शनिवार, २५ एप्रिल, २०२६

निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


निवांतपणा अन् सोबत जिवलग मित्र 


=====================


सोबत जिवलग मित्र मनोहर गावडे, 

सोबतीला थंडगार ऊसाचा रस 

अन्.... 

निवांत निशाचर वेळ..!

ठिकाण - छत्रपती संभाजीनगर शहरातील एक निवांत कोपरा..!


निवांतपणा, आपल्याला आपल्यातील आपलं काय आहे याचा शोध घ्यायला शिकवतो.मग तो निवांतपणा एकट्यातील असो अथवा प्रिय मित्राच्या सोबतचा..! त्यात हमखास आपला आपण केलेला शोध नक्कीच सापडतो. त्यातल्या त्यात निवांतवेळी आपलं कुणीतरी सोबत असलं की, मनाचे आयुष्य , दीर्घायुषी होते.निवांत बसल्यावर कुणी आपल्याला एकलकोंडा म्हणो अथवा काहीही म्हणो, मात्र त्या एकांतात आपल्यातील आपलं कुणीतरी नक्कीच सापडतो..!


आज ज्यावेळी प्रिय मित्र मनोहर अन् मी निवांत होतो, त्यावेळी आयुष्याच्या प्रवासातील कित्येक क्षणांना , व्यक्तींना पुन्हा एकदा जिवंत केले.


वास्तविक मी निशाचर नाही,पण काही वेळी व्हावं लागतं, आपला भुतकाळ शोधण्यासाठी..!

आपल्या मनाला जाणून घेणारे कुणी सोबतीला असले की, त्या बैठकीची रंगत काही औरच असते.

अजून यापेक्षा अजून काय हवे..?

त्या गप्पांच्या बैठकीत आम्हा दोघात उपस्थित होता तो आमचा अत्यंत जिवलग वर्गमित्र स्व. विनोद पाटील..! ♥️


विनोद पाटील आम्हाला कायमचा सोडून कधीचाच गेला आहे, मात्र आजही तो नेहमी सोबत असतो.स्व.विनोद पाटील सारखा अत्यंत प्रेमळ अन् खूप मोठ्या मनाचा मित्र आमच्या संपूर्ण डी. एड. बॅच कुणीच नव्हता. नियती पण ना...सर्वांच्या आवडत्यालाच का आपल्या सोबत घेऊन जाते कुणास ठाऊक..?

जसे माझ्या आयुष्याच्या प्रवासातील पालखेड येथील दोन जिवलग बालमित्रांना नियतीने खूप लवकर आपल्यातून कायमचे दूर तिच्या घरी नेले आहे. स्व.आप्पासाहेब सुराशे अन् स्व.शाम शेळके..! दोघेही जिवलग बालमित्र होते..!♥️♥️


माझी फेसबुक मित्र यादी मोजकीच आहे. त्यात कायमचे अढळ स्थान राखून आहे स्व.विनोद पाटील..! विनोद कधीचाच स्वर्गवासी झालेला आहे, मात्र विनोद पाटील यास मी कधीच अनफ्रेंड करू शकत नाही.जिवलग मित्र होता तो..! भावना जपायचा असतात. विनोद, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप आवडता होता.आज मी अन् माझा खूप जिवलग मित्र मनोहर गावडे ज्यावेळी रात्री निवांत बसलो होतो, तेंव्हा विनोदची उपस्थिती आम्हाला गतकाळातील आठवणीत घेऊन गेली.विनोद पाटील हा आमच्या मैत्रीचा सर्वोच पॉईंट होता. कधीतरी लिहिल , त्यावर..! जिवलग मित्राचा मृत्यू हा आपल्या त्या कालखंडाचा मृत्यू असतो. सगळं काही पाठीमागे राहते.


प्रिय मित्र मनोहर अन् मी ऊसाचा रस पिऊन झाल्यावर निघालो , पुन्हा एकदा आमच्या प्रापंचिक आयुष्याच्या प्रवासात..!

पुन्हा कधीतरी भेटू , आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी..!

असेच कुठेतरी..!


आम्हाला भेटायला , फारसा काही खर्च लागत नाही आणि पचायला ७२ तास लागतील असे खाद्य पदार्थ देखील खाण्यात लागत नाहीत. त्याचे कारण आम्ही गुरुबंधू आहोत म्हणून..! 🕉️


जाणीव अन् जाणिवा जिवंत ठेवणारे आयुष्यात सोबत असले की, बाबा केदारनाथाच्या चरणी भरून पावल्याचे आत्मिक समाधान लाभते. साधं,सरळ आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा अजून काही लागत नाही.


असो, शुभ रात्री मित्रांनो..!🙏🙂


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २५/४/२०२६, शनिवार

रविवार, १२ एप्रिल, २०२६

आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.


 


#चिंतन ©️


आशा दीदीने दीर्घ काव्याला अजरामर केले.


=====================


लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, आता आशा दीदी गेल्या.मृत्यूच्या डोहात दोन स्वर कायमचे विसावले. जरी लता दीदी आणि आशा दीदी यांच्या वर्तमानातील आयुष्यातील स्वर कायमचे थांबले असले तरी त्यांनी गायन केलेला प्रत्येक स्वर पिढ्यानपिढ्या, स्वरांची पूजा करणाऱ्या कित्येक भक्तांना ऐकू येत राहील.


काही चित्रपटावर लिहायला हळुवार मन थांबते.कारण त्या चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवाचे असते.व्यक्त करायला लागलो की भावना स्तब्ध होते.माझ्या भावविश्वात असे दोनच चित्रपट आहेत ज्यांना फक्त आणि फक्त अनुभवून आत्मिक आनंद प्राप्त करत असतो.त्या भावविश्वातील एक चित्रपट आहे सी.प्रेमकुमार लिखित अन् दिग्दर्शित ' 96’ आणि दुसरा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे गुलजार साहेब लिखित आणि दिग्दर्शित इजाजत..! या दोन्ही चित्रपटांवर लिहायला लेखणी थांबते , कारण ह्या दोन्ही चित्रपटांना फक्त आणि फक्त अनुभवत असतो. काही भावना व्यक्त न करता हृदयाच्या देव्हाऱ्यात जपून ठेवायच्या असतात.


माझ्या मते संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखादे दीर्घ काव्य ठरावे असा एकमेव चित्रपट आहे अन् तो म्हणजे इजाजत..! इजाजत चित्रपटाची कथा अन् पटकथा जर थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी लिहिली असती तर तो काहीसा प्रखर भाष्य करणारा चित्रपट झाला असता.मात्र इजाजत चित्रपटाला साहित्य विश्वातील अत्यंत मृदु , संवेदनशील लेखक कवी गुलजार साहेब यांनी प्रस्तुत केले आणि एक अत्यंत तरल भावनाशील चित्रपट इतिहासात अजरामर झाला.

संपूर्ण इजाजत चित्रपटच एक छानसे काव्य आहे अन् त्या काव्यातील सर्वोत्तम काव्य आहे...

" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." 

या दीर्घ पद्य रचनेला जेंव्हा गुलजार साहेब यांनी लिहिले अन् संगीतकार पंचमदा ( आर. डी.बर्मन ) यांच्या समोर ठेवले तेंव्हा पंचमदांना वाटले चित्रपटातील सीन लेखन असावे. मात्र गुलजार साहेब यांनी सांगितले हा मजकूर सीन लेखन नसून काव्य लिहिले आहे.यावर पंचमदा बुचकळ्यात पडले अन् आश्चर्यचकित होऊन म्हणाले...

" एवढे मोठे काव्य..? "

बाजूला आशा दीदी भोसले बसलेल्या होत्या.त्यांनी या काव्याच्या पहिल्या ओळी गुणगुणल्या. असे करत करत एका अजरामर गीताच्या , दीर्घ काव्याला संगीतात बंदिस्त करून रसिकांच्या समोर पंचमदांनी प्रस्तुत केले." मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं.." या काव्यातील प्रत्येक ओळ तरल भावूक मनाच्या भावना व्यक्त करते. एखादे सुंदरसे फूल एखाद्या स्रीने आपल्या डोक्यावर लावावे अन् त्या फुलाचे सौंदर्य वाढवावे तसेच काहीसे या काव्यामुळे आशा दीदी यांनी गुलजार साहेब यांच्या या काव्याचे सौंदर्य अजून वाढवून इतिहासात अजरामर केले. याचं काव्य लिखाण बद्दल गुलजार साहेब यांना आणि अत्यंत सुरेल आवाजात गायन केल्या बद्दल आशा दीदी भोसले यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.


आत्मिक आनंद देणाऱ्या बाबींना जपून ठेवून निवांत वेळी अनुभवायचे असते.जसे की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात गुलजार साहेब लिखित दिग्दर्शित इजाजत चित्रपटाला अनुभवत असतो.


असो, आज गायन क्षेत्रातील चतुरस्त्र सारस्वत आशा दीदी भोसले यांचा स्वर्गवास झाला आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


फोटो स्रोत : सोशल मीडिया 


वंदे मातरम् 


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १२/४/२०२६, रविवार

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


भला माणूस शेख गनी उपाख्य डॉन..!


=====================


परवा दिनांक १०/४/२०२६ शुक्रवार रोजी दुपारी लासूर स्टेशन येथील स्वर्गीय शेख गनी उपाख्य डॉन यांच्या ऐन तारुण्यात झालेल्या स्वर्गवासानंतर त्यांच्या घरी दुःखद सांत्वनपर भेट दिली.सोबत होता माझा अत्यंत आवडता विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे.


मी माझ्या आयुष्याच्या प्रवासातील जवळ जवळ दीड तप लासूर स्टेशन येथे व्यतीत केले. लासूर स्टेशनचे एक हळुवार प्रेमळ स्थान हृदयात आहे. आमचे स्व.आई दादा सोबत होते, त्यामुळे आधाराचा अन् मायेचा आनंद आयुष्यात होता.लासूर स्टेशन येथे वास्तव्यात असताना इ.स.२०१४ मध्ये माझ्या स्व.आईच्या पायाला फ्रॅक्चर झालेले होते.वैजापूर स्थित डॉ.रहाणे हॉस्पिटल येथे काही दिवसाच्या अंतराने न्यावे लागायचे. माझ्या स्व.आईच्या पायाची हालचाल अजिबात होत नसे.तब्येतही स्थूल होती.अशाच एका दिवशी आईला वैजापूर येथे न्यायचे होते.ऑगस्ट महिना होता.आभाळ भरून आले होते.त्यावेळी लासूर स्टेशन येथे ॲम्ब्युलन्स नसल्यात जमा होत्या.आताची परिस्थिती माहीत नाही. माझ्या माहितीनुसार आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या Dr. खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) आणि माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांच्याच कडे ॲम्ब्युलन्स होती. Dr. खरात साहेबांना आदल्या दिवशीच भेटून उद्या ॲम्ब्युलन्स मिळेल का? अशी प्रश्नार्थक विनंती केली. डॉ.खरात साहेब भला देव माणूस..!क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. फक्त त्यांनी नम्रपणे सांगितले की, " सर, ॲम्ब्युलन्स खूप दिवसांपासून बंद आहे आणि कामावर पण आलेली आहे.तरी पण पाठवून देतो.काहीच काळजी करू नका..!"


दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या डॉ.खरात साहेब ( आस्था हॉस्पिटल लासूर स्टेशन) यांनी त्यांची ॲम्ब्युलन्स माझ्या घराच्या समोर पाठवून दिली.त्या ॲम्ब्युलन्सवर शेख गनी ज्यांना अख्खे लासूर स्टेशन डॉन म्हणून ओळखत असायचे ते चालक म्हणून आले होते. आल्या आल्या लगेच शेख गनी उपाख्य डॉन म्हणाले..

" गुरुजी , चला निघायचे का..?"

डॉन भाऊ, तरुण कणखर तब्येतीचा होता.मी त्यांना अत्यंत आत्मियतेने घरात आणले. नाही नाही म्हणत होते तरी देखील चहा पोहे असा एकंदरीत अल्पोपहार केला.माझी स्व.आई बाजूलाच अंथरुणावर झोपून होती.आईच्या आग्रहाने अल्पोपहार आटोपला. माझ्या स्व.आईचा स्वभावचं अत्यंत मायाळू होता.आईचा हा सदगुण जेवण, अल्पोपहार अन् चहाच्या वेळी पालखेड येथील माझ्या जिवलग मित्रांना प्रत्येकवेळी यायचा.हाच अनुभव माझ्या आयुष्याच्या प्रवासातील दुसऱ्या गावी लासूर स्टेशन येथे शेख गनी उपाख्य डॉन यांनाही आला होता.शेवटी मीच आईला म्हणालो..

" आई, जास्त आग्रह करू नको.त्यांना जेवढे हवे तेवढे पोहे घेतील."

अखेर अल्पोपहार आटोपला.घरी मी , माझे वयोवृद्ध वडील, माझी पत्नी आणि धाकटा मुलगा नयन त्याचे त्यावेळी वय साधारणतः पाच वर्षे असेल एवढेच जण होतो.आता आईला झोपलेल्या अवस्थेत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचे होते.एका बाजूला मी अन् माझ्या पत्नीने अंथरूणाला धरले आणि दुसऱ्या बाजूला शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांनी एकट्याने धरले. शेख गनी मला म्हणाले..

" गुरुजी, पॅक धरा, आईचे वजन जास्त आहे."

हळूहळू चालत चालत आम्ही आईला अलगदपणे ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलो. माझे वयोवृद्ध वडील घरीच थांबणार होते.आम्ही लासूर स्टेशन येथील महावीरनगर येथून लासूरगाव मार्गे वैजापूर येथे निघालो.पावसाची रिमझिम सुरु झाली होती.ॲम्ब्युलन्स गाडी काहीशी अस्वस्थच जाणवू लागली होती.अखेर जे व्हायला नको तेच झाले.लासूर स्टेशन ते लासूरगाव रस्त्याच्या मध्यावर ॲम्ब्युलन्स बंद पडली.आता काय करावे..?

हा अत्यंत वेदनादायी प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला होता.शेख गनी भाऊंनी खूप प्रयत्न केले पण ॲम्ब्युलन्स काही चालू होईना.अखेर मी लगेच माझे प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ ( शारदा मेडिकल ) यांना मोबाईलवरून संपर्क केला.प्रिय मित्र राहुल भाऊ शिरसाठ यांना जी आहे ती सत्य परिस्थिती सांगितली.राहुल भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात पाठवून दिली आणि " अजून काही मदत लागली तर आवर्जून सांगा सर..!" राहुल भाऊ शिरसाठ यांचा मानसिक आधार त्यावेळी धीर देऊन गेला.


राहुल भाऊ शिरसाठ यांची ॲम्ब्युलन्स काही वेळात आली होती.वरतून रिमझिम पाऊस सुरू होता.रिमझिम पावसात आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूच्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावे लागणार होते.शेख गनी भाऊंनी मला धीर दिला अन् म्हणाले..

" गुरुजी टेन्शन मत लो, मैं हुं..! "

असे म्हणून आमच्या आईच्या अंथरूणाला एका बाजूने घट्ट पकडून अन् दुसऱ्या बाजूला मी , माझी पत्नी यांनी पकडून आईला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स मधून बाहेर काढून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवले.आभाळातून रिमझिम पाऊस सुरू होता.आई भिजू नये म्हणून आईच्या चेहऱ्यावर छत्री धरण्याची जबाबदारी धाकटा मुलगा नयन याने निभावली होती.आईला बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्स मध्ये अलगदपणे ठेवल्यानंतर शेख गनी भाऊकडे बघून माझ्या स्व.आईने दोन्ही हात जोडले. आईने तिच्या मूळ अत्यंत प्रेमळ अन् मायाळू स्वभावाला अनुरूप अतिशय नम्रपणे जोडलेले हात कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आपल्या संस्कृतीचे मूल्य दर्शवित होते.त्यावेळी माझ्या अन् माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले होते.शेख गनी भाऊंनी ते ओळखले माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले..

" गुरुजी, टेंशन मत लो, उपरवाला साथ हैं.आप अपनी अम्मी की सेवा कर रहे हो.खुशनसीब हो..! रस्ते में अगर कुछ तकलीफ होती हैं तो मुझे तुरंत कॉल करो.मैं जल्द से जल्द पहुंच जाऊंगा..! "

दुसऱ्या ड्रायव्हर भाऊंना आवश्यक ती काळजी घेण्याचे सांगितले आणि आम्हाला पुढील मार्गाला सुव्यवस्थीपणे मार्गस्थ केले.


जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्याला होतो तो पर्यंत अधून मधून मला शेख गनी भाऊ कॉल करून आईच्या तब्येती बाबत खुलासा घेत असायचे.मी माझ्या आईच्या आयुष्यावर आधारित आई वडील हयात असताना एकतीस भागात लेख लिहिलेले आहेत.त्यातील एका भागात शेख गनी भाऊंनी आमच्या आयुष्यात कृतीतून व्यक्त केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.सदरील पुस्तक अजून प्रकाशित केलेले नाही.भविष्यात बघू..!


जात धर्म ह्या मानव निर्मित बाबी..! ज्याने त्याने त्याचा यथा योग्य सामाजिक हितासाठी उपयोग करायला हवा.त्यांचे उपद्रवमूल्य वाढले की सामाजिक वातावरण गढूळ होते.धर्माच्या मदतीने माणसाने समुहाने , आत्मियतेने , आनंदाचे काही क्षण साजरे करुन आपापल्या परंपरा जपत जगायला अन् जपायला सुरुवात केली. काळाच्या ओघात जात, धर्म , वंश इत्यादी बाबींचा माणसाच्या आयुष्यात कधी अहंकाराने कधी न्यूनगंडाने वापर होऊ लागला.यात घुसमट झाली ती कमी संख्येच्या, संवेदशील मनाच्या अन् भावनाशील मनाच्या मानवी घटकांची..! माणसाच्या आयुष्यात रक्ताचे नाते श्रेष्ठ की रक्त विरहित नाते श्रेष्ठ..? हा प्रश्न आपल्याच पूर्वजांच्या कित्येक उदाहरणांवरून त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत करून ठेवलेले आहे. मोह, माया अन् मानवी आयुष्य यावर श्रीकृष्णाने आपल्या विद्वत्तेने केलेले वैचारिक भाष्य सर्व मानवी घटकांना सदैव अनुकरणीय आहे.शेख गनी माझा रक्ताचा नातेवाईक नव्हता, मात्र विधात्याने ऐन संकटात पाठविलेला त्यावेळचा देवदूत होता. अशावेळी रक्ताची नाती बोधट ठरतात अन् चिरंजीव ठरतात रक्त विरहित नाती..! आर्ष कालीन , प्राचीन , मध्ययुगीन अन् आधुनिक काळात मानवी जीवनातील असे कित्येक उदाहरणे आहेत ज्यांनी ऐन वेळी मदत करतो तो विठ्ठल याची अनुभूती कित्येकांना दिलेली आहे.


आमच्या आयुष्यातील देवदूत स्व.शेख गनी उपाख्य डॉन भाऊ यांचा स्वर्गवास झाला आहे हे मला सोशल मीडियाद्वारे उशिरा माहित झाले. लासूर स्टेशन येथील त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे , सांत्वनपर गृहभेट घेतली.यावेळी त्यांच्या घरातील जेष्ठ बंधू उपस्थित होते.त्यांनाही डॉन भाऊंच्या माणुसकीच्या आठवणी सांगितल्या.त्यांनाही गहिवरून आले.


असो, शेख गनी उपाख्य डॉन भाऊ ( सावंगी लासूर स्टेशन )यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १२/४/२०२६, रविवार

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'


 


#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' आधार आदरणीय कौराजी पाटलांचा..!'


===================================


आम्ही दिनांक ३/४/२०१६, रविवार रोजी भल्या सकाळी पालखेड परिसरातून निघून नाशिक येथे पोहोचलो होतो.

निमित्त होते,प्रिय जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची होती आमच्या या बालमित्राला ,सदरील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मौजे बाजार वाडगाव, ता. गंगापूर येथे करायची होती.


मात्र सदरील प्रवासाला निघण्यापूर्वी एक दिवस अगोदर प्रिय बालमित्र संजुचा मला फोन आला की,

" नंदू, ,आपल्याला कानिफनाथ महाराज यांची मूर्ती नाशिक येथून घेऊन यायची आहे.तुला सोबत यावेच लागेल. अजुन एखादी अनुभवी जाणकार व्यक्ती सोबत घे..!"


हे ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर लगेच माननीय कौराजी पाटील निघोटे ( सरपंच हडस पिंपळगाव ) नाव आले. त्याचं कारण असं की,मी हडस पिंपळगाव, ता.वैजापूर येथे जवळजवळ आठ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली होती.या संपूर्ण कालावधीत याच गावातील जय बाबाजी भक्त परिवारातील माझे गुरुबंधू माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा एक सकारात्मक अन् अतिशय खंबीर नेतृत्व म्हणून जवळून परिचय झाला होता. विशेष म्हणजे धार्मिक अन् सामाजिक कामासाठी कौराजी पाटील निघोटे यांची समर्पण वृत्ती जवळून पाहिली होती. मी दुसऱ्याच क्षणी कौराजी पाटील निघोटे यांना फोन केला अन् म्हणालो..

" पाटील, जय बाबाजी, वंदे मातरम्..! उद्या आपल्याला सकाळी लवकर नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती आणायला जायचे आहे. तुम्हाला यायला जमेल का..?"

माननीय कौराजी पाटील निघोटे यांनी लगेच होकार दिला अन् सांगितले की,

" गुरुजी, तुम्हीं या,मी जळगाव फाटा फाट्यावर सकाळी येऊंन थांबतो..!"

(स्थानिक परिसरात याला लाडमसरी / लाडले अन्सारी फाटा देखील म्हणतात.) 

सहजवृत्तीने, सहकार्यवृत्तीने चांगल्या कार्यासाठी कौराजी पाटील निघोटे यांनी प्रवासासाठी होकार दिला होता. सकाळी सहा वाजता नियोजित ठिकाणी यावे असे ठरले.मी लगेच माझ्या बालमित्राला फोन करून पुढील नियोजन सांगितले.


मी पहाटे ५:३० वाजता लासूर स्टेशन येथून निघून जळगाव फाट्यावर पहाटे ५:४५ ला पोहोचलो. कौराजी पाटील निघोटे अगोदरच येऊन बसलेले होते.पालखेड ( शेड फाटा ) फाट्याहुन जिवलग बालमित्र डॉ.संजू राऊत व जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी यांच्या सोबत पुढील प्रवासाला चार चाकी वाहनात निघालो. माझी दुचाकी पालखेड फाट्यावर एका दुकानासमोर उभी करून दिली होती.


नाशिक येथे कानिफनाथ महाराज यांची मूर्ती घेतली.याकामी कौराजी पाटील निघोटे यांचा अनुभव कामी आला होता. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.आम्ही हॉटेल मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली,मात्र कौराजी पाटील निघोटे म्हणाले की,

" गुरुजी, आपण इथून जवळच असलेल्या बाबाजी आश्रमात जाऊ,दर्शन घेऊ अन् तिथंच आश्रमातील जेवण करू..!"

आम्ही होकार देऊन आश्रमात जाऊन दर्शन घेऊन,मस्तपैकी वरण पालक भाजी,बाजरीच्या भाकरी सोबत काला कुस्करून पोटभरून जेवण केले.ही भोजन व्यवस्था फक्त आणि फक्त कौराजी पाटील निघोटे यांच्या , आश्रमातील परिचयामूळेच शक्य झाली होती.भक्तीचा,दर्शनाचा अन् जेवणाच्या तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


माननीय कौराजी पाटील निघोटे अतिशय कडक शिस्तीच्या स्वभावाचे व्यक्तिमत्व..! आम्ही ज्यावेळी हडस पिंपळगाव येथे शिक्षक म्हणून सेवा करत होतो तेंव्हा आम्हा सर्व शिक्षकांना सकारात्मक कार्यासाठी नेहमी पाठिंबा देत होते.आदरणीय कौराजी पाटील निघोटे हे तत्त्वनिष्ठ,स्वाभिमानी अन् वेळ प्रसंगी लवचिक अन् शिस्तीचे पाईक म्हणून देखील मला खूप भावलेले आहेत.शाळेत काही पाल्यांच्या तक्रारी आल्यावर जबाबदार व्यक्ती म्हणून त्या बाबी कौराजी पाटील निघोटे यांच्या कानावर घातल्या जात असायच्या.त्या त्या प्रत्येकवेळी कौराजी पाटील यांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी अन् शिक्षकांसाठी स्वीकारलेल्या संरक्षणवृत्तीचे, समाजहिताचे वेळ प्रसंगी कठोर शिस्तीचे धोरण स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी अंगिकारले होते. वेळ प्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांना योग्य त्या शब्दात समजावून सांगून शाळेच्या हितासाठी केलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद अन् अभिमानास्पद होते. आजकाल इथून तिथून अशी निर्भीड, तत्त्वनिष्ठ वेळ प्रसंगी कठोर, लवचिक समाजहितासाठी कार्य करणारी सार्वजनिक आयुष्यातील पिढी अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. शाळेत ,विद्यार्थ्यांची, कोणतीही समस्या निर्माण झाली तर माननीय कौराजी पाटील निघोटे सर्वात पुढे येऊन यातून सहजसुंदर मार्ग काढायचे.चांगल्या कामासाठी शिक्षकांना नेहमी पाठबळ देत होते. त्यांच्या सरपंच कार्यकाळात आणि सरपंच पदावर नसल्यावर सुध्दा ,शिक्षकांसाठी खूप मोठा मानसिक आधार माननीय कौराजी पाटील निघोटे यांचा होता.


प्रस्तुत फोटो स्थळ : पंचवटी नाशिक. 


सोबत : माझे प्रिय बालमित्र डॉ.गणेश वाणी व डॉ.संजय राऊत.तसेच सोबत हडस पिंपळगाव,ता.वैजापूर येथील माजी सरपंच आदरणीय कौराजी पाटील निघोटे.


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

भेट दि.३/४/२०१६ रविवार 

बुधवार, १ एप्रिल, २०२६

नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏




 




#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏

=====================

माझ्या शिक्षकी आयुष्यात लासुरगाव ता.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगरचे एक विशिष्ट स्थान आहे.माझ्या शिक्षकी आयुष्याचा प्रारंभ याचं लासुरगाव केंद्रांतर्गत झाला.आयुष्यातले पहिले काहीही असले की, ते पहिलं हृदयाच्या कोपऱ्यात सदैव जपलेले असते.त्या पहिल्याला आणि त्या पहिल्याच्या सानिध्यातील घटनांना हृदयाच्या कोपऱ्यात सदैव जपल्या जाते.अर्थात हे सर्वांना शक्य होत नाही. जवळ जवळ दीड तप आयुष्याचा कालखंड लासुरगाव आणि केंद्रांतर्गत विविध गावांच्या सेवेत गेला. आयुष्याच्या या प्रवासात बरीच मित्रमंडळी लाभली.त्यात वयोगटाचे अन् गप्पांच्या विषयांचे बंधन कधीच आले नाही.जेष्ठ , कनिष्ठ अन् सम वयस्क अशा सर्व वयानां आपलंस करत करत आयुष्य व्यतीत झाले. 

आयुष्याच्या प्रवासात याचं लासुरगाव मधील एक व्यक्तिमत्व परिचित झाले.वास्तविक त्यांचा अन् माझा , लासुरगावातील इतर माझ्या काही जेष्ठ , कनिष्ठ अन् सम वयस्क मित्रांसारखा  अनौपचारिक संबंध आला नाही.मात्र एक व्रतस्थ, धार्मिक अन् आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी भटकंती केलेल्या सदवृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून सदरील सद्गृहस्थ मला कमालीचे भावले. त्याचं नाव आहे आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार..!

आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार..!

आई नर्मदेला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र अन् श्रद्धेचे स्थान आहे.हिंदू धर्म मुळातच मूलतः निसर्गपूजक आहे.पंचमहाभूतांचे पूजन, निसर्गातील नैसर्गिक स्थळांना कृतज्ञतेची भावना ठेवून त्यांचे पूजन करणे अन् त्या अनुषंगाने विविध सण उत्सव परंपरा निर्माण झाल्या. त्याचं निसर्गाच्या अफाट शक्तीला वंदन म्हणून आई नर्मदेचे पूजन अन् कृतज्ञतेची भावना म्हणून आई नर्मदेची परिक्रमा याला हिंदू धर्मात अतिशय पवित्र स्थान  आहे.कित्येक भाविक आई नर्मदेची पायी परिक्रमा करतात.आई नर्मदेची पायी परिक्रमा करणे वाटते तेवढे सोपे नाही.अत्यंत शारीरिक त्रास, संयम अन् त्यागी वृत्ती इत्यादी मूल्यांना अंगिकारून नर्मदा परिक्रमा साध्य होते.आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार यांनी आता पर्यंत आई नर्मदेची तब्बल नऊ वेळा पायी परिक्रमा केली आहे.यापुढेही हा श्रद्धेय क्रम सुरु राहणार आहे यावर उत्तम भाऊ पाटील कारभार ठाम आहेत.

ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी उत्तम भाऊ आपल्या नर्मदा परिक्रमातील प्रवासात होते.संपर्काचे ऑनलाईन साधन जवळ नसल्याने नोटबंदी झाली आहे हे त्यावेळी त्यांना समजले नाही.जवळ पाचशे रुपयांच्या नोटा होत्या.त्याचवेळी नर्मदा परिक्रमा सुरू असताना त्या पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, व्यवहारात न चालल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली होती.उत्तम भाऊंचे व्यवहारीक आयुष्य पूर्णतः थांबले होते. आयुष्य ठप्प झाल्यासारखे झाले होते. मात्र अनोळखी प्रदेशात, अनोळखी रस्त्यावर,  अनोळखी व्यक्तीने त्यांची ही समस्या ऐकल्यावर त्या पाचशे रुपयाच्या नोटांच्या बदल्यात त्याच मूल्यांची व्यवहारातील रक्कम दिली होती. ही आठवण ज्यावेळी उत्तम भाऊ आजही आठवणीने सांगतात त्यावेळी सहेतुक कार्याच्या वेळी, एखादे चांगले मन एखाद्या समस्येत असेल तर कुणीतरी येतो अन् आपल्याला मदत करतो ही प्रत्यक्षात घडलेली भावना सुखावून जाते.जो मदत करतो तो विठ्ठल ही श्रद्धेय भावना सहज पटते. उत्तम भाऊंनी तब्बल नऊ वेळा पायी परिक्रमा केली आहे.प्रत्येक परिक्रमेततील आठवणी भिन्न भिन्न आहेत.एका वेळी नर्मदा परिक्रमेत प्रणवगिरीजी नावाचे साधू यांचा पायी प्रवासात सहवास लाभला. नर्मदा परिक्रमा मार्गावरील दीर्घायुष्य लाभलेले वैकुंठवासी सीयाराम महाराजांच्या आश्रमापासून प्रणवगिरी यांचा पायी प्रवासात सहवास लाभला होता.प्रणवगिरीजी स्वतः MBBS MD होते, मात्र वैराग्य प्राप्त करून अध्यात्म स्वीकारले होते. पुढील आयुष्यातील प्रवासात प्रणवगिरीजी यांची भेट कधी झालीच नाही.काही भेटी एकदाच अन् चिरकाल स्मरणात राहणाऱ्या ठरतात.त्याचे हे एक उदाहरण होय.जेंव्हा उत्तम भाऊ त्यावेळी नर्मदा परिक्रमा आटोपून आपल्या भागात आले होते त्यावेळी ज्ञानानंद महाराजांच्या मार्फत त्यांना असे समजले की, प्रणवगिरीजी हे त्यागी अन् उच्च विद्या विभूषित आहेत.त्याचे सानिध्य सहसा लाभत नाही.सतत अध्यात्मिक प्रवासात असतात.ज्ञानानंद महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ सर होय. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली गुंजाळ सर यांनी संन्यास घेऊन आपलं पुढील आयुष्य प्रारंभ केले.प.पू. ज्ञानानंद महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे आदरणीय ज्ञानेश्वर गुंजाळ सर अन् मी हडस पिंपळगाव ता. वैजापूर येथे  शिक्षक म्हणून सोबत कार्यरत होतो.

आदरणीय उत्तम भाऊ पाटील कारभार यांनी तब्बल नऊ वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.मात्र कुठेही बडेजाव केला नाही. आई नर्मदेच्या परिक्रमेला निघताना ग्राम दैवत आई दाक्षायनीचे मनोभावे दर्शन घेऊन निघायचे आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावी परत आल्यावर प्रथमतः आई दाक्षायनीचे मनोभावे दर्शन घ्यायचे हा श्रद्धेय क्रम तब्बल नऊ वेळच्या नर्मदा परिक्रमा प्रवासापासून सुरू आहे.

मला आजच्या भेटीत आदरणीय उत्तम भाऊंचे सानिध्य प्राप्त झाले. माझा अत्यंत आवडता विद्यार्थी गणेश नानासाहेब पाटील गाजरे  याने आमचे  सोबतचे फोटो काढले.फोटो काढताना गणेश आम्हाला म्हणाला – 
 " थोडेसे smile करा " 
यावर उत्तम भाऊ लगेच म्हणाले..
" जे प्रपंचात आहेत ते कुणीच मनापासून हसत नसते."
यावर मीही लगेच म्हणालो..
" जगासाठी हसावं लागतं. जरी यदा कदाचित कुणी हसलं तर काही वेळाने पुन्हा प्रापंचिक जबाबदाऱ्या ते हसू कमी करत असते..!"

असा शाब्दिक विनोदी प्रपंच होऊन मी आदरणीय उत्तम भाऊंचे मनोभावे दर्शन घेऊन माझ्या पुढील प्रवासाला निघून गेलो.

नर्मदे हर हर..!🙏🕉️🙏

वंदे मातरम् 

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक : १/४/२०२६,बुधवार