मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

" नित्तळ निरागस सौदर्य - मधुबाला..! "


 


चिंतन ©️


" नित्तळ निरागस सौदर्य - मधुबाला..! "


====================================


एखादं नित्तळ सौदर्य कसं असतं,अस जर सौंदर्याच्या देवतेने मला विचारले तर ते असेच असते हे मी त्याच सौंदर्याच्या देवतेला पटवून देईल..!


स्रीच्या सौंदर्याची परिभाषा नेमकी काय असते..?

तर माझ्या मते, ज्या सौंदर्यात मायेची नजर,मातृत्वाचं दर्शन अन् निखळ स्वच्छ सुंदर निष्पाप मनाचा अन निरागस मनाचा सुंदर आविष्कार असतो तेच खरे स्रीचे सर्वात सुंदर ईश्वरीय सौदर्य होय. स्री सौंदर्याला नियतीने मुक्त उधळण करून दिली आहे.  


हेच ते स्वच्छ सुंदर सौदर्य आहे जे नैसर्गिक आहे. असं वाचण्यात आले आहे की, ज्यावेळी नाना पाटेकर प्रहार चित्रपट तयार करत होते,त्यावेळी सेटवर माधुरी दीक्षित खूप मेक अप करून आली होती.ते पाहून नाना तिच्यावर जाम खवळला अन् जे व्यक्त झाला होता त्याचा सारांश असा होता...

"अग,तुला देवानेच नैसर्गिकरित्या इतकं सुंदर बनवलं आहे,तर मग तू,खोटे सौदर्य का घेऊन मिरवते..? यानंतर माधुरीने सगळा मेक अप पुसून टाकला अन् संपूर्व प्रहार चित्रपट विना मेक अप चा केला.


मात्र याच सौंदर्याच्या देवतेने निर्माण केलेल्या याच स्रीला ,सौंदर्याला जर शाप मिळाला तर....

तर ते सौंदर्य शर्मिष्ठेच्या सौंदर्यासारखे रूपवान असून देखील मनाच्या उद्दिग्न अवस्थेत शापित अवस्थेत जगत असते.देवदत्त रुपमती असूनही काही शापित सौंदर्य आपल्या मनाच्या नैराश्यात कुंठित आयुष्य व्यतीत करत असते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मधुबाला यांचं देता येईल.


मुमताज जहान बेगम नहलवी उपाख्य मधुबाला..!


मधुबाला म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं गोड स्वप्नं..! असं स्वप्न , ज्यानं कित्येक हृदयाच्या तारा छेडल्या होत्या. विधात्याने आपल्या कुंचल्यातून मधुबालाचं निरागस सौंदर्य निवांत वेळ देऊन रेखाटलं होतं.ते रेखाटताना कुठलीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.मात्र तेच निरागस सौंदर्य रेखाटताना कोणत्यातरी अप्सरेची नजर लागली असावी, ज्यामुळे या निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात मानसिक समाधान लाभले नाही.


एखाद्याच्या सौंदर्याचा उपयोग कुणी जन्मदाता पिता आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करून घेतो अन् त्याच निरागस सौंदर्याला एखाद्या पिंजऱ्यात बंदिस्त करावं तसं करून ठेवतो , असंच काहीसं मधुबालाच्या आयुष्यात झालं.एन. चंद्रा दिग्दर्शित तेजाब या हिंदी चित्रपटात याच्याशी मिळते जुळते प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत.तेजाब चित्रपटात अनुपम खेर हा आपल्या रूपवान मुलीच्या म्हणजेच माधुरी दिक्षितच्या सौंदर्याला, कलेला, कलेच्या बाजारात विकतो अन् मिळालेल्या पैशातून स्वतः ची मौजमजा अन् गरजा भागवून घेतो.


आता पर्यंत बहुतांशी रसिकांना ऐकिवात असलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मधुर प्रेमकथा म्हणून अमिताभ बच्चन अन् रेखा यांचीच सर्वात जास्त प्रमाणात परिचित आहे.मात्र याही प्रेमकथेला पुरून उरणारी तरल अन् जीवापाड प्रेमकथा होऊन गेलेली आहे.ती प्रेमकथा होती युसुफखान उपाख्य दिलीपकुमार अन् मुमताज जहान बेगम नहलवी उपाख्य मधुबालाची होय. एखाद्याने एखाद्यावर किती निस्सीम प्रेम करावं याचं सर्वात प्रेमळ उदाहरण म्हणजे दिलीपकुमार अन् मधुबाला यांची प्रेमकथा होय.


दिलीपकुमार अन् मधुबाला यांच्या प्रेमकथेत बीभत्सपणा नव्हता. होती, फक्त एकमेकांविषयी असलेली ओढ..! अशी ओढ , ज्यातून या दोन जीवांनी स्वतः पेक्षाही आपल्या प्रेमावर सर्वात जास्त प्रेम केलं.मात्र मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे या रूपवतीला विधात्याने आपल्या कुंचल्यातून रेखाटताना कोणत्यातरी अप्सरेची नजर लागली असावी ज्यामुळे या निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात मानसिक समाधान लाभले नाही. ज्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम केले , तो दिलीपकुमार आपला होऊ शकला नाही. म्हणतात ना की, प्रेम एकदाच होतं अन् तेच कायमस्वरूपी असते.जर ते प्रेम वास्तवात मिळाले नाही अन् नियतीने दुसरं नातं जरी आयुष्यात जरी पाठवलं तरी देखील पहिलं प्रेम माणूस कधीही विसरुच शकत नाही.अगदी असंच काहीसं मधुबालाच्या आयुष्यात झालं.मधुबालाच्या आयुष्यात दिलीपकुमार नंतर किशोरकुमार नावाच्या एका गायक कलाकाराचा प्रवेश झाला.दोघांनी लग्न देखील केले,पण मधुबाला तहहयात दिलीपकुमार वर निस्सीम प्रेम करत राहिली.


अखेर पर्यंत मधुबाला ही शापित सौंदर्य घेऊनच जगत राहिली.बऱ्याचदा सौंदर्य शापित असते. त्या सौंदर्यावर भाळून प्रेम करणारे देखील अनेकजण असतात. मात्र त्या निरागस स्री सौंदर्याचं पूजन करणारे अत्यल्प प्रमाणात बघायला मिळतात हे कटू सत्य आहे.विधात्याने आपल्या कुंचल्यातून निवांत वेळी निर्माण केलेलं सौंदर्य होते मधुबाला..! मात्र याच निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात शापित आयुष्य व्यतीत करावं लागलं अन् जीवघेण्या कॅन्सरच्या आजारात संपून जावं लागलं..! ही फार मोठी शोकांतिका होती मधुबालाच्या आयुष्याची..! 


ज्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम केलं तो दिलीपकुमार सध्या हयात नाही अन् ज्या सौंदर्याने निस्सीम प्रेम केलं ती मधुबाला देखील सध्या हयात नाही.विधत्याच्या नगरीत जेंव्हा या दोन प्रेम जीवांची भेट झाली असेल तेंव्हा विधात्याने या दोघांचे देव देवतांच्या साक्षीने लग्न लावून दिले असेल अशी आशा करूया..! कारण या दोन जीवांना या भूतलावर अपूर्णतेत जगायला बाध्य करणारा देखील हाच विधाता होता.त्याला आपली चूक लक्षात येऊन त्याच परिमार्जन करणं आवश्यक वाटलं असेल..!


असो, आज विधात्याने आपल्या कुंचल्यातून निवांत वेळी निर्माण केलेल्या सौंदर्याचा म्हणजेच मधुबालाचा जन्मदिन आहे.(जन्म दिनांक १४/२/१९३३) या निरागस सौंदर्याला माझ्याकडून एक रसिक म्हणून विनम्र अभिवादन..!🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १४ फेब्रुवारी २०२३, मंगळवार.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

प्रेमळ अन् गुणी मित्र जनार्दन भाऊ राऊत सर..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


प्रेमळ अन्  गुणी मित्र जनार्दन भाऊ राऊत सर..!


===================================


माननीय जनार्दन भाऊ राऊत सर अन् माननीय दत्ता भाऊ घोगरे सर, मूळ राहणार काटे पिंपळगावकर या दोघांवर जीवापाड प्रेम करावं अशी ही प्रेमळ व्यक्तिमत्वे आहेत. ज्यांच्याशी मनातलं बोलावं, अशी हृदयातल्या फार मोजक्या मित्रांपैकी ही जोडगोळी..! 


जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांचं अन् माझं नाते तसे बघितले तर शिवभाऊ म्हणून देखील आहे. एकमेकांच्या गावात जाणं येणं हे आम्हा दोघांच्या गावकरी मंडळीत पूर्वीपासून ते आजतागायत सुरू आहे.त्याच सहवासाच्या नात्यातून आमच्या मैत्रीच्या नात्यात इ.स.१९९२ पासून सुरुवात झाली ती आजतागायत कायम आहे.


काटे पिंपळगाव अन् पालखेड ही दोन्ही गावे कलाप्रेमी गावे..! जनार्दन भाऊ राऊत यांनी आमच्या पालखेड गावातील कार्तिकी यात्रेतील एका नाटकात अभिनय देखील केलेला आहे. काटे पिंपळगाव येथून त्यांच्या नाट्य मंडळाने एक नाटक आमच्या पालखेड गावातील यात्रेत सादर केले होते.


कन्नड येथील सहवासात या दोन्ही जेष्ठ मित्रांकडून खूप काही शिकायला मिळालं. एकाच खोलीत स्वयंपाक बनवणं अन् तेही एकाच पितळाच्या बादलीत सर्वकाही कामे उरकून घेणे हे फक्त आणि फक्त आम्हालाच जमले होते.जेंव्हा जेंव्हा जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांची भेट होती तेंव्हा तेंव्हा एकमेकांची खुशाली विचारण्या अगोदर ती अनमोल पितळी बादली आता कुठे अन् कशी आहे याची आवर्जून चौकशी केली जाते.😊 


वसतिगृहातील आमच्या वास्तव्य काळातील आयुष्याच्या अनेक आठवणी ह्या आजही आम्हाला जगायला शिकवितात. अनेक चमत्कारिक प्रसंग फुकटमध्ये  अनुभवायला मिळतात. जर एखादा माणूस उच्च शिक्षण घेत असेल तर अशा   माणसाने त्याच्या शिक्षणाच्या काळात काही काळ का होईना वसतिगृहात रहायलाच पाहिजे.जेणेकरून आयुष्याच्या आठवणी इस्टमकलरच्या होऊन  भविष्यातील आयुष्य अजुन इस्टमकलरच्या होऊन जाते. त्याच अनुषंगाने मी माझ्या थोरल्या मुलास चि. भावी डॉ.नमन यास मुद्दामहून वसतिगृहात राहायला लावले होते.


जनार्दन भाऊ राऊत म्हणजे एकदम साधे सरळ व्यक्तिमत्व..! त्यांचा एक सदगुण मला माझ्या आयुष्यात खूप भावून गेला आहे.त्या सद्गुणांचं दर्शन झालं होतं आम्ही कन्नड येथे डी.एडचे शिक्षण घेत असताना..! प्रिय मित्र सुनील जाधव, भगवान हिवाळे, काकासाहेब मगर , प्रशांत चौधरी  इत्यादी अनेकजण आम्ही त्याकाळी कन्नड येथील समर्थनगर परिसरातील वसतिगृहात राहत होतो. आमचे ते वसतिगृह म्हणजे त्या काळातील सर्व वसतिगृहात , जगातील अस्वच्छतेत जर कुणी क्रमांक काढला असता तर आमचे वसतिगृह नक्कीच त्यात  टॉप टेन मध्ये आले असते.एवढी खात्री आम्ही तिथं त्याकाळी राहणारे सर्व मित्र स्वतः च्या शरीरावर हात ठेवून सांगू शकतो. आम्ही संध्याकाळी वसतिगृहातून बाहेर फिरायला किंवा कॉलेज कडे जाताना येताना बऱ्याचदा सोबत असायचो.मी त्यावेळी बऱ्याचदा बघितले होते की, रस्त्याच्या कडेला एखादा पूर्ण कोरा कागद  अथवा अर्धवट कोरा कागद दिसला की जनार्दन भाऊ राऊत त्या कागदाला उचलून खिशात ठेवायचे. आम्ही  वसतिगृहात आल्यावर ज्यावेळी अभ्यासाला बसायचो त्यावेळी जनार्दन भाऊ राऊत त्या सापडलेल्या कोऱ्या कागदावर अभ्यासाचे एखादे उत्तर, मुद्दा इत्यादींचे लिखाण करायचे अन् मग तो कागद जरी कचऱ्यात फेकून द्यायची गरज पडली तर फेकून द्यायचे. हा प्रसंग मला माझ्या स्व.वडिलांच्या अशाच कृतीतून केलेल्या आठवणीत घेऊन जायचा.माझे स्व. वडील देखील थोडा जरी एखादा कोरा कागद दिसला तरी त्यावर काहीतरी कामाचे लिखाण लिहायचे अन् मग फेकून द्यायचे. या कृतीतून खूप काही शिकण्यासारखे होते.कोणताही कागद त्याचा उपयोग झाल्याशिवाय फेकून द्यायचा नाही हे विद्येच्या देवतेला प्रिय असलेलं मूल्य यातून बघायला मिळत होते. आजकाल किती कोरे कागदं वाया जातात हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे.


माझे पालखेड येथील दोन जिवलग बालमित्र नितीन जैन अन् डॉ. गणेश वाणी  यांच्यामूळे देखील जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांच्याशी मैत्रीच्या नात्यात प्रेमळपणा वाढत गेला. आजही मला तो नागपंचमी चा दिवस आठवतो ,ज्या दिवशी मी काटे पिंपळगाव येथे जनार्दन भाऊ राऊत यांच्या घरी अगदी तृप्त होई पर्यंत जेवण केले होते. काही जेवणं, आपल्या सोबत जेवायला कोण आहेत अन् निव्वळ माणुसकीचं नातं कसं आहे यावर देखील त्या अन्नाची चव आणि गोडवा वाढवते. यांचं चवदार शाकाहारी उदाहरण तेच नागपंचमीच्या दिवशी केलेलं जेवण होतं.


कन्नड येथील सहवासात व्यतीत केलेल्या अनेक आठवणी आजही आमच्या हृदयात चिरंजीव आहेत.कन्नड येथील आमचा सर्व मित्रांचा सर्व सहवास आम्हा सर्व मित्रांना एक मित्र म्हणून जोडून ठेवण्यास पुरेसा आहे. ते दिवस मंतरलेले होते,म्हणून आम्ही आजही मंत्रमुग्ध होऊन आमच्या मैत्रीच्या विश्वात जिवंत आहोत..!


असो, आज आमचे जेष्ठ मित्र जनार्दन भाऊ राऊत सर मूळ राहणार काटे पिंपळगाव, हल्ली मुक्काम गंगापूर, यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त या प्रेमळ मित्राला वैयक्तिक माझ्याकडून,कन्नड येथील तत्कालीन वसतिगृहातील सर्व मित्रांकडून तसेच माझे जिवलग बालमित्र नितीन जैन, डॉ. गणेश वाणी कडून  मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ४/२/२०२३, शनिवार.

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त...


 


चिंतन ©️


आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त...


================================


आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे..!

लेकरांच्या हृदयात अन् लेकरांच्या सोबत व्यतीत करता आलं पाहिजे..!


नियती आपल्याला प्रत्येक क्षण जगायला भरभरून देते,

फक्त त्याचा मनमुरादपणे आनंद लुटता आला पाहिजे..!


मोठेपणाच्या , पदाच्या अहंकाराच्या गराड्यात सतत मरण्यापेक्षा, बेगडी प्रतिष्ठा फेकून देता आल्या पाहिजे..!


सुख अन् दुःख सोबतच असते , फक्त त्यावर फुंकर घालता आली पाहिजे..!


मनाला हवा असतो असा सहवास, जिथं त्या विधात्याची अनुभूती यायला हवी.

ती अनुभूती येऊ द्यायची असेल तर निरागस मनांच्या सहवासात काही क्षण का होईना व्यतीत करता यायला पाहिजे..!


आजकाल त्या विधात्याच्या अस्तित्वाची अनुभूती कुठं लाभत असेल तर ती याच निरागस मनांच्या सहवासात जाणवते, त्या ईश्वरीय अनुभूतीचा आनंद घेता आला पाहिजे..!


सततच्या पुस्तकी अकलेच्या कांद्याची होळी करता येऊन कधीतरी मनाच्या निर्भेळ यशाची चव चाखता आली पाहिजे..!


याच्या , त्याच्या ,माझ्या , तुझ्या आयुष्याला कधीतरी पूर्णविराम लागणारच आहे, फक्त आयुष्यातील स्वल्पविराम शोधता आला पाहिजे..!


येणाऱ्या वार्धक्यात जर काही आठवायचे असेल तर आजच्या वर्तमानात काहीतरी गोड आठवणी शिलकीत जमा करायला पाहिजे..!


कोणताही शिक्षक कोणताही विद्यार्थी कधीही म्हातारा होता नसतो, फक्त त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण चिरंजीव करता आला पाहिजे..!


कुणीतरी एखाद्या दिवशी येतो अन् कायमचे मूल्यमापन करून जातो, त्यापेक्षा त्या निरागस मनांच्या दररोजच्या व्यथा अन् कथा समजून घेता आल्या पाहिजे..!


मनाचा अभ्यास अन् मनाची खोली शोधता आली पाहिजे अन् त्यातून उज्वल मनाची श्रीमंती तयार करता यायला पाहिजे..!


नुसते चौकटीत राहून रोबोट सारखं जगण्यापेक्षा , जिवंत माणसासारखं देखील जगता यायला पाहिजे..!


समोरच्या मनाची अवस्था जाणून त्या निरागस मनाच्या पटलावर मनाचं कोंदण लिहिता यायला पाहिजे..!


आणि हो, आयुष्य खूप सुंदर आहे,फक्त जगता आलं पाहिजे..!😊🙏🏻🌹


असो, आज नियतीने निरागस मनांच्या सहवासात आयुष्यातील काही क्षण व्यतीत करण्याची संधी दिली..!


फोटो स्थळ : कान्होबा मंदिर, अंधारी सिल्लोड 


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ३/२/२०२३, शुक्रवार.