मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ४)
===================================
गौरी कुंड येथील मुक्कामी मी मोबाईल मध्ये पहाटे साडे तीन वाजताचा अलार्म लावलेला होता.वास्तविक पहाटे चार वाजताचे उठायचे नियोजन होते,पण मुद्दामहून एक तास अगोदरचा अलार्म लावलेला होता. मला दररोज पहाटे उठण्याची सवय असल्याने लावलेल्या अलार्म ची गरज पडलीच नाही.मी पहाटे साडे तीन वाजेच्या आसपास उठलो. एक एक करून माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुले पण उठली होती. अंगावर उबदार रग, दुलई होती, तरी देखील प्रचंड कडाक्याच्या थंडीने शरीर पार गारठून गेले होते. सकाळची दिनचर्या आटोपली होती. दोन्ही मुलांनी मुक्कामी असलेल्या रुमच्या बाहेर जाऊन वातावरणाचा कानोसा घेतला अन् पटकन रूम मध्ये आले. बाहेर खूपच कडाक्याची थंडी पडलेली आहे हा स्वर त्यांच्या बोलण्यातून जाणवला होता.
आता पहाटेचे साडे चार वाजले होते. रूमच्या बाहेर आल्यावर ज्यांना चहा प्यायची होती त्यांनी गरमागरम चहा पिली. मी अन् माझे मुलं चहा शौकीन नसल्यामुळे मी अन् माझ्या दोन्ही मुलांनी थंडगार पाण्यावर चहा समजवून चहा पिण्याचा आनंद मानून घेतला होता.अगदी बरोबर पहाटे पाच वाजता आम्ही गौरी कुंड येथून बाबा केदारनाथाच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात केली.काही अंतर पायी चालून झाल्यानंतर आमच्या सोबत असणाऱ्या सहकारी कुटुंबाने घोड्यावर बसून पुढे जाण्याचा निर्णय घेतला अन् ते पुढे घोड्यावर बसून मार्गस्थ झाले. साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतर पायी चालून झाले होते.हातात धरून चालताना उपयोगी पडणाऱ्या दोन काठ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून विकत घेतल्या.मुलांनी काठी घ्यायला नकार दिला होता.
सकाळचे सात वाजले होते.अंगात खूप उबदार असलेले कपडे परिधान केलेले होते,तरी देखील भयंकर थंडी जाणवायला लागली होती.सकाळी सात वाजता सोबत घेतलेला पतंजली बिस्कीट पुडा प्रत्येकाने एक एक खाल्ला अन् पुढे मार्गस्थ झालो.खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून पुढचा प्रवास करणे आवश्यक होते.उंच चढण लागली होती.चालताना सुरुवातीला दम लागू लागला होता,पण चालण्यात सातत्य कायम राखल्यामळे आता लागणारा दम नाहीसा झाला होता.हातातली काठी अधून मधून उपयोगी पडत होती. पाणी प्यावे वाटत होते,पण कमालीचा गारठा अन् त्यामुळं पाणी पिण्याची इच्छा असूनही खूप थंड पाणी पील्या जात नव्हते.तीन किलोमीटर अंतर पायी चालून झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबू सरबत विक्रत्याकडे आम्ही थांबलो होतो.हिमालयाच्या पर्वत रांगातील दऱ्या खोऱ्यातून झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे सरबत त्या विक्रेत्याने तयार केले होते. मला अगोदर त्या वाहणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर शंका आली,पण पर्याय कमी असल्यामुळे मी मौन पाळले. वाहणाऱ्या पाण्यापासून बनवलेले मस्तपैकी सरबत पिऊन झाल्यावर पुन्हा मार्गस्थ झालो.आम्ही हर हर महादेव असा जयघोष अधून मधून करत होतो.
सकाळचे आठ वाजले होते.आता येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या घोड्यांची वर्दळ वाढली होती.विशेषत: बाबा केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या घोड्यांची वर्दळ वाढली होती.आता पायी चालताना निसरडा रस्ता, घोड्यांची वर्दळ अन् स्वतः ला यातून सावरत सावरत पायी प्रवास सुरू झाला होता.काही घोडे अन् त्या घोड्यावर बसलेले भाविक यांच्या शरीराचा अन् पायांचा धक्का बसत होता. रस्त्याची रुंदी साधारणतः पाच ते दहा फूट होती. त्याच रत्यावरून येणारे जाणारे पायी प्रवासी, त्याच रस्त्यावरून येणारे जाणारे घोड्यावर बसलेले प्रवासी, त्याच रस्त्यावरून पाठीवर प्रवाश्यांना ने आण करणारे, त्याच रस्त्यावर डोलीत प्रवाश्यांना ने आण करणारे..! असा एकंदरीत प्रवास सुरू झाला होता.हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या परिसरात निसर्गाची मुक्त उधळण बघून मन प्रसन्न होत होते. बाजूलाच खोल दरीतून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला बघून हीच ती मंदाकिनी आहे जिने वर उंच असणाऱ्या बाबा केदारनाथाच्या पवित्र परिसराला स्पर्श करून आपलं मार्गक्रमण पुढे सुरू ठेवले होते. खोल दरीतून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या प्रवाहाला बघून मला असे वाटले की, स्री अन् नदी ह्या आपल्यातील असलेल्या दुसऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो या मूल्याची जाणीव झाली. मंदाकिनी नदी या मूल्यांना नैसर्गिक प्रवाहाच्या द्वारे सतत वाहते ठेवून मानवी संस्कृती वृद्धिंगत करत आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूच्या डोंगर , पर्वत अन् मैदानाला महत्त्व आहे.फरक फक्त एवढाच होता, स्री चे तरल, शालीन , स्वच्छ अन् भावूक स्वभावाच्या वाहत्या प्रवाहामुळे पुरुषाच्या आयुष्याचे नंदनवन बहरत आलेले आहे.अन् नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्वत ,डोंगर दऱ्या खोऱ्यांना सौंदर्य, देखणं अन् राजबिंडे रुप प्राप्त झालेले आहे. असेच काहीसे स्री च्या तरल, शालीन स्वच्छ अन् भावूक स्वभावाच्या वाहत्या प्रवाहामुळे पुरुषाच्या आयुष्याचे नंदनवन फुलले आहे अन् असे कित्येक पिढ्या फुलत जाणार आहे. मात्र हीच बाजूला वाहणारी मंदाकिनी नदी जेंव्हा भयंकर पावसामुळे, पावसाच्या पाण्याच्या अतिरेकामुळे आपलं भान विसरते किंवा आपली मर्यादा ओलांडते तेंव्हा तिच्या आसपास असलेल्या चराचरांना उध्वस्त करत करत पुढे जात असते. स्री चे देखील असेच असते का..? द्रौपदी त्या समस्त स्रीयांचे प्रतिनिधित्व करणारी आहे का..? असे विचार प्रवाह माझ्या अंतर्मनात सुरू होते.बाजूला पायी चालत असलेल्या मानवी समूहाच्या ' हर हर महादेव ' या जयघोषाने माझ्या अंतर्मनातील विचार प्रवाह थांबला होता अन् मीही ' हर हर महादेव ' असा जयघोष करून पुन्हा आपल्या प्रवासाच्या लयीत आलो होतो.
चढणीच्या प्रवासामुळे आता पायात अधून मधून थकवा जाणवू लागला होता .केदारनाथ घाटी ज्या नैसर्गिक हवामानाच्या लहरीपणा बाबतीत प्रसिद्ध आहे, आज त्या मानाने हवामान खूपच स्वच्छ होते.गौरी कुंड येथून पहाटे पाच वाजता आम्ही पायी निघालो होतो. आता सकाळचे नऊ वाजले होते.आम्ही आता रामबाडा येथे पोहोचलो होतो. रामबाडाहून पायी चालणाऱ्या भाविकांची खरी परीक्षा सुरू होती.हाच तो रामबाडा परिसर आहे जिथं मंदाकिनी नदीवर पुल बांधलेला आहे.याचं पुलाचे पूर्णतः अस्तित्व जून २०१३ च्या महाभयंकर प्रलयात नाहीसे झाले होते.हाच रामबाडा गौरी कुंड ते बाबा केदारनाथ मंदिर दरम्यान सरासरी मध्यावर आहे.इथुन वर असणाऱ्या हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगा कडे बघितले तर वर वर जाणारे रस्ते बघून छातीत धडकी भरते.अजून खूपच उंच चालत जायचे आहे याची जाणीव होते. थोडक्यात रामबाडा येथील परिसर दोन विभागात विभागणी करतो.एक गौरी कुंड ते रामबाडा अन् दुसरा रामबाडा ते बाबा केदारनाथ मंदिर..! पुलाच्या खालून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्यात दूरवर जून २०१३ मधील महा भयंकर प्रलयातील मनाला दुःख देणाऱ्या आठवणी दिसल्या. दूरवर नदीच्या पाण्यात कडेला जून २०१३ मधील महा भयंकर प्रलयात जो लोखंडी पूल होता तो वाहून जाऊन मोडतोड झालेल्या अवस्थेत दिसला होता. आम्ही ज्या पुलावर उभे होतो त्याची अन् त्याखाली वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्याचे अंतर बरेच होते. एवढे अंतर असूनही त्यावेळी भयंकर पुरात लोखंडी पूल वाहून गेला होता. यावरून जून २०१३ मधील भयंकर प्रलयाची व्याप्ती सहजपणे लक्षात येत होती. याच रामबाडा येथील मंदाकिनी नदीच्या सध्याच्या पुलावर उभे राहून आम्ही फार वेगात फोटो काढून घेतले,कारण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीला सांभाळत हे काम करावे लागले होते.
रामबाडा हून आम्ही पुन्हा बाबा केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो. आता खूप उंचाकडे चालताना आपला असलेला सर्व अहंकार बाजूला ठेवून मार्गक्रमण करत करत पुढे जात होतो. आपल्या आयुष्यात पण ज्यांना उंचीकडे जायचे असते त्यांना देखील आपला असलेला तथाकथित अहंकार बाजूला ठेवूनच मार्गक्रमण करायचे असते हाच संदेश रामबाडा येथून पुढचा प्रवास करून देऊ लागला होता.
वंदे मातरम्
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ११ /९ /२०२३, श्रावण मास, चौथा सोमवार.
क्रमशः







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा