शुक्रवार, २७ मार्च, २०२६

" सारस्वतांचे आम्ही भक्त रसिक...!"


 


#आमचे गाव आमची माणसं ©️


" सारस्वतांचे आम्ही भक्त रसिक...!"


=========================


रसिक नसलेलं मन , एखाद्या वाळवंटातील काटेरी झुडपा सारखं असतं.रसिक असलेलं मन, कलाकृतींना आपल्या मनाला सतत प्रफुल्लित ठेवण्यासाठी एखाद्या औषधा सारखं उपयोगात नेहमी आणत असतं.ज्याला मन अन् ज्या मनाला भावना असतात अशांनीच रसिकांची रसिकता जपलेली आहे. रसिक असलेलं मन नटरंग देवतेची पाठराखण करत असते, कारण रसिक मनाला पुरेपूर ठाऊक असते की, मनाच्या आजारावरील सर्वोत्तम औषध कोणते असेल तर ते याच नटरंग देवतेच्या चरणी समर्पित केलेली कला आहे.याच कलेच्या गाभाऱ्यात सारस्वत अन् त्याचे भक्त रसिक आनंदात जगत असतात.


माझे जन्मगाव पालखेड ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर या गावाला जवळ जवळ शंभर वर्षांची नाट्य परंपरा आहे. मला जेंव्हा पासून समज आली तेंव्हा पासून दरवर्षी पालखेड गावातील पारेश्वर महादेवाच्या कार्तिकी यात्रेतील काही नाटकं अन् त्यातील नाट्य कलाकार कायमचे हृदयात स्थान मिळवून आहेत.माझ्या मते आमच्या पालखेड गावात सादर केलेल्या सर्वोत्तम अभिनयाच्या भूमिका अन् ती सादर केलेले पालखेडकर नाट्य कलाकार पुढीप्रमाणे..


क्रम : नाटक – भूमिका – नाट्य कलाकार 


नाटक – संत तुकाराम , 

भूमिका – संत तुकाराम महाराज,

नाट्य कलाकार –आदरणीय माणिक भाऊ मोकाटे ,


नाटक –राक्षशी लालसा , 

भूमिका – राजा शशांक , 

नाट्य कलाकार – आदरणीय निवृत्ती काका कुमावत,


नाटक – मानी मराठा , 

भूमिका –छत्रपती संभाजी महाराज , 

नाट्य कलाकार –आदरणीय नवनाथ काका गायकवाड ( निवृत मुख्याध्यापक ) , 


नाटक – मानी मराठा, 

भूमिका –औरंगजेब , 

नाट्य कलाकार – स्व.भानुदास भाऊ शिंदे, 


नाटक – मानी मराठा,

भूमिका – गणोजी शिर्के , 

नाट्य कलाकार – स्व.रामकृष्ण रोठे,


नाटक – एकच प्याला , 

भूमिका – सुधाकर , 

नाट्य कलाकार – आदरणीय तुळशीदास मुलमुले, 


नाटक – एकच प्याला ,

भूमिका – सिंधू ,

नाट्य कलाकार – आदरणीय अशोक वाणी,


नाटक – संगीत शारदा,

भूमिका – शारदा

नाट्य कलाकार –आदरणीय स्व. नंदलाल भाऊ जैन, आदरणीय रमेश भाऊ जैन आणि आदरणीय जगन्नाथ भाऊ निकम,


नाटक – विच्छा माझी पुरी

नाट्य कलाकार- नारायण रोठे ( टेलर ),


तसेच माझ्या पिढीच्या अगोदर जी सर्वोत्तम मराठी नाटकं अन् त्यातील सर्वोत्तम नाट्य कलाकार आमच्या पालखेड गावात होऊन गेलेले आहेत ते गावातील वडीलधाऱ्या माणसांकडून त्या विषयी नेहमी ऐकलं आहे.त्यात प्रामुख्याने....


नाटक – तंट्या भिल ,

भूमिका – आदरणीय ऋषीपाठक गुरु,/ स्व.खांडेकर सर ( राजू भाऊ गिरजीनाथ शेळके सर यांचे नातेवाईक ),


नाटक – संगीत सौभद्र / संगीत शारदा ,

नाट्य कलाकार – स्व.आदरणीय नंदलाल भाऊ जैन आणि स्व. आदरणीय राजाभाऊ नाना जैन 


पालखेड गावातील शास्त्रीय संगीत नाटकांना दिग्दर्शित करण्यासाठी माझ्या पाहण्यात आलेले दोन दिग्दर्शक होते ते म्हणजे स्व.आदरणीय एकनाथ नाना पगार अन् स्व. आदरणीय एकनाथ आण्णा वाणी होय.


तसेच गावातील पूर्वीच्या काळी जी संगीत प्रधान शास्त्रीय संगीताची नाटकं सादर करण्यात आली होती त्याला हार्मोनियमची साथ माझे सख्खे आजोबा स्व.चंपतराव जाधव, अन् तबला साथ माझे चुलत आजोबा स्व.नागोराव जाधव यांनी सर्वोत्तम साथ दिली होती. त्या शास्त्रीय उंचीची साथ अद्याप पर्यंत पालखेड गावात कुणालाही देता आली नाही हे गावातील जुने जाणते नागरिक आवर्जून सांगतात.


विशेष नाटकांची विशेष आवड असली की विशेष काहीतरी बघावं वाटतं छत्रपती संभाजीनगर शहरातील नाट्यगृहात अनेक विशेष नाटकं बघितली.कधी पालखेड येथून मित्रांच्या सोबत येऊन तर कधी लासूर स्टेशन येथून येऊन तर कधी छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर बरीच मराठी नाटकं एकट्याने न बघता सह परिवार बघितली आहेत.या सर्व बघितलेल्या सर्व नाटकांपैकी चार नाटकं विशेष आवडली ती पुढीलप्रमाणे -


हॅम्लेट ( मराठी नाटक ) ,


ऑल द बेस्ट ( मराठी नाटक ) ,


देवबाभळी, 


चौथे नाटक आहे..

शरद पोंक्षे अभिनित मी नथुराम गोडसे बोलतोय.छत्रपती संभाजीनगर येथे ’ मी नथुराम गोडसे बोलतोय ’ हे नाटक बघण्यासाठी पालखेड येथून चार चाकी जीप वाहन करून आलेल्या गावकरी मित्रांच्या सोबत सदरील नाटक बघितलेले आहे.


हरिभाऊ वडगावकर लिखित ' गाढवाचं लग्न ' हे वगनाट्य मी व माझ्या काही बालमित्रांनी माध्यमिक वयोगटात असताना आमच्याच पालखेड गावातील श्री. पारेश्वर महादेव मंदिर गल्लीतील स्व. उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये टेप रेकॉर्डरवर कित्येकदा ऐकलं आहे.शाळा सुटली की चार वाजेनंतर बऱ्याचदा उत्तम काका निकम यांच्या हॉटेल मध्ये बसून दादू इंदूरीकर यांचं ' गाढवाचं लग्न ' टेप रेकॉर्डर वर ऐकलं आहे. आदरणीय स्व. उत्तम काका निकम यांचे चिरंजीव विलास निकम ( ह.मु. छत्रपती संभाजीनगर) हा आमचा प्रिय मित्र होता अन् आहे.त्या मैत्रीच्या नात्यातून अन् मुळात विकास निकम यालाही दादू इंदूरीकर यांचं गाढवाचं लग्न ऐकायला जाम आवडायचं,त्यामुळं आम्ही काही रसिक मित्र मंडळी उठल्या पडल्या विलास निकम यांच्या हॉटेल मध्ये सदरील वगनाट्य अगदी तल्लीन होऊन ऐकलेलं आहे. वगसम्राट दादू इंदूरीकर यांच्या विशिष्ट अशा संवादाच्या प्रेमात मी पौगंडावस्थेतील वयोगटापासून ते आजतागायत आहे. गाढवाचं लग्न या वगनाट्यात दादू इंदूरीकर यांनी जी ' सावळ्या कुंभाराची ' व्यक्तिरेखा साकारली आहे त्या उंचीची व्यक्तिरेखा अद्याप पर्यंत कोणत्याही अभिनेत्याला साकारता आली नाही.मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांनी गाढवाचं लग्न अन् त्यातील सावळा कुंभार सादर केला,पण दादू इंदूरीकरांच्या अचूक संवादाच्या टायमिंगची कमाल यांना साधता आलीच नाही.माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील दादू इंदूरीकर म्हणून गोविंदा यांनाच ओळखल्या जाऊ शकते. त्याचं कारण, दोघांच्याही विनोदी संवादाची अचूक फेक सर्वोत्तम ठरली.


मी माध्यमिक वयोगटात असताना ' घाशीराम ड्रायव्हर ' या नाटकाची टेप रेकॉर्डर वरील ऑडियो कॅसेट पालखेड येथील आमच्याच गल्लीतील आदरणीय राजू आप्पा जैन यांच्या घराच्या बाजूला असलेल्या घरात ऐकलेली आहे.राजू आप्पा जैन याच्या घराच्या बाजूला जे घर होते त्याला आम्ही त्याकाळी ' गोठा ' असे म्हणत असे.संवाद काहीसे आचरट होते, पण रसिकतेने भान असल्याने त्याचा आनंद फक्त एक रसिक म्हणून घेतला होता.


चित्रपटात देखील काही नाट्य रसिकता दाखवल्या गेलेली आहे. नाटक वेड्या तरुणाची कथा असलेला एन. चंद्रा दिग्दर्शित अन् नाना पाटेकर अभिनित ' वजुद ' नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेलेला आहे.नाना पाटेकर यांनी यात मल्हार नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट मध्यांतर पर्यंत खूप छान होता,पण मध्यांतर नंतर पूर्णपणे भरकटून गेला.मात्र याच चित्रपटाच्या अगदी शेवटी ,मल्हार नावाच्या व्यक्तिरेखेने नाटकाच्या मंचावर अप्रतिम असे स्वगत सादर केले होते.असे स्वगत माझ्या मते अद्याप पर्यंत कोणत्याही चित्रपटात ,कोणत्याही अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने सादर केलेले नाही.एका नाटक वेड्या तरुणाची एकतर्फी प्रेमापोटी, अभिनयाच्या वेडा पोटी होणारी मनाची होरपळ वजुद चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे.बहुदा मध्यांतराच्या नंतर पटकथेत गडबड झाल्याने आपण एका खूप सुंदर चित्रपटाला मुकलो असे मला एक रसिक म्हणून आजही वाटते.रंगभूमीसाठी अन् अभिनयासाठी एखादा अभिनेता किती आसुसलेला असतो याचं खूप छान चित्रण वजुद चित्रपटात आहे.


पालखेड गावातल्या रसिक आठवणी खूप आहेत.त्यातली एक गमतीशीर आठवण थोडक्यात पुढीलप्रमाणे होय.

राक्षसी लालसा नाटक जेवढ्या वेळी पालखेड येथे एकाच नाटक पार्टीकडून सादर केल्या गेले तेवढे इतर कोणतेच नाटक पुन्हा पुन्हा सादर केल्या गेले नाही.राक्षसी लालसा हे नाटक एवढ्या वेळी पुन्हा पुन्हा दरवर्षी सादर झाले होते,की त्यातील भूमिकांचे संवाद गावातील प्रेक्षकांचे तोंडपाठ झाले होते.🙂 नाटकाच्या सुरुवातीची गण झाल्यावर नाटकाला प्रारंभ व्हायचा.राजा शशांक ( निवृत्ती काका कुमावत ) सिंहासनावर बसलेले असायचे. सिंहासनावरून उडी मारून राजा शशांक यांचा संवाद असायचा...

" प्रतिभा प्रतिभा तुझ्या या राक्षसी लालसेने.." इत्यादी संवाद म्हणल्या म्हणल्या लाईट जायची. लगेच सदरील नाटकाचे इतर पाठीराखे गावाच्या बाहेर दहेगाव रस्त्याला असलेल्या विद्युत डिपीकडे जाऊन उडालेले फ्यूज टाकून द्यायचे.लाईट पुन्हा सुरळीत होऊन पुन्हा राजा शशांक ( निवृत्ती काका कुमावत)सिंहासनावर बसून तोच संवाद उडी मारून म्हणून नाटकाला प्रारंभ करायचे. राजा शशांक यांनी उडी मारली रे मारली की लाईट जायची.असे साधारणतः तीन चार वर्षे झाले.अखेर याच नाटकाच्या पार्टीतील काहीजण याचं नाटकाच्या सुरुवातीलाच दहेगाव रस्त्याला लागून असलेल्या विद्युत डिपी जवळ राखण बसू लागले. तेंव्हा कुठे राजा शशांक ( निवृती काका कुमावत) यांनी सिंहासनावरून उडी मारून पुढील संवाद म्हणून नाटक सुरळीत प्रारंभ होऊ लागले होते. राजा शशांक यांच्या उडीच्या वेळी नेमक्या वेळी जाणारी light 🚨 आपोआप जात होती की मुद्दामहून कुणीतरी डीपी वरील फ्यूज बंद करत होते हे गावातल्या नाट्य कलाकारांना अन् रसिकांना माहित असलेले / नसलेले कोडेच होते.


काळाच्या ओघात, जबाबदारीच्या ओघात तसेच माझे स्व.तीर्थरूप आई वडील यांच्या स्वर्गवासानंतर गाव, आयुष्याच्या दैनिक प्रवासात मागे सुटत चालले.मात्र गावातल्या आठवणी माझ्या आयुष्याच्या प्रवासात सदैव चिरंजीव आहेत.अधून मधून गावाकडे जाणे येणे होते तेंव्हा गतकाळातील आठवणी हृदयात एखाद्या सारस्वताचे पूजन कराव्यात तशा पवित्र भावनेने जाग्या होतात.


गावातल्या नाटकाच्या अनेकानेक आठवणी आहेत, तुर्तास आवरतं घेतो. आज या रसिक आठवणींचे स्मरण होण्याचं कारण असे की, आज रंगभूमी दिवस आहे त्यामुळं गतकाळातील अनेक आठवणी मनाच्या गाभाऱ्यात दाटून आल्या अन् त्या सर्व रसिक माय बापांच्या समोर एक रसिक म्हणून प्रस्तुत केल्या..! 


आजच्या रंगभूमी दिवस निमित्त सर्व नाट्य कलाकारांना त्यातल्या त्यात माझी जन्मभूमी पालखेड येथील हयात नसलेल्या अन् हयात असलेल्या सर्व नाट्य कलाकारांना माझ्याकडून अन् माझ्या कुटुंबाकडून विनम्र मानवंदना..!🙏🏻


लेखाच्या सोबत प्रस्तुत असलेल्या फोटोत माझ्यासह प्रिय शिक्षक मित्र सुनील जोशी सर, अरविंद पाटील सर अन् पारस जैन सर आहेत.


स्थळ: शासकीय अध्यापक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर 

( इ.स. २०१० - १२ )


ता. क. - कलेसाठी रसिकांची रसिकता ही रसिक देवतेचे केलेले पूजन असते.


वंदे मातरम्


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २७ मार्च २०२६, शुक्रवार

मंगळवार, २४ मार्च, २०२६

बुवा तिथे बाया – एक अपूर्ण राहिलेली आठवण..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


बुवा तिथे बाया – एक अपूर्ण राहिलेली आठवण..!


=====================


आम्ही पालखेड येथे श्री.पारेश्वर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकायला होतो.त्यावेळी आमचे गुरुवर्य आदरणीय जी.एम.भगत सर यांनी आम्हा काही  विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ हे नाटक करण्याचे ठरविले होते.नाटकाचे नाव ऐकल्या ऐकल्या आम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना गुदगुल्या झाल्या होत्या.आम्ही पालखेडकर मुळातच नाटकी अन् कलेवर निस्सिम प्रेम करणारे असल्याने उत्कृष्ट लेखकाचे नाटक असल्याने ’ बुवा तिथे बाया ’ हे धाडसी नाटक करण्याचे ठरविले होते. 


त्यावेळी आजच्या सारखी अद्ययावत पुस्तके मिळण्याचे ऑनलाइन व्यवस्था नव्हती. सदरील नाटकाचे पुस्तक तत्कालीन औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे  मिळेल या आशेने आमच्याच वर्गातील वर्गमित्र रमेश घोडके अन् मी पालखेड येथून पहाटे  पायी  चालत निघून परसोडा रेल्वे स्टेशनवर भल्या सकाळी पोहोचलो. तिथून सकाळच्या रेल्वेने  छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरातील सर्व पुस्तकांचे दुकाने पालथे घातले मात्र आचार्य अत्रे लिखित ' बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नाही.


रिकाम्या हाताने अन् अर्धवट उपाशी पोटाने आम्ही पुन्हा परतीच्या संध्याकाळच्या रेल्वेने परसोडा रेल्वे स्टेशनवर उतरून पालखेड येथे परतलो होतो. सदरील नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे आम्ही काही विद्यार्थी अन् आमचे गुरुवर्य आदरणीय भगत सर नाराज झालो होतो.


आमच्या पालखेड गावात जी काही अत्यंत मोजकी नाटकं आम्हा पालखेडकरांनी आपल्या कलासक्त अभिनयाने सादर करून अजरामर केलेली आहेत त्यात आदरणीय भगत सर दिग्दर्शित अन् थोर लेखक वसंत सबनीस लिखित ’ विच्छा माझी पुरी करा ’ या नाटकाचा आजही पालखेड गावाच्या नाट्य परंपरेतील इतिहासात आवर्जून उल्लेख केल्या जातो.माझे मोठे बंधू सुनील भाऊ, अंबादास भाऊ घोडके, नारायण भाऊ रोठे इत्यादी वर्गमित्रांनी भगत सर दिग्दर्शित विच्छा माझी पुरी करा या नाटकाला आपापल्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्यातल्या त्यात या नाटकातील नारायण भाऊ रोठे यांनी " हल्या... हप्प...थिर्र...या अजरामर वाक्याने या नाटकाला अन् नारायण भाऊ रोठे यांच्या सर्वोत्तम अभिनयाला आमच्या पालखेड गावातील नाट्य परंपरेत अजरामर केलेले आहे.


जर यदा कदाचित आम्हाला त्यावेळी आचार्य अत्रे लिखित ’ बुवा तिथे बाया ’ या नाटकाचे पुस्तक उपलब्ध झाले असते तर कदाचित पालखेड येथील नाट्य इतिहासात आमच्याही नाटकाची नोंद झाली असती.


साधारणतः बावीस वर्षापूर्वी मी, माझी पत्नी आमचा थोरला चिरंजीव त्यावेळी थोरला चिरंजीव छोटासा होता असे आम्ही सह परिवार दुचाकीवर प्रवास करून एका धर्मगुरुचे दर्शन घ्यायला गेलो होतो.दर्शन घेतले.त्या धर्मगुरूच्या बाजूला एका भांड्यात सफरचंद अन् दुसऱ्या भांड्यात गोड गोड साखरेचे दाणे होते.आम्ही श्रद्धेने दर्शन घेतले.आम्हाला दर्शन झाल्यावर संबंधित धर्मगुरूने गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद दिला.आम्ही तो प्रसाद अत्यंत श्रद्धेने घेतला.थोड्याच वेळात तिथे आलिशान चारचाकी गाडीतून काही श्रीमंत माणसं आले.त्यांचे वस्र अन् अंगावरील सोन्याच्या भरजरी दागिन्यांवरून  हाय प्रोफाईल भक्त जाणवत होते.त्या श्रीमंत भक्तांनी पण त्या धर्मगुरूचे दर्शन घेतले.मात्र यावेळी त्या धर्मगुरूने बाजूला. असलेल्या भांड्यातील सफरचंद एक एक करून त्या श्रीमंत भक्तांना प्रसाद म्हणून दिले. हे दृश्य पाहून मी विचार केला की, आम्ही सर्व सामान्य आहोत म्हणून आम्हाला गोड गोड साखरेच्या दाण्याचा प्रसाद आणि नुकतेच आलेले हाय प्रोफाईल भक्त श्रीमंत आहेत म्हणून त्यांना सफरचंद..! कुणाला काहीही वाटो मात्र हा भेदभावच होता.एखादा इथे लॉजिक लावेल की, प्रसाद आहे जो दिला तो घ्यावा वगैरे..! मात्र हे लॉजिक निव्वळ तकलादू ठरते. गोष्ट छोटी होती, मात्र त्या प्रसंगावरून माझी त्या धर्मगुरु वरील श्रध्दा समाप्त झाली ती कायमची..!


प्रभू श्रीरामने शबरीचे उष्टे बोरे खाल्ले , श्रीकृष्णाने आपला गरीब मित्र सुदामा याला सन्मानाने जवळ घेतले अन् छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय सर्व सामान्य कुटुंबातील माणसांना आपलंसं केले.श्रीमंती, ऐश्वर्य , शक्ती असतानाही सर्व सामान्यांना जे समानतेची वागणूक देतात ते आपले अनुकरणीय आदर्शवादी पूर्वज आहेत. आपल्या संविधानाला अभिप्रेत असलेल्या समता अन् बंधुता या मूल्यांचे मूळ स्रोत हेच राष्ट्रपुरुष आहेत. कुठलाही सामाजिक भेदभाव करणारे आदर्शवादी  कधीच नसतात.


मी काही वर्षापूर्वी प्रत्येक  धर्मातील ढोंगी धर्मगुरुंवर एक लेख लिहिला होता.जर यदा कदाचित सर्च करून उपलब्ध झालाच तर पुन्हा शेअर करील. प्रत्येक  धर्माच्या आडून त्या त्या धर्मातील काही ढोंगी धर्मगुरु, तत्त्वचिंतक , उपदेशक, आपापल्या धर्मातील देवभोळे असणाऱ्यांना फसवून आपल्या पिशव्या, थैल्या, तिजोऱ्या भरून आर्थिक संपन्न होतात अन् त्यात भरडल्या जातात काही स्री अन् पुरुष..! विशेषतः यात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात भरडल्या जातो.


मात्र इथेही एक मेख आहे. पीडित अन् पीडिता जर स्वतःहून आपल्या आयुष्याला उध्वस्त करून घेत असेल तर..?

हा देखील मोठा सामाजिक प्रश्न आहे.याचे उत्तर बुद्धिवंतांच्या सहज लक्षात येईल.


बाकी मौन सर्वार्थ साधिके..!😷🙏


ता.क. - आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे धर्म आणि धर्मगुरु यांच्यावरील अनेक जालीम बौद्धिकं सदैव प्रासंगिक आहेत.


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २४/३/२०२६, मंगळवार

शनिवार, १४ मार्च, २०२६

जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!


 

आमचे गाव आमची माणसं ©️


जिवलग बालमित्रांच्या सस्नेह भेटी..!


=====================


काल दिनांक १४/३/२०२६, शनिवारी रात्री आमचा जिवलग बालमित्र विलास उत्तम निकम हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर याच्या कन्येच्या विवाह निमित्त आम्ही बालमित्र छत्रपती संभाजीनगर येथे एकत्र भेटलो. सोबत होते सर्व जिवलग बालमित्र गोपीनाथ निकम, वाल्मीक निकम, वधू पिता विलास निकम आणि डॉ. संजय राऊत..! यातील काहींवर यापूर्वीच ब्लॉगवर यापूर्वीच लिहिले आहे.काही बाकी आहेत.वधू पिता तथा जिवलग बालमित्र विलास निकम तथा संजय राऊत यांच्यावर माझ्या ब्लॉगवर यापूर्वीच  लेख लिहिलेले आहेत.


वधू पिता विलास निकम या बालमित्राच्या पालखेड येथील तत्कालीन हॉटेल मध्ये ( घर आणि हॉटेल एकच होते ) बसून आमच्या घरात एवढं थांबलो नाही तेवढं विलासच्या हॉटेल मध्ये उठल्या पडल्या बसून अनेकानेक विषयांवर पारायणे केलीत.त्याविषयी सविस्तर विलासवर यापूर्वीच लिहिलेल्या लेखात लिहिलेले आहे. त्या जिवलग बालमित्राच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील उपस्थिती खूप साऱ्या आठवणी पुन्हा एकदा आठवण करून गेल्या.


काल रात्री माझा अत्यंत जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत अन् मी  ज्या धावपळीत सदरील विवाह सोहळ्यास आलो ते फक्त आणि फक्त आम्हीच करू शकतो. गतकाळातील , बिकट परिस्थितीत एकमेकांना दिलेला भावनिक आधार अन् एकमेकांच्या घरात घरातल्या सारखं वावरणं या नात्याचा हा मूळ आधार..!  एकमेकांची गतकाळातील बिकट परिस्थिती अन् त्यात एकमेकांना दिलेला आधार हाच कोणत्याही नात्याचा सर्वोत्तम आधार असतो.बाकी सगळी नाती मिथ्या ठरतात अन् आहेत. रक्ताची अन् रक्तविरहित नाती हा काय प्रकार असतो अन् त्यातील खरे खोटे कोणते याचा निदान आम्हा काही जिवलग बालमित्रांना अन् इतर काही जिवलग मित्रांना अजून तरी उलगडा झालेला नाही आणि होऊ पण द्यायचा नाही. त्याचं कारण जे नाते आपल्याला आहे त्या परिस्थितीत अन् बिकट परिस्थितीत एकमेकांच्या परिस्थितीला समजून उमजून घेते तेच नाते शाश्वत..! बाकी सब मोह माया आहे.हाच श्रीमद् भागवताचा सार आहे; पण आपल्याला आपल्या महान पूर्वजांनी जे सांगितले आहे त्यातील भावार्थ समजून न घेता आपण नको त्या बेगडी नात्यात स्वतःला शोधत असतो.विषयांतर झाले, पण आमच्या अनेक बालमित्रांच्या नात्यातील हाच भावार्थ आम्ही शोधला अन् आजही त्यावर कायम आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने उपरोक्त विषय लिखाणात आला.


विशेष म्हणजे आम्ही गोपीनाथ निकम बाळगता यातील सर्वजण चित्रपटाचे विशेष रसिक..! एखादी कथा कशी तोंडी सादर करावी या बाबतीत उपस्थित दोन जिवलग बालमित्रांचा हात  पाय अन् तोंड कुणीच धरू शकणार नाही.अर्थात त्या कथा ऐकताना फक्त आमच्यातच एक श्रवण भक्त म्हणून सहनशक्ती आहे हे आम्हा यात उपस्थित नसलेल्या काही बालमित्रांना ठाऊक आहे.🙂


लग्न सोहळा आटोपला.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप  सासूबाईंची श्रद्धेय भेट घेतली.वधू पिता विलास निकम याच्या तीर्थस्वरूप सासूबाईचे माहेर  आमच्याच मूळ परिसरातील धोंदलगाव येथील..! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिवलग बालमित्र विलासच्या सासुबाई माझ्या तीर्थरूप वडिलांच्या माजी विद्यार्थिनी..! त्या भेटीत माझ्या तीर्थरूप वडिलांच्या आठवणी निघाल्या अन् पित्याच्या सानिध्याची जाणीव झाली.


मी अन् डॉ. संजय राऊत रात्री लग्न सोहळ्यातून निघाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील कित्येक गल्ल्या पालथ्या घातल्या. त्यात प्रत्येक गल्लीत गतकाळातील आपले दिवस शोधले. तो स्वतंत्र्य लेखनाचा विषय असेल.एकमात्र नक्की ज्यावेळी काल रात्री उशिरापर्यंत मी अन् संजू राऊत छत्रपती संभाजीनगर शहरातील गल्ल्या हिंडलो त्यावेळी वाल्मीक निकम , Dr.गणेश वाणी, स्व.शाम शेळके, आण्णासाहेब म्हस्के, संजय गायकवाड, संजय भाऊ गणपतकाका शेळके, पारसनाथ भोईटे इत्यादी बालमित्रांच्या आठवणींना गतकाळातील सानिध्याचा अंधारलेल्या रात्री उजाळा मिळाला.त्यात कैलासनगर मधील स्मशानभूमी, बाजूलाच जळणारे मृतदेह, कित्येक रात्री रूम मधील खिडक्यातून दिसणाऱ्या त्या जळणाऱ्या मृतदेहाच्या सोबत मित्रांच्या रूमवर मुद्दामहून केलेला मुक्काम सगळं काही सोबत होते.फक्त आज त्या त्या ठिकाणाला ग्लॅमर मिळाले आहे इतकेच..!माझ्या मुलांना कैलासनगर मधील स्मशानभूमी, तिथला परिसर आणि तिथल्या आठवणी प्रत्यक्ष तिथे नेऊन दाखविलेल्या अन् सांगितलेल्या आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील कैलासनगर परिसरातील तत्कालीन किरायाच्या खोल्या वारसा हक्काने आमच्याच इतर जिवलग बालमित्रांना मीठ ,मिरची, भाजीपाला रूम मधील सर्व भांड्यासह सुपूर्द केल्या होत्या. किती तो जीव..!♥️


मध्यरात्र ओलांडली होती. भले आम्ही आजच्या ग्लॅमर लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर  शहरात अंधारलेल्या रात्रीत फिरत होतो, मात्र आम्ही त्याच गतकाळातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात स्वतःला शोधत होतो. गतकाळातील वास्तवात जगलेल्या आठवणींना झोप येऊ लागली होती.पुन्हा कधीतरी त्या गतकाळातील आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व्यक्त होण्यासाठी..! जिवलग बालमित्र Dr. संजय राऊत यास देखील दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कर्मस्थळी जायचे होते.


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : १५/३/२०२६, रविवार