गुरुवार, २२ जून, २०२३

असा खलनायक पुन्हा होणे नाही.


 


चिंतन ©️


असा खलनायक पुन्हा होणे नाही..!


=====================================


अमरीश पुरी यांच्या सारखा हिंदी चित्रपटसृष्टीत  खलनायक झाला नाही अन् होण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नाही.त्यांच्या खल भूमिकेला साथ दिली ती त्यांच्या भारदस्त, करारी आवाजाने अन् भेदक नजरेने.आवाज अन् भेदक नजर समोरच्या प्रेक्षकांना कशी घाबरवून सोडते यांचं मूर्तीमंत उदाहरण द्यायचं झालं तर थोर अभिनेते अमरीश पुरी यांच्या सारखं सर्वोत्तम उदाहरण दुसरं कोणतेही नाही.


अमरीश पुरी यांच्यातील खलनायकी अभिनयाच्या प्रेमात पडायला माझे पौगंडावस्थेतील वयोगट महत्त्वाचा टप्पा ठरला.ऐंशीच्या दशकात आमच्या पालखेड गावात स्व. तीर्थस्वरुप दौलत काका कुमावत यांचं व्हिडिओ मिनी थिएटर निमित्त ठरले.त्याकाळी VCR वर चित्रपट दाखवले जायचे.ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस लोहा नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, करण कपूर हे तीन  अभिनेते मुख्य हिरोच्या भूमिकेत होते.मात्र या चित्रपटात सगळा भाव खावून गेले ते अमरीश पुरी..! एखाद्या दिवशी कोणताही चित्रपट VCR वर दाखवायला नसेल तर लोहा हा चित्रपट हमखास दाखवल्या जायचा.त्यामुळं हा चित्रपट इथून तिथून पाठ झाला होता. तिकीट दरही माफक होते.फक्त पाच रुपये..! लोहा चित्रपटाची व्हिडिओ कॅसेट स्व. दौलत काका कुमावत यांच्याकडे कायमस्वरूपी  होती. त्यामुळं हा चित्रपट हक्काचा चित्रपट झाला होता.अतिशय क्रूर खलनायकाच्या भूमिकेत अमरीश पुरी यांनी जीव ओतून काम केले होते.त्यामुळं लोहा चित्रपटाचे सगळे यश अमरीश पुरी यांच्या नावावर जमा झाले होते. अमरीश पुरी यांच्या खलनायक म्हणून अभिनयाच्या कारकीर्दीत प्रामुख्याने मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बो या व्यक्तिरेखेचा उल्लेख रसिक करत असतात.मात्र माझ्या मते अमरीश पुरी यांनी आपल्यातील अतिशय क्रूर खलनायक अभिनेत्याला लोहा याच चित्रपटात सादर केले होते.


अमरीश पुरी यांच्या अभिनयाला धारदार पैलू पाडण्याचे काम मोजक्याच दिग्दर्शक मंडळींनी केले.त्यात प्रामुख्याने राजकुमार संतोषी, प्रियदर्शन यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे राजकुमार संतोषी अन् प्रियदर्शन यांनी अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला रसिक प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत केले. ही दोन दिग्दर्शक मंडळी अमरीश पुरी यांच्या आयुष्यात आली नसती तर अख्खी हयात अमरीश पुरी फक्त आणि फक्त एक क्रूर खलनायक म्हणूनच रसिक प्रेक्षकांच्या हृदयात राहिले असते.मात्र अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला रसिक प्रेक्षकांच्या समोर वरील उल्लेखित दिग्दर्शकांनी प्रस्तुत केले अन् एका अभिनेत्याच्या अभिनयाची दुसरी बाजू रसिक प्रेक्षकांच्या समोर आली.


राजकुमार संतोषी दिग्दर्शित घातक चित्रपटातील एक बाप माणूस अमरीश पुरी यांनी अतिशय ताकदीने सादर केला. घातक चित्रपटात सनी देओल, डॅनी अन् अमरीश पुरी हेच तिघेजण संपूर्ण चित्रपटात आपलं अस्तित्व दाखवत असतात, बाकीचे फक्त गर्दीतले चेहरे जाणवतात.


अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला खऱ्या अर्थानं ओळख दिली ती प्रियदर्शन या दिग्दर्शकाने..! विरासत अन् गर्दीश हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. विरासत चित्रपटातील ठाकूर आजही त्याच रुबाबात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे.माझ्या मते अमरीश पुरी यांच्या संवेदनशील अभिनयाच्या कारकीर्दीत सर्वात श्रेष्ठ चित्रपट जर कोणता असेल तर तो प्रियदर्शन दिग्दर्शित गर्दीश हाच आहे. बाप अन्  मुलाच्या स्वभावाचे द्वंद्व यात खूपच सुरेख पद्धतीने सादर केले आहे. जॅकी श्रॉफ अन् अमरीश पुरी यांच्या अभिनयाची जुगलबंदी गर्दीश या चित्रपटात बघायला मिळते.


वास्तवातील आयुष्यात अमरीश पुरी खूप सज्जन अन् खूप शिस्त प्रिय गृहस्थ होते.अभिनय सोडून इतर झगमगाटी आयुष्यात अमरीश पुरी रमले नाहीत.


असो, आज दिनांक २२ जून २०२३ रोजी स्व. अमरीश पुरी यांचा जन्मदिन आहे.( जन्म दिनांक २२/६/१९३२)

त्यानिमित्त या महान अभिनेत्याला त्यांच्या अभिनयाला विनम्र अभिवादन..! 🙏🏻


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ जून २०२३, गुरुवार. शुभ रात्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा