गुरुवार, २२ जून, २०२३

असा खलनायक पुन्हा होणे नाही.


 


चिंतन ©️


असा खलनायक पुन्हा होणे नाही..!


=====================================


अमरीश पुरी यांच्या सारखा हिंदी चित्रपटसृष्टीत  खलनायक झाला नाही अन् होण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नाही.त्यांच्या खल भूमिकेला साथ दिली ती त्यांच्या भारदस्त, करारी आवाजाने अन् भेदक नजरेने.आवाज अन् भेदक नजर समोरच्या प्रेक्षकांना कशी घाबरवून सोडते यांचं मूर्तीमंत उदाहरण द्यायचं झालं तर थोर अभिनेते अमरीश पुरी यांच्या सारखं सर्वोत्तम उदाहरण दुसरं कोणतेही नाही.


अमरीश पुरी यांच्यातील खलनायकी अभिनयाच्या प्रेमात पडायला माझे पौगंडावस्थेतील वयोगट महत्त्वाचा टप्पा ठरला.ऐंशीच्या दशकात आमच्या पालखेड गावात स्व. तीर्थस्वरुप दौलत काका कुमावत यांचं व्हिडिओ मिनी थिएटर निमित्त ठरले.त्याकाळी VCR वर चित्रपट दाखवले जायचे.ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस लोहा नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.त्यात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, करण कपूर हे तीन  अभिनेते मुख्य हिरोच्या भूमिकेत होते.मात्र या चित्रपटात सगळा भाव खावून गेले ते अमरीश पुरी..! एखाद्या दिवशी कोणताही चित्रपट VCR वर दाखवायला नसेल तर लोहा हा चित्रपट हमखास दाखवल्या जायचा.त्यामुळं हा चित्रपट इथून तिथून पाठ झाला होता. तिकीट दरही माफक होते.फक्त पाच रुपये..! लोहा चित्रपटाची व्हिडिओ कॅसेट स्व. दौलत काका कुमावत यांच्याकडे कायमस्वरूपी  होती. त्यामुळं हा चित्रपट हक्काचा चित्रपट झाला होता.अतिशय क्रूर खलनायकाच्या भूमिकेत अमरीश पुरी यांनी जीव ओतून काम केले होते.त्यामुळं लोहा चित्रपटाचे सगळे यश अमरीश पुरी यांच्या नावावर जमा झाले होते. अमरीश पुरी यांच्या खलनायक म्हणून अभिनयाच्या कारकीर्दीत प्रामुख्याने मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बो या व्यक्तिरेखेचा उल्लेख रसिक करत असतात.मात्र माझ्या मते अमरीश पुरी यांनी आपल्यातील अतिशय क्रूर खलनायक अभिनेत्याला लोहा याच चित्रपटात सादर केले होते.


अमरीश पुरी यांच्या अभिनयाला धारदार पैलू पाडण्याचे काम मोजक्याच दिग्दर्शक मंडळींनी केले.त्यात प्रामुख्याने राजकुमार संतोषी, प्रियदर्शन यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे राजकुमार संतोषी अन् प्रियदर्शन यांनी अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला रसिक प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत केले. ही दोन दिग्दर्शक मंडळी अमरीश पुरी यांच्या आयुष्यात आली नसती तर अख्खी हयात अमरीश पुरी फक्त आणि फक्त एक क्रूर खलनायक म्हणूनच रसिक प्रेक्षकांच्या हृदयात राहिले असते.मात्र अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला रसिक प्रेक्षकांच्या समोर वरील उल्लेखित दिग्दर्शकांनी प्रस्तुत केले अन् एका अभिनेत्याच्या अभिनयाची दुसरी बाजू रसिक प्रेक्षकांच्या समोर आली.


राजकुमार संतोषी दिग्दर्शित घातक चित्रपटातील एक बाप माणूस अमरीश पुरी यांनी अतिशय ताकदीने सादर केला. घातक चित्रपटात सनी देओल, डॅनी अन् अमरीश पुरी हेच तिघेजण संपूर्ण चित्रपटात आपलं अस्तित्व दाखवत असतात, बाकीचे फक्त गर्दीतले चेहरे जाणवतात.


अमरीश पुरी यांच्यातील एका संवेदनशील अभिनेत्याला खऱ्या अर्थानं ओळख दिली ती प्रियदर्शन या दिग्दर्शकाने..! विरासत अन् गर्दीश हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. विरासत चित्रपटातील ठाकूर आजही त्याच रुबाबात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे.माझ्या मते अमरीश पुरी यांच्या संवेदनशील अभिनयाच्या कारकीर्दीत सर्वात श्रेष्ठ चित्रपट जर कोणता असेल तर तो प्रियदर्शन दिग्दर्शित गर्दीश हाच आहे. बाप अन्  मुलाच्या स्वभावाचे द्वंद्व यात खूपच सुरेख पद्धतीने सादर केले आहे. जॅकी श्रॉफ अन् अमरीश पुरी यांच्या अभिनयाची जुगलबंदी गर्दीश या चित्रपटात बघायला मिळते.


वास्तवातील आयुष्यात अमरीश पुरी खूप सज्जन अन् खूप शिस्त प्रिय गृहस्थ होते.अभिनय सोडून इतर झगमगाटी आयुष्यात अमरीश पुरी रमले नाहीत.


असो, आज दिनांक २२ जून २०२३ रोजी स्व. अमरीश पुरी यांचा जन्मदिन आहे.( जन्म दिनांक २२/६/१९३२)

त्यानिमित्त या महान अभिनेत्याला त्यांच्या अभिनयाला विनम्र अभिवादन..! 🙏🏻


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ जून २०२३, गुरुवार. शुभ रात्री.

सोमवार, १२ जून, २०२३

जिवाभावाचा दोस्त - संजू..!


 


आमचे गाव आमची माणसं ©️


जिवाभावाचा दोस्त - संजू..!


==================================


मित्रा संजू उपाख्य डॉ. संजय सखाराम राऊत, आजची परसोडा, ता. वैजापूर येथील रणरणती दुपार तुझ्या सानिध्यात कधी शितलतेचा शिडकावा मनावर उडवून गेली समजलेच नाही. अनेक आठवणी आपल्या भेटीत दाटून आल्या.काही आठवणी आपल्यातील खोडकरपणा जाग्या करून गेल्या.काही आठवणी आपल्यातील बालपणाला पुन्हा एकदा जिवंत करून गेल्या. काही आठवणी आजच्या आपल्या प्रौढ वयाला अजुन टवटवीत करून गेल्या.आपल्या आजच्या भेटीत आलेल्या आठवणी अन् त्या आठवणीतील पात्रांना आपल्या हृदयात, मनात पुन्हा एकदा स्थान देऊन गेल्या..! मित्रा संजू आठवणी ह्या, आपल्या सारख्या भावूक मनांच्या जिवलग मैत्रिणी असतात हेच खरं..! ज्या माणसाच्या आयुष्यात आठवणी अन् त्या आठवणीतील पात्रे नाहीत अशी माणसं मुर्दाड मनाची असतात हे माझं प्रांजळ मत आहे.ज्याला स्मरण आहे तो नात्याचा राजा असतो अन् ज्याला स्मरण नसते अशी माणसं एखाद्या गुलामासारखी असतात. ज्यांना नियतीने स्मरण या अदृश्य भावनाला पारखं केलेलं असतं अशी माणसं याला अपवाद असतात हेही तितकेच खरे..!


जिवाभावाच्या दोस्ता संजू तू , गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के अन् विजू गायकवाड ही जिवलग मित्र माझ्या आयुष्यातील बालपण, पौगंडावस्था,तारुण्य अन् आता प्रौढपण या चारही टप्प्यांवरील खूप गलबते आहात. इतरही अनेकजण आहेत, पण तुम्ही माझं आयुष्य जवळून बघितलं आहे. तुम्ही अशी गलबते आहात, ज्याच्याकडे बघुन माझ्या आयुष्याचे जहाज योग्य दिशेने प्रवास करत गेले,आहे अन् राहील. कोणत्याही जहाजाला गलबतांशिवाय काहीही महत्त्व नसते.जहाज हे गलबतांकडे बघून आपल्या आयुष्याचा प्रवास करत असते.त्या प्रवासात भले सागराची आवश्यकता असेल, पण हाच आयुष्यरूपी सागर जेंव्हा उधानावर असतो ,तेंव्हा जहाज आपल्या ध्येयाकडे, आपल्या गलबतांकडे बघून आपलं मार्गक्रमण करत असते.जसे मी माझ्या आयुष्यात तुम्हा जिवलग मित्रांकडे बघून मार्गक्रमण करत आलेलो आहे अन् राहील..!


आपला खूप जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके आजही आपल्या बैठकीत उपस्थित होता. त्याचं आपल्या मित्रांच्या बैठकीत उपस्थित राहणं कधीही गैरहजेरीत नसतं. ज्यादिवशी स्व.शाम शेळके आपल्या गप्पांच्या मैफिलीत गैरहजर असेल तो दिवस मैत्रीच्या देवतेला कधीही आवडणार नाही.


जिवलग मित्रा संजू, आज तू तुझ्या वैद्यकीय क्षेत्रात खूप समाधानी आहेस, त्याच कारण तुझे सत्कर्म..! तू आज पर्यंत, कोणताही छुपा अजेंडा मनी न धरता नेहमी सत्कर्म करत आला आहेस. त्याचं फळ तुझ्या आजच्या समाधानी आयुष्याला आहेस. एक जिवाभावाचा मित्र म्हणून तू आम्हा काही मित्रांच्या आयुष्यात किती मोठा आहेस याची मला जाणीव आहे.तू एक जिवलग मित्र म्हणून ज्या जबाबदारीने माझ्या लग्नात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती त्या नात्याला माझ्या कुटुंबाकडून सदैव दंडवत असेल..! 


मित्रा संजू , तू जेंव्हा डॉक्टर झालेला नव्हतास, तेंव्हा तु स्वतः ला आयुष्यात उभे करण्यात ज्या कष्टांना सोबत घेतले होतेस, याचा साक्षीदार एकमेव व्यक्ती आहे अन् ती म्हणजे आपला खूप जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी..! कदाचित म्हणून तुम्हा दोघांची मैत्री ही सदैव भूतकाळाच्या जाणीवा जागृत ठेवून आजही जिवंत आहे. नव्वदच्या दशकात तू अन् गणेश वाणी तत्कालीन औरंगाबाद शहरातील नूतन कॉलनी परिसरात एकत्र राहिलात त्या तुझ्या अतिशय खडतर दिवसांनी साष्टांग दंडवत..! त्या काळात अन् त्याच परिसरातील तुमच्या खोलीत मी अन् आपला खूप जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके एका रात्री मुक्कामी आलो होतो, तो प्रसंग आजही आठवला की खूप हसू येते. त्या आठवणींवर कधीतरी नक्कीच लिहिणार आहे. शेवटी आठवणी ह्या आपल्या जिवलग मैत्रिणी असतात हेच खरं..!


कोसळणारा मुसळधार पाऊस, बोर नदीला आलेला पुर, ऐन रात्रीच्या वेळी  झालेला माझा प्रवास आयुष्यातील एक कायमची आठवण देऊन गेलेला आहे. याचा साक्षीदार तू आहेस मित्रा..! त्यावर लिहिल कधीतरी..! जेवढं आपल्याकडून शक्य आहे तेवढं चांगलं द्यावं या विचारावर अढळ श्रद्धा बाळगून असणारे आपण..! 


बाकी मित्रा, आज मनसोक्त कौटुंबिक गप्पा झाल्या. मी चहा पीत नाही हे तुला माहीत आहे, म्हणून अनेकदा थंडगार सरबताची सरबत्ती झाली. कित्येक तासांच्या बैठकीत आपल्या गप्पांच्या मैफिलीत आपलं कुटुंब सहभागी झाले होते याचा विशेष आनंद झाला.मात्र आपलं दोघांचं कुटुंब आजच्या आपल्या गप्पांच्या बैठकीत एका रसिक श्रोत्याच्या भूमिकेत होते हे मात्र खरं..! त्यांना देखील आपल्या आयुष्यातील अनेकानेक आठवणींच्या हिंदोळ्यावर बसायला आवडले. मित्रा संजू, आपल्या आयुष्यातील अनेकानेक आठवणींच्या हिंदोळ्यावर बसायला कुणाला आवडणार नाही..? सर्वानाच आवडेल..! त्याचं कारण, आपलं आयुष्य हे मैत्रीच्या नंदनवनातील सुमधुर फुलांच्या सुगंधासारखे आहे.असा सुगंध, ज्याचा सुगंधी दरवळ सर्वदूर पसरलेला जाणवतो.अगदी केदारनाथ बाबाच्या सानिध्यापर्यंत..!🕉️


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १२ जून २०२३, सोमवार

रविवार, ४ जून, २०२३

आमचे नाना..!


 


आमचे गाव आमची माणसं.©️


" आमचे नाना..!"


==================================


माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्या काही फार मोजक्या बालमित्रांच्या संपूर्ण कुटुंबाचा अगदी घरगुती संबंध जुळून आला त्यात अग्रस्थानी आमच्या पालखेड गावातील अन् आमच्याच आळीतील गायकवाड कुटुंबीयांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.पालखेड गावातील आमच्या आळीतील समस्त गायकवाड कुटुंबीय कधी परके जाणवलेच नाही.अगदी स्वतः च्या घरात जो आपण हक्काने भाकरीच्या टोपल्यावर ताव मारतो, तोच प्रेमळ हक्क गायकवाड कुटुंबातील प्रत्येक बालमित्रांच्या घराविषयी होता,आहे अन् सदैव राहील.


आज दिनांक ४ जून २०२३, रविवार रोजी असेच माझ्या वैयक्तिक आयुष्यातील हक्काच्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी सह परिवार जाण्याचा योग आला.हा भेटीचा योग पालखेड गावातील आमच्या आळीतील घरी नव्हता, तर होता सध्या एक गायकवाड कुटुंब वैजापूर येथे स्थायिक असलेल्या घरी जाण्याचा..! पालखेड गावातील , आळीतील सुखद आठवणी सोबत घेऊन सह परिवार माझ्या आयुष्यातील खूप जिवलग बालमित्र विजू वैजिनाथ गायकवाड याच्या घरी गेलो अन् विजुच्या तीर्थरूप वडिलांची म्हणजेच आमच्या नानांची तीर्थस्वरुप बाईंची ( विजू गायकवाड यांच्या मातोश्री ) श्रद्धेय भेट झाली.


तीर्थस्वरुप वैजिनाथ कोंडाजी गायकवाड उपाख्य नाना..!

सेवानिवृत्त जि.प.शाळा मुख्याध्यापक. माझ्याशी नेहमी खूप आपुलकीने वागणारे नाना आज वार्धक्यात आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.मात्र याच वार्धक्याने आम्हा काही बालमित्रांना त्यांच्या पालखेड येथील घरात अगदी घरगुती वागताना कधीही निर्बंध लादले नाहीत.त्यांच्या घरात जो वावर आमचा प्रिय बालमित्र विजू गायकवाड याचा असायचा तो वावर त्यांच्या घरात थेट आमचा पालखेड गावातील वास्तव्य काळ जो पर्यंत होता तो पर्यंत होता.


आम्ही पालखेड येथे स्थायिक असताना, त्यातल्या त्यात माध्यमिक वयोगटात असे पर्यंत दर वर्षी आम्ही काही बालमित्र विजुच्या घरी जे पितृपक्षातील जेवण असायचे त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असायचो. त्याचं मुख्य कारण असायचे , विजूच्या घरी पितृपक्षात आम्ही काही बालमित्र गेलो की, तिथे आम्हाला वरण ,भात, कढी आमटी पोळी खीर यांच्या सोबत भजे खायला मिळायचे.आम्हा इतर मित्रांच्या घरी पितृपक्षात इतर सर्व खाद्य पदार्थ असायचे,मात्र भजे नसायचे. त्यावेळी भजे खायचे खूप आवडायचे.ती आवड प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घरी पूर्ण व्हायची. आज या आमच्या भजे खाण्याच्या तत्कालीन आवडणाऱ्या खाद्य पदार्थांच्या प्रसंगावर आजच्या दररोजच्या वडा पाव पिढीचा विश्वास बसणार नाही. त्याचं कारण आजच्या पिढीत भजे किंवा तत्सम तळलेले पदार्थ दररोज सहज उपलब्ध होतात अन् त्यामुळं त्याचं महत्त्व तेवढं राहिलेलं नाही.आमच्या बालपणी भजे सणासुदीलाच खायला मिळायचे. आम्ही माध्यमिक वयोगटात असताना प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घरी पित्राच्या जेवणाच्या पंगतीत बसलो की, आमच्या समोरची बसलेली पंगत घरातील ज्येष्ठांची असायची.त्यात तीर्थस्वरुप नाना देखील बसलेले असायचे. कितीही नाही म्हटलं तरी आम्हा काही बालमित्रांचा त्यात विशेषतः आण्णासाहेब कारभारी म्हस्के, स्व. आप्पा सुराशे  अन् मी आमचा भजे खाण्याचा जो हावरटपणा असायचा त्यावर नाना समोरच जेवायला बसलेले असल्याने त्यावर मर्यादा यायची. नानांची नजर चुकवून गपागप तोंडात भजे कोंबून द्यायचे अन् पुन्हा जसे काय आपण कसे ताटातील सर्व खाद्य पदार्थ मोठ्या चवीने खात आहोत अश्या ढोंगी खाद्य आविर्भावात आमचं पित्राचे जेवण सुरू असायचे. वास्तविक तीर्थस्वरुप नाना आम्हा बालमित्रांना आमच्या जास्त भजे खाण्याचा कृतीला  कधीही रागावणार नाहीत याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास असायचा,पण शेवटी आम्हा बालमित्रांचे वडील अन् तीर्थस्वरुप नाना यांच्यात आम्ही कधी अंतर धरलेच नाही.तो वडिलकीचा नैतिक धाक जाणवायचा अन् आम्ही वेळ साधून भज्यावर जास्त प्रमाणात ताव मारायचो.


प्रिय बालमित्र विजू गायकवाड अन् त्याचे भावंडे संजू, राजू अन् अविनाश ही सर्वजण आम्हाला भावंडासारखीच होती, आहेत अन् सदैव राहील. प्रिय बालमित्र विजू गायकवाड हा सध्या वैजापूर येथे दैनिक पुढारी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत आहे.जो पर्यंत पालखेड येथे आम्हा काही बालमित्रांचे वास्तव्य होते तो पर्यंत विजू गायकवाड याच्या घराच्या वरील माडी आमची हक्काची बैठक असायची. तिथे नाही शक्य झाले तर आदरणीय शिवाजी भाऊ गायकवाड याच्या घरी किंवा नितीन जैन याच्या शिवण काम दुकानात..! मात्र बैठक हमखास असायची. ( येथे ' बैठक ' शब्द प्रयोग केला आहे. त्याचा अर्थ फक्त आणि फक्त निखळ मैत्रीच्या गप्पांची रंगीबेरंगी चर्चा असा अर्थ अभिप्रेत आहे.आजकाल काही मराठी शब्द काही जणांनी त्यांच्या वर्तनाने संकुचित करून टाकले आहे. ) असो,प्रिय बालमित्र विजू गायकवाड याच्या घराच्या वरील खोलीत दिवसभर आम्ही काही बालमित्र पसरलेले असायचो.कधी कधी आमच्या गप्पांचा गोंगाट देखील व्हायचा, मात्र तीर्थस्वरुप नाना आम्हाला यावरून कधीही रागावले नाहीत.


गेल्या काही वर्षांपासून  तीर्थस्वरुप नाना अन् त्यांचं संपूर्ण कुटुंब वैजापूर येथे स्थायिक झाले आहे. दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत श्री. पारेश्र्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेला जेव्हा जेंव्हा तीर्थस्वरुप नानांची भेट होती, तेंव्हा तेंव्हा तीर्थस्वरुप नाना स्वतः हून आम्हा मित्रांना गर्दीत असलो तरी भेटायला यायचे. यदा कदाचित तीर्थस्वरुप नानांची भेट झाली नाही, तर यात्रेच्या धामधुमीत नानांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटायचो. वयोमानानुसार तीर्थस्वरुप नाना आता थकले आहेत.


आज जेंव्हा मी सह परिवार वैजापूर येथे तीर्थस्वरुप नानांची श्रद्धेय भेट घेतली त्यावेळी नानांचे हृदय प्रेमाने खूप भरून आले.त्यात वडीलकीची माया होती.आपली मुलं आपल्याला भेटायला आली याचा गगणात न मावणारा आनंद होता.जे नाते रक्तविरहित नात्यातील सर्वोच्च श्रेणीतील प्रेमळ असते तिथं फक्त भेटीने मनाला प्रफुल्लित करणारा पारिजातकाचा सडा पडलेला असतो.अशा भेटीत मनाच्या गाभाऱ्यात आपुलकीचा सुगंध दरवळत असतो. अशा भेटीत सख्खे कोण अन् परके कोण या बाबी गौण असतात.अशा भेटीत फक्त एकच भाव असतो अन् तो म्हणजे ही माणसं आपली आहेत अन् आता या क्षणाला मी यांच्या सोबत आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद उपभोगत आहे हेच भाव असतात , दुसरं काहीही नाही..! 


आज ज्यावेळी माझ्या पत्नीने  तीर्थस्वरुप बाईंना ( प्रिय बालमित्र विजू गायकवाड यांच्या मातोश्रींना  विजू ज्या नावाने हाक देतो त्याच नावाने मीही हाक देत असतो.) स्वयंपाक घरात मदत केली, ती पाहून  तीर्थस्वरुप नानांच्या हळू आवाजात मुखातून कित्येकदा शब्द बाहेर पडले की, 

" अरे नंदू, तिला उगीचच त्रास झाला..!"


मी तीर्थस्वरुप नानांना म्हणालो..

" अहो नाना, हे आमचं पण घर आहे. त्यामुळं कृपया असे म्हणू नका. तुम्ही सगळी माणसं आपलीच आहात.तुम्ही कधी आम्हाला परके समजले नाही.मग तुमचं घर देखील आमचं हक्काचे आहे..! "

तीर्थस्वरुप नाना असो किंवा त्यांच्या पिढीतील सर्व माणसं, यांना आपल्या मुळे कुणाला त्रास झालेला आवडत नाही.स्वावलंबी , स्वाभिमानी आयुष्य व्यतीत करत करत ही जुनी जाणती पिढी आज आपल्या  पिढीत आदर्शवतच म्हणावी अशी आहे.


ज्यावेळी आज सकाळी तीर्थस्वरुप नाना अन् तीर्थस्वरुप बाईंची वैजापूर येथील घरी भेट झाली त्यावेळी मी , माझी पत्नी अन् धाकटा मुलगा यांनी मनोभावे दर्शन घेतले होते तीच श्रद्धेय कृती निरोप घेताना पण केली.निरोप घेताना तीर्थस्वरुप बाईंना आवर्जून सांगितले की, 

" नानांना,  आम्ही केदारनाथ बद्रिनाथ तीर्थयात्रेहून आणलेला जो पवित्र तीर्थप्रसाद आहे तो नक्की ध्यान करून द्या..! "


आम्ही घरातून बाहेर पडलो. सोबत विजू अन् प्रिय मित्र धनंजय साळुंखे ( वैजापूरकर ) होते. थोडे अंतर चालून गेल्यावर मी पुन्हा परत तीर्थस्वरुप बाईंना आवर्जून सांगायला गेलो की, " नानांना,  आम्ही केदारनाथ बद्रिनाथ तीर्थयात्रेहून आणलेला जो पवित्र तीर्थप्रसाद आहे तो नक्की ध्यान करून द्या..! "


आज कुटुंबातील  ज्येष्ठ आदरणीय व्यक्तींची भेट झाल्याचे आत्मिक समाधान लाभले होते. काही ज्येष्ठांच्या भेटी ह्या भावूक मनांना गतकाळातील आठवणी जाग्या करायला अन् आपलं तिथून पुढचं आयुष्य प्रफुल्लित करायला पुरेश्या ठरतात.जशी की आज खूप मायाळू तीर्थस्वरुप बाई अन् तीर्थस्वरुप नाना यांची श्रद्धेय भेट झाली..!


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ४ जून २०२३, रविवार.