रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

" काळी माती..! "






चिंतन
" काळी माती..! "
======================================

मी पालखेड येथे राहत होतो तेंव्हा आमच्याच शेतातून किंवा मित्रांच्या शेतातून घटस्थापना करिता काळी माती घेऊन यायचो..!
त्यानंतर...
मी लासूर स्टेशन येथे राहत होतो तेव्हा हाडके पाटील यांच्या शेतातून घटस्थापना करिता काळी माती घेऊन यायचो..!
त्यानंतर....
मी मागील वर्षी औरंगाबाद येथे स्थायिक झालो,तेंव्हाही मी घटस्थापना पूर्वी काही कामानिमित्त जन्मगाव पालखेड येथे गेलो होतो तेव्हा येताना  आमच्याच शेतातून काळी   माती घेऊन आलो होतो..!
पण......
यावर्षी  आज दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील एका पेठेत घटस्थापना करिता सामान खरेदी करायला गेलो तर काळी माती विकायला होती..!☺

मला तेंव्हा कुठे जाणीव झाली की मी एका शहरात राहायला आलो आहे..! अशा अनेक जाणीवांमूळे मला जाणवत आहे की, मी एक " प्युवर खेडूत " एका शहरात राहायला आलेलो आहे..!☺ त्या अनेक जाणीवांपैकी एक आजची काळी माती..!😂

असो ,सर्व भारतीयांना नवरात्र उत्सव निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्..!
शूभेच्छूक: एक प्युवर खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२९ सप्टेंबर २०१९



** नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या..!** " काहीही हं...! "






चिंतन
** नऊ दिवसांच्या नऊ  रंगाच्या साड्या..!**
   " काहीही हं...! "
______________________________________________

कोणे एकेकाळी हिंदू धर्मातील गरीब, अशिक्षित माणूस ( पुरुष अन् स्री ) अंधश्रध्दा किंवा कोणत्याही प्रथा परंपरा सुरू करण्यात पटाईत होते..असे सुशिक्षित माणसं म्हणत असे..!

पण नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या परिधान करणे ही अलीकडच्या काळातील हिंदू धर्मातील सुशिक्षित महिलांनी,सुशिक्षित महिलांच्या करिता सुरू केलेली प्रथा परंपरा..गोर गरीब महिलांना न्यूनगंड निर्माण करायला भाग पाडत आहे..!
नवरात्राच्या नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या परिधान कराव्यात असे कुठेही हिंदू धर्म ग्रंथात उल्लेखित नाही..!

 आपल्या वर्तमानपत्राचा खप वाढावा म्हणून महाराष्ट्र टाइम्स विरूध्द लोकसत्ता मध्ये स्पर्धा सुरू झाली अन् त्यांनी त्याद्वारे मार्केटिंग केले नवरात्र व साड्यांचे..! अन् या कामासाठी पद्धतशीरपणे उपयोग करून घेतला सुशिक्षित , पैसे असणाऱ्या महिलांचा.. इ.स.२००३ पासून..!

ता.क.: एखाद्या गोर गरीब महिलेला नऊ रंगाच्या साड्या पैकी एखाद्या रंगाची साडी नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी दान केली तर खरी आई अंबाबाईला ,तुळजाभवानी मातेला वस्र दान केल्याचे आत्मिक समाधान नक्कीच मिळेल..! आम्ही दरवर्षी असे करतो.

 नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!
दिनांक:१०/१०/२०१८

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

" जिवलग बालमित्राची भेट..!"



आमचे गाव आमची माणसं..!

" जिवलग बालमित्राची भेट..! "





_____________________________________________

आमचे गाव आमची माणसं..!©️

" भेट..! "
___________________________________________

आलास,खूप खूप वेळ निवांत बसलास, तुला अन् मलाही खूप खूप बरे वाटले..! माझा जिवलग बालमित्र म्हस्के आण्णासाहेब..! तू ही औरंगाबाद येथे स्थिरावलास व मी ही हळूहळू स्थिरावतोय..!
आम्हाला माहीत नाही की, आम्ही  दोघेही पुन्हा कधी  आमच्या मूळ गावी, पालखेड येथे स्थायिक होऊ की नाही..?
पण तू किंवा मी किंवा इतर कुणीही जे आपल्या जन्मभूमी असलेल्या पालखेड गावातील  मूळ रहिवाशी आहोत ते भेटले की,अख्खे गाव भेटल्याचा आनंद नक्की होतो..!
कारण आम्ही आमच्या गावातील प्रत्येक गल्लीवर ,गल्लीतल्या बोळींवर ,बोळीतल्या माणसांवर ,तिथल्या अनेकानेक चवदार प्रसंगावर भरभरून प्रेम केले..! 

माणूस कुठेही स्थायिक होवो, शेवटी त्याची जन्मभूमी व तेथील माणसं त्याचा पिच्छा सोडत नसतात..! ती कधी जिवंत रूपाने भेटतात तर कधी आठवणीच्या रूपाने..! आमच्या सारखी अशी कित्येक माणसं असतात की जी आपल्या मूळ गावापासून दूर गेलेली असतात पण गावातला ,त्यातल्या त्यात गल्लीतला,त्यातल्या त्यात जिवलग मित्र भेटला की, गल्ली बोळीतील सर्व आठवणी जाग्या होतात..! ज्या माणसाचं बालपण खेड्यात गेलेलं असतं,त्याच्या आयुष्यात विविध अनुभवांचे त्यातील विविध रसांचे विश्व समृद्ध असते..!याचा अर्थ असा नव्हे की शहरातील माणसांचे बालपण निरस असते..! पण....
जे जिवंत अनुभव गावरान तडका देऊन खेड्यात मिळतात ते शहरातील मुलांना नाही मिळत..! 🙏

बोळ वरून आठवलं..! याच माझ्या बालमित्राच्या घरी जाताना कोणे एकेकाळी एक बोळ अस्तित्वात होती..! आता आहे का नाही माहीत नाही, कारण खेड्यात अन् शहरात बऱ्याच जुन्या भौतिक वास्तुंनी आपलं रंगरूप पूर्णपणे कधीचेचं बदलून टाकले आहे. मित्रा, आण्णासाहेब तुझ्या घराकडे येताना ज्यावेळी मी अन् विजू गायकवाड त्या बोळीत प्रवेश करायचो, अगदी तेंव्हाच मोठ्याने विचारायचो...
" आण्णासाहेब आहे का घरात..?"

तू घरातच असायचा, पण मुद्दामहून बाईंना म्हणजेच तुझ्या मातोश्रीला विचारण्याचे ते एक निमित्त असायचे..! तुझ्या घराकडे येताना जी बोळ अस्तित्वात होती, तशी बोळ आपल्या अख्ख्या पालखेड गावात नव्हती हे मात्र नक्की..! 😊 आपल्या वर्गातील आपल्या मोजक्या बालमित्रांच्या अनेक अजरामर प्रसंगांची साक्षीदार होती, ती बोळ..! काळाच्या ओघात आपण बऱ्याच मित्रांनी गाव सोडले, पण तशी बोळ पुन्हा आयुष्यात  इतरत्र कुठेही पाहण्यात आलीच नाही..!

आपल्या अभ्यासाच्या खोल्या ह्या देखील, आपल्या पौगंडावस्थेतील काळातील एक जिवंत दंतकथाच बनून गेल्या होत्या..! मी तर खात्रीने सांगतो की, आपल्या वर्गाची बॅच ही आपल्या पालखेड गावातील शेवटची बॅच असावी, ज्यांनी खूप जीव लावून अभ्यासाच्या खोल्या अन् त्यात अभ्यास केला होता..! अर्थात अभ्यासाच्या सोबतच एखाद्या निशाचर प्राण्यासारखे , गावात, गावातल्या गल्ल्यात, ओट्यावर हिंडणारे, बसणारे आपणच काही वर्गमित्र होतो..! अभ्यासाच्या खोल्यात अभ्यास करणारे आपले  काही वर्गमित्र इपितर होते हा देखील गमतीचा इतिहास आहे..! 😊 लिहीन त्यावर कधीतरी..! 🙏🏻

मी ज्या..ज्या गावात शिक्षक म्हणून नोकरी केली किंवा आता करत आहे. तिथे देखील आमच्या गावातील माणसांसारखे खूप चांगले माणसं भेटली अन् भेटत आहेत...! त्यांच्याकडे  पाहून आपल्या गावातील माणसांना भेटल्याचा आनंद मानून घ्यायचा..असतो अन् मी तो नेहमी मानून घेत असतो..!

पण एक मात्र नक्की खरे की,गावातल्या माणसांजवळ ,त्यातल्या त्यात गल्लीतला..त्यातल्या त्यात बालमित्रांजवळ माणूस जरा जास्तच खुलतो,बोलतो व वागतो..! कारण तिथे सगळं कसं एकमेकांना एकमेकांच माहीत असते..! भरभरून गप्पा केल्या आपल्या गावातील पूर्वीच्या ,आत्ताच्या गावावर..! आमच्या या गप्पांनी ,ज्या ज्या  माणसांची,त्यांच्या आठवणीची आठवण काढली,त्यांना नक्कीच गुचकी लागली असेल..!

ता.क.: कृपया ' गूचकी लागणे ' या माझ्या शब्द प्रयोगावर फक्त हिंदू धर्मातील बाबींवर टीका करणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या एकांगी ढोंगी पुरोगामी कार्यकर्त्यांनी टीका करू नये ही त्यांच्या डोक्यावरून लिंबू पिळून विनंती..!😂

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक २६ सप्टेंबर २०१८

"अंबाबाईचा उदो उदो..! "





चिंतन ©️

" अंबाबाईचा उदो उदो..! "

__________________________________________

गुप्तहेर शिवरायांचे...!
गोंधळी समाज..ज्या समाजाने शिवरायांच्या पायी आपली निष्ठा झोकून दिली..!
गोंधळी समाज..आता पर्यंत यांच्या पाठीवर फक्त त्यांच्या थोरल्या महाराजांची कौतुकाची थाप पडली..!
गोंधळी समाज..ज्यांच्या साठी छत्रपती शिवराय म्हणजे स्वतच्या खऱ्याखुऱ्या धण्यासारखे..!
गोंधळी समाज.. ज्यांच्यातील कित्येकांनी फक्त आपल्या थोरल्या धण्याकरिता स्वतः चे प्राण तळहातावर घेवून हिंदवी स्वराज्याची घडी बसविण्यात आपले प्राण वेचले..! 
गोंधळी समाजाने ,हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना गुप्तहेरांच्या भूमिका वठवून इत्यंभूत माहिती आपल्या धन्याला दिली..!

गोंधळी समाज, ज्याने कित्येक मोहिमा फत्ते केल्या..अन् कित्येक गोंधळी समाजाचे माणसं आपल्या थोरल्या महाराजांसाठी हुतात्मा झाले, पण कुठेही त्यांच्या नावाची नोंद इतिहासात नाही..! कारण पूर्वीही अन् आजही गुप्तहेरांची ओळख ही देशासाठी गुप्तच राहते..!

गोंधळी समाज,ज्यांच्या योगदानाचे भारतीय इतिहासात सर्वोत्तम उदाहरण म्हणजे..फत्ते झालेला किल्ले सिंहगड..!
अभेद्य संरक्षण कवच फोडण्यासाठी तानाजी मालुसरे व गोंधळी समाजाच्या कलाकारांनी, मावळ्यांनी गोंधळी कलेचा योग्य वापर करून उदय भान राठोड सारख्या बलशाली मुघल सरदाराला पाणी पाजले..! ज्या गोंधळी समाजातील कित्येकांनी गुप्तहेर होऊन आपली ओळख न सांगता आपले प्राण दिले पण आपल्या राजाची रणनीती शत्रूला कधीच सांगितली नाही..हा तोच समाज..!

गोंधळी समाजाच्या निष्ठा या पूर्वी..आता अन्..पुढे कित्येक पिढ्यानपिढ्या फक्त आणि आपल्या धन्याच्या,छत्रपती शिवरायांच्या चरणीच राहतील..! गोंधळी समाजाच्या कित्येक गुप्तहेरांनी आपले नाव व ओळख न सांगता आपल्या राजासाठी महान त्यागाचे कार्य केलेले आहे..! मुळात आजही भारतमातेच्या सेवेसाठी कित्येक गुप्तहेर आपल्या प्राणाची आहुती देतात, त्यावेळी गोंधळी समाजातील त्या कित्येक गुप्तहेरांच्या आत्म्याला आनंद होत असेल, ज्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहे..!

फक्त आजही वाईट याचे वाटते..गोंधळी समाज हा भटक्या जमातीतील गरीब समाज..! ज्यांच्या पाठीवर मायेने , बापाच्या प्रेमाने ,विश्वासाने कौतुकाची थाप पाठीवर देणारा युगपुरुष ते म्हणजे छत्रपती शिवराय, बाकीच्या लोकांनी यांची किंमत ओळखली का..?
त्यांच्या कलेचा त्यानंतर योग्य तो राजसन्मान झाला का..?
आजही कित्येकदा, कित्येक संकुचित मानवी मनोवृत्ती या जातीचा शब्दोल्लेख चुकीच्या अर्थाने करतात, तेंव्हा खूप दुःख वाटते..!😔

असो,आजपासून नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे..! त्यानिमित्त जगाची नियंती...आईच्या नवरात्र उत्सव..निमित्त सर्व भारतीयांना नवरंगी मनःपूर्वक शुभेच्छा..!

अंबाबाईचा उदो उदो..!
छत्रपती शिवाजी महाराज की जय...!
वंदे मातरम्..!

लेखक व जगाच्या नियंतीचा ,आईचा उपासक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

व्हिडिओ स्रोत - व्हॉट्स ऍप

दिनांक: १० ऑक्टोबर २०१८

" जाणीव असलेला.. प्रिय मित्र,नंदलाल रामलाल सलामपुरे...! "



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" जाणीव असलेला..
प्रिय मित्र,नंदलाल रामलाल सलामपुरे...! "






=====================================

काही माणसं,वयानं तरुण किंवा प्रौढ असतात पण,त्यांच्या वागण्यात कमालीचा पोक्तपणा सतत जाणवत असतो.कदाचित अशा तरुण किंवा प्रौढ माणसांच्या आयुष्यात " जबाबदारी " लवकर आल्यामुळे त्यांच्यातील तरुणाला किंवा प्रौढाला तीच जबाबदारी पोक्त बनवते..!

मला माझ्या शिक्षक पदाच्या आयुष्यातील प्रवासात असाच एक प्रवासी भेटला,त्यांचे नाव आहे प्रिय नंदलाल रामलाल सलामपूरे सर..!

शांत ,संयमी , मध्यम प्रकारचा मितभाषी स्वभाव..!मी जो पर्यंत सरांच्या सोबत एकलहेरा ता.गंगापूर येथे सह अध्यापक म्हणून नोकरी करत होतो,तो पर्यंत प्रिय सलामपुरे सर बऱ्याचदा एकांतात ,त्यातील स्वतला शोधणाऱ्या अंतर्मनाला शोधत असायचे..! त्यांचा हाच गुण मला खूप भावला..! माझ्या वैयक्तिक अंतर्मनाला खूप जवळचा जाणवणारा,मी स्वतः अनुभवणारा हा स्वभाव खूप जवळचा वाटला..!

आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी माणसाला अशाच एकांतप्रिय वातावरणात घेऊन जाते..! अशा एकांतात माणसाला आपली कौटुंबिक जबाबदारी अन् स्वतच्या आयुष्याचं आत्मचिंतन खूप सूक्ष्मपणे साध्य करता येते..! कदाचित माझ्या अन् प्रिय नंदलाल सलामपुरे सरांच्या मध्ये असलेला हा एक दुवा असावा..मैत्री निर्माण करायला..!

माझ्या वैयक्तिक शिक्षकी आयुष्यात फार मोजके असे प्रिय शिक्षक मित्र लाभले,ज्यांच्या जवळ  सर्व दुःख आणि सुख व्यक्त करायला अजिबात मनात संकोच वाटला नाही,त्यात प्रिय नंदलाल सलामपुरे सर हे एक आहेत..!अर्थात असेच मनोभाव प्रिय सलामपुरे सर देखील माझ्याजवळ व्यक्त करत असायचे..व  व्यक्त करत असतात..!

आम्ही जो पर्यंत जि.प.प्रा.शा.एकलहेरा,ता.गंंगापूर ,जिल्हा औरंगाबाद येथे एकत्र कार्यरत होतो तो पर्यंत आम्हा दोघांचा आवडता वर्ग असायचा ,आमचे प्रिय कल्याणराव डमाळे सरांचा इ.४ चा वर्ग..!☺ अर्थात इतर सर्व वर्ग खूप आवडायचे पण आमचे प्रिय कल्याणराव डमाळे सरांचा एकलहेरा येथील इ.४ चा वर्ग म्हणजे आम्हाला आमच्यातील असलेले बालक जिवंत करायला लावणारा वर्ग..!😂  वास्तविक या वर्गाला आम्ही प्रत्यक्ष शिकवायला नव्हतो पण..आम्हाला आमच्यातील बालक शोधायाला प्रिय डमाळे सरांचा इ.४ चा वर्ग खूप जवळचा वाटायचा..!

आजही प्रिय नंदलाल रामलाल सलामपुरे सर ,त्याच प्रौढ व्यक्तिमत्त्वाच्या नात्यातून हमखास भेटत असतात..! सलामपुरे सरांचे आपल्या  कुटुंबावर असलेलं नित्तळ प्रेम त्यांना अजुन प्रौढ बनवते..!सरांचे त्यांच्या भोळ्या भाबड्या आईवर खूप खूप प्रेम आहे..! माझ्या तीर्थरूप वडिलांना ,प्रिय सलामपुरे  सरांच्या स्वभावाची मी कल्पना दिलेली आहे,तेंव्हा पासून माझ्याही वडिलांना ,जेंव्हा जेंव्हा सरांची व माझ्या वडिलांची घरगुती भेट होती तेंव्हा माझ्या वडिलांना एक समजूतदार मुलगा भेटल्याची नक्कीच जाणीव होती..! कारण अशाच कौटुंबिक जबाबदाऱ्या ,स्वतच्या आवडीनिवडीवर मर्यादा ठेवून जगलेली ही दोन्ही ग्रेट माणसं..!

माझ्या आयुष्याच्या प्रवासात  सामाजिक जाणीवा,जबाबदारी अन्  समजूतदारपणा याचा सुंदर मिलाप असलेला प्रिय मित्र नंदलाल रामलाल सलामपुरे, गोलवाडीकर..!(औरंगाबाद)

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १० ऑगस्ट २०१९, शनिवार.

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

" शूरा मी वंदिले..! "




                                  आमचे गाव आमची माणसं..!

                                                                 " शूरा मी वंदिले..! "

___________________________________________

आत्ताच  माझ्या पालखेड  गावातील गणेश नरूटे(भारतीय सैनिक)यास मेसेंजरने जन्मदिनाच्या  शूभेच्छा दिल्या.त्यांची पोस्टींग  जम्मू ला आहे.त्यांच्या व माझ्यातील मेसेंजर वर झालेला संवाद जसाच्या तसा पूढीलप्रमाणे-
                             
"गणू बेटा,जन्मदिन निमित्त  शूभेच्छा...!उशीर झाला.कारण तांत्रिक ...!"        

" Thank u sir. ..kahi harkat nahi let jhalat ..!"
                 
" सध्या पोस्टींग कूठे?  "
 
"Jammu..!"
                                                       
" सध्या  तेथील वातावरण गरम असेल ..!"
                                     
 " High alert aahe ..!"
                                                           
" काळजी घे...!"
                                                      " Ho..swatahachi kalji ghetli tarach dusryachi madad karu shakto. ....and thanks ..!"                                          

" तूम्ही आहात तर आम्ही आहोत.माझ्या परिवाराकडून तूम्हा जवानांना विनम्र  वंदन...वंदे  मातरम्....!"
                               
" Dhanyavad..!"
असे म्हणून गणू व माझ्यातील संवाद संपला..!
                                                                     
वरील संवाद प्रसंगातून गणूचा एक संवाद माझ्या मनाला खूप हेलाऊन गेला...   तो असा-

"    Ho..swatachi kalji ghetli tarach dusryachi madat karu shakto..!"  

गणू आणि माझ्यातील संवाद संपला अन्  गणू रात्रपाळीसाठी, गर्द झाडीत, अंधारात हातात शस्त्र घेऊन आपल्या मोहिमेवर निघून गेला..!
अन् त्याच वेळी मी किंवा अनेक घरात झोपणारी माणसं पहुडली होती आपापल्या बिछान्यावर..! गणूचे अन् माझ्या संवादातील एक वाक्य सतत माझ्या मनात काहूर घालत होते अन् त्याचे ते वाक्य होते.....
"Hi..swatachi kalji ghetali tarach dusaryachi madar Karu shakato..!"                            

किती मोठा व देशातील नागरिकांप्रती भारतीय सैनिकांमध्ये असलेल्या  जबाबदारीचा अर्थ होता या वाक्यात....!

आपले जवान आपल्या कूटूंबापासून दूर देशाचे रक्षण करत असतांना आपण अनेकवेळी जात,पात इ.अनेक राष्ट्रीय  एकतेला घातक बाबींवर पोकळ बातांवर वेळ वाया घालवतो.त्यावेळी जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे भारतीय...!

 देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो..ही जाणीव भारतीय नागरिकांत असावी..असे स्वातंत्रवीर सावरकर यांना अपेक्षित होते..! आज स्वातंत्रवीर सावरकर यांचे जरी नाव घेतले तरी आपल्या समाजातील काही घाणेरड्या प्रवूत्तीच्या लोकांना त्यांची जात दिसते...! खूप वाईट वाटते अशावेळी..! आज आपल्या गावात,देशात आपण जेंव्हा रात्रीची शांत झोप घेत असतो,त्यावेळी हेच आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतात..! त्यांना ना तमा असते आप्त स्वकियांची ना मित्र परिवाराची..! त्यांच्या समोर त्यावेळी फक्त आणि फक्त माझा देश आणि त्याचे संरक्षण हेच असते..!

जेंव्हा एखादा सडक छाप राजकीय नेता या आपल्या रक्षणकर्त्यांविषयी अपशब्द वापरतो तेंव्हा आपली भारत माता नक्कीच अश्रू ढाळत असेल..! या अशा दृष्टांची हिम्मत होतीच कशी..असे बेताल वक्तव्ये करण्याची..! बहुदा आपल्या भारतीय लोकशाहीतील अमर्याद स्वातंत्र्याचा तो स्वैराचार असावा..! असावा नाही तर आहेच...! आपल्या लोकशाहीला नव्याने बांधणीची गरज निर्माण झाली आहे असे वाटते..!

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला व स्वतः दिग्दर्शित केलेला नव्वदच्या दशकात एक नितांत सुंदर चित्रपट आला होता..त्याचे नाव होते....प्रहार..! त्यात एक भारतीय जवान ज्यावेळी निवृत्त होतो अन् भारतीय समाज जीवनात मिसळतो..त्यावेळी तो जवान क्षणोक्षणी उद्दिग्न होत असतो..!
का होत असतो तो जवान क्षणोक्षणी उद्दिग्ण...?

त्या जवानांच्या मानसिक उद्दिग्नतेचे  त्याच्या मनातील एकमेव  कारण म्हणजे...
" आम्ही अहोरात्र रक्ताची होळी साजरी करून या समाजजीवनातील भारतीयांना सुखाचे दिवस दिलेत अन् ही माणसं प्रत्यक्ष समाजजीवनात किती गलिच्छ वर्तन करतायेत..!
एका भारतीय निवृत्त जवानाच्या मनातील,वर्तनातील होणाऱ्या घालमेलीचे अचूक सादरीकरण प्रहार चित्रपटात केलेले आहे...! याच आशयाला धरून आमच्या गावातील गणू व माझ्यात एकदा मागे मोबाईल वर असाच संवाद झाला होता..!

खरंच भारतीय सैनिकांची आपल्या भारतीयांना किंमत आहे का..अन् असेल तर ती फक्त एखादा देश भक्तिपर चित्रपट पाहताना किंवा एखादा जवान धारातीर्थी पडतो तेवढ्या काळापुरती मर्यादित होत चालली आहे का..? हा मनाला हेलावून टाकणारा प्रश्न आहे..!

शेवटी एकच....
"तुम ,तुम हो...हम ,हम है..!
तुम नहीं ,तो हम नहीं..!
तुम नहीं तो कुछ भी नहीं..!"

 पून्हा एकदा विनम्र  वंदन  जवानांना....व प्रिय गणू तुला जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्...!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२६ सप्टेंबर २०१६
प्रिय गणू व माझ्यातील संवादाची वेळ रात्री ७:१० ते ७:२०

" बालमित्र- भानू मामा.."






आमचे गाव, आमची माणसं
" बालमित्र- भानू मामा.."
=======================================

माझ्या आयुष्यात सगळयाच चवीचे मित्र मला नियतीने दिले.त्या सर्व चवीच्या मित्रांनी माझ्या आयुष्यातील जेवणाच्या ताटातील सर्व क्षणांची लज्जत खूप रसदारपणे वाढविली..! एकमात्र नक्की ज्यांना कुणाला बालपणी,त्यातल्या त्यात खेड्यातील असे विविध चवीचे प्रिय मित्र लाभले त्यांच्या आयुष्याचे सार्थक झालेच म्हणून समजा..! कारण खेड्यातील बालवयात जे बालमित्र ज्यांना कुणाला भेटतात त्यांच्या पासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही..!☺ एकमेकांना सगळं कसं मोकळं चाकळं माहीत असतं..!☺अर्थात शहरात देखील असं असेलच,पण गावरान तडका जो खेड्यात मिळतो,त्याची सर कशालाच नाही..!☺
नियतीनं मला असाच एक अगदी मनमोकळा बालमित्र दिला,ज्याचं मनमोकळं वागणं माझ्या सकट सर्व मित्रांना खूप जवळचं वाटलं, वाटत आहे अन् आमच्या मरे पर्यंत  वाटत राहील..! तो माझा प्रिय बालमित्र भानुदास एकनाथ जगदाळे पाटील...!

हा जरी आमचा बालमित्र असला तरी याला आम्ही सर्वजण
" भानू मामा " असंच म्हणतो,कारण याचा भाचा गावातीलच असल्याने बहुदा त्या आमच्या भाच्या सोबत आम्हा मित्रांनाही आमच्या भानुदास ला " भानू मामा " असे म्हणायची सवय लागली असावी..!☺

भानू मामा..!
मनात काहीही न ठेवता व्यक्त होणारा मित्र..! याच्या पोटात एक अन् ओठात एक असं काहीच नाही.जे काही बोलायचे ते कुणाचीही भीडभाड न करता बोलून टाकायचे..! अशा रोखठोक स्वभावाचा आमचा प्रिय बालमित्र भानुमामा..!थोडक्यात एका घावात समोरच्याचे अनेकानेक तुकडे करणारा याचा स्वभाव..! कदाचित भानू मामाच्या याच स्वभावाच्या वैशिष्ट्यामूळे याचे अन् माझ्या तीर्थरूप वडिलांची खूप चांगली मैत्री आहे..! ☺माझ्या वडिलांना भानू मामा व त्याचा धाकटा भाऊ प्रिय बाबासाहेब ( निवृत्त भारतीय सैनिक ) यांचा खूप खूप अभिमान वाटतो.तसे ते नेहमी बोलून देखील दाखवतात.

आमच्या पालखेड गावात पहाटे फिरायला जायची सुरुवात ज्याला इंग्रजीत Morning walk असेही म्हणतात त्याची सुरुवात आम्हीच दोघांनी सुरू केली.त्यापूर्वी कुणी पालखेड गावात अशी पहाटे फिरण्याची परंपरा माझ्या तरी ऐकण्यात पाहण्यात नव्हती..! आज त्याच पहाटे फिरायला जायच्या आम्ही दोघांनी सुरू केलेल्या सवयीचे वटवृक्ष झाले आहे,कारण आज पालखेड गावातील अनेक माणसं पहाटे,फिरायला जात आहेत..!

इ.स.१९९५ ते अंदाजे २००० पर्यंत आमच्या पालखेड गावात क्रिकेट खेळाला जिवंत ठेवायचे काम याच भानू मामाने केले.पालखेड गावात मी ज्या क्रिकेट संघात खेळायचो त्या संघाचे नाव होते..शिवशक्ती क्रिकेट संघ..आणि भानू मामा आमच्या याच संघाचा कर्णधार होता.याची गोलंदाजी अतिशय वेगवान..! फलंदाजी पण करायचा,पण गोलंदाजी मध्ये विशेष वेग अन् अचूक मारा करायचा..!

माझ्या गावातील काही मित्रांना माहीत आहे की, मला रात्री १० नंतर झोप आवरत नाही.बाकी पहाटे किती पण वाजता उठायला लावा..! माझी हीच रात्री लवकर झोपायची सवय  मोडायची म्हणून यांनी एकदा मला अद्दल घडविली. अंदाजे १९९७ -९८ चा कालखंड असेल,आमच्या पालखेड गावातील जिल्हा परिषद शाळेच्या ओट्यावर रात्री ९ वा.आम्ही मित्र गप्पा मारण्यासाठी बसलो,त्यात हा भानू मामा पण होता.गप्पांचा फड रंगला पण मला पडल्या पडल्या लागली झोप..! हे सगळे शहाणे मित्र मला तिथंच सोडून घरी निघून गेले. मला थेट पहाटे पहाटे जाग आली.मी एकदम ताडकन उठून चीनभिन होऊन इकडं तिकडं पाहू लागलो तर कुणीच नाही,फक्त काही कुत्रे ज्यांना शुद्ध भाषेत श्वान असे म्हणतात ते माझ्याच बाजूला बहुदा माझे राखण करायला होती..!😂 दुसऱ्या दिवशी हाच भानू मामा मला भेटला अन् म्हणतो कसा..
" काय,दादा झोप बरी झाली का..?"☺
खूप हसलो होतो त्या प्रसंगावर आम्ही..!

वरील प्रसंग सांगण्याचे कारण एकच की, एवढ्या हक्काने खोड मोडणारी मैत्री लाभणे याला पण नशीबच लागते.अर्थात माझी ती झोपण्याची खोड अद्याप  शाबूत आहे म्हणा..! फक्त त्यात काही  वाढ झाली आहे झोपी जाण्याची इतकेच..!☺

हाच तो भानू मामा आहे,ज्याने माझ्या स्व.आईला डोंगरे हॉस्पीटल वैजापूर येथून लासूर स्टेशन येथे घेऊन येण्यासाठी त्याच्या चार चाकी गाडीतून सगळी माणसं उतरवून दिली होती अन् ड्रायव्हर सह त्याची चार चाकी गाडी मला दिली होती.या प्रसंगाचा  उल्लेख मी माझ्या स्व.आईच्या आयुष्यावर लिहिलेल्या
" माझी आई एक मायाळू विद्यापीठ " या पुस्तकात  सविस्तर केलेला आहे.असा मित्र नियती फार कमी लोकांच्या आयुष्यात देत असते.मी या बाबतीत खूप नशीबवान आहे.भानू मामा सारखी माणसं स्वभावाने रोखठोक असतात,पण यांच्या मनात कधीच कुणा विषयी आकस,द्वेष नसतो.मनाने खूप निर्मळ असतात अशी माणसं..!

असा आमचा रोखठोक,प्रेमळ,निष्कटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघाचा तेज तर्रार गोलंदाज  अन् कर्णधार भानुदास एकनाथ जगदाळे पा. उपाख्य प्रिय भानू मामा..!

वंदे मातरम्

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २७ सप्टेंबर २०१९, शुक्रवार.


मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

" बाप व त्याच्या मुली..! "






*** चिंतन ***

" बाप व त्याच्या मुली..! "
_______________________________________________

काल दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी माझ्या सध्याच्या शाळेतील,माझ्या मुलींना इतिहासातील अनेक बापांचे दाखले देत असताना सहज एक छोटीशी कृती माझ्या मुलींकडून झाली..! त्यांनी काही पैसे आणले होते.माझ्यातील कुतूहल जागे झाले अन् मी माझा अध्यापनाचा घटक शिकविण्याचा घटक थांबवून माझ्या या मुलींना सहज विचारले...
" दीदी, हे पैसे तू कुणाकडून आणले..?"
माझ्या मुलींनी पटकन उत्तर दिले...
" सर, आमच्या वडिलांकडून...!"
हेच उत्तर माझ्या मुलींकडून येणार मला अपेक्षित होते अन् झाले तसेच...!हे उत्तर ऐकल्या बरोबरच माझ्या चेहऱ्यावरील हावभाव माझ्या या मुलींनी पटकन ओळखले..! मी काही क्षण थांबलो अन् माझ्या मुली मला  लगेच म्हणाल्या..
" का, सर...काय झाले..? आमचे काही चुकले का..?"
मी खूप स्तब्ध झालो होतो..काय बोलावं हेच समजेना..! माझ्या या मुलींना माझी समजावून सांगण्याची परिभाषा समजेल का या प्रश्नात मी गुंतून गेलो होतो..! पण अखेर माझ्या मुलींनी मला बोलते केलेच..! त्या आहेतच साक्षात ईश्वराचा अवतार..!मग मी कसा निव्वळ स्तब्ध राहू शकतो..?
मी माझ्या मुलींना नीट समजावत सांगू लागलो....,

" हे बघ दीदी, कोणत्याही मुलीच्या आयुष्यात ईश्वरा पेक्षाही सर्वात उच्च स्थान कुणाचे असेल तर......वडिलांचे...! हे तेच वडील असतात,जे जगात कुणालाही नकार देऊ शकतात पण आपल्या लेकीला कधीच नकार देऊ शकत नाही..! नकार हा शब्द त्यांच्या लेकींसाठी  नसतोच मुळी..! तर....प्रत्येक बापाच्या अंतर्मनात आपल्या मुलींसाठी फक्त आणि फक्त होकार असतो..! हा तोच सर्व सामान्य परिस्थिती असलेला बाप असतो,जो..आपल्या लेकीने काहीही मागितले तर...चटकन त्यांचे लाड पुरवतो..! भले मग त्या करिता त्या बापाला कितीही त्रास सहन करावा लागला, तो बाप कितीही आर्थिक विवंचनेत असला तरी...! तरी हा तोच बाप असतो ,जो आपल्या लेकीने कोणतीही वस्तू मागितली की, देण्यासाठी तो सदैव तत्पर असतोच..! त्याचे एकमेव कारण म्हणजे...त्या बापाची ,त्याची लेक म्हणजे हळुवार भावूक कोपरा असते..! अगदी त्या बापाच्या शेवटच्या श्वासापर्यंत..! आणि भारतीय इतिहास साक्षीला आहे की,भावुकता ही सदैव ईश्वराला सदा सर्वदा प्रिय राहत आलेली आहे..!

पण माझ्या मुलींनो, एक दुसरी ही पण बाजू लक्षात घ्या की, सर्व सामान्य परिस्थती असणाऱ्या बापाने, आपल्या लाडक्या लेकीला पटकन ज्यावेळी पैसे दिले,मागितली ती वस्तू दिली...तर त्याचं वेळी तोच बाप काही वेळानंतर जर तुम्ही बघितला तर त्याचे आर्थिक नियोजन सुरू झालेले असते..!
कशाचे..?
तर..जे पैसे माझ्या मुलीला मी दिले आहेत,त्याची तजवीज मी आता कुठून व कशी करू..? एक बाप आपल्या लेकीला हे कधीच बोलणार नाही की,......
" मी तुला पैसे देणार नाही..!" त्याच्या मुलीला दिलेल्या पैश्यांचे नियोजन प्रपंचात कुठून करायचे याच नियोजनात तो गुंतून जातो..
त्या सर्व सामान्य परिस्थिती असलेल्या बापाच्या मनात त्याच्या लेकीसाठी नकार हा नसतोच..! मग तुम्ही अशावेळी काय करायचे सांगू...?

आपल्या आईला ,कोणत्याही कार्यासाठी पैसे, वस्तू मागा..! कारण कोणाचीही आई, तिला अशावेळी भावनेच्या नात्यातील सुवर्णमध्य साधायला खूप छान प्रकारे येते.! ही तीच आई असते जी आपल्या पतीचे व आपल्या लेकरांची मन जपत प्रपंचाचा गाडा सुरळीतपणे हाकत असते...! आई, वेळ प्रसंगी आपल्या लेकीला नकार देईल पण बाप देऊच शकत नाही..! हा बाप स्वतः ला चिमटा घेऊन आपल्या ईश्वरीय लेकिंचे लाड पुरवून आपल्या लाडक्या लेकीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सदा सर्वदा करत असतो..!
म्हणून आईला वस्तू , पैसे मागा...! आणि त्या नंतर जे उत्तर आईचे येईल तेच अंतिम मानून त्याचा नम्रपणे स्वीकार करा.. !
पटलं का तुम्हाला..माझे म्हणणे...?"

माझ्या मुली खूप खूप भावूक झाल्या होत्या..! बहुतांशी माझ्या मुलींना गहिवरून आलं होतं..!
त्यांनी एकमताने मान्य केले की,...
" या पुढं आम्ही कोणतीही वस्तूं, पैसे आमच्या आईलाच मागू..!"

मलाही आज खूप गहिवरून आले होते.कारण एक बाप आपल्या लेकींना " बाप व त्याच्या मुली  " या हळुवार नात्यातील विण समजावून सांगत होता..!

वंदे मातरम्..!

ता.क.: माझ्या सध्याच्या अंधारी गावातीला शाळेतील या मुली खूप खूप ग्रेट आहेत..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २५ सप्टेंबर २०१८

" टाईमपास...!"



                                            मला प्रवासात भेटलेली माणसं..!
                                                         " टाईमपास...!"







=====================================
शाळा सुटली की,आम्हा काहींची लई धावपळ सुरू होते..बस पकडण्याची..! पण नेहमीप्रमाणे बऱ्याचदा बस एकतर उशिरा येते किंवा आलीच तर त्यात चीन आणि भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारी घनदाट लोकसंख्या असतेच..! या परतीच्या प्रवासात आम्हा परतीच्या मित्रांना एक वस्तू प्रेमाने ,तोंड चावळत चावळत साथ देते.प्रेमाने तोंड चावळत चावळत साथ देणाऱ्या इवल्याश्या खाद्य पदार्थांचे नाव आहे.....
खारट सूर्यफूल बी..! त्याला आम्ही टाईमपास असेही म्हणतो..!☺

हा टाईमपास दिसतो एवढासा पण आमचे अख्खे तोंड ढवळून काढायची भर भक्कम ताकद याच खारट सूर्यफूल बियांमध्ये आहे..!या टाईमपास ला अलगदपणे फोडून त्यातील पौष्टीक पदार्थ खाण्यासाठी निष्णात बी फोडणाराच बी फोड्या असावा लागतो..!☺ हे टाईमपास हातात घेतले की, पाहिले खारट बी फोडून खाण्याची तीव्र लालसा निर्माण होऊन ते पाहिले खारट बी  फोडून ,बोटात पकडून पोटात ढकलले की,अजुन अजुन खाद्य लालसा वाढत जाते..!

जो पर्यंत आम्ही बस स्थानकावर उभे असतो तो पर्यंत खारट बी फोडून खाण्याची कसरत सुरू असते..! मात्र एकदाका बस आली रे आली  अन् त्यात आम्ही चढलो की मग आमच्यातील ते बी फोडून खाण्याचे कौशल्य पणाला लावावे लागते..! खारट बी त्या चीन आणि भारताच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घनदाट गर्दीत खाणे म्हणजे त्या  खारट सूर्यफूल बियांवर केलेलं सर्जिकल स्ट्राईकच असते..! अचूक टायमिंग साधून अचूकपणे  बी मधील नेमका  पौष्टिक पदार्थ खाणारे आमच्या सारखे आम्हीच..!😂

आमच्या या निष्णात खाण्या बाबत आम्हीच आमची पाठ अन् कंबर थोपटून घेतो..! कारण औरंगाबाद ते जळगाव रस्ता अन् त्यावरील सुंदर, सुबक  विविध भौमितिक आकृत्या सारखे अंगवळणी पडलेले खड्डे..!☺ आपले भारतीय अशा बऱ्याच गोष्टी अंगवळणी पाडून घेतो त्याबद्दल त्या सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच..!😂

एखादा खड्डा आला की हातातील बी निसटून ते बी आमच्या पासून दुरावण्याची शक्यता निर्माण होते.अशावेळी मला व माझ्या या मित्रांना खूप खूप दुःख होते..! पण काय करता..आम्ही  पडलो अंगवळणी पडलेले दैनिक प्रवासी..!☺जे खारट बी हातातून निसटून खाली पडले त्याचा शोक न करता आम्ही मित्र पुन्हा दुसऱ्या खारट सूर्यफूल बियांवर सर्जीकल स्ट्राईक करायला सज्ज होतो..! या सर्व कौशल्यपूर्ण खाण्याच्या क्रियेत जेंव्हा त्या खारट बियांमधील पौष्टीक पदार्थ जेंव्हा तोंडात जातो त्यावेळी स्वर्गापेक्षा लई मोक्कार आनंद आम्हा मित्रांना होतो..!☺

तर..असे हे आमचे टाईमपास अन् त्याला खाण्याची तऱ्हेवाईक पद्धत..! त्या तऱ्हेवाईक खाण्याच्या पद्धतीत माझ्या सोबत जे माझे मित्र आहेत ते...प्रिय निकम सर, प्रिय परदेशी सर अन्  प्रिय डॉ. गिरी सर..आम्ही या टाईमपास खारट सूर्यफूल चे निष्णात खवय्ये आहोत याचा आमच्या आम्हालाच लई अभिमान वाटतो..!

ता.क.: सदरील आम्हा मित्रांचे छायाचित्र आज  दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी शाळा सुटल्यावर टाईमपास खारट सूर्यफूल बी खातांनाचे आहे..!

वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २४ सप्टेंबर २०१९

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

" यांकू पप्पा...! अत्युत्कृष्ट वादक..! "



आमचे गाव ,आमची माणसं

 " यांकू पप्पा...! अत्युत्कृष्ट वादक..! "
________________________________________________

कोण होते कुठले होते माहीत नाही पण आमच्या पालखेड गावात दरवर्षी  यात्रेला यायचे..!  ग्रेट होते..!

आम्ही पालखेड ता.वैजापूर येथे लहानपणी गावातील विविध मिरवणुका पहिल्या..! त्या सर्व मिरवणुकांवर जीव ओवाळून टाकावा असा त्यांचा थाट असायचा..!विशेष म्हणजे त्या सर्व मिरवणुकांमध्ये नाचनाऱ्यांचे ,शरीराचे सर्व अवयव थिरकण्यापेक्षा पायांची विशिष्ट लयबध्द हालचाल मस्तपैकी व्हायची..!

आजही त्या गतकाळातील त्या लयबध्द ,मस्तपैकी हालचाली आठवल्या तरी आपोआप स्वतः चे पाय थिरकायला लागतात..!
असं काय होत, त्या मिरवणुकीमध्ये की,ज्याच्या वाजण्याने गावातील माझ्या सकट सर्व जे कुणी " लयबध्द नाचणे " या नाद संस्कृतीवर  अद्याप विश्वास ठेवून आहेत,त्यांचे पाय थिरकायला लागायचे..?

त्या वादकांचे नाव होते.." यांकु पप्पा..!"
आता त्यांचे नाव यांकू पप्पा का होते हे मला त्यावेळी ही माहीत नव्हते अन् अजुन पर्यंत हे नाव माझ्या साठी कुतुहलाचा विषय आहे..!त्या सर्व वादकांच्या प्रमुखाचे नांव यांकू पप्पा होते की..अजुन काही...हे अजूनही मला माहित नाही..! पण एक मात्र नक्की खरे की, या  यांकू पप्पांनी आमच्या तत्कालीन पालखेडकरांना वेड लावले होते...नाचायचे..!

यांकू पप्पा व त्यांच्या संचात दोन, तीन जण पिपाणी वाजायला व दोघं जण  संबळ वाद्य वाजवणारे असायचे..! ते आमच्या पालखेड गावातील ग्राम दैवत असलेल्या श्री.पारेश्र्वर महादेव कार्तिकी यात्रेला हमखास असायचे..! महादेवाच्या मिरवणुकीत सहभागी बहुतांशी लोक,यांकू पप्पांच्या ठेक्यावर ताल धरून नाचायचे..! खूप मज्जा यायची..! त्या नृत्यात जुने हिंदी चित्रपट अभिनेते भगवान दादा यांच्या हळुवार,सूक्ष्म हालचाली, पायांचे मोजक्या अंतरावर चाल करून नाचणे, ते नाचत असताना मधूनच गोल गिरकी घेऊन पुन्हा ठेका धरून नाचणे..मध्येच एखादी किंकाळी फोडणे..यांचे पदोपदी दर्शन व्हायचे..!
व्वा... काय अप्रतिम होते ते सर्व..!

पण............
काळाच्या ओघात यांक्कू पप्पा व त्यांचा संच आमच्या गावातूनच काय तर या जगातून हद्दपार झाला की काय असे वाटू लागले आहे..! कुठेच हा ठेका व त्याच्या तालावर नाचणारे आधुनिक युगातील तरुण नाचताना दिसत नाही..! जे थोडेफार शिल्लक आहेत ते खान्देश मध्ये विशेष करून धुळे जिल्ह्यात ही वाद्य संस्कृती व तिच्या तालावर नाचणारे सर्व वयोगटातील नर्तक पाहायला मिळतात..! मी याचा जवळून अनुभव घेतला आहे.माझ्या मित्रांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात..! उर्वरित महाराष्ट्रात यदा कदाचित हा प्रकार दिसलाच तर त्या नाचणाऱ्या तरुणांना मरगळ आल्या सारखे त्यांचे नृत्यकाम सुरू असते..!

 मात्र जर का तो DJ  भाऊ आला तर यांच्या अंगात आल्या सारखं होतं..! हा DJ भाऊ ,वाजायला लागल्यावर नाचनाऱ्यांच्या शरीराचा नेमका कोणता अवयव हालचाल करू राहिला हे समजतच नाही..! ना त्यात नाद माधुर्य असते ना भगवान दादांच्या लयबध्द नृत्याचा ठेका त्यात धरता येतो..!

अलीकडच्या काळात " जोगवा " मराठी चित्रपटातील
" ललाटी भंडार..!" या गीतावर तोच ठेका आहे,जो यांकू पप्पांच्या ठेक्याची आठवण करून देतो..ते गीत ऐकून   मला माझ्या लहानपणी पाहिलेल्या, ऐकलेल्या यांकू पप्पाची ठेका धरून आठवण आली..! या गीतात साक्षात भगवान दादाच नृत्य करत असल्याचा मला भास होतो.शेवटी लयबध्द वाद्य संस्कृती कधीही लुप्त होत नसते हे असे काही उत्कृष्ट लोकगीत नृत्य प्रकार पाहताना मनोमन पटते..!

ता.क.: आपल्या भागात कुठे हा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला यांकू पप्पांच्या वाद्य संस्कृतीतील वाद्य प्रकार व त्यात सहभागी भगवान दादा नृत्य शैली जोपासणारे नर्तक आढळल्यास नक्की कळवा..!😂

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २३ सप्टेंबर २०१८

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

" कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"




       चिंतन **

      " कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"

=====================================

चिंतन ©️

" कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"

=====================================

कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती..!

रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती तर..अतिशय दारिद्र्य अवस्थेतील,कुटुंबातील एक तरुण त्याचे शिक्षण घेऊ शकला नसता..!

रयत शिक्षण संस्था नसती तर स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र त्याच तरुणाने ,त्यांच्या वार्धक्यात आम्हाला दिला नसता..!

रयत शिक्षण संस्था नसती तर..आम्ही सर्वजण आज कुठेतरी रोजंदारीवर काम करत राहिलो असतो..!

आज आम्हाला जे काही थोडेफार स्थैर्य प्राप्त झाले आहे, त्यामागे कळत नकळतपणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आशीर्वाद आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  शिक्षण संस्थेत त्याकाळी आमच्या तीर्थरूप वडिलांची अजिबात आर्थिक कुवत नसताना, तीर्थरूप वडिलांनी कमवा व शिका अंतर्गत शिक्षण घेतले होते..!

जी व्यक्ती तुम्हाला ,तुमच्या कुटुंबाला शिक्षणाचा पहिला मार्ग दाखवते किंवा सानिध्य देते, अशाच महान व्यक्ती, अशा  कित्येक  सर्व सामान्य व्यक्तींसाठी वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतात. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही फक्त एक व्यक्ती नसून कौटुंबिक, सामाजिक क्षमता नसताना  शिक्षण घेऊन   स्वतः ला सिध्द करणारी विचारधारा आहे . वंदनीय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त फोटो, जयंती किंवा जयघोष करण्यापुरते मर्यादित व्यक्तिमत्त्व नाही. तर शिक्षण म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्व सर्वश्रेष्ठ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.आमच्या कुटुंबासाठी असे महान व्यक्तिमत्व दोन अन् ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील अन् आमचे वडील तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव..! 

आमच्या घरातील वटवृक्ष जे माझे वडील..तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव पालखेडकर ( वय वर्ष ८२), आहेत, त्यांचे शिक्षण साठ च्या दशकात " कमवा व शिका..!" या विचाराने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत झालेले आहे.

माझ्या पत्नीचे विद्यालयीन शिक्षण देखील त्याच रयत शिक्षण संस्थेत झालेले आहे.मी नेहमी माझ्या सासुरवाडीला गेल्यावर तेथील रयत शिक्षण संस्थेच्या  शाळेत नक्कीच जातो.दर्शन  घ्यायला..रयत शिक्षण संस्थेचे..!

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे.
(९ मे १९५९) त्या निमित्त या महामानवास आमच्या कुटुंबाकडून विनम्र अभिवादन..! 🙏🏻

तसेच माझ्या वडिलांचे छायाचित्र ,त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या  श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचे आहे.माझे वडील या इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वार वर उभे आहेत,त्यावेळी एवढी भव्य इमारत नव्हती. मी सहपरिवार वडिलांना मुद्दामहून त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रीरामपूर येथे  त्याच स्थळी घेऊन गेलो होतो.त्यावेळी त्या परिसरातील   गतकाळातील काही वस्तू , जुन्या इमारती इत्यादी बघून  खडतर आठवणींच्या हिंदोळ्यावर माझ्या वडिलांना खूप गहिवरून आले होते.

माझ्या दृष्टीने ,माझ्या वडिलांना त्यांचा भूतकाळ भेटीस घालून देणे त्यांच्या वर्तमानकाळात एखाद्या तीर्थक्षेत्रास गेल्या सारखे वाटले होते.

ता.क. - वर्तमानात, खडतर आयुष्याचा भूतकाळ भेटला की, मन भरून येते.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: ९ मे २०१९

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

"शेम टु शेम...! "



***  मला प्रवासात भेटलेली माणसं  ***

                         " शेम टु शेम...! "
_______________________________________________

मी आपला सावरून, सवरून , नेहमी प्रमाणे सर्वात पाठीमागे शिस्तीत बसलो होतो. हे माझे सर्वात पाठीमागे बसणे थेट माझ्या इयत्ता १ ली पासून ते आजतागायत आहे.. बरं का..!😂
असो,
 समोर एक साहेब ,
" आम्ही असं काम करावं, तसं काम करावं..!"
अशा अनेकानेक उपदेशपर ,मार्गदर्शनपर दोन,चार गोष्टी समजावून सांगत होते..! इतक्यात..माझ्या नेमकं थोडेसे पुढे एक चांगला ओळखीचा चेहरा,देहयष्टी असलेला माझ्याच वयाचा पण , माझ्या व त्याच्या कपाळावरील भागात अमुलाग्र फरक असलेला एक इसम येऊन बसला..!
मी मनात म्हटलं," अरे,हा विजू इकडं काय करू राहिला..?"
माझं,त्या मार्गदर्शन करणाऱ्या साहेबांच्या अमृत वाणीकडे अजिबात लक्ष नव्हते..! अगदी तसेच,जसे वर्गातील ,शिक्षण विभागाच्या दृष्टीने "अप्रगत विद्यार्थ्यासारखे..! आता सरकारला काय माहीत,जगातील सर्वात सुपीक मेंदू हे वर्गातील मागील रांगेतच सापडतात..!😂 बहुदा माहीत सुध्दा असेल..!😂😂

 भल्या मोठ्या हॉल मध्ये स्वयंपाक घरातील सांडशी पडल्यावर,त्याच सांडशीचा मस्त आवाज ऐकू येऊ शकेल इतकी निरव शांतता होती..!  माझी आपली चुळबुळ सुरूच होती, मनात म्हणत होतो, " याला आवाज कसा देऊ...?"
अखेर अंदाजे १९७० पूर्वीच्या नवविवाहित दांपत्यासारखा हळूच आवाजात त्याला आवाज दिलाच..
" विजू, ऐ....विजू...!"
त्याचं काही लक्ष जाईना..! मग मी त्याच्या आडनावाने वरील प्रमाणेच १९७० पूर्वीचा आवाज दिला...
" ऐ, पाताळयंत्री...!"
असे म्हंटल्यावर त्याने पटकन माझ्याकडे मागे वळून पाहिले..!
पण,त्याची नजर ,माझ्याकडे अनोळखी नजरेनं पाहत होती.मी मनात म्हटलं, " अरे,हा विज्या..स्वतः ला लई शहाणा समजू राहिला की काय..? ओळख पण देईना..!"
त्याने हाताने इशारा करून,नंतर बोलू असे मला करपल्लवी करून सांगितले. तेंव्हा कुठं मी चौकसपणाची तात्पुरती माघार घेतली..!

अखेर साहेबांची बैठक सुखरूप समाप्त झाली.त्याची नजर माझ्याकडे पाहताना अनोळखी असल्यानं मी औपचारिक भाषेत विचारले , " तुम्ही , पानवडोदचे ना..?"
" हो,मी तिथेच शिक्षक आहे..! तुम्ही कोण..?"
आता मला पक्की खात्री झाली की ," हा तो नव्हेच..! जो मी समजत आहे..!"
मी- " तुमचा एखादा भाऊ, डी.एड ला कन्नड येथे होता का हो..?"
" हो..विजय त्याचे नाव आहे,तो तेथे होता..! तुम्ही पण तिथे होता वाटतं..! म्हणूनच तुमची गफलत होऊ राहिली..!तो अन् मी जुळे भाऊ आहोत..!
मी- " काय शेम टु शेम आहात राव तुम्ही दोघे..! बरं झालं मी तुम्हाला डायरेक्ट विज्या नाही म्हणालो...! तुमचा नाहक गैरसमज झाला असता..!"
" नाही हो..! याच आवाजाच्या हाकेच्या मैत्रीत खरी मजा असते..!"
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन् आम्ही एकमेकांचा निरोप घेतला..!

ता.क.: खरचं, ही शेम टु शेम दिसणारी माणसं बऱ्याचदा ,बऱ्याच जणांना चांगलीच अडचणीत आणतात..त्यांच्या दिसण्याच्या सांधर्म्यामूळे...!😂

वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

घडलेला प्रसंग दिनांक: २१ सप्टेंबर २०१८

चितरून व्यक्तिमत्त्व,आदरणीय सादेक चाचा..!"

                      आमचे गाव आमची माणसं..!

      " चितरून व्यक्तिमत्त्व,आदरणीय सादेक चाचा..!"
                                                                



=======================================

काही माणसं ही फक्त शरीराने तरुण नसतात तर मनाने तरुण असण्याने त्यांच्यातील तारुण्याचा उत्साह हा नेहमी सळसळत असतो.त्यांचे हे पन्नाशीनंतरचे सळसळते तारुण्य आजकालच्या तथाकथित तरुणांना एक प्रेरणादायी तारुण्य असते..!

आमच्या पालखेड ता.वैजापूर या गावातील जे असेच पन्नाशीनंतरचे सळसळते तारुण्य आमच्या पिढीने पाहिले ते म्हणजे प्रिय आदरणीय स्व. सादेक शेठ बागवान यांचेच..!

काल दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आमच्या या आदरणीय प्रिय सादेक शेठजी बागवान यांचा मृत्यू झाला अन् आमच्या पिढीने पाहिलेले  पन्नाशीनंतरचे एक सळसळते तारुण्य आमच्या पालखेड गावातून कायमचे निघून गेले..!

आदरणीय सादेकजी चाचा शेठ बागवान..!
 आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख शेख गौस शेठ बागवान ( जि.प.शिक्षक, वैजापूर) यांचे सख्खे काका..!
आमच्या या बालमित्राच्या अन् आमच्यातील असलेल्या प्रेमामुळे नेहमी आदरणीय सादेक चाचा यांचा नेहमी संपर्क यायचा..! एखाद्या माणसानं आपलं आयुष्य कसं आनंदाने जगावं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे प्रिय सादेक चाचा..! नेहमी हसमुख चेहऱ्याने कुणालाही भेटणार..!यांचा अन् रागाचा दूर दुरून देखील संबंध नाही..! आयुष्यावर अन् त्यातील प्रत्येक क्षणावर आपल्यातील सहजसुंदर अन् हसमुख स्वभावाने आपले जीवन जगणारा एक ग्रेट पालखेडकर..!

आमच्या पालखेड गावातील असा एकही माणूस आदरणीय सादेक चाचा यांना कोणत्याच बाबतीत नाव ठेवूच शकत नाही इतकं यांचे वागणे सगळ्यांना हवंहवंसं अन् प्रेमळ होते..! आदरणीय सादेक चाचा  सारखी माणसं अशा सगळया माणसांसाठी प्रेरणादायी असतात जी माणसं सतत आपल्या गैरवर्तनाने कुणालातरी कोणत्याही मार्गाने दुखावत असतात..! खूपच मनमौजी व्यक्तिमत्त्व होते प्रिय सादेक चाचा..!

यांचे वय यांच्या स्वभावाच्या कधीच आड आलेच नाही.मला जेंव्हा जेंव्हा भेटायचे तेंव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून हसून हमखास म्हणायचे.." क्यू...रे..जाधव...क्या.. चल.. रहा है..? मजेमे..ना...?"
त्याच्या या नेहमीच्या प्रेमळ चौकशीने मन एकदम आनंदीत अन् प्रफुल्लित होऊन जायचे..!जरी यदाकदाचित मनात नैराश्य असेल तर ते पार दूर पळून जायचे..! प्रिय सादेक चाचा यांनी आमच्या मित्रांसोबत गप्पा करताना कधीच वयाचे बंधन आडवे येऊ दिले नाही.सगळ्याच रंगाच्या छटा असलेल्या गप्पा चाचा सोबत व्हायच्या..!☺ अशी माणसं कोणत्याही वयोगटातील माणसाची मित्र पटकन होऊन जातात..! कारण त्यांच्यातील असलेले निरपेक्ष भावनेने निर्माण केलेले प्रेमळ संबंध..!

आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख ( जि.प.शिक्षक वैजापूर) याच्या समोर देखील प्रिय सादेक चाचा त्याच मनमोकळ्या गप्पा करायचे ज्या आमच्या मित्राच्या सोबत एकट्यात भेटल्यावर..!  विशेषकरून प्रिय आदरणीय सादेक चाचा व आमचा प्रिय बालमित्र विजय गायकवाड यांच्या गप्पा ह्या निव्वळ आनंद द्यायच्या मनाला..! विजू अन् सादेक चाचा यांच्यातील गप्पा म्हणजे दोन खूप वयाचे अंतर असून देखील त्यात कसं नातं असावं याचं मूर्तीमंत उदाहरण होते..! त्यांच्या गप्पात कधीच वयाचे बंधन आलेच नाही..!

आयुष्यावर प्रेम करणारे,
आपल्यातील अजातशत्रू मित्रत्वाचा सदैव पुरस्कार करणारे,
नेहमी हसमुख चेहऱ्याने स्वागत करणारे,
आपल्या वयाला, एखाद्याशी मैत्री निर्माण करताना कधीही आड न येऊ देणारे,
आम्ही सर्व बालमित्र व त्यांचा सख्खा पुतण्या ( आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख) यांच्यात कधीही भेदभाव न करणारे एक उत्तुंग प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सादेक चाचा..!
काल दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्यातून निघून पैगंबरवासी झाले..!त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

वंदे मातरम्..!

आदरणीय स्व. सादेक चाचा बागवान( ह.मू.औरंगाबाद) यांचा,त्याच्या पेक्षा वयाने खूप लहान असणारा मित्र: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२० सप्टेंबर २०१९

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

" विकृत सुशिक्षित माणसं..अन् त्यांचे ओंगळ प्रदर्शन..! "



                                                                           **चिंतन **

                                            " विकृत सुशिक्षित माणसं..अन् त्यांचे ओंगळ प्रदर्शन..! "
________________________________________________

 हल्ली काही बरीच " सुशिक्षित माणसं " आपला वाढदिवस साजरा करायचा म्हंटल्यावर स्वतच्या तोंडाला खायचा केक फासून आपल्या विकृत मानसिकतेचे ओंगळ प्रदर्शन करत असतात..! शेवटी केक सुध्दा अन्नच आहे..!ते खायचे सोडून वाढदिवस मूर्तीला व त्यांच्या आजूबाजूच्या अती उत्साही विकृत मानसिकतेचे ओंगळ प्रदर्शन करणाऱ्या माणसांच्या तोंडाला फासण्याचा विकृत प्रकार हल्ली प्रत्येक  " फक्त सुशिक्षित मंडळी " करताना आपण पाहत आहोत..!

जी विकृत माणसं तो केक खायचा सोडून तोंडाला बचाबचा चोपडून घेतात..एकतर अशांना अन्नाची किंमत माहीत नसते किंवा अशांनी गरिबी पाहिलेली नसते..! तोच तोंडाला चोपडून वाया जाणारा केक एखाद्या भुकेल्या माणसाला दिला किंवा उपस्थित माणसांनी खाल्ला तर त्या अन्नाची किंमत जानल्या सारखे होईल...! पण असे आजकालची सुशिक्षित मंडळी असे करतांना दिसत नाही हे फार मोठे दुर्दैव आहे..! पुन्हा हीच सुशिक्षित मंडळी शेतकरी दादाच्या नावाने बाजू घेऊन टाहो फोडीत असतात..!

केक हेही अन्नच आहे..शेतकरी दादाने पिकविलेल्या शेतातील..!मग त्या बळी राजाचा अपमान करण्याचा ह्या सुशिक्षित माणसांना काय अधिकार पोहचतो..? जन्मदिनी तोंडाला केक फसविण्याचा विकृत प्रकार कधीही अशिक्षित माणसं करताना आढळणार नाही..! बहुदा त्यांनाच त्या अन्नाची किंमत समजलेली आहे..!
मी वरील विषयाला नेहमी समाज व्यवस्थेत प्रबोधन म्हणून  व्यक्त करत आलेलो आहे..अन् करत राहणार..!

आशा करतो आपणही सर्व भली माणसं माझ्या या  जन्मदिनी तोंडाला केक न फासता तो खावा किंवा खाऊ घालावा या उपक्रमात सहभागी व्हाल..!

केक हे अन्न आहे,त्याची गरज कुणा भुकेल्या माणसांना नक्कीच आहे.पण आजही आपल्या समाजात काही अन्नाचा माज आलेले माजखोर या अन्नाला असे वाया घालवत आहेत..! असे करणाऱ्यांत सुशिक्षित माणसंच आहेत ..!
अरे, मुजोरानो, केक हे कुणाच्या तरी मुखी घाला..! तुम्हाला नाही खायचा तर नका खाऊ...! पण ज्याला त्याची गरज आहे त्या भुकेल्यांच्या मुखी घाला रे...शिकलेल्या सुशिक्षितांनो...!असे अन्न वाया घालवून ते अन्न पिकविणाऱ्या बळीराजाचा अपमान कृपया करू नका..सुशिक्षितांनो केक वाया घालवून वाढदिवसाला चेहऱ्याला फासवून..एक गरीब,माणूस कधीच असे घाणेरडे कृत्य करणार नाही..!

वाढदिवस साजरा करत असताना मुलांकडून,जर अशा चुका होत असतील तर त्यांना उपस्थित भल्या माणसांनी समजून सांगायला हवे...! माझा काय अन् दुसऱ्याचा काय मुलं आहेत...पहिल्यांदा चुकतीलच.! कारण आजकाल आसपासचा माहोल तसा आहे...!
पण त्यांच्या केक चेहऱ्याला फासविण्याच्या या ओंगळ प्रदर्शन असणाऱ्या वाईट सेलिब्रेशन बाबत समजावून सांगणे महत्त्वाचे आहे..!
कुणी समजावून सांगितलेच नाही तर
 " जन्मदिनाच्या रोजी चेहऱ्याला केक फासायचा असतो " अशा विकृत प्रथेला अजुन व्यापक स्वरूप लागेल..!

आपल्या भारतात वाईट प्रथांना कमतरता नाही.अजुन त्यात एक कायमस्वरूपी सामील होईल..!
हे जर टाळायचे असेल तर..
एकमेकांना सांगत चला..की,

" जन्मदिनाच्या दिवशी केक वाढदिवस मूर्तीच्या किंवा त्याच्या आसपासच्या माणसांच्या चेहऱ्याला न फासता , तो केक खा...! किंवा इतरांना खाऊ घाला..!

ता.क.: जन्मदिनी कृपया चेहऱ्याला केक फासवू नका..! आसपासचे कुणीतरी खा...किंवा गरजवंताला खायला द्या..!आपल्या आसपास खूप  खूप गरजवंत आहेत..!

वंदे मातरम्..!🇮🇳

लेखक :  नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२० सप्टेंबर २०१८

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

थोर लेखक वि.स.खांडेकरांच्या दोन मानसकन्या..!



थोर लेखक वि.स.खांडेकरांच्या दोन मानसकन्या..! 
=======================================
एक देवयानी अन् दुसरी शर्मिष्ठा..!

वि.स.खांडेकर यांच्या ययाती या महाभारतकालीन ग्रंथातील या दोन्ही मानसकन्या आपापल्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात..! त्यापैकी...देवयानी ही काही काळानंतर भावनाशून्य होत गेली अन् शर्मिष्ठा आहे त्याच साध्या स्वच्छ मानसिकतेत आपलं आयुष्य जगत राहिली..आपल्या स्वच्छ आणि नितळ प्रेमात..!

वि.स.खांडेकर हे माणसांच्या नात्यांचा गुंता सोडविणारे थोर विचारवंत अन् लेखक..!

वि.स.खांडेकर यांनी दोघींना आपापल्या आयुष्यात रेखाटलं..! मात्र त्यात शेवटी रुपगर्विता अन् कृतघ्नपणा दाखवून परखड असणारी देवयानी ही दुर्दैवीच राहिली..!ययाती अखेर पर्यंत द्विधा मनःस्थितीत राहिला..!


अद्यापही पृथ्वीवर  नात्यांवर स्वच्छ प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून तर कुणात तरी शर्मिष्ठा जिवंत आहे..!नसता अनेक देवयानी सारख्या मानसिकतेच्या माणसांनी माणसांचे आयुष्य पार स्मशान केलेले होते..अन् आहे.यातून तेच सहिसलामत सुटले जे कचा सारखे प्रगल्भ होते अन् आहेत..! नसता देवयानी कायमची वरचढ ठरली असती..!

वि.स.खांडेकर म्हणजे मराठी साहित्याला पडलेलं गोड स्वप्नं...! असं स्वप्न ,ज्याने अनेकाच्या भावविश्वाचा कोपरा आपल्या सुगंधी,रसिक भावनांनी दरवळत राहिला...सदा सर्वदा..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१७ सप्टेंबर २०१९

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

" फक्त कल्पना करा ..! "

             
                                                                   ** चिंतन **

                                                            " फक्त कल्पना करा ..! "
===============================================================

फक्त कल्पना करा जर सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळी असा धाडसी निर्णय घ्यायला स्वतंत्र नसते अन् ......
त्यावेळी ज्यांच्या हातात निर्णय घ्यायची अधिकृत सत्ताकेंद्रे कुणाच्यातरी हट्टापाई दिल्या गेली होती ते जर त्यावेळी हजर असते...तर...आम्ही संपूर्ण मराठवाडाकर...कदाचित दुसऱ्या पाकिस्तानचे नागरिक राहिलो असतो...!

आपल्या देशाचा स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा बराच इतिहास हा हुजरेगिरी ,घराणेशाही,कर्मठ व्यक्तिनिष्ठा अन् जात,धर्म यांच्या अनैतिक दबावापोटी झाकून ठेवल्या गेला..! पण नियती प्रत्येकाला उघडे नागडे करत असते विशिष्ट वेळ आल्यावर..!
" मौका सभी को मिलता हैं..!"☺

ग्रेट होता तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल..अन् ग्रेट होती तुमची तत्कालीन समयसूचकता..!

उद्या १७ सप्टेंबर ...!
त्या निमित्त तत्कालीन सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन..!

ता.क.: एखाद्याच्या गैरहजेरीत ,कमी वेळेत उत्तुंग कार्य कसे असावे  याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे...हैदराबादच्या निजाम,रझाकार विरूध्द केल्या गेलेली पोलीस अॅक्शन...!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:१६ सप्टेंबर २०१८

" चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो..!"


** चिंतन **
" चलो एक बार फिर से अजनबी बन जाये
=====================================

माणसाला बऱ्याचदा आयुष्यात जीवन जगत असताना आयुष्याच्या वाटेवर स्वल्पविराम घ्यावा लागतो..! हा  स्वल्पविराम घेण्याचा अर्थ अभिप्रेत असतो, त्या वाक्यातील काही शब्दांना अर्थपूर्णता येण्यासाठी..! बरीच नाती ही मुद्दामहून अनोळखी भासवावी लागतात,नात्यातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी..!

बऱ्याचदा आयुष्याच्या वाटेवर घेतलेला स्वल्पविराम, कधी कधी नाईलाजाने घ्यावा लागतो तर कधी कधी समोरच्याला समजून घेऊन घ्यावा लागतो..! मात्र हा स्वल्पविराम संवेदनशील मनाला चीरचीर करून जातो..! आयुष्याच्या वाटेवर जेंव्हा कधी एकांतात आपण बसतो तेंव्हा हा घेतलेला स्वल्पविराम गहिवर निर्माण करतो आठवणींनी..!

माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींना नाही मिळत पूर्णविराम..!बऱ्याच वाक्यात पूर्णविरामाच्या अगोदर स्वल्पविराम असतो,त्याच पूर्णविरामाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी..!
आणि तो  स्वल्पविराम  म्हणत असतो...
" चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो..!"

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १५ सप्टेंबर २०१९,रविवार

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

" औंदा कसं होईल रं भाऊ...? "

                                                 **  मला प्रवासात भेटलेली माणसं..! **      
                                                       " औंदा कसं होईल रं भाऊ...? "

________________________________________________

खरंच फार फार बिकट परिस्थिती आहे यावर्षी निदान माझ्या औरंगाबाद जिल्ह्यात तरी..! इतरत्र कशी असेल..काय माहीत..!
आला दिवस तसाच चालला आहे..! माझा व माझ्या बऱ्याच फेसबुक मित्रांचा मूळ पिंड खेड्यातील असल्याने खूप खूप वाईट वाटते..! कारण सध्याच्या अती भयानक परिस्थिती विषयीची दाहकता खूप जवळची वाटते..! याचा अर्थ शहरातील मित्रांना आजच्या बिकट परिस्थिती बद्दल वाईट वाटत नसेल असे अजिबात नाही. पण माझ्या सारख्या अनेकांचे बालपण ज्या खेड्यात ,शेतकऱ्यांच्या सहवासात,शेतकरी मित्रांच्या सहवासात गेले,त्यामुळं आजच्या दुष्काळजन्य परिस्थिती बद्दलची दाहकता खूप जवळची वाटते. बऱ्याच विषयांवर व्यक्त व्हावंसं वाटतं पण..माझे विचार स्तब्ध होऊन जातात दररोज सकाळ होऊन संध्याकाळ तशीच कोरडी जाते..! अन् पुन्हा उगवते...दात इचकुन..पुन्हा त्याच  कोरड्या वाकुल्या दाखवत..!

कसं होणार...?
माझी नोकरी ग्रामीण भागात आहे..दररोजची तीच ती दाहकता पहावल्या जात नाही..!आज दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी शाळेतून घरी येताना बस मध्ये माझ्या शेजारी एक खूप वयस्कर गृहस्थ बसले होते. काळा सावळा वर्ण,दाढी काहीशी वाढलेली,डोक्यावरील टोपी मळकटलेली..! नंबरच्या चष्म्याच्या काचा घासून घासून धूसर झालेल्या..!डोळे पार ओलसर ..त्यात एक प्रकारची .........
" आता कसं होईल..?" या विचाराने त्रस्त असलेली भेदरलेली नजर मला सहज लक्षात आली..! मला राहवले नाही अन् मी विचारले बाबांना...
मी- " बाबा,कुठं चाललात..?"
माझ्या कडे अनोळखी नजरेनं पाहत बाबांनी उत्तर दिलं..
" भाऊ,मी माझ्या पोरा कडं चाल्लो ..!"
मी- " काय करतो तुमचा पोरगा..?"
" कंपनीत कामाला हाये.."
मी माझा रुमाल काढला अन् माझा घाम पुसु लागलो ,इतक्यात बाबा मला म्हणाले..
" आरं भाऊ, नुसती गरमस हाये.. तो काही पडाना..! वावरात कपाशी लावली होती..पण पाऊसच नाय...कशी वाढल ती कपाशी..? संमदी कपाशी जळुन गेली भाऊ..काय करतो..नशिबाचे भोग..! औंदा कसं होईल रं भाऊ..?

बाबाचे हे उद्गार ऐकून मी खूप अस्वस्थ झालो होतो.एका म्हाताऱ्या माणसाची ही वेदना माझ्या मनाला चीर चीर..करून गेली..!
मी- " बाबा, तुमच्या काळात लई पाऊस पडायचा, हाय ना...!"
" हाव भाऊ, लई महामुर पाऊस पडायचा..लई पिकायच... संमदीकड चांगलं होतं..!
मी- " बाबा, आता काम्हून पाऊस पडत नसेल बर..?"
" आरं, भाऊ..लोकांच्या नीतिमत्ता खराब झाल्या..काय त्या पावसाला नाव ठेवून उपयोग..?"
मी- " बाबा, जंगलं पण कमी झालेच की..!"
आरं, जंगलं कमी झाल्यात पण..माणसं कोणती ढंगावर राहिली..?
मी- " कसं काय बाबा..?"
हे पहाय..आमच्या काळी ,आम्ही लई गरीब होतो पण..आम्हाला काही यसन नव्हतं..! या यासनामुळ शेतात काही पिकलं की,लगीच पैसा वाया जातू..! कष्टाची कमाई अशी वाया गेली की लई वाईट वाटत रे..भाऊ..!

औरंगाबाद बस स्थानक जवळ येऊ लागलं होतं.बाबा लगेच उठले.मी म्हणालाे..
" बाबा,थांबा अजुन..! बस स्टँड आले की, मी सांगतो तुम्हाला..!"
बाबा खाली बसले.बस, बस स्टॅण्ड वर थांबली.मी व ते वयोवृध्द बाबा बस स्टँड समोरील एकाच  रिक्षा स्टँडवर आलो.मी रिक्षात बसलो.त्या वयोवृध्द बाबांना देखील माझ्याच मार्गाकडे यायचे होते. रिक्षावाला बाबांना म्हणाला...
" भाडे ,३० ₹ आहे..!"
बाबा-" मी २० ₹ च देईन..! तुला पटलं तर घे...नायतर जा निघून..!"
रिक्षावाल्यानं बरीच विनवणी केली पण बाबा काही त्यांच्या २० ₹ वरून मागे हटायला अजिबात तयार नव्हते.वास्तविक बाबांना जिथं जायचं होत तिथलं रिक्षा भाडे खरोखर ३०₹ होते..पण बाबा काही ऐकेना..!
मी त्या रिक्षावाल्याला बाजूला घेऊन म्हणालो..
" दादा, जाऊ द्या..२०₹ तर..२०₹ घ्या..! वाटल्यास वरचे १० ₹ मी देतो..! या जुन्या माणसांनी खूप कष्टांनी, पोटाला चिमटा घेऊन पैसा कमावलेला असतो,त्यामुळं ही माणसं सहसा पैसा सोडत नाही..!"
हे ऐकुन तो नेहमीचा परिचयाचा रिक्षावाला तयार झाला अन् आम्ही निघालो..!

रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार येत होता..की, जी वयस्कर माणसं असतात त्यांनी खूप कष्टाने व पोटाला चिमटा घेऊन पैसा कमावलेला असतो, त्यामुळं ही माणसं त्यांच्या गाठीशी असणारा पैसा सहसा सोडायला तयार होत नाही..अन् माझ्या पिढीतील उथळ मनोवृत्तीची तरुण माणसं या वयोवृद्धांना " कंजूस " म्हणून हेटाळणी करतो.आज मी काय किंवा माझी समकालीन मित्र मंडळी काय..आमच्या मुलांना तेवढे पैशाचे महत्त्व नाही..जेवढे आमच्या पिढीला आहे..! माझी अन् माझ्या पिढीतील माझ्या मित्रांची मुलं आम्हालाही कदाचित " कंजूस " नक्कीच म्हणतील यात तिळमात्र शंका नाही..! माणसाच्या आयुष्यात पैशाचे असेच अधःपतन होत राहील का..?
याला जबाबदार कोण असणार..?

हा प्रश्न मनात घेऊनच मी माझ्या थांब्यावर उतरलो.बाबांचा निरोप घेतला अन् म्हणालो..
" येऊ का बाबा..!"
बाबांनी माझ्या काहीश्या पांढऱ्या होत चाललेल्या दाढीच्या  केसांवर हात लावला अन् म्हणाले..
" ये ,भाऊ..दम्मानं जाय बरं का..!"
हा...बाबा..! तुम्ही पण....जपून जा..!"
माझ्या घराकडे जात असताना माझ्याही मनात विचार येत होता..
" खरंच औंदा कसं होईल..?"

वंदे मातरम्...!

लेखक व एक प्रवासी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वरील प्रसंग घडलेला दिनांक: १५ सप्टेंबर २०१८
स्थळ: फुलंब्री ते औरंगाबाद बस.

" गोल गोल फिरून पुन्हा तिथेच..! "

**चिंतन **

" गोल गोल फिरून पुन्हा तिथेच..! "
======================================

मी आज दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारनंतर सुट्टी असल्याने घरी निवांतपणे  " प्राचीन भारत प्रारंभ ते १२०० " या पुस्तकातील मधील काही प्रकरणे मुद्दामहून पुन्हा वाचली..!
(हे पुस्तक मी माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील काही विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी विकत घेतले होते)

त्यातून एकच निष्कर्ष काढला...
ज्यांनी ज्या पद्धतीने भले त्या राजांचे राज्य कीर्तिवंत होते तरी पण ते स्थापन करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष केला तेंव्हा कुठे ते बलाढ्य साम्राज्य उभे राहिले..!
पण.....
त्याच साम्राज्याची अखेर कित्येक पिढ्यानंतर त्याच रक्तरंजित घटनांनी होऊन तेच साम्राज्य लयाला गेले..! शेवटी जिथून निघाले तिथेच येऊन पोहचले..! नियतीने बरोबर गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले  होते तिथेच आणून सोडते..!

हेच निकष वेळोवेळी आधुनिक भारताच्या इतिहासात थेट आज पर्यंत देखील पाहायला मिळाले मिळत आहेत..! त्या..त्या घटनांकडे काहींनी निष्पक्षपणे पाहिले नाही किंवा हुजरेगिरी करण्याच्या मानसिकतेने त्या..त्या घटनांकडे मुद्दामहून डोळेझाक करण्यात आली..! पण नियतीने  संबंधितांचे निरीक्षण करण्यात अन् जिथून निघाले तिथे पुन्हा संबंधिताला आणून सोडण्यात कधीही कुचराई केली नाही अन् भविष्यात करणार देखील नाही..!

आजकाल किंवा प्राचीन काळात किंवा मध्ययुगीन काळात ज्या ज्या घटना रक्तरंजित किंवा कुणाला तरी त्रास देऊन स्थापन झाल्या किंवा निर्माण झाल्या, त्या सर्व मानवी घटकांना देखील नियतीने पुन्हा गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच आणून सोडले..! हा सत्य स्वरूपातील इतिहास आहे..!यावर ज्यांना कुणाला शंका येत असेल अशांनी आजकालच्या काळात अती दुर्मिळ होत चाललेल्या निवांतपणा याला प्राधान्य देऊन त्या त्या काळातील संदर्भ असलेले पुस्तकं शांत मनाने अन् सर्वात महत्त्वाचे निष्पक्षपणे वाचली तर हे सहज लक्षात येईल..!

माझे जन्मगाव पालखेड ता.वैजापूर येथे देखील अनेकांना असेच नियतीने असेच गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच आणून सोडले असे उदाहरणे माझ्या पिढीने पाहिले आहे अन् भविष्यात कदाचित त्याच नियतीच्या गर्भात  गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच येऊन नियातिसमोर सपशेल शरणागती पत्करली असे उदाहरणे होणार यात तिळमात्र शंका नाही..! हाच निकष इतरत्र सर्व क्षेत्रात  देखील लागू नक्की पडतो..!

कारण नियतीने  संबंधितांचे निरीक्षण करण्यात अन् जिथून निघाले तिथे पुन्हा संबंधिताला आणून सोडण्यात कधीही कुचराई केली नाही अन् भविष्यात करणार देखील नाही..!

ता.क.: नियती जगातील सर्वोत्कृष्ट गुरु आहे..सर्व सजीवांची..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १४ सप्टेंबर २०१९, शनिवार.

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

" घरगूती मैत्रीची माणसं..!"

                                                      **  आमचे गाव, आमची माणसं  **

                                                                " घरगूती मैत्रीची माणसं..!"







_________________________________________________
                                               
प्रेम,सहकार्य,जिव्हाळा ,विश्वास इ.उच्च कोटीची मूल्ये " मित्र " या नात्यात निसर्ग अलगदपणे पाठवून देत असतो..!अशी मूल्ये लाभलेली मित्र व मैत्री लाभणे हा निसर्गदत्त प्रसादच  म्हणावा..!
माझ्या बालमैत्रीतील शिरपेचातील कोंदणात ठेवावे असे हे दोन बालमित्र-डॉ.संजय राऊत व डॉ.गणेश वाणी( cap घातलेला)..!आज मी जो काही आहे,त्या माझ्या असण्यासाठीच्या आयुष्यात अनेक मित्रांपैकी या दोन मित्रांचे अमूल्य योगदान आहे..!
                                                   
डॉ.गणेश वाणी,हा  अतिशय शांत,संयमी व मेहनती मित्र..!आम्ही एकाच अभ्यासिकेत ( मातीच्या घरात) पालखेड येथे इ.५ वी ते १० पर्यंतचा खूप अभ्यास केला..!माझ्या आजपर्यंतच्या  कौटुंबिक आयुष्यात गणेशाचे खूप योगदान आहे.आमच्या सर्व मित्रांमध्ये आम्ही  समविचारी मित्र आहोत.विश्वास व हक्काने त्रास देणारी मैत्री आमची..!माझ्या पडत्या काळात गणेशने नेहमी दीपस्तंभ म्हणून भूमिका निभावली..!ज्यावेळी माझा पहिला मुलगा चि.नमन चा जन्म झाला त्यावेळी,केवळ मैत्रीखातर पालखेड हून माझ्या दूर असलेल्या सासुरवाडीला  मैत्रीपूर्ण  भेट देण्यासाठी धावत येणारा मित्र..!माझ्या आईची आजारपणात सेवा करणारा मित्र..!माझ्या वडिलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असणारा मित्र..! माझ्या तीर्थरूप वडिलांचे मित्र होणे सोपी गोष्ट नाही,हे त्यांचं स्वभाव ज्यांना माहीत आहे त्यांना चांगले माहित आहे,खूप तत्वनिष्ठ स्वभाव माझ्या वडिलांचा..! पण  विजू गायकवाड व डॉ.गणेश पा. वाणी यांना ते कसब जमले  आहे..! थोडक्यात आज मी,जो काही उभा आहे,त्या माझ्या उभा असण्याला खूप मोठे  निमित्त आहे..गणेश जगन्नाथराव पा. वाणी..!
                                   

 दुसरा अतिशय प्रिय मित्र डॉ.संजय राऊत..! औरंगाबाद येथे राहून कमवा व शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ब्रीद वाक्याचे सर्वोत्तम उदाहरण..! माझ्या या मित्राने किती खडतर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतले हे खूपच प्रेरणादायक आहे. संजू सोबतची मैत्री किती घट्ट आहे, हे सांगण्यासाठी एकच उदा.पुरेसे आहे.याच्या सोबतच मी माझे पहिले आणि अंतिम विवाहस्थळ पाहायला याच्या सोबत गेलो, तेंव्हा यानेच माझे लग्न जमविले,संजूच्याच हस्ते माझ्या लग्नाच्यारोजीचा " साखरपुडा " विधी पार पडला..!माझ्या कुटुंबातील एक सदस्य या अधिकारवाणीने समजून आजतागायत मला खूप खूप प्रेम,सहकार्य ,जिव्हाळा संजुकडून मिळालेला आहे..!माझ्या सुखी संसारात संजू ,एक भाग्यवान मित्र म्हणून आमच्या कुटुंबात सदैव असेल..! आम्ही दोघेही स्वयंसेवक आहोत..!

अशी ही बनवाबनवी या सर्वोत्तम मराठी चित्रपटातील जे एक मित्रांचे उदाहरण आहे,ते आमच्यासाठी याच माझ्या अतिशय जिवलग मित्राने डॉ.संजय राऊत याने माझ्यासाठी इ.स.१९९७ साली औरंगाबाद येथे केलेले आहे..!☺ त्यावर जर लेख लिहायचा असेल तर तो या माझ्या मित्राला विचारून नक्की वाचकांसाठी लिहिल..!

 या मित्राचा जनसंपर्क खूप दांडगा, त्यामुळे नेहमी,संजूच्यासोबत ,त्याच्या ओळखीच्या लग्न समारंभाला जाणे होते..!वास्तविक मला अजिबात निमंत्रण नसते..!पण केवळ मित्राच्या मैत्री खातिर जातो..! यात मला कधीच कमीपणा वाटला नाही आणि वाटणार देखील नाही...! विशेषकरून राजपूत समाजाच्या लग्नास गेलो की,शामभाऊ राजपूत,हमखास म्हणतात..." का,हो डॉक्टर,नंदन नाही आला का...?"  किंवा बरेच जन अंदाज लावतात की,ही व्यक्ती(मी) डॉ. राऊत सोबत आलेली आहे..!मी पण मग निमंत्रण नसलेला मान,सन्मान घेत,बऱ्याच विवाहसोहळ्यात मित्रासाठी स्वतःला मिरवत असतो..!

 असे आम्ही प्रिय बालमित्र  , व आमची घरगुती मैत्री..! मित्र व मैत्री जपणारी अनेक उदाहरणे आमच्या गावात होती अन् आहेत..!
       
वंदे मातरम्  
       
ता.क. - आज दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी आम्ही, पित्रा निमित्त चापून,चोपून कढी,खीर,वड्या रश्शीवर ताव मारला..!विशेष म्हणजे कढी मस्तपैकी गरम,गरम पिलो..!☺
                                                               
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १४ सप्टेंबर २०१७
स्थळ: लासूर स्टेशन

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

" स्री ही भावनेची शक्ती देवता आहे..! "

                                                                     ** चिंतन **

                                                     " स्री ही भावनेची  शक्ती देवता आहे..! "




चिंतन ©️

 " स्री ही भावनेची शक्ती देवता आहे..! "
=====================
                                                              
पूरूषांची पूरूषी अहंकाराची मानसिकता धोकादायक आहे.फक्त स्री नेच पूरूषांची सर्व कामे करावीत ही एककल्ली मानसिकता आहे.पूरूषांनीही आपली स्रीयांप्रती असणारी जबाबदारीही ओळखायला हवी.सेवा काय फक्त तीनेच करायची का? ही दोन चाके आहेत. एकमेकांना समजून,सहकार्य करणारी..!परंतू बऱ्याच पूरूषांचे पूरूषी अहंकाराचे एककल्ली धोरण या धोरणाला बाधक ठरू शकते.नव्हे नव्हे कित्येक पिढ्यांपासून पूरूषी अहंकारी मानसिकता आपल्या समाजात किड करून पोखरत आहे.आपल्या भारतातील ज्या..ज्या समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे त्यांनी त्यांच्या स्त्रीयांना बरोबरीची अन् सन्मानाची वागणूक दिली आहे.

जर एखाद्या स्रीने पूरूषाच्या आई वडिलांची सेवा,आदर केला तर अशा स्रिया सदासर्वकाळ वंदनीय आहेत.मात्र पूरूषांनीही त्या स्रीच्या आई वडीलांची काळजी,सेवा,आदर करायवाच हवा.

 काहीजण मी असेही पाहिलेले आहे,जे मोठ्या अभिमानाने सांगतात की, 
" मी इतक्या...इतक्या वर्षापासून सासुरवाडीला गेलो नाही..!"
" मी काहीही करायचं असलं की, माझ्या बायकोला अजिबात विचारत नाही..!"
इत्यादी....इत्यादी ..
मला हे कळत नाही की ,अशा पुरुषी अहंकाराच्या गप्पांमध्ये कुठला आला पुरुषार्थ..?
स्री म्हणजे काय फक्त भोग वस्तू आहे का..?

ह्या त्याच पुरुषी मानसिकता आहेत,ज्यांनी वर्षानुवर्षे महिलांना आपले बटिक करून ठेवलेले आहे.आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांच्या सिद्धांतानुसार आपण जेवढं एखाद्या तत्त्वाला दमन करू, तेवढा तिचा उद्रेक हमखास होत असतो. फक्त तो उद्रेक होण्याची माध्यम भिन्न..भिन्न असतात इतकेच..!आज आपण पाहिलं तर असे सहज लक्षात येईल की,अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचे प्रमाण महिलांचे जास्त आहे.त्याचे कारण हेच की,त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला या पुरुषी अहंकाराच्या मानसिकता अडसर ठरतात.काही धर्मात तर महिलांना इतकं काही नखशिखांत आचरणाच्या बाबतीत बंधनात ठेवलं आहे की किळस येते त्या धर्मांध मानसिकतेची..! त्यांना आपलं दुःख व्यक्त करायला अंधश्रध्दांचा सहारा देखील घेता येत नाही. किती मानसिक कुचंबणा होत असेल त्या माता भगिनींची..? निष्णात मानसशास्त्रज्ञाला देखील अशा अतिशय बंदिस्त स्त्रीयांवर उपचार करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे.

काही कमावत्या महिलांना तर त्यांच्या स्व कष्टाच्या कमाईवर सुध्दा अधिकार नसतो. आली कमाई...घेतली नवऱ्यानं ताब्यात..!त्या कमवित्या माता भगिनींचा अंडी देणारी कोंबडी म्हणूनच वापर होतो. प्रचंड घुसमट होत असते अशा कमवित्या महिलांची..!

भारतीय राजकारणात वेगवेगळ्या क्षेत्रातही महिलांना विविध पदांचे आरक्षण दिल्या गेले आहे.पण ज्या महिलांना ते विविध पदे जनतेने दिले आहेत,त्याच पदावर त्याच महिलांचे बहुतांशी पती किंवा इतर पुरुष नातेवाईक सतत लुडबुड करून त्या अधिकृत पदाधिकारी असलेल्या महिलांचे खच्चीकरण करत असतात. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही..तर बऱ्याचदा त्या महिलांचे अधिकृत राजकीय पद त्यांचे पती महाशय स्वतः च्या नावाच्या मागे पुढे लावायला सुध्दा स्वतः चा पुरुषार्थ समजून घेतात. काहीवेळा त्यांचे कार्यकर्ते देखील अशी महिलांची पदे त्याच महिलांच्या पतीच्या नावापुढे किंवा मागे लावून काय दाखवू इच्छितात हा मोठा प्रश्न आहे. ही आपल्या भारतीय राजकारणातील पुरुषांच्या अहंकाराची विकृती आहे. अन् यात नाहक मानसिक बळी ठरते महिला..! विशेष गंमत म्हणजे ज्या महिलांचे राजकीय पदे जे त्यांचे पती अनधिकृतरित्या ताब्यात घेतात तेच महिलांच्या स्वातंत्र्याच्या अन् त्यांच्या गौरवाच्या गप्पा मारतात. किती प्रचंड विरोधाभास आहे हा..! जे याला अपवाद आहेत ते वंदनीय आहेत.

किती पती या नात्यातील पुरुष आपल्या पत्नीला आपल्या जवळ मायेनं बसवून,तिच्याशी प्रेमानं,शृंगारिक शब्दात बोलतात..हा खूप चिंतनाचा विषय आहे. विधात्याने स्री असा एकमेव सजीव बनवलेला आहे की,ज्याला या भूतलावरील सर्व प्राण्यांमध्ये आपल्या कौतुकाची प्रचंड आस असते. लग्नापूर्वी किंवा फार तर पाहिलं लेकरू होई पर्यंत बहुतांशी पती ,आपल्या पत्नीचं पोटभरून कौतुक करत असतात. मात्र नंतर तो कौतुकाचा झरा आटत जातो. तो जसजसा आटत जातो तसतसा..दोघांमधील प्रेमळ नात्यात उरत राहतात ते फक्त आणि फक्त शुष्क नात्याच्या आटून गेलेल्या झऱ्यांचे अवशेष..! कधी..कधी हे भग्नावशेष इतकं भयानक रुप धारण करतात की, दोघांना विभक्त होण्यापर्यंत मजल मारावीच लागते.याला जे अपवाद आहेत ते वंदनीय आहेत.

माझ्या मते लग्न जुळताना एकमेकांची सहमती फार फार आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात कौटुंबिक अपघात होत नाहीत किंवा रोखता येतात. स्री आणि पुरुष यांच्या नात्यात काही बाबतीत पारदर्शकता असायलाच हवी.जसे की लग्नापूर्वी स्थळ जुळविण्यापूर्वी..! पण नेमके आपल्या बऱ्याचश्या भागात अजूनही फक्त पुरुषांचा होकार यालाच महत्त्व दिले जाते अन् मग त्या दोघांच्या लग्नानंतरच्या आयुष्यात मराठी चित्रपट 
" दुनियादारी " मधील एका प्रसंगाची वास्तविकता सहजपणे लक्षात येते. समाजमान्य व आपापल्या इष्ट धार्मिक आराध्यांच्या साक्षीने झालेल्या लग्नानंतर नवऱ्याकडून त्याच्या पत्नीवर बलात्कार होत असतात. एका पतीचा...त्याच्या पत्नीवर...!एका स्त्रीच्या अनिच्छेने दुसऱ्या पुरुषाशी झालेल्या लग्नानंतर होणारे शारीरिक संबंध हे समाजमान्य बलात्कारच ठरतात. येथे बलात्काराची व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. बलात्कार म्हणजे मनाच्या अनिच्छेने होणारा शारीरिक संबंध होय.मन येथे सर्वोच्च ठरते. थोड परखड पण हे कटू सामाजिक सत्य आहे..काहींच्या बाबतीत..! या आशयाचा दुनियादारी चित्रपटात खूप सुंदर अन् भावूक संवाद वर्षा उसगावकर यांच्या तोंडी आहे,त्या जेंव्हा त्यांच्या मुलासमोर स्वप्नील जोशी समोर असेच काहीतरी व्यक्त करतात.त्यावेळी पुरुषांच्या अहंकाराची अन् स्री ला दुय्यम स्थान दिल्याची नकळतपणे जाणीव अन् तिची होणारी घुसमट जाणवते.थोर लेखक सुहास शिरवळकर लिखित दुनियादारी कादंबरीवर आधारित दुनियादारी हा चित्रपट बऱ्याच प्रसंगात स्री जातीच्या व्यथा व्यक्त करतो.

कोणत्याही स्री.. ला फक्त नोकरी करणारा किंवा खूप पैसेवाला पती असून चालत नाही,तर तो कोणत्याही प्रकारचा बलात्कार करणारा नसावा यावर ती स्री अपेक्षा ठेवून असते. बलात्कार हा फक्त शारीरिक संबंधानेच होतो असे कदापि नसते.तर.... बलात्काराच्या व्याख्या व त्यांचे स्वरूप खूप व्यापक आहे.जेंव्हा एखादा पुरुष ,त्याच्या पत्नीवर त्रास ठरणारा प्रकार करतो,त्यावेळी ती महिला ,केवळ आपला पती आहे म्हणून ते निमूटपणे सहन करत आलेली आहे अन् भविष्यात देखील हेच होत राहणार. उदाहरणार्थ विविध प्रकारचे भयंकर धूम्रपान करून स्री शी संपर्क ठेवणे इत्यादी.

स्री..ही भावनेची शक्ती देवता आहे. मग ती कोणत्याही नात्यात असो..! तिला फक्त हवी असती भावना अन् शक्ती..! अशा कित्येक माता,भगिनींनी आपल्या मुलांबरोबर , पती बरोबर अजुन इतर नात्यांबरोबर खूप आत्मियतेनं पवित्र भावनिक नाते निर्माण करून इतिहासात शक्तीरुपाने अजरामर झालेल्या आहेत.

राजेश खन्ना व स्मिता पाटील अभिनित " अमृत " नावाचा एक माझा आवडता नितांतसुंदर हिंदी चित्रपट आहे.ज्यात दोघेही वयोवृध्द असतात.दोघांचे वेगवेगळे कुटुंब असते. दोघांमध्ये कोणतेही नाते नसते.दोघांनाही त्यांच्या घरातील मुलांकडून , सूनांकडून हीन वागणूक दिली जाते.आणि...मग तेच दोन वयोवृध्द एक स्त्री अन् एक पुरुष एकत्र येतात,जेंव्हा..जेंव्हा भेट होईल तेंव्हा तेंव्हा आपल्या होणाऱ्या मानसिक कुचंबणांच्या भावनांना वाट मोकळी करून देतात.दोघांमध्ये कोणतेच नाते नसते. असतो फक्त भावनिक ऋणानुबंध..! जो त्यांना आपल्या घरातून मिळत नाही,आणि मग जिथे हा मायेचा भावनिक ऋणानुबंध मिळतो, तिथे बहरते...एका पुरुषाने एका स्रीला समजून घेण्याच्या नात्यातील सर्वांगसुंदर संजीवन नात्याची कथा..! 

थोडक्यात जिथं मन हलकं करून कुणीतरी आपल्या मनातील भावना व्यक्त करत तेच खरं नातं..! याच आशयाचा अमृत हा खूप सुंदर चित्रपट आहे. वास्तविक जीवनात देखील अशी बरीच नाती असतात. चित्रपट हे समाजप्रबोधनाचे अन् समाजातील वास्तविकता दाखविणारे सर्वात प्रभावी प्रसार मध्यम आहे.

वरील उल्लेखित नात्यातील मर्म भावनिक दृष्ट्या समजून घ्यायची कुणाची इच्छा असेल तर " अमृत " हा चित्रपट पहा.

विधात्याने ज्यावेळी पुरुष आणि स्त्रीला निर्माण केले त्यावेळी नैसर्गिकरीत्या जबाबदारीची जाणीव अन् भावनिक ओलावा पुरुषाच्या तुलनेत स्रीच्या पारड्यात जास्त प्रमाणात दिला.त्यातल्या त्यात ज्यावेळी माणसांच्या नात्यांची गुंफण सुरू झाली त्यावेळी जी नाती निर्माण झाली त्यात सर्वोच्च नाते ठरले आईचे..! विवाहित पुरुष अन् स्री ज्यावेळी भावी आयुष्यासाठी शारीरिक संबंधाने एकत्र येतात त्यावेळी पुरुष हा बऱ्याच प्रमाणात वासनेच्या डोहात बुडून गेलेला असतो, मात्र त्याचवेळी स्री आपल्या गर्भात भविष्यात वाढणाऱ्या नवीन जीवाच्या स्वागतासाठी आतुरलेली असते. वासना आणि शारीरिक समर्पण यात बळाचा जन्म झाल्यावर विजय होतो तो मातृत्वाचा..! आपल्या गर्भात वाढविलेल्या आपल्याच रक्ताच्या गोळ्याला भावनिक आकार अन् उद्धार करण्याची ईश्वरीय जबाबदारी बाळाच्या जन्मानंतर मातृत्व लाभलेली स्री पूर्णार्थाने पूर्ण करते.

बहुतांशी स्रीयांच्या आयुष्याचा देव्हारा खूप मोठा आहे. काही पुरुष त्या देव्हाऱ्याचे भक्त आहेत.


ता.क: स्री ही भावनेची शक्ती देवता आहे..!

वंदे मातरम् 

लेखक - नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: १३ सप्टेंबर २०१६