रविवार, २९ डिसेंबर, २०१९

" भारताचे पहिले पंतप्रधान, नेताजी सुभाषचंद्र बोस..!"




चिंतन

" भारताचे पहिले पंतप्रधान, नेताजी सुभाषचंद्र बोस..!"

===================================
                       
३० डिसेंबर १९४३ ला भारतातील अंदमान व निकोबार ही बेटे इंग्रजांच्या जूलमी राजवटीच्या जोखडातून स्वातंत्र्य झाली होती..! व या रोजी येथे आझाद हिंद सरकार स्थापन होऊन तिरंगी राष्ट्रध्वजाचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते जाहीररित्या ध्वजारोहण झाले होते..!(ते स्मृतिस्थळ आजही तेथे आहे..!)

त्या बद्दल प्रथमतः आझाद हिंद सेना व तत्कालीन भारताचा काही भूभाग स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानचे पाहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन..!

 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्याही वेळी भारतातील संपूर्ण भूप्रदेश इंग्रजांच्या,पोर्तुगीजांच्या ,व काही संस्थानिकांच्या जूलमी राजवटीच्या जोखडातून स्वातंत्र्य झालेला नव्हता,तरी देखील चाचा नेहरू यांचा नामोल्लेख
" स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान " असाच होतो..!

मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील सशस्त्र क्रांती करून भारतातील काही भूभाग अंदमान आणि निकोबार बेटे  १५ऑगस्ट १९४७ पूर्वी स्वतंत्र केली होती.. म्हणून नेताजींचा ही
" स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान" असा नामोल्लेख करणे संयुक्तिक ठरेल..!

 आज स्मृतिदिन आहे...अंदमान व निकोबार बेटे स्वातंत्र्य झाल्याचा..!  त्यानिमित्त आझाद हिंद सेना मधील सर्व भारतीय सैनिकांना व " भारताचे पहिले पंतप्रधान, नेताजी सुभाषचंद्र बोस " यांना   विनम्र अभिवादन..!


जय हिंद..!




वंदे मातरम्..!
                 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३०/१२/२०१८

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

" लज्जतदार मित्र अन् खुमासदार त्यांच्या शैली..! "
























आमचे गाव आमची माणसं..!

" लज्जतदार मित्र अन् खुमासदार त्यांच्या शैली..! "

हरित क्रांती प्रतिष्ठान - लासूर स्टेशन
=====================================

मैत्री... या एका शब्दात सर्व नात्यांचे सार सामावले आहे. मित्र या शब्दात सर्व भावभावनांचे ममत्व समाविष्ट आहे. आठवणी माणसाच्या आयूष्यात सतत त्याच्या सोबत असतात; नव्हे, नव्हे तर त्याच्या पश्चात त्या रम्य आठवणी त्या आठवणींचे साक्षीदार सतत गप्पांच्या ओघात आठवत असतात. 

अशीच आमची आज दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजीची रविवारची रम्य आठवण! आमच्या ग्रूप हरित क्रांती प्रतिष्ठान -लासूर स्टेशन चे आम्ही सदस्य आज एकत्र जमलो.आमच्या लासूर स्टेशन येथील आम्ही सर्वजण लज्जतदार मित्र अन् खुमासदार आमच्या स्वभावाने आम्हीच आमच्या विश्वात रमून गेलो..!अख्ख्या लासूर स्टेशन येथे असे फक्त आम्हीच केलं..! आम्ही तरी असे काय केले असे कित्येकांना प्रश्न पडला असेल..!

तर मानव निर्मित सतत पाणी टंचाईच्या छत्रछायेखाली असणाऱ्या लासूर स्टेशन येथे आम्ही सर्वांनी जीवाचे रान करून लासूर स्टेशन ते लासुरगाव रोडलागत वृक्षारोपण केले..! कित्येकदा आम्ही वृक्षारोपण केलेली झाडं व त्यांची Tree Guard चोरीला गेली..! कित्येकदा काहींनी फक्त आम्हाला काम करताना पाहून फक्त उपदेशाचे डोस पाजले..! मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे कृतीतून दाखवून दिले अन् सर्व झाडे जगवली..! उगीचच पर्यावरणाच्या गप्पा मारल्या नाहीत...! लासूर स्टेशन येथे वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन करून ते  टिकविणे मोठे अग्निदिव्य होते अन् आम्ही सर्वांनी ते अग्निदिव्य यशस्वीपणे पार केले...म्हणून आजच्या आहारावरील बट्ट्या ,रोडगे खाण्यात आमचा एक प्रकारचा रुबाब होता..! आमच्यातील प्रत्येक सदस्य लज्जतदार आहे अन् त्यांच्या शैली देखील खूप खुमासदार आहे..!😊

आज आम्हा सर्व मित्रांना आमच्या एका पितृतुल्य मित्राची खूप खूप आठवण आली अन् ते म्हणजे आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका होय..!मुंबई महानगर पालिकेच्या शासकीय सेवेतून दर्जा क्रमांक १ वरून निवृत्त  होऊन आम्हाला एक ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली..! आम्ही काकांच्या मार्गदर्शनात हे कार्य करत गेलो.आजच्या सह भोजन कार्यक्रमाला आदरणीय काका नाहीत,कारण काकांनी त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर त्यांच्या मूळ गावी डोंबिवली ,मुंबई येथे केले होते म्हणून..!पण आमच्या प्रत्येक घासाता आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका यांची प्रकर्षाने आठवण आली हे मात्र नक्की..!

  स्वत:च्या हाताने चवदार शूध्द शाकाहारी स्वयंपाक बनवला...!(आहारावरील रोडगे, बट्ट्या) खूपच चवदार स्वयंपाक झाला, त्यात स्वत:च्या मेहनतीने स्वयंपाक बनवून खाण्याचा आनंद काही औरच असतो... भोजनालयातील भोजनात स्वनिर्मितीचा आनंद नसतो. आणि मानवाला स्वनिर्मितीचा आनंद सतत आकर्षित करत असतो. मग ती स्वनिर्मिती कोणतीही असो, त्याचे माणूस कौतूकाने कौतूक करत असतो..!

 आम्ही सर्व हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन चे सदस्य या स्वनिर्मितीच्या आनंदात आज रमून गेलो. आयूष्य खूप सूंदर आहे...! तिशी-चाळीशीनंतर तर प्रत्येक क्षण मित्रांसमवेत जगावा. कारण या वयोगटापासून माणसाच्या कौटुंबिक जबाबदारीही विस्तारलेली असते. आणि यावेळी मनमोकळे करण्याचे रमनिय भावनिक ठिकाण मित्र...!  

एक स्वप्न आहे की, आम्ही वृक्षसंवर्धन करून खूप मोठ्या झालेल्या एखाद्या झाडाच्या सावलीत पुन्हा एकदा अशाच बट्ट्या ,रोडगे ,स्वतच्या हाताने तयार करून खायच्या..!

ता.क.: वाचकांनी प्रत्येक छायाचित्र निरखून पहा..! प्रत्येक छायाचित्र खवय्यांच्या तोंडाला पाणी आणील किंवा आनंद तर नक्कीच देईल..!😊

वंदे मातरम्..!

सौजन्य: हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन.

स्थळ: महावीर नगर लासूर स्टेशन येथील एका इसमाच्या घरासमोरील पटांगण व आडोसा..!😊

एक आचारी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक:  २५/१२/२०१६ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २६/१२/२०१९, गुरुवार


" अंश...एक..रूपे दोन..! "



" अंश...एक..रूपे दोन..! "

=================================

प्रत्येक जण आपापल्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असतो..!
जसे प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..तर..
भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..!
दोघेही एकाचेच अंश होते...पण..दोघांचे आचरण..उच्चारण..उपदेशन..भिन्न..भिन्न होते..!
कारण ,असे भिन्न भिन्न असणे..ही त्या कालखंडाची मागणी होती..!

प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण दोघेही एकच आचरण...उच्चारण... उपदेशन करून त्या त्या कालखंडात जगले असते तर..तो त्या कालखंडावर अन्याय झाला असता..!
नियतीने असे...एकाच्याच अंशाला.. असे भिन्न...भिन्न वर्तन करायला भाग पाडले..! असे इतिहासात अनेक उदाहरणे आहेत की,जे एकाचेच अंश होते पण वर्तन भिन्न..भिन्न..!

असे असण्याचे एकमेव कारण म्हणजे..त्या..त्या कालखंडाचे ते अपत्य असणे होय..!

अन् या भारतमातेच्या सुपुत्रांनी ती आपल्या कृतीने ,युक्तीने पूर्ण केली..! तीच त्यांची कायमची ओळख बनून गेली.प्रत्येकजण स्वतंत्र असतो.एकाचाच जरी अंश असला तरी...तो स्वतंत्र असतो..! असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे..त्या..त्या कालखंडातील स्वातंत्र्याची, समाजमनाची मागणी असते..इच्छा असते...! नव्हे .नव्हे..असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे हे  त्या कालखंडाचे लाडके अपत्य असते..भिन्न..भिन्न आचरण..उच्चारण... उपदेशनाचे..!

" अटलजी तुम्ही नरेंद्र होता..तुमच्या कालखंडाचे |

भिन्न..भिन्न नरेंद्र असतात.. त्या..त्या कालखंडाचे |"

तुम्ही प्रभू रामासारखे जगले |

कुणी भगवान श्रीकृष्णा सारखे जगत आहे..|

नीती दोघांची  भिन्न..भिन्न |

पण उद्देश मात्र एकच आहे |

माझा देश अग्रेसर व्हावा | "

आज अटलजींचा जन्मदिन..!
त्यानिमित्त विनम्र वंदन...अटलजींना...!

ता.क.: वरील मजकुरात उपमा अलंकार उपयोगात आणला आहे..! तुलना केलेली नाही..हे कृपया वाचकांनी नम्रपूर्वक समजून घ्यावे ..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २५ डिसेंबर २०१९, बुधवार.

" बालमित्रांची अंगत-पंगत "



आमचे गाव आमची माणसं..!

" बालमित्रांची अंगत-पंगत "

===============================
                           
आम्ही ,डावीकडून डॉ.गणेश वाणी,हा मजकूर लेखक इसम,आण्णासाहेब म्हस्के(औरंगाबाद),सदाशिव मुलमुले(शिक्षक) व आमचा बालमित्र व वर्गमित्र नंदकिशोर जाधव पा.  .!

काल दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी उशिरा संध्याकाळी नंदूच्या पालखेड येथील  घरी अंगत..पंगत जेवण केले..! हक्काने आम्ही एकमेकांच्या घरी ,अगदी थेट स्वयंपाक घरात जाऊन जेवण करणारी व आजकाल " अल्पसंख्यांक " होत चाललेल्या या अल्पसंख्यांक मानवी जमाती पैकी आम्ही मोजके..!

आमसूल टाकून केलेले वरण..! आहाहा..! व्वा..!खूपच रुचकर..! माझी स्व.आई,अगदी असेच वरण करत असे..! आईची यावेळी खूप आठवण आली..! वर्षाताईंना तसे बोलूनही दाखविले..!स्वयंपाक खूपच रुचकर झाला होता..!अर्थात याचे संपूर्ण श्रेय आमची जन्मभूमी पालखेडच्या सरपंच वर्षाताई नंदकिशोर जाधव यांच्या सुगरण पाक कौशल्याला द्यावे लागेल..!त्या बाबतीत दोन कौतुकाचे शब्द वर्षा ताईंना म्हणालो सुध्दा..! वास्तविक मी वैयक्तीक दुपारी जर तीन,चार पोळ्या जरी खाल्या तरी रात्री जेवण करत नाही,पण आजची जेवणाची मैफिल आणि त्यातील रंगत काही औरच होती..!त्यामुळे माझी ती जेवणाची दिनचर्या आज अपवाद ठरली..!धन्यवाद वर्षाताई..!!

आजकाल बऱ्याच भारतीय संस्कृती नष्ट होत चालल्या आहेत.त्यापैकी ही एक.  " बालमित्रांच्या घरी ,थेट स्वयंपाक घरात जेवण करणे " ही होय..!आम्ही मात्र  ही भारतीय संस्कृती नष्ट न होऊ देण्यासाठी छोटासा का होईना पण प्रामाणिक प्रयत्न अधून मधून नक्कीच करत असतो..!
एकमेकांच्या घरी जाऊन हक्काने घरगुती जेवण करणे या पात्रतेची आजकाल बालमैत्री निर्माण होत नाही का..?
त्या विश्वासाची नाती आजच्या मुलांमध्ये निर्माण  होत नाही का..?
मानवी संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या जातीपातीच्या भयंकर भिंती त्या आड येत आहेत का..?
आजचे अती प्रगत तंत्रज्ञान यास कारणीभूत आहे का..?
आजकाल फक्त व्यक्ती भेटतात..!माणूस भेटत नाही का..? 

आमच्या सारख्या अनेकांचे आयुष्य असच मन मोकळे व्यतीत झाले आहे.आजचे धकाधकीचे अन्  प्रत्यक्ष न भेटणारे अनेक आयुष्य पाहिले की,माझ्या सारख्या अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते..!आमच्या मनातील ही निर्माण होणारी अस्वस्थता आजच्या समाजव्यवस्थेवर उगारलेला आसूड असतो..! कारण आज माझी मुलं काय किंवा माझ्या समकालीन मित्रांची मुलं काय बहुतांशी एकमेकांना  भेटतात पण त्या भेटीत एकमेकांच्या घरातील स्वयंपाक घर काही भेटत नाही अन् इथंच आजच्या मुलांच्या आयुष्याची दुर्दैवी मेख आहे..!




आम्ही उपस्थित व अनेक अनुपस्थित बालमित्र या वरील अनेक गंभीर व आत्मचिंतन करायला लावणाऱ्या प्रश्नांना नक्कीच अपवाद आहोत..!
आम्ही खरंच नशीबवान आहोत..!

खूप खूप धन्यवाद मित्रा नंदू..!                                                                   

वंदे मातरम्..!

ता.क.: आम्हा बालमित्रांच्या आयुष्यातील अनेक रंगतदार किस्से आहेत,ज्यावर भविष्यात मी लेखन करणारच आहे..!
कारण आमच्या सारखे आम्हीच होतो आमच्या गावात..!😀
                                                                                     
या अंगती-पंगतीतील एक इसम व लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, पालखेड वाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 फेसबुकवर लिखाण दिनांक: २५ डिसेंबर २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २५ डिसेंबर २०१९

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

" मानवी नात्याला फुटलेला, टहाळ प्रेमाचा..! "






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मानवी नात्याला फुटलेला, टहाळ प्रेमाचा..! "

==================================

मी काल शनिवारी‌ दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी शाळेतून आल्यावर जेवण झाल्यावर काहीतरी वाचत अन् पाहत बसलो होतो.माझ्या पत्नीने मला विचारले की,
" आपण ,लासूर स्टेशन येथे राहत असताना ,दरवर्षी  बबन हरभऱ्याचा टहाळ घेऊन यायचाच...!
माझ्या पत्नीच्या या वाक्याने मलाही आज बबन अन् त्याच्या दरवर्षी दिल्या जाणाऱ्या टहाळाची लगेच आठवण आली..अन् त्या माझ्या प्रिय मुलाची देखील प्रकर्षाने आठवण आली..!
मी माझ्या पत्नीला म्हणालो..
" अगं,आता आपण दूर औरंगाबादला राहतो..आता कसं शक्य आहे ते..! आणि नयन ला टहाळ आवडतो तर घेऊन टाक विकत..! विकणारे येतातच  की..! पण आज नेमकी कशी काय आठवण आली..?"
माझी पत्नी - " अहो,आज सकाळी हरभऱ्याचा टहाळ विकणारा आला होता..म्हणून बबनच्या दरवर्षीच्या भेटीची आठवण आली..!"
या नंतर मी माझ्या कामात मग्न झालो.थोड्या वेळानं माझा मोबाईल खणखणला.. त्यावर नाव  दिसत होते
" Hajare Baban " अन् वेळ होती..संध्याकाळी ५:२७ ची...!
मी आलेला कॉल घेतला अन् तिकडून मोठ्याने आवाज येऊ लागला...
" सर,तुम्ही घरीच आहात का..?"
मी- " अरे,बबन...! मी घरीच आहे भाऊ...का...काय झालं..?"
बबन - " सर,मी दहा...पंधरा मिनिटात तुमच्या घरी येऊ राहिलो...घरीच थांबा..!"
मी - " बरंं बरं...तू हळू ये पण..!"

काही वेळाने बबन घरी आला.आल्या..आल्या त्याने हरभऱ्याचा भला मोठा टहाळ आणला होता.मी अन्  माझी पत्नी एकमेकाकडे विस्मयकारक नजरेने  पाहू लागलो होतो.ज्या बबन ची अन् त्याच्या दरवर्षीच्या प्रेमळ भेटीच्या टहाळाची आठवण आम्ही काही वेळा पूर्वीच काढली होती...तीच आठवण जिवंत स्वरूपात आमच्या समोर उभी होती. असं कसं काय होऊ शकते...? यावर मी खूप अंतर्मुख होऊन अंतर्मनात विचार करू लागलो होतो.मनाच्या संवेदना ,मनाच्या तारा जोडलेल्या मानवी मनांना अशा प्रकारे भेटत असतात यावर माझा विश्वास अधिक दृढ झाला होता.फक्त बोलणे हीच एकमेव भाषा असूच शकत नाही यावर मी ठाम झालो होतो.मानवी नात्याची अन् त्यातील मानवी मनाची अबोल असणारी पण मनातून एकमेकांना साद  देणारी भाषा जगात आजही अस्तित्वात आहे यावर माझा प्रचंड विश्वास बसला होता..!

आल्या...आल्या...बबन बबन मोठ्या आवाजात बोलू लागला..
( बबन जसा शाळेत असताना मोठ्याने बोलायचा तीच त्याची सवय आजही आहे)
" सर, इकडं औरंगाबाद ला काम होते..अन् जळगाव चे एक लग्नही होते. म्हणलं सरला टहाळ द्यावा...घ्या सर...!"
अस म्हणून त्याची दरवर्षीची प्रेमळ भेट पूर्ण होत होती.वास्तविक हा जो टहाळ होता तो जगाच्या दृष्टीने असलेल्या बाजारात फार काही महाग अजिबात नाही.पण बबन ने त्या देण्यामागील सातत्य व त्या मागील निरपेक्ष प्रेम भावना मला खूप स्वर्गीय आनंद देऊन जात होती.

बबन हजारे..!
माझ्या शिक्षकी आयुष्यातील माझ्या बऱ्याच गुणांना अगदी चपखलपणे अनुकरण करणारा विद्यार्थी..! तब्बल  २३ वर्षापूर्वी मी जेंव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव, केंद्र लासूरगाव ता.वैजापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होतो..त्यावेळी तेथे अनेक रत्ने भेटली..मुलांच्या रूपातून ! त्यापैकीच हा एक बबन..!

प्रिय बबन,हा निव्वळ रांगडा गडी..! याला कशाचेही व्यसन अजिबात नाही.शाळेत असताना मी जेंव्हा मुलांची कब्बडी घ्यायचो तेंव्हा..हा पठ्ठ्या एकटा..तीन...चार जणांना सहजपणे ओढीत घेऊन यायचा..! प्रत्येक मैदानी स्पर्धेत हा अव्वल असायचा.सकाळी जेऊन खाऊन  आपल्या कामाला मोकळा असणारा बबन..! आपल्या कुटुंबावर खूप खूप प्रेम करणारा बबन..!हा लहान असताना मी नेहमी याला खूप खूप जवळून पाहिले आहे.हा याच्या घरातील सगळी कामे करायचा.आजीची खूप सेवा करायचा.कोणत्याही कामाची कधीच लाज बाळगली नाही. पडेल ती कामे याने केली. याने याच्या घरातील म्हाताऱ्या माणसांची अशी काही सेवा केली की ,मी याच्या त्या कार्यापुढे नतमस्तक होऊन जातो. मला जळगाव येथील शाळेत असताना जर काही घरून पालखेड येथून काही आणायचे असेल तर..हा गडी सायकलवर जाऊन येऊन २० ते २५ मिनिटात पुन्हा शाळेत हजर..! दोन्ही गावातील अंतर आहे अंदाजे ८ ते १० किलोमीटर..!याला नाही म्हंटले तरी हा म्हणायचा...
" सर,तुमचं जेवण होई पर्यंत आलोच..मी..!" खूप काटक तब्येतीचा..!कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना,स्थावर मालमत्ता नसताना स्वतः च्या हिमतीवर , चिकाटीने,आज माझा हा प्रिय विद्यार्थी खूप सुखात आहे.

प्रिय विद्यार्थी बबन,याने जेंव्हा बालेवाडी,पुणे येथे एक उत्कृष्ट धावपटू म्हणून राज्यस्तरावरील बक्षीस प्राप्त केले होते, तेंव्हा तिथून आल्या आल्या,माझ्या लासुर् स्टेशन येथील घरी आवर्जून भेटायला आला होता. त्या भेटीच्या वेळी त्याला प्राप्त झालेले  बक्षीस पदकासह  मला खूप कौतुकाने दाखवत होता..! माझ्या शिक्षकी आयुष्याचा तो विजय दिवस साजरा करत होता असेच जाणवत होते..!

याच्या कष्टाचे फळ याला मिळाले..! आज हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात नोकरी करतो.याच्यातील अंगभूत गुणांना याने तिथेही प्रदर्शित केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या  स्पर्धेत बबन ने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे..! बालेवाडी , पुणे येथे हा एक धावपटू म्हणून गेलेला आहे.ज्या..ज्यावेळी हा कुठे स्पर्धेत जातो....तिथून मला नक्की आठवणीने फोन करून माहिती देत असतो..खुशाली कळवत असतो.आपल्या मुलांवर केलेल्या प्रेमाची ती परतफेड असते..!

बबन ,हा आजच्या काळातील सर्व मुलांना एक आदर्श उदाहरण आहे..!
त्याची ही योग्यता त्याच्या वर्तनातून सतत जाणवत असते..! याने स्व कष्टातून जळगाव येथे टुमदार घर बांधलं..! त्याची गृहपुजा देखील केली नव्हती..पण याने पहिल्यांदा मला ते घर पाहण्यासाठी आवर्जून घेऊन गेला होता.त्यावेळी तो जे बोलला होता..ते माझ्या हृदयात कायमचे घर करून गेले आहे..! तो म्हणाला होता....
" सर,आम्ही तुमच्या संस्काराला कधीही विसरणार नाहीत.हे माझे घर तुमच्या आशिर्वादामुळेच झाले आहे.तुम्ही माझ्या घराला पाय लावले..माझ्या घराची वास्तुशांती झाली सर..!"

 कृपया कुणीही मी माझी आत्मस्तुती करतो वगैरे असे अजिबात समजू नये ही नम्र अपेक्षा..!
पण प्रिय बबन नैतिक दृष्ट्या किती परिपक्व झाला होता अन् आहे हे जगाला माहित व्हावे हा निर्मळ हेतू..!

बबन ला , प्रिय मित्र नितीन पगार सर व मी खूप जवळून पाहिले आहे..! आमच्या आवडत्या मुलांपैकी तो एक आहे..!

माझ्या लग्नात माझ्या माजी विद्यार्थ्यां पैकी सोपान वाल्हे  अन् बबन आवर्जून उपस्थित होता. वास्तविक माझ्याकडून त्याला लग्न पत्रिका देखील दिल्या गेली नव्हती.हे नाते असते अजिबात अहंकार नसलेले..! हे नाते असते..फक्त आणि फक्त श्रद्धा अन् प्रेम असलेले..!मी ज्या बबन ला त्याच्या लहानपणी खूप जीव लावला होता त्या जीवाच्या प्रेमाचा आता वृक्ष झाला होता.असा वृक्ष ज्या वृक्षाच्या सावलीत ,त्या वृक्षाला कोवळ्या वयात जोपासणारे आनंदाने विसावू शकत होते.म्हणून माझा माझ्या सर्व माजी अन्  आजी विद्यार्थ्यांच्या प्रेमावर खूप खूप विश्वास अन् प्रचंड श्रद्धा आहे..! कारण मुळातच स्वच्छ ,सुंदर प्रेमाचं नातं असलं की, त्याला मानवी नात्याची अतिशय सुगंधी फुलं येतातच यावर माझा ठाम विश्वास आहे..! काल ज्यावेळी बबन घरी आला होता त्यावेळी नमन ला मी म्हणालो..
" तू जर माझ्या या मुलाबरोबर शर्यतीत जिंकून दाखवले तर तुला जे हवं ते बक्षीस देईल..!"
यावर नमनने स्पष्ट नकार दिला...कारण त्यालाही मी या माझ्या मुलाचे,बबन चे कर्तृत्व सांगितलेले आहे..!

खूप खूप धन्यवाद बेटा बबन...!

ता.क.: विद्यार्थांना जीव लावलेल्या जीवाच्या झाडाला प्रेमाचा टहाळ नक्की येतो..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २३ डिसेंबर २०१८ व

माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २३ डिसेंबर २०१९

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

" श्रीमंतांच्या पावाची आठवण आली..! "




आमचे गाव आमची माणसं..!

" श्रीमंतांच्या पावाची आठवण आली..! "
==================================

थोरल्याची अन् धाकट्याची हौस म्हणून आज गुबगुबीत गालाचा पाव अन् तरतरीत तापड भाजी  केली होती..!
त्या तरतरीत तापड भाजीची चव काल्पनिक पद्धतीने  घेऊन अन् वास मात्र प्रत्यक्षात घेऊन माझ्या देखील सुदृढ नाकाची आज हौस पूर्ण झाली..!😊
या गुबगुबीत गालाचा पाव पाहून मला माझ्या पालखेड येथील बालपणीच्या निष्ठुर अन् पाषाणह्रदयी पावाची आठवण आली..! मी इ.७ वी पर्यंत चहा पीत असे..!मात्र इ.८ वी नंतर जी चहा प्यायची बंद केली ती आजतागायत कायम आहे..!
असो,
मी इ.७ वी पर्यंत चहा पीत असे,त्यामुळं बऱ्याचदा  चहात बुडून पाव खाण्याचा मोह होत असे आणि मी नेहमीप्रमाणे त्या मोहाला बळी पडत असे..!😊माझी स्व.आई , चहाची लई शौकीन होती..! त्यामुळं तिच्या सोबत चहा प्यायचा आग्रह व्हायचा..! माझ्या बालपणी आमच्याच पालखेड गावातील माझ्या वडिलांचे बालमित्र तिर्थस्वरूप यासीन काका भल्या पहाटे गावातील प्रत्येक आळीत फिरून पाव-बटर विकायचे..! गावातील बहुतांशी  माता भगिनी पहाटे सडा रांगोळी करत असतानाच यासीन काका यांच्याकडून ,आपापल्या लेकरांसाठी पाव विकत घ्यायच्या..! माझ्या तीर्थरूप वडिलांचे बालमित्र असल्याने यासीन काका हमखास आमच्या घरी पाव द्यायचेच..! आमच्याच आळीत पाव-बटर विकणारा एक आमचा जिवलग शेजारी पण होता..! त्याच नाव उस्मान भाऊ शेख..! आळीतच पाव बटर विकायला असल्याने बऱ्याचदा त्यांचं मी हक्काचं गिऱ्हाईक होतो..!
माझ्या बालपणी जे पाव मिळायचे ,त्यांच्यी तब्येत एकदम  कडक,निष्ठुर अन् पाषाणह्रदयी..! चहात पाव बुडून खायचा असेल तर..त्याला त्या चहात भिजायला टाकावं लागत असे..! दोन..तीन मिनिटे पाव भिजून झाला की,मग तो पाव  खायच्या लायकीचा व्हायचा..!😊  एका गोष्टीचा लई राग यायचा..अन् तो म्हणजे......
" तो अतिशय कडक असलेला निष्ठुर ,पाषाणह्रदयी पाव लवकर भिजत नसायचा अन् खायची तगमग सुरू असायची..!" 😊 बऱ्याचदा आम्ही काही बालमित्र तो कडक पाव खिशात घेऊन प्राथमिक शाळेत जायचो..! आम्ही काही बालमित्र पहिल्यापासून  बॅक बँचर असल्याने मागे बसून शिक्षण घेता घेता तो कडक पाव पण अधून मधून सरांची नजर चुकवून खात असायचो..!😊
एवढे कडक पाव आमच्या बालपणी खायला मिळत असे. वर्षातून कधीतरी ब्रेड पाव खायला मिळत असे..! ते जेंव्हा  खायला भेटत असे तेंव्हा.....................
" आपण श्रीमंतांचा पाव " खात आहोत याची जाणीव होत असायची..! आजचा गुबगुबीत गालाचा पाव पाहून मला माझ्या पालखेड गावातील माझ्या बालपणीच्या
कडक निष्ठुर पाषाणह्रदयी पावाची आठवण आली. आज माझ्या मुलांना किंवा माझ्या समकालीन मित्रांच्या मुलांना आमच्या पालखेड गावातील बालपणीच्या काळात खायला भेटणाऱ्या कडक निष्ठुर लवकर न भिजणाऱ्या पावाची ओळख  नाही..!
कारण...आजच्या पिढीतील मुलांना दररोज गुबगुबीत गालाचा पाव खायला मिळत आहे..किंवा सहजपणे उपलब्ध होतो..! मात्र माझ्या पिढीतील अनेकांनी आपापल्या गावी,बालपणी कडक,निष्ठुर ,पाषाणह्रदयी लवकर न भिजणारे पाव अन् वर्षातून कधीतरी तत्कालीन श्रीमंतांचा पाव, ब्रेड पाव खाल्ला असल्याने  त्यांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतात चवदार भावूकतेने..!

मिस यू...कडक,निष्ठुर,पाषाणह्रदयी लवकर न भिजनारा पाव..!

वंदे मातरम्

गेल्या कित्येक वर्षांपासून वडा पाव खायचे टाळणारा इसम : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक:२२ डिसेंबर २०१९,रविवार.





बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

"अखेर आपले मास्तर गेले..! "







"अखेर आपले मास्तर गेले..! "
=================================

दोन डॉक्टरांच्या अभिनयाच्या युध्दात दोघांनीही सर्वोत्कृष्ट अभिनयांचे युद्ध खेळून आयुष्याच्या रंगमंचावर यांनीच बाजी मारली..!
कारण स्वतः जवळ असणारे संयमित वर्तन..!
डॉ.काशिनाथ घाणेकर अन् डॉ.श्रीराम लागू..!
एका डॉक्टरांच्या कायमचे हृदयातील स्थान मिळवून त्या क्षेत्रातील अढळ स्थान प्राप्त करणारे दुसरे डॉक्टर..!
डॉ.जब्बार पटेल साहेब अन् डॉ.श्रीराम लागू..!
आता ,आज एक जे ग्रेट डॉक्टर  आदरणीय जब्बार पटेल साहेब हयातीत आहेत,त्यांनी जर यदा कदाचित सिंहासन-२   हा मराठी चित्रपट तयार केलाच तर.........
त्यात आपले डॉ.श्रीराम लागू, ना..अभिनेता म्हणून असतील...ना...प्रेक्षक म्हणून असतील...!
वि.वा.शिरवाडकरांच्या गणपत रामचंद्र बेलवलकर...यांनी आपल्या थरथरत्या हातांनी आपल्या आयुष्याचे रुदन,अंतर्मनातील घालमेल व्यक्त करणारे आपले नटसम्राट डॉ.श्रीराम लागू आयुष्याच्या रंगमंचावरून कायमचा निरोप घेऊन आपल्या सरकारकडे गेले..!
ता. क.: अखेर एका मास्तराला नियतीने तिच्या तुणतुण्याच्या तालावर नाचवून स्वतच्या कवेत घेतलेच...!
अशा सर्वार्थाने ग्रेट असणाऱ्या अभिनयाच्या डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

वंदे मातरम्..!

अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक:१८ डिसेंबर २०१९, बुधवार.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

"आम्हाला एकमेकांना भूतकाळ भेटला..!"





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"आम्हाला एकमेकांना भूतकाळ भेटला..!"
=================================

मी आज दिनांक १६/१२/२०१८ रोजी रविवारी भल्या सकाळी  औरंगाबाद शहराकडे निघालो होतो.जाताना गोलवाडी फाट्यावर सैनिकी क्षेत्रात काहीजण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ठिकाणी झाडे ,इतर सामान घेऊन जमलेले दिसले.औरंगाबाद शहरातून लगेच काम आटोपून ८:३० पर्यंत त्याच ठिकाणी परत आलो.
मला येथे माझा लासूर स्टेशन येथील भूतकाळ भेटल्या सारखा वाटत होता..पण नवीन माणसं असल्याने कशी विचारपूस करावी हे समजेना..! अखेर त्यांच्यातील एक प्रमुख असल्या सारखे दिसणाऱ्या एका इसमाकडे गेलो..अन् म्हणालो....
" साहेब,मी नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव,  मी गुरुजी आहे..मी येथे काम करू शकतो का..?"
" अहो, असं काय विचारता राव..! आम्हाला असेच माणसं हवी आहेत..!" यांचे नाव प्रशांत भाऊ गिरे आहे हे नंतर समजले.
वृक्षारोपण करण्याचे महान काम करणाऱ्या " जन सहयोग संस्थेचे ते सर्व स्वयंसेवक होते.

मग काय...काही वर्षापूर्वी आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील स्वयंसेवकांनी जे कार्य लासूर स्टेशन ते लासूरगाव रोड वरील कार्यात झोकून दिले.. ते सतत भेटत होते.! प्रत्येक टिकाव, कुदळ त्या सर्व स्वयंसेवकांची आठवण करून देत होते. पुन्हा एकदा माझा भूतकाळ मला भेटला होता..! मी जून २०१८ मध्ये येथे राहायला आल्यापासून त्याच भूतकाळाच्या शोधात होतो...अन् नियतीने तो असा पुढे आणून उभा केला..! यांच्या मध्ये मला हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन चे स्वयंसेवक दिसत होते..!

खूप दिवसानंतर झाडे लावण्यासाठी टिकाव  हाती घेतले होते..पाच सहा खड्डे झाल्यावर एका बाजूला उभा राहिलो..इतक्यात एक मुलगा माझ्याकडे आला..अन् म्हणाला..
" काका, पाणी आणून देऊ का...?"
" नको रे दादा..! कुठला आहेस तू.. नाव काय. तुझे..? "
मुलगा - "मी म्हसल्याचा आहे.. माझे नाव शुभम संतोष गोराडे..!"
मी हे गावाचे नाव माझ्या शाळेतील मुलांकडून ऐकले होते.मी त्या मुलाला म्हणालो...
" अरे,छोट्या...मी तुझ्याच गावाकडील आहे... अंधारी चा...!मी तिथे गुरुजी आहे..!"

मी असं म्हणल्या बरोबर. तो मुलगा माझ्या खूप जवळ आला.
माणसाला दूर गावी ,आपल्या गावाकडचा माणूस भेटला की खूप आनंद होतो अगदी तेच भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर मला जाणवले..! त्याला जवळ घेऊन विचारपूस केली तर समजले की,आज वृक्षारोपण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज सैनिक शाळा ,कांचनवाडी येथील काही विद्यार्थी आपल्या गुरुजी सोबत आलेले होते.त्याच शाळेत हा शुभम शिकतो अन् तिथेच वसतिगृहात राहतो.मी तिथून माझे पूर्ण काम करून निघे पर्यंत हा शुभम सतत..माझ्या सोबतच होता..!
मी त्याला म्हणालो...
" तुझ्या वडिलांशी बोल.. बरं वाटेल त्यांना.! काय नंबर आहे..?"
त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मी ही बोललो .त्याला त्याच्या गावचा माणूस भेटल्याचा खूप आनंद वाटत होता..तसा तो बोलला सुध्दा..
" सर,तुम्ही माझ्या गावाकडचे आहात..लई चांगलं वाटलं ..! मी गावाकडे आलो का...तुम्हाला शाळेत भेटायला नक्की येईल..!

माणूस,नेहमी त्याच्या वर्तमानात ,त्याचा भूतकाळ शोधत असतो.मग तो कधी माणसांच्या रुपात शोधत असतो..तर कधी विविध प्रतीकांचा रुपात..! मात्र एक नक्की..की....आपला भूतकाळ सतत आपल्याला या..ना..त्या मार्गाने भेटत असतो..! फक्त आपण त्या भूतकाळाला ,सध्याच्या वर्तमानकाळात ओळखायला हवे अन् त्याच्या जवळ स्वतः हून  जायला हवे...! बरच हलके हलके वाटते....मनातून..!

जसे आज,त्या शुभम ला..त्याच्या गावाकडच्या  भूतकाळातीलआठवणी माझ्या रूपातून  भेटल्या...! अन् मला माझ्या लासूर स्टेशन येथील आम्ही जवळ...जवळ १०० वृक्षांच्या स्वतच्या लेकरा सारखी काळजी घेतल्याच्या आठवणी भेटल्या...!
धन्यवाद भूतकाळ...तू आज  वर्तमानात भेटला आम्हाला..! 
तू आता भेटत राहणार...!

खूप खूप धन्यवाद अन् ग्रेट सँल्युट जन सहयोग परिवार औरंगाबाद..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १६ डिसेंबर २०१८ 
व माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १६/१२/२०१९, सोमवार


रविवार, १५ डिसेंबर, २०१९

प्रिय बालमित्र नाना अन् त्याचा बुक्का..! '😊





आमचे गाव आमची माणसं..!

प्रिय बालमित्र नाना अन् त्याचा बुक्का..! '😊
=================================

संजय भाऊसाहेब भाडाईत उपाख्य नाना..!
विशेष काही लिहिण्यासारखे नाही,पण हा आमच्या सर्व वर्गमित्रांमध्ये सर्वांचा मित्र होता.याच्या एका हातात लई ताकद असल्याने आम्ही सगळे बालमित्र याच्याशी सहसा हुज्जत घालण्याचे टाळत असायचो..! याचा नेमका उजवा का डावा हात हे आज नेमकं लक्षात नाही..! नाहीतरी मला " हात " असलेल्या काही बाबी जेंव्हा पासून माझे वय वर्ष १८ पूर्ण झाले तेंव्हा पासून आवडतच नाही..!😊
आम्ही इयत्ता ६ वीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखेड येथे शिकत होतो.त्यावेळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते आदरणीय मुळे सर..! सरांची तब्येत जेमतेम होती.स्वभाव देखील अती सौम्य होता.
एकदा मधल्या सुट्टीत या नानाचे अन् आमच्याच वर्गातील कुणाचे तरी भांडण झाले. आम्ही काही मित्र जे की तब्येतीनं दीन अन् दुबळे होतो,ते आम्ही काहीजण दुरून ही भांडणं पाहत होतो..! हा नाना,त्या समोरच्याला त्याच्या ज्या एका हातात जास्त ताकद होती,त्याच हाताने बदड बदड बदडत होता..! आम्ही दुरून आमच्या काळातील घातक चित्रपट पाहत होतो.त्यात जसा तो काशी ( सनी देओल)  त्या काथ्याला ( डँनी ) झोडपतो तसाच हा नाना,आमच्याच वर्गातील दुसऱ्या एका मित्राला झोडपत होता..!मी अन् माझ्या सोबत उभ्या असलेल्या मित्रात ते भांडण सोडविण्याची क्षमता नव्हती अन् हिम्मत तर अजिबात नव्हती..! माझ्या सोबत डॉ.गणेश वाणी,विजय गायकवाड ( ह. मु.वैजापूर) उभे होते.आम्ही त्याकाळचे एकदम लुकडे..लाकडे जिवंत पात्रं होतो..!त्यामुळे शारीरिक क्षमता अन् हिम्मत याचा आमच्याशी दूरदूरचा संबंध नव्हता..!😊
नानाचे अन् त्या मित्राचे भांडण ऐन रंगात आले होते.बाजूलाच शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय होते.आज ती मुख्याध्यापक वर्गाखोली शाळेच्या इमारतीत उत्तर दिशेला ऐन मधोमध सुस्थितीत आहे..!त्याच्या उत्तर दिशेला मोकळ्या जागेत नानाचे अन् त्या मित्राचे हातघाईवर सुरू असलेलं युद्ध सुरू होते.थोड्या वेळाने या भांडणाचा अन् आमच्या सारख्या तब्येतीनं दिन..दुबळ्या प्रेक्षकाच्या गोंगाटाने आदरणीय मुळे सरांना अंदाज आला की,कुणाचे तरी भांडण सुरू आहे म्हणुन..!
इतक्यात आदरणीय मुळे सर तावातावाने ओरडत आले.त्यांनी नानाला अन् दुसऱ्या मित्राला भांडणापासून‌ दूर करण्याचा प्रयत्न करू लागले..! माणसांच्या भांडणाचा एक मानसशास्त्रीय नियम आहे..अन् तो म्हणजे त्याला भांडणात कुणी आवरायला लागले की,त्याला अजून जास्त चेव येतो..!😊 इथेही हा माणसांच्या भांडणाचा एक मानसशास्त्रीय नियम लागू पडू लागला होता.आदरणीय मुळे सर ,त्या दोघांची भांडणं सोडू लागली तसतसे त्यांच्या अंगात चेव येऊ लागला होता.
इतक्यात...........
नानाचे अन् त्या दुसऱ्या मित्राचे भांडण सोडायला गेलेले
आदरणीय मुळे सर ऐन दोघांच्या मधोमध आले.एवढ्यात नानाचा एक जोराचा बुक्का त्या मित्राला मारताना तो मित्र ऐनवेळी मटकन खाली बसला अन् नानाचा तो जोराचा बुक्का नेमका आदरणीय मुळे सरांच्या छातीत बसला..! नानाने नेमका त्याच हाताने तो जोराचा बुक्का हाणला होता,ज्यात सर्वात जास्त ताकद होती..! मुळे सर एकदम जमिनीवर पडले.एकतर त्यांची तब्येत जेमतेम अन् त्यात नानाच्या जास्त ताकदीचा ठोसा..! त्यामुळे मुळे सर एकाच बुक्क्यात जमिनीवर पडले..! आपल्या सरांना चुकून मार लागला हे पाहून ते दोघेही भांडणं करणारे भानावर आले.त्यांनी एकत्रितपणे सरांना उठवायला लागले.बाजूलाच आम्ही जे तब्येतीनं जी दिन..दुबळी मित्रमंडळी उभी होतो,आम्ही लगेच सरांना प्यायला पाणी घेऊन आलो.सरांच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारले. मुळे सर थोड्या वेळाने सावध अवस्थेत आले.नानाने आदरणीय मुळे सरांना मुद्दामहून बुक्का हाणला नव्हता,पण सर,नानाच्या अन् त्या दुसऱ्या मित्राच्या ऐन तडाख्यात सापडले होते,त्यामुळे असे घडले होते..!
आदरणीय मुळे सर सावध स्थितीत आल्यावर आम्हाला वाटले होते की,सर आता यांना लई हाणतील..पण सरांनी त्या दोघांनाही अशी भांडणं यापुढे करू नका असे प्रेमाने समजावून सांगितले.सरांच्या त्या प्रेमळ सल्ल्यामुळे त्यापुढे आमच्या वर्गात तिथून पुढे कधीही कुणाचेही भांडणं झाली नाहीत हे विशेष..! प्रेमात अशीही ताकद असते हे आम्हाला आमच्या आदरणीय मुळे सरांच्या त्या वर्तनातून दिसले होते.
असा हा आमचा प्रिय बालमित्र संजू उपाख्य नाना भाडाईत..! हा सध्या पालखेड गावात स्वतच्या व्यवसायात सुखी आहे.आजही जेंव्हा कधी याची अन् माझी भेट होते तेंव्हा तेंव्हा त्याच्या त्याकाळातील त्या बुक्क्याचा विषय हमखास निघतो..!😊

असा आमचा प्रिय बालमित्र नाना अन् त्याचा बुक्का..!😊


वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक:१५ डिसेंबर २०१९, रविवार.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

" मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो..!"





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो..!"
======================

आज दिनांक १२/१२/२०१८ रोजी सकाळी दररोजच्या पेक्षा लवकरच म्हणजे सकाळी ९ वाजताच माझ्या सध्याच्या जि.प. अंधारी ,ता. सिल्लोड प्रशालेत पोहचलो होतो.घाईतच शाळेतील मुख्य गेटजवळ पोहचलो..कारण कधी वर्गात जाईल अन् कधी जेवणाच्या डब्ब्यातील थोडेफार खाईल असे झाले होते. मला खूप भूक लागली होती.
इतक्यात मला माझ्या एका मुलीने आवाज दिला....
ऋतुजा - " ओ....सर...इकडं या....!"
मी - " अगं ,दीदी...मी नंतर येतो...!"
शिवानी- " सर, तुम्ही इकडं या म्हणजे या...तिकडं जाऊ नका...!"
मला शेवटी त्या माझ्या मुलींकडे जावेच लागले.तिथं गेल्यावर पाहिलं तर या माझ्या मुली मस्तपैकी अंगत..पंगत करून जेवायला बसल्या होत्या. त्यातील समीक्षा दीदी मला म्हणाली....
" सर, तुम्ही दुपारी  आमच्या सोबत जेवायला बसतात पण आज सकाळी बसा..!"
मी- " मला पण लई भूक लागली आहे...!"
असं म्हणून मीही पटकन बसलो..माझा जेवणाचा डबा काढणार इतक्यात समीक्षा दीदी म्हणाली....
" सर,तुमचा डब्बा तसाच राहू द्या...आमच्यातच जेवायला बसा..! "
मीही काहीही आढेवेढे न घेता बसलो.कारण मी कितीही म्हणालो असतो की ," मी माझाच जेवणाचा डब्बा खातो ...!"
तर ते कदापि शक्यच नव्हते..! कारण माझ्या या मुलींचा न भूतो न भविष्यती असलेला नेहमीचा प्रेमळ मायेचा आग्रह..! आणि तो मायेचा आग्रह नाकारण्याची माझ्यात तरी हिम्मत नाहीच..!

मी त्यांच्याशी बोलू लागलो...
" कागं...दीदी..तुम्ही एवढ्या  सकाळी जेवणाचा डबा घरून तयार करून आणतात...खरंच तुमच्या आईचे तुमच्यावर खूप खूप उपकार आहेत की नाही..!"
वैष्णवी - " सर,आम्ही आमच्या आईला मदत करून येतो..!"
मी - " तुम्ही सगळ्या शेताच्या वस्तीवर राहता..तुमची वस्ती अन् शाळा किती अंतर असेल बरं..?"
समीक्षा-" दोन ते तीन किलोमीटर..!"
ऋतुजा - " सर,आम्ही पहाटेच उठून अंघोळ करून जेवणाचा डबा घेऊन गावात असलेल्या ट्युशन ला पायी येतो.. सकाळी ६ वाजता...! कधी सायकलवर पण येतो. कधी आमचे वडील आणून सोडतात...!"
मला खूप आश्चर्य वाटले.. मी विचारले.....
" मग तुम्ही घरून कधी निघता..?"
निकिता - " पहाटे...५:४० ते ५:४५ दरम्यान निघतो आम्ही..!"
मी - " कमाल आहे दीदी तुमची...! तुमच्यापेक्षा तुमच्या आईची..! ती माऊली तुम्हाला सगळ्यांना जेवणाचा डबा तयार करून पाठवून देते..! तिला कधीही विसरू नका...खूप उपकार आहेत तिचे तुमच्यावर..!"

एवढ्यात मुख्य गेट कडून मोठ्याने आवाज आला...
" का... हो...सर... काल...तुम्ही आमच्या हॉटेल वर काम्हून नाही आले...?"
मी मागे वळून पाहिले तर मागून मला आवाज देत..देत अभिषेक तोडकर येत होता.माझ्या अगदी जवळ आल्यावर मला पुन्हा म्हणाला....
" काय सर..काल आपल्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होते...त्यामुळं माझ्या वडिलांनी हॉटेल लावले होते...तुम्ही कांम्हून नाही आले हो....? मी तुम्हाला लई पाहिलं पण तुम्ही सापडलेच नाही...!"
मी- " अरे,..माझ्यावर पार्किंगची जबाबदारी होती..तिकडं होतो मी..!"
अभिषेक - " जाऊ द्या...मी सकाळीच आमच्या हॉटेल मधून खास तुमच्यासाठी गरमागरम सोयाबीन मिक्स मसाला भात आणला आहे...खा...तेवढा...!"
मी - " अरे, कशाला आणला..?"
अभिषेक - " नाही हो..सर...घ्या खाऊन..!मला कालच तुम्हाला वडा द्यायचा होता...पण जाऊ द्या...आता सोयाबीन मिक्स मसाला भात घ्या..!"

काल आमच्या अंधारी प्रशालेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन असल्याने आम्ही सगळेच धावपळीत व्यस्त होतो.त्यामुळे अभिषेकची मी, न भेटायची तक्रार योग्यच होती..!

मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो..माझ्या मुलींच्या प्रेमळ जेवणाच्या आग्रहाने..!
मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो माझ्या मुलाच्या प्रेमळ आग्रह असणाऱ्या प्रेमळ प्रेमाने..!
शेवटी एका माणसाच्या आयुष्यातील त्याची तृप्तता तरी काय असते हो...?
तर ती असते...त्या माणसाला  निव्वळ प्रेमानं मिळणाऱ्या भावूक गोष्टींनी..होणारी तृप्त भावना..!
ती असते...त्याच्या देवकन्या कडून मिळणाऱ्या निरागस प्रेमळ प्रेमानं दिलेली जिवंत अनुभूतीच्या रूपाने...!
ती असते..आपल्या नात्यात अनौपचारिक भाव ठेवणाऱ्या मुलाकडून...!

खूप खूप धन्यवाद माझ्या मुलामुलींनाे...! आणि .....
वंदन तुम्हाला....तुमच्यातील ममत्वाला...!
तुमचा हा मायेचा आग्रह माझ्याकडून कधीही विसरणे अशक्य आहे...!माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील शेत, वस्तीवरून येणारी सर्व माझी मुलं,मुली माझ्या मोजक्या आदर्शांपैकी एक आहेत..! आमच्यातील मायेचं नातं फक्त एका दिवसापूरत्या फोटोसेशन पुरते मर्यादित नसून ते दररोजच्या शालेय दिवसांचे चिरंजीव संजीवन आहे..!

मी आज खऱ्या अर्थाने तृप्त झालो होतो..!

वंदे मातरम्...!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १२ डिसेंबर २०१८
वेळ: सकाळी ९ वाजता.
 व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १२ डिसेंबर २०१९

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

"दुर्मीळ संधी माणसं वाचण्याची..! "





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"दुर्मीळ संधी माणसं वाचण्याची..! "
__________________________
                                                   
आज दिनांक ९/१२/२०१७ रोजी बऱ्याच दिवसानंतर भल्या मोठ्या गर्दीतील  खूप माणसं वाचण्याच्या सुवर्णसंधीचा मी दुर्लभ लाभ घेत आहे..!ही दुर्मिळ संधी आज सकाळी ७ ते शेवटची वेळ माहीत नाही.. या वेळेत उपलब्द आहे..!
निमित्त: मोफत भव्य आरोग्य शिबिर,लासूर स्टेशन,ता.गंगापूर.

गर्दीतल्या माणसांना गुपचूप वाचण्याचा  माझा आवडता छंद आहे..! या छंदाच्या छंदीपणापायी मी सकाळी ६:५० पासून ते दुपारचे १२:३० पर्यंत या क्षणापर्यंत जागेहून उठलेलो सुध्दा नाही..!आता या जागेवरून शेवटी कधी उठेल हे सगळे,माझ्या समोर आलेल्या पुस्तकांवर म्हणजेच माणसांवर अवलंबून आहे..!
मी येथे रुग्णांची नाव नोंदणी करणारा गंगापूर तालुक्यातील उर्वरित शिक्षकांप्रमाणे,एक शिक्षक आहे..!

आज भेटत असलेल्या माणसांपैकी बरीच माणसं,अतिशय दारिद्र्य अवस्थेतील दिसली.या माणसांच्या चेहऱ्यावरून ,आजही आपला भारत देश,महासत्ता होण्याच्या मार्गावर जाताना,यांना सोबत घेऊन जाणे किती अत्यावश्यक आहे हे याच दारिद्र्य अवस्थेतील लोकांच्या अवस्थेवरून जाणवत होते..!

आज काही माणसं अशीही दिसली,जी आज आपल्याला नेमून दिलेले काम न करता,त्यांच्या वरिष्ठांच्या पुढे..पुढे करण्यात, इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरण्यात स्वतः ला धन्य समजून घेत होती..! अशा चमकोगीरी करणाऱ्या शिक्षकांना,शिबिरात आलेल्या एखाद्या दीन.. दुबळ्या व्यक्तीने काही काही मार्गदर्शन विचारल्यास,ही चमकोगीरी करणारी शिक्षक मंडळी अशा दीन.. दुबळ्यांना प्रत्यक्ष काम करत असलेल्या शिक्षकांकडे पाठवून देत होती..!

आज  आरोग्य शिबीरात अशीही  माणसं वाचण्यात आली,ज्यांचे शारीरिक अपंगत्व उघडपणे दिसत होते,मात्र त्यांच्यातील प्रखर इच्छाशक्ती धडधाकट माणसाला देखील लाजवून जात होती..!त्याचे कारण, ही दिव्यांग असलेली माणसं,मनाने किती धडधाकट आहेत ,हे त्यांच्या देहबोली वरून जाणवत होते..!

याच माणसांच्या गर्दीत अशीही माणसं दिसली,जी त्यांच्या वागण्यावरून अनेक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते जाणवत होती.यातील बहुतांशी कार्यकर्ते ,अशाच कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारी जाणवली, जी आपल्या नेत्याच्या कानाच्या जवळ जाऊन,त्याच दृश्यांचे फोटोसेशन करून.....
" टिंब..टिंबशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना अमुक.. अमुक..!" अशी बिरुदावली चिकटवून,त्याच आशयाच्या बातम्या सर्व माध्यमात प्रदर्शित करण्यात पटाईत जाणवली..!😊

आणि माणसातील देव माणूस, ज्याला आपण डॉक्टर असे म्हणतो,ही देव माणसं अनेक वंचित,दीन..दुबळ्यांची आरोग्य तपासणी करताना दिसली..अन् माणसातील देव माणसं देखील पाहायला मिळाली..!

हल्ली बरीच माणसं खूप वाचनीय आहेत..! एक माणूस दहा पुस्तकांचे वाचन जिवंत स्वरूपात ,चेतक बदलाच्या रूपाने उपलब्द करून देतो..असे " माझे वैयक्तिक " मत आहे..!त्यामुळे हल्ली पुस्तके वाचणे बरेच कमी केले आहे..!

धन्यवाद , माणसांन्नो..मला खूप काही वाचायला तुमच्या रूपाने अगदी मोफत दिल्याबद्दल...!

वंदे मातरम्..!

गर्दीतील माणसांना मोफत वाचण्याचा छंद असणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
    ‌‌           
 फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक :९/१२/२०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ९/१२/२०१९,सोमवार

रविवार, १ डिसेंबर, २०१९

कला महत्त्वाची की औपचारिक शिक्षण ..?



चिंतन

कला महत्त्वाची की औपचारिक शिक्षण ..?
_______________________________________

कोणतीही कला ,त्यात जर एखाद्या माणसाने मग तो कोणत्याही वयोगटाील असो,त्याने जर त्यात जास्त रस घेतला तर,त्याचे जे औपचारिक शिक्षण आहे त्याकडे नक्कीच दुर्लक्ष होत असते..!
आणि इतिहास साक्षीला आहे,ज्यांनी ज्यांनी असे केले आहे,त्यातील कित्येकजण औपचारिक शिक्षणात मागे पडलेले होते,आहे अन् राहतील सुध्दा..!

माझ्या वरील मताचा अर्थ असा अजिबात नाही की,कोणतीही कला माणसाच्या अंगी असू नये..! उलट प्रत्येक माणसाने ,आपल्या अंगी कला जपावीच...!कारण कलेमुळे माणसाचं मन संवेदनशील होत असतं..! पण ती संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा औपचारिक शिक्षण महत्त्वाचे...जेणेकरून त्या मिळणाऱ्या संवेदनशील आनंदाचा आनंद काही औरच असेल..!
पण...
ती जपत असताना औपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष जर झाले तर..सर्व कलाप्रेमींना कलेच्या प्रांतात यश हमखास यश मिळेलच असे नाही.मात्र औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर हमखास कोणत्यातरी प्रांतात यश नक्कीच मिळते..भले त्यापासून मिळणारे आर्थिक स्रोत कमी असेल..! काही कलाप्रेमी काही  मोजक्या कलाकारांचे नाव सांगून त्यांनी कसे आपल्या आयुष्यात,शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कसे आपल्या आयुष्यात यश मिळविले, कलेवर प्रेम केल्यामुळे यश मिळविले याचे उदाहरणं नेहमी देत असतात..! पण यांचे प्रमाण किती आहे..? अतिशय कमी..! आणि  सर्वात महत्त्वाचे ज्यांनी असे केले होते,आहे अन् करणार आहे त्यांना त्या...त्या कलेच्या विकासाकरिता योग्य ती संसाधने उपलब्ध झाली म्हणून ती त्यात कलेच्या प्रांतात यशस्वी झाली..! त्यांचे औपचारिक शिक्षण कमी होते तरी..!

मुळात सर्वात महत्त्वाचे कोणत्याही माणसाने ,मग तो कोणत्याही वयोगटातील असो,त्याने आपल्या औपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तर..शिक्षणातील भविष्य अंधकारमय होऊन जाते..!आणि आज आपल्याला शिक्षण महत्त्वाचे आहे..आणि त्यानंतर जर आवड असेल तर कला महत्त्वाची आहे..!
पण जर यातील क्रम जा चुकला म्हणजेच कला पहिल्यांदा कला  अन् नंतर शिक्षण  तर....अशा माणसांच्या आयुष्याचा शिक्षणातील क्रम देखील चुकतो..! दोन्ही क्रिया जसे की, कला अन् शिक्षण घेऊन त्या दोन्ही प्रांतात यश प्राप्त करणारे खूपच अत्यल्प आहेत हे सर्वात महत्त्वाचे..! अशी माणसं सुवर्णमध्य साधणारी असतात अन् अशांची संख्या हाताच्या किंवा पायाच्या बोटांच्या कांड्या मोजण्या इतकी कमी असते..!

सध्याला बऱ्याच शाळेत वार्षिक स्नेह संमेलन ( गॅदरींग) ची तयारी सुरू आहे.या तयारीच्या नादी लागून बहुतांशी शाळेत औपचारिक शिक्षणाच्या तासिकांचा पार बोजवारा उडत असतो..हे फार कटू सत्य आहे..! जिथं असं होत नाही ते स्तुत्य...!
बरं...या कार्यक्रमाच्या तयारीला १५ दिवस ते १ महिना इतका कालावधी लागतो.
मग मुख्य प्रश्न पडतो...की औपचारिक शिक्षण महत्त्वाचे की ही " कला " नावाच्या खाली अभ्यासक्रमाला हरताळ फासण्यात पटाईत असलेली  कला महत्त्वाची...?
माझ्या या लेखाचा मुख्य हेतू याच माझ्या प्रश्नाला अनुसरून आहे..!

औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर त्याच औपचारिक शिक्षणाच्या साहाय्याने जी कला आत्मसात केली जाते ती त्या प्राप्त कर्त्याला आपल्या भविष्याची गरज भागविते..!
पण...
औपचारिक शिक्षणाच्या अगोदर जर मुलांनी फक्त कला या क्षेत्राला प्राधान्य दिले तर..अशांना वरील मुद्द्यांना धरून त्यांच्या भावी आयुष्यात अडचण येते...!
येथे एक  सर्वांनी समजून घ्यावे की,कला म्हणजे...खेळ,संगीत,नाटक,अभिनय इ.सर्व त्यात आले...!

माझे कलेच्या क्षेत्रावर खूप खूप प्रेम होते आहे अन् राहील सुध्दा..! पण जर माझ्या समोर औपचारिक शिक्षण की कला असे  दोन प्रश्न आलेच तर...मी पहिल्यांदा औपचारिक शिक्षणाचीच निवड करील...! नव्हे..नव्हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात असेच केले आहे.माझ्या कुटुंबाला खूप चांगला कलेचा समृध्द वारसा मिळालेला आहे.पण मी पहिल्यांदा औपचारिक शिक्षण निवडले अन् मग माझ्या कलेच्या प्रांतावर प्रेम करत राहिलो..आज पर्यंत..!

ता.क.: कला माणसाला आत्मिक आनंद देते तर औपचारिक शिक्षण आपल्या आर्थिक कुवतीचा,आयुष्यात प्रापंचिक स्थैर्याचा आनंद देते..!
निवड आपापल्या हाती असते..अन् त्यातून निर्माण होणारे भविष्य सुध्दा...!
मला सर्व कलाकार व त्यांची कला फार आवडते..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १ डिसेंबर २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक:१/१२/२०१९

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

" आम्हीच आमचे मापं घेतो..!"



"""""""""" आमचे गाव, आमची माणसं..! """"""""""

" आम्हीच आमचे मापं घेतो..!"
____________________________________________
                   
आज दिनांक २९/११/२०१६ रोजी माझी जन्मभूमी पालखेड, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे श्री. पारेश्वर महादेव यात्रेनिमित्त आम्ही बालमित्र एकत्र भेटलो...! बालमित्रांसमवेत....!

आम्ही सर्व शाळा, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहोत मात्र गावच्या यात्रेनिमित्त एकत्र आल्यावर आपआपल्या पदांचे मूखवटे बाजूला ठेवून जमिनीवरील जीवनाचा अनौपचारिक नात्यातील गोडव्याचा आनंद हमखास घेतोच...!एकमेकांचे मापे घेत.. घेत जगतो..!

हीच एक सुवर्णसंधी असते,आपण नेमके कुठे चुकत आहोत,हे समजून घेण्याची..कारण,आम्ही एकमेकांची प्रत्येक विषयांवर प्रत्येकाची  उचलपटक करतो..!😂 एकमेकांचे गुणदोष दाखवतो. बाहेरच्या औपचारिक आयुष्यात जगतांना,आम्हाला विशिष्ट पदांमुळे खूप औपचारिक जगावे लागते..!मात्र गावात...कसं सगळं मोकळचाकळ असतं..!आम्हीच आमचे मानसोपचारतज्ज्ञ असतो..!आम्हाला झालेल्या विविध बाधांवर उपचार करणारे..! असे आम्ही..आमचेच मापं घेतो..!😂

जेंव्हा पासून आम्हाला या औपचारिक जीवनाचा स्पर्श झाला,तेंव्हा पासून ज्या..ज्या  वेळी आम्हाला मानसिक अस्वस्थपणा जाणवतो तेंव्हा..तेंव्हा  आम्हाला याच आठवणी औपचारिक आनंद घ्यायला शिकवितात..!कधी..कधी खूप कंटाळा येतो या औपचारिक जीवनाचा..! मग त्यावर एकच औषध...अन् ते म्हणजे आम्ही एकत्र घालवलेले आमच्या आयुष्यातील अमूल्य क्षण..! मग त्यात मी ,विजू,आण्णा म्हस्के, बाळू माळी, संजय राऊत..सोमनाथ गायकवाड आम्ही जरा जास्तच आतुरलेले असतो...ते क्षण जगायला... कारण आम्ही गावात सरासरी गावाच्या यात्रेलाच जातो..! बाकीचे फोटोतील आमचे बालमित्र...गावातच राहतात किंवा अधून मधून बऱ्याचदा त्यांचा एकमेकांशी संपर्क असतो..!

वंदे मातरम्

त्यातील एक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

फेसबुक वर लेखन दिनांक:२९ नोव्हेंबर २०१६ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २९/११/२०१९

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

" जत्रा अन् यात्रा...!" 😊




चिंतन

" जत्रा अन् यात्रा...!" 😊
=================================

काही मराठी शब्दांचा अर्थ मराठी माणसाने आपल्या सोयीने लावून घेतला आहे असे वाटते..! 
जसे की...जत्रा...अन्..यात्रा...!

कुणी म्हणत जिथं पशू हत्या होते ती जत्रा अन् जिथं फक्त शाकाहारी नैवैद्य दाखविला जातो ती यात्रा..!
मुळात कोणताही देव किंवा देवता ही पशू हत्या होऊन तिच्या मासाची अपेक्षा कधीही करत नाही..! माणसांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देवादिकांच्या नावाने हा प्रकार सुरू केला आहे...!😊
मी काही गावातील जत्रा अशा ही पाहिल्या आहेत,ज्या तेथील लोकांच्या जिभेच्या मांसाहारी चवीनुसार तेथील जत्रांच्या तारखा ठरवितात..! जसे की,ज्या दिवशी मांसाहार चालत नाही त्या दिवशी त्या देवेदिकांची जत्रा आयोजित करणे..! म्हणजे सगळं कसं माणसाच्या सोयीने..!

मुळात माणसाच्या शरीराची ठेवण,अवयव यांची रचना पाहता माणसाला मासाहारी प्राणी का म्हणावे किंवा तो मांसाहार का करतो हाच मूलभूत प्रश्न आहे..!😊
कदाचित अश्मुयुगात इतर खऱ्या मांसाहारी प्राण्यांच्या मांस खाण्याची रित पाहून माणसाला मांस खाण्याची
" सवय " लागली असावी...! खरे मांसाहारी प्राणी व खरे शाकाहारी प्राणी  यांची शारीरिक ठेवण व आहार खाण्याच्या पद्धतीत खूप काही मुलभूत फरक असतो...!
मग अशा दोन्ही गटातील प्राण्यांच्या आहार खाण्याच्या पद्धतीत व शारीरिक ठेवणीत दिसणारा फरक पाहिल्यास सहजपणे लक्षात येते की,माणूस नेमका कोणता प्राणी आहे....शाकाहारी की मांसाहारी...?😊
( ज्याने त्याने दोन्ही गटातील प्राण्यांच्या सर्व पद्धती पाहून आत्मचिंतन करावे..!😀)

मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..त्यावर मला काहीही म्हणायचे नाही..! काहींच्या भौगोलिक वातावरणानुसार त्यांनी तो ठरवला आहे हेही मान्य .! मात्र मुख्य मुद्दा असा की, जसं आपल्या मांसाहारी चवीनुसार देवादिकांच्या जत्रांच्या तारखा माणूस आपल्या सोयीने ठरवतो...अगदी तसाच काहीसा प्रकार जत्रा अन् यात्रा या मराठी शब्दांचा आहे असे मला वाटते..! अन् अशा प्रथेतूनच जत्रा अन् यात्रा या दोन्ही मराठी शब्दांचा अर्थ माणसाने आपल्या सोयीने ठरवून घेतला आहे..!

माझा मूळ पिंड खेड्यातील आहे.आजही खेड्यातील सर्व सामान्य माणसाला जत्रा अन् यात्रा यातील फरक माहीत नाही..! बहुदा त्यांना माहीत नसणे हेच खरे उत्तर आहे..! ही माणसं फक्त आनंद घेतात अशा उत्सवांचा ..! त्याच्या खोलावर जात नाही..! मी अशाच खेड्यातील सर्व सामान्य माणसांचा एक सर्व सामान्य प्रतिनिधी आहे...जत्रा...किंवा यात्रा म्हणणारा...!😊

ता.क.: माणूस हा एकमेव प्राणी असा आहे,ज्याने इतर प्राण्यांच्या सगळ्याच प्रांतात बळजबरी शिरकाव केला आहे..!
थोडक्यात सगळ्यात दृष्ट  आणि दुसऱ्यात हस्तक्षेप करणार प्राणी माणूस आहे का..?😊
वंदे मातरम्....!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२९/११/२०१९

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

यक्कु...उपाख्य एकनाथ भोईटे..!



आमचे गाव आमची माणसं..!

यक्कु...उपाख्य एकनाथ भोईटे..!
=================================

याच्यावर माझे अन् माझा प्रिय बालमित्र विजय गायकवाड
( ह. मू.वैजापूर) चे लई प्रेम आहे..!

आमच्या प्रेमाच्या तारा कोणे एकेकाळी बहुदा तब्बल वीस वर्षापूर्वी जुळल्या होत्या..! त्या आजतागायत कायम आहेत..! त्या तारा का...अन्..कशा जुळल्या...त्या..आम्हालाच माहीत नाही हे विशेष आहे..!

याला कोणे एकेकाळी मी अन् विजूने  प्रेमाने आमच्या गावातील कार्तिकी यात्रेत बळजबरी  शेव,चिवडा,लाडू,जिलेबी इत्यादी पदार्थ खाऊ घातले होते..!
ठिकाण होते...विजूच्या किराणा दुकानाचा ओटा...!आता त्या ओट्याचे कोणतेही अवशेष कुणालाही अजिबात सापडणार नाही..! अगदी अयोध्येत उत्खनन करणाऱ्या टीम ला सुध्दा..!😊

एवढा आग्रह ,मी अन् विजू आमच्या आयुष्यात कुणालाच करू शकणार नाही..! हा एक्कू...खूप नम्र स्वभावाचा आहे..! हा..कधीही कुणाच्याही अन् कोणत्याही भानगडीत पडत नाही..!आपण भलं अन् आपलं काम भलं...या विचाराचा हा आमचा एकनाथ..! घरची परिस्थिती जेमतेम आहे..! मात्र आमचा एकनाथ मनाने खूप श्रीमंत आहे..!मी अन् विजू ,आमच्या पालखेड गावातील ज्या मोजक्या माणसांवर निरपेक्ष प्रेम करतो त्यापैकी हा एक...एकनाथ..उपाख्य एक्कू..!

काल कार्तिकी यात्रेला मी गेल्यावर याची आवर्जून भेट घेतली.यानेही विजुची खूप प्रेमाने आठवण काढली..!
कारण विजू काल ,यावर्षीच्या यात्रेला आला नव्हता...!
मित्रा विजू,खास तुझ्यासाठी...आपल्या या मित्राचा फोटो अन् त्यावर लेख...!

ता.क.: आमच्या गावातील काही माणसं अशी आहेत,ज्यांना भेटल्याशिवाय गावाला भेट दिल्याचे आत्मिक  समाधान  मला अन् विजुला मिळत नाही..! त्यापैकी हा एक....एकनाथ..उपाख्य एक्कू..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२७/११/१९

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

" आम्हाला माहीत नाही..!"



आमचे गाव,आमची माणसं..!

" आम्हाला माहीत नाही..!"

==================================
                       
हसण्यातील कंजूसपणा काय असतो हो..?                           
आम्हाला माहीत नाही..!
                                                       
अहंकार काय असतो हो..?                                                 
आम्हाला माहीत नाही..!                                                     

जातीच्या अहंपणाचा " टेंभा " मिरवीणे काय असते हो..?         
आम्हाला माहीत नाही..!                                                             

पैशाचा माज काय असतो हो..?                                           
आम्हाला माहीत नाही..!                                                   

बुद्धिमत्तेचा गर्व काय असतो हो..?                                       
आम्हाला माहीत नाही..!                                                   

कपटीपणा काय असतो हो..?                                               
आम्हाला माहीत नाही..!                                                           

प्रौढ झाल्यावर उगीचच प्रौढपणाचा खोटा " आव " आणणे काय असते हो..? .                                                    आम्हाला माहीत नाही..!(विशेषकरून आम्ही एकमेकांना भेटल्यावर..!😂)                                                                                   

शहाजुका सारखे वागणे काय असते हो..?                             
आम्हाला माहीत नाही..!                                                           

आपण दूर गेलो म्हणजे विसरणे काय असते हो..?                   
आम्हाला माहीत नाही..!                                               

भूतकाळातील गमती जमती विसरणे काय असते हो..?           
आम्हाला माहीत नाही..!                                                     

एकमेकांना भेटल्यावर उगीचच शिष्टाचारयुक्त बोलणे काय असते हो..?                                                                     
आम्हाला माहीत नाही..!                                                         

आपण प्रौढ झाल्यावर स्वतःतील बालपण विसरणे काय असते हो..?                                                                       
आम्हाला माहीत नाही..!                                                   

एकमेकांच्या, सर्व चवींच्या आठवणी विसरणे काय असते हो..?  आम्हाला माहीत नाही..!                                                             

प्रौढ झाल्यावर एकाच डब्ब्यात दोघांनी जाण्याची लाज वाटणे..?     
 आम्हाला माहीत नाही..!
( ते दोघे फक्त आम्ही यातील दोघेच..!😂)         

आम्ही कुठेही स्थायिक झालो तरी,जन्मभूमी विसरणे..?         
आम्हाला माहीत नाही..!!
                                     ‌  ‌‌               

ऐनवेळी काहीतरीच व्यक्त करणारा तात्पुरता कवी ?:
                     
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव,पालखेडवाले.
वंदे मातरम्..!

ता.क.: इतक्यात प्रेक्षकांंमधून आवाज  आला,
" अरे...कविता संपली का रे.....?

त्यामुळे मी थांबतो आता..!नाहीतर कविता लई मोठी होती..!!
😂😂

                                                                                                                                            असे आम्ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना  " शाखा-पालखेड  चे स्वयंघोषित पदाधिकारी..!
ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना " इ .स. १९९० च्या दशकात पालखेड येथे कुठेही नोंद न करता स्थापन झालेली आहे..!

सर्व पदाधिकाऱ्यांचा कुणाला परिचय हवा असल्यास पालखेड नगरीत जेंव्हा काही धार्मिक,सांस्कृतिक इ.कार्यक्रम असेल तेंव्हा सर्वांचा असाच मोकळा चाकळा परिचय करून देण्यात येईल...!कारण यातील बहुतांशी तेंव्हाच भेटतील..! कारण यातील बहुतांशी गावाबाहेर कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत..! अर्थात यातील कुणाचाही चेहरा लक्षात ठेवून संपर्क केला तरी चालेल..!

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही..!बहुदा इतर कुणाचीही अशी संघटना असेल अशी जवळ जवळ शक्यता नाही..! योगायोगाने असल्यास त्या व आमच्या संघटनेचे विलीनीकरण करण्याचे सर्वाधिकार आम्हा सर्वांकडे राखून ठेवण्यात आले आहे..!

 तर.. त्वरा करा व संपर्क साधा..! जागा मर्यादित आहेत..!!

                               ‌‌                                ‌                                                        " मोकळ्या चाकळ्या बालमैत्री संघटनेचा फक्त पालखेड शाखेचा एक पदाधिकारी व लेखक व कधी मधी गद्यातून पद्य लेखन करणार तात्पुरता कवी ? : 
                           
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले
वंदे मातरम्

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

 फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २५ नोव्हेंबर २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २५/११/२०१९