बाई, रंगभूमीला पोरक्या करून गेल्या..!😔
=====================
अख्ख्या भारतात कुठेही नसेल एवढं महान कार्य मराठी माणसांनी नाट्य साहित्य, नाट्य साहित्यिक, नाट्य कलाकार अन् त्या नाट्य कलेला उंच शिखरावर नेण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे.विशेष म्हणजे अख्ख्या भारतात कुठेही नसेल एवढी समृद्ध नाट्य परंपरा याच आपल्या महाराष्ट्रात भरभराटीला आली.
नाट्य कलेला उंच शिखरावर नेण्यात अनेकांनी आपले आयुष्य वेचले. त्या अनेकातील एक थोर नाट्य दिग्दर्शिका वंदनीय विजया मेहता यांचे निधन झाले अन् रसिकजन पोरके झाले.
मला कधी कधी प्रश्न पडतो की, आपल्या मराठी नाट्यसृष्टीत थोर लेखक विजय तेंडुलकर सर, Dr.श्रीराम लागू , निळू भाऊ फुले आणि विजया मेहता यांच्या सारखे अस्सल सारस्वत जर जन्माला आले नसते तर....
कदाचित आज आपण बघतोय एवढी प्रगल्भ प्रतिभा असलेली नाट्य संस्कृती बहरलीच नसती.मी उपरोक्त नाट्य सारस्वतांचा उल्लेख केला आहे. व्यक्तिपरत्वे रसिकांच्या आवडीनिवडी भिन्न भिन्न असून त्यात अजून इतर मान्यवरांची नावे श्रेष्ठत्वांच्या यादीत येऊ शकतात. विजया मेहता यांना सन्मानाने अन् आदरयुक्त ' बाई ' हे नाव दिले तेही थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी..! विजया मेहता तहहयात त्यांच्या कित्येक शिष्यांसाठी ' बाई ' म्हणूनच जगल्या..! आपण मराठी माणसं बाई मध्ये आई शोधणारी रसिक अन् तरल मनाची माणसं आहोत.थोर लेखक विजय तेंडुलकर सर यांनी विजया मेहता यांच्यातील नाट्य कलेच्या बाबतीतील ममत्व जाणले अन् विजया मेहता या ' बाई ' म्हणून अजरामर झाल्या.
आपली बंद पडलेली झापडं ,प्रखर साहित्य कृतीतून प्रस्तुत करणारे लेखक विजय तेंडुलकर सर..! त्याच विजय तेंडुलकरांच्या सोबत विजया मेहता यांनी नाट्य क्षेत्राला अजरामर केले आहे.विजया खोटे यांना वयाच्या फक्त तिशीच्या नंतर आलेले विधवापण, मात्र त्याला आपली कमजोरी न होऊ देता , त्या विजया मेहता झाल्या आणि उंचच उंच भरारी घेत राहिल्या.नाना पाटेकर यांच्यावर विजया बाईं पुत्रवत प्रेम करत राहिल्या.विजया बाईं नसत्या तर नाना पाटेकर अभिनेते झाले असते का..? मला तरी खात्रीने वाटते , अजिबात नाही..! विजया बाईंच्या निधनानंतर नाना पाटेकर अत्यंत दुःखी झाले असतील याची मला पूर्णतः खात्री आहे. अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील असलेल्या नाना पाटेकर यांना अभिनयाचे धडे दिले ते विजया बाईं यांनीच..!
एकदा एका कार्यक्रमात नाना पाटेकर मंचावर आपले विचार व्यक्त करत असतात.इतक्यात प्रेक्षकात वयाने थकलेले विजय तेंडुलकर सर नानांच्या नजरेस पडतात.नाना पाटेकर बोलणे थांबवतात.अतिशय सन्मानाने विजय तेंडुलकर सर यांना मंचावर घेऊन येतात.ज्यावेळी खुर्चीत बसून विजय तेंडुलकर सर आपले मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतात, त्यावेळी नाना पाटेकर त्याच मंचावर मांडी घालून तल्लीनतेने शब्द प्रभू विजय तेंडुलकरांना ऐकतात..! आपण मोठे अभिनेते झालो आहोत हा तिळमात्र अहंकार न येऊ देता नाना पाटेकर विजय तेंडुलकर सारख्या सारस्वताला श्रध्येने ऐकत अन् बघत राहतात.नाना पाटेकर यांच्या त्या संस्कारात विजया बाईं यांच्या संस्काराची शिकवण दिसून आली होती.ही माणसं असामान्य होती अन् आहेत म्हणून ही माणसं सामान्यपणे जगत राहिली अन् जगत आहे..!
कला ,कलाकार एक आयुष्य घेऊन या भूतलावर आपले आयुष्य जगत असतात.त्या कलाकारांचे ग्लॅमर लाभलेले आयुष्य आपल्याला वरपांगी दिसत असते.मात्र त्या कलाकारांच्याही आयुष्यात कुठेतरी वेदना , दुःख असते.फक्त ते कलाकार ती वेदना अन् दुःख उघडपणे व्यक्त करत नाहीत.दादा कोंडके यांच्या आयुष्यावर असलेले ' एकटा जीव ' आणि विजया बाईं मेहता यांचे आत्मचरित्र ' झिम्मा ' जर वाचले तर कलेच्या क्षेत्रात कमालीचे कौतुक लाभलेल्या कलाकारांच्या वेदना आणि दुःख काय असतात याची उपरोक्त दोन्ही पुस्तके वाचताना जाणीव होते. विजया बाईं मेहता यांचे आत्मचरित्र झिम्मा वाचताना तर काही वेळा डोळे पाणावतात.हा माझा स्वानुभव आहे..!
असो,नाट्य क्षेत्रातील महान सारस्वत, कित्येकांना पुत्रवत जीव लावणाऱ्या,खंबीर, प्रगल्भ आणि ममत्त्वरूपी बाई, स्वाभिमानी स्त्रीत्वाचे उदाहरण विजया बाईं मेहता यांचे दिनांक ३०/६/२०२६ रोजी निधन झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
वंदे मातरम्
एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - १ जुलै २०२६, बुधवार
