शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३
देवभूमी 🕉️ भाग क्रमांक ६
रविवार, २४ सप्टेंबर, २०२३
ऋण, मुलींचे..!
मला प्रवासात भेटलेली माणसं.©️
ऋण, मुलींचे..!
==================================
काही मुलींचे ऋण आयुष्यात उतरवणं या जन्मी तरी शक्य नाही. माया अन् निस्सीम निरागसता याचे सर्वात पवित्र नाते या जन्मी मला लाभले.
मी जेंव्हा एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत सेवेत होतो, तेंव्हा अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले. दरवर्षी तिथली लक्ष्मी मातेची जत्रा असायची.मुली आदल्या दिवशीच मला मायेनं मात्र कडक शब्दात सांगायच्या...
' सर, उद्या आमच्या गावची जत्रा आहे.उद्या जेवणाचा डबा आणू नका बरं का..! जर आणला तर पहा मग..!!आपण मस्तपैकी जत्रातून आणून खाऊ, खाऊ."
होकार देण्याशिवाय पर्याय नसायचा, कारण काहींना अन् काही आग्रहाला नकार देणं म्हणजे पाप असं माझे वैयक्तिक मत आहे. मुली या नियतीने भूतलावर पाठवलेल्या देव कन्या असतात, या मताचा मी..! त्यामुळं नकार देऊन कशाला आपण देवाला दुखवायचे..? यामुळे निमुटपणे जत्राच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र बसून मनसोक्तपणे खाऊ खायचो. जेंव्हा नियतीने भावना अन् माया यांचं एकत्रित नातं निर्माण करण्याचे ठरवले असेल त्यावेळी त्याच नियतीने स्री हे नाते निर्माण केले.त्याच स्री चा सुंदर अन् पवित्र आविष्कार मुलगी होय. त्यांच्या सोबत आयुष्याचे काही दिवस व्यतीत केले, करत आहे हा त्या नियतीच्या जवळ जाण्याचा पवित्र मार्ग आहे असे मला वाटते.
आयुष्यात काही विद्यार्थिनी खूपच आपुलकीच्या भेटल्या. एकलहेरा ता. गंगापूर येथे त्यावेळी इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेली गायत्री दीदी सुदाम भाऊ औसरमल नावाची एक अतिशय सुसंस्कारित कन्या देखील भेटली.तिच्या घरी काहीही गोड धोड पदार्थ तयार केला की, एका डब्यात घालून तो गोड पदार्थ हमखास शाळेत घेऊन यायचीच. तो गोड गोड पदार्थ म्हणजे एक प्रकारे नियतीने तिच्या देव कन्या मार्फत दिलेला प्रसाद समजूनच खावा लागायचा. तिथं नकार नसायचा..! असायचा फक्त आणि फक्त भावपूर्ण अन् श्रद्धायुक्त होकार..! इतरही सर्व विद्यार्थिनी खूपच मायाळू होत्या, पण गायत्री दीदीच्या मायाळू स्वभावात मला माझ्या स्व.आईचा आग्रह, माया अन् निरपेक्ष वृत्ती जाणवायची. याच अशा अनेकानेक आशीर्वादामुळे आयुष्यात, आयुष्याच्या सोबत जगावेसे वाटले , वाटते अन् वाटत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
इ.स. जून १९९५ मध्ये जळगाव, ता. वैजापूर येथे शिक्षक म्हणून सेवेत असताना, ऐन पावसाळ्यात माझी दुचाकी गावापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतर अलीकडेच लावावी लागत असे. पुढील रस्ता अतिशय चिखलाचा असल्याने पुढे गाडी घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. मी पुढे पायी जायचो.बिब्बण भाई यांच्या वस्तीच्या अलीकडे रस्त्यावरच माझी दुचाकी लावत असायचो.त्यावर एक कव्हर टाकून मी पुढे शाळेत जायचो. गाडीवरील कव्हर जरी यदा कदाचित उडून गेले तरी भाडाईत पाटील वस्तीवरील शाळेत इयत्ता सातवी मध्ये येणाऱ्या मुली ते कव्हर पुन्हा गाडीवर टाकून द्यायच्या. त्या मुलींनी अतिशय निर्विकार मनाने हे काम केले होते. वास्तविक त्या मुलींना मी स्वतः सांगितलेले नव्हते की, तुम्ही असे काम करा म्हणून..! पण कौटुंबिक संस्कार अन् जाणीव यामुळे त्या मुलींकडून असे कार्य होत होते.आता त्या सर्व कन्या आपापल्या सुखी संसारात सुखी आहेत.याचं आत्मीयतेने हडस पिंपळगाव, सोनवाडी, ता. वैजापूर येथील अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले अन् अंधारी येथील मुलींचे आशीर्वाद लाभत आहे. मुलींकडून मिळालेले आशीर्वाद हेच संजीवन, कारण त्यात माया असते.
काही आठवणी आपल्यातील माणूस अजूनही जिवंत आहे याची जाणीव करून देऊन माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र देतात हेच खरं..! माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात अनेक विद्यार्थी भेटले, मात्र त्या सर्वांमध्ये माझ्या स्व. आईची माया जाणवली ती फक्त मुलींमध्ये..! नियतीने माणसाच्या आयुष्यात जे काही भाव बंधने निर्माण केलीत, त्यापैकी अतिशय पवित्र भाव बंधने मुलींमध्ये निर्माण केली आहेत.पुरुष अनेकवेळा उद्दामपणा दाखवून आपलं पुरुषत्व वेळोवेळी सिद्ध करत असतो,मात्र स्री आपल्यातील भावना व्यक्तपणे तर कधी अव्यक्तपणे व्यक्त करून त्याच नियतीने तिला निर्माण केल्याचं सार्थ आयुष्य स्वतः जगत असते.
माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलींच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी बोलणाऱ्या अन् वर्तन करणाऱ्या एकमेव शिक्षिका भगिनी भेटल्या. त्याचं नाव आदरणीय पंचशीला जाधव मॅडम..! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता . गंगापूर येथे त्या मुख्याध्यापिका होत्या. याविषयी आम्ही सोबत कार्यरत असताना मी, आदरणीय जाधव मॅडमशी बोललो होतो अन् त्यांना याबद्दल विनम्र वंदन देखील केले होते. आदरणीय जाधव मॅडम मुलींशी एकरूप होऊन त्यांच्याशी एक आई म्हणून वर्तन करायच्या. आज शाळेतील शिक्षिका भगिनींपैकी कितीजणी पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलीच्या मैत्रिणी आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मुलींना त्यांच्या समस्या इत्यादी बाबी व्यक्त करताना सामाजिक समस्या जाणवत असते. माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात भेटलेल्या या संदर्भातील अनुभवावर आधारित लिहावं वाटते,पण सामाजिक मर्यादा जाणून स्वतः च्या लेखणीला थांबून अव्यक्त राहतो. या अनुभवात, मुलींच्या समस्येत, भावनिक अडचणीत मला भेटलेली अन् भेटत असलेली मुलगी , माझी स्व. आई म्हणून भेटली अन् माझ्याजवळ व्यक्त झाली एवढं त्यात पावित्र्य होते हे बाबा केदारनाथाच्या पावित्र्या सारखं पवित्र सत्य..! सामाजिक बंधनामुळे मी त्यावर जास्त काही लिहीत नाही .मुली कुणाच्याही जवळ आपल्या समस्या व्यक्त करत नसतात. त्यांना ज्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते तिथेच त्या आपल्या समस्या व्यक्त करत असतात हा माझा स्वानुभव आहे. पुरुष आपल्या समस्या भावना उथळपणे व्यक्त करून मोकळा होत असतो,पण स्री आपल्या समस्या अन् भावना तेंव्हाच अन् त्याच व्यक्तीजवळ व्यक्त करत असते, जिथं तिला समोरच्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते.ती समोरची व्यक्ती पुरुष असला तरी त्यात ती आपली आई शोधण्याचा भावूक प्रयत्न करत असते अन् समोरच्या स्री शिक्षिका मध्ये जर स्वतः ची आई जाणवली नाही तर ती अव्यक्तच राहते. मला माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात एक कन्या म्हणून अन् आपण स्वतः त्यांची आई आहोत याची जाणीव होऊन काही प्रसंगात जगायला मिळाले हे नशीबच म्हणावे.
आज याची आठवण यायचे कारण असे की, आत्ताच समजले की, आज राष्ट्रीय कन्या दिवस आहे म्हणून..! त्यामुळं यावर काहीतरी मनातून लिहावं म्हणून व्यक्त झालो.
ता.क. - वरील लेखात माझ्या बाबतीत मी व्यक्त केलेला मजकूर हा माझा आत्मगौरव आहे असे कृपया वाचकांनी समजू नये ही नम्र विनंती. आजचा दिनविशेष अन् त्या अनुषंगाने माझे अनुभव अन् आत्मविचार व्यक्त केले आहेत, बाकी काही नाही.🙏🏻
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २४/९/२०२३, रविवार.
सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३
देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ५ )
भेट..!
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
भेट..!
===================================
डॉ.जीवन राजपूत..!
जन्मगाव पालखेडच्या शिवावरचा माणूस..!
म्हणजेच बेंदवाडी, ता. वैजापूर येथील मूळचा नागरिक..!
माझ्या जन्मगावी पालखेड येथे प्राथमिक शिक्षणाच्या आयुष्याचा काही काळ व्यतीत केलेला माणूस..!
कितीही व्यस्त कार्यक्रम , रुग्णसेवा असो, दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेवाच्या यात्रेला दर्शनासाठी आवर्जून येणारा भाविक माणूस..!
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे परम आदरणीय गुरू श्री.गोमलाडू ( राजपूत ) सरांचे चिरंजीव असलेले व्यक्तिमत्त्व श्री.डॉ जीवन राजपूत (न्यूरोसर्जन)..!
डॉ. जीवन राजपूत यांनी त्यांचं नवीन अद्ययावत इमारतीत इस्पितळ जे. जे. प्लस हॉस्पिटल & NEURON international चा शुभारंभ काल दिनांक १७/९/२०२३ रोजी केला. काल मराठवाडा स्वातंत्र्य दिन असल्यामूळे शुभेच्छा देण्यासाठी जाणे शक्य झाले नाही. मात्र आज आवर्जून सपत्नीक गेलो.
सदरील अद्ययावत इस्पितळात गेल्यावर एक विचार मनात येत होता. परम आदरणीय गुरू श्री.गोमलाडू ( राजपूत ) सर यांची भेट व्हायला हवी होती. पण सर घरीच असतील. सरांची खूप दिवस झाले भेट नाही.मागे एकदा इ. स.२०१७ मध्ये भेट झाली होती.त्यावर मी माझ्या ब्लॉगवर लिहिलं आहे.
अचानक आदरणीय गोमलाडू सर मला लिफ्ट मधून येताना दिसले.धावत सरांकडे गेलो.आदरणीय गोमलाडू सरांच्या पायी मस्तक टेकवलं..! कोण आहे म्हणून सरांनी बघितले, माझ्या खांद्याला धरून मला उभे केले.माझ्या दोन्ही गालांना धरून सरांच्या मुखातून शब्द बाहेर पडले..
" अरे नंदू, खूप दिवसांनी भेटला रे..! कुणी पेशंट ॲडमीट आहे का..? ये इकडे ये..बाजूला..!
मी म्हणालो - " सर, काल जीवन भाऊंनी नवीन इमारतीत अद्ययावत हॉस्पिटल सुरू केले.मला कालच शुभेच्छा द्यायला यायचे होते,पण काल १७ सप्टेंबर निमित्त ध्वजारोहण असल्यामूळे येऊ शकलो नाही.म्हणून आज आलो आहे..!"
आदरणीय गोमलाडू सर माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांचे मित्र होते.विशेष म्हणजे माझे वडील अन् गोमलाडू सर दोघेही कमालीचे स्वयंशिस्तीचे..! मोडेन पण वाकणार नाही या विचारसरणीचे..! आदरणीय गोमलाडू सर वयोमानानुसार आता काहीसे थकले आहेत. गप्पा झाल्यावर डॉ. जीवन राजपूत यांच्या कक्षात गेलो. गावाकडचा माणूस भेटला की , कोणताही माणूस गावाकडच्या अनौपचारिक भाषेत बोलतो.तो प्रत्यत आमच्या भेटीत एकमेकांना आला.
गप्पा आटोपल्यावर डॉ. जीवन राजपूत यांना नवीन इमारतीत अद्ययावत इस्पितळ जे. जे. प्लस हॉस्पिटल & NEURON international सुरु केल्याबद्दल अभिनंदन अन् पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..!🌹
डॉ. जीवन राजपूत यांना एक छानसा पेन सप्रेम भेट म्हणून दिला. भेट म्हणून दिलेला पेन बघून डॉ. जीवन राजपूत यांना अतिशय आनंद झाला.त्यावर म्हणाले...
" सर, खूप छान वस्तू भेट दिली. आता लगेच त्याचा उपयोग पेशंटला औषधी लिहून देण्यासाठी सुरू करतो आणि जवळच ठेवतो..!"
गप्पा झाल्यावर मी प्रेमाने " वंदे मातरम्..!" म्हणून निरोप घेतला.प्रत्युत्तर दाखल डॉ.जीवन राजपूत यांनी देखील " वंदे मातरम् सर..!" म्हणून निरोप दिला..!
सदरील अद्ययावत इस्पितळ पत्ता - जे.जे. हॉस्पिटल जिल्हा न्यायालयासमोर जालना रोड बाबा पेट्रोल, छत्रपती संभाजीनगर ( महाराष्ट्र)
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १८/९/२०२३,सोमवार.
सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३
देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ४)
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ३)
मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ३)
===================================
हरिद्वारहून सकाळी नऊ वाजता निघाल्यापासून ते थेट दुपारी बारा वाजेपर्यंत आमचा बस प्रवास सुरूच होता.दुपारी उंचच उंच असणाऱ्या पर्वत रांगातील घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवणं आटोपली होती. साधारणतः अर्धा तास थांबून आमचा बस प्रवास पुन्हा सुरू झाला होता. आमची बस संध्याकाळी पाच वाजता सोनप्रयाग येथे पोहोचणार होती. मात्र हे वेळापत्रक रस्त्यावरील ट्रॅफिक जाम अन् इतर काही नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती जर आली तर पोहोचण्याचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडून पडणार होते.
केदारनाथ बद्रीनाथ रस्त्यावरील प्रवासात सर्वात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. त्याचं कारण रस्त्याच्या रुंदीकरणाला असणारी मर्यादा अन् आहे त्या रस्त्यावर एकमेकांना समजून घेत वाट मोकळी करून देणारे विविध वाहनांचे चालक..! मला या प्रवासात एक खूप चांगला अनुभव हा आला की, चार चाकी वाहन चालक अजिबात कट न मारता आपली वाहने चालवत होती.विशेषत: समोरून जर एखादे चार चाकी वाहन आले तर सामंजस्याची भूमिका घेऊन कोणत्यातरी वाहनाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणे होय. माणसाच्या आयुष्यात उपलब्धता कमी असली की, तो आहे त्या परिस्थितीत समजूतदार होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण होते. याच्या उलट आपल्या इतर मैदानी प्रदेशात रस्त्याच्या मार्गांची उपलब्धता भरपूर किंवा बऱ्यापैकी मोकळी असते.एवढे असूनही आपल्या परिसरात चालक समोरच्या वाहनाला कट मारण्यात ड्रायव्हर कुळातील काहीजण पुरुषार्थ समजतात..! अर्थात याला जे अपवाद आहेत ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
पर्वतीय प्रदेशातील घाट रस्त्यावरून प्रवास करत असताना ज्याचा प्रवाश्यांना नेहमी मानसिक अन् शारीरिक त्रास होतो तो म्हणजे ट्रॅफिक जाम मध्ये अडकणे होय.त्या मानसिक अवस्थेत आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. हवेत खूप गारवा जाणवत होता.आता आपण हिमालयाच्या भौगोलिक वातावरणात आलो आहोत याची थंडगार हवेच्या स्पर्शाने जाणीव व्हायला लागली होती. स्पर्श हा बोलका असतो, याची जाणीव हिमालयाच्या थंडगार हवेच्या स्पर्शाने झाली होती. बस मध्ये बसून बसून पाय एकसारखे राहिल्यामुळे काहीसे अवघडून गेले होते.साधारणतः एक तास आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती.अखेर ट्रॅफिक जाम हळूहळू सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती. आमच्या बसचा पुढील प्रवास सुरू झाल्याने मनात खूप हायसे वाटले होते.
आकाशात काळ्याशार ढगांची गर्दी दिसू लागली होती. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत अडकत आमचा बस प्रवास सुरू होता.अखेर सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुर पार्किंग येथे आमची बस रात्री ८:३० वाजता पोहोचली होती.पाऊस सुरू झाला होता.थंडगार वारा, त्यात पावसाचे थंडगार थेंब यामुळं शरीर अजून गारठून जायला लागले होते. वास्तविक आमची बस सोनप्रयाग पर्यंत जाणार होती.आमचा शेवटचा थांबा तोच होता,परंतु पुढे प्रचंड गर्दी असल्यामुळे सर्व वाहने सीतापुर येथच थांबवली जात होती. उतरल्यावर सोबतच्या सर्वांना आवश्यक त्या सूचना अन् चालण्याचा क्रम ठरवून दिला होता. अंधार पडला होता.मी सर्वात पुढे हातात विजेरीचा (बॅटरी) प्रकाश सुरू करुन मार्गस्थ झालो होतो. उर्वरीत सर्वजण क्रमाने येत होते.थंडी, पावसाचे थंडगार थेंब अन् वाहनांच्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही सर्वजण पुढे पुढे सोनप्रयागच्या दिशेने निघालो होतो. वेगात चालणे आवश्यक होते, कारण सोनप्रयाग येथील लोखंडी पुलाच्या जवळील जीप स्थानकावरून जीपने गौरी कुंड येथे मुक्कामी पोहोचणे आवश्यक होते. रात्री दहा नंतर वर जाण्यास समस्या येऊ शकली असती. जर यदा कदाचित समस्या निर्माण झाली तर उघड्यावर कडाक्याच्या थंडीत सर्वांचीच तारांबळ झाली असती.
साधारणतः तीन किलोमीटर अंतर पायी चालत गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस मामांना गौरी कुंड येथे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विचारले.त्यांनी आमची आवश्यक ती कागदपत्रे बघितली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे का याविषयीची कागदपत्रे बघितली. तेंव्हा कुठे त्यांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. पोलिस मामांनी आवर्जून सांगितले की, लवकरात लवकर जा..! तुम्हाला अगोदरच उशीर झाला आहे. अर्थात त्यांनी हे हिंदीतून सांगितले होते.पुन्हा वेगाने पायी प्रवास सुरू केला अन् जीप स्थानकावर पोहोचलो.जीप उभीच होती.आम्ही सर्वजण त्यात बसलो अन् साधारणतः रात्री ९:१५ वाजता सोनप्रयाग येथून गौरी कुंड कडे प्रस्थान केले. सोनप्रयाग ते गौरी कुंड हा प्रवास खूपच नागमोडी वळणे घेत घेत सुरू होता. रात्रीचा अंधार असल्यामुळे बाजूच्या खोल खोल दरीतील काहीही दिसत नव्हते. दिसत होता,फक्त जीपच्या लाईटच्या प्रकाशातील समोरचा रस्ता अन् समोरून येणारी वाहने.सोनप्रयाग ते गौरी कुंड या मार्गावर फक्त जीपला प्रवास करण्यास परवानगी होती. जीप मालक बहुतांशी पहाडी क्षत्रिय राजपूत कुळातील होते. त्यांची देहबोली अन् वंदनीय योगी आदित्यनाथ यांच्या विषयी असलेली त्यांची परम श्रद्धा त्यांच्या बोलीतून जाणवत होती.
रात्री साधारणतः १० वाजता गौरी कुंड येथील जीप स्थानकावर पोहोचलो होतो.तिथून पुढे पुन्हा पायी चालत जावे लागणार होते.पुढे जीप प्रवास करण्यास परवानगी नव्हती.आम्ही पुन्हा त्याच नियोजित क्रमनुसार चालते झालो होतो.आता थंडीचा कडाका भयंकर जाणवायला लागला होता. गौरी कुंड येथील एका अरुंद गल्लीच्या गर्दीतून आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो होतो.रात्रीचे साधारणतः १०:३० वाजले होते.अधून मधून पावसाचे अतिशय थंडगार थेंब पडत होते.रात्रीचे जेवणं मुक्कामाच्या ठिकाणीच उरकून घेतली.पाणी पिल्या जात नव्हते. अतिशय थंडगार पाणी होते.
जेवणं आटोपली होती. दिवसभराचा प्रवास अन् त्यातून शारीरिक एकच स्थिती त्यामुळं अंग कडक झाल्यासारखे जाणवत होते.रात्रीचे अकरा वाजले होते.उद्या पहाटे चार वाजता उठायचे असे नियोजित झाले होते.
गौरी कुंड येथे आपण महादेवाच्या घरी वास्तव्य करत आहोत हा सुखद अन् श्रद्धेय अनुभव घेत घेत शरीर अंथरुणावर टाकून दिले अन् आस लागली होती, उद्याची..! उद्या आपण आयुष्याचे चिरंतन सत्य असलेल्या मृत्यूच्या इष्टला म्हणजेच महादेवाला भेटायला जाणार आहोत याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.स्मशानातील सत्य अन् त्याच शाश्वत सत्याचा स्वामी केदारनाथ महादेव याची कधी भेट होईल अन् कधी नाही याची श्रद्धेय आतुरता लागली होती. झोपेपूर्वी मी, माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलांनी जन्मभूमी पालखेड येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव अन् संत जनार्दन स्वामी महाराज यांचा मनोभावे श्रद्धेने जयजयकार केला अन् झोपी गेलो..!
वंदे मातरम्
हर हर महादेव..!🙏🏻🕉️👌
एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ४ /९ /२०२३, श्रावण मास, तिसरा सोमवार.
शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३
समजूतदारपणा की न्यूनगंड..?
मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
समजूतदारपणा की न्यूनगंड..?
===================================
मी आज सकाळी दिनांक १/९/२०२३, शुक्रवार रोजी वर्गात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली होती.हजेरी घेऊन झाल्यावर अध्ययन अध्यापन आटोपले होते.मी वर्गाच्या बाहेर पडणार इतक्यात वर्गातील विद्यार्थ्यांमधून एकाचा कुणाचा तरी आवाज आला..
" सर, आज पवनचा वाढदिवस आहे...!"
हे वाक्य कानी पडताच मी, वर्गातील शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या पवन कडे बघू लागलो. मी पवन यास म्हणालो की,
" का रे बेटा पवन, सकाळी परिपाठाच्या वेळी का बरं नाही सांगितले की, माझा वाढदिवस आहे म्हणून.! आपण त्याचवेळी तुझे अभिनंदन केले असते ना..!"
शाळेतील परंपरेनुसार ज्यांचा वाढदिवस असतो, त्यास परिपाठाच्या वेळी शुभेच्छा देण्याचा रीतिरिवाज असल्याने मी तसे बोललो.
यावर पवन काहीही बोलला नाही.मला वाटलं आजारी आहे की काय म्हणून मी त्यास पुन्हा विचारले की, " का रे का बरं नाही सांगितले..?" तो थोडासा उदास दिसत होता.
शेवटी वर्गाचा वर्गप्रमुख अनिकेत गोरे मला म्हणाला...
" सर, मुलांना वाटण्यासाठी त्याच्याकडे चॉकलेट नव्हते, म्हणून त्याने आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून सांगितले नाही..!"
हे ऐकून मन गहिवरून आलं. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांच्या जाणीवा जागृत ठेवून आपला आनंद झाकून ठेवणारी देखील मुलं असतात हे मी प्रत्यक्ष बघत होतो. बहुतांशी आर्थिदृष्ट्या गरीब विद्यार्थी आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कमालीची समजूतदार झालेली असतात याची जाणीव झाली होती. आपल्या पालकांची परिस्थिती अन् त्यानुसार निर्णय घेणारी अशी कित्येक मुले आहेत. पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अन् त्यातून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने घेतलेला निर्णय बघून मला खूप गहिवरून आले होते. त्याचा हा समंजसपणा होता की न्यूनगंडाची भावना..? या विचारता मी पडलो होतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर असे जाणवले की,आपल्या अवतीभोवती असणारा मानवी घटक आपापल्या आर्थिक परिस्थिती नुसार उपक्रमाचा आनंद घेत आहे.मात्र माझी परिस्थिती तसा आनंद घ्यायला मला परवानगी देत नाही.त्यामुळं मी माझा आनंद असाच गुदमरून टाकणार. तो आनंद काहीतरी वस्तू आनंदाने कुणाला तरी देऊन साजरा करणार तर नाहीच,पण तो आनंद व्यक्त सुध्दा करणार नाही या मानसिक अवस्थेत असे कित्येक विद्यार्थी आपलं आयुष्य जगत आहेत. हा मनोभाव अशा कित्येक सर्व सामान्य परिस्थिती मधील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात येत असणार. पवन त्या समस्त विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत होता.
माझ्या नजरेसमोर लगेच शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले चॉकलेट अन् ते दृश्य आले. ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटले होते त्याचे कारण एकतर त्यांच्या घरच्यांनी त्यासाठी पैसे दिले होते किंवा मुलांनी हट्ट करून ते आणले होते. त्यामुळे त्यांना चॉकलेट वाटप करणे शक्य झाले होते.मात्र पवनची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कदाचित त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी इच्छा असूनही चॉकलेट वाटप करणे शक्य झाले नव्हते.
ज्यावेळी शाळेतील काही विद्यार्थी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपला जन्मदिन साजरा करतात, त्याचवेळी त्याच शाळेत असाही एक मानवी घटक असतो, जो हे असे आर्थिक भुर्दंड बसणारे उपक्रम साजरे करू शकत नाही. विशेषतः सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात त्या शाळेतील काही शिक्षक देखील दणक्यात वाढदिवस साजरा करत असलेली आपण बघत असतो. नव्हे नव्हे ती एक परंपरा बनू पाहत आहे. आपण ज्या सामाजिक अन् भौतिक परिसरात वावरत असतो, तिथल्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीनुसार निर्णय घेणारी पिढी हरवत चालली आहे का..? हा उथळ चंगळवाद आहे का..? त्याचवेळी त्याच भौतिक परिसरात विद्यार्थ्यांचा असाही एक गट असतो, जो की हे असे खर्चिक उपक्रम तो साजरे करू शकत नाही.तो विद्यार्थी अशा खर्चिक उपक्रमाच्या प्रसंगी स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण करून मानसिकदृष्ट्या औदासीन्य अवस्थेत जात असतो.ज्या शाळेत मूळात आर्थिक संपन्न किंवा मध्यमवर्गीय पालकांची पाल्ये शिकत असतात तिथल्या विद्यार्थ्यांत अशी मानसिक औदासीन्य असलेली वृती दिसून येणार नाही,कारण तिथल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या नसल्यात जमा असतात.मात्र याउलट सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात तिथं मात्र याचा विरोधाभास दिसून येत असतो.
शिक्षक - शिक्षिका यांनी देखील सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या मुलांच्या समोर स्वतःचा भंपक म्हणून मिरविणारे खर्चिक वाढदिवस साजरे करू नये. तरच शाळेच्या कोपऱ्यातील नाजूक अन् परिस्थितीने गांजलेले निरागस मन सृजनशील होऊन त्यांच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे असे काही शिक्षक अन् शिक्षिका माझ्या पाहण्यात आलेले आहेत, ज्यांनी त्यांचा जन्मदिन शाळेत धुमधडाक्यात साजरा केलेला आहे. ज्यांची वाढदिवस साजरा करण्याची क्षमता नाही,अशा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आर्थिक, सामाजिक दुर्बल निरागस मनांना / विद्यार्थांना अशावेळी काय वाटले असेल..?
माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी सेवेत अद्याप पर्यंत तरी विद्यार्थ्यांच्या समोर भंपक वाढदिवस साजरा केलेला नाही. नव्हे नव्हे मी शाळेत माझा वाढदिवस साजरा केलेलाच नाही. याचा एकच प्रांजळ हेतू असा की, आपल्या अवतीभोवती असलेले निरागस अन् आर्थिक , सामाजिक परिस्थितीने रंजलेले गांजलेले बालमन न्यूनगंड अवस्थेत जाऊ नये. यात मी माझा मोठेपणा मिरवत आहे असे कृपया कुणीही समजू नये ही नम्र अपेक्षा.🙏
ता.क. - वरील लेखातील मत माझे वैयक्तिक आहे.कृपया कुणीही वैयक्तिक घेऊ नये ही नम्र अपेक्षा..!🙏🏻
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १ सप्टेंबर २०२३, शुक्रवार, शुभ रात्री.
















