#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏
=====================
माझ्या शिक्षकी आयुष्यात लासुरगाव ता.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगरचे एक विशिष्ट स्थान आहे.माझ्या शिक्षकी आयुष्याचा प्रारंभ याचं लासुरगाव केंद्रांतर्गत झाला.आयुष्यातले पहिले काहीही असले की, ते पहिलं हृदयाच्या कोपऱ्यात सदैव जपलेले असते.त्या पहिल्याला आणि त्या पहिल्याच्या सानिध्यातील घटनांना हृदयाच्या कोपऱ्यात सदैव जपल्या जाते.अर्थात हे सर्वांना शक्य होत नाही. जवळ जवळ दीड तप आयुष्याचा कालखंड लासुरगाव आणि केंद्रांतर्गत विविध गावांच्या सेवेत गेला. आयुष्याच्या या प्रवासात बरीच मित्रमंडळी लाभली.त्यात वयोगटाचे अन् गप्पांच्या विषयांचे बंधन कधीच आले नाही.जेष्ठ , कनिष्ठ अन् सम वयस्क अशा सर्व वयानां आपलंस करत करत आयुष्य व्यतीत झाले.
आयुष्याच्या प्रवासात याचं लासुरगाव मधील एक व्यक्तिमत्व परिचित झाले.वास्तविक त्यांचा अन् माझा , लासुरगावातील इतर माझ्या काही जेष्ठ , कनिष्ठ अन् सम वयस्क मित्रांसारखा अनौपचारिक संबंध आला नाही.मात्र एक व्रतस्थ, धार्मिक अन् आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी भटकंती केलेल्या सदवृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून सदरील सद्गृहस्थ मला कमालीचे भावले. त्याचं नाव आहे आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार..!
आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार..!
आई नर्मदेला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र अन् श्रद्धेचे स्थान आहे.हिंदू धर्म मुळातच मूलतः निसर्गपूजक आहे.पंचमहाभूतांचे पूजन, निसर्गातील नैसर्गिक स्थळांना कृतज्ञतेची भावना ठेवून त्यांचे पूजन करणे अन् त्या अनुषंगाने विविध सण उत्सव परंपरा निर्माण झाल्या. त्याचं निसर्गाच्या अफाट शक्तीला वंदन म्हणून आई नर्मदेचे पूजन अन् कृतज्ञतेची भावना म्हणून आई नर्मदेची परिक्रमा याला हिंदू धर्मात अतिशय पवित्र स्थान आहे.कित्येक भाविक आई नर्मदेची पायी परिक्रमा करतात.आई नर्मदेची पायी परिक्रमा करणे वाटते तेवढे सोपे नाही.अत्यंत शारीरिक त्रास, संयम अन् त्यागी वृत्ती इत्यादी मूल्यांना अंगिकारून नर्मदा परिक्रमा साध्य होते.आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार यांनी आता पर्यंत आई नर्मदेची तब्बल नऊ वेळा पायी परिक्रमा केली आहे.यापुढेही हा श्रद्धेय क्रम सुरु राहणार आहे यावर उत्तम भाऊ पाटील कारभार ठाम आहेत.
ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी उत्तम भाऊ आपल्या नर्मदा परिक्रमातील प्रवासात होते.संपर्काचे ऑनलाईन साधन जवळ नसल्याने नोटबंदी झाली आहे हे त्यावेळी त्यांना समजले नाही.जवळ पाचशे रुपयांच्या नोटा होत्या.त्याचवेळी नर्मदा परिक्रमा सुरू असताना त्या पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, व्यवहारात न चालल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली होती.उत्तम भाऊंचे व्यवहारीक आयुष्य पूर्णतः थांबले होते. आयुष्य ठप्प झाल्यासारखे झाले होते. मात्र अनोळखी प्रदेशात, अनोळखी रस्त्यावर, अनोळखी व्यक्तीने त्यांची ही समस्या ऐकल्यावर त्या पाचशे रुपयाच्या नोटांच्या बदल्यात त्याच मूल्यांची व्यवहारातील रक्कम दिली होती. ही आठवण ज्यावेळी उत्तम भाऊ आजही आठवणीने सांगतात त्यावेळी सहेतुक कार्याच्या वेळी, एखादे चांगले मन एखाद्या समस्येत असेल तर कुणीतरी येतो अन् आपल्याला मदत करतो ही प्रत्यक्षात घडलेली भावना सुखावून जाते.जो मदत करतो तो विठ्ठल ही श्रद्धेय भावना सहज पटते. उत्तम भाऊंनी तब्बल नऊ वेळा पायी परिक्रमा केली आहे.प्रत्येक परिक्रमेततील आठवणी भिन्न भिन्न आहेत.एका वेळी नर्मदा परिक्रमेत प्रणवगिरीजी नावाचे साधू यांचा पायी प्रवासात सहवास लाभला. नर्मदा परिक्रमा मार्गावरील दीर्घायुष्य लाभलेले वैकुंठवासी सीयाराम महाराजांच्या आश्रमापासून प्रणवगिरी यांचा पायी प्रवासात सहवास लाभला होता.प्रणवगिरीजी स्वतः MBBS MD होते, मात्र वैराग्य प्राप्त करून अध्यात्म स्वीकारले होते. पुढील आयुष्यातील प्रवासात प्रणवगिरीजी यांची भेट कधी झालीच नाही.काही भेटी एकदाच अन् चिरकाल स्मरणात राहणाऱ्या ठरतात.त्याचे हे एक उदाहरण होय.जेंव्हा उत्तम भाऊ त्यावेळी नर्मदा परिक्रमा आटोपून आपल्या भागात आले होते त्यावेळी ज्ञानानंद महाराजांच्या मार्फत त्यांना असे समजले की, प्रणवगिरीजी हे त्यागी अन् उच्च विद्या विभूषित आहेत.त्याचे सानिध्य सहसा लाभत नाही.सतत अध्यात्मिक प्रवासात असतात.ज्ञानानंद महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ सर होय. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ सर यांनी संन्यास घेऊन आपलं पुढील आयुष्य प्रारंभ केले.प.पू. ज्ञानानंद महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे आदरणीय ज्ञानेश्वर गुंजाळ सर अन् मी हडस पिंपळगाव ता. वैजापूर येथे शिक्षक म्हणून सोबत कार्यरत होतो.
आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार यांनी तब्बल नऊ वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.मात्र कुठेही बडेजाव केला नाही. आई नर्मदेच्या परिक्रमेला निघताना ग्राम दैवत आई दाक्षायनीचे मनोभावे दर्शन घेऊन निघायचे आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावी परत आल्यावर प्रथमतः आई दाक्षायनीचे मनोभावे दर्शन घ्यायचे हा श्रद्धेय क्रम तब्बल नऊ वेळच्या नर्मदा परिक्रमा प्रवासापासून सुरू आहे.
मला आजच्या भेटीत आदरणीय उत्तम भाऊंचे सानिध्य प्राप्त झाले. माझा अत्यंत आवडता विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे याने आमचे सोबतचे फोटो काढले.फोटो काढताना गणेश आम्हाला म्हणाला –
" थोडेसे smile करा "
यावर उत्तम भाऊ लगेच म्हणाले..
" जे प्रपंचात आहेत ते कुणीच मनापासून हसत नसते."
यावर मीही लगेच म्हणालो..
" जगासाठी हसावं लागतं. जरी यदा कदाचित कुणी हसलं तर काही वेळाने पुन्हा प्रापंचिक जबाबदाऱ्या ते हसू कमी करत असते..!"
असा शाब्दिक विनोदी प्रपंच होऊन मी आदरणीय उत्तम भाऊंचे मनोभावे दर्शन घेऊन माझ्या पुढील प्रवासाला निघून गेलो.
नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १/४/२०२६,बुधवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा