चिंतन ©️
" नित्तळ निरागस सौदर्य - मधुबाला..! "
====================================
एखादं नित्तळ सौदर्य कसं असतं,अस जर सौंदर्याच्या देवतेने मला विचारले तर ते असेच असते हे मी त्याच सौंदर्याच्या देवतेला पटवून देईल..!
स्रीच्या सौंदर्याची परिभाषा नेमकी काय असते..?
तर माझ्या मते, ज्या सौंदर्यात मायेची नजर,मातृत्वाचं दर्शन अन् निखळ स्वच्छ सुंदर निष्पाप मनाचा अन निरागस मनाचा सुंदर आविष्कार असतो तेच खरे स्रीचे सर्वात सुंदर ईश्वरीय सौदर्य होय. स्री सौंदर्याला नियतीने मुक्त उधळण करून दिली आहे.
हेच ते स्वच्छ सुंदर सौदर्य आहे जे नैसर्गिक आहे. असं वाचण्यात आले आहे की, ज्यावेळी नाना पाटेकर प्रहार चित्रपट तयार करत होते,त्यावेळी सेटवर माधुरी दीक्षित खूप मेक अप करून आली होती.ते पाहून नाना तिच्यावर जाम खवळला अन् जे व्यक्त झाला होता त्याचा सारांश असा होता...
"अग,तुला देवानेच नैसर्गिकरित्या इतकं सुंदर बनवलं आहे,तर मग तू,खोटे सौदर्य का घेऊन मिरवते..? यानंतर माधुरीने सगळा मेक अप पुसून टाकला अन् संपूर्व प्रहार चित्रपट विना मेक अप चा केला.
मात्र याच सौंदर्याच्या देवतेने निर्माण केलेल्या याच स्रीला ,सौंदर्याला जर शाप मिळाला तर....
तर ते सौंदर्य शर्मिष्ठेच्या सौंदर्यासारखे रूपवान असून देखील मनाच्या उद्दिग्न अवस्थेत शापित अवस्थेत जगत असते.देवदत्त रुपमती असूनही काही शापित सौंदर्य आपल्या मनाच्या नैराश्यात कुंठित आयुष्य व्यतीत करत असते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मधुबाला यांचं देता येईल.
मुमताज जहान बेगम नहलवी उपाख्य मधुबाला..!
मधुबाला म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं गोड स्वप्नं..! असं स्वप्न , ज्यानं कित्येक हृदयाच्या तारा छेडल्या होत्या. विधात्याने आपल्या कुंचल्यातून मधुबालाचं निरागस सौंदर्य निवांत वेळ देऊन रेखाटलं होतं.ते रेखाटताना कुठलीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.मात्र तेच निरागस सौंदर्य रेखाटताना कोणत्यातरी अप्सरेची नजर लागली असावी, ज्यामुळे या निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात मानसिक समाधान लाभले नाही.
एखाद्याच्या सौंदर्याचा उपयोग कुणी जन्मदाता पिता आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी करून घेतो अन् त्याच निरागस सौंदर्याला एखाद्या पिंजऱ्यात बंदिस्त करावं तसं करून ठेवतो , असंच काहीसं मधुबालाच्या आयुष्यात झालं.एन. चंद्रा दिग्दर्शित तेजाब या हिंदी चित्रपटात याच्याशी मिळते जुळते प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत.तेजाब चित्रपटात अनुपम खेर हा आपल्या रूपवान मुलीच्या म्हणजेच माधुरी दिक्षितच्या सौंदर्याला, कलेला, कलेच्या बाजारात विकतो अन् मिळालेल्या पैशातून स्वतः ची मौजमजा अन् गरजा भागवून घेतो.
आता पर्यंत बहुतांशी रसिकांना ऐकिवात असलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मधुर प्रेमकथा म्हणून अमिताभ बच्चन अन् रेखा यांचीच सर्वात जास्त प्रमाणात परिचित आहे.मात्र याही प्रेमकथेला पुरून उरणारी तरल अन् जीवापाड प्रेमकथा होऊन गेलेली आहे.ती प्रेमकथा होती युसुफखान उपाख्य दिलीपकुमार अन् मुमताज जहान बेगम नहलवी उपाख्य मधुबालाची होय. एखाद्याने एखाद्यावर किती निस्सीम प्रेम करावं याचं सर्वात प्रेमळ उदाहरण म्हणजे दिलीपकुमार अन् मधुबाला यांची प्रेमकथा होय.
दिलीपकुमार अन् मधुबाला यांच्या प्रेमकथेत बीभत्सपणा नव्हता. होती, फक्त एकमेकांविषयी असलेली ओढ..! अशी ओढ , ज्यातून या दोन जीवांनी स्वतः पेक्षाही आपल्या प्रेमावर सर्वात जास्त प्रेम केलं.मात्र मी अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे या रूपवतीला विधात्याने आपल्या कुंचल्यातून रेखाटताना कोणत्यातरी अप्सरेची नजर लागली असावी ज्यामुळे या निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात मानसिक समाधान लाभले नाही. ज्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम केले , तो दिलीपकुमार आपला होऊ शकला नाही. म्हणतात ना की, प्रेम एकदाच होतं अन् तेच कायमस्वरूपी असते.जर ते प्रेम वास्तवात मिळाले नाही अन् नियतीने दुसरं नातं जरी आयुष्यात जरी पाठवलं तरी देखील पहिलं प्रेम माणूस कधीही विसरुच शकत नाही.अगदी असंच काहीसं मधुबालाच्या आयुष्यात झालं.मधुबालाच्या आयुष्यात दिलीपकुमार नंतर किशोरकुमार नावाच्या एका गायक कलाकाराचा प्रवेश झाला.दोघांनी लग्न देखील केले,पण मधुबाला तहहयात दिलीपकुमार वर निस्सीम प्रेम करत राहिली.
अखेर पर्यंत मधुबाला ही शापित सौंदर्य घेऊनच जगत राहिली.बऱ्याचदा सौंदर्य शापित असते. त्या सौंदर्यावर भाळून प्रेम करणारे देखील अनेकजण असतात. मात्र त्या निरागस स्री सौंदर्याचं पूजन करणारे अत्यल्प प्रमाणात बघायला मिळतात हे कटू सत्य आहे.विधात्याने आपल्या कुंचल्यातून निवांत वेळी निर्माण केलेलं सौंदर्य होते मधुबाला..! मात्र याच निरागस सौंदर्याला आपल्या आयुष्यात शापित आयुष्य व्यतीत करावं लागलं अन् जीवघेण्या कॅन्सरच्या आजारात संपून जावं लागलं..! ही फार मोठी शोकांतिका होती मधुबालाच्या आयुष्याची..!
ज्याच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम केलं तो दिलीपकुमार सध्या हयात नाही अन् ज्या सौंदर्याने निस्सीम प्रेम केलं ती मधुबाला देखील सध्या हयात नाही.विधत्याच्या नगरीत जेंव्हा या दोन प्रेम जीवांची भेट झाली असेल तेंव्हा विधात्याने या दोघांचे देव देवतांच्या साक्षीने लग्न लावून दिले असेल अशी आशा करूया..! कारण या दोन जीवांना या भूतलावर अपूर्णतेत जगायला बाध्य करणारा देखील हाच विधाता होता.त्याला आपली चूक लक्षात येऊन त्याच परिमार्जन करणं आवश्यक वाटलं असेल..!
असो, आज विधात्याने आपल्या कुंचल्यातून निवांत वेळी निर्माण केलेल्या सौंदर्याचा म्हणजेच मधुबालाचा जन्मदिन आहे.(जन्म दिनांक १४/२/१९३३) या निरागस सौंदर्याला माझ्याकडून एक रसिक म्हणून विनम्र अभिवादन..!🌹🙏🏻
वंदे मातरम्..!
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १४ फेब्रुवारी २०२३, मंगळवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा