मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" भेट अनोळखी निरागस मनाची..!"
=========================
आज दिनांक २६/२/२०२५, गुरुवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बस स्थानकातून सकाळी लाल परी बसमध्ये प्रवासासाठी बसलो होतो.माझ्या सीटच्या मागेच असलेल्या सीटवर एक अनोळखी गोंडस मुलगा त्याच्या आईच्या सोबत बसला होता.त्या गोंडस मुलाने माझ्या शेंडीला हात लावला , तितक्यात मी मागे वळून पाहिले. पटकन तो गोंडस मुलगा खाली बसला.बस भडकल गेट जवळ आली होती.पुन्हा त्या गोंडस मुलाने माझ्या शेंडीला हात लावला. त्या मुलाला त्यात आनंद भेटत होता. आता मी मागे वळून बघणे बंद केले होते.
मी विचार केला.या गोंडस मुलाला त्याच्या या कृतीबद्दल रागावू नये अथवा असे तू का बरं करतो आहेस असे विचारू नये यावर मी ठाम झालो होतो.सध्यातरी ईश्वराचा अधिवास याच निरागस मनात आहे. निरागस मनाला आत्मिक आनंद देण्यायोग्य नशीब या प्रसंगात मला लाभले होते.मी त्याचा पुरेपूर आत्मिक आनंद घेत होतो. आता बस हडको कॉर्नर येथे आली होती.मला त्या गोंडस मुलाचा तो उभा राहिल्या राहिल्या पटकन फोटो क्लिक काढायची होती.तो गोंडस मुलगा माझ्या सीटमागे उभा राहिला, तेवढ्यात मी सेल्फी क्लिक काढली.
आता तो गोंडस मुलगा माझ्या शेंडीला हात लावत नव्हता ; मात्र अधून मधून उभा राहायचा अन् पटकन खाली बसायचा.त्या गोंडस मुलाचे हे निरागस भाव, मी सेल्फी अवस्थेत सुरू असलेल्या माझ्या मोबाईल मध्ये बघत होतो. आता हर्सूल सावंगी परिसर आला होता. नेहमी प्रमाणे बसमध्ये गर्दी खचाखच भरली होती आणि नेहमी प्रमाणे नाना तऱ्हेचे वास असलेल्या तोंडांची संख्या वाढली होती. त्या गोंडस मुलाच्या लक्षात आले होते की, मी सेल्फी अवस्थेत माझ्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये त्याला बघत आहे. आता तो गोंडस मुलगा आता काही वेळ उभा राहून माझ्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेरा कडे बघून स्मित हास्य करू लागला होता.
बस आता चौका घाटाच्या पुढे आली होती. इतक्यात बसमध्ये कंडक्टर भाऊ अन् एका प्रौढ वयातील प्रवासी महीलेत वादावादी सुरू झाली होती. त्या वादावादीत कंडक्टर भाऊची काहीच चूक नव्हती. असे दृश्य दररोजच्या प्रवासात नित्याचे झाले असल्याने त्यात मानसिकरीत्या नाहक भरडल्या जात होते कंडक्टर भाऊ..! ही वादावादी मी बसलेल्या सीटच्या बाजूलाच सुरू होती. मी एखाद्या समजूतदार व्यक्तीसारखं त्यांची वादावादी मिटवू लागलो होतो. माझ्यातील तथाकथित समजूतदारपणाचा अहंकार काही कामं आला नाही. ती महिला अजून चेव आल्यासारखी वादावादी करू लागली होती. अखेर बसमधील अनेक प्रवाश्यांनी त्या महिलेला तिची चूक लक्षात आणून दिली तेंव्हा ती महिला थोडीफार शांत झाली होती.तरीपण अधून मधून तिची बडबड सुरूच होती. तो गोंडस मुलगा हा प्रसंग टक लावून बघत होता.
आता बस फुलंब्रीच्या पुढे होती. तो गोंडस मुलगा पुन्हा माझ्या पाठीमागील सीटच्या जागेत उभा राहिला होता.पुन्हा मी माझ्या मोबाईल मधील सेल्फी कॅमेरा सुरू केला अन् त्या गोंडस निरागस मनाला स्वतःच्या भाव विश्वात रमवून त्या निरागस मनाला आनंदित करू लागलो होतो.आता त्या गोंडस निरागस मनाला खात्री पटली होती की, मी रागावणार नाही म्हणून..! ते निरागस मन आता मला हाताने टाटा करू लागले अन् आमच्यात अनोळखी मैत्रीचे नाते तयार झाले होते.
बस फरशी फाट्यावर आली होती.मी त्या निरागस मनाला त्याचे नाव विचारले. त्याने प्रत्युत्तर दिले.." पार्थ..!" मी त्याला म्हणालो पार्थ हेच नाव अर्जुनाचे देखील आहे. त्या निरागस मनाला यातलं काही माहीत नव्हतं. मला त्या निरागस मनाने त्याचे नाव सांगीतल्यावर एकलहेरा ता. गंगापूर येथील साधारणतः बारा वर्षापूर्वी नेहमी भेटत असलेल्या अशाच एका निरागस गोंडस मुलाची आठवण आली. एकलहेरा येथील माझे शिक्षक मित्र आदरणीय हरिभाऊ गांगर्डे सर यांचा मुलगा , त्याचे नाव देखील ' पार्थ ' हेच होते अन् त्याच्या अन् माझ्या नेहमीच्या भेटीत मी त्या निरागस मनाला देखील पार्थचा अर्थ त्याला समजेल तशा शब्दात सांगत असायचो.कुणाची आठवण कधी येईल हे सांगता येत नाही, कारण आपल्या आयुष्यातील आठवणी आपल्या जिवलग मैत्रिणी असतात हेच खरं..!
आयुष्यातील दररोजच्या प्रवासात षढरिपू असलेले अनेकजण भेटतात.त्या षढरिपूंपैकी काही माझ्यातले माझेच मलाच भेटत असतात.कधी आर्थिक श्रीमंतीचा अहंकार असलेले भेटत असतात, कधी विविध न्युनगंडाने ग्रस्त असलेल्या मानवी मनांची भेट होत असते, कधी विद्वत्तेचा अहंकार असलेले मन भेटत असते, कधी भौतिक सुख सुविधांचा अहंकार असलेले भेटत असतात, कधी आपल्या तथाकथित बेगडी पोकळ वंशाचा, जातीचा अहंकार असलेले भेटत असतात. या सर्वांच्या भेटण्यात जेंव्हा कधी अशी निरागस मनं भेटतात, तेंव्हा विधात्याचे अस्तित्व अजूनही या भूतलावर आहे याची खात्री पटते. अशा निरागस भेटीच्या वेळी विधात्याच्या निरागस नात्यातील अमृत सरी आपल्या प्रौढ वयातील आयुष्यावर पडून त्या भेटीतील क्षणांचे सार्थक झाल्याचं आत्मिक समाधान लाभतं..!
माझा बस थांबा आला होता. मी बस मधून उतरताना त्या निरागस गोंडस मनाला टाटा केला अन् माझ्या आयुष्यातील पुढील प्रवासाला सुरुवात केली होती.
ता. क. - सदरील लेख धावत्या बसमध्ये लिहिलेला आहे अन् लगेच माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला आहे.अक्षर अन् शब्द चूक भूल क्षमस्व..!🙏
वंदे मातरम्
लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २६/२/२०२५, गुरुवार.
