याकाळच्या, आजच्या अन् भविष्यातील समाजव्यवस्थेतील अनेक व्यक्तिरेखांचे प्रतिनिधीत्व केले, करत आहे अन् करत राहतील.

नियतीचा योगायोग पहा, ज्यादिवशी महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी मृत्यू पावली अगदी त्याच दिवशी व्ही. शांताराम यांचा मराठी चित्रपट पिंजरा प्रदर्शित झाला..!

शापित कला सौंदर्य महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी ३१ मार्च १९७२ रोजी मरण पावल्या तर मराठी चित्रपट पिंजरा त्याच दिवशी म्हणजेच ३१ मार्च १९७२ रोजी प्रदर्शित झाला. नियतीने दोन दुर्दैवी व्यक्तिमत्वांना असं निरोप अन् स्वागत करून आपल्या समस्त मानव जातीसमोर प्रस्तुत केले होते. फरक फक्त एवढाच होता की, यातील एक वास्तवातील दुर्दैव होते अन् एक आभासी विश्वातील वास्तववादी दुर्दैवी सत्य होते इतकेच..! महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी अन् पिंजऱ्यातला मास्तर..! असा विलक्षण योगायोग सहसा आढळून आला नाही, हे विशेष..! पिंजऱ्यातला मास्तर अन् मीनाकुमारी एक विलक्षण योगायोग असा कलेच्या विश्वातील दुर्मिळ योगायोग पुन्हा कधी जुळून आलाच नाही.

मीनाकुमारी काय किंवा पिंजऱ्यातला मास्तर काय..दोघेही आपापल्या आयुष्यात प्रेमाच्या चटक्यात होरपळत राहिले. फक्त एकाचे होरपळणे वास्तवातील आयुष्यात होते अन् दुसऱ्याचे आभासी विश्वातील..! मात्र दोघांच्या होरपळण्याला निमित्त होते प्रेमाच्या नशेचा भांग अन् त्यातून निर्माण झालेला प्रेमभंग..! अजुन या दोघात एकासमानता ती अशी की, दोघांनाही समाजाच्या कौतुकाचं ग्लॅमर लाभलं होतं. यातील एकाला वास्तवातील ग्लॅमर लाभले तर दुसऱ्याला आभासी विश्वातील..! माणसाच्या स्वभावाचा सिद्धांत आहे की, ज्याला कुणाला ग्लॅमर मिळते अन् जेंव्हा अशांचे आयुष्य प्रेमामुळे भंग होते, त्याची समाज चर्चा मोठ्या चवीने करतो. असेच काहीसे मीनाकुमारी अन् पिंजऱ्यातल्या मास्तराचे झाले.दोघेही समाजाच्या कौतुकाचे धनी झाले. यातील एकाचे वास्तवातील दुर्दैव ठरले तर दुसऱ्याचे आभासी विश्वातील वास्तववादी दुर्दैवी..! समाजाने मात्र दोघानाही सर्वोत्तम कलाकृती म्हणून डोक्यावर घेतले.

असो, आज महजबींन बानो उपाख्य मीना कुमारी यांचा स्मृतिदिन आहे,त्यानिमित्त त्यांच्या कलासक्त अभिनय कारकिर्दीला अभिवादन..!🙏🏻
अन्...
आज व्हीं. शांताराम दिग्दर्शित पिंजरा या मराठी चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबद्दल या परिपूर्ण कलाकृतीला मनापासून दाद..! 👌

वंदे मातरम्..!

एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक - ३१/३/२०२२, गुरुवार.

शनिवार, २६ मार्च, २०२२

" एका तीर्थस्थळाला, भेट द्यायची राहूनच गेली..! " 😔


 







मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

" एका तीर्थस्थळाला, भेट द्यायची राहूनच गेली..! " 😔

===================================

तीर्थस्थळाची व्याख्या काय असं कुणी मला विचारलं तर मी सांगेल की, ज्याठिकाणी माणसाला आत्मिक समाधान लाभते ते ठिकाण अन् ज्याचा भूतकाळ ज्याला जिथं पुन्हा एकदा गहिवरून भेटतो असे ठिकाण म्हणजेच तीर्थस्थळ होय..! माणसाचं मन सतत गुंतागुंतीच्या आयुष्यात गुंतलेलं असतं.याच आयुष्याच्या गुंतागुंतीच्या धाग्यात माणसाला कधी आत्मिक समाधान शोधावं वाटतं तर कधी आपल्या गतकाळातील आठवणी ज्या ठिकाणी व्यतीत झालेल्या आहेत, तिथं स्वतः ला न्यावं वाटत..! आत्मिक समाधान अन् भूतकाळातील त्यानं व्यतीत केलेल्या स्थळांना भेट देऊन स्वतः ला समृध्द करण्यासाठी माणसानं विविध ' तीर्थस्थळं ' निर्माण केली..!

मी याच तीर्थस्थळांना ज्या ज्या वेळी शोधण्यासाठी बाहेर पडलो त्या त्या वेळी ते आत्मिक समाधान कधी पूर्ण ज्योतिर्लिंग रामेश्वरम् येथे लाभले, कधी वाराणसी येथे लाभले, कधी सोरटी सोमनाथ येथे लाभले तर कधी पुरी जगन्नाथ येथे लाभले..! या प्रत्येक  तीर्थस्थळांना भेटी देताना नेहमी माझे स्व. तीर्थरूप वडील सोबत होते.मी अशाही स्थळांना भेटी दिल्या होत्या, ज्याठिकाणी गेल्यावर माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.अर्थात ही तीच ठिकाणं होती, ज्याठिकाणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी खूप मेहनत करून स्वावलंबी आयुष्याची पायरी चढायला सुरुवात केली होती. माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांनी इ.स.साठच्या दशकात कधी कोपरगाव सारख्या ठिकाणी हॉटेल मध्ये काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते, तर श्रीरामपूर येथे ' कमवा व शिका ' हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ब्रीद अंगिकारून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांना शिक्षण घेण्यासाठी वाटेल ती कामं करणं गरजेची होतं,कारण घरून अजिबात आर्थिक, सामाजिक  पाठिंबा कोसोदुर कुणाचाही नव्हता..! कोपरगाव अन् श्रीरामपूर येथे ज्याठिकाणी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी खूप कष्टाची, हलकी कामे त्यांच्या तारुण्यात केली होती, त्या स्थळांना ज्यावेळी माझ्या स्व.वडिलांना त्यांच्या वार्धक्यात सहपरिवार भेट द्यायला घेऊन गेलो होतो, तेव्हा तेंव्हा माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना खूप गहिवरून आले होते. आपला गतकाळातील भूतकाळ वर्तमानकाळ  भेटला की, माणसाला नक्कीच गहिवरून येते, फक्त तो भूतकाळ अन् त्यातील आठवणी खूप शून्यातून निर्माण करणाऱ्या असाव्यात..! श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयाला दिलेल्या भेटीवर मी यापूर्वीच पाच भागांची लेखमाला लिहिलेली आहे.

मात्र, माझ्या आयुष्याची एक खंत कायमची मनात राहून गेली अन् ती म्हणजे माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांची शिक्षकी आयुष्यातील काही वर्ष व्यतीत केली होती, त्या स्थळांना भेट देण्याचं राहूनचं गेलं..! मी भविष्यात या स्थळांना माझ्या वडिलांना सोबत घेऊन भेट देण्याचं नियोजनही केले होते,पण नियतीने तत्पूर्वीच माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना आमच्यातून कायमचे हिरावून घेतले..! ती तीर्थस्थळं होती, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नाचनवेल व बहिरगाव, ता.कन्नड, जि.प.प्रा.शा. शहापूर, घोडेगाव व मेहबुबखेडा, ता.गंगापूर, धोंदलगाव, भिवगाव, अन् दहेगाव ता. वैजापूर..! यातील दहेगाव तर आमच्या पालखेड गावाचेच जुळे गाव..! दहेगावाचे अन् माझ्या स्व.वडिलांचे विशेष नाते तहहयात राहिले..!

काल दिनांक २६/३/२०२२, शनिवार रोजी दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने अशाच एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा योग आला. ज्याठिकाणी माझ्या स्व.वडिलांना घेऊन जाण्याचे माझे नियोजन होते पण, नियतीने ते पूर्ण होऊ दिले नाही.ठिकाणं होते जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल, ता.कन्नड, जि. औरंगाबाद. याच शाळेत माझ्या स्व.वडिलांच्या शिक्षकी आयुष्याची सुरुवात इ.स. साठच्या दशकात झाली होती.याच माध्यमिक शाळेत एक शिक्षक म्हणून माझ्या स्व.वडिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम शिस्तप्रिय मुख्याध्यापक अन् शिक्षक वंदनीय स्व. दाशरथे सर पहिल्यांदा भेटले होते. ( आदरणीय स्व. दाशरथे सरांच्या शिस्तप्रिय आयुष्यावर मी यापूर्वीच एक लेख माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे. ) याच नाचनवेल माध्यमिक शाळेतील माझ्या स्व.वडिलांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी विविध प्रशासकीय, राजकीय ,धार्मिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली होती..!

काल दिनांक २६/३/२०२२ रोजी जेंव्हा भर दुपारी मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात प्रवेश केला, तेंव्हा माझ्या स्व.वडिलांनी याच शाळेविषयी नेहमी व्यक्त केलेल्या आठवणींनी माझ्या मनात जागा घ्यायला सुरुवात केली होती. त्या स्थळाला भेट देण्यासाठी माझ्या स्व.वडिलांना घेऊन येण्याचं माझं स्वप्न अपूर्णच राहून गेलं होतं. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर सर्वात अगोदर मुख्याध्यापक कार्यालयात गेलो तिथं खूप शिस्तप्रिय मुख्याध्यापक आदरणीय स्व.दाशरथे सरांच नाव, फलकावर बघितलं अन् भूतकाळात रमून गेलो. आदरणीय स्व.दाशरथे सर अन् माझ्या स्व.वडिलांचं असलेलं भावनिक नातं मनात भावनेचा हिंदोळा निर्माण करून गेले.आदरणीय स्व.दाशरथे सरांनी माझ्या स्व.वडिलांना जो जीव लावला होता, तो याच भूमीत..! जो पर्यंत माझे वडील हयात होते तो पर्यंत ते नेहमी आदरणीय दाशरथे सरांविषयी खूप अभिमानाने भरभरून व्यक्त व्हायचे.भावनिक ऋणानुबंध असला की, माणूस जरा जास्तच व्यक्त होतो किंवा त्या आठवणी चिरंजीव असतात हेच खरं..! प्रत्येक वर्गाच्या समोर मुद्दामहून जाऊन आलो कारण, याच जागेवर माझ्या स्व.वडिलांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्यातील काही काळ व्यतीत केला होता.ज्या तरुणाला ना सामाजिक आधार होता ना आर्थिक आधार होता, त्या तरुणाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सिद्धांतावर आयुष्य व्यतीत करून शिक्षण घेऊन कमवा व शिका व्रत अंगिकारून स्वतः ला सिद्ध केले होते. 

हीच ती जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेल होती, जी आमच्या आजच्या असणाऱ्या थोड्याफार सुखाला निमित्त ठरली होती, कारण येथूनच सर्वात पहिल्यांदा माझ्या स्व. वडिलांना  स्वतः च्या पायावर उभे राहण्यास सुरुवात झाली होती.  याच नाचनवेल प्रशालेचे आमच्या स्व.वडिलांना स्वतच्या कक्षेत घेतले होते. नाचनवेल या गावातील याच शाळेतून माझ्या स्व.वडिलांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्याला सर्वात पहिल्यांदा प्रारंभ केला होता.एका अर्थाने नाचनवेलची हीच शाळा आमच्या कुटुंबाची पाहिली पालकत्व निभावणारी वस्तू अन् वास्तू ठरली होती..! याच नाचनवेलच्या तत्कालीन शाळेतील अतिशय शिस्तप्रिय मुख्याध्यापक आदरणीय स्व.दाशरथे सरांनी दिलेला मूलमंत्र, तहहयात माझे वडील त्यांच्या शिक्षकी आयुष्यात पाळत राहिले..! याच नाचनवेल गावातील अनेक विद्यार्थ्यांनी माझ्या स्व.वडिलांवर खूप प्रेम केले..! मी मागे एकदा नाचनवेल येथील प्रतिष्ठित  नागरिक तथा माजी जिल्हा परिषद औरंगाबाद उपाध्यक्ष आदरणीय विठ्ठलराव थोरात पाटील भाऊंना फोनही केला होता. आदरणीय विठ्ठलराव थोरात यांना फोन करण्याचे कारण असे की, माझ्या स्व.वडिलांचे खूप आवडते विद्यार्थी होते आदरणीय विठ्ठलराव थोरात पाटील..! आज वेळेअभावी त्यांच्या घरी जाणे शक्य झाले नाही,पण भविष्यात कधीतरी नक्कीच जाईल..!

काल दिनांक २६/३/२०२२ रोजी मला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाचनवेलच्या प्रांगणात घेऊन जायला जे निमित्त ठरले ते माझे  सहकारी शिक्षक  आदरणीय सुरेश भाऊ अक्कर सर..! खूप खूप धन्यवाद सर, तुमच्यामुळे एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा सुवर्णयोग जुळून आला..! सोबत होते, खूप जिवलग मित्र तथा सहकारी शिक्षक आदरणीय संजय भाऊ राजपूत ( गोठवाल ) सर..!

नियती माणसाच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी पूर्ण करत नाही,त्यात अपूर्णता ठेवतेच..! कदाचित याच अपूर्णतेत्त ,पूर्णत्वाचा आत्मानंद घ्यावा हेच नियतीला अपेक्षित असेल..! माझ्या आयुष्यातील एक अपूर्णता हीच राहिली होती की, ज्या ज्या ठिकाणी माझ्या स्व.वडिलांनी एक शिक्षक म्हणून अगदी समरसून सेवा दिली होती, त्या स्थळांना माझ्या स्व.वडिलांना सहपरिवार भेटी देण्याची अपूर्णता राहूनच गेली..! आज जेंव्हा  कधी या शाळांना भेटी देतो किंवा भविष्यात देईल तेंव्हा तेंव्हा तो अपूर्णतेचा आनंद, खूप गहिवर निर्माण करून मनाला आनंद नक्कीच देतो किंवा भविष्यात देईल,कारण तिथल्या आठवणी आपल्याशी खूप गहिवर निर्माण करून जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून..!

बहुदा, नियतीने माणसाला, सर्वच गोष्टी पूर्ण दिलेल्या नाहीत, कारण अपूर्णतेत पूर्णत्वाचा आत्मानंद माणसाला घेता यावा म्हणून..! अर्थात हे भावविश्वाच्या सागरात पोहणाऱ्यानांच जाणवेल..!🙏🏻

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक - २७/३/२०२२, रविवार.

शनिवार, १९ मार्च, २०२२

धावती भेट, निवातंपणा देऊन गेली..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


धावती भेट, निवातंपणा देऊन गेली..!


==================================


निवांतच भेट व्हायला हवी असं काही नसतं, भेट ही भेट असते.ती जर आपल्या हृदयाला भिडणारी असेल तर अशा भेटी धावत्या भेटीत जरी झाल्या तरी  निवांतपणातील निर्भेळ आनंद नक्कीच देऊन जातात..! फक्त भेट देणारं व्यक्तिमत्व अन् ज्यांची भेट घ्यायची असेल ते व्यक्तिमत्व एकमेकांना निर्भेळ आनंद देणारे हवे इतकेच..!


आज दिनांक १९ मार्च २०२२ , शनिवार रोजी काही कामानिमित्त पुणे येथून देवाची आळंदी येथे जाण्याचा योग्य आला.औरंगाबाद येथून निघतानाच माझ्या मनात विचार आला होता की, देवाची आळंदी येथे माझे प्रिय फेसबुक मित्र आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू राहतात, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू..! भर उन्हात सावलीतल्या मोठ्या गाडीत पुणे गाठले. पुण्यात पाय ठेवल्या ठेवल्या मराठवाड्यातला माणूस, पुण्यात आला होता, यांचं माझ्या मलाच अप्रूप वाटायला लागले होते.पुण्याहून देवाची आळंदी गाठली. देवाची आळंदी आल्यावर माय माऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या चिरंजीव समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शन आटोपल्यावर माझ्या फेसबुक मित्र यादीतील प्रिय मित्र कल्याण भाऊ भोगे गुरू यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला.मला न्यायला कुठे येणार ते ठिकाण ठरले अन् काही वेळातच आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू स्कूटी घेऊन हसतमुखाने स्वागत करायला उपस्थित झाले. दुचाकीवर बसून त्यांच्या घरी गेलो.घरात प्रवेश केल्या केल्या समोर आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांचे तीर्थरूप वडील दिसले अन् त्यांच्या समोर नतमस्तक झालो.कुणाच्याही घरात ज्येष्ठ , वयोवृध्द माणूस दिसला की, त्या घराचे घरपण स्वर्गाहून सुंदर दिसते,अगदी तसेच आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांचं घर मला जाणवत होते.


धावती भेट म्हणता म्हणता कधी निवांत झाली हे मला, तीर्थरूप काकांना अन् आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू आम्हाला जाणवलेच नाही. आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू विद्वान व्यक्तिमत्व..! हिंदू धर्मातील शास्त्रानुसार वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व..! प्राथमिक शाळेतील वयोगटात असल्यापासून वैदिक शाळेत देवाची आळंदी येथे प्रवेश घेतला अन् पाहता पाहता एक वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व आकाराला आले.वेदशास्त्रात एवढे संपन्न झाले आहेत की, यांच्या हस्ते हिंदू धर्मातील विविध विधींचे पूजन थेट दुबई येथील हिंदू धर्मातील कार्यक्रमात यशस्वीरीत्या संपन्न झालेले आहेत. ' विद्वान सर्वत्र पुज्यते ' हे ब्रीद अंगिकारून आयुष्य व्यतीत करणारे प्रिय व्यक्तिमत्व वेदशास्त्रसंपन्न आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू होय..! मूळचे आमच्याच मराठवाड्यातील बीडचे ,पण आता देवाची आळंदी येथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत.


काही वेळ भेट घ्यायची असे नियोजित असताना, धावती भेट कधी मनाचा निवांतपणा देऊन गेली हे आम्हा दोघांच्या लक्षातही आले नाही.तीर्थरूप काकांनी माझ्याशी जो संवाद साधला,तो माझ्या स्वर्गीय वडिलांच्या अन् माझ्या नेहमी होणाऱ्या चर्चेच्या भेटीच्या आठवणीत घेऊन गेला.घरातील ज्येष्ठ माणसं, खूप मोठाली धर्मग्रंथ असतात, हे आम्ही आमच्या घरात माझ्या स्व.आई वडिलांच्या सानिध्यात होतो तेंव्हा नेहमी अनुभवयाचो.आज तोच आयुष्याच्या अनुभवाचा धर्मग्रंथ मला आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांच्या घरी जाणवत होता, तीर्थरूप भोगे काकांच्या सहवासातून..!


अखेर मला पुढील कामानिमित्त जाण्याचे नियोजन असल्याने मी तीर्थरूप काकांचे दर्शन घेतले अन् निघालो. आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू यांनी पुन्हा एकदा सहपरिवार आवर्जून येण्याचे निमंत्रण दिले अन् मीही ते हक्काने स्वीकारले. मला पुन्हा थेट देवाची आळंदी बस स्थानकावर नेऊन सोडले.आम्ही एकमेकांचा निरोप घेतला,पुन्हा सहपरिवार भेटण्यासाठी..!


फेसबुक हे कुणाला आभासी विश्व वाटते, नव्हे नव्हे आहेच..! पण याच आभासी विश्वात असे काही सजीव नातेसंबंध दृढ होतात,जे प्रत्यक्षातील नात्यानाही लाजवतात..! फेसबुक या आभासी विश्वात अनेक आभासी मित्र भेटतात.त्यापैकी काही आभासी वाटतात तर काही आभासी विश्वातील असूनही प्रत्यक्षातील वाटतात, जसे की, आदरणीय कल्याण भाऊ भोगे गुरू..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -१९/३/२०२२, शनिवार.