शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

देवभूमी 🕉️ भाग क्रमांक ६





 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ६ )

===================================

केदारनाथ घाटी चढताना आता जास्तच प्रमाणात पायात थकवा जाणवायला लागला होता.आम्ही दिनांक २० मे २०२३, शनिवारी पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेली पायी तीर्थयात्रा रामबाडा येथे सकाळी अकरा वाजता पोहोचली होती. तिथून पुन्हा सव्वा अकरा वाजता निघून पुढील प्रवास सुरू केला होता. पायी प्रवासातील भयंकर चढाई अन् त्यात अतिशय थंड हवामान, यामुळं चालताना वेग मंदावला होता. आमचा धाकटा चिरंजीव नयनचे चालणे मात्र त्याच जोशात होते, जे की पहाटे पाच वाजता सुरू केले होते.सकाळच्या सव्वा अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या प्रवासात कमी रुंदीच्या अन् दगडाचे पक्के कच्चे बांधकाम असलेल्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या , घोड्यांच्या धक्क्यांनी आम्ही अधून मधून स्वतः ला वाचवत चाललो होतो.तरी देखील एखादा पायी प्रवासी म्हणा किंवा घोड्यावरील प्रवासी, यांचा धक्का बसतच होता.त्यातल्या त्यात घोड्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या बुटांचा धक्का बसतच होता. पडून गेलेल्या पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावर चिखल झाला होता. तो चिखल मातीचा नव्हता, तर येणाऱ्या जाणाऱ्या घोड्यांच्या विष्ठेमुळे झाला होता.बऱ्याचदा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या घोड्यांच्या पायांच्या दबाई मूळे तो चिखल आमच्या पँटवर, कपड्यांवर उडू लागला होता. अधून मधून त्याच रस्त्यावर तो चिखल एका बाजूला ओढून रस्ता सुरळीत करणारे स्वच्छता कामगार आढळून येत होते.

आता दुपारचे एक वाजले होते.पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या शरीरात थकवा अन् त्यातल्या त्यात घशाला कोरड पडली होती. पाणी पिण्या ऐवजी लस्सी पिऊ असे सर्वानुमते ठरले.पावसाची बुरबुर सुरू झाली होती. नंतर पुन्हा ती बुरबुर बंद झाली. भयंकर थंडी जाणवायला लागली होती.रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये आम्ही थांबलो.अमुल लस्सी पिऊन झाले होते. आराम खूप करावसा वाटत होता,पण अजून ध्येय टप्प्यात आले नव्हते.अमुल लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारी सव्वा वाजता पुन्हा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी निघालो.काही अंतर गेल्यावर बर्फाचे खूप मोठे ग्लेशियर रस्त्याच्या बाजूला दिसले.त्याच बर्फाच्या ग्लेशियरचे आच्छादन पार खाली रस्त्यावर आलेले होते. तिथला रस्ता अतिशय निसरडा अन् धोकादायक होता.काठीचा आता खूप मोठा उपयोग होणार होता. त्या परिसरात काही सुरक्षा रक्षक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना धोक्याची सूचना ,मार्गदर्शन अन् मदत करत होते. आम्ही गौरी कुंड ते इथपर्यंतच्या प्रवासातील सर्वात मोठ्या धोकादायक मार्गावर आलेलो होतो. रस्त्यावर पसरलेल्या त्या बर्फाच्या ग्लेशियरवर दोन मार्ग तयार केलेले होते.एक खालून होता, तर एक मार्ग त्याच्याच बाजूला असलेल्या पण उंचावरून होता.खालच्या बर्फाच्छादित रस्त्यावर घोड्यांच्या खेचरांच्या विष्ठेमूळे चिखल होता तसेच घोडेस्वार, पालखी, पायी प्रवासी यांची खूप गर्दी होती. तर त्याच्याच बाजूला असलेल्या उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावर फक्त आणि फक्त बर्फच बर्फ होता. पायी प्रवासी कमी संख्येने दिसत होते. आम्ही सर्वानुमते उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावरून पुढे हळूहळू जाण्याचे ठरवले.सर्वात पुढे थोरला चिरंजीव नमन, त्याच्या मागे धाकटा चिरंजीव नयन, त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी मी असा क्रम चालण्याचा नक्की केला.पावलं हळूहळू टाकत टाकत त्या अतिशय निसरड्या बर्फाच्छादित रस्त्यावरून आम्ही पुढे पुढे चाललो होतो. त्याचं रस्त्यावर काहीजण येणारे जाणारे प्रवासी देखील होते,पण त्यांची संख्या मर्यादित होती.जर यदा कदाचित पायाखालचा बर्फ ठिसूळ निघाला तर आपण हमखास तिथं पडणार याची पुर्णतः जाणीव होती.नुसते पडणार नव्हतो,तर बाजूला असलेल्या खूप खोल दरीत आपला कायमचा मुक्काम होणारा ही भीती मनात होती.एक एक पाऊल टाकत टाकत त्या रस्त्याच्या शेवटी आलो. उतरणीच्या ठिकाणी बसत बसत उतरलो अन् पुढील दगडाच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.

दुपारचे दीड वाजले होते.आम्ही सर्वानुमते रस्त्याच्या कडेला असलेल्या ओलसर अन् थंडगार दगडी ओट्यावर बसलो. वरतून वय वर्ष नव्वदच्या आसपास असलेली एक वयोवृध्द स्री पायी येताना आम्हाला दिसली.तिच्या सोबत एक प्रौढ वयातील पुरुष अन् स्री होती.ते आमच्याच बाजूला येवून बसले. माझ्या बाजूला येऊन तो प्रौढ वयातील पुरुष अन् ती वयोवृध्द आजी बसली. ती प्रौढ वयातील स्री माझ्या पत्नीच्या अन् मुलांच्या बाजूला येऊन बसली होती. माझ्यातली चौकस वृत्ती जागी झाली. काही वेळ गेल्यावर त्या आजीला मी हिंदीतून विचारले..

" दादी, कहा से आये हो..?"
दादी - " अरे, भैय्या मैं राजस्थान से आई हुं | ये मेरी लडकी हैं और ये मेरे दामादजी हैं | 

मी त्या आजीच्या जावयाकडे पाहून म्हणालो - " हर हर महादेव साब..!" 
त्यांनी प्रत्युत्तर दाखल हर हर महादेव म्हंटले. यानंतर त्या आजीची मुलगी माझ्याशी अन् माझ्या पत्नीशी बोलू लागली..
" हमारी इच्छा थी की, हमारी माताजी को केदारनाथ बाबा के दर्शन करके लावू | आज वो इच्छा पुरी हो गयी | 
मी त्या आजीच्या मुलीस म्हणालो - " आपको भाई नहीं है क्या ?"
आजीची मुलगी म्हणाली - " नहीं, मैं अकेली हूं | हमारे पिताजी बहुत साल पहले गुजर गये हैं | मेरे पती इंजिनियर हैं, और हम राजस्थान के राजसमंद जिले के हैं | अभी हम राजस्थान होकर आये हैं, और साथ में मेरी माँ को लेकर आये हैं | 
मी पुन्हा त्या आजीला विचारले..
" दादी, भोलेनाथ का दर्शन हुआ क्या..? भीड थी क्या..?"
दादी - " अरे, भैय्या पूछो मत, कितनी भीड हैं | बहुत भीड हैं |
मी - " आप दर्शन के लिये कब आये थे ?"
दादी - " हम कल सुबह गौरी कुंड से निकले थे | कल रात को उपर रुके और आज फिर दर्शन कर के निकले हैं |
मी - ' गौरी कुंड से घोडे पर सवार होकर आये होंगे..?"
दादी - " काहे का घोडा..? मैं चलने को थकती नहीं बेटा..! उपर केदारनाथ बाबा के पास पहाड चढकर आने के लिये घोडा, खेचर तुम जैसे जवानो को लगता हैं, मुझे नही !
असे म्हंटल्यावर ती आजी खळखळून हसली. त्या आजीचे मनमोहक हास्य बघून माझ्या मनाला एक प्रकारची नवचेतना मिळाली होती. आपण एखाद्या बालकाच्या, तरुणीच्या किंवा स्री च्या मनमोहक हास्याच्या प्रेमात पडतो. ते हास्य पुरुषाला अजून जगायला प्रेरित करत असते. मात्र मी या वयोवृध्द आजीच्या हास्याच्या प्रेमात पडलो होतो.त्या हास्यात का कुणास ठाऊक मला माझ्या स्व. आईचं खूप मायाळू हास्य जाणवलं होतं. त्या आजीच्या हास्याने पुढील उर्वरीत खूप उंचीच्या चढणीच्या प्रवासाला आम्हा सर्वांना नवसंजीवनी मिळाली होती. जगात आईचं सुमधुर हास्य कोणत्याही लेकराला आयुष्याच्या प्रेमात पडायला मानसिक औषध म्हणून कित्येक पिढ्यानपिढ्या उपयोगी पडत आलेलं आहे हा विचार माझ्या मनात येऊन गेला.माझ्या स्व.आईच्या निधनानंतर असे मायाळू हास्य कधी बघितल्याचे किंवा अनुभवता आलेच नाही .आज पुन्हा एकदा याचं केदारनाथ बाबाच्या, हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेत या आजीच्या रुपात श्रद्धापूर्वक ते प्रेमळ हास्य बघायला मिळाले होते. माझी स्व.आई तर या आजीच्या रूपातून अन् तिच्या सुमधुर मायाळू हास्यातून माझ्या अन् माझ्या कुटुंबियांच्या समोर तर आली नसेल ना..? हा भाबडा पण मायाळू भाव माझ्या मनात आला होता. माणसाचे मन कुठल्या कुठं जाते.पण मनाला आवर पण घालता येत नसतो हेही खरं. मन जे म्हणतं त्यात बऱ्याचदा सत्यता देखील असते यावर माझा तरी ठाम विश्वास होता अन् आहे.

आजीचे बोलणे ऐकून माझ्यातला थोडाफार तारुण्याचा अन् असलेल्या प्रौढ वयातील तब्येतीचा अहंकार तिथल्या तिथंच गळून गेला. माझ्याही पेक्षा माझ्या थोरल्या मुलाचा ऐन तारुण्याचा अहंकार तर कुठल्या कुठं पळून गेला.आम्ही कुटुंबीय एकमेकांकडे बघत होतो अन् आमच्या थकव्याला लपवू बघत होतो, कारण आमच्या बाजूला तारुण्याला लाजवेल असे तारुण्य बसलेले होते अन् ते त्या आजीच्या रुपात होते. केदारनाथ बाबाच्या दर्शनाला तरुण अन् प्रौढ वयातील माणसं घोड्यावर खेचरावर बसून येत जात होती त्यांच्या मुखात सणसणीत चपराक त्या राजस्थानच्या आजीने आपल्या कृतीतून लगावली होती. केदारनाथ पहाडावरील प्रवासातील प्रवासी ज्या घोड्यावर प्रवासी बसून जात येत होते त्या सर्वांकडे मी बघत होतो अन् पुन्हा एकटक त्या कणखर आजीकडे श्रद्धेने बघत होतो. जखमी घोड्यांच्या दिसणाऱ्या अन् न दिसणाऱ्या वेदनांची होणारी आग प्रत्यक्षात त्या मुक्या प्राण्यांना व्यक्त करता येत नव्हती, पण त्या आजीने आपल्यातील दृढ निश्चयाने अन् उत्तम जीवनशैलीने शारीरिक आरोग्य कसे असावे याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केले होते. त्या सन्माननीय भक्तांचा निरोप घेण्यापूर्वी मी त्यांना विचारले की,
" केदारनाथ बाबा का मंदिर अभी कितना दूर हैं ?"
यावर त्या आजीचा जावई म्हणाला - " अगर बिना रूके चलेंगे तो आधा पाऊण घंटे मे आरामसे पहुचेंगे!"

आता दुपारचे दीड वाजून गेले होते. आम्ही पुन्हा सर्वानुमते ठरवले की, आता कुठेही न थांबता चालत राहायचं. रस्त्याने मार्गस्थ प्रवाशांची गर्दी खूप झाली होती.त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही दगडाच्या ओबड धोबड रस्त्याने बाबा केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो.कोणतेही ध्येय जवळ आले की, मनाचा अन् शरीराचा वेग, वेगवान होतो याची अनुभूती येऊ लागली होती.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २९ सप्टेंबर २०२३, शुक्रवार

क्रमशः

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

ऋण, मुलींचे..!


 




मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


ऋण, मुलींचे..!


==================================


काही मुलींचे ऋण आयुष्यात उतरवणं या जन्मी तरी शक्य नाही. माया अन् निस्सीम निरागसता याचे सर्वात पवित्र नाते या जन्मी मला लाभले.


मी जेंव्हा एकलहेरा, ता. गंगापूर या शाळेत सेवेत होतो, तेंव्हा अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले. दरवर्षी तिथली लक्ष्मी मातेची जत्रा असायची.मुली आदल्या दिवशीच मला मायेनं मात्र कडक शब्दात सांगायच्या...

' सर, उद्या आमच्या गावची जत्रा आहे.उद्या जेवणाचा डबा आणू नका बरं का..! जर आणला तर पहा मग..!!आपण मस्तपैकी जत्रातून आणून खाऊ, खाऊ." 

होकार देण्याशिवाय पर्याय नसायचा, कारण काहींना अन् काही आग्रहाला नकार देणं म्हणजे पाप असं माझे वैयक्तिक मत आहे. मुली या नियतीने भूतलावर पाठवलेल्या देव कन्या असतात, या मताचा मी..! त्यामुळं नकार देऊन कशाला आपण देवाला दुखवायचे..? यामुळे निमुटपणे जत्राच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र बसून मनसोक्तपणे खाऊ खायचो. जेंव्हा नियतीने भावना अन् माया यांचं एकत्रित नातं निर्माण करण्याचे ठरवले असेल त्यावेळी त्याच नियतीने स्री हे नाते निर्माण केले.त्याच स्री चा सुंदर अन् पवित्र आविष्कार मुलगी होय. त्यांच्या सोबत आयुष्याचे काही दिवस व्यतीत केले, करत आहे हा त्या नियतीच्या जवळ जाण्याचा पवित्र मार्ग आहे असे मला वाटते.


आयुष्यात काही विद्यार्थिनी खूपच आपुलकीच्या भेटल्या. एकलहेरा ता. गंगापूर येथे त्यावेळी इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेली गायत्री दीदी सुदाम भाऊ औसरमल नावाची एक अतिशय सुसंस्कारित कन्या देखील भेटली.तिच्या घरी काहीही गोड धोड पदार्थ तयार केला की, एका डब्यात घालून तो गोड पदार्थ हमखास शाळेत घेऊन यायचीच. तो गोड गोड पदार्थ म्हणजे एक प्रकारे नियतीने तिच्या देव कन्या मार्फत दिलेला प्रसाद समजूनच खावा लागायचा. तिथं नकार नसायचा..! असायचा फक्त आणि फक्त भावपूर्ण अन् श्रद्धायुक्त होकार..! इतरही सर्व विद्यार्थिनी खूपच मायाळू होत्या, पण गायत्री दीदीच्या मायाळू स्वभावात मला माझ्या स्व.आईचा आग्रह, माया अन् निरपेक्ष वृत्ती जाणवायची. याच अशा अनेकानेक आशीर्वादामुळे आयुष्यात, आयुष्याच्या सोबत जगावेसे वाटले , वाटते अन् वाटत राहणार यात तिळमात्र शंका नाही. 


इ.स. जून १९९५ मध्ये जळगाव, ता. वैजापूर येथे शिक्षक म्हणून सेवेत असताना, ऐन पावसाळ्यात माझी दुचाकी गावापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतर अलीकडेच लावावी लागत असे. पुढील रस्ता अतिशय चिखलाचा असल्याने पुढे गाडी घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. मी पुढे पायी जायचो.बिब्बण भाई यांच्या वस्तीच्या अलीकडे रस्त्यावरच माझी दुचाकी लावत असायचो.त्यावर एक कव्हर टाकून मी पुढे शाळेत जायचो. गाडीवरील कव्हर जरी यदा कदाचित उडून गेले तरी भाडाईत पाटील वस्तीवरील शाळेत इयत्ता सातवी मध्ये येणाऱ्या मुली ते कव्हर पुन्हा गाडीवर टाकून द्यायच्या. त्या मुलींनी अतिशय निर्विकार मनाने हे काम केले होते. वास्तविक त्या मुलींना मी स्वतः सांगितलेले नव्हते की, तुम्ही असे काम करा म्हणून..! पण कौटुंबिक संस्कार अन् जाणीव यामुळे त्या मुलींकडून असे कार्य होत होते.आता त्या सर्व कन्या आपापल्या सुखी संसारात सुखी आहेत.याचं आत्मीयतेने हडस पिंपळगाव, सोनवाडी, ता. वैजापूर येथील अनेकानेक मुलींचे आशीर्वाद लाभले अन् अंधारी येथील मुलींचे आशीर्वाद लाभत आहे. मुलींकडून मिळालेले आशीर्वाद हेच संजीवन, कारण त्यात माया असते.


काही आठवणी आपल्यातील माणूस अजूनही जिवंत आहे याची जाणीव करून देऊन माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र देतात हेच खरं..! माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात अनेक विद्यार्थी भेटले, मात्र त्या सर्वांमध्ये माझ्या स्व. आईची माया जाणवली ती फक्त मुलींमध्ये..! नियतीने माणसाच्या आयुष्यात जे काही भाव बंधने निर्माण केलीत, त्यापैकी अतिशय पवित्र भाव बंधने मुलींमध्ये निर्माण केली आहेत.पुरुष अनेकवेळा उद्दामपणा दाखवून आपलं पुरुषत्व वेळोवेळी सिद्ध करत असतो,मात्र स्री आपल्यातील भावना व्यक्तपणे तर कधी अव्यक्तपणे व्यक्त करून त्याच नियतीने तिला निर्माण केल्याचं सार्थ आयुष्य स्वतः जगत असते.


माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलींच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी बोलणाऱ्या अन् वर्तन करणाऱ्या एकमेव शिक्षिका भगिनी भेटल्या. त्याचं नाव आदरणीय पंचशीला जाधव मॅडम..! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता . गंगापूर येथे त्या मुख्याध्यापिका होत्या. याविषयी आम्ही सोबत कार्यरत असताना मी, आदरणीय जाधव मॅडमशी बोललो होतो अन् त्यांना याबद्दल विनम्र वंदन देखील केले होते. आदरणीय जाधव मॅडम मुलींशी एकरूप होऊन त्यांच्याशी एक आई म्हणून वर्तन करायच्या. आज शाळेतील शिक्षिका भगिनींपैकी कितीजणी पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटातील मुलीच्या मैत्रिणी आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मुलींना त्यांच्या समस्या इत्यादी बाबी व्यक्त करताना सामाजिक समस्या जाणवत असते. माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात भेटलेल्या या संदर्भातील अनुभवावर आधारित लिहावं वाटते,पण सामाजिक मर्यादा जाणून स्वतः च्या लेखणीला थांबून अव्यक्त राहतो. या अनुभवात, मुलींच्या समस्येत, भावनिक अडचणीत मला भेटलेली अन् भेटत असलेली मुलगी , माझी स्व. आई म्हणून भेटली अन् माझ्याजवळ व्यक्त झाली एवढं त्यात पावित्र्य होते हे बाबा केदारनाथाच्या पावित्र्या सारखं पवित्र सत्य..! सामाजिक बंधनामुळे मी त्यावर जास्त काही लिहीत नाही .मुली कुणाच्याही जवळ आपल्या समस्या व्यक्त करत नसतात. त्यांना ज्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते तिथेच त्या आपल्या समस्या व्यक्त करत असतात हा माझा स्वानुभव आहे. पुरुष आपल्या समस्या भावना उथळपणे व्यक्त करून मोकळा होत असतो,पण स्री आपल्या समस्या अन् भावना तेंव्हाच अन् त्याच व्यक्तीजवळ व्यक्त करत असते, जिथं तिला समोरच्या व्यक्तीत स्वतः ची आई जाणवते.ती समोरची व्यक्ती पुरुष असला तरी त्यात ती आपली आई शोधण्याचा भावूक प्रयत्न करत असते अन् समोरच्या स्री शिक्षिका मध्ये जर स्वतः ची आई जाणवली नाही तर ती अव्यक्तच राहते. मला माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात एक कन्या म्हणून अन् आपण स्वतः त्यांची आई आहोत याची जाणीव होऊन काही प्रसंगात जगायला मिळाले हे नशीबच म्हणावे.


आज याची आठवण यायचे कारण असे की, आत्ताच समजले की, आज राष्ट्रीय कन्या दिवस आहे म्हणून..! त्यामुळं यावर काहीतरी मनातून लिहावं म्हणून व्यक्त झालो.


ता.क. - वरील लेखात माझ्या बाबतीत मी व्यक्त केलेला मजकूर हा माझा आत्मगौरव आहे असे कृपया वाचकांनी समजू नये ही नम्र विनंती. आजचा दिनविशेष अन् त्या अनुषंगाने माझे अनुभव अन् आत्मविचार व्यक्त केले आहेत, बाकी काही नाही.🙏🏻


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/९/२०२३, रविवार.


सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ५ )


 




मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ५ )

===================================

दिनांक २० मे २०२३, शनिवार रोजी सकाळी साधारणतः ९:३० वाजता रामबाडाहून आम्ही पुन्हा बाबा केदारनाथाच्या दिशेने पायी मार्गस्थ झालो होतो खरे,पण रामबाडा हून पाय निघत नव्हता, पण पुढे निघणे गरजेचे झाले होते. जे आकाश अगोदर निळेशार दिसत होते आता त्याच आकाशात  काळया ढगांनी दाटी करायला सुरुवात केली होती.अंगाला झोंबणारे थंडगार वारे सुरू झाल्याने अंग अजून गारठून गेले होते.जर यदा कदाचित पाऊस आलाच तरी आमच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे रेनकोट असल्याने ओले होण्याची चिंता नव्हती.मात्र चिंता अतिशय थंडगार पावसाच्या पाण्याच्या थेंबांची होती.त्याच अतिशय थंडगार पावसाच्या पाण्याच्या थेंबाचा प्रभाव आसपासच्या वातावरणात होऊन वातावरण अजून गारठून जाईल अन् जास्तीचा पाऊस जर सुरू  झाला तर भौगोलिक परिसराची अनामिक भीती मनात आली होती. जर पाऊस सुरू झाला अन् आपण अर्ध्याच रस्त्यात ओले होऊन पार गारठून गेलो तर वाटेतच हरी ओम करावे लागणार होते.पुढील रस्ता छातीवर येणारा अतिशय उंच चढणीचा होता. मुलांना चालण्याच्या सूचना दिल्या, पण त्यांना तिथलं मनमोहक वातावरण पुढे जाऊ देण्यास परवानगी देत नव्हते.थोरला चिरंजीव नमन मला म्हणाला...
" दादा, थोडं अजून थांबा ना..! किती भारी दृष्य आहे.आपण पुन्हा पुन्हा थोडी येणार आहोत. " त्याचं बोलणं मनाला पटलं. त्याचं वय ऐन तारुण्यातील , त्यात पुन्हा अवतीभोवती हिरवळ, उंच पर्वत रांगा, बाजूला मंदाकिनी नदी..! एका नवतरूणाला किंवा एका नवतरुणीला आपल्या ऐन तारुण्यातील आपलं गद्य किंवा पद्य मन व्यक्त करायला यापेक्षा दुसरं ठिकाण कोणते असू शकते का..? उत्तर माहीत असलेल्या या प्रश्नांमुळे मी काही वेळ तिथं थांबायला तयार झालो.

तारुण्य भित नाही. तारुण्य आपल्या मनाला मुक्त करत असते. तारुण्याला एकच भाषा माहीत असते अन् ती म्हणजे सळसळत्या रक्ताला आपल्या मनाच्या तर कधी शरीराच्या द्वारे व्यक्त करणे. यात मन नेहमी आघाडीवर असते.तारुण्याच्या या भाषेला लिपी नसते. असतो फक्त आणि फक्त भावनेचा हुंकार..! तरुणांची तरुण मनं,  प्रौढांनी निदान निसर्गरम्य परिसरात  जपायला हवीत या मताचा मी..! त्यामुळं होकार दिला अन् मी अन् माझी धर्मपत्नी बाजूला असलेल्या अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो.आमची दोन्ही मुलं रामबाडा परिसर, मंदाकिनी नदी अन् तिथला परिसर आपल्या मोबाईल मध्ये स्वतः सोबत तर कधी फक्त त्या परिसराला बंदिस्त करू लागली.

मी अन् माझी धर्मपत्नी बाजूला असलेल्या अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलेलो असताना माझ्या मनात विचारांचे तरंग उमटायला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला असलेल्या केदारनाथ घाटीच्या उंच उंच पर्वत रांगा बघून आपण या निसर्गाच्या अदभुत शक्तीच्या पुढे किती खुज्जे आहोत हे बघण्यात मन रमुन गेले होते.केदारनाथ घाटातील दोन्ही बाजूच्या उंच उंच पर्वत रांगा अन् त्यातून वाहणारी मंदाकिनी नदी बघून माझ्या मनातील रसिकता अन् भावुकता जागृत झाली होती. दोन्ही बाजूच्या उंच पर्वत रांगा अन् त्यातून ऐन मधोमध वाहणारी मंदाकिनी बघून केशसांभार केलेल्या एखाद्या स्री च्या डोक्याच्या ऐन मधोमध चांदीचा हार सजवून ठेवला आहे असं ते मनोहारी दृष्य दिसत होते.तो मंदाकिनीचा चांदीचा हार आपल्यातील सौंदर्याने आजूबाजूच्या पर्वताला आपल्या मोहात पाडत होता. त्या उंच पर्वत रांगा देखील, मंदाकिनी नदीच्या मनमोहक रूपाला भाळून  नदीच्या पात्रात अधून मधून आपल्या शरीरावरील खाच खळगे दगड धोंडे अन् वृक्ष यांचा प्रेमळ वर्षाव करत होते. आजूबाजूच्या पर्वत रांगांचा हा प्रेमळ वर्षाव तेंव्हा खूप बहरात येत असेल जेंव्हा हीच मंदाकिनी नदी आपल्या ऐन उफाणावर येत असेल..!

आता आकाशात काळया ढगांची दाटी वाढली होती, त्यामुळे मी मुलांना आवाज दिला अन् आपल्याला आता पुढे जाणे का गरजेचे आहे हे सांगितले.आमच्या दोन्ही मुलांपैकी एकाने आपल्यातील पौगंडावस्थेतील हळुवार वयाला अन् एकाने आपल्यातील ऐन तारुण्याला मुरड घातली अन्  पुढे जाण्यास तयार झाले. पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून निघालो होतो तिथून ते इथपर्यंत थोरला चिरंजीव नमन याच्याच पाठीवर मोठी सॅक बॅग होती.बॅग मधील वस्तूंमुळे थोरला चिरंजीव नमन याच्या पाठीवर साधारणतः दहा किलो वजनाची बॅग होती. त्याची तब्येत मजबूत असल्यामुळे या कामासाठी त्याची निवड योग्य होती.तरी पण थकवा शेवटी येतोच. पहाटे पाच ते सकाळी नऊ असे सलग चार तास चढणीच्या रस्त्यावर पाठीवर दहा किलोची बॅग घेऊन चालल्यामुळे साहजिक आहे थकवा येणारच..! मात्र या थकव्या विषयी नमन काही बोलला नाही.त्याच्या आईला बहुदा जाणीव झाली अन् तिने नमन कडील बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली.तो नाही नाही म्हणाला पण तरी देखील तिने आग्रहाने घेतली.या सजीव सृष्टीतील सर्व प्राण्यांमध्ये आपल्या लेकराचं मन आईच सर्वात अगोदर ओळखते याचं ते मूर्तिमंत उदाहरण माझ्या समोर प्रस्तुत झाले होते. मी मग माझ्या पत्नीकडून तिची पर्स माझ्याकडे घेतली अन् खूपच चढणीचा  प्रवास सुरू झाला. सॅक बॅग आळीपाळीने माझी पत्नी, धाकटा मुलगा नयन अन् थोरला चिरंजीव नमन यांनी इथुन पुढे आपल्या पाठीवर घेण्याचे नियोजन केले.त्यात आघाडीवर थोरला चिरंजीव नमन हाच होता. कमी वेळासाठी धाकटा चिरंजीव नयन अन् माझ्या पत्नीने सॅक बॅग आपल्याकडे घेतली होती.  पर्स माझ्याकडे तर कधी नयन कडे तर कधी माझ्या पत्नीकडे ,मात्र जास्तीत जास्ती वेळ सॅक बॅग थोरला चिरंजीव नमन यानेच आपल्या स्वतच्या  पाठीवर घ्यायचे स्वतः हुन आग्रहाने स्वीकारले होते.

खूपच उंच चढणीच्या प्रवासामुळे पायात गोळे यायला लागले होते.पायात गोळे येऊ लागले होते,पण आम्हा चौघांचा श्वास अजून पर्यंत तरी योग्य लयीत होता. साधारणतः सकाळी अकरा वाजता आम्ही थांबा घ्यायचे ठरवले.उंच चढणीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये, हॉटेल कसले ते..? निळ्या प्लास्टिकचं ओबड धोबड आच्छादन असलेलं छोट दुकानच होतं. त्याच्या रंग रुपापेक्षा तिथं ऐनवेळी खायला प्यायला काय उपलब्ध आहे यावरून त्याच स्थान पंचतारांकित हॉटेल पेक्षाही श्रेष्ठ वाटू लागले होते. त्या दुकानात अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो.  पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून प्रवासाला सुरुवात केली होती.सकाळी सात वाजता मी, माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलांनी पतंजलीचे प्रत्येकी एक एक बिस्कीट पुडा खाल्लेला होता.रस्त्यात एका ठिकाणी सरबत पिलो होतो. तेवढाच आधार होता. आता सकाळचे अकरा वाजले होते. अगदी सुरुवातीला पहाटे पाच वाजता पायी निघाल्या पासून ते आता सकाळच्या अकरा वाजेपर्यंत सहा तास झाले होते.पोटात भुकेचा व्याकूळ आवाज येऊ लागला होता. चढणीच्या प्रवासामुळे पायात गोळे येऊ लागले होते. त्यात पुन्हा प्यायचे पाणी पोटात कमी गेल्यामुळे घसा कोरडा तर नाही,पण तहान लागली होती. बरं,पाणी प्यावे तर ते दातखिळी बसेल इतके थंडगार होते. मात्र पाणी पिणे आवश्यक होते.नसता पायातील गोळे अजून वेदनादायी होऊन आम्हाला जागच्या जागीच बसायला भाग पाडू शकणार होते. आम्ही सर्वजण अर्धवट ओल्या दगडी ओट्यावर बसलो आणि त्या छोट्या दुकानातील दुकानदाराला माझ्या थोरल्या मुलाने विचारले..

" चाचा, खाने के लिये क्या है..?"
दुकानदार - " भाई साब, खाने के लिये तो नही हैं, पर पिने के लिये लस्सी, माझा हैं | दुं क्या..?"
मी सोबतच्या सर्वांना म्हणालो - " आपल्या सोबत पतंजलीचे खारे बिस्कीट पुडे आहेत.ते अगोदर खाऊन घ्या.मग आपण पिण्यासाठी काहीतरी घेऊ. नमन, त्या दुकानदाराकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटली विकत घे अगोदर..! खूप तहान लागली आहे."
पाण्याची बाटली विकत घेऊन आम्ही पाणी पिऊन तृप्त झालो होतो.पाणी थंडगार होते,पण लागलेली तहान भागली होती हे महत्त्वाचे झाले होते.संकट आले की, माणसाचे नखरे नाहीसे होतात हेच खरं..! ज्या थंडगार पाण्याविषयी अगोदर मी स्वतः नाक मुरडत होतो, आता तेच पाणी खूप ग्लानी आल्यामुळे निमुटपणे प्यावे लागले होते. खारे बिस्कीट खाऊन झाले होते.आता नमन याने त्या दुकानदाराकडून अमुल लस्सीचे चार पॅकिंग मागवून घेतले.अमुल लस्सीतील गोडवा जिभेला अन् मनाला थंडावा देऊन गेला.शरीरातील ग्लानी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.लस्सीचे अजून एक एक पॅकिंग मागवून घेतले अन् मस्तपैकी लस्सी पिऊन काहीवेळ शांत बसून राहिलो. दुकानदाराचे बिल रोखीने दिले. बसल्यामुळे आराम तर मिळाला,पण मला पायातील गोळे वर मांडी पर्यंत आल्यासारखे जाणवू लागले होते. उठावे वाटत नव्हते,पण अजून मोठा पल्ला गाठायचा होता.त्यामुळं शरीराचे न ऐकता मनाचे ऐकून मार्गस्थ झालो.

आता सकाळचे सव्वा अकरा वाजले होते.आकाशात काळया ढगांची गर्दी असल्यामुळे वातावरण ओलसर अन् खूपच थंडगार होते.रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. घोडे, पायी, डोली असणारे, पाठीवर प्रवाश्यांना घेऊन जाणारे येणारे असे एकंदरीत सर्वजण दाटीवाटीने प्रवास करत होते. काही हट्टे कट्टे तरुण तरुणी देखील त्या मुक्या घोड्याच्या / खेचराच्या पाठीवर बसून मोठा शौर्याचा आविर्भाव आणून चढत होते, उतरत होते. काही खेचर घोडे यांची होणारी हेळसांड, त्यांची दुर्दशा पाहून  यावरून बसून जाणाऱ्या तरुण तरुणी यांना खरचं बाबा केदारनाथ प्रसन्न होईल का..? हा प्रश्न माझ्या मनात आला.मुक्या प्राण्यांना देखील संवेदना असतात. मात्र ज्यावेळी हट्टे कट्टे तरुण तरुणी देखील त्या मुक्या घोड्याच्या / खेचराच्या पाठीवर बसून एक भक्त म्हणून दर्शनाला जात होते कुणी उतरत होते ते बघून यांचं हे पर्यटन आहे की मनोभावे श्रद्धेय  तीर्थयात्रा याविषयी माझ्या मनात शंका आली होती. वयोवृध्द नागरिक, बालक, आजारी व्यक्ती यांनी मुक्या प्राण्यांच्या पाठीवर, चार माणसांच्या खांद्यावरील डोलीतून, एखाद्या पुरुषाच्या, स्री च्या पाठीवरील डोलीतून बसून जाणे उतरणे एकवेळ समजू शकतो,मात्र कानात हेड फोनचे बोळे अडकवून मुक्या प्राण्यांच्या पाठीवर, इतरांच्या खांद्यावरील डोलीत , पाठीवरील डोलीत मोठ्या रुबाबात बसून एक भाविक भक्त म्हणून यांचे स्थान काय आहे , असेल हे त्या परम पित्या बाबा केदारनाथ महादेवालाच माहीत. अशीच शारीरिक अन् मानसिक दुर्दशा त्या चार पुरुषांची  होत असेल जे  आपल्या खांद्यावरून डोलीतून काही  हट्टे कट्टे तरुण तरुणींना घेऊन चालले होते कुणी उतरत होते. तिथल्या पुरुषांच्या पाठीवरील डोलीतून देखील काही हट्टे कट्टे तरुण तरुणी आपल्या कानात हेड फोनचे बोळे अडकवून प्रवासात दिसले. मला काही घोड्याच्या खेचरांच्या अंगावर जखमेचे व्रण देखील दिसले.मात्र आपली वेदना व्यक्त करण्याचा हिसकावून घेतलेला अधिकार फक्त माणूस प्राणी नावाच्या जातीला आहे. इतर मुक्या प्राण्यांना नाही. मुक्या प्राण्यांना फक्त धावणे, पळणे, कष्टाचे काम करणे हेच माहित. हा विचार खूप खोलवर वेदना देऊन गेला. जाऊ द्या आपल्याला काय करायचे हा निष्पक्ष विचार मनात आला अन् माझे विचारचक्र थांबले होते.

केदारनाथ घाटीतून प्रवास करताना एका बाजूला प्रचंड खोल दरी अन् दुसऱ्या बाजूचा हिमालयातील केदारनाथ घाटीचे उंचच उंच पर्वत रांगा.यांना सोबत घेऊन आम्ही हर हर महादेव असा अधून मधून जयघोष करत पुढे पुढे उंच उंच चढू लागलो होतो.साधारणतः दोन तास चालून झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी ओट्यावर आम्ही सर्वजण बसलो.आता मात्र शरीर पार थकून गेल्यासारखे जाणवू लागले होते.त्यातल्या त्यात थोरला चिरंजीव नमन जास्तच काकुळतीला आला होता. त्याचं कारण बॅग चे ओझे घेऊन अन् उंच उंच चढण चढत तो प्रवास करत होता.त्याने त्याची काकुळतीला आलेली भावना व्यक्त केली नाही,पण मला त्याच्या देहबोलीतून ते जाणवलं होतं.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १९ सप्टेंबर  २०२३, मंगळवार ( गणेश चतुर्थी )

क्रमशः

भेट..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


भेट..!


===================================


डॉ.जीवन राजपूत..!

जन्मगाव पालखेडच्या शिवावरचा माणूस..!

म्हणजेच बेंदवाडी, ता. वैजापूर येथील मूळचा नागरिक..!


माझ्या जन्मगावी पालखेड येथे प्राथमिक शिक्षणाच्या आयुष्याचा काही काळ व्यतीत केलेला माणूस..!


कितीही व्यस्त कार्यक्रम , रुग्णसेवा असो, दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत श्री.पारेश्वर महादेवाच्या यात्रेला दर्शनासाठी आवर्जून येणारा भाविक माणूस..!


आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे परम आदरणीय गुरू श्री.गोमलाडू ( राजपूत ) सरांचे चिरंजीव असलेले व्यक्तिमत्त्व श्री.डॉ जीवन राजपूत (न्यूरोसर्जन)..!


डॉ. जीवन राजपूत यांनी त्यांचं नवीन अद्ययावत इमारतीत इस्पितळ जे. जे. प्लस हॉस्पिटल & NEURON international चा शुभारंभ काल दिनांक १७/९/२०२३ रोजी केला. काल मराठवाडा स्वातंत्र्य दिन असल्यामूळे शुभेच्छा देण्यासाठी जाणे शक्य झाले नाही. मात्र आज आवर्जून सपत्नीक गेलो.


सदरील अद्ययावत इस्पितळात गेल्यावर एक विचार मनात येत होता. परम आदरणीय गुरू श्री.गोमलाडू ( राजपूत ) सर यांची भेट व्हायला हवी होती. पण सर घरीच असतील. सरांची खूप दिवस झाले भेट नाही.मागे एकदा इ. स.२०१७ मध्ये भेट झाली होती.त्यावर मी माझ्या ब्लॉगवर लिहिलं आहे.


अचानक आदरणीय गोमलाडू सर मला लिफ्ट मधून येताना दिसले.धावत सरांकडे गेलो.आदरणीय गोमलाडू सरांच्या पायी मस्तक टेकवलं..! कोण आहे म्हणून सरांनी बघितले, माझ्या खांद्याला धरून मला उभे केले.माझ्या दोन्ही गालांना धरून सरांच्या मुखातून शब्द बाहेर पडले..


" अरे नंदू, खूप दिवसांनी भेटला रे..! कुणी पेशंट ॲडमीट आहे का..? ये इकडे ये..बाजूला..!

मी म्हणालो - " सर, काल जीवन भाऊंनी नवीन इमारतीत अद्ययावत हॉस्पिटल सुरू केले.मला कालच शुभेच्छा द्यायला यायचे होते,पण काल १७ सप्टेंबर निमित्त ध्वजारोहण असल्यामूळे येऊ शकलो नाही.म्हणून आज आलो आहे..!"


आदरणीय गोमलाडू सर माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांचे मित्र होते.विशेष म्हणजे माझे वडील अन् गोमलाडू सर दोघेही कमालीचे स्वयंशिस्तीचे..! मोडेन पण वाकणार नाही या विचारसरणीचे..! आदरणीय गोमलाडू सर वयोमानानुसार आता काहीसे थकले आहेत. गप्पा झाल्यावर डॉ. जीवन राजपूत यांच्या कक्षात गेलो. गावाकडचा माणूस भेटला की , कोणताही माणूस गावाकडच्या अनौपचारिक भाषेत बोलतो.तो प्रत्यत आमच्या भेटीत एकमेकांना आला. 


गप्पा आटोपल्यावर डॉ. जीवन राजपूत यांना नवीन इमारतीत अद्ययावत इस्पितळ जे. जे. प्लस हॉस्पिटल & NEURON international सुरु केल्याबद्दल अभिनंदन अन् पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..!🌹


डॉ. जीवन राजपूत यांना एक छानसा पेन सप्रेम भेट म्हणून दिला. भेट म्हणून दिलेला पेन बघून डॉ. जीवन राजपूत यांना अतिशय आनंद झाला.त्यावर म्हणाले...

" सर, खूप छान वस्तू भेट दिली. आता लगेच त्याचा उपयोग पेशंटला औषधी लिहून देण्यासाठी सुरू करतो आणि जवळच ठेवतो..!"


गप्पा झाल्यावर मी प्रेमाने " वंदे मातरम्..!" म्हणून निरोप घेतला.प्रत्युत्तर दाखल डॉ.जीवन राजपूत यांनी देखील " वंदे मातरम् सर..!" म्हणून निरोप दिला..! 


सदरील अद्ययावत इस्पितळ पत्ता - जे.जे. हॉस्पिटल जिल्हा न्यायालयासमोर जालना रोड बाबा पेट्रोल, छत्रपती संभाजीनगर ( महाराष्ट्र)


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १८/९/२०२३,सोमवार.

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ४)








 

मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ४)

===================================

गौरी कुंड येथील मुक्कामी मी मोबाईल मध्ये पहाटे साडे तीन वाजताचा अलार्म लावलेला होता.वास्तविक पहाटे चार वाजताचे उठायचे नियोजन होते,पण मुद्दामहून एक तास अगोदरचा अलार्म लावलेला होता. मला दररोज पहाटे उठण्याची सवय असल्याने लावलेल्या अलार्म ची गरज पडलीच नाही.मी पहाटे साडे तीन वाजेच्या आसपास उठलो. एक एक करून माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुले पण उठली होती. अंगावर उबदार रग, दुलई होती, तरी देखील प्रचंड कडाक्याच्या थंडीने शरीर पार गारठून गेले होते. सकाळची दिनचर्या आटोपली होती. दोन्ही मुलांनी मुक्कामी असलेल्या रुमच्या बाहेर जाऊन वातावरणाचा कानोसा घेतला अन् पटकन रूम मध्ये आले. बाहेर खूपच कडाक्याची थंडी पडलेली आहे हा स्वर त्यांच्या बोलण्यातून जाणवला होता.

आता पहाटेचे साडे चार वाजले होते. रूमच्या बाहेर आल्यावर ज्यांना चहा प्यायची होती त्यांनी गरमागरम चहा पिली. मी अन् माझे मुलं चहा शौकीन नसल्यामुळे मी अन् माझ्या दोन्ही मुलांनी थंडगार पाण्यावर चहा समजवून चहा पिण्याचा  आनंद मानून घेतला होता.अगदी बरोबर पहाटे   पाच वाजता आम्ही गौरी कुंड येथून बाबा केदारनाथाच्या दिशेने  पायी चालण्यास सुरुवात केली.काही अंतर पायी चालून झाल्यानंतर आमच्या सोबत असणाऱ्या सहकारी कुटुंबाने घोड्यावर बसून पुढे जाण्याचा निर्णय घेतला अन् ते पुढे घोड्यावर बसून मार्गस्थ झाले. साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतर पायी चालून झाले होते.हातात धरून चालताना उपयोगी पडणाऱ्या दोन काठ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून विकत घेतल्या.मुलांनी काठी घ्यायला नकार दिला होता.

सकाळचे सात वाजले होते.अंगात खूप उबदार असलेले कपडे परिधान केलेले होते,तरी देखील भयंकर थंडी जाणवायला लागली होती.सकाळी सात वाजता सोबत घेतलेला पतंजली बिस्कीट पुडा प्रत्येकाने एक एक खाल्ला अन् पुढे मार्गस्थ झालो.खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून पुढचा प्रवास करणे आवश्यक होते.उंच चढण लागली होती.चालताना सुरुवातीला दम लागू लागला होता,पण चालण्यात सातत्य कायम राखल्यामळे आता लागणारा दम नाहीसा झाला होता.हातातली काठी अधून मधून उपयोगी पडत होती. पाणी प्यावे वाटत होते,पण कमालीचा गारठा अन् त्यामुळं पाणी पिण्याची इच्छा असूनही खूप थंड पाणी पील्या जात नव्हते.तीन किलोमीटर अंतर पायी चालून झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबू सरबत विक्रत्याकडे आम्ही थांबलो होतो.हिमालयाच्या पर्वत रांगातील दऱ्या खोऱ्यातून झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे सरबत त्या विक्रेत्याने तयार केले होते. मला अगोदर त्या वाहणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर शंका आली,पण पर्याय कमी असल्यामुळे मी मौन पाळले. वाहणाऱ्या पाण्यापासून बनवलेले  मस्तपैकी सरबत पिऊन झाल्यावर पुन्हा मार्गस्थ झालो.आम्ही हर हर महादेव असा जयघोष अधून मधून करत होतो.

सकाळचे आठ वाजले होते.आता येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या घोड्यांची वर्दळ वाढली होती.विशेषत: बाबा केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या घोड्यांची वर्दळ वाढली होती.आता पायी चालताना निसरडा रस्ता, घोड्यांची वर्दळ अन् स्वतः ला यातून सावरत सावरत पायी प्रवास सुरू झाला होता.काही घोडे अन् त्या घोड्यावर बसलेले भाविक यांच्या शरीराचा अन्  पायांचा धक्का बसत होता. रस्त्याची रुंदी साधारणतः पाच ते दहा फूट होती. त्याच रत्यावरून येणारे जाणारे पायी प्रवासी, त्याच रस्त्यावरून येणारे जाणारे घोड्यावर बसलेले प्रवासी, त्याच रस्त्यावरून पाठीवर प्रवाश्यांना ने आण करणारे, त्याच रस्त्यावर डोलीत प्रवाश्यांना ने आण करणारे..! असा एकंदरीत प्रवास सुरू झाला होता.हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या परिसरात निसर्गाची मुक्त उधळण बघून मन प्रसन्न होत होते. बाजूलाच खोल दरीतून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला बघून हीच ती मंदाकिनी आहे जिने वर उंच असणाऱ्या बाबा केदारनाथाच्या पवित्र परिसराला स्पर्श करून आपलं मार्गक्रमण पुढे सुरू ठेवले होते. खोल दरीतून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या प्रवाहाला बघून मला असे वाटले की, स्री अन् नदी ह्या आपल्यातील असलेल्या दुसऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो या मूल्याची जाणीव झाली. मंदाकिनी नदी या मूल्यांना नैसर्गिक प्रवाहाच्या द्वारे सतत वाहते ठेवून मानवी संस्कृती  वृद्धिंगत करत आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूच्या डोंगर , पर्वत अन् मैदानाला महत्त्व आहे.फरक फक्त एवढाच होता, स्री चे तरल, शालीन , स्वच्छ अन् भावूक स्वभावाच्या वाहत्या प्रवाहामुळे पुरुषाच्या आयुष्याचे नंदनवन बहरत आलेले आहे.अन् नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्वत ,डोंगर दऱ्या खोऱ्यांना  सौंदर्य, देखणं अन् राजबिंडे रुप प्राप्त झालेले आहे. असेच काहीसे स्री च्या तरल, शालीन स्वच्छ अन् भावूक स्वभावाच्या वाहत्या प्रवाहामुळे पुरुषाच्या आयुष्याचे नंदनवन फुलले आहे अन् असे कित्येक पिढ्या फुलत जाणार आहे. मात्र हीच बाजूला वाहणारी मंदाकिनी नदी जेंव्हा भयंकर पावसामुळे, पावसाच्या पाण्याच्या अतिरेकामुळे आपलं भान विसरते किंवा आपली मर्यादा ओलांडते तेंव्हा तिच्या आसपास असलेल्या चराचरांना उध्वस्त करत करत पुढे जात असते. स्री चे देखील असेच असते का..? द्रौपदी त्या समस्त स्रीयांचे प्रतिनिधित्व करणारी आहे का..? असे विचार प्रवाह माझ्या अंतर्मनात सुरू होते.बाजूला पायी चालत असलेल्या मानवी समूहाच्या ' हर हर महादेव ' या जयघोषाने माझ्या अंतर्मनातील विचार प्रवाह थांबला होता अन् मीही ' हर हर महादेव ' असा जयघोष करून पुन्हा आपल्या प्रवासाच्या लयीत आलो होतो.

चढणीच्या प्रवासामुळे आता पायात अधून मधून थकवा जाणवू लागला होता .केदारनाथ घाटी ज्या नैसर्गिक हवामानाच्या लहरीपणा बाबतीत प्रसिद्ध आहे, आज त्या मानाने हवामान खूपच स्वच्छ होते.गौरी कुंड येथून पहाटे पाच वाजता आम्ही पायी निघालो होतो. आता सकाळचे नऊ वाजले होते.आम्ही आता रामबाडा येथे पोहोचलो होतो. रामबाडाहून पायी चालणाऱ्या भाविकांची खरी परीक्षा सुरू होती.हाच तो रामबाडा परिसर आहे जिथं मंदाकिनी नदीवर पुल बांधलेला आहे.याचं पुलाचे पूर्णतः अस्तित्व जून २०१३ च्या महाभयंकर प्रलयात नाहीसे झाले होते.हाच रामबाडा गौरी कुंड ते बाबा केदारनाथ मंदिर दरम्यान सरासरी मध्यावर आहे.इथुन वर असणाऱ्या हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगा कडे बघितले तर वर वर जाणारे  रस्ते बघून छातीत धडकी भरते.अजून खूपच उंच चालत जायचे आहे याची जाणीव होते. थोडक्यात रामबाडा येथील परिसर दोन विभागात विभागणी करतो.एक गौरी कुंड ते रामबाडा अन् दुसरा रामबाडा ते बाबा केदारनाथ मंदिर..! पुलाच्या खालून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्यात दूरवर जून २०१३ मधील महा भयंकर प्रलयातील मनाला दुःख देणाऱ्या आठवणी दिसल्या. दूरवर नदीच्या पाण्यात कडेला जून २०१३ मधील महा भयंकर प्रलयात जो लोखंडी पूल होता तो वाहून जाऊन मोडतोड झालेल्या अवस्थेत  दिसला होता. आम्ही ज्या पुलावर उभे होतो त्याची अन् त्याखाली वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्याचे अंतर बरेच होते. एवढे अंतर असूनही त्यावेळी भयंकर पुरात लोखंडी पूल वाहून गेला होता. यावरून जून २०१३ मधील भयंकर प्रलयाची  व्याप्ती सहजपणे लक्षात येत होती. याच रामबाडा येथील मंदाकिनी नदीच्या सध्याच्या पुलावर उभे राहून आम्ही फार वेगात फोटो काढून घेतले,कारण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीला सांभाळत हे काम करावे लागले होते. 

रामबाडा हून आम्ही पुन्हा बाबा केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो. आता खूप उंचाकडे  चालताना आपला असलेला सर्व अहंकार बाजूला ठेवून मार्गक्रमण करत करत पुढे जात होतो. आपल्या आयुष्यात पण ज्यांना उंचीकडे जायचे असते त्यांना देखील आपला असलेला तथाकथित अहंकार बाजूला ठेवूनच मार्गक्रमण करायचे असते हाच संदेश रामबाडा येथून पुढचा प्रवास करून देऊ लागला होता.

वंदे मातरम्
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ११ /९ /२०२३, श्रावण मास, चौथा सोमवार.

क्रमशः

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ३)


 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️


 देवभूमी..! 🕉️

(भाग क्रमांक ३)


===================================


हरिद्वारहून सकाळी नऊ वाजता निघाल्यापासून ते थेट दुपारी बारा वाजेपर्यंत आमचा बस प्रवास सुरूच होता.दुपारी उंचच उंच असणाऱ्या पर्वत रांगातील घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवणं आटोपली होती. साधारणतः अर्धा तास थांबून आमचा बस प्रवास पुन्हा सुरू झाला होता. आमची बस संध्याकाळी पाच वाजता सोनप्रयाग येथे पोहोचणार होती. मात्र हे वेळापत्रक रस्त्यावरील ट्रॅफिक जाम अन् इतर काही नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती जर आली तर पोहोचण्याचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडून पडणार होते.


केदारनाथ बद्रीनाथ रस्त्यावरील प्रवासात सर्वात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. त्याचं कारण रस्त्याच्या रुंदीकरणाला असणारी मर्यादा अन् आहे त्या रस्त्यावर एकमेकांना समजून घेत वाट मोकळी करून देणारे विविध वाहनांचे चालक..! मला या प्रवासात एक खूप चांगला अनुभव हा आला की, चार चाकी वाहन चालक अजिबात कट न मारता आपली वाहने चालवत होती.विशेषत: समोरून जर एखादे चार चाकी वाहन आले तर सामंजस्याची भूमिका घेऊन कोणत्यातरी वाहनाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणे होय. माणसाच्या आयुष्यात उपलब्धता कमी असली की, तो आहे त्या परिस्थितीत समजूतदार होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण होते. याच्या उलट आपल्या इतर मैदानी प्रदेशात रस्त्याच्या मार्गांची उपलब्धता भरपूर किंवा बऱ्यापैकी मोकळी असते.एवढे असूनही आपल्या परिसरात चालक समोरच्या वाहनाला कट मारण्यात ड्रायव्हर कुळातील काहीजण पुरुषार्थ समजतात..! अर्थात याला जे अपवाद आहेत ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.


पर्वतीय प्रदेशातील घाट रस्त्यावरून प्रवास करत असताना ज्याचा प्रवाश्यांना  नेहमी मानसिक अन् शारीरिक त्रास होतो तो म्हणजे ट्रॅफिक जाम मध्ये अडकणे होय.त्या मानसिक अवस्थेत आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. हवेत खूप गारवा जाणवत होता.आता आपण हिमालयाच्या भौगोलिक वातावरणात आलो आहोत याची थंडगार हवेच्या स्पर्शाने जाणीव व्हायला लागली होती. स्पर्श हा बोलका असतो, याची जाणीव हिमालयाच्या थंडगार हवेच्या स्पर्शाने झाली होती. बस मध्ये बसून बसून पाय एकसारखे राहिल्यामुळे काहीसे अवघडून गेले होते.साधारणतः एक तास आमची बस उत्तर काशीच्या अलीकडे ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती.अखेर ट्रॅफिक जाम हळूहळू सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती. आमच्या बसचा पुढील प्रवास सुरू झाल्याने मनात खूप हायसे वाटले होते.


आकाशात काळ्याशार ढगांची गर्दी दिसू लागली होती. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकत अडकत आमचा बस प्रवास सुरू होता.अखेर सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुर पार्किंग येथे आमची बस रात्री ८:३० वाजता पोहोचली होती.पाऊस सुरू झाला होता.थंडगार वारा, त्यात पावसाचे थंडगार थेंब यामुळं शरीर अजून गारठून जायला लागले होते. वास्तविक आमची बस सोनप्रयाग पर्यंत जाणार होती.आमचा शेवटचा थांबा तोच होता,परंतु पुढे प्रचंड गर्दी असल्यामुळे सर्व वाहने सीतापुर येथच थांबवली जात होती. उतरल्यावर सोबतच्या सर्वांना आवश्यक त्या सूचना अन् चालण्याचा क्रम ठरवून दिला होता. अंधार पडला होता.मी सर्वात पुढे हातात विजेरीचा (बॅटरी)  प्रकाश सुरू करुन मार्गस्थ झालो होतो. उर्वरीत सर्वजण क्रमाने येत होते.थंडी, पावसाचे थंडगार थेंब अन् वाहनांच्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही सर्वजण पुढे पुढे सोनप्रयागच्या दिशेने निघालो होतो. वेगात चालणे आवश्यक होते, कारण सोनप्रयाग येथील लोखंडी पुलाच्या जवळील जीप स्थानकावरून जीपने गौरी कुंड येथे मुक्कामी पोहोचणे आवश्यक होते. रात्री दहा नंतर वर जाण्यास समस्या येऊ शकली असती. जर यदा कदाचित समस्या निर्माण झाली तर उघड्यावर कडाक्याच्या थंडीत सर्वांचीच तारांबळ झाली असती.


साधारणतः तीन किलोमीटर अंतर पायी चालत गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस मामांना गौरी कुंड येथे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विचारले.त्यांनी आमची आवश्यक ती कागदपत्रे बघितली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे का याविषयीची कागदपत्रे बघितली. तेंव्हा कुठे त्यांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. पोलिस मामांनी आवर्जून सांगितले की, लवकरात लवकर जा..! तुम्हाला अगोदरच उशीर झाला आहे. अर्थात त्यांनी हे हिंदीतून सांगितले होते.पुन्हा वेगाने पायी  प्रवास सुरू केला अन् जीप स्थानकावर पोहोचलो.जीप उभीच होती.आम्ही सर्वजण त्यात बसलो अन् साधारणतः रात्री ९:१५ वाजता सोनप्रयाग येथून गौरी कुंड कडे प्रस्थान केले. सोनप्रयाग ते गौरी कुंड हा प्रवास खूपच नागमोडी वळणे घेत घेत सुरू होता. रात्रीचा अंधार असल्यामुळे बाजूच्या खोल खोल दरीतील काहीही दिसत नव्हते. दिसत होता,फक्त जीपच्या लाईटच्या प्रकाशातील समोरचा रस्ता अन् समोरून येणारी वाहने.सोनप्रयाग ते गौरी कुंड या मार्गावर फक्त जीपला प्रवास करण्यास परवानगी होती. जीप मालक बहुतांशी पहाडी क्षत्रिय राजपूत कुळातील होते. त्यांची देहबोली अन् वंदनीय योगी आदित्यनाथ यांच्या विषयी असलेली त्यांची परम श्रद्धा त्यांच्या बोलीतून जाणवत होती.


रात्री साधारणतः १०  वाजता गौरी कुंड येथील जीप स्थानकावर पोहोचलो होतो.तिथून पुढे पुन्हा पायी चालत जावे लागणार होते.पुढे जीप प्रवास करण्यास परवानगी नव्हती.आम्ही पुन्हा त्याच नियोजित क्रमनुसार चालते झालो होतो.आता थंडीचा कडाका भयंकर जाणवायला लागला होता. गौरी कुंड येथील एका अरुंद गल्लीच्या गर्दीतून आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो होतो.रात्रीचे साधारणतः १०:३० वाजले होते.अधून मधून पावसाचे अतिशय थंडगार थेंब पडत होते.रात्रीचे जेवणं मुक्कामाच्या ठिकाणीच उरकून घेतली.पाणी पिल्या जात नव्हते. अतिशय थंडगार पाणी होते.


जेवणं आटोपली होती. दिवसभराचा प्रवास अन् त्यातून शारीरिक एकच स्थिती त्यामुळं अंग कडक झाल्यासारखे जाणवत होते.रात्रीचे अकरा वाजले होते.उद्या पहाटे चार वाजता उठायचे असे नियोजित झाले होते.


गौरी कुंड येथे आपण महादेवाच्या घरी वास्तव्य करत आहोत हा सुखद अन् श्रद्धेय अनुभव घेत घेत शरीर अंथरुणावर टाकून दिले अन् आस लागली होती, उद्याची..! उद्या आपण आयुष्याचे चिरंतन सत्य असलेल्या मृत्यूच्या इष्टला म्हणजेच महादेवाला भेटायला जाणार आहोत याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.स्मशानातील सत्य अन् त्याच शाश्वत सत्याचा स्वामी केदारनाथ  महादेव याची कधी भेट होईल अन् कधी नाही याची श्रद्धेय आतुरता लागली होती. झोपेपूर्वी मी, माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलांनी जन्मभूमी पालखेड येथील  ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेव अन् संत जनार्दन स्वामी महाराज यांचा मनोभावे श्रद्धेने जयजयकार केला अन् झोपी गेलो..! 


वंदे मातरम्

हर हर महादेव..!🙏🏻🕉️👌


एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ४ /९ /२०२३, श्रावण मास, तिसरा सोमवार.

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

समजूतदारपणा की न्यूनगंड..?


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


समजूतदारपणा की न्यूनगंड..?


===================================


मी आज सकाळी दिनांक १/९/२०२३, शुक्रवार रोजी वर्गात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली होती.हजेरी घेऊन झाल्यावर अध्ययन अध्यापन आटोपले होते.मी वर्गाच्या बाहेर पडणार इतक्यात वर्गातील विद्यार्थ्यांमधून एकाचा कुणाचा तरी आवाज आला..

" सर, आज पवनचा वाढदिवस आहे...!"

हे वाक्य कानी पडताच मी, वर्गातील शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या पवन कडे बघू लागलो. मी पवन यास म्हणालो की,

" का रे बेटा पवन, सकाळी परिपाठाच्या वेळी का बरं नाही सांगितले की, माझा वाढदिवस आहे म्हणून.! आपण त्याचवेळी तुझे अभिनंदन केले असते ना..!" 

शाळेतील परंपरेनुसार ज्यांचा वाढदिवस असतो, त्यास परिपाठाच्या वेळी शुभेच्छा देण्याचा रीतिरिवाज असल्याने मी तसे बोललो.

यावर पवन काहीही बोलला नाही.मला वाटलं आजारी आहे की काय म्हणून मी त्यास पुन्हा विचारले की, " का रे का बरं नाही सांगितले..?" तो थोडासा उदास दिसत होता.

शेवटी वर्गाचा वर्गप्रमुख अनिकेत गोरे मला म्हणाला...

" सर, मुलांना वाटण्यासाठी त्याच्याकडे चॉकलेट नव्हते, म्हणून त्याने आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून सांगितले नाही..!"


हे ऐकून मन गहिवरून आलं. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांच्या जाणीवा जागृत ठेवून आपला आनंद झाकून ठेवणारी देखील मुलं असतात हे मी प्रत्यक्ष बघत होतो. बहुतांशी आर्थिदृष्ट्या गरीब विद्यार्थी आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीमुळे कमालीची समजूतदार झालेली असतात याची जाणीव झाली होती. आपल्या पालकांची परिस्थिती अन् त्यानुसार निर्णय घेणारी अशी कित्येक मुले आहेत. पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अन् त्यातून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने घेतलेला निर्णय बघून मला खूप गहिवरून आले होते. त्याचा हा समंजसपणा होता की न्यूनगंडाची भावना..?  या विचारता मी पडलो होतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर असे जाणवले की,आपल्या अवतीभोवती असणारा मानवी घटक आपापल्या आर्थिक परिस्थिती नुसार उपक्रमाचा आनंद घेत आहे.मात्र माझी परिस्थिती तसा आनंद घ्यायला मला परवानगी देत नाही.त्यामुळं मी माझा आनंद असाच गुदमरून टाकणार. तो आनंद काहीतरी वस्तू आनंदाने कुणाला तरी देऊन साजरा करणार तर नाहीच,पण तो आनंद व्यक्त सुध्दा करणार नाही या मानसिक अवस्थेत असे कित्येक विद्यार्थी आपलं आयुष्य जगत आहेत. हा मनोभाव अशा कित्येक सर्व सामान्य परिस्थिती मधील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात येत असणार. पवन त्या समस्त विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत होता.


माझ्या नजरेसमोर लगेच शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले चॉकलेट अन् ते दृश्य आले. ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटले होते त्याचे कारण एकतर त्यांच्या घरच्यांनी त्यासाठी पैसे दिले होते किंवा मुलांनी हट्ट करून ते आणले होते. त्यामुळे त्यांना चॉकलेट वाटप करणे शक्य झाले होते.मात्र पवनची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कदाचित त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी इच्छा असूनही चॉकलेट वाटप करणे शक्य झाले नव्हते. 


ज्यावेळी शाळेतील काही विद्यार्थी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपला जन्मदिन साजरा करतात, त्याचवेळी त्याच शाळेत असाही एक मानवी घटक असतो, जो हे असे आर्थिक भुर्दंड बसणारे उपक्रम साजरे करू शकत नाही. विशेषतः सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात त्या शाळेतील काही शिक्षक देखील दणक्यात वाढदिवस साजरा करत असलेली आपण बघत असतो. नव्हे नव्हे ती एक परंपरा बनू पाहत आहे. आपण ज्या सामाजिक अन् भौतिक परिसरात वावरत असतो, तिथल्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीनुसार निर्णय घेणारी पिढी हरवत चालली आहे का..? हा उथळ चंगळवाद आहे का..? त्याचवेळी त्याच भौतिक परिसरात विद्यार्थ्यांचा  असाही एक गट असतो, जो की हे असे खर्चिक उपक्रम तो साजरे करू शकत नाही.तो विद्यार्थी अशा  खर्चिक उपक्रमाच्या  प्रसंगी स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण करून मानसिकदृष्ट्या औदासीन्य अवस्थेत जात असतो.ज्या शाळेत मूळात आर्थिक संपन्न किंवा मध्यमवर्गीय पालकांची पाल्ये शिकत असतात तिथल्या विद्यार्थ्यांत अशी मानसिक औदासीन्य असलेली वृती दिसून येणार नाही,कारण तिथल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या नसल्यात जमा असतात.मात्र याउलट सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या पालकांची मुले ज्या शाळेत शिकत असतात तिथं मात्र याचा विरोधाभास दिसून येत असतो.


शिक्षक - शिक्षिका यांनी देखील सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या मुलांच्या समोर स्वतःचा भंपक म्हणून मिरविणारे खर्चिक वाढदिवस साजरे करू नये. तरच शाळेच्या कोपऱ्यातील नाजूक अन् परिस्थितीने गांजलेले निरागस मन सृजनशील होऊन त्यांच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे असे काही शिक्षक अन् शिक्षिका माझ्या  पाहण्यात आलेले आहेत, ज्यांनी त्यांचा जन्मदिन शाळेत धुमधडाक्यात साजरा केलेला आहे. ज्यांची वाढदिवस साजरा करण्याची क्षमता नाही,अशा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आर्थिक, सामाजिक दुर्बल निरागस मनांना / विद्यार्थांना अशावेळी काय वाटले असेल..?

माझ्या आज पर्यंतच्या अठ्ठावीस वर्षाच्या शिक्षकी सेवेत अद्याप पर्यंत तरी विद्यार्थ्यांच्या समोर भंपक वाढदिवस साजरा केलेला नाही. नव्हे नव्हे मी शाळेत माझा वाढदिवस साजरा केलेलाच नाही. याचा एकच प्रांजळ हेतू असा की, आपल्या अवतीभोवती असलेले निरागस अन् आर्थिक , सामाजिक परिस्थितीने रंजलेले गांजलेले बालमन न्यूनगंड अवस्थेत जाऊ नये. यात मी माझा मोठेपणा मिरवत आहे असे कृपया कुणीही समजू नये ही नम्र अपेक्षा.🙏


ता.क. - वरील लेखातील मत माझे वैयक्तिक आहे.कृपया कुणीही वैयक्तिक घेऊ नये ही नम्र अपेक्षा..!🙏🏻


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १ सप्टेंबर २०२३, शुक्रवार, शुभ रात्री.