मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ११ )
===================================
बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरातून निघताना मन अगदी गहिवरुन येत होते. जिथं आपलं मन मोकळं होतं, जिथं आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवतं, जिथं अस्तित्व कुणाच्या तरी अधीन होऊन समरसून गेलेलं असतं, जिथं प्रेम, भक्ती हृदयातून व्यक्त केलेली असते, जिथं आपली संपूर्ण चेतना समोरच्या अस्तित्वाला श्रद्धेने समर्पित केलेली असते, अशा ठिकाणाहून निरोप घेताना मन , त्या त्यावेळी अंतर्मनातून अश्रू ढाळत असते. त्या भावूक मनाला कुणीही, कितीही समजावून सांगूनही ते आपलं रुदन सुरूच ठेवत असते. आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात, बाबा केदारनाथाच्या गर्भगृहात आपलं मन मोकळं केलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आमचं मन बाबा केदारनाथला अधीन होऊन समरसून गेलेलं होतं. या अखिल विश्वातील सर्वात सुंदर असणारा भाव म्हणजे प्रेम अन् भक्ती..! त्या प्रेमाचा अन् भक्तीचा भाव बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात जाणवला होता. हा भावूक अनुभव आमच्या हृदयातून निघता निघता निघत नव्हता. मात्र मानवी आयुष्याला त्याग अन् निरोप यांना सोबत घेऊनच आपलं आयुष्य व्यतीत करायचे असते हा शाश्वत विचार स्वीकारून त्या पवित्र स्वर्गीय हवा वाहणाऱ्या परिसराचा निरोप घेतला होता. मी सह परिवार बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसराला निरोप दिला होता.निरोप हा पुन्हा कधीतरी भेट होण्यासाठीच दिला जातो यावर माझा विश्वास होता. बाबा केदारनाथचा निरोप घेताना मी अगोदरच बाबा केदारनाथाला अगदी हृदयातून व्यक्त झालो होतो की, " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..! तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!" हे व्यक्त केलेले विचार राहून राहून मनात येत होते, तसतसे आमची पावलं आता बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून बरीच पुढे आली होती.
थोरला चिरंजीव नमन हा सर्वात पुढे चालू लागला होता. आम्हाला आता पुन्हा हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील केदार घाटी पुन्हा पायी चालत चालत जाऊन उतरून गौरी कुंड येथे पोहोचायचे होते. चालता चालता नमन एकदम थांबला अन् रस्त्याच्या उजव्या बाजूला बघत मला म्हणाला..
" दादा, तिकडं जेवण वाटप सुरू आहेत. आपण प्रसाद घेऊ अन् मग केदार घाटी उतरायला सुरुवात करू..!"
माझ्या नियोजनात गौरी कुंड ते नंदी बेस कँप अन् पुन्हा उतरताना बाबा केदारनाथ मंदिर परिसर ते गौरी कुंड या पायी प्रवासात जेवण करणे नव्हते. त्याचं कारण, जेवणामुळे शरीराला जडत्व येईल किंवा पोट बिघडण्याची शक्यता होती.या कारणामुळे फक्त आणि फक्त द्रव पदार्थ घेऊन पायी प्रवास नियोजित होता. मी थोरला चिरंजीव नमन याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.धाकटा चिरंजीव नयन याने थोरल्याच्या स्वरात स्वर मिळवला अन् मला बोलते केले.मी माझ्या पत्नीकडे बघून विचारले..
" तुझे काय मत आहे ,हे दोघं म्हणतात तसं प्रसादाचे जेवण करून पुढील प्रवासाला लागायचे की, रस्त्यात लस्सी, सरबत प्यायचे..?"
यावर माझ्या पत्नीने लगेच उत्तर दिले...
" मुलं म्हणतायेत तर आपण जेवणं करू अन् मग पुढील पायी प्रवासाला सुरुवात करू..!"
माझ्या पत्नीच्या होकारानंतर आम्ही चौघे जण ज्या बाजूला लंगर सुरू होते तिकडे जाऊ लागलो.
जिथं जेवणं सुरू होती, तिथं पोहोचल्यावर लक्षात आले की, अतिशय कडाक्याच्या थंडीत शीख पंथातील काही तरुण स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लंगर मधील भोजन प्रसाद वाटप करत होते. आम्ही रांगेत उभे राहून आम्ही ताटात भोजन प्रसाद घेतला अन् काहीसे दूर एका कट्ट्यावर जेवण करायला बसलो. काही वेळात जेवणं उरकली. तिथल्या बांधवांचे आभार मानले अन् दुपारच्या साडे बारा वाजता आम्ही गौरी कुंड कडे पायी मार्गस्थ झालो. रस्ता आता ओळखीचा झालेला असल्यामूळे अंतिम ठिकाण कुठे अन् किती दूर आहे याचा अंदाज घेऊन आम्ही झपझप पावलं टाकत केदार घाटी उतरू लागलो होतो.केदार घाटीची उतरंड बऱ्याच ठिकाणी तीव्र होती, त्यामुळं उतरतांना पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. गौरी कुंड पासून बाबा केदारनाथकडे येताना केदार घाटी चढताना गुढग्यावर अन् मांडीवर ताण खूप पडला होता. आता बाबा केदारनाथ ते गौरी कुंड उतरतानाच्या पायी प्रवासात पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. आम्ही काल दिनांक २०/५/२०२३ रोजी गौरी कुंड येथून दोन काठ्या सोबत घेतलेल्या होत्या. गौरी कुंड ते बाबा केदारनाथकडे चढणीच्या रस्त्यावर काठीची गरज पडली नव्हती.मात्र बाबा केदारनाथ ते गौरी कुंडकडे येताना अतिशय उतरणीच्या रस्त्यावर सोबत घेतलेल्या काठीचे महत्त्व लक्षात येऊ लागले होते. काठीचा खूप आधार वाटू लागला होता. अरुंद रस्त्याने वर चढून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढलेली असल्याने घोड्यांचा धक्का बसू नये म्हणून खूप कडेने आम्ही चालू लागलो होतो.काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता.रस्त्यावर घोड्यांच्या विष्ठेमुळे त्यात पुन्हा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल खूप झाला होता. पाय निसटून पडण्याचा धोका खूप होता. पायी उतरणारे काही भाविक पडत देखील होते. खेचर / घोड्यावर बसून वर चढून जाणाऱ्यांपेक्षा वरतून खाली गौरी कुंड कडे उतरणारे खेचर / घोडे बऱ्याच ठिकाणी पाय निसटून पडत होते. घोड्यावर खेचरावर बसलेले काही भाविक देखील खाली पडताना आढळून येऊ लागले होते. उतरणाऱ्या एका घोड्याने आमचा धाकटा चिरंजीव नयन यास धक्का दिला. इतक्यात नयनला त्याच्या आईने पटकन पकडले. जर यदा कदाचित नयन यास त्याच्या आईने पटकन पकडले नसते तर बाजूला असणाऱ्या दरीत नयन हमखास पडला असता. खूप अघटीत घडले असते.त्या धक्क्यामुळे नयन खूप घाबरुन गेला होता. आता आम्ही चालण्याचा क्रम बदलला होता. सर्वात पुढे मी , माझ्या मागे नयन , त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी थोरला चिरंजीव नमन अशा क्रमाने आम्ही गौरी कुंड कडे पायी प्रवास सुरू केला होता. थंडीचा कडाका खूपच जास्त प्रमाणात जाणवू लागला होता.
उतरताना काही ठिकाणी काही मार्ग आम्ही जुना निवडला होता. जो मार्ग जून २०१३ मधील विध्वंसक त्रासदी मध्ये वाहून गेला होता, तो मार्ग काही ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडताना काहीसा जवळचा होता त्यामुळं जुन्या मार्गाचा वापर करू लागलो होतो. मात्र जुना मार्ग बांधणीचा अजिबात नव्हता. निव्वळ दगड धोंडे, खाच खळगे, खड्डे इत्यादी समस्यांनी भरलेला होता. नव्या अन् जुन्या रस्त्याच्या अंतरात फारसा फरक नव्हता.आम्हाला निघून दीड तास झाला होता.थकवा आला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात आम्ही थांबलो. अमूल लस्सी पिलो.थांबल्यामुळे मांडीत गोळे यायला लागले होते. आता दुपारचे सव्वा दोन वाजले होते. अधून मधून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. प्रचंड गारठा होता. बसल्यावर थंडीची तीव्रता जास्तच जाणवायला लागली होती. लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारच्या सव्वा दोन वाजता पुन्हा पुढे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला.
अतिशय तीव्र उताराच्या अरुंद रस्त्याने आम्ही चौघेजण उतरू लागलो होतो. इतक्यात माझ्या जॅकेटच्या आतील शर्टच्या खिशातील मोबाईल खणखणला. अरुंद रस्ता, त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची, घोड्यांची गर्दी त्यामुळं मी आलेला कॉल घेतला नाही. भीती वाटत होती, आपण आलेला कॉल घ्यावा अन् बोलताना किंवा मोबाईल खिशातून काढताना एखाद्या घोड्याने धक्का दिला तर...काय होईल यामुळे मी कॉल घेतला नाही. काही वेळापूर्वी नयनला घोड्याचा धक्का बसला होता. नशीब, त्याच्या आईने नयनला पटकन पकडले. त्या प्रसंगानंतर आम्ही खूपच सावधपणे पुढील रस्ता मार्गक्रमण करू लागलो होतो. पुन्हा कॉल आला. कुणाचा कॉल आहे हे बघून घ्यावा असे वाटले. आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबलो. आलेला कॉल अनोळखी होता.मी कॉल उचलला . एकलहेरा ता.गंगापूर येथील माजी विद्यार्थीनीचा तो कॅला होता. दीदीचे लग्न होते अन् मला आवर्जून लग्नाला या सर असं आग्रहाचं निमंत्रण तिने दिले होते. त्या माजी विद्यार्थीनीच्या लग्न तिथीला मी हजर राहू शकणार नव्हतो, कारण तेंव्हा मी इकडेच उत्तराखंड प्रवासातात राहणारा होतो. त्यामुळं दीदीला सर्व परिस्थिती सांगितली अन् लग्नास अनुपस्थित राहण्याचे कारण सांगितले. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अन् कॉल बंद केला. मोबाईलची रेंज खूप कमी होती. अधून मधून फोन कॉल कट होत होता. इतक्यात लगेच दुसरा कॉल आला.हा कॉल ओळखीचा होता. जळगाव येथील माजी विद्यार्थी प्रकाश शिंदे याचा तो कॉल होता. कॉल घेतला अन् प्रकाशने त्याच्या घर भरणी करीता आवर्जून निमंत्रण दिले. मात्र प्रकाशला देखील प्रवासाची परिस्थिती सांगितली. रेंज खूपच कमी होती. अखेर कॉल वरील बोलणे बंद केले. पुन्हा मोबाईल जॅकेटच्या आत मध्ये ठेवून दिला.आकाशात काळया ढगांनी दाटी करायला सुरुवात केली होती. आमच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे रेन कोट होते.जरी यदा कदाचित पाऊस सुरू झालाच तर रेन कोट परिधान करून पुढील पायी प्रवास करावा लागणार होता.पावसाच्या चाहूल मुळे आम्ही लवकरात लवकर पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो.
रामबाडा दृष्टीक्षेपात आले होते. शरीरात प्रचंड थकवा जाणवू लागला होता. मांडीत अन् पोटरीत गोळे येऊ लागले होते. त्यात रस्ता पूर्णतः किंवा अर्धा मोकळा नव्हता. येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चालणे अजून अडचणीचे ठरू लागले होते. रामबाडा आले म्हणजे आपण अर्ध्या अंतरावर पोहोचलो असा अर्थ होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ मंदिर या पायी प्रवासातील अंतरावरील रामबाडा हे ठिकाण ऐन मध्यावर आहे. रामबाडाहुन बाबा केदारनाथ कडे जाताना रस्त्याची अतिशय उंचीची चढण आहे.याचाच अर्थ बाबा केदारनाथ कडून रामबाडाकडे येताना रस्त्याची उतरंड अतिशय तीव्र उतरण आहे. थोडक्यात रामबाडा पासून बाबा केदारनाथ कडे अन् बाबा केदारनाथ पासून रामबाडाकडे जाताना अन् येताना पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी ठरते. शरीराच्या अन् मनाच्या परीक्षेत आम्ही सहभागी होऊन गौरी कुंड कडे मार्गस्थ झालो होतो. शरीर खूप थकले होते, मात्र मन अजूनही टवटवीत होते. आयुष्याचे सगळे प्रवास मनाच्या सुदृढ क्षमतेवरच होत असतात याला प्रमाण मानून आम्ही आमच्या थकलेल्या शरीराला ,आमच्या अजूनही टवटवीत असणाऱ्या मनाने ताजेतवाने केले होते.
इतक्यात पावसाला सुरुवात झाली....
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ३० डिसेंबर २०२३, शनिवार.
क्रमशः































