मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
प्रेमळ अन् गुणी मित्र जनार्दन भाऊ राऊत सर..!
===================================
माननीय जनार्दन भाऊ राऊत सर अन् माननीय दत्ता भाऊ घोगरे सर, मूळ राहणार काटे पिंपळगावकर या दोघांवर जीवापाड प्रेम करावं अशी ही प्रेमळ व्यक्तिमत्वे आहेत. ज्यांच्याशी मनातलं बोलावं, अशी हृदयातल्या फार मोजक्या मित्रांपैकी ही जोडगोळी..!
जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांचं अन् माझं नाते तसे बघितले तर शिवभाऊ म्हणून देखील आहे. एकमेकांच्या गावात जाणं येणं हे आम्हा दोघांच्या गावकरी मंडळीत पूर्वीपासून ते आजतागायत सुरू आहे.त्याच सहवासाच्या नात्यातून आमच्या मैत्रीच्या नात्यात इ.स.१९९२ पासून सुरुवात झाली ती आजतागायत कायम आहे.
काटे पिंपळगाव अन् पालखेड ही दोन्ही गावे कलाप्रेमी गावे..! जनार्दन भाऊ राऊत यांनी आमच्या पालखेड गावातील कार्तिकी यात्रेतील एका नाटकात अभिनय देखील केलेला आहे. काटे पिंपळगाव येथून त्यांच्या नाट्य मंडळाने एक नाटक आमच्या पालखेड गावातील यात्रेत सादर केले होते.
कन्नड येथील सहवासात या दोन्ही जेष्ठ मित्रांकडून खूप काही शिकायला मिळालं. एकाच खोलीत स्वयंपाक बनवणं अन् तेही एकाच पितळाच्या बादलीत सर्वकाही कामे उरकून घेणे हे फक्त आणि फक्त आम्हालाच जमले होते.जेंव्हा जेंव्हा जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांची भेट होती तेंव्हा तेंव्हा एकमेकांची खुशाली विचारण्या अगोदर ती अनमोल पितळी बादली आता कुठे अन् कशी आहे याची आवर्जून चौकशी केली जाते.😊
वसतिगृहातील आमच्या वास्तव्य काळातील आयुष्याच्या अनेक आठवणी ह्या आजही आम्हाला जगायला शिकवितात. अनेक चमत्कारिक प्रसंग फुकटमध्ये अनुभवायला मिळतात. जर एखादा माणूस उच्च शिक्षण घेत असेल तर अशा माणसाने त्याच्या शिक्षणाच्या काळात काही काळ का होईना वसतिगृहात रहायलाच पाहिजे.जेणेकरून आयुष्याच्या आठवणी इस्टमकलरच्या होऊन भविष्यातील आयुष्य अजुन इस्टमकलरच्या होऊन जाते. त्याच अनुषंगाने मी माझ्या थोरल्या मुलास चि. भावी डॉ.नमन यास मुद्दामहून वसतिगृहात राहायला लावले होते.
जनार्दन भाऊ राऊत म्हणजे एकदम साधे सरळ व्यक्तिमत्व..! त्यांचा एक सदगुण मला माझ्या आयुष्यात खूप भावून गेला आहे.त्या सद्गुणांचं दर्शन झालं होतं आम्ही कन्नड येथे डी.एडचे शिक्षण घेत असताना..! प्रिय मित्र सुनील जाधव, भगवान हिवाळे, काकासाहेब मगर , प्रशांत चौधरी इत्यादी अनेकजण आम्ही त्याकाळी कन्नड येथील समर्थनगर परिसरातील वसतिगृहात राहत होतो. आमचे ते वसतिगृह म्हणजे त्या काळातील सर्व वसतिगृहात , जगातील अस्वच्छतेत जर कुणी क्रमांक काढला असता तर आमचे वसतिगृह नक्कीच त्यात टॉप टेन मध्ये आले असते.एवढी खात्री आम्ही तिथं त्याकाळी राहणारे सर्व मित्र स्वतः च्या शरीरावर हात ठेवून सांगू शकतो. आम्ही संध्याकाळी वसतिगृहातून बाहेर फिरायला किंवा कॉलेज कडे जाताना येताना बऱ्याचदा सोबत असायचो.मी त्यावेळी बऱ्याचदा बघितले होते की, रस्त्याच्या कडेला एखादा पूर्ण कोरा कागद अथवा अर्धवट कोरा कागद दिसला की जनार्दन भाऊ राऊत त्या कागदाला उचलून खिशात ठेवायचे. आम्ही वसतिगृहात आल्यावर ज्यावेळी अभ्यासाला बसायचो त्यावेळी जनार्दन भाऊ राऊत त्या सापडलेल्या कोऱ्या कागदावर अभ्यासाचे एखादे उत्तर, मुद्दा इत्यादींचे लिखाण करायचे अन् मग तो कागद जरी कचऱ्यात फेकून द्यायची गरज पडली तर फेकून द्यायचे. हा प्रसंग मला माझ्या स्व.वडिलांच्या अशाच कृतीतून केलेल्या आठवणीत घेऊन जायचा.माझे स्व. वडील देखील थोडा जरी एखादा कोरा कागद दिसला तरी त्यावर काहीतरी कामाचे लिखाण लिहायचे अन् मग फेकून द्यायचे. या कृतीतून खूप काही शिकण्यासारखे होते.कोणताही कागद त्याचा उपयोग झाल्याशिवाय फेकून द्यायचा नाही हे विद्येच्या देवतेला प्रिय असलेलं मूल्य यातून बघायला मिळत होते. आजकाल किती कोरे कागदं वाया जातात हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे.
माझे पालखेड येथील दोन जिवलग बालमित्र नितीन जैन अन् डॉ. गणेश वाणी यांच्यामूळे देखील जनार्दन भाऊ राऊत अन् दत्ता भाऊ घोगरे यांच्याशी मैत्रीच्या नात्यात प्रेमळपणा वाढत गेला. आजही मला तो नागपंचमी चा दिवस आठवतो ,ज्या दिवशी मी काटे पिंपळगाव येथे जनार्दन भाऊ राऊत यांच्या घरी अगदी तृप्त होई पर्यंत जेवण केले होते. काही जेवणं, आपल्या सोबत जेवायला कोण आहेत अन् निव्वळ माणुसकीचं नातं कसं आहे यावर देखील त्या अन्नाची चव आणि गोडवा वाढवते. यांचं चवदार शाकाहारी उदाहरण तेच नागपंचमीच्या दिवशी केलेलं जेवण होतं.
कन्नड येथील सहवासात व्यतीत केलेल्या अनेक आठवणी आजही आमच्या हृदयात चिरंजीव आहेत.कन्नड येथील आमचा सर्व मित्रांचा सर्व सहवास आम्हा सर्व मित्रांना एक मित्र म्हणून जोडून ठेवण्यास पुरेसा आहे. ते दिवस मंतरलेले होते,म्हणून आम्ही आजही मंत्रमुग्ध होऊन आमच्या मैत्रीच्या विश्वात जिवंत आहोत..!
असो, आज आमचे जेष्ठ मित्र जनार्दन भाऊ राऊत सर मूळ राहणार काटे पिंपळगाव, हल्ली मुक्काम गंगापूर, यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त या प्रेमळ मित्राला वैयक्तिक माझ्याकडून,कन्नड येथील तत्कालीन वसतिगृहातील सर्व मित्रांकडून तसेच माझे जिवलग बालमित्र नितीन जैन, डॉ. गणेश वाणी कडून मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹🙏🏻
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : ४/२/२०२३, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा