आमचे गाव आमची माणसं.©️
" आमचे नाना..!"
==================================
माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्या काही फार मोजक्या बालमित्रांच्या संपूर्ण कुटुंबाचा अगदी घरगुती संबंध जुळून आला त्यात अग्रस्थानी आमच्या पालखेड गावातील अन् आमच्याच आळीतील गायकवाड कुटुंबीयांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.पालखेड गावातील आमच्या आळीतील समस्त गायकवाड कुटुंबीय कधी परके जाणवलेच नाही.अगदी स्वतः च्या घरात जो आपण हक्काने भाकरीच्या टोपल्यावर ताव मारतो, तोच प्रेमळ हक्क गायकवाड कुटुंबातील प्रत्येक बालमित्रांच्या घराविषयी होता,आहे अन् सदैव राहील.
आज दिनांक ४ जून २०२३, रविवार रोजी असेच माझ्या वैयक्तिक आयुष्यातील हक्काच्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी सह परिवार जाण्याचा योग आला.हा भेटीचा योग पालखेड गावातील आमच्या आळीतील घरी नव्हता, तर होता सध्या एक गायकवाड कुटुंब वैजापूर येथे स्थायिक असलेल्या घरी जाण्याचा..! पालखेड गावातील , आळीतील सुखद आठवणी सोबत घेऊन सह परिवार माझ्या आयुष्यातील खूप जिवलग बालमित्र विजू वैजिनाथ गायकवाड याच्या घरी गेलो अन् विजुच्या तीर्थरूप वडिलांची म्हणजेच आमच्या नानांची तीर्थस्वरुप बाईंची ( विजू गायकवाड यांच्या मातोश्री ) श्रद्धेय भेट झाली.
तीर्थस्वरुप वैजिनाथ कोंडाजी गायकवाड उपाख्य नाना..!
सेवानिवृत्त जि.प.शाळा मुख्याध्यापक. माझ्याशी नेहमी खूप आपुलकीने वागणारे नाना आज वार्धक्यात आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.मात्र याच वार्धक्याने आम्हा काही बालमित्रांना त्यांच्या पालखेड येथील घरात अगदी घरगुती वागताना कधीही निर्बंध लादले नाहीत.त्यांच्या घरात जो वावर आमचा प्रिय बालमित्र विजू गायकवाड याचा असायचा तो वावर त्यांच्या घरात थेट आमचा पालखेड गावातील वास्तव्य काळ जो पर्यंत होता तो पर्यंत होता.
आम्ही पालखेड येथे स्थायिक असताना, त्यातल्या त्यात माध्यमिक वयोगटात असे पर्यंत दर वर्षी आम्ही काही बालमित्र विजुच्या घरी जे पितृपक्षातील जेवण असायचे त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असायचो. त्याचं मुख्य कारण असायचे , विजूच्या घरी पितृपक्षात आम्ही काही बालमित्र गेलो की, तिथे आम्हाला वरण ,भात, कढी आमटी पोळी खीर यांच्या सोबत भजे खायला मिळायचे.आम्हा इतर मित्रांच्या घरी पितृपक्षात इतर सर्व खाद्य पदार्थ असायचे,मात्र भजे नसायचे. त्यावेळी भजे खायचे खूप आवडायचे.ती आवड प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घरी पूर्ण व्हायची. आज या आमच्या भजे खाण्याच्या तत्कालीन आवडणाऱ्या खाद्य पदार्थांच्या प्रसंगावर आजच्या दररोजच्या वडा पाव पिढीचा विश्वास बसणार नाही. त्याचं कारण आजच्या पिढीत भजे किंवा तत्सम तळलेले पदार्थ दररोज सहज उपलब्ध होतात अन् त्यामुळं त्याचं महत्त्व तेवढं राहिलेलं नाही.आमच्या बालपणी भजे सणासुदीलाच खायला मिळायचे. आम्ही माध्यमिक वयोगटात असताना प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घरी पित्राच्या जेवणाच्या पंगतीत बसलो की, आमच्या समोरची बसलेली पंगत घरातील ज्येष्ठांची असायची.त्यात तीर्थस्वरुप नाना देखील बसलेले असायचे. कितीही नाही म्हटलं तरी आम्हा काही बालमित्रांचा त्यात विशेषतः आण्णासाहेब कारभारी म्हस्के, स्व. आप्पा सुराशे अन् मी आमचा भजे खाण्याचा जो हावरटपणा असायचा त्यावर नाना समोरच जेवायला बसलेले असल्याने त्यावर मर्यादा यायची. नानांची नजर चुकवून गपागप तोंडात भजे कोंबून द्यायचे अन् पुन्हा जसे काय आपण कसे ताटातील सर्व खाद्य पदार्थ मोठ्या चवीने खात आहोत अश्या ढोंगी खाद्य आविर्भावात आमचं पित्राचे जेवण सुरू असायचे. वास्तविक तीर्थस्वरुप नाना आम्हा बालमित्रांना आमच्या जास्त भजे खाण्याचा कृतीला कधीही रागावणार नाहीत याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास असायचा,पण शेवटी आम्हा बालमित्रांचे वडील अन् तीर्थस्वरुप नाना यांच्यात आम्ही कधी अंतर धरलेच नाही.तो वडिलकीचा नैतिक धाक जाणवायचा अन् आम्ही वेळ साधून भज्यावर जास्त प्रमाणात ताव मारायचो.
प्रिय बालमित्र विजू गायकवाड अन् त्याचे भावंडे संजू, राजू अन् अविनाश ही सर्वजण आम्हाला भावंडासारखीच होती, आहेत अन् सदैव राहील. प्रिय बालमित्र विजू गायकवाड हा सध्या वैजापूर येथे दैनिक पुढारी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत आहे.जो पर्यंत पालखेड येथे आम्हा काही बालमित्रांचे वास्तव्य होते तो पर्यंत विजू गायकवाड याच्या घराच्या वरील माडी आमची हक्काची बैठक असायची. तिथे नाही शक्य झाले तर आदरणीय शिवाजी भाऊ गायकवाड याच्या घरी किंवा नितीन जैन याच्या शिवण काम दुकानात..! मात्र बैठक हमखास असायची. ( येथे ' बैठक ' शब्द प्रयोग केला आहे. त्याचा अर्थ फक्त आणि फक्त निखळ मैत्रीच्या गप्पांची रंगीबेरंगी चर्चा असा अर्थ अभिप्रेत आहे.आजकाल काही मराठी शब्द काही जणांनी त्यांच्या वर्तनाने संकुचित करून टाकले आहे. ) असो,प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घराच्या वरील खोलीत दिवसभर आम्ही काही बालमित्र पसरलेले असायचो.कधी कधी आमच्या गप्पांचा गोंगाट देखील व्हायचा, मात्र तीर्थस्वरुप नाना आम्हाला यावरून कधीही रागावले नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून तीर्थस्वरुप नाना अन् त्यांचं संपूर्ण कुटुंब वैजापूर येथे स्थायिक झाले आहे. दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत श्री. पारेश्र्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेला जेव्हा जेंव्हा तीर्थस्वरुप नानांची भेट होती, तेंव्हा तेंव्हा तीर्थस्वरुप नाना स्वतः हून आम्हा मित्रांना गर्दीत असलो तरी भेटायला यायचे. यदा कदाचित तीर्थस्वरुप नानांची भेट झाली नाही, तर यात्रेच्या धामधुमीत नानांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटायचो. वयोमानानुसार तीर्थस्वरुप नाना आता थकले आहेत.
आज जेंव्हा मी सह परिवार वैजापूर येथे तीर्थस्वरुप नानांची श्रद्धेय भेट घेतली त्यावेळी नानांचे हृदय प्रेमाने खूप भरून आले.त्यात वडीलकीची माया होती.आपली मुलं आपल्याला भेटायला आली याचा गगणात न मावणारा आनंद होता.जे नाते रक्तविरहित नात्यातील सर्वोच्च श्रेणीतील प्रेमळ असते तिथं फक्त भेटीने मनाला प्रफुल्लित करणारा पारिजातकाचा सडा पडलेला असतो.अशा भेटीत मनाच्या गाभाऱ्यात आपुलकीचा सुगंध दरवळत असतो. अशा भेटीत सख्खे कोण अन् परके कोण या बाबी गौण असतात.अशा भेटीत फक्त एकच भाव असतो अन् तो म्हणजे ही माणसं आपली आहेत अन् आता या क्षणाला मी यांच्या सोबत आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद उपभोगत आहे हेच भाव असतात , दुसरं काहीही नाही..!
आज ज्यावेळी माझ्या पत्नीने तीर्थस्वरुप बाईंना ( प्रिय बालमित्र विजू गायकवाड यांच्या मातोश्रींना विजू ज्या नावाने हाक देतो त्याच नावाने मीही हाक देत असतो.) स्वयंपाक घरात मदत केली, ती पाहून तीर्थस्वरुप नानांच्या हळू आवाजात मुखातून कित्येकदा शब्द बाहेर पडले की,
" अरे नंदू, तिला उगीचच त्रास झाला..!"
मी तीर्थस्वरुप नानांना म्हणालो..
" अहो नाना, हे आमचं पण घर आहे. त्यामुळं कृपया असे म्हणू नका. तुम्ही सगळी माणसं आपलीच आहात.तुम्ही कधी आम्हाला परके समजले नाही.मग तुमचं घर देखील आमचं हक्काचे आहे..! "
तीर्थस्वरुप नाना असो किंवा त्यांच्या पिढीतील सर्व माणसं, यांना आपल्या मुळे कुणाला त्रास झालेला आवडत नाही.स्वावलंबी , स्वाभिमानी आयुष्य व्यतीत करत करत ही जुनी जाणती पिढी आज आपल्या पिढीत आदर्शवतच म्हणावी अशी आहे.
ज्यावेळी आज सकाळी तीर्थस्वरुप नाना अन् तीर्थस्वरुप बाईंची वैजापूर येथील घरी भेट झाली त्यावेळी मी , माझी पत्नी अन् धाकटा मुलगा यांनी मनोभावे दर्शन घेतले होते तीच श्रद्धेय कृती निरोप घेताना पण केली.निरोप घेताना तीर्थस्वरुप बाईंना आवर्जून सांगितले की,
" नानांना, आम्ही केदारनाथ बद्रिनाथ तीर्थयात्रेहून आणलेला जो पवित्र तीर्थप्रसाद आहे तो नक्की ध्यान करून द्या..! "
आम्ही घरातून बाहेर पडलो. सोबत विजू अन् प्रिय मित्र धनंजय साळुंखे ( वैजापूरकर ) होते. थोडे अंतर चालून गेल्यावर मी पुन्हा परत तीर्थस्वरुप बाईंना आवर्जून सांगायला गेलो की, " नानांना, आम्ही केदारनाथ बद्रिनाथ तीर्थयात्रेहून आणलेला जो पवित्र तीर्थप्रसाद आहे तो नक्की ध्यान करून द्या..! "
आज कुटुंबातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तींची भेट झाल्याचे आत्मिक समाधान लाभले होते. काही ज्येष्ठांच्या भेटी ह्या भावूक मनांना गतकाळातील आठवणी जाग्या करायला अन् आपलं तिथून पुढचं आयुष्य प्रफुल्लित करायला पुरेश्या ठरतात.जशी की आज खूप मायाळू तीर्थस्वरुप बाई अन् तीर्थस्वरुप नाना यांची श्रद्धेय भेट झाली..!
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : ४ जून २०२३, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा