आमचे गाव आमची माणसं ©️
" श्रध्येय, रायभान बाबा त्रिभुवन..! "
=============================
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात अशी काही माणसं येऊन जातात, की त्यांच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्याच्या पुढील आयुष्यासाठी सुखकर होऊन जाते. अशा येणाऱ्या माणसांमध्ये कुणी शिक्षक म्हणून येतं,तर कुणी मित्र म्हणून येतं तर कुणी पालक म्हणून येतं..! प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणाऱ्या या सगळ्यांचं येणं भिन्न भिन्न कारणाने असतं, मात्र ही येणारी माणसं त्या विद्यार्थांना आपल्या आयुष्यात खूप काही देऊन जातात.
आमच्या पालखेड गावातील जवळ जवळ दीड तप,म्हणजे जवळ जवळ सतरा अठरा वर्षे कालखंडातील एका पिढीतील ' काहीजण ' आपल्या आयुष्यात शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक इत्यादी अनेक क्षेत्रात यशस्वी झाली. त्यातल्या त्यात शैक्षणिक अर्हता मिळवून या कालखंडातील पिढीला आपल्या आयुष्यात जे स्थैर्य प्राप्त झाले,त्यामागे त्या कालखंडातील पिढीचे पालक, शाळेतील शिक्षक , शाळेतील मित्र इत्यादी नक्कीच कारणीभूत होते यात तिळमात्र शंका नाही. पण या सर्वांच्या वर श्रेष्ठ असणारा एक अढळ ध्रुव तारा होता, ज्यांच्या सानिध्यामुळे आमच्या पालखेड गावातील जवळ जवळ दीड तप कालखंडातील एक पिढी सतत तेजोमय होत राहिली.
आमचे ते शिक्षक होते का..?
आमचे ते मित्र होते का..?
आमचे ते पालक होते का..?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही काही विद्यार्थी तरी आजही हमखास देऊ शकतो..!
अढळ ध्रुव ताऱ्या सारख्या महान माणसाचे आमच्या आयुष्यात स्थान हे, शिक्षक, मित्र अन् पालक यांचं अतिशय सुंदर मिश्रण असलेलं नातं होतं . त्या नात्याला आम्ही प्रेमानं अन् अतिशय आदराने नाव दिले होते, आदरणीय रायभान बाबा..! उपाख्य रायभान त्रिभुवन सर..!!
कोण होते स्वर्गीय रायभान बाबा त्रिभुवन..?
आम्हा काही मित्रांसाठी रायभान बाबा त्रिभुवन आयुष्यात भेटलेले सर्वोत्तम शिक्षक होते. त्यांचं अध्यापन करणं , आदरणीय भगत सरांची आठवण करून द्यायचं..! रायभान बाबा त्रिभुवन आमच्या काळात अधिकृत शाळेतील शिक्षक नव्हते,पण शिकवणी वर्गात शिकवत असताना अधिकृत शाळेचं स्मरण, विस्मरणात न्यायला नक्कीच भाग पाडणारं त्यांचं अध्यापन असायचं..! इतकं समरसून अन् आत्मियतेनं अध्यापन करणारं थोर व्यक्तिमत्व लाभले, म्हणून आम्ही मित्र, आपापल्या आयुष्यात शिक्षण घेऊन स्थैर्य प्राप्त करू शकलो हे शाश्वत सत्य आहे.
आदरणीय रायभान बाबा अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. अतिशय गरीब कुटुंबातील माणूस, पण आपल्या विद्वत्तेने आपल्या आयुष्यात विद्वत्तेचा कुबेर असलेला हा महान माणूस कौटुंबिक आयुष्यात आर्थिकदृष्ट्या खूप गरीब होता. आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन आमच्या पालखेड गावात ऐंशीच्या दशकात अन् नव्वदच्या दशकातील काही कालखंडात नसते तर....?
पालखेड मधील जवळ जवळ दीड तप कालखंडाच्या पिढीतील काही तरुण अन् तरुणी शैक्षणिक क्षेत्रात खूप मागे पडली असती. पालखेड गावातील ऐंशीच्या दशकात अन् नव्वदच्या दशकात जी जी तरुण मुलं शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात स्थिर झाली, त्यात आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात यात वंदनीय जी. एम. भगत सरांचे देखील खूप मोठे योगदान नक्कीच होते. विशेष म्हणजे ही दोन्ही महान माणसं, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर परम श्रद्धा बाळगून होते..!🙏🏻
रायभान बाबा त्रिभुवन..!
आमच्या पालखेड गावात ऐंशी अन् नव्वदच्या दशकात एकमेव एकखांबी शिकवणी वर्ग सुरू होता. ते शिकवणी वर्ग सुरू केले होते, आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन यांनी. रायभान बाबा त्रिभुवन यांना ' बाबा ' हे उपाख्य नामकरण का पडले माहीत नाही. आमच्या अगोदरचे विद्यार्थी मित्र अन् रायभान त्रिभुवन यांचे समवयस्क मित्र त्यांना बाबा म्हणत,म्हणून सगळं गाव त्यांना ' रायभान बाबा ' याच नावाने उल्लेखित करू लागले.
आदरणीय रायभान बाबा अगदी पहाटेच उठून सगळं आवरून शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी तयार असायचे.अफाट बुद्धिमत्तेचा शिक्षक आदरणीय रायभान बाबा होते. पण बऱ्याचदा आपण बघतो जिथं विद्वत्ता असते,तिथं आर्थिक स्थैर्य रुसून विद्वत्तेचा अपमान करत असते. आदरणीय रायभान बाबा आम्हा विद्यार्थ्यांकडून शिकवणी वर्गाचे प्रति माह २०₹ घ्यायचे. काळाच्या ओघात त्यात सत्तर ऐंशी रुपये पर्यंतच वाढ होत गेली. त्यात पण जी मुलं आर्थिक बाबतीत कमकुवत होती, त्यांच्याकडून रायभान बाबा पैसे घेत नसायचे.
आदरणीय रायभान बाबा सकाळी साधारणत: सात वाजता शिकवायला सुरुवात करायचे.शिकविण्यात खूप प्रगल्भता अन् ओघावतेपणा असायचा. त्याकाळी आमच्या पालखेड गावात आदरणीय रायभान बाबा यांचे शिकवणी वर्गाच्या जागा अधून मधून बदलत असायच्या. ज्या ज्या ठिकाणी शिकवणी वर्ग सुरू असायचे ती घरे निव्वळ मातीची असायची. शिकवणी वर्ग प्रामुख्याने माझ्या आजोबांचे मित्र स्व.कारभारी काका देवराव पा. जाधव, गावातील तत्कालीन पिठाची गिरणी दुकानदार आण्णाभाऊ वडाळे,माझा प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के या सर्वांच्या घराच्या बाजूला असलेली खोलीत सुरू असायचे. या शिकवणी वर्गाला आमच्या वर्गातील बाहेरगावाहून देखील आमचे मित्र यायचे.त्यात प्रामुख्याने संजय उगले, अशोक उगले दहेगावकर , हंसराज भुजाडे कनकसागज आणि इतर काहीजण. आम्हा सर्व वर्गमित्रांचे ध्येय एकच होते अन् ते म्हणजे शिक्षण..!
आदरणीय स्व. रायभान बाबा यांनी जे शिक्षण आम्हा विद्यार्थ्यांना दिले, आज त्याचेच फळ आहे की, आम्ही काही वर्गमित्र आपापल्या आयुष्यात शिक्षण घेऊन समाधानी नक्कीच आहोत.
ज्यावेळी आदरणीय रायभान बाबा यांचं लग्न जमलं त्यावेळी त्यांनी माझ्या तीर्थरूप स्व.वडिलांना लग्नाचे आवर्जून निमंत्रण दिले होते. ते ज्यावेळी निमंत्रण द्यायला घरी आले होते त्यावेळी आमच्या पालखेड येथील तत्कालीन छोट्याश्या घरात आदरणीय रायभान बाबा यांचे स्वतः माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मनोभावे पूजन करून त्यांना नारळ ,टोपी अन् रुमाल दिला होता. आजही तो प्रसंग माझ्या नजरेत अन् स्मरणात आहे. माझ्या आयुष्यात मी, माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना एकमेव त्याच वेळी गावातील कुणा एखाद्या भावी वर असणाऱ्या तरुणाला स्वतः ओवाळतांना पाहिले होते. माझ्या मते त्याचं एकमेव कारण असावं, आदरणीय रायभान बाबा यांचं गावातील पौगंडावस्थेतील मुलांच्या शिक्षणासाठी झोकून देणे असावे. तसेच अतिशय गरीब परिस्थितीतून माझ्या वडिलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका अंतर्गत स्वतः ला सिद्ध केले होते .हाच सामाजिक जाणिवेचा धागा या दोघांना एकमेकांच्या सन्मानासाठी जवळ करत होता.
आदरणीय रायभान बाबा यांचं लग्न नव्वदच्या दशकात जि.प.प्रशाला लासुर स्टेशन , ता गंगापूर येथील मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानात होते.मी स्वतः आदरणीय रायभान बाबा यांच्या सोबत एक जवळचा प्रेमळ वऱ्हाडी म्हणून लासूर स्टेशन येथे मुक्कामी गेलो होतो. मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत अधून मधून माझ्या दोन्ही मुलांना सदरील ठिकाणी घेऊन जायचो अन् आदरणीय रायभान बाबा यांचं माझ्या अन् माझ्या काही मित्रांच्या आयुष्यातील मौल्यवान अस्तित्वा विषयी तिथं निवांत बसून सांगायचो.तिथं झालेल्या आदरणीय रायभान बाबा यांच्या लग्नाच्या आठवणी देखील सांगायचो..! माझ्या दृष्टीने हे सुध्दा एक पर्यटनच असायचे.फक्त या पर्यटनात माझ्या आयुष्यातील एका महान गुरूच्या म्हणजेच आदरणीय रायभान बाबा यांच्या आठवणींचा गहिवर असायचा.
आदरणीय स्व.रायभान बाबा आज हयातीत नाही,पण त्यांनी आम्हा मित्रांना शिक्षणाचे जे बाळकडू दिले आहे, ते संजीवन अमृताचे थेंब होऊन आमच्या हयातीत असे पर्यंत अमरत्व प्राप्त करून राहतील यात तिळमात्र शंका नाहीच..!
नियती ज्यावेळी आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला आपल्यातून कायमचे हिरावून घेते त्यावेळी अशी व्यक्ती निसर्गाच्या सान्निध्यात कुठेतरी कोणत्यातरी अस्तित्वाच्या स्वरूपात नक्कीच असते असे मला वाटते.माझ्या वैयक्तिक आयुष्यातील ज्या ज्या अतिशय मौल्यवान व्यक्तींनी या इहलोकातून कायमचा निरोप घेतला आहे ती मोजकी माणसं, आजही आपल्या आसपासच विविध आठवणीच्या रूपाने सजीव आहेत..!🙏🏻
आदरणीय स्व. रायभान बाबा, तुम्ही जिथं कुठे असाल तिथं तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांची नक्कीच आठवण करत असणार ही खात्री वाटते.
आदरणीय स्व. रायभान बाबा आपणास आम्हा काही वर्गमित्रांकडून नम्रपुर्वक जय भीम..!🙏🏻🌹
वंदे मातरम्..!
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
फोटो स्रोत - डॉ. बाबासाहेब त्रिभुवन
दिनांक - २७/११/२०२१,शनिवार.
