शनिवार, २८ मे, २०२२

' मोठं कार्य..!'










#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' मोठं कार्य..!'


=====================


प्रत्येक प्रवास आपल्याला आपल्यातील लपून बसलेल्या माणसाला सतत हीच जाणीव करून देत असतो की, " तू फार काही मोठा नाहीस, तुझ्या पेक्षा कितीतरी मोठी माणसं याच समाजात आहेत..!" यातील मोठा अन् मोठी माणसं याचा अर्थ समजून घेताना आपण त्याच्या खूप खोलवर असलेल्या अर्थात शिरलो तर सहज लक्षात येईल की, मोठा अन् मोठी माणसं हा फक्त शब्द नसून त्याच्या पाठीमागे खूप मोठा लौकिकार्थ लपलेला असतो..!


आपल्या भारतात ज्या भूमीचे कधीही न फिटणारे ऋण आपल्या समस्त भारतीयांवर आहे,त्याच शौर्य भूमीत म्हणजेच राजस्थान मध्ये खूप मोठा इतिहास अन् खूप मोठी माणसं होती अन् आहेत हाच खरा अर्थ या शब्दांच्या मागे लपलेला आहे. ज्या शौर्य भूमीला आपण फक्त शौर्याच्या भूमिकेत बघत आलेलो आहोत, त्याच भूमीत जर कुणी आपल्या समोर अचानक समाजसेवा रुपी कार्याच्या रूपाने उभे राहिले तर नक्कीच खूप अभिमान वाटतो. सेवा ही विविध रूपाने दिली जाते.सेवा देताना कुणी विविध सामाजिक संघटन उभे करून देते तर कुणी शासनाच्या अधिकृत संस्थेत सहभागी होऊन आपल्या परीने सेवा देते.


मी दिनांक २४/५/२०२२ रोजी रात्री चित्तोडगड रेल्वे स्थानकावर माझ्या पुढील नियोजित प्रवासाकरिता बसलेलो होतो.तत्पूर्वी रेल्वे स्थानकाच्या बाहेर फेरफटका मारून विविध माणसं पाहून ताजेतवाने होऊन आलो होतो.रेल्वे स्थानक परिसरातील एका कोपऱ्यात बसून मला भेटलेला भूतकाळ बघत होतो.त्यात कुणी वर्तमानातील भेटतं का याचा शोध घेत होतो.इतक्यात काही माणसं एका वाहनात तयार केलेला स्वयंपाक घेऊन आली.त्यांनी आपल्या सोबत जो काही तयार स्वयंपाक आणला होता,तो रांगेत मांडला अन् त्यांच्यातील एक सद्गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरू लागले.फिरता फिरता ते सद्गृहस्थ मोठमोठ्याने म्हणत होते की, " भोजन कर लो, भोजन..! " 

मी कुतुहलाने बघत होतो.त्या सद्गृहस्थाने जे नम्र आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद म्हणून रेल्वे स्थानक परिसरातील सर्व भिकारी माणसं, काही प्रवासी माणसं पटापट एका रांगेत मांडलेल्या जेवणाच्या भांड्याकडे गेली. एका रांगेत उभं राहून प्रत्येकाने भोजन घेतले अन् निवांत बाजूला बसून त्या जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. भोजन देताना त्यांचा धर्म पाहून दिल्या गेले नाही,कारण भोजन घेणारे त्यांच्या पेहरावावरून हिंदू होते अन् मुस्लिम देखील होते..!


ते, जे गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरून ' भोजन कर लो भोजन..!' असा आवाज देत होते, त्यांची मी भेट घेतली.त्यांनी सांगितले की,त्यांची एक सेवाभावी संस्था आहे अन् त्याच संस्थेच्या मार्फत दररोज रात्री साधारणतः आठ वाजता चित्तोडगड रेल्वे स्थानक परिसरात मोफत भोजन वाटप करण्यात येते.संबंधित सद्गृहस्थाशी बोलताना मला त्यांचे काही शब्द परिचित जाणवले.मला राहवले नाही,मी त्यांना अखेर विचारलेच...

" आप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुडे हो क्या..?"

यावर ते सद्गृहस्थ आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले..

" आप ने कैसे पहचना..?"

मी म्हणालो - " आपके कुछ शब्द और काम करने का तरिका मुझे परिचित लगा..!"

त्या सद्गृहस्थाचे नाव होते संजय गिल..! ते चित्तोडगड येथील रहिवासी होते. स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते अन् त्यांचं अख्खं कुटुंब देखील संघ कार्यात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कार्य करत होते.मला भेटून त्यांना खूप आनंद झाला होता.मीही त्यांना थोडीफार मदत केली.त्यांनी दिलेले भोजन ग्रहण केले.माझ्या पुढील नियोजित प्रवासाची वेळ झाली होती.आम्ही एकमेकांना एकमेकांचा परिचय दिला अन् प्रेमाचा निरोप घेतला,पुन्हा आयुष्यात कधीतरी भेटण्यासाठी..!


आज समाजात अशा कित्येक सामाजिक संस्था कार्यरत आहेत,ज्यांच निस्वार्थ सामाजिक कार्य,खूप वरच्या दर्जाचे आहे.फक्त यातील काही संस्था आपल्या कार्याला प्रसिध्दी देतात तर काही संस्था अविरतपणे आपलं कार्य कोणतीही प्रसिध्दी न करता सुरू ठेवतात. काही माणसं, आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विविध संस्थेच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या सामाजिक कार्य करतात तो भाग वेगळा..! माझ्या मते निस्वार्थ हेतूने कार्य करणाऱ्या चांगल्या कार्याला नक्कीच प्रसिध्दी द्यायला हवी, जेणेकरून त्या कार्याचं कुणीतरी अनुकरण करील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक सामाजिक कार्य करतो.त्यात कित्येक स्वयंसेवक प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कार्य करत असतात.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला पाहिजे तेवढी प्रसिध्दी देत नाही.माझ्या मते प्रसिध्दी द्यायला हवी, जेणेकरून संघ सामाजिक कार्यात किती अग्रेसर आहे हे त्यांना समजेल जे संघाला फक्त आणि फक्त हिंदू हितैशीच समजतात..! अर्थात संघातील सामाजिक कार्याला प्रसिध्दी द्यायला हवी हे माझे वैयक्तिक मत काही स्वयंसेवकांना पटणार नाही, कारण आजही संघातील सामाजिक कार्य करणारे बरेच स्वयंसेवक आपल्या प्रसिध्दी पासून कोसोदूर आहेत..!


असो, भुकेल्या पोटाला अन्न देऊन तृप्त करणारं खूप मोठं कार्य बघून माझं मन तृप्तीच्या ढेकराने तृप्त झाले होते..!


स्थळ - चित्तोडगड रेल्वे स्टेशन ( राजस्थान )


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


लेखन दिनांक - २८/५/२०२२, शनिवार.



ते,  जे गृहस्थ रेल्वे स्थानक परिसरात फिरून ' भोजन कर लो भोजन..!' असा आवाज देत होते, त्यांची मी भेट घेतली.त्यांनी सांगितले की,त्यांची एक सेवाभावी सं 

शनिवार, २१ मे, २०२२

" बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच..! "


 


चिंतन ©️


" बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच..! "


===================================


माणूस जन्मतः भटका आहे. काहींच्या आयुष्यात सामाजिक जीवनप्रणाली नुसार भटके आयुष्य त्याच्या माथी आले..! माणूस सतत त्याच्या आयुष्याचं स्थैर्य त्याच्या प्रवासात शोधत राहिला.जिथं त्याला स्थैर्य प्राप्त झाले तिथं त्यानं आपलं बस्तान बसवलं.जिथं माणूस स्थिर झाला तिथं त्यानं आपली माणसं आपल्या भोवती आपल्या स्वभावानुसार जमा केली.जमा होणारी माणसं ,माणसाच्या स्वभावानुसार जमा होत गेली.प्रेमळ स्वभाव, प्रेमळ माणसं आपल्या भोवती जमा करत गेला तर संकुचित वृत्तीचा स्वभाव संकुचित मनोवृत्तीच आपल्या भोवती जमा करत गेला..! आपला स्वभाव आपल्या सभोवती असणाऱ्या मनोवृत्तींना आपल्याकडे निमंत्रित करत गेला हेच माणसाच्या सामाजिक प्राणी असाण्याचं निमित्त ,बाकी दुसरं काहीही नाही..!


बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच हे मी याच साठी म्हणतोय की, बुऱ्हाणपूर हे आजचं शहर मला ,माझ्या स्व.आईला, माझ्या आईच्या आईला म्हणजेच माझ्या आजीला जी आजही शंभरीच्या आसपास असून हयात आहे तिला खूप जवळचं वाटत होते अन् आजही वाटत आहे.बुऱ्हाणपूर जरी आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश मध्ये असले तरी ते आमच्या सारख्या आयुष्याची भटकंती करणाऱ्या अनेक माणसाचं प्रतिनिधीत्व करणारे गाव वाटतं..!


माणसाच्या आयुष्यातील नात्याचा प्रारंभ त्याचा अनेक पूर्वजांकडून होत असतो.जिथं पर्यंत त्याला आपले पूर्वज ठावूक असतात, तिथं पर्यंत तो त्यांचं मूळ शोधत जात असतो.जसं माझ्या स्व.वडिलांचं मूळ नेवासा जिल्हा अहमदनगर इथपर्यंत ठावूक असल्याने वडिलांच्या कडील मूळ नेवासा गावापर्यंत येऊन थांबते.अगदी तसेच माझ्या आई आजीचे मूळ गाव हेच बुऱ्हाणपूर आहे,जे की, आजच्या मध्यप्रदेश राज्यात येते.


माझ्या आई आजीचे नाव तिच्या आई वडिलांकडील आडनावानुसार सुशीलाबाई ठाकरे होय. याच बुऱ्हाणपूर गावात माझ्या आई आजीचा जन्म झाला.याच बुऱ्हाणपूर गावात माझ्या आई आजीचे एकोणिसाव्या शतकातील विसाव्या दशकातील शेवटच्या कालखंडात अन् तिसाव्या दशकातील सुरुवातीच्या कालखंडात शिक्षण झाले.माझी आई आजी त्याकाळची इयत्ता सहावी उत्तीर्ण आहे. याच बुऱ्हाणपूर गावात त्याकाळी माझ्या आई आजीच्या वडिलांचे घर होते काळाच्या ओघात कुटुंबाचे स्थलांतर झाले अन् बुऱ्हाणपूरशी निगडित फक्त आठवणी शिल्लक राहिल्या.माझ्या दृष्टीने माझी आई आजी प्रचंड बुध्दीमान व्यक्ती आहे. माझ्या स्व.वडिलांच्या अन् माझ्या स्व.आईच्या सर्व नातेवाईकांच्या गोतावळ्यात फक्त एकमेव माझी आई आजीच सर्वात बुध्दीमान व्यक्ती आहे असे मला वाटते. त्याचं कारण आजही कित्येक संस्कृत श्लोक ,हिंदू धर्मातील विविध ग्रंथाच्या ओळी तिच्या मुखोदगत आहेत.हिंदी ,इंग्रजी अन् मराठीवर देखील प्रभुत्व आहे.अर्थात आज शंभरीच्या आसपास असल्याने त्यात फरक जाणवतो,पण ती जेंव्हा ठणठणीत होती तेंव्हा तो बुध्दीचा प्रभाव मला तिच्या भेटी वेळी सतत जाणवायचा.


बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच असं आपल्या समस्त मराठी माणसाला वाटण्याचं अजुन एक कारण असे की, याच बुऱ्हाणपूरला हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे यांचा पदस्पर्श झालेला आहे.हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले.तेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणले ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी..! याच हिंदवी स्वराज्याचे स्वतः च्या प्राणापेक्षाही जास्त संरक्षण केले ते छत्रपती संभाजी महाराजांनी.अन् याच हिंदवी स्वराज्याच्या सीमा थेट दिल्ली पर्यंत आपल्या अजोड युद्ध कौशल्याने विस्तारल्या त्या थोर पहिले बाजीराव पेशवे यांनी..! याच थोर पहिले बाजीराव पेशव्यांचा पदस्पर्श माझी जन्मभूमी पालखेड , ता.वैजापूर येथे देखील झालेला आहे, याचा जेवढा अभिमान वाटतो जितकाच अभिमान राऊंनी याच बुऱ्हाणपूर मार्गे दिल्लीवर अंकुश ठेवला होता त्याचा वाटतो..! 


मला असे वाटते की, मध्ययुगीन भारताच्या इतिहासात कोणत्याही एखाद्या सेनानीने आपलं साम्राज्य विस्तारण्यासाठी , आपल्या धन्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली सर्वोत्तम अन् यशस्वी भटकंती म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे यांनी केलेली बुऱ्हाणपूर मार्गे भटकंती होय..!


म्हणून म्हणतो,बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच, कारण या गावाशी माझी वैयक्तिक रक्ताशी निगडित भावूक आठवण जुळलेली आहे. बुऱ्हाणपूर आपलं वाटण्याचं दुसरं कारण असं की, याच बुऱ्हाणपूरला पहिले बाजीराव पेशवे यांचा पदस्पर्श झालेला आहे..!


प्रत्येक माणूस भटका आहे, फक्त काहींनी आपली भटकंती आपलं शौर्य , युद्ध कौशल्यने आपलं अतुलनीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी केली तर काहींनी आपली भटकंती आपल्या सामाजिक आयुष्यानुसार केली..!


ता.क. - सदरील लेख आत्ताच धावत्या आगगाडीत लिहिलेला आहे.अक्षर चूकभूल क्षमस्व..!🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ मे २०२२, रविवार.

सोमवार, १६ मे, २०२२

उडी मारली रे मारली की, लाईट गेलीच समजा..!"

 


" आमचे गाव आमची माणसं "©️


" उडी मारली रे मारली की, लाईट गेलीच समजा..!"

=============================


गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी संपूर्ण गावची लाईट घालवायचा इलेक्ट्रीशियन; गावकऱ्यांच्या हाती लागला अन्....अशी बातमी मी वाचली अन् अशाच लाईट जाणाऱ्या प्रसंगाची आठवण मला आली..!


असो, 

वरील बातमीचा अन् आमच्या पालखेड गावचा काय संबंध असा प्रश्न बऱ्याच मित्रांना पडला असेल..! वरील बातमी सारखं अगदी सेम टू सेम नव्हतं पण, लाईट मात्र नेमकी टायमावर जायची हे मात्र खरं..! 😊


ऐंशीच्या दशकात आमच्या पालखेड गावात ' राक्षसी लालसा ' हे नाटक अजरामर होऊन गेलेलं आहे.या नाटकाची लोकप्रियता गावात एवढी होती की, यातील संवाद आमच्या सारख्या काही प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले होते.त्यांचं कारण बऱ्याचदा दरवर्षी हेच नाटक अन् तीच नाटक पार्टी सादर करायची.


रात्री साधारणतः नऊ वाजता हे नाटक सुरू झाल्यावर सिंहासनावर बसलेला राजा शशांक याने सिंहासनावरून उडी मारली रे मारली की, लगेच लाईट जायची अन् नाटक जो पर्यंत लाईट येत नाही तो पर्यंत बंद व्हायचे. त्यावेळी गावासाठी एकच लाईट डीपी होती अन् ती वेशीच्या बाहेर असणाऱ्या शेतात ज्याला अख्खं गाव तक्क्या म्हणायचे तिथं होती. लाईट गेल्यावर राक्षसी लालसा या नाटकाच्या पार्टीचे समर्थक हातात बत्ती ( थोडक्यात मोठ्ठा कंदील ) घेऊन त्या डिपी कडे जायचे अन् फ्यूज दुरुस्ती करायचे. त्याकाळी आमच्या पालखेड गावात एकदोन जणांकडेच बत्ती होती.त्यांना त्याकाळी विशेष महत्त्व असायचे..!😊 


लाईट आल्यावर पुन्हा राजा शशांक आपल्या सिंहासनावर विराजमान व्हायचा अन् पुन्हा सिंहासनावरून उडी मारत मारत पुढील संवाद म्हणायचा..

" प्रतिभा ,प्रतिभा तुझ्या या राक्षसी लालसेने माझ्या अंगाची लाही लाही होत आहे..!" 


हा संवाद पूर्ण होत नाही तोच पुन्हा लाईट जायची.सुरुवातीला एकदोन वर्ष प्रयोग सादर करणाऱ्या पार्टीला असे वाटले की, लाईट तिच्यात होणाऱ्या काही नादुरुस्तीमूळे जात असेल,पण नंतर दरवर्षी नेमका राजा शशांक आपल्या सिंहासनावरून उडी मारल्या मारल्याच कशी काय लाईट जाती याचा संशय या नाटकातील कलाकारांना आला. साधारणतः तिसऱ्या वर्षापासून एकजण वेशीबाहेर असणाऱ्या लाईट डिपी जवळ राखण बसायला लागला अन् मग तेव्हांपासून नाटक सुरू झाल्यावर अन् नाटक सुरू असताना कधीच लाईट गेली नाही.


मात्र तो प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे की, राक्षसी लालसा हे नाटक सुरू झाल्यावर अख्ख्या गावची लाईट कोण बंद करत होते..?😊🙏🏻


या नाटकाची लोकप्रियता अन् कदाचित त्यामुळं गावातील दुसऱ्या नाटक पार्टीला होणारी असूया यामुळं असे करणारे कुणीतरी असावेत असा त्याकाळी अनेकांना अंदाज आला होता,पण भक्कम पुरावा हाती न लागल्याने आरोपी कधीच सापडू शकला नाही..!😊


बाकी काहीही असो, राजा शशांक आपल्या सिंहासनावरून उडी मारल्या मारल्या लाईट जाणार हा अंदाज आम्हा काही प्रेक्षकांना अगोदरच असायचा,कारण लाईट जाण्याचं अन् राजा शशांक यांच्या उडीचं अचूक टायमिंग त्याकाळी साधलं जायचं..! आम्ही काही बालमित्र नाटकाच्या ओट्याच्या सर्वात जवळ बसलेलो असायचो.लाईट जरी गेली तरी राजा शशांक यांचा अपूर्ण संवाद आम्ही काही बालमित्र प्रेक्षक गॅलरीत बसुन म्हणजेच जमिनीवर अंथरलेल्या बारदाण्यावर बसून म्हणायचो..!


मात्र तो प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे की, राक्षसी लालसा हे नाटक सुरू झाल्यावर अख्ख्या गावची लाईट कोण बंद करत होते..?😊 आता गावातील काही तरुण संशोधन क्षेत्रात आहेत, निदान त्यांनी तरी याचा शोध घ्यावा ही राजा शशांकावर प्रेम करणाऱ्या व त्याकाळी जमिनीवर अंथरलेल्या बारदाण्यावर बसलेल्या प्रेक्षकांकडून कलासक्त अपेक्षा आहे..!🙏🏻😊


ता.क. - गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी संपूर्ण गावची लाईट घालवायचा इलेक्ट्रीशियन; गावकऱ्यांच्या हाती लागला या बातमीची लिंक -

https://www.loksatta.com/trending/bihar-electrician-cuts-power-supply-of-village-to-meet-girlfriend-in-dark-marries-her-after-being-caught-red-handed-scsg-91-2924690/


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १६ मे २०२२, सोमवार.





शनिवार, ७ मे, २०२२

🎼 ' नक्षीदार , चंद्रमुखी..!'. 🎼

 



चिंतन ©️


🎼  ' नक्षीदार , चंद्रमुखी..!'. 🎼


==============================


आज दिनांक ७ मे २०२२ , शनिवार रोजी चंद्रमुखी चित्रपट पाहिला अन् त्यातील प्रत्येक नक्षीदार कलेच्या निखळ प्रेमातच पडलो..!


कला ही नेहमी साज शृंगार चढवून आपलं प्रेम हे समोरच्या रसिक मनाला देत असते.कला ही आपल्यात जसं प्रेम फुलवते,अगदी तसंच प्रेमात देखील कला प्रज्वलित होते.थोडक्यात कला अन् प्रेम ह्या एकमेकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमजोड्यांपैकी एक जोडी आहे.पण जेंव्हा कलेत उच नीचतेचा भेद निर्माण होतो तेंव्हा याच कलेवर स्वतः ला ओवाळून टाकणारी मनं पार होरपळून निघतात, अन् शेवटी उरते ती फक्त त्या दोन मनांची उदिग्नता..!  याच कलेवर अन् प्रेमावर स्वार होऊन प्रेमळ आयुष्याचे प्रेमळ स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या दोन मनात जेंव्हा एकाच्या आयुष्याचा स्तर उंच ठरवल्या जातो अन् एकाचा स्तर खालचा  तेंव्हा अशा दोन मनांची स्मशानभूमी होऊन जाते.


मी, आज वर व्यक्त केलेल्या साज शृंगाराने सजविलेल्या प्रेमाला ,प्रेमातील त्यागाला ,प्रेमाच्या दोन मनांना समाजव्यवस्थेने उच नीच ठरविलेल्या भावूक प्रेमकथेला पाहिले.निमित्त होते लेखक विश्वास पाटील सर लिखित ' चंद्रमुखी ' कादंबरीवरील मराठी चित्रपट ' चंद्रमुखी ' पाहण्याचे..!


चंद्रमुखी ही कथा  लोककलेला वाहून घेतलेल्या अशा स्री ची आहे, जिच्या प्रेमळ संवेदना समाजव्यवस्थेच्या कर्मठ मानसिकतेत मरून जातात अन् तिच्या आयुष्याची प्रेमाची प्रेमळ संवेदना मृत होऊन जाते. चंद्रमुखीच्या आयुष्याची प्रेमकथा जरी मृत होऊन जाते,पण याच प्रेमाचं प्रतीक आपल्या गर्भात घेऊन निघून जाते, पुन्हा त्याच विश्वात, जिथं दौलतराव देशमाने यांना फक्त आठवणीत आठवण्याशिवाय दुसरं तिच्या हाती काहीही नसतं..!


दौलतराव देशमाने हा खासदार असतो.त्याच्यात लपलेला एक रसिक अन् साहित्यिक देखील असतो.याच रसिकतेच्या प्रेमापोटी त्याची अन् चंद्रमुखीची भेट होते. दोघांच्या प्रेमाला शृंगार चढतो.मात्र हा शृंगार चढत असताना दौलतराव देशमाने यांचं राजकीय आयुष्य बाधा ठरते अन् या दोन भावूक मनांची स्मशानभूमी होऊन जाते.


राजकीय व्यवस्थेत अशा कित्येक प्रेमकथा निर्माण होतात ज्यात एक प्रेमी समाजव्यवस्थेतील उच्च गटातील असतो अन् एक प्रेमी एकतर लोककलाकर असतो किंवा ज्या समाजव्यवस्थेकडे आजही तुच्छ नजरेने पाहिल्या जाते त्यातील असतो.यात उध्वस्त होते तेच मन ज्या समाजव्यवस्थेकडे आजही तुच्छ नजरेने पाहिल्या जाते. दौलतराव देशमाने यांचं चंद्रमुखी वर निस्सीम प्रेम असते.पण जेंव्हा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा ,हाच दौलतराव देशमाने,अगदी पालापाचोळा फेकून द्यावा  अगदी तसेच चंद्रमुखीच्या स्वच्छ ,सुंदर अन् निस्सीम प्रेमाला अनोळखी करतो. चंद्रमुखी मात्र आपल्या प्रियकराला म्हणजेच दौलतराव देशमाने यांना त्याच्या राजकीय व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दूर निघून जाते, सर्वोच्च त्याग करून..! सर्वोच्च त्याग यासाठी म्हणातोय की,  स्री ज्यावेळी एखाद्या पुरुषावर निस्सीम प्रेम करते अन् तो पुरुष ज्यावेळी तिला आपल्या स्वार्थासाठी अनोळखी करतो. त्यावेळी स्री ने आपल्या प्रियकराला त्रास होऊ नये म्हणून केलेला त्याग हा सर्वोच्चच ठरतो.हाच त्याग चंद्रमुखी करते अन् दौलतराव देशमाने यांच्या आयुष्यातून दूर निघून.जाते.मात्र चंद्रमुखी आपल्या सोबत दौलतराव देशमाने यांचा अंश आपल्या गर्भात घेऊन जाते. हा खूप भावूक प्रसंग चंद्रमुखी या चित्रपटात दौलतराव देशमाने ( आदिनाथ कोठारे ) अन् चंद्रमुखी ( अमृता खानविलकर ) यांनी आपल्यातील सर्वोच्च अभिनयाने अजरामर केला आहे.


लोक कलाकार असणाऱ्या स्रीने  प्रेम करावं की करू नये या द्विधा मनःस्थितीत हा चित्रपट पुढे पुढे सरकत असतो. चंद्रमुखी ही लोककलेला समर्पित नृत्यांगना असते, मात्र तिच्याच भाषेत सांगायचे झाले तर ती रांड नसते, असते फक्त नृत्यांगना..! दौलतराव देशमाने हा खासदार असलेला राजकारणी चंद्रमुखीच्या संगीत बारीवर सुरुवातीला एक दर्दी रसिक म्हणून येतो अन् कायमचा चंद्रमुखीच्या आयुष्याला हळुवार स्पर्श करून  प्रेममय हिस्सा होऊन जातो.दौलतराव देशमाने ,त्यांची पत्नी डॉली ( मृण्मयी देशपांडे ) अन् चंद्रमुखी यांची त्रिकोणी प्रेमकथा ही जशी काळजाला भिडते तसाच या तिघांनी केलेला अभिनय सुध्दा..!


चंद्रमुखी चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच  ओघवत्या शैलीत श्री.प्रसाद ओक यांनी केले आहे. ज्या प्रमाणे एखादी शृंगारिक लावणी फडात सादर करावी तसं शृंगारिक दिग्दर्शन केलंय प्रसाद ओक सरांनी..! चित्रपटाची प्रत्येक फ्रेम कशी नक्षीदार झाली आहे..! यातील संवाद हळुवार अन् खूपच अर्थपूर्ण आहेत.यासाठी या चित्रपटाचे संवाद लेखक चिन्मय मांडलेकर यांना नक्कीच दाद द्यायला हवी..! या चित्रपटातील अजुन एक पात्र आपल्या अभिनयाने लक्षात राहते अन् ते म्हणजे बत्ताशा ( समीर चौगुले ) होय.आपल्या सहज सुंदर तमाशा प्रधान अभिनयाने समीर चौगुले यांनी बत्ताशा हे पात्र खूपच छान उभे केले आहे..! आदिनाथ कोठारे यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका चंद्रमुखी या चित्रपटात दौलतराव देशमाने यांच्या रूपाने निभावली आहे. अमृता खानविलकर यांनी देखील त्याच तोडीस तोड चंद्रमुखीचा अभिनय केला आहे.


चंद्रमुखी चित्रपटाचा आत्मा ,या चित्रपटाचे संगीत आहे.अजय - अतुल यांनी एखादी मेहंदी रेखाटावी तसे यातील प्रत्येक गाणं आपल्या सुरेल अशा संगीताने सजवले आहे.मला विशेष आनंद याचा वाटतो की, या चित्रपटातील ' बाई गं..!' ही लावणी संगीतबद्ध करताना यातील तबला वादक म्हणून माझे प्रिय फेसबुक मित्र प्रसादजी पाध्ये यांनी साथ दिलेली आहे.प्रिय प्रसाद भाऊ पाध्ये आपण ज्या नादब्रह्माचे अस्तित्व यात तबला वादक म्हणून सादर केलं आहे, त्या आपल्यातील सारस्वताला माझ्याकडुन विनम्र वंदन..! चंद्रमुखी या चित्रपटाचे मला अजून एक वैशिष्ट्ये जाणवले अन् ते म्हणजे चित्रपट संपल्यावर शेवटी जी नामावली येते त्यात प्रत्येक गाण्याला ज्या ज्या वादकांनी आपली संगीत साथ दिली आहे त्यांचे क्रमवार नावे येतात..!


आज मी औरंगाबाद येथील नुपूर चित्रपटगृहात चंद्रमुखी चित्रपट पाहिला.विशेष म्हणजे मी जो दुपारचा शो पाहिला त्या शो करिता बरीच वयस्कर मंडळी ज्यात स्री अन् पुरुष दोघेही ,ते उपस्थित होते.यातच चंद्रमुखीचे यश आहे..!


शेवटी एक रसिक म्हणून एकच अपेक्षा व्यक्त करतो की, चित्रपटातील भूमिकेसाठी चित्रपट कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो तसाच अस्सल मातीतील लोककलेच्या लोककलावंतांना असा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार द्यायला हवा.जेणेकरून उपेक्षित आयुष्य जगून समाजमनाला आपल्या अस्सल लोककलेने प्रफुल्लित  करणाऱ्या लोककलावंतांचा तो खरा सन्मान ठरेल..!🙏🏻


वंदे मातरम्..!


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ७  मे २०२२, शनिवार.