शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

" आम्हीच आमचे मापं घेतो..!"



"""""""""" आमचे गाव, आमची माणसं..! """"""""""

" आम्हीच आमचे मापं घेतो..!"
____________________________________________
                   
आज दिनांक २९/११/२०१६ रोजी माझी जन्मभूमी पालखेड, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे श्री. पारेश्वर महादेव यात्रेनिमित्त आम्ही बालमित्र एकत्र भेटलो...! बालमित्रांसमवेत....!

आम्ही सर्व शाळा, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहोत मात्र गावच्या यात्रेनिमित्त एकत्र आल्यावर आपआपल्या पदांचे मूखवटे बाजूला ठेवून जमिनीवरील जीवनाचा अनौपचारिक नात्यातील गोडव्याचा आनंद हमखास घेतोच...!एकमेकांचे मापे घेत.. घेत जगतो..!

हीच एक सुवर्णसंधी असते,आपण नेमके कुठे चुकत आहोत,हे समजून घेण्याची..कारण,आम्ही एकमेकांची प्रत्येक विषयांवर प्रत्येकाची  उचलपटक करतो..!😂 एकमेकांचे गुणदोष दाखवतो. बाहेरच्या औपचारिक आयुष्यात जगतांना,आम्हाला विशिष्ट पदांमुळे खूप औपचारिक जगावे लागते..!मात्र गावात...कसं सगळं मोकळचाकळ असतं..!आम्हीच आमचे मानसोपचारतज्ज्ञ असतो..!आम्हाला झालेल्या विविध बाधांवर उपचार करणारे..! असे आम्ही..आमचेच मापं घेतो..!😂

जेंव्हा पासून आम्हाला या औपचारिक जीवनाचा स्पर्श झाला,तेंव्हा पासून ज्या..ज्या  वेळी आम्हाला मानसिक अस्वस्थपणा जाणवतो तेंव्हा..तेंव्हा  आम्हाला याच आठवणी औपचारिक आनंद घ्यायला शिकवितात..!कधी..कधी खूप कंटाळा येतो या औपचारिक जीवनाचा..! मग त्यावर एकच औषध...अन् ते म्हणजे आम्ही एकत्र घालवलेले आमच्या आयुष्यातील अमूल्य क्षण..! मग त्यात मी ,विजू,आण्णा म्हस्के, बाळू माळी, संजय राऊत..सोमनाथ गायकवाड आम्ही जरा जास्तच आतुरलेले असतो...ते क्षण जगायला... कारण आम्ही गावात सरासरी गावाच्या यात्रेलाच जातो..! बाकीचे फोटोतील आमचे बालमित्र...गावातच राहतात किंवा अधून मधून बऱ्याचदा त्यांचा एकमेकांशी संपर्क असतो..!

वंदे मातरम्

त्यातील एक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

फेसबुक वर लेखन दिनांक:२९ नोव्हेंबर २०१६ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २९/११/२०१९

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

" जत्रा अन् यात्रा...!" 😊




चिंतन

" जत्रा अन् यात्रा...!" 😊
=================================

काही मराठी शब्दांचा अर्थ मराठी माणसाने आपल्या सोयीने लावून घेतला आहे असे वाटते..! 
जसे की...जत्रा...अन्..यात्रा...!

कुणी म्हणत जिथं पशू हत्या होते ती जत्रा अन् जिथं फक्त शाकाहारी नैवैद्य दाखविला जातो ती यात्रा..!
मुळात कोणताही देव किंवा देवता ही पशू हत्या होऊन तिच्या मासाची अपेक्षा कधीही करत नाही..! माणसांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देवादिकांच्या नावाने हा प्रकार सुरू केला आहे...!😊
मी काही गावातील जत्रा अशा ही पाहिल्या आहेत,ज्या तेथील लोकांच्या जिभेच्या मांसाहारी चवीनुसार तेथील जत्रांच्या तारखा ठरवितात..! जसे की,ज्या दिवशी मांसाहार चालत नाही त्या दिवशी त्या देवेदिकांची जत्रा आयोजित करणे..! म्हणजे सगळं कसं माणसाच्या सोयीने..!

मुळात माणसाच्या शरीराची ठेवण,अवयव यांची रचना पाहता माणसाला मासाहारी प्राणी का म्हणावे किंवा तो मांसाहार का करतो हाच मूलभूत प्रश्न आहे..!😊
कदाचित अश्मुयुगात इतर खऱ्या मांसाहारी प्राण्यांच्या मांस खाण्याची रित पाहून माणसाला मांस खाण्याची
" सवय " लागली असावी...! खरे मांसाहारी प्राणी व खरे शाकाहारी प्राणी  यांची शारीरिक ठेवण व आहार खाण्याच्या पद्धतीत खूप काही मुलभूत फरक असतो...!
मग अशा दोन्ही गटातील प्राण्यांच्या आहार खाण्याच्या पद्धतीत व शारीरिक ठेवणीत दिसणारा फरक पाहिल्यास सहजपणे लक्षात येते की,माणूस नेमका कोणता प्राणी आहे....शाकाहारी की मांसाहारी...?😊
( ज्याने त्याने दोन्ही गटातील प्राण्यांच्या सर्व पद्धती पाहून आत्मचिंतन करावे..!😀)

मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..त्यावर मला काहीही म्हणायचे नाही..! काहींच्या भौगोलिक वातावरणानुसार त्यांनी तो ठरवला आहे हेही मान्य .! मात्र मुख्य मुद्दा असा की, जसं आपल्या मांसाहारी चवीनुसार देवादिकांच्या जत्रांच्या तारखा माणूस आपल्या सोयीने ठरवतो...अगदी तसाच काहीसा प्रकार जत्रा अन् यात्रा या मराठी शब्दांचा आहे असे मला वाटते..! अन् अशा प्रथेतूनच जत्रा अन् यात्रा या दोन्ही मराठी शब्दांचा अर्थ माणसाने आपल्या सोयीने ठरवून घेतला आहे..!

माझा मूळ पिंड खेड्यातील आहे.आजही खेड्यातील सर्व सामान्य माणसाला जत्रा अन् यात्रा यातील फरक माहीत नाही..! बहुदा त्यांना माहीत नसणे हेच खरे उत्तर आहे..! ही माणसं फक्त आनंद घेतात अशा उत्सवांचा ..! त्याच्या खोलावर जात नाही..! मी अशाच खेड्यातील सर्व सामान्य माणसांचा एक सर्व सामान्य प्रतिनिधी आहे...जत्रा...किंवा यात्रा म्हणणारा...!😊

ता.क.: माणूस हा एकमेव प्राणी असा आहे,ज्याने इतर प्राण्यांच्या सगळ्याच प्रांतात बळजबरी शिरकाव केला आहे..!
थोडक्यात सगळ्यात दृष्ट  आणि दुसऱ्यात हस्तक्षेप करणार प्राणी माणूस आहे का..?😊
वंदे मातरम्....!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२९/११/२०१९

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

यक्कु...उपाख्य एकनाथ भोईटे..!



आमचे गाव आमची माणसं..!

यक्कु...उपाख्य एकनाथ भोईटे..!
=================================

याच्यावर माझे अन् माझा प्रिय बालमित्र विजय गायकवाड
( ह. मू.वैजापूर) चे लई प्रेम आहे..!

आमच्या प्रेमाच्या तारा कोणे एकेकाळी बहुदा तब्बल वीस वर्षापूर्वी जुळल्या होत्या..! त्या आजतागायत कायम आहेत..! त्या तारा का...अन्..कशा जुळल्या...त्या..आम्हालाच माहीत नाही हे विशेष आहे..!

याला कोणे एकेकाळी मी अन् विजूने  प्रेमाने आमच्या गावातील कार्तिकी यात्रेत बळजबरी  शेव,चिवडा,लाडू,जिलेबी इत्यादी पदार्थ खाऊ घातले होते..!
ठिकाण होते...विजूच्या किराणा दुकानाचा ओटा...!आता त्या ओट्याचे कोणतेही अवशेष कुणालाही अजिबात सापडणार नाही..! अगदी अयोध्येत उत्खनन करणाऱ्या टीम ला सुध्दा..!😊

एवढा आग्रह ,मी अन् विजू आमच्या आयुष्यात कुणालाच करू शकणार नाही..! हा एक्कू...खूप नम्र स्वभावाचा आहे..! हा..कधीही कुणाच्याही अन् कोणत्याही भानगडीत पडत नाही..!आपण भलं अन् आपलं काम भलं...या विचाराचा हा आमचा एकनाथ..! घरची परिस्थिती जेमतेम आहे..! मात्र आमचा एकनाथ मनाने खूप श्रीमंत आहे..!मी अन् विजू ,आमच्या पालखेड गावातील ज्या मोजक्या माणसांवर निरपेक्ष प्रेम करतो त्यापैकी हा एक...एकनाथ..उपाख्य एक्कू..!

काल कार्तिकी यात्रेला मी गेल्यावर याची आवर्जून भेट घेतली.यानेही विजुची खूप प्रेमाने आठवण काढली..!
कारण विजू काल ,यावर्षीच्या यात्रेला आला नव्हता...!
मित्रा विजू,खास तुझ्यासाठी...आपल्या या मित्राचा फोटो अन् त्यावर लेख...!

ता.क.: आमच्या गावातील काही माणसं अशी आहेत,ज्यांना भेटल्याशिवाय गावाला भेट दिल्याचे आत्मिक  समाधान  मला अन् विजुला मिळत नाही..! त्यापैकी हा एक....एकनाथ..उपाख्य एक्कू..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२७/११/१९

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

" आम्हाला माहीत नाही..!"



आमचे गाव,आमची माणसं..!

" आम्हाला माहीत नाही..!"

==================================
                       
हसण्यातील कंजूसपणा काय असतो हो..?                           
आम्हाला माहीत नाही..!
                                                       
अहंकार काय असतो हो..?                                                 
आम्हाला माहीत नाही..!                                                     

जातीच्या अहंपणाचा " टेंभा " मिरवीणे काय असते हो..?         
आम्हाला माहीत नाही..!                                                             

पैशाचा माज काय असतो हो..?                                           
आम्हाला माहीत नाही..!                                                   

बुद्धिमत्तेचा गर्व काय असतो हो..?                                       
आम्हाला माहीत नाही..!                                                   

कपटीपणा काय असतो हो..?                                               
आम्हाला माहीत नाही..!                                                           

प्रौढ झाल्यावर उगीचच प्रौढपणाचा खोटा " आव " आणणे काय असते हो..? .                                                    आम्हाला माहीत नाही..!(विशेषकरून आम्ही एकमेकांना भेटल्यावर..!😂)                                                                                   

शहाजुका सारखे वागणे काय असते हो..?                             
आम्हाला माहीत नाही..!                                                           

आपण दूर गेलो म्हणजे विसरणे काय असते हो..?                   
आम्हाला माहीत नाही..!                                               

भूतकाळातील गमती जमती विसरणे काय असते हो..?           
आम्हाला माहीत नाही..!                                                     

एकमेकांना भेटल्यावर उगीचच शिष्टाचारयुक्त बोलणे काय असते हो..?                                                                     
आम्हाला माहीत नाही..!                                                         

आपण प्रौढ झाल्यावर स्वतःतील बालपण विसरणे काय असते हो..?                                                                       
आम्हाला माहीत नाही..!                                                   

एकमेकांच्या, सर्व चवींच्या आठवणी विसरणे काय असते हो..?  आम्हाला माहीत नाही..!                                                             

प्रौढ झाल्यावर एकाच डब्ब्यात दोघांनी जाण्याची लाज वाटणे..?     
 आम्हाला माहीत नाही..!
( ते दोघे फक्त आम्ही यातील दोघेच..!😂)         

आम्ही कुठेही स्थायिक झालो तरी,जन्मभूमी विसरणे..?         
आम्हाला माहीत नाही..!!
                                     ‌  ‌‌               

ऐनवेळी काहीतरीच व्यक्त करणारा तात्पुरता कवी ?:
                     
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव,पालखेडवाले.
वंदे मातरम्..!

ता.क.: इतक्यात प्रेक्षकांंमधून आवाज  आला,
" अरे...कविता संपली का रे.....?

त्यामुळे मी थांबतो आता..!नाहीतर कविता लई मोठी होती..!!
😂😂

                                                                                                                                            असे आम्ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना  " शाखा-पालखेड  चे स्वयंघोषित पदाधिकारी..!
ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना " इ .स. १९९० च्या दशकात पालखेड येथे कुठेही नोंद न करता स्थापन झालेली आहे..!

सर्व पदाधिकाऱ्यांचा कुणाला परिचय हवा असल्यास पालखेड नगरीत जेंव्हा काही धार्मिक,सांस्कृतिक इ.कार्यक्रम असेल तेंव्हा सर्वांचा असाच मोकळा चाकळा परिचय करून देण्यात येईल...!कारण यातील बहुतांशी तेंव्हाच भेटतील..! कारण यातील बहुतांशी गावाबाहेर कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत..! अर्थात यातील कुणाचाही चेहरा लक्षात ठेवून संपर्क केला तरी चालेल..!

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही..!बहुदा इतर कुणाचीही अशी संघटना असेल अशी जवळ जवळ शक्यता नाही..! योगायोगाने असल्यास त्या व आमच्या संघटनेचे विलीनीकरण करण्याचे सर्वाधिकार आम्हा सर्वांकडे राखून ठेवण्यात आले आहे..!

 तर.. त्वरा करा व संपर्क साधा..! जागा मर्यादित आहेत..!!

                               ‌‌                                ‌                                                        " मोकळ्या चाकळ्या बालमैत्री संघटनेचा फक्त पालखेड शाखेचा एक पदाधिकारी व लेखक व कधी मधी गद्यातून पद्य लेखन करणार तात्पुरता कवी ? : 
                           
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले
वंदे मातरम्

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २५ नोव्हेंबर २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २५/११/२०१९

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

" का, हो सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" का, हो  सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"
==============================

माझ्या आज पर्यंतच्या साडे चोवीस वर्षाच्या शिक्षकी आयुष्यात सर्वच विद्यार्थी खूप चांगले मिळाले.मात्र त्यातील काही विद्यार्थ्यांनी अगदी छोट्याश्या प्रसंगातून आपल्या निरागस ,निष्पाप निव्वळ प्रेम ,मानवाची सुंदर संस्कृती जिला माणुसकी असे म्हणतात या अमूल्य अशा सद्गुणांनी मला विशेषकरून प्रभावित केले..! त्यात बऱ्याच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी आहेत.

जि.प.प्रा.शा.एकलहेरा,ता.गंगापूर,जि.औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून सेवा करत असताना, अनेक प्रेमळ मुलं ,मुली असेच मायाळू भेटले.मात्र त्यात असाच एक खूप प्रेमळ मुलगा मला माझ्या आयुष्याच्या वाटेवर  एक प्रेमळ प्रवासी म्हणून भेटला ज्याच्या वयाच्या मानाने त्याच्यात खूप समजूतदारपणा जाणवत होता.तो छोटासा प्रिय विद्यार्थी होता चिरंजीव भावेश संतोष औसरमल..!

हा  चिरंजीव भावेश इ.३ रीला शिकत  होता.मी सकाळी शाळेत गेल्या गेल्या माझ्याकडे धावत यायचा..!तसे बरेच मुलं माझ्या वयोवृध्द दुचाकीकडे धावत यायचे..! हा भावेश,तत्कालीन इ.३ रीचा वर्गप्रमुख ( मॉनिटर ) होता.त्यांना शिकवायला होते, आईच्या मायेचे प्रिय कल्याणराव डमाळे सर..!हा भावेश सरांना वर्गात शैक्षणिक उपक्रम घ्यायला खूप मदत करत असायचा. हा प्रिय भावेश त्या वर्गाचा एक छोटासा पण खूप निरागस शिक्षकच मला जाणवत असायचा..!मला जर यदा कदाचित एखाद्या दिवशी विषण्ण वाटायला लागलं की,मी इ.३ रीच्या वर्गात जाऊन स्वतः मधील बालक जिवंत करत असायचो..!

मी या वर्गाला अध्यापन करायला नव्हतो.मात्र मायेच्या नात्याला वर्ग मर्यादित करूच शकत नाही..! कितीतरी वेळा हा प्रिय भावेश,माझ्या वर्गात यायचा अन् फक्त भेट घेऊन पुन्हा त्याच्या वर्गात निघून जायचा..!दुपारच्या मध्यांतरच्या सुट्टीत चिरंजीव भावेश याने एकदा एका छोट्या डब्यात काहीतरीआणले होते.त्यानं मला एकलहेरा येथील लक्ष्मी माता मंदिरात शोधलं,प्रत्येक वर्गात शोधत शोधत तो, मी ज्या वर्गात बसलेलो होतो तिथं आला.मी जो पर्यंत एकलहेरा येथे नोकरीला होतो तो पर्यंत नेहमी दुपारच्या दीर्घ सुट्टीत एकतर एकलहेरा गावातील लक्ष्मी माता मंदिरात जाऊन निवांत बसायचो किंवा वर्गात एखादं पुस्तक वाचत..! पुस्तकं अन् मंदिर या ठिकाणी आपल्यातील बरच काही सापडतं... असं माझं वैयक्तिक मत आहे..!

भावेश  वर्गात आल्या आल्या मला म्हणाला..
" का, हो  सर..तुम्हाला कव्हापासून पाहू राहिलो मी..!"
मी वाचत असलेले पुस्तक बाजूला ठेवले अन् त्याला म्हणालो..
" का...रे काय झालं..? कुणी मारलं का..?"
भावेश- " नाही हो सर..! हे डब्ब्यात मी ,तुमच्यासाठी दही आणले आहे,घ्या बरं..!"
मी- " अरे,तुला कुणी सांगितलं होतं दही आणायला..? जा घरी ठेवून ये पुन्हा..!"
भावेश- " सर,मी माझ्या आजीला विचारून आणले आहे,आजीला म्हणलं, मला जाधव सरला दही न्यायचे आहे नेऊ का..? तर आजी म्हणली जाय घेऊन..!"
मी- " अरे,बेटा,मी तुला द्यायचं असतं ,पण तूच मला देत आहेस..! नको,जा...घरी  अन्  घरी ठेवून ये दही..!"
भावेश  -" नाही हो सर..! तुम्ही आत्ताच्या आत्ता दही खावून घ्या,मंग डब्बा घरी घेऊन जातो..! किंवा घरी घेऊन जा..!"
मी त्याला खूप खूप समजावून सांगितले पण पठ्ठ्या ऐकायचं नाव घेत नव्हता.अखेर  मला त्यानं आणलेलं दही मुकाट्यानं पिऊन घ्यावं लागलं..!

हीच ती मुलं असतात,ज्यांच्या अंतर्रमनात  सदैव प्रेम,वात्सल्य अन् माया यांचा अंकुर सदैव प्रफुल्लित होत असतो..! मी प्रिय भावेशच्या आग्रही मायेनं खूप भावूक झालो होतो.मी थोड्या वेळाने मोठ्या वर्गातील एका मुलाला बिस्कीट पुडा आणायला सांगितला.वर्ग भरल्यावर पुन्हा भावेशला माझ्या वर्गात बोलावून घेतले अन् त्याला बिस्कीट पुडा देऊ केला,तर त्याने घ्यायला चक्क नकार दिला.मग मी त्याला म्हणालो...
" का...रे..तू आग्रहाने मला दही पाजले अन् आता तू माझ्याकडून बिस्कीट पुडा घ्यायला नकार देतो..! घे हा बिस्कीट पुडा..!"
यावर प्रिय भावेशला बहुदा जाणवले असावे की,कोणालाही प्रेमानं,मायेनं केलेल्या आग्रहाचं प्रत्युत्तर त्याच प्रेमानं,मायेनं होत असतं..! फक्त तो हे शब्दात व्यक्त करू शकत नव्हता..! अर्थात प्रत्येक माणसं या तत्वात बसत नाहीत.कारण बऱ्याच माणसांना कितीही प्रेम ,माया द्या..! ते त्यांचं कृतघ्न मनाचं विकृत रूप सोडतच नसतात..! मात्र आमचा प्रिय भावेश संतोष औसरमल याला नक्कीच अपवाद होता..!

मी जो पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहेरा, ता.गंगापूर येथे कार्यरत होतो तो पर्यंत आईच्या मायेच्या सुसंस्कारित माझ्या मुली देखील भेटल्या..!

आज मी माझ्या सध्याच्या अंधारी शाळेत कार्यरत आहे.येथेही मला अनेकानेक चिरंजीव भावेश भेटले आहेत,माझ्या अनेक मायाळू मुली देखील भेटल्या आहेत.त्यांच्यात तोच भावेश सतत दिसत असतो.  एकाच स्वभावाची माणसं दुसरीकडे  सतत आपल्याला भेटत असतात,फक्त आपण त्या माणसांच्या भावविश्वात खोलवर रुजलेलो असायला हवे..!

ता.क.: त्यावेळी माझ्या मुलाने केलेल्या मायेचा जो तृप्तीचा ढेकर मला आला होता,त्याची प्रेमळ चव अद्याप माझ्या जिभेवर अन् अंतर्रमनात  आहे..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १९ नोव्हेंबर २०१९, मंगळवार

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

" हे खळगुटा, तुझ्याविषयी असे मला वाटते..!"




चिंतन

" हे खळगुटा, तुझ्याविषयी  असे मला वाटते..!"
_______________________________________

कुणी याला खळगुट म्हणते..!
कुणी याला शेंगदाण्याची आमटी म्हणते..!

मात्र एक आहे... या कालवणाची सर...अमृत घुसळून केलेल्या कोणत्याही कालवणाला अजिबात यायची नाही..
असे मला वाटते..!

बहुदा जेंव्हा माणूस पातळ कालवण बनविण्याची  ही  सुगरण पाककला शिकला असेल..तेंव्हा हेच खाळगुट पहिल्यांदा बनवले असेल...
असे मला वाटते..!

त्यातल्या त्यात याच खळगुटा सोबत जर बाजरीची भाकर असेल तर... ज्यांना या कालवणाची चव माहीत आहे त्या बहुतांशी माणसांच्या ओलसर तोंडाला पाणी सुटलेच ...
असे मला वाटते..!

जर हे खळगुट गरमागरम असेल तर कितीही थंडगार माणूस असला तरी..त्याच्या पाककलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व ग्रंथींना हमखास गरमागरम पाझर फुटलाच म्हणून समजा...
असे मला वाटते..!

आता माझ्या पाककलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व ग्रंथींना पाझर फुटला आहे..तेंव्हा आता मी माझ्या संयमित स्वभावाला तिलांजली देऊन हे खळगुट पोळी उपाख्य चपाती सोबत काला..उपाख्य कुस्करून खातो..
हे खळगुटा, तुझ्याविषयी असे मला वाटते मला वाटते..!

ता.क.: ज्या..ज्या खवय्यांच्या पाककलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व ग्रंथींना पाझर फुटला असेल..त्यांनी वेळ मिळेल तेंव्हा..हे खळगुट घरी मस्तपैकी तयार करून खावे..
असेही मला शेवटी वाटते..!😂

खळगुटाला पाहून आपल्या सर्व खाद्य ग्रंथींना पाझर फुटणारा:
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!
फेसबुकवर लिखाण दिनांक: १८ नोव्हेंबर २०१८ व,
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक:१८/११/२०१९,सोमवार

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९





चिंतन
** आपला इतिहास भाग :२ **

"  जो जिता वही सिकंदर.. असे का म्हणू मी....? "
___________________________________________

पाश्चिमात्य देशातील इतिहासात नैतिक दृष्ट्या  सक्षम नसलेल्या अलेक्झांडर उपाख्य सिकंदर ,नेपोलियन बोनापार्ट, मुसोलिनी, अडॉल्फ हिटलर इ. ते आजतागायत अनेक शासनकर्यांना त्याच पाश्चिमात्य देशांनी सर्व जगात वैचारिक दृष्ट्या यशस्वीपणे पसरविले..व जगाने स्विकारले सुध्दा..! विशेषकरून त्यांच्या आपल्या देशातील तत्कालीन मेकॉले नावाच्या त्यांच्या शिक्षण तज्ज्ञाने,त्यांचीच संस्कृतीला पोषक असलेल्या शिक्षणाला आपल्या गळी उतरवले..अन् आपण ते उतरवलेलेे पित गेलो..!

( याच मेकॉले भाऊ च्या धूर्त शिक्षण पद्धतीवर मी मागे.... माझ्या फेसबुक वॉल वर ११ फेब्रुवारी २०१८ रोजी एक उपरोधिक प्रहसन असलेला लेख लिहिला होता..! ज्या वाचकांना माझ्या प्रोफाईल वर मागे जाऊन तो लेख वाचायची " तीव्र " इच्छा असेल त्यांनी तो वरील तारखेला लिहिलेला लेख  नक्की वाचा..! )

असो.....

एवढच नाही तर पाश्चिमात्य विचारवंतांनी, अब्राहम लिंकन यांच्या पत्राला त्यांनी जगाला वाचायला भाग पाडले..अन् आम्हीही वाचत गेलो..! मला अद्याप पर्यंत " अब्राहम लिंकन चे हेड मास्तरांना पत्र " समजलेच नाही..किंवा माझी तिळमात्र ते पत्र समजून घ्यायची इच्छा नाही.कारण माझ्याच देशात त्यांच्याहून महान विद्यार्थी,शिक्षक, गरिबीला झगडून पुढे आलेले, विद्यार्थी.. उदा.  चाणक्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ.अब्दुल कलाम साहेब इ. अनेकानेकांचे संपूर्ण जगाने त्यांचे अनुकरण करून विनम्र वंदन करावे असे अनेकानेक थोर पुरुष,महिला होते,आहेत... त्यांचे अद्वितीय पत्र, साहित्य संपदा,कृतिशील कार्य असताना मग मी का म्हणून घरचं सोडून पळत्याच्या मागे धावू..?

पण आपला प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का...?
" आपल्याला घरातलं सोडून, हॉटेल मधल्या खाद्य पदार्थांचं लई मोक्कार आकर्षण..! "

मी किंवा इतरांनी त्यांची म्हणजेच आपल्या भारतातील थोरांची नावे जरी घेतली..तरी आपल्यातील
" दुसऱ्यांचे बाहुले "  झालेले  काहीजण काय म्हणतील.....

हे आमच्या जातीचे आहेत बरं का..!
हे आमच्या वंशाचे आहेत बरं का..!
हे तुच्छ जातीचे आहेत बरं का..!
हे अमक्या..समूहाचे प्रतिनिधित्व करतात बरं का..!
हे अमक्या विचारांचे आहेत बरं का..!
इत्यादी...!
आणि आम्ही इथच माती खाल्ली..!
अन् आजही खात आहोत..!

आपण मात्र..आपल्या भारतातील.... भेदाभेदीच्या,भांडणाच्या,कुरघोडीच्या इ.अनेक तुच्छ गुणांमुळे वरील सर्व पाश्चिमात्य शासनकर्त्यांपेक्षा कितीतरी पटीने सर्व बाबतीत सदा सर्वकाळ सर्वश्रेष्ठ असणाऱ्या अनेक अनेक भारतीय शासन सम्राटांना सर्व जगात वैचारिक दृष्ट्या प्रसारित करण्यात कमी पडलो आहोत...पडत आहोत...!

आजही भारतातील अनेक महाभागांना.........
" जो जिता वही सिकंदर " असे म्हणण्यात मोठ्या गर्व वाटतो..!
नव्हे..नव्हे या शीर्षकावर चित्रपट निघाला आहे हे विशेष..!
हेच वाक्य आपण...आपल्याच भारतातील  थोर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषा महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांचे नाव घेऊन का नाही म्हणू शकलो..?  जो जिता वही सिकंदर असे का म्हणू मी....?

उलट " जो जिता वही पुरुषोत्तम..!" असे आपण का म्हणू शकलो नाही..याचे कुणीच आत्मचिंतन केलेच नाही...अन्..करत सुध्दा नाही..! वास्तविक हे तेच महाराज पुरुषोत्तम होते,ज्यांनी स्वतः ला जगज्जेता म्हणवून घेणाऱ्या अलेक्झांडर ला आपला अद्वितीय भारत देश जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता..! थोडक्यात महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू हे आपल्या भारताचे पाहिले संरक्षक म्हणून आपण मोठ्या अभिमानाने त्यांचा उल्लेख करायला हवा..!

वरील छायाचित्रातील पाठ्यपुस्तक २००७ साली प्रकाशित झालेले होते.याच जुन्या इयता ६ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक ९, महाजनपदे या पाठात  पान क्रमांक ३८ वर अलेक्झांडर उपाख्य सिकंदर वर त्याच्या छायाचित्रासह एक अख्खा परिच्छेद लिहिला आहे पण..आपल्या महान भारतीय सम्राट पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांच्या विषयी एक साधी ओळ  तर द्या सोडून...एक साधा शब्दोल्लेख देखील नाही..!
दुर्दैव आपले...!

आपल्यातील बऱ्याच जणांना नेहमी परदेशातील लोकांच्याच तळ्या उचलण्यातच धन्यता वाटत आली आहे..! अगदी थेट प्राचीन भारतीय इतिहासापासून ते  आधुनिक भारताच्या अलीकडच्या राजकीय इतिहासात देखील..! तेथे आपण आपल्याच मातीतील माणसांना  पुढे करायला  का कमी पडलो..?

आता येथेच बघा..मी " जो जिता वही सिकंदर "  हेच वाक्य आपल्या भारतातील एखाद्या राष्ट्रपुरुषाचे नाव घेऊन लिहिले तर...
" अरे, हा अमक्या.. जातीचा..विचारधारेचा...धर्माचा..पंथाचा..
सांस्कृतिक चळवळीचा आहे बरं का..! हा आपला नाही..!!" असे मनातल्या मनात,कधी..कधी जाहीररीत्या म्हणून..आपण आपल्याच राष्ट्रपुरुषांच्या कार्याला मर्यादित नक्कीच करत आहोत..!

भारताच्या इतिहासाचा प्रारंभ प्राचीन भारतीय इतिहासापासून सुरू होतो.भारतावर पाहिले परकीय आक्रमण करणाऱ्या क्रूर आलेक्झांडर ला रोखणाऱ्या आपल्या महाराज पुरुषोत्तम यांच्या अनेक मूल्यांचे अनुकरण कळत नकळत भारताच्या पुढील पिढीतील अनेक राजे महाराजे करत राहिली..!

आपण अशा अनेक देशहिताच्या बाबींना मर्यादित  केल्यामुळे कित्येक परकीयांचे आपल्या भारत देशावर राज्य गाजविण्याचे मनसुबे यशस्वी झाले आहेत अन् होत देखील आहेत..!फक्त माध्यमं भिन्न..भिन्न..!

आपल्या भारतात, भारतातील, आपल्याच मातीतील  अनेक थोर शासन सम्राट..थेट प्राचीन भारतीय इतिहासापासून ते आधुनिक भारताचा इतिहास व वर्तमानातील सुध्दा...यांना आपण आपल्यातील अनेक दुर्गुणांमुळे मर्यादित करून ठेवले..!

मी इतिहास तज्ञ नाही.पण सदरील  हे जुने पाठ्यपुस्तक जे की सध्याला बंद केले आहे व त्यातील हा घटक शिकवत असताना ज्या भावना सतत जाणवत होत्या त्या विषयी व्यक्त केले आहे हे कृपया सर्व वाचकांनी नम्रपणे समजून घ्यावे ही नम्र अपेक्षा..!

सध्याच्या इ.६ वी च्या पाठ्यपुस्तकात देखील सिकंदर वर अख्खा एक परिच्छेद त्याच्या फोटो सह  लिहिला आहे.
पण..महाराज पुरुषोत्तम उपाख्य पुरू यांच्या विषयी एक शब्दही उल्लेखित नाही..!
नवीन पुस्तकाचा फोटो व मजकूर या पूर्वीच्या पोस्ट केलेल्या
" आपला इतिहास भाग क्रमांक: १ मध्ये अपलोड केलेला आहे.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक  भिंतीवर लेखन दिनांक: नोव्हेंबर २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १६/११/२०१९

एकूण भाग दोन समाप्त..!

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

** अप्रतिम भावनिक आंतरिक क्लिक **



चिंतन

** अप्रतिम भावनिक आंतरिक क्लिक ** 
______________________________________
                                               
 माझे मित्र संतोषराव बच्छाव सर,(प्रा.शा.लासूरगाव,ता.वैजापूर,ह.मु.लासूर स्टेशन) यांनी आज दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी त्यांची कन्या शर्वरी दीदी चा खूप छान फोटो काढला.सरांनी तो फोटो सहजपणे काढला.पण ,त्या सहजपणात नकळतपणे एक सर्वांगसुंदर अप्रतिम क्लिक काढल्या गेली..!

 सरांची प्रतिमा दिदीच्या उजव्या डोळ्याच्या चष्म्याच्या फ्रेम मध्ये अलगदपणे आली..!अप्रतिम क्लिक सरजी..! मुलीच्या डोळ्यात तिचा पिता...!व्वा..!माझ्यामते यापेक्षा सुंदर क्लिक नसेलच..!आणि त्यातही आज बालदिन..!

ईश्वरीय सत्यतेच्या आभासी जगात एका कन्येच्या डोळ्यात तिचा देव ..अर्थात पिता..! यापेक्षा सुंदर क्लिक असूच शकत नाही...!हे शास्वत सत्य आहे की,एका पित्याचे त्याच्या कन्येवर आणि त्या कन्येचे तिच्या पित्यावर सर्वात जास्त प्रेम असते..!

भावनिकदृष्ट्या विचार जर केला तर एका बापाच्या अंतर्मनात, ह्रदयात जेवढं मायेचं, आत्मियतेेच,प्रेमळ स्थान त्याच्या मुलीचं असतं, तितक त्याच्या मुलांचं कदापि नसते..!हे कटू सत्य आहे..!बाप,घरी आल्यावर जर ताजातवाना होत असेल तर... कन्येकडे बघून..!त्याची कन्या,त्या पित्यासाठी साक्षात ईश्वरीय आधार शक्तीच असते.आपली कन्या,जसजशी मोठी होत जाते,तसतशी कोणत्याही बापाला,तिच्या लग्नाची चिंता सतावत नसते..! तर माझी ईश्वरीय शक्ती माझ्यातून निघून जाणार...या भविष्यातील होणाऱ्या भावनिक पोकळीच्या धाकाने तो पिता सतत अस्वस्थ होत असतो..!

एक बाप,जेवढे मनातील भाव त्याच्या कन्येजवळ व्यक्त करतो,त्याच्या कितीतरी खूप,खूप कमी पटीने तो पिता,तेच भाव त्याचा मुलाजवळ व्यक्त करतो..!काही काळानंतर तोच पिता,त्याच्या मुलाजावळ,मनातील भाव व्यक्त करण्यास पाहिजे तितका पुढे येत नाही..! मात्र तोच पिता,आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत मनातील सर्व भावभावनांचे श्रध्देने समर्पण आपल्या मुलीजवळ कळत नकळतपणे व्यक्त करतोच..!

कोणताही माणूस जिवंतपणी जिवंत राहत असेल तर तो फक्त निर्मळ भावनेच्या श्रध्येय दृश्य,अदृश्य शक्तींवर..!आणि त्यातही ती दृश्य शक्ती जर स्वतःची मुलगी असेल तर,त्या पित्यासारखा नशीबवान तोच..! मी किंवा माझ्यासारखे अनेक पिता या दृश्य शक्तीला पारखे आहोत..!याची सल कायम मनात घर करुन असते..!कारण मला मुलगी नाही..!मला सख्खी बहीण नाही. माझे वडील (वय ऐंशी वर्षे)स्वतःची मुलगी समजून ज्या आत्मीयतेने माझ्या पत्नीशी,म्हणजे त्यांच्या सूनबाईशी बोलतात..! अर्थात सूनही मुलीसारखी मायाळू असावी लागते..आणि ते परम नैतिक मूल्य माझ्या धर्मपत्नीने सौ. शारदा नंदन जाधव ने जन्मजात मिळविले आहे..! त्यात तिच्या आई वडिलांच्या संस्काराचा खूप मोठा वाटा आहे..! जे भाग्य माझ्या वडिलांच्या नशिबी आहे...!त्या तुलनेत मी एक मुलगा म्हणून त्यांच्याशी संवाद साधायला कमी पडतो..!कारण मी माझ्या वडिलांची कन्या होऊ शकत नाही..!

जे भाग्य माझ्या पत्नीच्या नशिबात आहे..!माझ्या वडिलांचे एका सख्ख्या मुलीचे नसलेले पिता म्हणून असलेले एकाकीपण मी जवळून पाहतोय..!आणि हीच अवस्था माझ्या सह ज्या..ज्या माणसांना फक्त मुले आहेत ,त्यांच्याही वाट्याला कितीही नाही म्हटले तरी येतेच...येणारच....!

विशेषकरून कोणत्याही पुरुषाचे " सरकार "   इहलोकातून निघून गेल्यावर नसलेल्या मुलीची उणीवेची जाणीव प्रकर्षाने जाणवते..!

असो, बाप व मुलीच्या भावविश्वाचा देव्हारा खूप मोठा आहे..!जे या देव्हाऱ्यात आहेत ते नशीबवान..!जसे आमचे मित्र संतोषराव बच्छाव सर व त्यांची कन्या शर्वरी( श्रावणी) दीदी..!

 शर्वरी दीदीला व असंख्य बालकांना " बालदिनाच्या " मनःपूर्वक शुभेच्छा..!
                                   
वंदे मातरम्..!

शूभेच्छूक व लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
                         
फेसबुक वर लेखन दिनांक-१४/११/२०१७  व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक- १४/११/२०१९

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

" लग्न पत्रिका आणि श्रध्येयांचा होणारा अपमान..!"




चिंतन

" लग्न पत्रिका आणि श्रध्येयांचा होणारा अपमान..!"
___________________________________________

 बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की, आपल्या भारत देशात.. कुणाच्या देवदेवतांच्या विटंबनेवरुन किंवा राष्ट्र पुरुषांचा पुतळ्यांच्या किंवा धार्मिक प्रतिकांच्या विटंबनेवरून एकमेकांची डोकी फोडली जातात..!  पण लग्न पत्रिकेतील देवदेवतांचा ,राष्ट्रपुरुषांचा,धार्मिक प्रतिकांचा आपल्या डोळ्या समोर होणाऱ्या अतिशय गलिच्छ अपमानाच्या वेळी सगळे कसे शांतपणे सहन करतात..आपल्या आराध्यांचा होणारा अपमान..!

आपण ज्या लग्न पत्रिकेत,किंवा त्यावर आपल्या अनेक देवदेवतांची किंवा थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो, प्रतिकं छापतो.. फार..फार.तर लग्न होई पर्यंत त्या लग्न पत्रिकेचा सन्मान राखला जातो.मात्र एकदा का लग्न झाले...की मग त्याच लग्न पत्रिकेची झालेली अवहेलना पहावल्या जात नाही.परिणामी त्या पत्रिकेतील देवदेवतांचा, राष्टपुरूषांचा नको..नको..तो..झालेला अपमान प्रत्येक जण आपल्या उघड्या डोळ्यांनी  मूकपणे पाहत असतो..!बऱ्याच वेळा या लग्न पत्रिका खूप गलिच्छ ठिकाणी पाहायला मिळतात..!आपण मोठ्या कौतुकाने त्याच लग्न पत्रिकेवर आपल्या इष्ट देवदेवतांचे, राष्ट्रपुरुषांचे फोटो छापलेले असतात..!

माझे तर  प्रामाणिक मत असे आहे की,लग्न कोणत्याही जाती धर्माचे असो,त्यांनी आपापल्या लग्न पत्रिकेवर फक्त आणि फक्त मजकुरच छापायला हवा..!जेणेकरून जरी पत्रिकेची अवहेलना झालीच..( अवहेलना नक्कीच होते..!) तर त्यामुळे कुणाच्या उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आपापल्या इष्ट देवदेवतांच्या ,राष्ट्रपुरुषांच्या होणाऱ्या अपमानामुळे भावना नक्कीच दुखावणार नाहीत..!

लग्न पत्रिका व मोठ्या तसबिरी मधील देवदेवतांच्या किंवा राष्ट्रपुरुषांच्या  किंवा प्रतिकांविषयी माणसांच्या असलेल्या श्रद्धेच्या भावना भिन्न..भिन्न दिसून येतात..!
एकातील श्रद्धेय पायंदळी तुडविल्या जातात,बहुतेक वेळा अतिशय गलिच्छ ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेल्या आढळून येतात..!
तर तसबीरितील श्रध्देयांना सन्मानाचे स्थान बैठकीत,देवघरात दिल्या जाते..!

देवदेवता किंवा राष्ट्रपुरुष तेच असतात..फक्त..माणसांच्या आपल्या सोयीनुसार , स्वार्थानुसार त्यांना उपयोगात आणण्याच्या पद्धती बदलतात..!श्रद्धेच्या नावाखाली  माणसांचे असणारे दुहेरी रूप यापेक्षा कदाचित दुसरे कोणतेच नसावे..! बहुदा..माणसाने  आपल्या श्रद्धा, प्रतिकं,अभिमान,या सर्वांचा होणारा अपमान,आपापल्या श्रध्देयांची डोळ्यासमोर जगजाहीरपणे होणारी परवड इत्यादी अनेक बाबी वापरण्याचे  आपल्या सोयीनुसार नक्की केले आहे..!

पुतळा,फोटो , प्रतिकं यांची विटंबना कुणी केलीच तर सर्वत्र हाहाकार माजला जातो अन् लग्नपत्रिका मधील त्याच राष्ट्रपुरुषांचा,देवदेवतांचा होणारा डोळ्यासमोरील अपमान,विटंबना माणूस निमुटपणे पाहत असतो...! यापेक्षा माणसाचे ढोंगी दुसरे रूप असूच शकत नाही..! विशेष म्हणजे हे सगळं ,सगळ्याच जाती धर्मातील माणसं करतात..!☺

माणूस फार विचित्र प्राणी आहे का हो..?
त्याला सगळं त्याच्या मनाप्रमाणं हवं असतं..! मग ते काहीही असो..! जसं आपल्या भारताच्या महान संविधानातील कर्तव्यांपेक्षा त्याला अधिकार हवे असतात...! त्यासाठी तो काहीही करायला तयार होतो..! पण कर्तव्य आलं की...समोरच्याला म्हणतो ,
" तू , हो ना पुढे..! मी येतो मागून..!!"

मात्र  आपापल्या श्रध्देयांची अशी होणारी परवड,अपमान ,लग्न पत्रिका सोडून इतर ठिकाणी,उदा.पुतळा,फोटो इ.ठिकाणी झालीच  तर..........
बाप रे...पुढे काय काय..होईल..किंबहुना..बऱ्याचदा झालेले सुध्दा आहे..अशी सर्व समाजाची वाताहत होते..दंगली होतात..! परिणामतः  राष्ट्राचे अपरिमित नुकसान होते..!

चला तर मग एक प्रयत्न करुया..आपापल्या श्रद्धेयांचा ,आपल्याच संमतीने ,आपल्याच डोळ्या समोर होणारा अपमान थांबविण्याचा..! लग्न पत्रिका छापुया...फक्त मजकुराने..!

वंदे मातरम्..!

माझ्या मुलांनी  जर मला विचारून लग्न केले तर भविष्यात स्वतच्या मुलांची ( इतरांची हमी घेत नाही..!)  लग्न पत्रिका फक्त मजकूराने छापू इच्छिणारा  लेखक :
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

लेखन दिनांक: ९ मे २०१८ व,
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ९/११/२०१९

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९





** चिंतन **

  पुनीत भूमी, रामेश्वरम् ....एक आठवण..! 
______________________________________________

माझ्या आवडीचे तीर्थक्षेत्र..रामेश्वरम्..!
अध्यात्मातील देवाचे देव महादेवाचे.अन् प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीचेे.!
अन्...
माझ्या पिढीने पाहिलेल्या माणसातील देव माणूस..परम वंदनीय अब्दुल कलाम साहेब यांच्या जन्मभूमीचे..!

येथील प्रत्येक कण आणि कण रोमांचित करतो आपल्याला या  महान विभूतींच्या वास्तव्य अनुभूतीनीं..!
येथील एक क्षण म्हणजे आपल्या मानवी आयुष्याचे संपूर्ण सार्थक झाल्या सारखे वाटते..तेथील..अदभुत वातावरणांनी..! आपला भारत खरचं समृध्द होता अन् आहे..अशा अनेकानेक रोमांचित करणाऱ्या वास्तव्यांनी...तेथील वास्तव्य केलेल्या महान मानवांनी..!तेथील असलेल्या अध्यात्मिक पवित्र परिसराने..!

रामेश्वरम्...येथे कुठेही जा...तुम्हाला प्रभू रामचंद्र,महादेव भगवान अन्  माणसातील देव माणूस, परम वंदनीय अब्दुल कलाम साहेब पदोपदी जाणवतील..!
फक्त ते जाणवणारे जाणीव व जाणीवा असलेले मन असेल तर..
नसता...
रामेश्वरम् फक्त एक फक्त वालुकामय भूमी आहे..पुरुष आणि स्त्री यांच्या वसाहतींची..!अजुन इतर प्राणिमात्रांच्या वास्तव्याची..!
अंतर्मनाने शोधले तर बरेच काही बऱ्याच ठिकाणी सापडते...!
ते जर मानवाच्या बुध्दी मध्ये भरकटत राहिले तर..त्या मानवाच्या बुध्दीच्या पलीकडील असणाऱ्या अदभुत बाबी कदापि जाणवणार नाही..!

एकादा तरी या सर्वांच्या अनुभूती साठी जा.. रामेश्वरम् ला अन् जाणून घ्या...तेथील या सर्वांच्या प्रेमळ,भावूक,श्रद्धेय अनुभूतीची..! जेथे विज्ञान संपते..तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होते ..याचा अनुभव येणारे तीर्थस्थळ..! विशेष म्हणजे या पुनीत झालेल्या भूमीत अध्यात्म व विज्ञान या दोन्ही अनुभूती जाणवतात..!कारण डॉ.अब्दुल कलाम साहेब विज्ञानाचे तर प्रभू रामचंद्र अन् भगवान महादेव अध्यात्माचे प्रतिनिधित्व येथे करत आहेत. .हे जाणवते..!  फक्त ते जाणवणारे मन हवे. ..!

सदरील फोटो रामेश्वरम् येथील त्रिवेणी समुद्र संगम... गंगा सागर, सिंधू सागर व हिंदी महासागर यांच्या त्रिवेणी संगमावरील आहे .!

अतुल्य भारत,
श्रेष्ठ भारत..!
वंदे मातरम्..!

लेखक:  नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

छायाचित्र व रामेश्वरम् भेट दिनांक: २७ ऑक्टोबर २०१७

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

" हे भास्करा,तू असा अस्ताकडे जाऊ नकोस..!"




चिंतन

" हे भास्करा,तू असा अस्ताकडे जाऊ नकोस..!"
===================================

सुप्रभात..!
मी काल संध्याकाळी सूर्य अस्ताकडे जातांना पहिला..!त्याचे अस्ताकडे सरकणे माझ्यातील ,त्याच्याविषयी असणाऱ्या श्रद्धेला चिरचिरून गेले..!
काहीजण म्हणतील, सूर्य तर दररोज अस्ताला जातो,त्यात काय विशेष एवढं..?
मात्र माणसाचं मन आहे शेवटी..! त्याला कधी काय जाणवेल याची शाश्वती अद्याप तरी विज्ञानाला अन् अध्यात्माला देता आलेली नाही..!

काल संध्याकाळी त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याची  अवस्था पाहून हाच का तो सूर्य,ज्याने कधीतरी आपल्या प्रखर प्रकाशकिरणांनी आपल्यातील अंधारलेल्या अस्मिता जागृत केल्या होत्या..? हा यक्ष प्रश्न माझ्या सारख्या त्या सूर्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका सर्व सामान्य माणसाला जाणवला..!

त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याला म्हणावं वाटलं की,
" हे, प्रखर प्रकाशमान भास्करा,तुझ्यात असलेल्या त्या प्रखरतेला ,तू असा का म्हणून निस्तेज करून घेत आहेस..?
तुझा प्रकाश हा, आक्रमकतेचा,जाज्वल्याचा,शौर्याचा,आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करण्याचा..!
मग अस्ताला का म्हणून चालला आहेस आम्हाला पोरके करून..?
तुझे असे अस्ताकडे जाणे,माझ्या सारख्या असंख्य माणसांना देखील तुझ्यापासून दूर दूर घेऊन जात आहे..!  कारण तुझ्यात असलेल्या वरील गुणांवरच तर मी अन् असंख्य माणसांनी निस्सीम प्रेम केले..!आणि तेच जर तिथं नसेल तर मग आमच्या  तुझ्यापासून दूर जाण्याला,तुला नाव ठेवण्याचा अजिबात अधिकार नसणार..!

एकमात्र नक्की...! हे भास्करा, तू अस्ताला गेल्यावर , पृथ्वीवरील दुसऱ्या बाजूला तुझा पुन्हा सूर्योदय झालेला असेलही..! मात्र तुझ्यात असलेल्या आक्रमकतेच्या, जाज्वल्याच्या ,शौर्याच्या आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करण्याच्या..या तुझ्यातील अंगभूत गुणांना त्या अनोळखी भूप्रदेशात तू,मनसोक्तपणे उधळू शकणार नाहीस याची माझ्या सारख्या तुझ्यावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या कित्येक सर्व सामान्य माणसांना खात्री आहे..!

शेवटी एकच नम्रपणे म्हणेन की,
" हे दिनकरा,तूच सर्व सामान्य माणसाला,असामान्य बनवलं,तू असा आम्हाला तुझ्यापासून दूर दूर नको जायला लावुस..! तुझ्या जाण्याने माझ्या सारखी असंख्य माणसं नाईलाजाने तुझ्यापासून दूर दूर जातील...! पण तुझ्यावर जे निस्सीम प्रेम केले,ते दुसरीकडे कधीही भेटणार नाही..!
कारण...हे भास्करा,तू घरातला वाटतो म्हणून..!
म्हणून म्हणतो ,हे भास्करा,तू असा अस्ताकडे जाऊ नकोस..!"

वंदे मातरम्..!

आक्रमकतेचा,जाज्वल्याचा,शौर्याचा,आमच्यातील मृत झालेल्या अस्मिता जागृत करणाऱ्या सूर्यावर निस्सीम प्रेम करणारा एक सर्व सामान्य माणूस: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:७ नोव्हेंबर २०१९

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

आनंदी माणूस संपतजी छाजेड








मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" आनंदी माणूस,आदरणीय संपत भाऊ शेठ छाजेड "

________________________________________

एखाद्या राजकीय व्यक्ती विषयी माझ्या सारख्या बिगर राजकीय व्यक्तीने काही व्यक्त केले म्हणजे नक्कीच त्या व्यक्त होणाऱ्या विचारांकडे बिगर राजकीय नजरेनेच प्रत्येकाने पाहायला हवे.

कुबेराच्या घरी काही..खूप ग्रेट माणसं जन्माला येतात त्यात आदरणीय संपत भाऊ शेठ छाजेड यांचा मी वैयक्तिकरित्या आवर्जून उल्लेख करील. या ग्रेट माणसाने..ज्यावेळी यांची राजकीय कारकीर्द सुरूही झालेली नव्हती,त्यावेळी फक्त एका शब्दावर माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसाला लासूर स्टेशन येथे जागा व घर नावावर करून देणारे एकवचनी व्यक्तिमत्त्व..! विशेष म्हणजे माझ्या घराचे पैसे ,घर नावावर करून दिल्यानंतर टप्याटप्याने मी आदरणीय संपतजी शेठ यांना दिले होते. महावीर नगर लासूर स्टेशन येथील पहिला नागरिक होण्याचा सन्मान मला अन् आदरणीय पाडळकर सर आम्हाला प्राप्त करून दिला. इ.स.२००३ मध्ये महावीर नगर लासूर स्टेशन येथे सर्वात अगोदर मी अन् आदरणीय पाडळकर सर सहपरिवार राहायला आलो होतो. एवढा मोठा विश्वास आदरणीय संपत भाऊ शेठ यांनी माझ्यावर तब्बल १५ वर्षापूर्वी दाखवला याचे आजही मला अप्रूप वाटते.

खूप चांगले व्यक्तिमत्त्व , नेहमी हसतमुख अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरच्याशी विनम्र भाषेत संवाद साधून आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय संपतजी शेठ छाजेड..! सार्वजनिक आयुष्यात आयुष्य व्यतीत करत असताना भाषा सौंदर्य असणे अत्यंत आवश्यक असते.त्यात आदरणीय संपतजी शेठ छाजेड खूप श्रीमंत आहेत. 

आजही आदरणीय संपत भाऊ शेठ यांनी एखादा शब्द दिला म्हणजे.. दिला...! त्यात हा ग्रेट माणूस अजिबात बदल करत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे ; आणि हाच अनुभव त्यांच्याशी ज्यांचा..ज्यांचा संबंध आलेला आहे त्यांनाही आलेला असेलच.

कधी संपत भाऊ शेठ यांना भेटा..त्यांच्या चेहऱ्यावर एक नाजूक हास्याची लकेर उमटलेली दिसेल.आणि जी व्यक्ती सदैव हसमुख राहते..ती व्यक्ती आयुष्याकडे किती सकारात्मकतेने पाहते याचा सहज अंदाज येतो. कधीही यांना गर्व जाणवत नाही.याचा माझा एक अनुभव सांगतो....

मी अंदाजे..तीन वर्षांपूर्वी लासूर स्टेशन येथून गंगापूर येथे काहीतरी सरकारी कामानिमित्त दुचाकीवर चाललो होतो. शिरेगाव धरणाच्या कडेच्या रोडने माझ्या मागून महागडी चार चाकी गाडी आली अन् थोडीशी पुढे गेली..अन् थांबली..! मला वाटलं गाडीतील माणसांचं काहीतरी काम असेल म्हणून थांबले असेल.
पण..मी त्या थांबलेल्या चार चाकी गाडीला ओव्हरटेक करून पुढे गेलो तर..मला मागून आवाज आला...

" ओ...जाधव सर....!"
मी थांबलो व मागे वळून पाहिले तर संपत भाऊ शेठ होते.मी गाडी वळवून मागे आणली..अन् म्हणालो...
" वंदे मातरम्, शेठ..! "
संपत भाऊ शेठ- " काय जाधव सर, तुम्ही फेसबुकवर इतके भारी..भारी लेख लिहिता अन् खाद्य पदार्थ टाकतात..की...ते पाहून तुमच्या कडे जेवायला यावे वाटते, आणि तुमचे लेख मी आवर्जून वाचतो बरं का..!"
इतर अनौपचारिक गप्पा झाल्यावर आम्ही आमच्या मार्गाने मार्गस्थ झालो.

असो, आज दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ रोजी आदरणीय संपत भाऊ शेठ यांचा जन्मदिन आहे.आयुष्याकडे अतिशय सकारात्मक व आनंददायी नजरेने पाहणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाला खूप खूप शुभेच्छा..!🌹🙏🏻

वंदे मातरम्..!

शूभचिंतक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

ता.क.: कृपया माझ्या या पोस्ट कडे राजकीय नजरेने पाहू नये ही नम्र अपेक्षा..! 🙏🏻
आयुष्यावर हसतमुखाने निव्वळ प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व आदरणीय संपत भाऊ शेठ यांच्या विषयी मला जाणवलेल्या व प्रत्यक्ष अनुभवलेल्या भावूक भावनेच्या नजरेने पहावे.

दिनांक: ५ नोव्हेंबर २०१८

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

" आपण असतो,त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो..असा मोबाईल..!"☺




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" आपण असतो,त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो..असा मोबाईल..!"☺
===================================

माझ्या मोबाईलची तब्येत काही दिवसापासून अस्वस्थ आहे.तांत्रिक क्षेत्रातील विविध उपचार केले पण त्याचा मूळ आजार काही बरा होईना..!दिवसेंदिवस माझ्या मोबाईलची तब्येत आणखीनच अस्वस्थ होत आहे,म्हणून मी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी तीनदा Amazon वर मोबाईल बुक केला..! पण..तीनदा बुक करूनही...
" मी Amazon च्या आवाक्यात राहत नाही..!" असे थातुर मातुर उत्तर देऊन  मी औरंगाबाद शहरात राहून देखील माझ्या घरी बुक केलेला मोबाईल आला नाही..!☺

अखेर सौम्य स्वरूपातील वैताग येऊन मी  काल दिनांक
४ नोव्हेंबर २०१९ रोजी औरंगाबाद शहरातील एका  भारी मोबाईल दुकानात गेलो.जसा एखादा होणारा नवरदेव, समोर बसलेल्या पाहुण्यांना आपल्या आवडी निवडी सांगतो त्याप्रमाणे मी ही माझ्या आवडी निवडी मोबाईल दुकानदाराला सांगितल्या..!☺

सुरुवातीला तो दुकानदार हिंदीत बोलायला लागला.मी त्यांना नम्र भाषेत सांगितले की," भाऊ, कृपया मराठीत बोला राव..!"
यावर तो गालातल्या गालात हसला अन् मराठीत माझ्याशी बोलू लागला..!
मोबाईल दुकानदार मला म्हणाला-" तुम्हाला फोटो चांगला येणारा हवा की...ताकदीचा..?"
मी-" माझे मोबाईलवर लिखाण काम जास्त असते,तेंव्हा ताकदीचा असेल तर दाखवा..!"
दुकानदाराने विविध ताकदीचे मोबाईल दाखवले.मी आस्थेवाईकपणे सर्व ताकदीचे मोबाईल पाहून घेतले..! यानंतर तो दुकानदार मला म्हणाला....
" चांगले फोटो येणारे पण मॉडेल आहेत,दाखवू का..?"
मी-" दाखवा,पाहायला काय जाते..?" अशा मिश्किल स्वरात मी म्हणालो.
माझा मिश्किल रोख पाहून तो दुकानदारही मिश्किल स्वरात म्हणाला...
" माझ्या कडे असे काही मोबाईल आहेत,त्यात आपण असतो,त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो..! ते दाखवू का..?"
मला आश्चर्य वाटले..आपण दिसतो त्यापेक्षा सुंदर दाखवणारा मोबाईल पाहायचे कुतूहल निर्माण झाले..!
दुकानदाराने जे मोबाईल माझ्या समोर मांडले होते,त्याच मोबाइलद्वारे माझ्या परिचयाच्या अनेक फेसबुक मित्रांचे फोटो मी ,फेसबुकवर पाहिले होते..!☺कारण ब्रँडचे नाव दिसले होते त्यावर..!☺ अर्थात  आपण असतो,त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो..या मोबाईलचे नाव मी काही इथे सांगणार नाही..!☺ कारण ज्यांच्याकडे ते मॉडेल आहे ,त्यांच्या नाहक भावना दुखून ते सतत अधून मधून स्वतः ला आरशात बघत बसतील..!☺

मला लगेच दुसरे कुतूहल निर्माण झाले की,आपण दिसतो त्यापेक्षा सुंदर दाखवणारा मोबाईलवर ज्या ज्या माझ्या फेसबुक मित्रांनी फोटो काढले होते,त्यांना कधी एकदाचा प्रत्यक्ष अथवा पुन्हा भेटेन याचे..!☺

मी सगळं पाहून घेतले अन् त्या दुकानदाराला म्हणालो की,
" आपण दिसतो त्यापेक्षा सुंदर दाखवणारा मोबाईल..!" अशीच एखादी जाहिरात या मोबाईलच्या कंपनीने प्रदर्शित नक्कीच करायला हवी..! लई खप वाढेल...याची हमी मी देतो..! या मोबाईलच्या मॉडेल ला पाहून याला खरेदी करणारा तारुण्यसुलभ तरुण नक्कीच म्हणेल की,
" मी पुन्हा येईन..!मी पुन्हा येईन..!! मी पुन्हा येईन..!!!"
यावर त्या दुकानदाराला खूप हसू आले..!तो दुकानदार मला म्हणाला...
" माझ्या दुकानात जवळ जवळ सर्वच गिऱ्हाईक हिंदीत बोलणारे येतात..! तुम्ही सगळं कसं मराठीत बोलले..ते ऐकून अन् पाहून आनंद वाटला..! येत जा..अधून मधून..गप्पा मारायला..!"☺

मी खूप मोबाईल पाहून शेवटी पुन्हा  Amazon किंवा flipcart वरच शेवटची एक आवड मागवून घेण्याचे ठरवले अन् निघालो त्या दुकानातून..! निघताना त्या दुकानदाराला म्हणालो की,
"मी पुन्हा येईन..!मी पुन्हा येईन..!! मी पुन्हा येईन..!!!"☺

वंदे मातरम्..!
प्रवासी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:५/११/१९, मंगळवार.
स्थळ: प्रोझोन मॉल, औरंगाबाद.

" विधु विनोद चोप्रा..चोखंदळ दिग्दर्शक..!"


चिंतन

" विधु विनोद चोप्रा..चोखंदळ दिग्दर्शक..!"
===================================

आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत असे मोजके माणसं आहेत की,जे आपल्या कामाच्या प्रती अतिशय चोखंदळपणा बाळगून आहेत,त्यापैकी एक आहेत, ग्रेट दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा..!

विधु विनोद चोप्रा यांचे दिग्दर्शन म्हणजे प्रत्येक कलाकारांकडून सूक्ष्म  स्वरूपातील अभिनय कसा करून घ्यावा यातील हे एक अतिशय दुर्मिळ व्यक्तिमत्त्व..!एखाद्या दृध्याचे त्यांच्या मनासारखे जो पर्यंत चित्रीकरण होत नाही तोपर्यंत ते दृश्य अन् ते चित्रीकरण करतच राहणार असे चोखंदळ दिग्दर्शक..! मी  माध्यमिक शाळेत असताना माझी जन्मभूमी पालखेड येथील स्व.दौलत काका कुमावत यांच्या घरगुती टी. व्ही.वर व्हिडिओ कॅसेट वर हा चित्रपट पहिला होता..!

काल दिनांक ३/११/१९ रोजी विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या " परिंदा " या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली..! हा चित्रपट विधु विनोद चोप्रा यांच्या कारकिर्दीतील माईल स्टोन..! यात जॅकी श्रॉफ,नाना पाटेकर,अनीलकपुर यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील परमोच्च असाच म्हणावा..! यात विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ यांचा अभिनय अतिशय सुंदर झालेला आहे..! चित्रपटातील शेवटच्या दृश्यात जेंव्हा नाना पाटेकर जो की यात विकृत गुंड असतो,तो अन् जॅकी श्रॉफ दोघेच एका खोलीत असतात.तेंव्हा नाना जॅकी श्रॉफ ला सांगतात की,मी तुझ्या भावाला ( अनिलकपुर) ला का मारले वगैरे..! हे सांगत असताना  जॅकी श्रॉफ यांच्या चेहऱ्यावर एकही संवाद व्यक्त न करता जो अभिनय विधु विनोद चोप्रा यांनी करून घेतला अन् जॅकी श्रॉफ यांनी तो मनाची अतिशय विषण्ण अवस्था व्यक्त करणारा भाव आपल्या चेहऱ्यावर आणला आहे...तो...अतिशय ग्रेट..ग्रेट..ग्रेट..!

हळू आवाजात अन् योग्य आरोह अवरोह यांचा उच्चार करून अतिशय सुंदर अभिनय जॅकी श्रॉफ यांनी परींदा चित्रपटात केला आहे.अर्थात याचे बरेचसे श्रेय ग्रेट दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांना जातेच..!

याच चित्रपटातील अभिनयानं जॅकी श्रॉफ यांनी एक उत्कृष्ठ अभिनय करणारा कलाकार म्हणून प्रस्थापित केले..! विधु विनोद चोप्रा यांच्या पुढील 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटात शुभंकर या व्यक्तिरेखेला  देखील जॅकी श्रॉफ यांनी हळू आवाजात  आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या समोर सादर करून त्यांची मने जिंकली होती..! वास्तविक या चित्रपटात थेट मध्यंतरानंतर जॅकी श्रॉफ ( शुभंकर ) चा प्रवेश होतो..! मात्र  मध्यंतरानंतर प्रवेश होऊन देखील 1942 अ लव्ह स्टोरी  या चित्रपटात भाव खावून गेला तो जॅकी श्रॉफच..!

ता.क.: सदरील वर्तमानपत्राचे  कात्रण आजचे वर्तमानपत्र दिव्य मराठी यातील आहे.त्यात विधु विनोद चोप्रा यांनी
" परिंदा " या चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ४/११/१९, सोमवार.

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

" चलो साब , पुना.. पूना..! शिरीफ ढाई घंटे मे छोड देंगे..!!"




*** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" चलो साब , पुना.. पूना..! शिरीफ ढाई घंटे मे छोड देंगे..!!"
_______________________________________________

नेहमप्रमाणे आज दिनांक ३/११/२०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानकाच्या बाहेर आलो होतो.तेच नेहमीचे कार,ट्रॅव्हल्सवाले एजंट माझ्याकडे धावत...धावत आले.त्यातील एकजण  मला म्हणाला....

" चलो,साब.. पूना.. पुना..! शिरीफ ढाई घंटे मे छोड देंगे...! "
मी त्या भाऊला बाजूला घेतले अन् प्रेमाने म्हणालो...

" का..हो..मी तुम्हाला..दररोज सकाळी येथे दिसतो.तरी तुम्ही मला..वरील प्रमाणे विचारपूस करता..मी काय दररोज पुण्याला जातोय का..?"

यावर तो प्रवासी सीट भरणारा एजंट काही पुरुष जसे लाजतात अगदी तसाच लाजला अन् म्हणाला...

" वो..क्या...हैं साब....
असे म्हणत असतानाच त्याला मध्येच अडवून मी म्हणालो..

" भाऊ,मराठीत बोला राव..! तुम्ही लई भारी मराठी बोलता मला माहीत आहे..!"

( वास्तविक मला काहीच माहीत नव्हते की,तो इसम मराठी अस्खलित बोलतो किंवा नाही..!😂 पण त्याला बोलते करण्यासाठी त्याच्या मराठीच्या झोपलेल्या अस्मिता शाब्दिक चिमटा घेऊन जागृत करणे योग्य वाटले म्हणून..असे म्हणालो..!😂)
यावर त्याचे डोळे विस्फारले अन् मला तो एजंट म्हणाला...

" तुम्ही बरोबर ओळखले साहेब, मी मराठीच माणूस आहे..पण.. धंद्या निमित्त हिंदीत बोलावे लागते...!"

मी- " अहो ,ठीक आहे.. बोला हिंदीत...पण..माझ्या सारख्या दिसणाऱ्या अनेक मराठी माणसा बरोबर तरी मराठीत बोलशाल की नाही..?"

प्रवासी एजंट- " तुम्ही म्हणत्या ते पण बरोबर आहे म्हणा..!"

मी- " आता हा चेहरा लक्षात ठेवा..संग्राम भाऊ..! हा चेहरा दिसला की, मस्त मराठीत बोला..! अन् सर्वात महत्त्वाचे..मला पुण्याला नका घेऊन जाऊ..! 😂 मी आपला अंधारी नावाच्या एका खेड्याला जाणारा गुरुजी आहे..! ते..साब...साहेब...पण नका म्हणू...! लई अवघडल्या सारखं होतं..!"

प्रवासी एजंट-" साहेब..अर्र...चुकले..!  ( त्याने त्याचीच जीभ त्याच्याच दाताखाली दाबली अन् पुढे म्हणाला..)
गुरुजी..तुम्ही " लई भारी पिक्चर मधला डायलॉग चांगला मारला राव..! आता तुमचा हा चेहरा लक्षात ठेवीन बरं का..!"

मी - " एक काळजी घे पण..याच चेहऱ्यावर कधी दाढी असते तर कधी दाढी नसते..! नाहीतर..बिगर दाढीवाल्या चेहऱ्याला पुन्हा म्हणशाल.....
"  चलो साब, पुना... पूना...! शिरिफ ढाई घंटे मे छोड देंगे..!"😂

प्रवासी एजंट- " गुरुजी... हा चेहरा चांगला लक्षात राहिला आता..!"

मी- " पण, भाऊ...हा चेहरा आज शेवट दिसेल तुला..कारण आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस.दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे.आता हा चेहरा तुला थेट २६ नोव्हेंबर रोजीच दिलेलं..! तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा..आणि हो .तुझ्या व्यावसायिक बंधूंना पण नक्की सांग..!"
तो इसम हसला अन्  म्हणाला..
" नक्कीच गुरुजी..!"
असे म्हणून तो प्रवासी एजंट निघून गेला..पुन्हा कुणाला तरी  माणूस पाहून म्हणायला..." साब, पुना.. पूना.. शिरीफ ढाई घंटे मे..!"😂

ता.क.: मी औरंगाबाद येथे वास्तव्यास आल्या पासून माझे हिंदी सुधारतेय वाटतं..!😂
पण मी समोरच्या कृत्रिम हिंदी आवरण चढवलेल्या मराठी माणसा बरोबर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरतो..!😂

वंदे मातरम्..!

एक प्रवासी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३ नोव्हेंबर २०१८
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ३ नोव्हेंबर २०१९

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

" आपला इतिहास, भाग-१ " " एक साधी ओळ नाही..!"



चिंतन

" आपला इतिहास, भाग-१ "

"  एक साधी ओळ नाही..!"
________________________________________________   

आपल्या भारताचा इतिहास किती दैदिप्यमान आहे,हे जेंव्हा तो इतिहास आपण उलगड जातो तेंव्हा कळत जाते.आता पर्यंत आपल्याला मोगलकालीन इतिहासाचा थोडा जास्तच over dose विविध पाठ्यपुस्तके,विचारवंत आणि प्रसार माध्यमे इ. द्वारे देण्यात आपले ,शैक्षणिक,कला सांस्कृतिक,राजकीय इ.अनेक क्षेत्रातील मानवी घटकांना धन्यता वाटत आली आहे..! आपल्याला जसजसे भारतीय इतिहासातील अनेक महान भारतीय सम्राट,राजे,महाराणी इ.चे दैदिप्यमान ऐतिहासिक कार्य माहीत होत जाते,तसतसे आपल्या भारतीय पूर्वजांच्या त्यागाचा खूप अभिमान वाटू लागतो..!

आतापर्यंत हा भारतीयांचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या स्वरूपात का पुढे  येत नाही..किंवा आला नाही..? कोणत्या बुरसटलेल्या मानसिकता हा भारतीय इतिहास मोठ्या स्वरूपात पुढे न येऊ देण्यास कारणीभूत होत्या. किंवा आहेत...? बरं या आपल्या भारताच्या मातीतील जगाला हेवा वाटावा असे सदा सर्वदा वंदनीय ऐतिहासिक स्री,पुरुषांना जर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्थान दिलेच तर..आपल्यातील काहीजण लगेच..टाहो फोडायला सुरुवात करतात की,
" अमके.. अमके इतिहासाचे भगवेकरण करत आहेत..!"
आपल्याच देशातील,आपल्याच लोकांचा भले ते कोणत्याही जाती धर्माचे असोत,त्यांचे पाठ्यपुस्तकात धडे लिहिल्या गेले तर..त्यात कुठे आले..भगवेकरण..?
तो एकच रंगात आपण सर्वांनी आत्मचिंतन करून रंगवायला हवा...अन् तो रंग म्हणजे.. त्या..त्या..महान राष्ट्र सेनानींच्या त्यागाच्या,शौर्याच्या ,आत्मबलीदानाच्या रंगाने..!

इ.६ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक: ७.
" मौर्यकालीन भारत "  या  पाठात,ज्या अॅलेक्झांडर उपाख्य सिकंदरने  भारत वगळता संपूर्ण जग जिंकले पण त्याला जगज्जेता होण्यापासून, ज्यावेळी अलेक्झांडर ने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी  आपला भारतीय सम्राट पोरस उपाख्य पुरुषोत्तम पुरूच रोखू शकला किंवा प्रयत्न केला. त्यांच्या  कार्या विषयी एक साधी ओळही नाही अन् तथाकथित जगज्जेत्या म्हणविल्या गेलेल्या ग्रीक सम्राट अॅलेक्झांडर विषयी अख्खा एक परिच्छेद,त्याच्या फोटो सह लिहिला गेला आहे. दुर्दैव आपले..! 

खूप अपमानित झाल्या सारखे वाटते मला, तो घटक शिकवितांना..! आपण आपल्याच लोकांचा इतिहास लिहायला व सांगायला कमी पडलो तर कोणत्या तोंडाने आणि नैतिक मूल्यांची जोपासना करून आपली येणारी पिढी तयार होईल..?

आपल्या मातीतील ,आपल्या माणसांचा ,आपल्या भारत देशाच्या रक्षण प्रित्यर्थ केलेला महान त्यागाचा इतिहास व त्या इतिहासातील राष्ट्रपुरुषांच्या कामगिरीचे कार्य पाहून जर उर अभिमानाने भरून येत असेल, आणि अशांचा इतिहास लिहिला तर त्यात कुठले आले भगवेकरण..?
अशा पद्धतीने ओरड करणारे कधी कुणाचे बाहुले झाले,हे त्यांनाच अजूनही समजलेलं नाही..!

नोव्हेंबर २०१७ पासून सोनी चॅनल वर सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ८:०० वा.प्रसारित होणारी  " पोरस "ही ऐतिहासिक मालिका पाहतांना , पोरस साम्राज्य,तक्षशिला साम्राज्य यांचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्य स्वरुपात पाहतांना अनेक माहीत नसलेल्या गोष्टी ज्ञात होत जातात..!भारताच्या शैक्षणिक,कला व सांस्कृतिक,राजकीय व सामाजिक क्षेत्रात भारताच्या प्राचीन इतिहासाला पाहिजे तितके महत्व दिल्या गेले नाही.वास्तविक प्राचीन भारतीय इतिहास,हा आपल्या  भारताच्या इतिहासाचा प्रारंभ म्हंटला तर वावगे ठरणार नाही..! 

प्राचीन भारतीय इतिहासाच्या अनेक महान भारतीय रक्षकांनी देशाप्रती केलेल्या योगदानाचे अनुकरण पुढील ऐतिहासिक पिढी करत राहिली,त्यांच्या पासून प्रेरणा घेत राहिली हे शाश्वत सत्य आहे..!प्राचीन भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा पाहतांना भारताचे पहिले रक्षक राजा पुरुषोत्तम उपाख्य पुरू (पोरस) यांचे शौर्यपूर्ण कार्य येणाऱ्या सर्व भारतीय रक्षकांसाठी प्रेरणादायी होते..!त्यांच्या शौर्याचे आदर्शव्रत, त्यानंतर आलेल्या अनेक भारतीय सम्राटांनी अंगीकारले..! या सर्वांचे ध्येय एकच होते...स्वतःचे,स्वतःच्या लोकांसाठी सुराज्य स्थापन करणे..!आणि ते या अनेक थोर सम्राटांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून सुध्दा दाखविले..! 

मी इतिहास तज्ञ नाही.पण सदरील  हे पाठ्यपुस्तक व त्यातील हा घटक शिकवत असताना ज्या भावना मला सतत जाणवतात त्या विषयी व्यक्त केले आहे हे कृपया सर्व वाचकांनी नम्रपणे समजून घ्यावे ही नम्र अपेक्षा..!
वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:३० ऑक्टोबर २०१८

क्रमशः

"पिझ्झा भाऊ अन् डुबूक वडा..!"☺




मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"पिझ्झा भाऊ अन् डुबूक वडा..!"☺
==================================

आज पर्यंत माझ्या आयुष्यात कधीच तो पिझ्झा खाल्ला नव्हता. माझ्या मुलांनी ही आज पर्यंत तो पिझ्झा भाऊ खाल्ला नव्हता.

आज दिनांक १/११/२०१९  औरंगाबाद शहरातील प्रोझोन मॉल या खूप मोठ्ठ्या ठिकाणी गेलो. तेथील एका उपहारगृहात गेल्यावर मी माझ्या पोरांना म्हणालो...
" तुम्हीं पिझ्झा खा..! या बसा..!"
पोरं नाही...नाही..म्हणत होते तरी पण मी आवडीने अन् आग्रह करून त्यांना हा पिझ्झा भाऊ खाऊ घातलाच.
माझी अजिबात खाण्याची इच्छा नव्हती..म्हणून मी दोघांच्या करिताच दोन पिझ्झा ची ऑर्डर दिली. मात्र मी नुसता बाजूला बसलेला पाहून  माह्या पोरांनी  मला आग्रह केला अन् मला म्हणाले...
" अहो,दादा..तुम्ही नुसते बसून आहात..! निदान थोडा तर खा..!"
मी म्हणालो-" अजिबात नाही..! तुम्हाला खायचा तो खा..मला म्हणू नका..!"

दोघेही कभी खुशी कभी गम या आविर्भावात पिझ्झा भाऊ खात होते. बहुदा ते दोघेही आपल्या बापाच्या प्रेमळ खाऊ घालण्याच्या आग्रहाखातर  खात होते.☺

पुन्हा  माझ्या पोरांकडून अती आग्रह झाला अन् पिझ्झाचा फक्त एकच तुकडा खाल्ला.बहुदा त्यांनाही तो धकत नसावा.मी खूप आग्रहाखातर एकच तुकडा खाल्ला. बापरे..! सगळी तोंडाची चवचं बिघडून गेली. माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या पोरांना अंदाज आला. उगीचच आपण दादांना पिझ्झा खाण्याचा आग्रह केला.मला सगळं कसं बेचैन व्हायला लागले.अक्षरशः ओकारी व्हायची वेळ आली. मी लगेच तिथूनच घरी माझ्या सौभाग्यवती ला फोन केला अन् म्हणालो...
"मी पिझ्झाचा फक्त एकच तुकडा खाल्ला आहे..! मला काहीच ताळमेळ लागेना..! तू आपल्या पालखेड किंवा तुझ्या माहेरचा अस्सल गावरान तडका  कोणताही एखादा अस्सल ब्रँड लवकर तयार कर बरं..! आता अस्सल खाल्ल्या शिवाय जमणार नाही..!"

मी एक तासाने स्वतच्या घरी आलो. आल्या आल्या हात धुवून जेवायला बसलो.माझ्या समोर अस्सल गावरान तडका डुबूक वडा ची भाजी ( कालवण ) तयार होती. ताटात त्या डुबूक वड्याचे कृष्णवर्णीय रूप पाहून माझी जीभ सैल झाली..अन् अनंत कोटी सहस्र लाळेच्या ग्रंथी स्रवू लागल्या. माझा संयमाचा बांध फुटला अन् मी शत्रूवर तुटून पडून त्याचा फडशा पाडावा तसा...डुबूक वड्यात मस्तपैकी पोळ्या चुरून मुरून काला करून खाल्ला. तेंव्हा कुठं तो पिझ्झा भाऊ माझ्या जिभेवरून नाहीसा झाला..अन् तेंव्हा कुठं मला बरं.. बरं वाटलं..!

आज अंदाजे दहा.. बारा वर्षांनी अस्सल काळं कालवण खाण्याचा काळयोग जुळून आला..केवळ त्या पिझ्झा भाऊ मुळेच हे शक्य झाले..!

ता.क.: नेहमी पिझ्झा भाऊ खणाऱ्यांच्या जिभेला माझा अस्सल गावरान तडका देऊन सलाम..!

वंदे मातरम्..!

आयुष्यात पहिल्यांदाच अन् शेवटचा एकच पिझ्झाचा तुकडा खाणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:०१/११/१९, शुक्रवार.