#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
' मोठं कार्य..!'
=====================
प्रत्येक प्रवास आपल्याला आपल्यातील लपून बसलेल्या माणसाला सतत हीच जाणीव करून देत असतो की, " तू फार काही मोठा नाहीस, तुझ्या पेक्षा कितीतरी मोठी माणसं याच समाजात आहेत..!" यातील मोठा अन् मोठी माणसं याचा अर्थ समजून घेताना आपण त्याच्या खूप खोलवर असलेल्या अर्थात शिरलो तर सहज लक्षात येईल की, मोठा अन् मोठी माणसं हा फक्त शब्द नसून त्याच्या पाठीमागे खूप मोठा लौकिकार्थ लपलेला असतो..!
आपल्या भारतात ज्या भूमीचे कधीही न फिटणारे ऋण आपल्या समस्त भारतीयांवर आहे,त्याच शौर्य भूमीत म्हणजेच राजस्थान मध्ये खूप मोठा इतिहास अन् खूप मोठी माणसं होती अन् आहेत हाच खरा अर्थ या शब्दांच्या मागे लपलेला आहे. ज्या शौर्य भूमीला आपण फक्त शौर्याच्या भूमिकेत बघत आलेलो आहोत, त्याच भूमीत जर कुणी आपल्या समोर अचानक समाजसेवा रुपी कार्याच्या रूपाने उभे राहिले तर नक्कीच खूप अभिमान वाटतो. सेवा ही विविध रूपाने दिली जाते.सेवा देताना कुणी विविध सामाजिक संघटन उभे करून देते तर कुणी शासनाच्या अधिकृत संस्थेत सहभागी होऊन आपल्या परीने सेवा देते.
मी दिनांक २४/५/२०२२ रोजी रात्री चित्तोडगड रेल्वे स्थानकावर माझ्या पुढील नियोजित प्रवासाकरिता बसलेलो होतो.तत्पूर्वी रेल्वे स्थानकाच्या बाहेर फेरफटका मारून विविध माणसं पाहून ताजेतवाने होऊन आलो होतो.रेल्वे स्थानक परिसरातील एका कोपऱ्यात बसून मला भेटलेला भूतकाळ बघत होतो.त्यात कुणी वर्तमानातील भेटतं का याचा शोध घेत होतो.इतक्यात काही माणसं एका वाहनात तयार केलेला स्वयंपाक घेऊन आली.त्यांनी आपल्या सोबत जो काही तयार स्वयंपाक आणला होता,तो रांगेत मांडला अन् त्यांच्यातील एक सद्गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरू लागले.फिरता फिरता ते सद्गृहस्थ मोठमोठ्याने म्हणत होते की, " भोजन कर लो, भोजन..! "
मी कुतुहलाने बघत होतो.त्या सद्गृहस्थाने जे नम्र आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून रेल्वे स्थानक परिसरातील सर्व भिकारी माणसं, काही प्रवासी माणसं पटापट एका रांगेत मांडलेल्या जेवणाच्या भांड्याकडे गेली. एका रांगेत उभं राहून प्रत्येकाने भोजन घेतले अन् निवांत बाजूला बसून त्या जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. भोजन देताना त्यांचा धर्म पाहून दिल्या गेले नाही,कारण भोजन घेणारे त्यांच्या पेहरावावरून हिंदू होते अन् मुस्लिम देखील होते..!
ते, जे गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरून ' भोजन कर लो भोजन..!' असा आवाज देत होते, त्यांची मी भेट घेतली.त्यांनी सांगितले की,त्यांची एक सेवाभावी संस्था आहे अन् त्याच संस्थेच्या मार्फत दररोज रात्री साधारणतः आठ वाजता चित्तोडगड रेल्वे स्थानक परिसरात मोफत भोजन वाटप करण्यात येते.संबंधित सद्गृहस्थाशी बोलताना मला त्यांचे काही शब्द परिचित जाणवले.मला राहवले नाही,मी त्यांना अखेर विचारलेच...
" आप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुडे हो क्या..?"
यावर ते सद्गृहस्थ आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले..
" आप ने कैसे पहचना..?"
मी म्हणालो - " आपके कुछ शब्द और काम करने का तरिका मुझे परिचित लगा..!"
त्या सद्गृहस्थाचे नाव होते संजय गिल..! ते चित्तोडगड येथील रहिवासी होते. स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते अन् त्यांचं अख्खं कुटुंब देखील संघ कार्यात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कार्य करत होते.मला भेटून त्यांना खूप आनंद झाला होता.मीही त्यांना थोडीफार मदत केली.त्यांनी दिलेले भोजन ग्रहण केले.माझ्या पुढील नियोजित प्रवासाची वेळ झाली होती.आम्ही एकमेकांना एकमेकांचा परिचय दिला अन् प्रेमाचा निरोप घेतला,पुन्हा आयुष्यात कधीतरी भेटण्यासाठी..!
आज समाजात अशा कित्येक सामाजिक संस्था कार्यरत आहेत,ज्यांच निस्वार्थ सामाजिक कार्य,खूप वरच्या दर्जाचे आहे.फक्त यातील काही संस्था आपल्या कार्याला प्रसिध्दी देतात तर काही संस्था अविरतपणे आपलं कार्य कोणतीही प्रसिध्दी न करता सुरू ठेवतात. काही माणसं, आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विविध संस्थेच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या सामाजिक कार्य करतात तो भाग वेगळा..! माझ्या मते निस्वार्थ हेतूने कार्य करणाऱ्या चांगल्या कार्याला नक्कीच प्रसिध्दी द्यायला हवी, जेणेकरून त्या कार्याचं कुणीतरी अनुकरण करील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक सामाजिक कार्य करतो.त्यात कित्येक स्वयंसेवक प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कार्य करत असतात.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला पाहिजे तेवढी प्रसिध्दी देत नाही.माझ्या मते प्रसिध्दी द्यायला हवी, जेणेकरून संघ सामाजिक कार्यात किती अग्रेसर आहे हे त्यांना समजेल जे संघाला फक्त आणि फक्त हिंदू हितैशीच समजतात..! अर्थात संघातील सामाजिक कार्याला प्रसिध्दी द्यायला हवी हे माझे वैयक्तिक मत काही स्वयंसेवकांना पटणार नाही, कारण आजही संघातील सामाजिक कार्य करणारे बरेच स्वयंसेवक आपल्या प्रसिध्दी पासून कोसोदूर आहेत..!
असो, भुकेल्या पोटाला अन्न देऊन तृप्त करणारं खूप मोठं कार्य बघून माझं मन तृप्तीच्या ढेकराने तृप्त झाले होते..!
स्थळ - चित्तोडगड रेल्वे स्टेशन ( राजस्थान )
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
लेखन दिनांक - २८/५/२०२२, शनिवार.
ते, जे गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरून ' भोजन कर लो भोजन..!' असा आवाज देत होते, त्यांची मी भेट घेतली.त्यांनी सांगितले की,त्यांची एक सेवाभावी सं



