रविवार, २८ जून, २०२०

" सारस्वताचं देणं, प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! "




चिंतन

" सारस्वताचं देणं, प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! "

====================================

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  माजी कुलगुरू तसेच व्याख्याते वंदनीय प्राचार्य शिवाजीराव  भोसले यांचा आज स्मृतिदिन ! (२९ जून २०१०)
त्यानिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन..!

काही माणसं अन् त्यांची वाचा ही अदभुत असते..!त्यातील एक प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! आपल्या मराठवाडयात या महान व्याख्यात्याने त्यांच्या आयुष्यातील इ.स.१९८८ ते १९९१  या कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे कुलगुरू पद भूषविले.आपल्या अमोख आणि सरल वाणीने गहन विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले..!

सारस्वतांच्या मांदियाळीत आपले स्थान मिळविणाऱ्या अनेक महान सारस्वतांच्या पैकी प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! त्यांच्या निधनानंतर आपल्या महाराष्ट्रात जी वैचारिक व्याख्यात्याची पोकळी निर्माण झाली ती अद्याप भरलेली नाही असे मला वाटते..! आजकाल बरेच व्याख्याते पार बेंबीच्या देठापासून ओरडून आपले विचार व्यक्त करत असतात..! त्यांचे विचार ऐकताना असे वाटते की, एकतर अशा आजकालच्या बहुतांशी तथाकथित व्याख्यात्यांचा एकतर स्वतचा  उच्च रक्तदाब वाढलेला असतो किंवा समोर बसलेल्या श्रोत्यांचा उच्च रक्तदाब वाढवित असतात..!😊

मी  ज्यावेळी लासुर स्टेशन येथे राहत होतो त्यावेळी बऱ्याचदा दूर कोपऱ्यात उभा राहून अशा तथाकथित आरडाओरडा करून आपले विचार व्यक्त करणाऱ्या व्याख्यात्यांना मनमुरादपणे ऐकुन आनंद लुटला आहे..!😊 तेंव्हा असे वाटायचे की ,हे व्याख्यान देणारे महाशय भांडत आहेत की व्याख्यान देत आहेत..?
याचा उलगडा अद्याप झालेला नाही..!😊

आजही व्याख्यान कसं आणि कशा भाषेत असावं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..!

वंदे मातरम्..!

प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब यांच्या वाचास्पदीवर नितांत प्रेम करणारा: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २९ जून २०१९, शनिवार

शुक्रवार, २६ जून, २०२०

" व्यथा..भटक्या विमुक्त जमातीची..! "




चिंतन ©️

" व्यथा..भटक्या विमुक्त जमातीची..! "

=================================

ज्या जातींना राजकीय नेतृत्व नसते त्यांच्यावर कुणी पण टीका टिपणी करा,त्यांच्या जातींच्या नावाचा नकारात्मक, उपहासात्मक उल्लेख कुठेही करा तरी काही फरक पडत नाही.आंदोलन ,जाळपोळ लुटालूट होणार नाही.कारण त्यांचे संख्याबळ कमी असते.
पण अशीच टीका टिपणी ज्या जातींचे राजकीय नेतृत्व असते, संख्याबळ असते त्यांच्या बाबतीत असे काही घडले तर ते लगेच निषेध नोंदविल्या जातात. नव्हे नव्हे बऱ्याचदा देशाच्या राष्ट्रीय संपत्तीेेचे अपरिमित नुकसान होते.

याच अशा अनेक घटना ज्यावेळी भटक्या जमाती मधील लोकांच्या बाबतीत घडतात त्यावेळी कुणीही नेता किंवा संवेदनशील माणसं पुढे येऊन एक साधा निषेध देखील व्यक्त करत नाही. काही अपवाद...!

मागील काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात भटक्या जमाती मधील लोकांना चोर समजून लोकांनी भर दिवसा ठेचून,ठेचून मारले. अतिशय भयंकर कृत्य होते ते..! सर्व बाबतीत पोरका समाज असल्याने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचारांना वेदना व्यक्त करता येत नाही.आणि जरी कुणी व्यक्त केली तरी त्याची म्हणावी तेवढी कुणी दखल घेत नाही. अशा वेळी वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची खूप खूप आठवण येते..!मुंढे साहेब यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील भटका समाज राजकीदृष्ट्या पोरका झालेला आहे.

भटक्या जमाती मधील लोकांना स्वतच्या लेकराप्रमाणे जीव लावला तो थोरल्या महाराजांनी..! हिंदवी स्वराज्याची जडणघडण करण्यात भटक्या विमुक्तांच्या कौशल्यांचा खूप उत्कृष्ट उपयोग करून घेतला तो सुध्दा परम वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनीच..! म्हणून पूर्वीही ,आजही अन् भविष्यातही भटक्या विमुक्त समाजातील माणसं आपला माणूस मानतात ते छत्रपती शिवाजी महाराज यांना..! कधी नव्हे तो भटका समाज सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात निःसंकोचपणे आपल्या बिऱ्हाडाच्या सोबत सुरक्षितपणे भटकंती करत असायचा. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी अशीच प्रामाणिक साथ दिली ती महाराणा प्रतापसिंह महाराज यांना..! 

आज भारतात जवळ जवळ पंधरा कोटी भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांची संख्या आहे. पण सगळे भटकंती अवस्थेत विखुरलेले आहेत. विशेष म्हणजे भटक्या जातींच्या प्रवर्गात अनेक जातींचा समावेश आहे. उदा.भटक्या जमाती ब श्रेणीत आरक्षणाची मर्यादा फक्त २.५ टक्के आहे अन् भटक्या जमाती ब श्रेणीत एकूण जातींची संख्या आहे ३८ ..! त्यातही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जे आरक्षण दिलेले आहे,तेही अ,ब,क,ड अशा श्रेणीत विभागून देण्यात आले आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना फक्त जातीचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेता येत नाही. त्यात अजुन समस्या अशी आहे की, उच्च उत्पन्न मर्यादा नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र असल्या शिवाय आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यातील बहुतांशी लोकांना आजही भटक्या अवस्थेत गावोगावी फिरावे लागते.त्यात पुन्हा काही गावातील लोकांच्या संशयी नजरा भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर रोखून असतात. शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या कक्षा फार फार कमी प्रमाणात रुंदावलेल्या आहेत. आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बऱ्याच लोकांच्या वसत्या पाल टाकून ,गावोगावी भटकंती करत आहे.काही भटक्या जातीच्या लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या इतर सदस्यांच्या प्रयत्नांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आरक्षण मिळाले याविषयी दुमत नाही..!

पण अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना फक्त जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सर्व सुख सुविधा,त्यात नोकरी देखील आली, त्या सर्व बाबी मिळत होत्या अन् आहेत.मात्र भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना असा नियम नाही. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नुसते जातीचे प्रमाणपत्र काढून सर्व सुविधांचा लाभ घेता येत नाही..! भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जातीच्या आधारावर सुविधा मिळविण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतर देखील नाॅनक्रिमीलेयर प्रमाणपत्र काढवेच लागते,तेंव्हा कुठे लाभ घेता येतो..! त्यात समस्या अजुन अशी नाॅनक्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी देखील अजुन इतर पूरक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते, उदा.उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी.

बहुतांशी भटका समाज,गावोगावी भटकंती अवस्थेत विखरलेला असल्याने याकामी अनेक समस्या आजही कायम आहेत..!😔

विशेष म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांची एकत्रित vote bank नसल्याने अशा कित्येक समस्या पूर्वीपासून ते आजतागायत कायम आहेत. आपल्या देशात कोणत्याही मानवी समुदायाला ,लाभ मिळवून घ्यायचा असेल तर त्या त्या मानवी समुदायाची जातीची अन् धर्माची vote bank असणं अत्यंत आवश्यक आहे हे कटू सत्य आहे..!

१४ मार्च २००५ रोजी केंद्र सरकारने रेणके आयोगाची स्थापना केली.उद्देश एकच होता की,भारतातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या अवस्थेचे संकलन करून यातील लोकांना न्याय मिळवून देणे.रेणके आयोगाने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाजाचा सर्वंकष अहवाल इ. स.२००८ मध्ये केंद्र सरकारला सादर देखील केला.पण...त्यावर काहीही निर्णय झालेला नाही..!😔 भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला, त्रासाला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे.

हा लेख आज लिहिण्याचे कारण असे की, २६ जून हा, महाराष्ट्र राज्याने घोषित केलेला " सामाजिक न्याय दिन " सुध्दा आहे म्हणून..!

ता.क. - सदरील छायाचित्र, तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी भेटलेल्या एका वासुदेवाच्या सोबतचे आहे.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: २६ जून २०१९

असा बाप असून काय उपयोग..?😔




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

असा बाप असून काय उपयोग..?😔

=====================================

मी आणि माझी पत्नी आज दिनांक २७/६/२०१९ रोजी आत्ताच थोड्या वेळापूर्वी संध्याकाळी ७ वाजता बजाजनगर,औरंगाबाद मधून दुचाकी वर घरी येत होतो.माझी दुचाकी मध्यम वेगाने धावत होती..!
इतक्यात.....
मला रस्त्याच्या कडेला एक पुरुष ज्यांचे वय अंदाजे ४० ते ४५ च्या दरम्यान असेल,तो पुरुष खूप दारू पिऊन निपचित पडलेला दिसला..! असे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसते त्यात विशेष काहीच नाही,पण...आज  या दारू पिवून रस्त्याच्या कडेला पुरुषाचे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांच्या कडा खरचं सांगतो...ओलावल्या..!

आमच्या समोरील मनाला चटका लावून जाणाऱ्या दृश्यात त्या दारू पिऊन पडलेल्या  नराधम  बापाच्या जवळ त्याची दोन लहानशी मुले त्या बापाला हलवून हलवून उठवत होती..! विशेष म्हणजे त्या दोन मुलांपैकी एक अंदाजे ३ वर्षाची मुलगी त्या बापाला हलवून हलवून उठवत होती..आणि तिचा अंदाजे चार वर्षाचा भाऊ बाजूला उभा होता..!

मी गाडी थांबवली अन् खाली उतरलो तर तो नराधम बाप निपचित पडला होता अन् त्याची देवकन्या त्याला उठवत होती.मी त्याला आवाज देऊन पाहिला पण..अती दारू पिल्याने तो नराधम बाप अजिबात उठत नव्हता..! दुरून एक स्री त्याच्याकडे येताना दिसली,ती त्याची पत्नी होती.ती माऊली आल्यावर आम्ही तिथून निघालो.

"ज्या बापाला,त्याची देवकन्या खूप खूप दारू पिल्यानंतर झोपेतून उठवत असते...असे नराधम बाप असून काय उपयोग..?
ज्या मुली साक्षात ईश्वराचा पृथ्वीवरील अंश असते,तिला ही दुर्दैवी वेळ यावी यापेक्षा त्या जगाच्या नियंत्याचा दुसरा कोणताच अपमान होऊच शकत नाही..! मुली, बापाच्या आयुष्यातील पहिला अन् शेवटचा श्वास असतात..! आणि श्वासाशिवाय कोणत्याही सजिवाचे आयुष्य निर्जीव आहे..! मग या दारू पिऊन पडलेल्या नराधम बापाला काय अधिकार होता,त्याच्या आयुष्यातील श्वासाला त्रास देण्याचा..?
त्या नराधम बापाला काय अधिकार होता पृथ्वीवरील ईश्वराच्या अंशाला त्रास देण्याचा..?"

असे कुणाच्याही आयुष्यात होऊ नये हीच त्या जगाच्या नियंत्याला प्रार्थना..! माझी ही प्रार्थना केवळ , अशा बापाच्या आयुष्यात  देवकन्या  असतात म्हणून..! कारण देवकन्येला त्रास देण्याचा अधिकार अशा नराधम बापाला कुणी दिला..?

वंदे मातरम्..!

ता.क.: असे बाप असून काय उपयोग...?

वरील दुर्दैवी दृश्य  पाहिलेला लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २७ जून २०१९, गुरुवार.

सोमवार, १५ जून, २०२०

" खळखळून हसणारे व्यक्तिमत्त्व बाळू पाटील निघोटे...! "






मला प्रवासात भेटलेली माणसं

" खळखळून हसणारे व्यक्तिमत्त्व बाळू पाटील निघोटे...! "
__________________________________________

मृत्यू...! एक चिरंतन व शाश्वत सत्य..!! परंतु तो जर अकल्पनीय व अचानक आला तर...ज्या प्रिय व्यक्तीचा असा स्वर्गवास होतो,तेंव्हा मात्र माझ्यासारख्याच मन एकदम शून्य अवस्थेत जाते..! काहीच सुचत नाही..!

आज दिनांक १६ जून २०१७ रोजी,,माझे परमस्नेही बाळकृष्ण साहेबराव पाटील (बाळू काका पाटील) रा.हडस पिंपळगाव,ता.वैजापूर यांच्या निधनाची दुःखद वार्ता माझ्या कानी पडली अन् मी स्तब्धच झालो..! माझा प्रिय विद्यार्थी व बाळू पाटील यांचा पुतण्या किशोर नारायण निघोटे याने मला ही दुःखद वार्ता सांगितल्यावर मी पुन्हा,पुन्हा खात्री करून विचारात गेलो...!कारण मन विश्वास ठेवायला तयारच नव्हते..! मनातील आठवणींच्या ढगांनी आदरणीय स्व.बाळू पाटील यांच्या विषयी गत आठवणींनी गर्दी करायला सुरुवात केली..!

बाळू पाटील, अतिशय दिलदार माणूस..! माझा आणि त्यांचा परिचय १९९९ पासूनचा..! मी प्रा.शिक्षक म्हणून जळगावहून हडस पिंपळगाव येथे हजर झालो..! हड्स पिंपळगाव व माझे वैचारिक व वैयक्तिक श्रद्धेच्या बाबतील तंतोतंत सुर जुळले..! कारण मी सद्गूरू जनार्दन स्वामी (बाबाजी)यांच्या धार्मिक विचारांचा अनुष्ठानार्थी व पिंपळगाव देखील याच विचाराने श्रध्देय असलेले गाव..! याच गावातील जी लोकं नेतृत्व करणारी  मंडळी होती,त्यात बाळू पाटील नेहमी अग्रेसर ..! ते स्वतः बाबाजींच्या विचारांचे निष्ठावंत सेवेकरी...! बाळू पाटील ,जेवढे धार्मिक होते ,तितकेच ते खेळकर स्वभावाचे देखील होते..!

आमच्या गावी(पालखेड,ता.वैजापूर)श्री.पारेश्र्वर महाराज यात्रे निमित्त क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयोजित  केल्या जातात.इ.स.२००० साली स्व.बाळू पाटील व स्व.ज्ञानेश्वर पाटील निघोटे(  ज्यांना आम्ही सर्व पंच म्हणायचो ) यांनी ,त्यांचा क्रिकेटचा संघ ,साखळी सामन्यात उतरविला होता..! मी ,त्यावेळी त्यांच्या विरोधात " रामजाने क्रिकेट संघ-पालखेड कडून खेळलो होतो..!  शाळेला सहकार्य करण्यात हडस पिंपळगाव येथील सर्वच माणसं अतिशय अतिशय खिलाडवृत्तीची अन् सर्व शिक्षकांशी प्रेमाने वागणारी माणसं..! माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात , शाळेसाठी कोणतेही सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या नागरिकांच्या श्रेणीत हडस पिंपळगाव येथील सर्व माणसं नक्कीच सर्वोच्च स्थानी  आहेत..!

इ.स.२००० साली, माझे लग्न ठरले..! मला आजही ते प्रसंग आठवले की, मन भरून येतं...! तत्कालीन हडस पिंपळगावच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय एस.एम.गंडे सर व बाळू पाटील माझ्या सोबत गावातील खूप स्नेहजणांच्या घरी अल्पोहार व नारळ घेण्यासाठी आले होते...! बाळू पाटील ,यांना,कुठलाच गर्व कधी शिवला नाही..! माझ्या लग्नासाठी त्यांनी चि.रविला (त्यांचा मधला मुलगा,जो,त्यावेळी इ.२री ला होता बहुधा)मुद्दामहून आणले होते..! त्यावेळी ते म्हणाले होते..
" जाधव सर,गुरूच्या लग्नाला लहान विद्यार्थ्याने  हजर राहणे ही खुप आनंदाची गोष्ट..! " असे मनमोकळ्या स्वभावाचे बाळू पाटील होते..!

शाळेत आम्ही,विद्यार्थ्यांसोबत नाटिका केली होती..! कलासक्त हडस पिंपळगावच्या रसिकांची दाद बाळू पाटील यांनी वैक्तिकरित्या माझ्याजवळ त्या नाटिकेतील कलाकार योगेश माधवराव निघोट(इ.७वीे ) चर्या अभिनयाला भरभरून दाद दिली होती..!कालांतराने माझी तिथून बदली झाली.परंतु कधी जरी ,बाळू पाटील भेटले तर  त्यांच्या खास खळखळून हसण्याच्या शैलीने भेटीला प्रारंभ करायचे..! बाळू पाटील यांना,हसण्यात " कंजुषपणा " अजिबात माहीत नव्हता..! अगदी खळखळून हसायचे..! अश्या अनेक आठवणी आदरणीय,स्व.बाळू पाटील यांच्याशी निगडित आहे..!

आज सारखी हुरहूर लागली की,बाळू पाटील यांच्या सारखा सह्रदयी माणूस आज आपल्यात नाही याची..! आपल्या समविचारी व्यक्तीसोबत आठवणी नेहमी मनात पिंगा घालत असतात...!

 स्व.आदरणीय बाळू  काका पाटील,तुमच्या सोबतच्या व्यतित केलेल्या सर्व आठवणी ,मी जिवंत असे पर्यंत " जिवंतच " राहतील..! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना..!
विनम्र अभिवादन खळखळून हसणा-या व्यक्तिमत्त्वाला..!

 वंदे मातरम्..! 
                                                                                               
श्रद्धांजली अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले व परिवार

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १६ जून २०१७

शुक्रवार, १२ जून, २०२०

चिंतन " भारदस्त व्यक्तिमत्व... आचार्य प्र.के.अत्रे...! "







#चिंतन ©️

" भारदस्त व्यक्तिमत्व - आचार्य प्र.के.अत्रे...! "

=====================================

आज दिनांक १३ जून २०१७ रोजी आचार्य प्र.के.अत्रे यांचा स्मृतिदिन..! (निधन दि.१३ जून १९६९)
त्यानिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. 🙏💐   
 गीतकार,निर्माता,दिग्दर्शक, पटकथाकार,पत्रकार,विडंबणकार,शिक्षक,राजकारणी,इ.थोडक्यात कला क्षेत्रात अत्रे काय नव्हते.....तर सर्वच होते. बहुआयामी माणूस.ज्याला कुणाला स्वतःच्या जीवनाविषयी नैराश्य आले असेल त्याने आचार्य अत्रे लिखित " मी कसा झालो " हे पुस्तक अवश्य वाचावे.मी भाग्यवान,मला ते पुस्तक "वैजिनाथ वाचनालय, वैजापूर" येथून इ.स.१९९९ सालीच वाचायला मिळाले.

अत्रेनीं- तो मी नव्हेच,कवडी चुंबक, वंदे मातरम्,मोरूची मावशी,इ.अनेक अजरामर नाटके लिहिली.आम्ही,फक्त..मुलामुलांनी पालखेड,ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथे श्री.पारेश्वर विद्यालयात इ.स.१९९०-९१ साली इ.९ वी मध्ये शिकत असताना " कवडी चुंबक " नाटक करण्याचे ठरविले..आमचे सदासर्वकाळ आदरणीय शिक्षक गुरुजी जी.एम.भगत सर ,ते नाटक दिग्दर्शित करणार होते. मला त्यातील " पंपू शेठ " ही व्यक्तिरेखा दिली होती. काही दिवस रंगीत तालिम सुध्दा झाली.पण ..सरांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते नाटक बासनात गुंडाळावे लागले.अन् आमचे स्वप्न,स्वप्नच राहिले..!

आचार्य अत्रे यांचे अनेकांसोबत राजकीय मतभेदही व्हायचे. मग निर्णय काय घ्यावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठरवायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे खूप जवळचे संबंध होते. गाडगेमहाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या सर्वांविषयी अत्रे यांना प्रचंड आदर होता. आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजत पदक प्राप्त झाले होते. त्याआधी त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण केला होता, जो भारतातील राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळवणारा पहिला चित्रपट होता. फुले यांच्यावरील चित्रपटातील पहिल्या दृश्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. बाबासाहेब आणि अत्रे यांचे प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले.

प्र. के. अत्रे सक्रीय राजकारणात होते. त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, मात्र ते अनैतिक कधीही झाले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर गेल्यावर अत्रेंनी जे अग्रलेख लिहिले ते सावरकरांवरील " अक्षय मृत्यूलेख " आहेत. अत्रे काँग्रेसपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत सर्वांशी मैत्री ठेवून होते आणि त्यांच्याशी त्यांनी टोकाचे वादही घातले. 

अत्रे हे खरेतर शिक्षणतज्ज्ञ. मराठी भाषाविषयक त्यांची शैक्षणिक पुस्तकं आजही वाचली, तर कुणाचीही मराठी भाषा सुधरू शकते. मराठी भाषा, मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी राजकीय, सामाजिक लढा एकहाती पेलला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.समकालीन साहित्यिकांबरोबरचे त्यांचे टोकाचे वाद प्रचंड गाजले. ना. सी. फडके, हे त्याचे उत्तम उदाहरण. परंतु नंतर ज्यांच्याशी वाद घातला, टोकाचे शत्रूत्व केले त्यांच्यांशी हात मिळवणे, मैत्री करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला. 

संयुक्त महराष्ट्र आंदोलनाचे प्र. के. अत्रे हे एक प्रमुख नेते होते. ‘मराठा’ हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.

प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र समितीचा भाग होते. अत्रेंबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे वा लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार करणे, हे त्यांनी कधीच केले नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या बालकासारखे होते व आयुष्यभर तसेच राहिले.

वरील मुख्य लेखातील खालील ओळींचे स्पष्टीकरण..

" लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे..."

याचा अर्थ असा की, काही माणसं जगाच्या नजरेत भरावी म्हणून नैतिक वागतात,मात्र प्रत्यक्षात ती तशी नसतात. आचार्य अत्रे अशा प्रकारे ढोंगी आयुष्य कधीच जगले नाही.

अन्..." लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार ...."

याचा अर्थ असा की, काही गोष्टी जरी समाजातील काहींच्या दृष्टीने योग्य नसेल, म्हणून त्यांनी त्या टाळल्या नाहीत.
उदाहरणार्थ काही राजकीय पक्ष,विचारधारा काहींच्या दृष्टीने विरोधाच्या होत्या,म्हणून आचार्य अत्रे यांनी त्यांच्याशी मैत्रीचे संबंध तोडले नाहीत.
लोकं काय म्हणतील, याच्यापेक्षा ,आपल्या इच्छेनुसार , मनानुसार त्यांचं वर्तन राहिले.
सारांश काय तर..आचार्य अत्रे,हे कोण काय म्हणेल, या भानगडीत न पडता,आपल्या निव्वळ स्वतंत्र विचाराने तहहयात जगले.

आचार्य अत्रे कधीही बरोबर किंवा चूक नव्हते. अत्रे हे एकमेवद्वितीय होते. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणारा चित्रपट बनवणारा माणूस, फुलेंच्या जीवनावर चित्रपट बनवून राष्ट्रपती रजत पदक मिळवून देणारा माणूस, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा माणूस, टोकाचे प्रेम आणि टोकाचा द्वेष ज्याने झेलला तो माणूस महाराष्ट्राचा हिमालय होता. असं एखादंच क्षेत्र असेल, जे अत्रेंनी गाजवायचं ठेवलं असेल. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रेम आणि ऋण या दोन्हींची उंची इतर कुणालाच गाठता येणार नाही एवढं आहे. 

मी, मे २०१७ या महिन्यात सहपरिवार मुंबईत गेलो होतो.तेथे गेल्यावर सर्वप्रथम मनोमनी वंदन केले अर्थातच अत्रे यांना, कारण प्र.के. अत्रेंच्या रोखठोक भूमिकेमुळे देखील मुंबई आपली राहिली व मराठी माणूस तेथे तग धरून उभा राहिला.

संयुक्त महाराष्ट्रात मुंबई राजधानी झाली. प्र.के. अत्रे यांनी आपल्या हजरजबाबी, उपरोधिक वक्तृत्व शैलीने आणि विनोदाने शेकडो तास भाषणं करून मराठी माणसाला जागा केला. प्र.के. अत्रे यांचे मुंबईत स्मारक असायला हवे.

वि.र.काळे लिखित "आचार्य अत्रे:महाराष्ट्रातील बलदंड व्यक्तिमत्त्व " या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आचार्यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी काढलेले उदगार खूपच समर्पक आहे ....

" उद्या जर माझी समाधी बांधायची वेळ आलीच तर त्यावर एकच वाक्य लिहा --हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील;पण हा कृतघ्न कधीही नव्हता.."

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनी माझ्यातर्फे या महान अवलियास विनम्र श्रद्धांजली..! 🌹🙏🏻

वंदे मातरम्..!

 ता.क.: या लेखाचे हक्क माझ्याकडे राखून आहेत.कुणीही लेखाच्या शेवटी स्वतः चे नाव लिहून कॉपी पेस्ट करू नये.असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..! 

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: १३ जून २०१७

गुरुवार, ११ जून, २०२०

"आमचा एक असाही कर्णधार, बबन जाधव.!" 😊






आमचे गाव आमची माणसं..!

"आमचा एक असाही कर्णधार, बबन जाधव.!" 😊

===========================

इ. स.१९९४-९५ चा कालखंड होता.आमच्या पालखेड ता.वैजापूर  गावात तेंव्हा आम्हा सर्व मित्रांच्या अंगात क्रिकेटचा ज्वर जरा जास्तच  फणफण करत होता. तसे पाहिले तर त्यापूर्वीही अन् आताही आमचे गाव, नाट्यकला अन् क्रिकेट यात नेहमी अग्रेसर होतेच अन् आहे..! याच दोन्ही कलागुणांचा ज्वर आम्ही आमच्या पिढीत देखील याची देही याचि डोळा पाहिला अन् अनुभवलेला सुध्दा आहे..!

वरील उल्लेखित कालखंडात आम्ही मित्र शिक्षण घेऊन गावाच्या वरील उल्लेखित कलागुणांना अधून मधून जशी जमेल तशी वाव देत असायचो..! यापैकीच एक ज्वर आमच्या सर्वांगात लई फणफण करत असायचा,अन् तो म्हणजे क्रिकेट...! आम्हाला क्रिकेट खेळायची लई मोक्कार हौस..! त्या हौशेपाई आम्ही,पेशवेकालीन जे अतिशय पडझड झालेले वाडे आमच्या गल्लीत होते,तेथील लाकडी फळ्या सभ्य भाषेत सांगायचे म्हणजे काढून आणायचो अन् असभ्य भाषेत सांगायचे म्हणजे चोरुन आणायचो अन् त्याच्यापासून बँट तयार करायचो..!आम्ही करत असलेली ही कृती शुद्ध चोरी असायची पण..हौस कांदे अन् लसूण खाते म्हंटल्यावर..तिथं बाकी कशाचाही वास येत नसतो.. असच काहीतरी होतं..! त्यातल्या त्यात आमच्या आयुष्याचा  पौगंडास्थेतील उत्तरार्ध सुरू असल्याने या गोष्टी खेळाच्या नावाखाली सुरू होत्या..!  😊 आमच्या क्रिकेट संघातील सर्वजण सर्व सामान्य परिवारातील होते.त्यावेळी आमच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होता बाळु माळी..! आज तो जिल्हा परिषद जालना अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.आमच्या सर्व  क्रिकेट खेळाडू मध्ये बाळु माळी याच्या अंगात क्रिकेटचा ज्वर जरा जास्तच चढलेला असायचा..!

त्याकाळी आमच्या पालखेड गावाच्या परिसरात १० ते १५ कि.मी.अंतरावर असलेल्या लासुरगाव, ता.वैजापूर येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.ती बातमी बाळु माळीच्या कानावर आली.बाळु माळी लगेच कामाला लागला.गावातील त्याचा विखुरलेला संघ गोळा करायला त्याने सुरुवात केली.सर्व खेळाडू पारेश्वर् मंदिर गल्लीत एकत्र जमलो, तिथं जमल्यावर बाळु माळीने आम्हाला लासूरगाव येथील क्रिकेट स्पर्धेविषयी सांगितले अन् आपण त्यात कोणत्याही परिस्थितीत सहभागी व्हायचे असे सांगितले..!

त्याकाळी पालखेड,दहेगाव मार्गे लासूरगाव रस्ता अतिशय खराब होता.बाळु माळी याने क्रिकेट स्पर्धेत सहभागी व्हायचे नक्की केले होते.पण ,पालखेडहुन लासुरगावला जाण्याची समस्या निर्माण झाली.जायचे तर नक्की,पण...एवढ्या सगळ्यांनी जायचे कसे..? हा प्रश्न उभा राहिला.त्याकाळी आम्ही घरच्यांना पैसे मागायची हिम्मत करत नव्हतो.आज माझी मुलं किंवा माझ्या समकालीन मित्रांची मुलं आमच्याकडून सहज पैसे मिळवून घेतात तो भाग वेगळा..! याचे कारण बहुदा आजच्या पिढीला त्यांच्या बापाच्या पैश्याची जाणीव नसेल कदाचित..!
असो,आमच्या पुढे लासुरगावला एवढ्यांनी  कसं जायचं हा लई गंभीर प्रश्न उभा राहिला,पण आम्ही पर्याय काढायला लई पटाईत होतो.

त्याकाळी आमच्या पालखेड गावात बबन जाधव याचे लाँड्रीचे दुकान बऱ्यापैकी प्रगतीपथावर होते.हा बबन  कपडे धुवून, इस्री करून प्रत्येकाच्या घरपोच सेवा पुरविण्याचे काम  खूप चांगल्या प्रकारे करायचा.या व्यवसायामुळे त्याच्या हाती दररोज खेळता पैसा असायचा.बबन जाधव याला क्रिकेट खेळायची लई हौस..! पण त्याच्या वयाच्या कारणामुळे त्याच्यात पाहिजे तेवढी चपळता नव्हती अन् मुळात खरं सांगायचं झालं तर तो पाहिजे तेवढा चांगला खेळत पण नव्हता..! मात्र  खेळायची हौस लई होती.आम्ही सर्व मित्रांनी बबन च्या या हौशेचा " उपयोग " करून घेण्याचे ठरवले,कारण आमच्याकडे लासुरगावला जाण्यासाठी जी जीप भाड्याने लावायची होती,तिच्या  भाड्याचे पैसे आमच्याकडे नव्हते अन् बबन जाधव कडे पैसे असल्याने अन् त्याला क्रिकेट खेळायची मोक्कार हौस असल्याने ,त्याच्या त्या हौशेचा फायदा करून घ्यायचे ठरवले अन् आम्ही त्याची भेट घ्यायची ठरवले.

आम्ही बबन जाधव कडे जाण्यापूर्वी सर्वानुमते असे ठरवले की,आपण सर्वांनी आपल्या गरजेपोटी याला आपल्या क्रिकेट संघात घायचे अन् एकदा का आपण लासुरगावला पोहोचलो की,बबनलाच  ऐनवेळी संघातून बाहेर काढायचे..! म्हणजे डायरेक्ट कॅप्टनलाच टिममधून काढायचे ठरवले..! 😊 अर्थात बबनला ऐनवेळी संघातून काढल्यावर तो काय आमची आरती करणार नव्हता..! तो सामना संपल्यावर येताना ,त्यानं भाडे दिलेल्या जीप मध्ये आम्हाला लासुरगावाहुन पालखेडला येऊ देणार नव्हता..! म्हणून आम्ही दुसरा ' प्लॅन बी ' तयार केला होता तो असा की,मॅच संपल्यावर लासूर स्टेशन येथे पायी जायचे अन् तिथून रेल्वेने बिन ‌तिकटी प्रवास करून परसोड्याला उतरून तिथून पायी घरी पालखेडला यायचे..! असा आमचा येतानाचा प्लॅन बी तयार केला होता.

सर्वानुमते ठरल्यावर आम्ही बबन जाधव याच्या लाँड्री दुकानात गेलो. हे त्याचं दुकान विजू गायकवाडच्या घराच्या शेजारीच होते. तिथं बबन कपड्यांना इस्त्री करतच होता.आमच्या वतीने आमचा खरा कर्णधार बाळु माळी हाच बबन जाधव याच्याशी बोलणार होता,आम्ही बाकीचे फक्त री ओढणार होतो.आम्ही तिथं गेल्यावर बाळु माळीने बबन जाधवला , लासुरगाव येथील क्रिकेट स्पर्धेविषयी अन् तिथं जाण्याच्या समस्येविषयी सविस्तर सांगितले.शेवटी बाळु माळी हा बबन जाधव याला म्हणाला की,
" बबन ,आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की,आमच्या क्रिकेट संघाचा तुला कँप्टन करायचे अन् लासूरगावला क्रिकेट मॅच खेळायला जायचे आहे..! तुला काय वाटतं...सांग बरं..?"
मुळात बबनला क्रिकेट खेळायची लई हौस अन् त्यात डायरेक्ट कँप्टन म्हणल्यावर बबन जाधव याने कपड्यांना इस्त्री करत असलेले काम बाजूला ठेवले अन् तो आमच्यात येऊन उभा राहिला..!😊थोडक्यात बबन आता निव्वळ हवेत गेला होता..!😊 सगळं कसं आमच्या नियोजनाप्रमाणे होत होते..!
बबन एकदम आनंदीत होऊन एखाद्या कर्णधारासारखं कमरेवर हात ठेवून पोज घेऊन म्हणाला -
" बरं..! माझी काहीच हरकत नाही, चला तर मग बाळाईत जाऊन प्रँक्टीस करू..!"
( आमच्या गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानाला बाळाबाई म्हणतात...!)

बबन ची तयारी पाहून बाळू माळीला अजून उत्साह आला. बाळु  त्याला म्हणाला-
" हे पहा बबन,आमच्याकडे लासुरगावला जाण्यासाठी जी, जीप भाड्याने लावायची आहे ना,तिच्या भाड्याचे पैसे आमच्याकडे नाही..! तू सगळं भाडं भरलं तरच तिथं जायला जमेल..! कारण आमच्याकडे जीपच्या भाड्या एवढे पैसे नाहीत...!"
बबनला एकतर खेळायची लई हौस अन् त्यात अजून डायरेक्ट कॅप्टन झाल्यामुळे तो लई मुड मध्ये आला होता.
यावर बबन जाधव लगेच म्हणाला-
" भाड्याचं तुम्ही बिलकुल टेंशन घेऊ नका..! मी हाये ना..! मी भरतो सगळं जीपचे भाडे..!"

सगळं आमच्या प्लॅन नुसार घडत होते,मात्र माझ्या मनात लासूरगावला पोहोचल्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे सचित्र बोलपट नजरेसमोर अगोदरच येत होता..!😊 रघु मामांची जीप भाड्याने लावली. जीपचे भाड्याचे पैसे अगोदरच बबन कडून रघु मामांना दिले,कारण नंतर पैसे मिळण्याची शक्यता अजिबात नव्हती..!😊 आम्ही  लासूरगाव येथे पोहोचलो.आमची मॅच ,आज जिथं जिल्हा परिषद हायस्कूल ची इमारत आहे,त्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानावर होणार होती.आम्ही तिथं पोहोचलो.आता सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या कामा पुरत्या कर्णधाराला कसं सांगायचं की, " तुलाच टीममधून काढायचे आहे..!"

अखेर आमचा जो खरा कर्णधार होता, बाळु माळी,हाच बबनला बाजूला घेऊन गेला अन् त्याला म्हणाला....
" बबन,ही टीम लई तगडी आहे,तू एवढा काही खास खेळत नाही.त्यामुळं तुला टीम मध्ये घेता येणार नाही..!"
हे ऐकल्या बरोबर, बबन रागाने लालबुंद झाला अन् घाईघाईत आम्हा  सगळ्यांकडे येऊन विविध प्राण्यांचा उध्दार करून मोठमोठ्याने आवाज करून उध्दार करायला सुरुवात केली..!मात्र आम्ही त्याला काहीच प्रत्युत्तर द्यायचे नाही असेच ठरले असल्याने आम्ही सर्वजण मौन पाळून राहिलो.आमच्यावर ,बबन ओरड..ओरड..ओरडला..! प्रिय बबन याला कर्णधार करायचे ऐनवेळी रद्द केल्याने आता तो आमच्या विरूद्ध टीमच्या बाजूने घोषणा  देण्यासाठी त्यांच्या उघड्यावरील पव्हेलियन मध्ये गेला होता..!

आमच्या क्रिकेट संघातील ही भानगड विरुद्ध संघातील खेळाडूंना माहीत नव्हती. आमच्या क्रिकेट संघात कृष्णा रोठे , भानू मामा जगदाळे इत्यादी होते. मॅच सुरू झाली होती.लासूरगाव क्रिकेट संघात प्रवीण सोनवणे, सचिन आब्बड सारखे तगडे खेळाडू होते.पाहिली फलंदाजी लासूरगाव संघाची होती.बबन लासूरगावच्या समर्थकांच्या मध्ये जाऊन बसला होता.जेंव्हा जेंव्हा लासूरगाव क्रिकेट संघातील खेळाडू चौका,छक्का, एक, दोन, तीन रन काढायचे तेंव्हा तेंव्हा  बबन त्यांच्या बाजूने ओरडायचा अन् आमच्या नावाने हुर्रे करायचा..!😊 असंच जेंव्हा आमची फलंदाजी सुरू झाली तेंव्हा, आमचा एखादा जरी फलंदाज बाद झाला की, बबन आनंदाने नुसत्या उड्या मारायचा..!

अखेर आम्ही मॅच हरलो..! बबनला अजून चेव आला अन् आमच्या समोर येऊन अजून नाचायला लागला. आम्हा सर्वांचे चेहरे पडले होते. आम्हाला आमच्या चुकीच्या नियोजनाचे ,चुकीच्या मार्गाने फळ मिळाले होते..! आम्ही सर्वजण एका बाजूला जाऊन खूप दुःखी होऊन बसलो होतो. बबन आमच्याकडे पाहतच होता.
अखेर खूप वेळा नंतर प्रिय बबनलाच आमची  दया  आली अन् आमच्याकडे येऊन म्हणाला...
" जाऊ द्या,  जे झालं ते झालं..! आपण एकाच गावातले असल्याने मी तुम्हाला माफ करतो..! पण इथून पुढं तरी असं करू नका राव..!"
प्रिय बबनचा हा बदललेला पवित्रा पाहून आमच्याही सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता..! आम्ही सर्वांनी त्याची माफी मागितली..! आमच्या चुकीच्या वागण्याचं प्रायचित्त आम्हाला मिळाले होते,आम्ही सामना हरलो होतो..!आम्ही सर्वजण रघु मामाच्या जीप मध्ये बसून पालखेड येथे पोहोचलो..!

आम्ही दुसऱ्या गावी जाऊन , जो सामना खेळला होता,तो केवळ आमच्या चुकीच्या नियोजन कर्मामुळे जगातील एकमेव नियोजन केलेला क्रिकेट सामना होता..! अशा प्रकारे क्रिकेट विश्वात, कुणीही , कोणत्याही सामन्यासाठी  नियोजन केले नसेल हे मात्र नक्की..!😊

आजही जेंव्हा जेंव्हा आमचा सदा सर्वदा महान कर्णधार बाळु माळी अन् प्रिय बबन जाधव याची भेट होते,त्यावेळी बबनच्या त्यावेळच्या तात्पुरत्या  कॅप्टनशीप   चा विषय आवर्जून निघतो..!😊 गतकाळातील त्या आठवणी आज आठवून मन टवटवीत होते..! आज बबन, बाळु , मी ,आम्ही पालखेड येथे राहत नाही,पण गावच्या यात्रेच्या वेळी जेंव्हा कधी भेट होते,तेंव्हा गतकाळातील या आठवणींना नक्कीच पुन्हा पुन्हा उजाळा नक्कीच मिळत असतो..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : ११ जून २०२०, गुरुवार.

" शाब्दिक कोट्यांचे महामेरू पू.ल.देशपांडे..! "



चिंतन

" शाब्दिक कोट्यांचे महामेरू पू.ल.देशपांडे..! "

===================================

आज दिनांक १२ जून २०१७ रोजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पू.ल.देशपांडे यांचा स्मृतिदिन..!
( निधन दिनांक: १२/६/२०००) त्या निमित्त या अवलियास माझ्याकडून विनम्रपुर्वक अभिवादन..!

संपूर्ण भारतात आपण महाराष्ट्रीयन काही बाबतीत खरंच नशीबवान आहोत..! त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे       " नशीबवान " क्षेत्रे म्हणजे...नाटक व साहित्य..! नाटक संस्कृती येथे बहरली अन् तिला साज चढवला अभिजात मराठी साहित्याने..!   या दोन्ही नशीबवान क्षेत्रात अधिराज्य अनेक साहित्यिकांनी गाजवले पण दोन साहित्यीक महाराष्ट्राचे जरा जास्तच लाडके झाले..त्यापैकी एक प्र.के.अत्रे व दुसरे पू.ल.देशपांडे..!! दोघंही मराठी साहित्याला पडलेले सुखद स्वप्नच होते..!या द्वयींनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं..!😂😂
पू.ल.नी नाटक ,अभिनय,संगीत,कथा,कविता,कथाकथन,उत्कृष्ट संवादिनी (हार्मोनियम ) वादक,गायक इ.अनेक प्रांतात मुशाफिरी केली..!

 माझ्यामते महाराष्ट्रातील माणसात विविध विषयांवर विनोदी अंगाने मिश्किलपणा तोही समोरच्याचे मन न दुखावता करण्याचं जे कसब आहे,ते पू.ल.चीच देणं आहे..!आज पू.ल.ची खूप आठवण येते..! कारण तो विनोदी मिश्कीलपणा हरवत चाललाय का असे वाटते.!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब व गोपीनाथराव मुंडे साहेब विनोदी,मिश्किलपणे भाषणे करण्यात तरबेज होते..! विलासरावांनी केलेल्या शाब्दिक कोट्या ,पू.ल.ची आठवण करून देत असे..!असे विनोदी अंगाने,खोचक,मिश्किल कोट्या करणारे सार्वजनिक जीवनातील माणसं कमी होत चालली  आहेत..! आपल्या पिढीत नितीन गडकरी साहेब हा वारसा नक्कीच सक्षमपणे चालवत आहेत.

आमच्या पालखेड गावात प्रत्येक गल्लीत सरासरी एकजण तरी कुणालाही न दुखवता मिश्किलपणे शाब्दिक कोट्या करणारा नक्की सापडतो..! यातील काहीजण हयात आहेत तर काहीजण हयात नाहीत. ती शाब्दिक कोट्या करण्याची कला या पालखेडकरांना निसर्गदत्त लाभलेली आहे..! माझ्या माहितीप्रमाणे ते पुढीलप्रमाणे  होते आणि आहेत..
स्व.गजानन निकम भाऊ, नासेर भाऊ बागवान, भगवान पगार,डॉ.दिलीप शेळके,स्व.तिर्थस्वरुप कचरू मामा पा.कान्हे, स्व.बाबुराव नागोराव जाधव, विजय ( भैय्या ) काळे व अजय काळे,दिलीप सुराशे,अशोक नामदेव पा.शेळके, आदरणीय भानुदास भाऊ शिंदे, संजय गणपत पा. शेळके, आदरणीय बी.के.म्हस्के सर व आण्णासाहेब कारभारी म्हस्के,भावराव कोल्हे , तिर्थस्वरूप  भावराव पा.शेळके, सादेक चाचा, गिताराम बनसोड, रामदास धनाड गुरुजी इत्यादी..!

 वरील सर्वजण पू.ल.देशपांडे यांच्या साहित्य कलाकृती मधील शाब्दिक कोट्यांचे सभ्य भाषेत आमच्या पालखेड गावात प्रतिनिधी करणारे व्यक्ती आणि वल्ली आहेत..! यातील प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे पण..यांच्यात एकच समानता आहे अन् ती म्हणजे..शाब्दिक कोट्या करून विनोद निर्मिती करणे..! कधी कुणा एखाद्या वाचकाचा आमच्या गावात चक्कर झालाच तर जे हयात आहेत त्यांच्याशी चर्चा करा मग तुम्हाला याचा जिवंत अनुभव येईल..!😂

विनोद ही एक कला आहे,मात्र ती विनोदाची कला फार जपून वापरली तर तिचा ,ज्याच्यावर विनोद केला त्याला अन् इतरांना आनंद घेता येतो..! नसता उगीचच गैरसमज निर्माण होऊ शकतो..! मुळात विनोदबुद्धी ही नैसर्गिक देणगी असते,ती अशी कुणालाही मिळत नाही,त्यातल्या त्यात ज्यांच्या कपाळावर नेहमी बारा वाजलेले असतात,त्यांना तर अजिबात नाही..!😊 आणखी एक विशेष म्हणजे विनोद समजून घ्यायला देखील विनोदी मन असावे लागते..!

 आजकाल उठसुठ कुणीही,कोणालाही शारीरिक व्यंगावर, त्यांच्या नातेवाईकावर ,टीका करतांना आपण पाहतोय..! असे विकृत व्यंग करणारे एका अर्थाने मानसिक रोगी असतात..! महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी कुणाच्याही भावना न दुखवता समोरच्यावर  मिश्किल टिप्पणी केली आहेत, असे  वक्ते पुन्हा होणे नाही..!
पू.ल.देशपांडे खरोखर शाब्दिक कोट्यांचे महामेरू होते..!

पू.ल.नेहमी म्हणायचे.." क्रियापदाचं  मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठं आहे,ह्याच्यावर अवलंबून असत "

असो,पू.ल.(पुरुषोत्तम लक्ष्मण ) देशपांडे उपाख्य " भाईजी " यांना , स्मृतिदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली...!!

वंदे मातरम्..! 🙏🇮🇳🙏
                                                                                                                       शाब्दिक कोट्यांची आवड असणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १२ जून २०१७

मंगळवार, ९ जून, २०२०

आमचा कर्णधार - प्रिय बालमित्र बाळु माळी..!




आमचे गाव आमची माणसं..!

आमचा कर्णधार - प्रिय बालमित्र बाळु माळी..!

====================================

कोण म्हणतं जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे..?

यदा कदाचित जगाच्या दृष्टीने महेंद्रसिंग धोनी  सर्वश्रेष्ठ कर्णधार असेलही..!
पण नव्वदच्या दशकातील पालखेड येथील आमच्या क्रिकेट संघाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आमचा खूप जिवलग बालमित्र प्रिय बाळु माळी हाच होता..! हा आमचा प्रिय बालमित्र बाळू माळी नसता तर आमच्या गावातील आमची समकालीन एक पिढी क्रिकेट या खेळातील कौशल्य आत्मसात करू शकली नसती..! आमच्या पालखेड गावातील क्रिकेटचा इतिहास जेंव्हा लिहिला जाईल तेंव्हा तीन ग्रेट माणसांचा उल्लेख त्यात आवर्जून केला जाईल..! त्यात क्रमांक एक वर असतील ऐंशीच्या दशकातील पालखेड गावातील ग्रामसेवक गायकवाड काका, क्रमांक दोनवर असेल आदरणीय शिवाजी भाऊ जाधव आणि क्रमांक तीनवर असेल आमचा तत्कालीन ग्रेट कर्णधार बाळु माळी..!

या आमच्या मित्राच्या कॅप्टनशीप पुढे महेंद्रसिंग धोनी काहीच नाही..!😊 प्रिय बाळु माळी, सध्या जिल्हा परिषद जालना अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहे..!  आमच्या या मित्राच्या नेतृत्वाखाली अनेक सामने आम्ही केवळ याच्या कर्णधाराच्या कौशल्याच्या जोरावर जिंकलेले आहेत..! त्यापैकीच एका असाधारण अन् संपूर्ण क्रिकेट विश्वात असा सामना अन् त्याच नियोजन कुणीही केलं नसेल असे आम्ही नव्वदच्या दशकात पालखेड येथे करून दुसऱ्या एका गावात  पराक्रम..? केला होता..! मात्र आमच्या चुकीने त्यात आम्ही हरलो होतो..!😊 नव्हे नव्हे आमच्या चुकीच्या कर्माचे ते प्रायचित्तच नियतीने आम्हाला ,आमच्या पराभवाच्या भेटीतून दिले होते..!😔


अर्थात यातील अजुन एक मुख्य जिवंत पात्र  होते,त्याच्याशिवाय त्या सामन्याची सत्य कथा पूर्ण होऊच शकत नाही..!😊 प्रिय जिवलग बालमित्र बाळु माळी व अजुन त्या एका मित्राशी त्या काळातील सत्य घडलेल्या प्रसंगावर चर्चा केली आहे..!  त्यावर उद्या किंवा परवा लगेच लिहून,लगेच ती सत्य कथा " आमचे गाव आमची माणसं " या सदराखाली  फेसबुकवरील माझ्या .....
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
या ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येईल..!
सर्व वाचक मित्रांनी निव्वळ वाचनाचा आनंद घ्यावा ..!🏏🏏

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

दिनांक : ९/६/२०२०, मंगळवार

शुक्रवार, ५ जून, २०२०

" जिथं नतमस्तक व्हावे असा जगातील एकमेव उंबरठा..! "



चिंतन

" जिथं नतमस्तक व्हावे असा जगातील एकमेव उंबरठा..! "
________________________________________

महाराष्ट्रातील माझे आवडते तिर्थस्थळ किल्ले रायगड...!

छत्रपती  शिवरायांचे  समाधी स्थान मूख्य द्वार किल्ले  रायगड..! वास्तूविशारद हिरोजी इंदोलकर लिखित शिलालेख..अन् त्यावरील मजकूर...
" सेवेचे ठायी तत्पर हिराेजी इंदाेलकर..!"

या शिलालेखावर व थोरल्या  महाराजांसमोर त्या वेळी मी माझे संपूर्ण  कूटूंब नतमस्तक  झालो होतो. मला तरी वाटतं आजरोजी महाराष्ट्रात नतमस्तक  व्हाव असा हाच एकमेव उंबरठा शिल्लक राहिला आहे...!

थोरल्या महाराजांनी एवढी मनसबदारी मिळविली,एवढे त्रिकालाबाधित ऐश्वर्य, भौतिक व सामाजिक श्रेष्ठत्व  मिळविवे परंतू कधीही त्यांनी स्वत :चा बडेजावपणा,स्वत:चे नाव या अतूलनिय कार्यकर्तृत्वापूढे लावले नाही.नाव लावले ते दुसऱ्याचे, एका निष्ठावान सर्व सामान्य पण असामान्य कार्य करणाऱ्या हिराेजी इंदाेलकरांचे..!

 शिवरायांनी राज्यकारभार  सर्व सामान्य रयतेसाठी केला.  हिंदवी स्वराज्यातील कोणत्याही किल्ल्यांवर स्वत:चे अथवा स्वत:च्या कूटूंबातील कूणाचेही नाव दिले नाही...आणि हेच थोरल्या महाराजांचे थोरपण भूतलावावरील इतर सर्वच राजांपेक्षा सदैव उजवे ठरते..! छत्रपती शिवाजी महाराज नैतिक मूल्यांचे जिवंत विद्यापीठ होते.आजही त्याच नैतिक मूल्यांची प्रासंगिकता पदोपदी जाणवते..!

आपले थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज..हे भूतलावरील असे एकमेव मानवी अंश होते,ज्यांच्या प्रत्येक कृतीचे ,प्रत्येक माणसाने..डोळे झाकून जरी अनुकरण केले तरी..आपल्या या निरर्थक आयुष्याचे ,सार्थक झाल्या सारखे होईल यात तिळमात्र शंका नाही..!

जगाच्या त्या नियंत्याने ,आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांनी सदा सर्वदा अनुकरण करावे असे महामानव तोच नियंता नेहमी या भूतलावर पाठवत असतो..!पण आपल्यातील हीच सर्व सामान्य माणसं,या अद्वितीय भारतीयांच्या नावाचा फक्त स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी वापर करून पाप करतात अन् अशा अनेक महामानवांच्या अनुकरणीय मूल्यांना खऱ्या आयुष्यात  अनुकरण करण्यात  मुकतात..हे  माणसांचे दुर्दैव आहे..!

असा राजा कदापी होणे नाहीच...!

 त्रिवार वंदन किल्ले  रायगडाला व थोर विभूतींना...!

वंदे मातरम्..!

 फोटो क्लिक व लेखन : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

नतमस्तक  होण्याचा दिनांक: ३ जून २०१३

गुरुवार, ४ जून, २०२०

" जागतिक पर्यावरण दिन , दीन न होवो...! "🌳🌳🌳








चिंतन

" जागतिक पर्यावरण दिन , दीन न होवो...! "🌳🌳🌳 

==================================

माणसाला उन्हाची झळ अन् पोटाला कळ लागली की देव आठवतात..! अगदी तसंच बऱ्याच माणसाचं सोयीचं अन् स्वार्थी तत्वज्ञान झाडांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते..!
उन्हाचा तडाखा बसायला लागला की, माणूस झाडांची सावली शोधतो..! पण हीच सावली निर्माण करण्यासाठी माणूस किती पोटतिडकीने प्रत्यक्ष जमिनीवर काम करतो हे फार महत्त्वाचे आहे..! जसं आपल्या महान भारतीय संविधान अंतर्गत बऱ्याच माणसांना अधिकार हवे असतात मात्र कर्तव्य आले की,
" तू हो पुढे मी आलोच मागून..!"
अशी प्रवृत्ती बहुतांशी ठिकाणी आढळते..!

झाडांची सावली प्रत्येकाला हवी आहे पण, झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करायला धावणारे कमी आहेत..!  वृक्षारोपण अन् संवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी..!

आज औरंगाबाद शहराचा विस्तार मोठा होत आहे.शहराला चारही दिशेने येणारे जे महामार्ग आहेत,त्यापैकी रस्त्याच्या दुतर्फा उंच अन् मोठाली झाडे फक्त औरंगाबाद - पडेगाव ते कन्नड फाटा याच दरम्यान पाहायला मिळतात..! कदाचित काही वर्षानंतर ही झाडे पण मारून टाकल्या जातील..किंवा मरतील..!

 या विषयावर जनसहयोग परिवार चे प्रमुख  प्रशांत भाऊ गिरे यांचे मत फार विचार करायला लावणारं अन् वास्तवाला धरून आहे, ते असे की,

" पुन्हा वृक्षांची लागवड होईल कदाचित,पण आज जी झाड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत , तितकं मोठं स्वरूप नवीन वृक्षारोपण करून वाढणाऱ्या झाडांचे कदाचित नसेल..! कारण प्रदूषण युक्त वातावरण..! त्यांना वाढीसाठी जे पूर्वी ३० ते ४० वर्षांपूर्वी निरोगी वातावरण लाभले होते,तितक्या प्रमाणात निरोगी वातावरण आज अजिबात नाही..! त्यामुळं आज वृक्षारोपण केलेल्या झाडांची जरी वाढ झाली तरी त्यांच्या वाढीला मर्यादा पडेल..!"

ज्यांना कुणाला औरंगाबाद शहरालगत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा हा पर्यावरणीय आनंद याची देही याचि डोळा पाहायचा असेल अशांनी औरंगाबाद ते नाशिक रोडवरील पडेगाव ...कन्नड फाट्यापर्यंत व त्याच्या काही पुढे नक्की पाहून घ्यावा..! कदाचित काही वर्षानंतर आपली पिढी येणाऱ्या पुढील म्हणेल की,
"  कोणे एके काळी ,या रस्त्याच्या दुतर्फा उंच,उंच झाडे होती..!"

यावर्षी प्रत्येकाने निदान पाच झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करावे तरच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याचा आत्मानंद मिळेल..!
नसता.....
इकडं..तिकडं झाडांची सावली शोधत हिंडावे लागेल..!

असो, " जागतिक पर्यावरण दिन , दीन न होवो असे ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी वेळीच सावध व्हा अन् वृक्षारोपण करून त्यांचे त्याच जोमाने संवर्धन देखील करा ही जन सहयोग परिवार औरंगाबादच्या वतीने कळकळीची नम्र विनंती..!🙏

आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यानिमित्त याच पर्यावरणाचा जीव जाई पर्यंत उपयोग घेणाऱ्या सर्व मानवजातीला मनःपूर्वक शुभेच्छा..!🌳🌳

वृक्षारोपण व संवर्धन प्रती एक तळमळ : जनसहयोग परिवार औरंगाबाद.

ता.क. - झाडांचे फोटो,औरंगाबाद ते नाशिक रोडवरील पडेगाव -कन्नड फाट्यापर्यंत व काही प्रमाणात थोडे पुढे..या मार्गावरील आहेत.🌳🌳

Click by : चि.नमन नंदन जाधव.

वंदे मातरम्

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ५ जून २०१९

बुधवार, ३ जून, २०२०

हमखास करमणूक




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

****  हमखास करमणूक  ****
=======================================
                                                         
आज दिनांक ४ मे २०१७ रोजी , सकाळी फुलंब्री ते औरंगाबाद सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या(Bus) वाहनाने प्रवास करत असतांना बसमध्ये खालील घोषवाक्य लिहिलेले दिसले..!
 " एसटीचा प्रवास, करमणूक हमखास " 

मी थेट फुलंब्री पासून ते औरंगाबाद पर्यंत एसटीतील हमखास करमणूकीची वाट पाहत राहिलो..! पण निराशाच पदरी पडली..! हमखास करमणूक काही झाली नाही..! मनात म्हटलं,एसटी महामंडळ " मोघम " अस काही लिहू शकत नाही.काही तरी अर्थ नक्कीच असेल..! मग अचानक " क्लू " लागला..! चटकन माझ्या नजरेसमोर पू.ल.देशपांडे लिखित " व्यक्ती आणि वल्ली " हे पुस्तक व त्यातील अजरामर पात्रे आली..!प्रत्येक माणूस  हीच सर्वात मोठी व फुकटमध्ये जिवंत बघायला मिळणारी करमणूक आहे..!

प्रत्येक माणसाचे वर्तन भिन्न-भिन्न असते.आणि त्यातल्या त्यात प्रवासात तर सगळा भारत पहायला मिळतो..तेही फुकट..! सोबत त्या प्रत्येक पात्रांचे वेगवेगळे संवाद,भिन्न देहबोली,भिन्न अंगविक्षेप,भिन्न हावभाव,भिन्न चेहरे,भिन्न-भिन्न चेहऱ्याचे आनंद,दुःख,करुणा, इ.भावनेचे अनेक जिवंत आविष्कार बघायला मिळतात..! आपण चित्रपटात,नाटकात तरी काय पाहतो...हेच भावनेचे आविष्कार ...! फक्त तिथे हे सर्व आविष्कार एका कथेत गुंतविलेले असतात...!  प्रवासात देखील हे भावनेचे आविष्कार ,कथेत गुंतविलेले असतात,फक्त त्या कथा सलग ,दीर्घ नसतात.तर छोट्या,छोट्या प्रसंगात विभागलेल्या असतात.ते प्रसंग कधी मुक ,तर कधी शाब्दिक असतात...!

मात्र ही हमखास करमणूक करून घेतांना प्रवासातील प्रेक्षकांनी एक पथ्य पाळायचे असते.अन् ते पथ्य म्हणजे  ,प्रवासातील  हमखास करमणूक करणाऱ्या व्यक्ती आणि वल्ली यांच्या लक्षात न येऊ देता करमणूक करून घ्यायची असते..! त्यांच्या लक्षात आले की ,त्या पात्रांचा नैसर्गिक अभिनय पहायला  मिळत नाही..!     
 हे " लॉजिक" एसटी महामंडळाला खालील घोषवाक्य लिहितांना अपेक्षित असेल......" बहूधा "...!!!

वंदे मातरम्..!

प्रवास निमित संजय जाधव पाटील  (मूळ गाव वारेगाव ता.फुलंब्री ) बापू, जे की,आमचे खूप जिवलग कौटुंबिक स्नेही आहेत,त्यांच्या मूळ गावाहून, वारेगाव ता.फुलंब्री हून औरंगाबादकडे येतानांचा प्रवास..!
         
भटकंती करणारा एक भटका प्रवासी लेखक :
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ४ मे २०१७

सोमवार, १ जून, २०२०

" हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी ...! "




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी ...! "

===================================

माणसाच्या आयुष्यात भेटलेली काही माणसं,त्याला अजुन प्रगल्भ करत असतात. अशा मोजक्याच पण गोड माणसांमुळे आपल्याही आयुष्यात जगण्यात , आपोआप प्रगल्भता येत असते.

मी जेंव्हा जून २०१८ मध्ये औरंगाबाद येथे स्थायिक झालो तेंव्हा जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद बरोबर जोडल्या गेलो.अगदी अनौपचारिक नात्यातील प्रेमळ माणसं इथ लाभली..! कुठेही श्रीमंतीचा गर्व नाही,कुठेही जातीचा अहंकार व न्यूनगंड  नाही,  थोडक्यात सर्वच बाबतीत मोकळी चाकळी मित्र मंडळी भेटली..! या सर्वांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्याला जगण्यासाठी अजुन प्रगल्भ करणारे एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व भेटले अन् ते म्हणजे आदरणीय प्रदीप भैय्या यादवजी...!🌹

आमच्या जन सहयोग परिवाराला जसे प्रशांत भाऊ गिरे यांच्या रूपाने धाडसी नेतृत्व लाभले अगदी त्यांच्याच तोडीस तोड त्यांना खंबीरपणे साथ देणारे ' खंबीरखुट ' साथीदार देखील लाभले..! असं असण्याचे एकमेव कारण होते, आमच्या परिवाराचे कृतीतून आदर्श होते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज..! थोरल्या महाराजांच्या सर्वांना सोबत घेऊन जगण्याच्या अद्वितीय मूल्यांचे अनुकरणीय आदर्श, आम्ही जन सहयोग परिवारातील सर्व सदस्यांनी अंगीकारले होते..! त्याच मूल्यांना अनुकरण करून प्रशांत भाऊ गिरे व जन सहयोग सामाजिक संस्थेला अजुन प्रगल्भ करणारे आहेत हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी...!🌹🙏

हमारे प्यारे प्रदीप भैय्याजी...!

एल.आय.सी. मध्ये सरकारी सेवेत नोकरी सांभाळून आदरणीय प्रदीप भैय्या यादवजी यांनी जन सहयोग सामाजिक संस्थेसाठी जी तांत्रिक कौशल्याची मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली आहे ती ग्रेट आहे..! आम्ही ज्यावेळी मेंढी शेळी प्रक्षेत्र पडेगाव, दौलताबाद रोड औरंगाबाद येथील खूप मोठ्या भूभागावर तब्बल जवळ जवळ वीस हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे स्वप्नं पाहिले होते त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर मार्क आऊट टाकण्याचे महत्त्वाचे काम करायचे होते.त्यावेळी जन सहयोग परिवार मधील प्रत्येक सदस्यांचे योगदान अमूल्य होते. मात्र त्यात शीर्ष स्थानी होते प्रदीप भैय्या यादवजी..! यादवजींनी ,आम्हाला सर्वांना सोबत घेऊन मेंढी शेळी प्रक्षेत्र पडेगाव येथील जमिनीवर योग्य असे मार्क आऊट आखले..!

गोलवाडी फाटा, छावणी डंपिंग ग्राऊंडवर आम्ही तब्बल जवळ जवळ सात हजार देशी झाडे लावलीआहेत.  काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर प्रदीप भैय्या यादवजी नेहमी अग्रेसर राहतात.

प्रदीप भैय्या यादवजी, एक कुटुंब वत्सल माणूस आहे.त्यांच्या घरी मी जेंव्हा जातो तेंव्हा त्यांच्या घरातील त्यांच्या तिर्थस्वरूप वडिलांना पाहून मन प्रसन्न होते..! आज त्यांचे वडील शरीराने पूर्णपणे थकलेले आहेत. त्या थकलेल्या शरीराने ,त्यांच्या तारुण्यात जे कष्ट सोसले आहेत,त्याच कष्टांना ,आज त्यांचा सुपुत्र प्रदीप भैय्या यादवजी जो प्रेमरूपी सेवा देऊन आराम देत आहेत हे प्रत्यक्ष पाहून प्रदीप भैय्या यादवजी यांना मी नेहमी दर्शन घेऊन वंदन करत असतो..!प्रदीप भैय्या यादवजी, अतिशय समंजस माणूस..! नेहमी वडिलकीच्या नात्याने आम्हा सर्वांना प्रेमाने समजावून सांगत असतात..! प्रदीप भैय्या यादवजी यांनी त्यांच्या गतकाळातील आयुष्यात अतिशय गरीब अवस्थेत जे दिवस व्यतीत केलेले आहेत, त्या सर्व दिवसांचे फलित आज हे आहे की, प्रदीप भैय्या यादवजी आज खूप सुखी आहे..! प्रदीप भैय्या यादवजी‌ खूप धार्मिक देखील आहेत.वाळूज - औरंगाबाद रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ रस्त्यालगत जे लक्ष्मी मातेचे मंदिर आहे,त्याची पूजा अर्चा , देखभाल, साफसफाई इत्यादी कामे मनोभावे करत आहेत..! विशेष म्हणजे दररोज पहाटे प्रदीप भैय्या यादवजी सदरील मंदिरात साफसफाई करिता न चुकता जातात..! त्यांच्या या सेवेला साष्टांग दंडवत..!🙏

आमच्या जन सहयोग परिवार मधील आम्ही इतर सर्वजण ज्या ज्येष्ठांच्या सानिध्यात वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य करत आहोत,त्यात शाम आण्णा,अमजद भाऊ आणि प्रदीप भैय्या यादवजी आहेत..! कोणत्याही कामात ज्येष्ठ हवेत ,जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा उपयोग तारुण्याला होत असतो..हेच प्रशांत भाऊ गिरे यांनी ओळखले अन् सर्व ज्येष्ठांना यथोचित सन्मान देऊन जन सहयोग सामाजिक संस्थेचे कार्य सुरू आहे..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : १ जून २०२०, सोमवार