बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

अत्यंत दुर्मिळ पिढी.यांनाही जपलं पाहिजे.


 

#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


अत्यंत दुर्मिळ पिढी.यांनाही जपलं पाहिजे..!


===================


दिनांक २४/१२/२०२५, बुधवार रोजी थंडी खूप होती.मी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन वरील पॅसेंजर रेल्वे मधील एका डब्यात प्रवेश केला.गर्दी होती.डब्यातील सीट शोधत शोधत अखेर एका ठिकाणी जागा आढळून आली.तिथे दाटीवाटीत बसलो.माझ्या बाजूला एक जेष्ठ नागरिक दिव्य मराठी वर्तमानपत्र वाचत होते.एक चिरतरुण वरील स्लिप सीटवर पहुडलेला होता.डब्यातील लाईट सुरु होता.थंडीमुळे सर्व खिडक्या बंद होत्या.लाईटच्या प्रकाशात ते जेष्ठ नागरिक काका वर्तमानपत्र वाचत होते.


त्या चिरतरुणाला लाईटच्या प्रकाशामुळे झोप येईना.अखेर तो चिरतरुण वैतागून काहीश्या उंच स्वरात जेष्ठ नागरिक काकांना म्हणाला..

" तुमचा पेपर वाचून झाला का..?"

ते जेष्ठ नागरिक काहीसे रागाने म्हणाले..

" पेपर मी विकत घेतला आहे.मी वाचील नाहीतर नाही वाचणार.तुमची जबरदस्ती आहे का..? "


थोड्या वेळाने बघितले तर तो चिरतरुण वरील सीटवर पहुडलेल्या अवस्थेत मोबाईल बघण्यात मग्न झाला होता.


ते जेष्ठ नागरिक काका माझ्याकडे बघत पुटपुटले..

" कठिणच जमाना आला आहे.मी पैसे देऊन पेपर विकत घेतला आहे अन् हा मला विचारतो आहे तुमचा पेपर वाचून झाला आहे का..?


अशी जुनी जाणती माणसं बघितली की, ' मोडेन पण वाकणार नाही ' या म्हणीची आठवण आली.बाकी काहीही असो वरील प्रसंगावर माझ्यासह इतरांची भिन्न भिन्न मतं असू शकतात, मात्र या जेष्ठ नागरिक काकांच्या सारखी सुद्धा पिढी अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे.याही पिढीवर निस्सिम प्रेम करायला हवे. त्याचं कारण एवढं स्पष्टवक्तेपणाने वागायला पण स्वतः , स्वतः विषयी अत्यंत प्रामाणिक असावं लागतं. जे माझ्या समवयस्क पिढीत नसल्यात जमा आहे. ही अत्यंत दुर्मिळ पिढी आहे.यांनाही जपलं पाहिजे..!


अखेर माझे नियोजित रेल्वे स्टेशन आले होते.मी निघताना त्या जेष्ठ नागरिक काकांना अत्यंत आत्मियतेने म्हणालो..

" काका, उतरतो मी. थंडी खूप आहे.काळजी घ्या. एकटेच दिसता..? कुणी सोबत नाही का..?"

काकांनी माझ्याकडे बघून स्मित केले अन् म्हणाले..

" हो बेटा, मनमाडला चाललो आहे.काम आहे."


आधीच घडून गेलेल्या प्रसंगामुळे त्या काकांना ' मनमाडला काय काम आहे ?' असे विचारण्याची माझी हिंमत झाली नाही.🙂 


ता.क. : तत्त्वनिष्ठ असणाऱ्यांसोबत आपणही आपल्या पायरीत बसून रहावं.


वंदे मातरम् 

सुप्रभात मित्रांनो.🙂🙏


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २५/१२/२०२५, गुरुवार

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

कृती छोटी पण, प्रेरक नक्कीच आहे..!



 

#मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" कृती छोटी पण, प्रेरक नक्कीच आहे..! "

===============================


" सर, तुम्ही ७ डिसेंबर ला कुठे गेले होते हो..?" 

माझ्या जवळ येऊन हळू आवाजात या अभिषेक सखाराम तोडकरने मला विचारले.

मी- " अरे,बेटा..माझ्या जन्मगावाची यात्रा होती त्या दिवशी..! म्हणून मी त्यारोजी रजेवर होतो..! का..काय झाले..? "

अभिषेक - " काय...सर...माझा वाढदिवस होता ना त्या दिवशी..! "

मी - " अरे ,व्वा...! अभिनंदन बेटा..!"

आमच्यातील हा संवाद सुरू असताना अभिषेकला मला काहीतरी सांगायचे होते पण तो सांगू..का...नको...या द्विधा मनःस्थितीत असल्याचे मला जाणवले.मी त्याला म्हणालो..

" काय रे...काय झाले..? कुणी काही बोलले का तुला..? "

अभिषेक - " नाही हो सर..!"

मी - " मग काय झाले..?"

अभिषेक माझ्याजवळ आला अन् म्हणाला..

" सर,ते तुम्ही मागे म्हणाले होते ना..की आमचा कुणाचा वाढदिवस असला तर त्या दिवशी केक, चॉकलेट वर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशातून काहीतरी घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना द्या म्हणून..!"

मी -" अरे..हा..म्हणालो होतो..! "

अभिषेक - " सर,मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी..४० ₹ चे पेन आपल्याच शाळेच्या बाजूला असणाऱ्या लहाण्या जिल्हा परिषदेच्या  शाळेत ३ रीच्या विद्यार्थ्यांना वाटले..!"


मी काहीवेळ त्याच्याकडे पाहताच राहिलो..अन् विचार करू लागलो की, मुलं त्यांच्या गुरुजींच्या प्रत्येक नैतिक मूल्यांच्या शिकवणीवर किती बारीक लक्ष ठेवत असतात. या अभिषेकने असे काही अप्रतिम कार्य केले होते की,जे..जे मोठी सुशिक्षित माणसं कुणाच्याही वाढदिवसाला  स्वतःच्या किंवा इतरांच्या चेहऱ्याला केक फासतात त्यांना सणसणीत चपराक लगावली होती.


मला खूप खूप आनंद झाला होता. मी ज्या..ज्या छोटछोट्या नैतिक मूल्यांची रुजवणुक माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये करू लागलो होतो...त्याला आता कुठे खूप सुंदर असा अंकुर फुटायला लागला होता.मला हेच अपेक्षित होते. भले असे करणाऱ्यांची संख्या कमी असेल पण प्रारंभ झाला होता हे काय थोडे होते का...? भले त्यांच्या या कृती जगाच्या दृष्टीने खूप अती सामान्य असेल पण छोट्या कृतीतूनच मोठी कार्य सहज होत असतात. एकाजनाचे प्रेरक कार्य..निदान पाच जणांना तरी प्रेरित करत असते यावर माझा ठाम विश्वास आहे.


मी ज्यावेळी अंधारी प्रशालेत जून २०१८ मध्ये हजर झालो होतो ,त्यावेळी मला या शाळेत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक नवीनच प्रकार पाहायला मिळाला होता.

तो असा..

या शाळेत ज्या मुलामुलींचा वाढदिवस साजरा होत असे,ते बरेच मुलं मुली केक वर्गात आणत असे अन्  दणक्यात वाढदिवस साजरा करत असे.मला प्रश्न पडत असे की,या मुलामुलींना १०० ते १५० ₹ चा केक घ्यायला यांच्या घरचे पैसे कसे काय देऊ शकतात..? मुलांना चॉकलेट वाटप करणे समजू शकतो पण..वर्गात केक आणून..?


मी त्यावेळी या मुलांना त्यांच्या या साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाबद्दल प्रत्यक्ष उपदेशाचे काहीसे रागावून डोस दिले नाही ; कारण पौगंडावस्थेतील वयोगटातील मुलांना पटकन अशा अनेक गोष्टी सहजपणे लवकर मुद्दामहून समजत नाही. 😊 कारण हा वयोगट आयुष्यातील सर्वात संवेदनशील वयोगट असतो. जोषपूर्ण आयुष्याचा प्रारंभ इथूनच सुरू होतो. मात्र आपण वाढदिवसाला नेमके काय काय करायला हवे याबाबतीत तासिका झाल्यावर सांगत असे.त्याचाच हा खूप चांगला परिणाम होता..की अभिषेकने त्याच्या वाढदिवसाला वर्गात केक आणून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा लहान मुलांना काहीतरी अभ्यास उपयोगी वस्तू त्याने दिली होती. 


प्रिय अभिषेक याने  वर्गात केक न आणता दुसऱ्या एका चांगल्या कृतीतून स्वतःचा वाढदिवस साजरा करायला प्रारंभ तर केला होता,याचा मला खूप खूप आनंद झाला होता. कोणताही चांगला प्रारंभ हाच येणाऱ्या काळातील चांगल्या कृतींचा प्रारंभ बिंदू असतो. म्हणून प्रिय अभिषेकची ही छोटीशी कृती अंधारी प्रशालेतील बाकीच्या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार होती,जी मुलं अन् मुली वर्गात केक आणून आपला वाढदिवस दणक्यात साजरा करत होती..! प्रत्येक वर्गात मी गेल्यावर अभिषेकने वाढदिवसाच्या दिवशी काय केले, याचे आवर्जून विद्यार्थांना सांगत होतो. याचा दृश्य परिणाम असा झाला की, अशा प्रकारांना आळा बसला.


खूप खूप अभिनंदन बेटा अभिषेक..!🌹


वंदे मातरम्.. !


ता.क.:  कृती छोटी आहे...पण अनुकरणीय नक्कीच आहे. अभिषेकला या छान कार्याबद्दल पतंजली बिस्कीट पुडा बक्षीस दिला.


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


प्रसंग दिनांक: ७/१२/२०१८


लेखन दिनांक: २० डिसेंबर २०१८

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

कौटुंबिक विश्वासू गणेश हिंगमिरे..!


 

#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


कौटुंबिक विश्वासू गणेश हिंगमिरे..!


=====================


आज दिनांक २९/११/२०२५ रोजी सकाळी जरा धावपळीतच छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक गाठलं होतं.इतर दिवसाच्या मानाने आज थंडी जास्त जाणवत होती. .मी रेल्वे प्लॅटफॉर्म वरून चालू लागलो होतो.इतक्यात माझ्या पाठीमागून येऊन पुढ्यात आल्यावर एका तरुणाने माझे दर्शन घेतले. आपलं कुणीतरी दर्शन घ्यावे एवढी आपली योग्यता नाही अन् मी ते अत्यंत अपवाद कुणीतरी वगळता कुणाला घेऊनही देत नाही. माझ्या पुढ्यात अचानक गणेश हिंगमिरे उभा होता. गणेश हा मूळचा राहणारा लासूर स्टेशन येथील होता.त्याला बघितल्यावर अत्यंत आनंद झाला.त्याचे गाल धरून आपुलकीने अनौपचारिक अन् कौटुंबिक विचारपूस करून आम्ही दोघेही गप्पात रममाण झालो.


गणेश हिंगमिरे..!


आम्ही लासूर स्टेशन येथे वास्तव्यास असताना हा गणेश आमच्या कुटुंबाचा अत्यंत विश्वासू कौटुंबिक सदस्य होता.त्यावेळी या गणेश हिंगमिरेचे वय साधारणतः दहा बारा वर्षाचे असेल..! मी लासूर स्टेशन येथे काही दिवस डोणगाव रस्त्याच्या लगत असलेल्या वसाहतीत वास्तव्यास होतो.माझे जिवलग शिक्षक मित्र नितीन पगार ( नाशिक), मधुकर शेवाळे ( मालेगाव ) अन् गणेश देशपांडे ( देऊळगाव राजा) असे आम्ही मित्र परिवार तिथे सह परिवार वास्तव्यास होतो.त्याच परिसरात गणेश आपल्या बालवयात आपल्या आई वडिलांच्या सोबत वास्तव्यास होता. 


आमचा थोरला चिरंजीव नमन यास गणेशने अंगाखांद्यावर खेळवले होते. आमचा थोरला चिरंजीव नमन त्यावेळी दीड वर्षाचा असेल तेव्हा..! घरात लहान मूल असलं की, घरात खेळणी , जेष्ठ माणसं अन् त्यांच्या जोडीला काहीसे मोठ्या वयाचे बालकं असावी लागतात. दीड दोन वर्षाच्या लहान बालकांच्या भाव विश्वाला फुलविणारे उपरोक्त उल्लेखित मानवी घटक अत्यंत गुणकारी मानसिक औषधं असतात. माझी स्व.आई आमच्या मुलाच्या भावविश्वाचे आंजरण गोंजारण नेहमी करत असायची. काही दिवसांनी आम्ही लासूर स्टेशन येथील लासूरगाव रोड लगत आमच्या स्वतःच्या घरात वास्तव्यास राहायला गेलो.तेंव्हा आमच्या लहान मुलांच्या भावविश्वाचे आंजरण गोंजारण माझे स्व.आई अन् वडील दोघेही करू लागले होते.


मात्र आम्ही जो पर्यंत लासूर स्टेशन येथे काही दिवस डोणगाव रस्त्याच्या लगत असलेल्या वसाहतीत वास्तव्यास होतो तो पर्यंत हाच प्रिय गणेश आमच्या कुटुंबाचा अत्यंत विश्वासू कौटुंबिक सदस्य होता.बालवयातील थोरला चिरंजीव नमन यास माझी पत्नी जेऊ घालू लागली की, तो जेवताना आढेवेढे घ्यायचा. कोणत्याही लहान बालकांचा आपल्या आईच्या सानिध्यात असलेला हा खोडकर , अल्लड स्थायीभाव असतो. हा गणेश त्या लहान बाळाला जेवताना एकचित्त होईल असे आनंदाचे ,कृतीयुक्त हावभाव करत असायचा.खेळणी वाजवायचा. लहान मुले आपल्या बालवयात , आपल्या अवतीभोवती असलेल्या ज्येष्ठांच्या अन् काहीसे मोठे असणाऱ्या लहान मुलांच्या भावविश्वात पटकन रममाण होतात.त्याची प्रचिती येत असायची. बऱ्याचदा बालवयातील आमचा थोरला मुलगा गणेश हिंगमिरे याच्या सोबत त्यांच्या घरी असायचा. आमच्या थोरल्या मुलाच्या बालवयातील आजारपणात देखभाल , काळजी , शुश्रुषा करण्यात गणेश स्वतः हून पुढाकार घ्यायचा.आमच्या मुलाच्या आयुष्यात रक्तविरहित नात्यातील मामाचे अत्यंत प्रेमळ अन् मायाळू नाते गणेशने निर्माण केले होते.आमच्या घरातील स्वयंपाक घर गणेश साठी हक्काचे होते.


काही दिवसांनी आम्ही लासूर स्टेशन येथील लासूर गाव रोड लगत असलेल्या आमच्या स्वतःच्या घरात वास्तव्यास राहायला गेलो. गणेश तिकडे पण घरी यायचा.आपण आपल्याच घरी आहोत या नात्याने एक कौटुंबिक सदस्य म्हणून वावरत असायचा.


सध्या गणेश हिंगमिरे गेल्या काही वर्षांपासून बडोदा ( गुजरात ) येथे सह परिवार वास्तव्यास आहे असे आज समजले. सुखी आयुष्य जगत आहे. कौटुंबिक अन् आस्थेवाईकपणे गप्पा मारल्या. गणेश निघताना पुन्हा पुन्हा आवर्जून म्हणाला..

" सर, नमन अन् ताईला नक्की सांगा, मी भेटलो होतो म्हणून..! पुन्हा कधी इकडे आलो तर घरी नक्कीच येईल..!"

 

इतक्यात त्याच्या पुढील प्रवासाच्या रेल्वेची अनाउन्समेंट झाली. गणेशच्या गालावरून हात फिरवून त्याला अत्यंत प्रेमाने निरोप दिला.गणेश अन् मी आपापल्या पुढील प्रवासाला निघून गेलो.


आयुष्यात आपल्याला , आपल्या कौटुंबिक परिस्थितीला समजून उमजून घेणारी माणसं आपल्या आयुष्यात येणं हे परम भाग्यच म्हणावं..! भले अशांची संख्या कमी असेल, मात्र त्यात आपली आई अन् आपला बाप जाणवला पाहिजे. यात उल्लेखित आपली आई अन् बाप हे शब्द भावार्थाने अभिप्रेत आहेत, भले अशांचा वयोगट कोणताही असो..!


वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : २९/११/२०२५, शनिवार

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

तरल स्वभावाचे ही मॅन धर्मेंद्र..!


 


#चिंतन


तरल स्वभावाचे ही मॅन धर्मेंद्र..!


====================


माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अस्सल शेतकरी असलेले अन् शेवट पर्यंत शेतीवर निस्सिम प्रेम करणारे पहिले अन् बहुदा शेवटचे अभिनेते धर्मेंद्र देओल हेच होते. पंजाबच्या मातीतील धष्टपुष्ट व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले आहे.


धर्मेंद्रजी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत उत्कट भाव विश्वातील आयुष्य जगले. त्या उत्कट प्रेमाच्या वैवाहिक आयुष्यात गतकाळातील अन् तद्नंतरच्या आयुष्यात त्यांनी कुणालाही अंतर दिले नाही हे विशेष आहे. आपल्या आयुष्यातील दोन्ही कुटुंबावर फक्त आणि फक्त निस्सिम प्रेम करत राहिले. दोन्ही कुटुंबावर एवढे निस्सिम प्रेम केले की, त्यांना दोन्ही कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तळहातावरील फोडा प्रमाणे जपलं. पुरुषाच्या दोन वैवाहिक आयुष्यात सहसा असे भावनिक अन् निखळ प्रेमळ आयुष्य आढळून येत नाही. धर्मेंद्र यांच्या निखळ प्रेमाची ती किमया अन् कमाई होती.


धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकानेक उत्तमोत्तम भूमिका केल्या, मात्र हिंदी चित्रपटसृष्टीने त्यांचा यथायोग्य सन्मान केला नाही. उत्तमोत्तम भूमिका करून देखील पुरस्कार मिळाला नाही याची खंत त्यांनी एकदा बोलून दाखवली होती. लोकांचे लोकप्रिय धर्मेंद्र हे नातं अख्ख्या हिंदी चित्रपटसृष्टीत धर्मेंद्र यांच्याच वाट्याला आले. धर्मेंद्र यांच्यावर लोकांनी भरभरून प्रेम केलं. पुरस्कारासाठी कुणालातरी मॅनेज करणे हे धर्मेंद्र यांना जमलेच नाही. स्वाभिमानी पंजाबी जाट असल्याचे ते स्वाभिमानी क्षत्रिय लक्षण होते.


मी अन् माझ्या कित्येक बालमित्रांनी पालखेड येथे बालपणी अन् माध्यमिक वयोगटात असताना स्व.दौलतराव काका कुमावत यांच्या घरी असणाऱ्या VCR व्हिडिओ वर धर्मेंद्र यांचे काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले होते.त्यात प्रामुख्याने हुकूमत , लोहा, मेरा गाव मेरा देश यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. " कुत्ते, कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा..!" ही डरकाळी फक्त धर्मेंद्र यांच्याच मुखी शोभत असायची. एवढ्या ताकदीचा संवाद म्हणण्याची वास्तवातील अस्सल ताकद धर्मेंद्र यांच्या नंतर फक्त त्यांचा मुलगा सनी देओल यांच्याच व्यक्तिमत्वाला शोभून दिसली.


सत्यकाम, चुपके चुपके , गुलामी या चित्रपटातील धर्मेंद्र यांचा अभिनय सर्वोत्तम होता.जे. पी.दत्ता दिग्दर्शित गुलामी हा चित्रपट माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी गुलामी या चित्रपटात साकारलेला रंजित चौधरी ही व्यक्तिरेखा त्या तमाम अन्यायग्रस्त अन् सरंजामशाही प्रवृत्तीच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांची प्रतिनिधित्व करते. गुलामी चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण फतेहपुर शेखावटी ( राजस्थान ) येथे झालेले आहे. आयुष्यात एकदा तरी फतेहपूर शेखावटी येथे भेट द्यायची आहे. दिग्दर्शक जे.पी.दत्ता अन् ऋषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांच्यातील सर्वोत्तम अभिनयाला गुलामी अन् चुपके चुपके या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या समोर प्रस्तुत केले. धर्मेंद्र उत्कृष्ट कवी होते.मात्र त्यांची ती अलौकिक प्रतिभा पुढे आली नाही.


एक अत्यंत तरल स्वभाव असलेले , अस्सल मातीशी इमान राखून असलेले, अत्यंत भावोत्कट असणारे आणि अस्सल देहयष्टी लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणून धर्मेंद्र हे शेवटचे अभिनेते आहेत असे वाटते.हिंदी चित्रपटसृष्टीत हा अस्सल वारसा धर्मेंद्र यांचे थोरले चिरंजीव सनी देओल हेच एकमेव पुढे चालवत आहेत असे वाटते.त्यानंतर उपरोक्त उल्लेखित अस्सल वारसा इतर कुणाकडे आहे असे जाणवत नाही.


पंजाबच्या मातीतील धष्टपुष्ट व्यक्तिमत्व धर्मेंद्रजी आज अनंतात विलीन झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!🙏


वंदे मातरम् 


एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४/११/२०२५, सोमवार

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

मनाच्या ओळी





========================


मनाच्या ओळी

भाग क्रमांक ११

स्वाद युक्त नात्यातूनी





#मनाच्या ओळी

भाग क्रमांक ११

स्वाद युक्त नात्यातूनी

========================

काही जिवलग जीवांच्या भेटी व्हायला हव्यात 

त्या भेटी एकमेकांच्या प्रेमाने जोपासायला हव्यात 

माणसे सांभाळत सांभाळत
झाडांना जोपासतो आम्ही ,
स्वाद युक्त नात्यातूनी ||

🌳 वंदे मातरम् 🌳

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक - २/६/२०२४, रविवार

====================


मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २७

आपलं कर्तृत्व शून्य वाटते..





#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २७
आपलं कर्तृत्व शून्य वाटते..

======================

जिथं आपल्या बापजाद्यांचे पाय लागले, तिथं आपलं कर्तृत्व शून्य वाटते,

आयुष्यात ज्यांचा धाक होता, ते आज नसल्याची खूप उणीव भासते,

त्यांच्या धाकामुळे धाकात राहिलो, याचि क्षणोक्षणी जाणीव होते,
आयुष्याच्या प्रवासात ||

वंदे मातरम् 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक: १७/५/२०२६, रविवार



========================

मनाच्या ओळी

भाग क्रमांक १०

स्वतःला शोधावे



#मनाच्या ओळी

भाग क्रमांक १०

स्वतःला शोधावे

=============================

शिवाच्या सानिध्यात जावे

तेथे स्वतः ला शोधावे

अंतिम काय ते अंतर्रमनी जाणावे 

जे जसे लाभले तसे शिव सानिध्यात समर्पित करावे ,
आयुष्य आपले  ||

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

वंदे मातरम् 
हर हर महादेव 🕉️

(© सदरील  काव्य  कॉपीराइट केलेलं असून संबंधित काव्याचे संपूर्ण हक्क राखून ठेवण्यात आलेले आहेत.)

दिनांक -  १७/५/२०२४, शुक्रवार




=========================

#मनाच्या ओळी
भाग क्रमांक ९

शून्यात बघत आहे 





#मनाच्या ओळी
भाग क्रमांक ९

शून्यात बघत आहे 

=====================

पूर्वी दरवाजा दरवाजाला भेटत होता

दोन आपुलकीचे शब्द व्यक्त होत होता

आता दरवाजे ही एकटे होत आहेत

अव्यक्तपणे एकट्यात शून्यात बघत आहेत‌ ,
गतकाळातील आपल्या  आप्तेष्टांना ||

वंदे मातरम् 

तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

छायाचित्र स्थळ - आमेर किल्ला जयपूर , राजस्थान

दिनांक -  २/ ५ /२०२४, गुरुवार






==========================

#मनाच्या ओळी
( भाग क्रमांक १९ )

जाणुनी..





#मनाच्या ओळी
( भाग क्रमांक १९ )

जाणुनी..

===================

निरागस मनांच्या सहवासात दिवस निघून जात आहेत,

भविष्यातील आयुष्याच्या प्रवासात जगण्यासाठी.

प्रतिदिन जगतो आहे निरागस जीवांचा सखा होऊनी,

पुन्हा कधी इथला सहवास लाभणार नाही हे जाणुनी.

पुन्हा कधी हा इथला परिसर भेटणार नाही,
कदाचित भेटतील दुसरी मने, दुसरीकडे इथल्यांचा पुनर्रावतार होऊनी,
पण यांचा सहवास पुन्हा लाभणार नाही ||

वंदे मातरम् 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक - १७/४/२०२५, गुरुवार





========================
मनाच्या ओळी
भाग क्रमांक ८

प्रीत असावी





#मनाच्या ओळी
भाग क्रमांक ८

प्रीत असावी

=============================

उजेडाला अंधाराशी प्रीत असावी
अंधार काळाकुट्ट असला म्हणून काय झालं
त्यालाही उजेडाची आस असावी
दिसणं अन् असणं यात भेद तो नसावा
आयुष्याच्या प्रवासात ||

असो, शुभ रात्री मित्रांनो..!🙏🏻😊🌹

वंदे मातरम् 

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

(© सदरील  काव्य  कॉपीराइट केलेलं असून संबंधित काव्याचे संपूर्ण हक्क राखून ठेवण्यात आलेले आहेत.)

दिनांक -  १५/३/२०२४, शुक्रवार.
==========================

मनाच्या ओळी 
भाग क्रमांक १८

जपावं 





#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक १८

जपावं 

=====================

एकमेकांना मोकळं चाकळं भेटावं,

मैत्रीच्या नात्याला कोंदणात मढवावं,

तीच रात्र,तेच मित्र,

अमुल आइस्क्रीम सारख्या थंडगार अन्  गोड गप्पा.

जे आपलं आहे, त्या नात्याला जीवापाड जपावं,
सरत्या आयुष्याच्या प्रवासात ||

ता. क. - सदरील फोटोत दिसणारे मित्र ,जन सहयोग सामाजिक संस्थेचे सक्रिय सदस्य तथा स्वयंघोषित मोकळ्या चाकळ्या स्वभावाचे आहेत.

वंदे मातरम्

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक – ८/३/२०२५, शनिवार





=========================

#मनाच्या ओळी
भाग क्रमांक ७

अर्पण 



#मनाच्या ओळी
भाग क्रमांक ७

अर्पण 
========================

ऐन मध्यावर नजरेत आता तुझा आधार शोधतो

पुढील आयुष्याच्या प्रवासात आशीर्वाद मागतो

कोण दिवस येईल कसा हे बाबा भोलेनाथ जाणतो
शुद्ध अंतःकरणाने मन मात्र त्या विधात्याला 
दररोज अर्पण करतो ||

असो, सर्व भक्तांना आजच्या महाशिवरात्री निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🏻😊🌹

हर हर महादेव 🕉️
वंदे मातरम् 

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक -  ८ /३/२०२४, शुक्रवार , महाशिवरात्री


=======================

मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २६
रंग खुणावतो आहे





#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २६
रंग खुणावतो आहे

=====================

प्रौढावस्था खुणावते आहे

काळ्यावर पांढरा रंग वरचढ ठरतो आहे 

कुणी काळ्याला हिणवतो 

कुणी काळ्याला कौतुकाने मिरवतो

कुणी पांढऱ्याला लपवतो

कुणी पांढऱ्या अहंकारात वावरतो

खेळ हा माझ्या तुमच्या बाह्यांगाचा ठरतो,
इंद्रधनुष्यी आयुष्यात..🌈 

वंदे मातरम् 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक: २७/२/२०२६, शुक्रवार 
शुभ सकाळ मित्रांनो 🙂🙏



=========================

#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २५

जगणं, प्रत्येकाचं..!




#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक २५

जगणं, प्रत्येकाचं..!

====================

आयुष्याच्या प्रवासातील कित्येक आठवणी आपल्या जिवलग मैत्रिणी होऊन जातात, आयुष्यभरासाठी.

प्रवासात दिसणाऱ्या परिचित अन् अपरिचित माणसाचं जगणं अन् वागणं भिन्न भिन्न असते. जो तो आपापल्या परीने आयुष्याशी मैत्री करत असतो, पोटापाण्यासाठी.

आगगाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघताना असं जाणवतं की, दिसणारा प्रत्येकजण आपापल्या परीने आयुष्याशी मैत्री करत असतो जगण्यासाठी.


वंदे मातरम् 

आत्मभाव व्यक्त  करणारा  एक प्रवासी - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक - २/२/२०२५, रविवार


=========================


#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक १७

या इहलोकी



#मनाच्या ओळी 
भाग क्रमांक १७

या इहलोकी

======================

वेळ आल्यावर निवांत ते बसावे
समस्ता  निरखून ते बघावे
समस्तांचे वर्तन बघुनी
आत्मचिंतन करूनी चालावा आयुष्याचा प्रवास 
या इहलोकी ||

वंदे मातरम्

तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष – नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक – २६/१/२०२५, रविवार.






=========================

मनाच्या ओळी
 भाग क्रमांक ४

अस्तित्व माझे

---------------------------



मनाच्या ओळी
 भाग क्रमांक ४

अस्तित्व माझे
-------------------------------

अस्तित्व माझे मी का विसरावे
समस्तास, छोट्याश्या कृतीतून दर्शवावे
आदर्श असे निर्माण करावे
समस्तांनी लोटांगण घालावे
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कृतीतूनी ||

असो, शुभ सकाळ मित्रांनो..!🙏😊🌹

वंदे मातरम्

तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक - ८/१/२०२४, सोमवार

=======================

#मनाच्या ओळी 
भाग क्र २४
देवपण अनुभवण्यासाठी..

--------------------------------


#मनाच्या ओळी 
भाग क्र २४
देवपण अनुभवण्यासाठी..
--------------------------------

आयुष्यात प्रेम ओथंबून असावे

त्यासाठी आपण कुणासाठी तरी निरागस व्हावे

नंदन, दे फेकून त्या धकाधकीच्या आयुष्याला ,

निरागस मनाचे देवपण अनुभवण्यासाठी 
या क्षणाला ||१||

वंदे मातरम् 

निरागस क्षणांवर प्रेम करणारा :  नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक: ६/१/२०२६, मंगळवार





======================

#मनाच्या ओळी ©️
 भाग क्रमांक ३

डोकावून बघावे




#मनाच्या ओळी ©️
 भाग क्रमांक ३

डोकावून बघावे

----------------------------------

इतरास अक्कल शिकवतांना 
स्वतः कडे अधून मधून डोकावून बघावे
आपलं वास्तव काय आहे ते जाणावे
मग आयुष्याच्या पथावर मार्गस्थ व्हावे
समस्त अक्कलधाऱ्यांनी ||

असो, शुभ सकाळ मित्रांनो..!🙏😊🌹

वंदे मातरम्

तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक - २४/१२/२०२३, रविवार.


==========================

मनाच्या ओळी
 भाग क्रमांक २

त्या जातकुळीस..




#मनाच्या ओळी
 भाग क्रमांक २

त्या जातकुळीस..

-----------------------------------

सकाळी सकाळी इकडे तिकडे भटकावे
भटकंती करताना माणसाला आठवावे 
चिंतन करुनी माणसातील ॲनिमल शोधुन पहावा
स्वतः वर त्याचा प्रभाव पाडून बघावा
समस्त उत्तरे मिळतील त्या त्या जातकुळीस ||

असो , शुभ सकाळ मित्रांनो..!😊🌹🙏🏻

वंदे मातरम्

तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


दिनांक - १०/१२/२०२३, रविवार

========================

#मनाच्या ओळी
भाग क्रमांक २२
स्वतः , स्वतःला...!



#मनाच्या ओळी
भाग क्रमांक २२
स्वतः , स्वतःला...!

--------------------------------

स्वतःला निवांतवेळी निरखून पहावं 
त्या पाहण्यात फक्त दार्शनिक नसावं
आंतरिक होऊन निवांत बसावं 
निवांत पाहताना स्वतः स्वतःचा विरोधक व्हावं 
स्वतः स्वतः चा विरोधक झाल्यावर श्रीकृष्ण सापडतो आयुष्यात. || १ ||

जय श्रीकृष्ण 
वंदे मातरम् 
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
दिनांक - ८/११/२०२५, शनिवार.

========================

#मनाच्या ओळी 

भाग क्र: २३

जाणीव करून देतात..


 

#मनाच्या ओळी 

भाग क्र: २३


जाणीव करून देतात..


------------------------------------------


सकाळचं भटकनं अनेक अनोळखी मनांच्या आयुष्यात शिरकाव करतं.


आपल्या आयुष्यातील उर्वरित क्षण अजूनही जिवंत आहेत यापेक्षा दुसरे काही असतं..?


इतरांचा राग, द्वेष , अहंकार यांची भ्रामक किल्मिशं गळून पडतात.


हा क्षण माझा आहे आपण अजूनही जिवंत आहोत याची जाणीव करून देतात.


जे आपले जाणवतात त्यांच्याशीच मन अन् वाचा सदैव बोलत राहते.


जे असे जाणवत नाहीत, दुरून डोंगर साजरे बरे वाटते


आयुष्याचे जीवन गाणे गात गात मन असेच पुढे पुढे चालत राहते.


आयुष्याच्या अनेकानेक स्वल्पविरामात, पूर्णविरामला भेटण्यासाठी..


वंदे मातरम् 

आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

दिनांक - २३/११/२०२५, रविवार.

=====================

मनाच्या ओळी (भाग क्रमांक १६ )

स्वतः साठी..




#मनाच्या ओळी  (भाग क्रमांक १६ )


स्वतः साठी..


----------------------------------------


राम प्रहरी उठूनी ठाण मांडून बसावे

मनी इष्ट ते चिंतित जावे

अनिष्टांपासूनी योग्य ते शिकावे

उगवत्या सूर्याच्या प्रभेला वंदन करुनी

निळ्याशार विस्तीर्ण गगना  सारखे प्रगल्भ व्हावे

स्वतः साठी ||


वंदे मातरम् 


तात्पुरते पद्य लिहिणारा एक गद्य प्रेमी पुरुष – नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


(© सदरील  काव्य  कॉपीराइट केलेलं असून संबंधित काव्याचे संपूर्ण हक्क राखून ठेवण्यात आलेले आहेत.)

दिनांक -  २४/११/२०२४, रविवार


====================

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पुरुषाला देखील वाटतं..!


 


#चिंतन


पुरुषाला देखील वाटतं..!


=====================


पुरुषाला देखील आपलं मन समजून उमजून घेणारं मन हवं असतं. 


जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून गेलेलं पुरुषाचं आयुष्य असतं. 


पुरुषालाही वाटतं, आपलं एखादं माहेर असावं.


माहेरच्या मायेच्या माणसांसोबत मन हलकं करावं. 


समाजमनाने माहेरचं अंगण फक्त स्रीच्या आयुष्याला दिलं.


पुरुषाला मायेच्या या अंगणाला पारखं केलं. 


असेल घरात कुणी भावनेवर प्रेम करणारं तर पुरुष व्यक्त करतो आत्मभाव.


नसता मूकपणे सकाळी उठून शोधतो कष्ट करण्याचे एखादे गाव.


पुरुषाला त्याच्या वार्धक्यात एकटेपणाची सल सतावत असते. 


उभ्या आयुष्यात कुटुंबासाठी सोसलेल्या दिवसांच्या आठवणींची गाठोडी फक्त सोबत असते.


तो हाय मोकळून रडू शकत नाही, याची मुभा त्याला समाज देत नाही.

 

तो हाय मोकळून रडलाच तर समाज त्याला समजावत असतो ' तू पुरुष आहेस तुला हे शोभत नाही. '


पुरुषालाही वाटतं आपल्यासाठी कायदा असावा.


कुणाच्यातरी एकांगी हल्ल्यांचा नाहक त्रास नसावा. 


अजून आपल्या लोकशाहीला बरीच मजल गाठायची आहे.


एक ना एक दिवस पुरुषालाही पुरुष आयोग लाभून सुखाने आयुष्य जगायचे आहे. 


वंदे मातरम् 


असो, आज पुरुष दिन आहे. त्यानिमित्त समस्त पुरुष वर्गाला समर्पित पुरुष दिनाच्या शुभेच्छा..!🙏


पद्य रचनाकार पुरुष : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील पद्य कॉपीराइट केलेले असून सदरील पद्याचे संपूर्ण हक्क राखून आहेत.)

दिनांक : १९/११/२०२५, बुधवार

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

वंदे मातरम्..!


 

#चिंतन


वंदे मातरम्..!🙏


====================


मातृभूमी ही माणसाच्या आयुष्यात सदैव सोबत असते.

मातृभूमी चिरंजीव असते.

मातृभूमी फक्त गाव , तालुका , जिल्हा राज्य एवढ्या पुरती मर्यादित अन् संकुचितही नसते.

तर मातृभूमी व्यापक अर्थाने एक राष्ट्र, देश म्हणून असते.

आणि देश सर्वतोपरी सदा सर्वदा श्रेष्ठ असतो.


वंदे मातरम् हा फक्त एका राष्ट्रीय गीताचा भाग नाही तर तो आपल्या समस्त भारतीयांचा प्राण आहे..!

वंदे मातरम् आपल्या समस्त भारतीयांच्या मूळ अस्तित्वाचा प्राण आहे..!

वंदे मातरम् आपल्या मूळ सांस्कृतिक ओळखीची निशाणी आहे..!

वंदे मातरम् आपल्या जाणिवांची ओळख आहे..!


या संपूर्ण पृथ्वीवर फक्त आपणच भारतीय आपल्या देशाला श्रध्देने आई समजतो. त्या अत्यंत उच्च कोटीच्या प्रेमळ अन् मायाळू मूल्याचा वंदे मातरम् हा व्यक्त होणारा हुंकार आहे..!


इ.स. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती, ती रद्द करून पुन्हा फाळणी केलेला भारतमातेचा भूभाग भारतमातेत विलीन करण्यात आला होता. त्यावेळी वंदे मातरम् हा जय घोष मूलमंत्र झाला होता. एवढी सामाजिक एकजुटीची शक्ती आजतागायत एकमेव वंदे मातरम् या जय घोषात आढळून आलेली आहे.


अर्वाचीन भारताच्या इतिहासात जहाल अन् मवाळ या दोन्ही विचारधारांनी, अधिकृत संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी संमत केलेला जयघोष म्हणजे वंदे मातरम् आहे..!


आपल्या पूर्वजांनी आपल्या या भारत भूमीला जपून अन् सुरक्षित ठेवण्यासाठी कधी शस्त्र हाती घेतले, कधी शास्त्र हाती घेतले तर कधी नम्रतेचे मूल्य अंगिकारले. त्या समस्त भारतीयांच्या अंतर्मनातील स्फुल्लिंग जागृत केले ते वंदे मातरम् याच जय घोषाने..! 


आपल्या पूर्वजांनी पेटविलेले ते वंदे मातरम् चे स्फुल्लिंग आजही अन् भविष्यातही सदैव निनादत राहील..!


आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंदे मातरम् हा जय घोष आपल्या आईला, यथा योग्य स्री शक्तीला हृदयातून केलेलं विनम्र वंदन असते. आईचे अन् यथा योग्य स्री शक्तीचे महत्त्व अन् ममत्व या भूतलावर सर्वात श्रेष्ठ असते.त्या श्रेष्ठत्वाला केलेलं वंदन म्हणजेच वंदे मातरम् आहे असे माझे ठाम मत आहे.


जेव्हा पासून माझं लग्न झालं आहे तेंव्हा पासून ते आजतागायत माझ्या बहुतांश शर्टच्या खिशाच्या बाहेरील बाजूवर माझ्या धर्मपत्नीने साध्या सुई दोऱ्याने' वंदे मातरम् ' आहे. 

माझ्या शर्टच्या खिशावर माझ्या पत्नीने अगदी समरसून सुई दोऱ्याने वंदे मातरम् लिहिलेले असते, त्यामुळं एका अर्थाने माझ्या पत्नीचा आत्मिक सहवास सदैव सोबत असतो ही प्रेमळ भावना सदैव सोबत असते.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारतमातेला वंदन केल्याची श्रद्धेय भावना सदैव हृदयात असते.


असो, आज वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे झाली आहेत. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचेयता बंकिमचंद्र चतर्जी यांना विनम्र अभिवादन..!🙏


ता. क. : वेद मंत्राहुनी वंद्य आम्हा वंद्य वंदे मातरम्..!


वंदे मातरम् 


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ७/११/२०२५, शुक्रवार

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा अन् आठवणी..!



 


#आमचे गाव आमची माणसं ©️


तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा अन् आठवणी..!


====================


आज दिनांक ५/११/२०२५ रोजी आमच्या घरी तुलसी विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अक्षरा दीदी , आराध्या दीदी , खुशी दीदी,  मुगदीया बाबा , शेजारचं कुटुंब , अन् आम्ही कुटुंबीय असे एकंदरीत वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. सदरील विवाह सोहळ्याला मंगलाष्टके u tube वरील सुश्राव्य स्वरातील होते. ज्यावेळी मंगलाष्टके सुरू होते त्यावेळी माझा प्रिय बालमित्र अजय काळे गुरू याची आठवण आली. 


माझ्या बालपणी ते माध्यमिक वयोगटात असे पर्यंत आमच्या पालखेड येथील घरी माझी स्व.आई तुळशीच्या लग्नाच्या दिवशी पूजनाची तयारी करत असायची. ज्या दिवशी तुळशीचे लग्न आहे त्यादिवशी जिथं तुलसी विवाह संपन्न होणार आहे त्या जागेला आमच्या घराच्या शेजारच्या क्षीरसागर काकू किंवा गल्लीतील अश्रभ चाचा शेख यांच्या घरी असलेल्या गाईचे शेण आणून सारवून घेत असायची.माझ्या आईची तब्येत काहीशी स्थूल होती, मात्र माझी स्व.आई, धार्मिक काहीही असलं की देहभान विसरून धार्मिक कार्य बडेजाव न करता व्यवस्थित कसं होईल याची पुरेपूर काळजी घेत असायची.श्रद्धा अन् भक्ती देहभान विसरायला लावते याचं ते उदाहरण होते.संध्याकाळ झाली की, आमच्याच गल्लीतील कोपऱ्यावर राहत असलेल्या तीर्थस्वरुप स्व.पोपटराव काका ऋषिपाठक यांना तुळशीचे लग्न लावायला, मंगलाष्टके म्हणायला, पूजा करायला बोलावण्यासाठी मी पळत पळत जाऊन घेऊन यायचो.स्व.पोपटराव काका ऋषिपाठक यांच्या आवाजात मंगलाष्टके संपन्न झाली की, माझी स्व.आई उपस्थित प्रत्येकाच्या तळहातावर खडी साखरेचा प्रसाद द्यायची. आज मी पन्नाशशीच्या उंबरठ्यावर आहे. माझ्या आईचा स्वर्गवास होऊन दहा वर्षे झाली आहे. माझ्या स्व.आईने दिलेल्या खडी साखरेच्या प्रसादाची गोडी पुन्हा पुढील आयुष्यात कधी लाभली नाही अन् लाभण्याची अजिबात शक्यता नाही.त्याचं कारण आता अन् भविष्यात अनेकानेक मधुर , मिष्टान्न अन्न म्हणुन लाभले अन् लाभेल मात्र त्यात आईच्या हाताची अमृत चव नाही अन् नसेल..! आईचा सहवास , आईने स्वतःच्या हाताने बनवून आपल्याला खाऊ घातलेले जेवण भावूक स्री अन् पुरुषाच्या अंतिम श्वासापर्यंत सोबतच असते.गतकाळातील आईचा सहवास अन् आईने स्वतः बनवून आपल्याला खाऊ घातलेले जेवण किंवा दिलेला तीर्थप्रसाद , आईच्या पश्चात तिच्या लेकराला संजीवन अमृताची आठवण सदैव करून देत असतो.हा माझा स्वानुभव आहे.


आज आमच्या घरी तुलसी विवाह निमित्त माझ्या धर्मपत्नीने पूजनाचे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मांडले. घरातील तुळशीला व्यवस्थितपणे मांडून माझ्याच पत्नीने तुळशीला मिऱ्या बांधून साडी नेसली. तुळशीला योग्य ते अलंकार घातले होते. आजच्या तुलसी विवाह निमित्त तुळश अतिशय सुंदर अन्  पावित्र्यात न्हाऊन अत्यंत देखणी दिसत होती.एका स्रीने दुसऱ्या एका स्रीच्या सन्मानाचा केलेला साज शृंगार होता गतकाळातील तो अन् वर्तमानातील हा..!


आज आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी तुलसी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींना दिवाळीचे फराळ श्रध्येने देण्यात आले. अन्न प्रसाद खाऊन झाल्यानंतर सर्वांनी तुलसी अन् देवघरातील बाळ कृष्ण यांचे मनोभावे दर्शन घेतले.


श्रीकृष्ण हा सर्व मानव जातीचा सखा होता आहे अन् सदैव राहील. एखाद्याच्या आयुष्यात वयाची बंधने झुगारून कुणीतरी सखा असणं अन् त्या  पवित्र नात्याला जपणं याचा आदर्श एकमेव श्रीकृष्ण हाच होता अन् राहील.


असो, एकंदरीत कुठलाही फारसा बडेजाव न करता आमच्या घरी तुलसी विवाह संपन्न झाला.


तसेच आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे.आम्ही बालपणी आमच्या गावातील श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री संपूर्ण मंदिरात पणत्यातील दिवे लावत असायचो. सोबत माझे जिवलग बालमित्र सोमनाथ गायकवाड, रमेश गायकवाड, विजय गायकवाड, राजू निकम , विष्णू पगार, संजय राऊत , गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, नंदकिशोर जाधव, स्व.शाम शेळके अन् अनेकानेक मित्र या उत्सवात सहभागी होत असायचो. ते आयुष्य निरागस आयुष्य होते.निरागसतेत आनंद प्राप्त होतो अन् आम्ही तत्कालीन बालमित्र त्याचा आनंद घेऊन तेवढ्या क्षणांना जगून आनंदीत होत असायचो.


माझ्यासह बाहेरगावी स्थायिक झालेल्या काही बालमित्रांच्या आयुष्यातील भुतकाळ अन् तिथलं वास्तव्य पुन्हा वर्तमानात अथवा भविष्यात पालखेड गावात कधी आयुष्यात लाभेल का नाही याची खात्री नाही.काळाच्या ओघात आम्हा काही बालमित्रांचे गाव पाठीमागे सुटले , मात्र तिथल्या आठवणी सदैव सोबत आहेत अन् राहतील.


जय श्रीकृष्ण 

वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ५/११/२०२५, बुधवार 

त्रिपुरारी पौर्णिमा

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

शेवटची पिढी..!


 

#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


शेवटची पिढी..!


=====================


माणसाच्या आयुष्यात माणसांनी आपापल्या पिढ्यांना, पूर्वजांना पूजत पूजत आजच्या काळातील विज्ञानयुगा पर्यंत मजल मारली आहे. ही मजल मारताना माणसांच्या कित्येक पिढ्या खपल्या , खपत आहे अन् भविष्यात खपणार देखील आहे. माझे समवयस्क किंवा माझ्या पेक्षा ज्येष्ठ असलेल्या पिढीचे जे कुणी ज्येष्ठ आहेत ते एका अर्थाने सुखी म्हणायला हवेत. अर्थात सुखाच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या बौद्धिक अन् मानसिक क्षमतेनुसार भिन्न भिन्न असतात. जुनी जाणती पिढी निरागसच होती अन् जे याचं पिढीतील हयात आहेत ते अद्यापही निरागसच आहेत.भले अशा ज्येष्ठांचा स्वभाव कसाही असो.मात्र ही जुनी जाणती पिढी निरागसच आहे. निरागसता फक्त बालवयात असते असे काही नसते.निरागसता ही साधी भोळी मानसिक अवस्था असते. साधी भोळी मानसिक अवस्था ही वयाला बंदिस्त नसते. या अशा साध्या भोळ्या अन् एका विशिष्ट पठडीतील मानसिक वर्तनात जगलेल्या अन् जगत असलेल्या पिढीच्या व्यक्त - अव्यक्त होण्याच्या पद्धती देखील एका विशिष्ट मर्यादे पर्यंतच येऊन थांबत असतात. या जुन्या जाणत्या पिढीचे भाव दर्शन अधून मधून घ्यायला हवे, आयुष्यातला बराच अहंकार कुठल्या कुठं पळून जातो.


मी अन् माझी पत्नी प्रवासात असताना रस्त्याच्या कडेला काही भाजी विक्रेते भाजी विकायला बसलेले दिसले.आम्ही आमचं वाहन थांबवलं अन् भाजी विक्रेत्यांकडे गेलो.तिथं बसलेल्या एका मावशीकडे आम्ही उभयतांनी आवश्यक तेवढा भाजीपाला विकत घेतला.घेवड्याच्या शेंगा अन् आळूची पाने विकत घेतली.भाजीपाला विकत घेताना त्यांचा भाव अजिबात केला नाही.त्या मावशींनी जो भाव सांगितला ती रक्कम त्या मावशीला दिली. घेवड्याच्या शेंगा अन् आळुची पाने विकत घेतल्यावर थोड्याशा घेवड्याच्या शेंगा अन् थोडे आळुची पाने मावशीकडे शिल्लक राहिली. आम्ही आमचा भाजीपाला विकत घेतला अन् निघालो इतक्यात..

त्या मावशींनी मला आवाज दिला..

" अरे भाऊ, थोड्याशाच घेवड्याच्या शेंगा आन...तीन चार आळुची पानं उरली हाये.घेऊन जा तशीच..!"

आम्ही परत त्या मावशीकडे आलो अन् थोड्याशा शिल्लक राहिलेल्या शेंगा अन् आळुची आमच्या पिशवीत घेतले.त्याचे पैसे मी त्या मावशीला द्यायला लागलो तर...ती मावशी मला म्हणाली...

" अरे भाऊ , एवढ्याचे कशाला पैसे देतो. .जा घेऊन तसेच..!"

मी त्या मावशीला म्हणालो - " तसं नाही मावशी, तुम्हाला याचे काहीतरी पैसे घ्यावेच लागतील.नाहीतर आम्ही घेत नाही. "

हे ऐकल्यावर त्या मावशींनी पुन्हा नकार दिला अन् आग्रहाने शेंगा अन् आळुची पानं बळजबरी आमच्याकडे सुपूर्द केली.नाही नाही म्हणत अखेर योग्य ती रक्कम दिली अन् मावशींनी मोठ्या मुश्किलीने ती रक्कम घेतली.


मी मावशींना बोलतं केलं. अगोदर मी माझा परिचय करून दिला.कुठला , काय करतो कुठे सेवा करत होतो वगैरे. माझ्या बोलण्यात अंधारी गावाचे नाव ऐकल्या ऐकल्या मावशी मध्येच मला थांबवून म्हणाल्या..

" अरे भाऊ, आमचे पाहुणे हाये अंधारी येथे. आन तू एवढ्या लांब येऊन जाऊन करत होतास का..? लई तरास झाला असण..!"

मावशीच्या त्या वाक्यात मला अपलुकीचा प्रश्न अन् काळजीचा स्वर जाणवला. पुरुषाच्या पेक्षा स्री आपुलकीने, मायेने विचारपूस करते काळजी व्यक्त करते हाच भावार्थ त्या मावशीच्या प्रश्नात अन् वाक्यात मला जाणवला होता.मावशींनी त्यांच्या अंधारी येथील पाहुण्यांची जी जी आडनावे सांगितली त्यावरून मला अजून खात्री पटली होती. 


मी शिक्षक म्हणून सेवा केलेल्या अंधारी गावातील मावशी नातेवाईक निघाल्याने मी मावशीकडे खूप आत्मीयतेने गेलो.अगदी जवळ जाऊन बसलो. माणसाच्या आयुष्यात ओळखीचा थोडासा जरी धागा जुळला की नात्याच्या प्रेमळ अन् मायाळू वस्राचे शिवणकाम खूप छान पैकी विणल्या जाते हा माझा स्वानुभव आहे.त्याची प्रचिती पुन्हा एकदा या मावशींच्या भेटीत मला जाणवली होती. अंधारी सारख्या दूरच्या गावी मी सेवेत होतो याचं मावशीला तिच्या बोलण्यावरून अप्रूप वाटलं होतं. आपल्या पाहुण्यांच्या गावी मी शिक्षक म्हणून सेवेत होतो यामुळं ती माय माऊली अगदी मनमोकळेपणाने माझ्याशी अन् माझ्या पत्नीशी बोलू लागली होती.अगदी थोडासा ओळखीचा धागा जुळला की, नात्यांची वीण घट्ट होत जाते हा अनुभव आम्हाला येत होता. नातं असतं तरी काय..? एकमेकांच्या सामाजिक अन् भावनिक जाणीवा ओळखून एकमेकांना आपुलकी, जिव्हाळा अन् निस्सीम प्रेम देणं अन् घेणं यापेक्षा नात्याची साधी सोपी व्याख्या दुसरी कोणतीच नसावी असे माझे ठाम मत आहे. मग ते नाते रक्ताचे असो अथवा रक्तविरहित..! बऱ्याचदा आपुलकी, जिव्हाळा अन् निस्सीम प्रेम आई वडील वगळता हे मूल्य रक्तविरहित नात्यात जास्त प्रमाणात आढळून येते.


आम्हाला पुढील प्रवासासाठी निघायचे होते.बऱ्याच गप्पा झाल्यावर त्या माय माऊलीचा निरोप घेण्यापूर्वी आम्ही पती पत्नीने त्या माय माऊलीचे दर्शन घेतले.मी निघण्यापूर्वी त्या माय माऊली मावशीच्या पाठीवर अगदी मायेने हात ठेवला अन् " येतो मावशी..!" असं म्हणालो.त्यावेळी त्या माय माऊलीचे डोळे पाणावले होते. कुणी आपल्याशी प्रेमाने, आपुलकीने , आत्मीयतेने कुठलाही बडेजावपणा न करता भेटलं की , भावूक माणसाचे मन भरून येते. असेच काहीसे त्या माय माऊलीला वाटले असावे. प्रवासात भेटलेल्या माय माऊलीचा भाव निरोप घेतला. राहून राहून मला असे वाटू लागले होते की, आपली स्व.आई तर या माय माऊलीच्या हृदयात येऊन आपल्याशी बोलत तर नसावी ना..? हा भावनिक प्रश्न माझ्या मनात आला होता.मी याविषयी माझ्या पत्नीला देखील बोललो.माणसाचे मन, आपल्या पूर्वजांना त्यांच्या पश्चात कुठे ना कुठे तरी अन् कुणात तरी शोधत असते ही मानसिक अवस्था माझ्याही बाबतीत होत होती. 


अत्यंत प्रेमळ , मायाळू अन् वय झालं तरी आपलं निरागस मन जपणारी ही शेवटची पिढी आहे असे मला जाणवू लागले होते.


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १२/१०/२०२५, रविवार

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

सदगुण विकृती



#चिंतन ©️

सदगुण विकृती

====================================

सदगुण विकृती असा तो पूर्ण शब्द आहे. मित्रांनो,मुळात एक लक्षात घ्या की,मराठीतील बरेच शब्द आज कालबाह्य झाले आहेत,त्यात हा एक शब्द सदगुण विकृती..!

सदगुण म्हणजे चांगले गुण अन् विकृती म्हणजे स्वभाव.सदगुण विकृती याचा अर्थ येथे चांगला स्वभाव असा अभिप्रेत आहे.हे जुने लिखाण आहे. तात्याराव सावरकर यांचे मराठी भाषेतील शब्द संपदेचे योगदान अमूल्य आहे.त्यांनी कित्येक नवनवीन शब्द आपल्या मराठी भाषेला दिले आहेत.

काळाच्या ओघात विकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा न राहता तो दोष किंवा वाईट अशा अर्थाने उल्लेखित होऊ लागला.असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे पुरोगामी साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर लिहिलेले एक खूप उत्कृष्ट पुस्तक म्हणजे  दगलबाज शिवाजी होय. यातील दगलबाज या शब्दाचा  खरा अर्थ चाणाक्ष,चतुर असा आहे. मात्र ज्यांना माहित नव्हते त्यांनी त्याचा अर्थ धोकेबाज असाच लावला.त्यावरून कित्येकांनी वाद पण केला होता. मात्र जेंव्हा दगलबाज  या मराठी शब्दांचा खरा अर्थ समोर  आला तेंव्हा  विरोधकांचे समाधान झाले.

येथेही सदगुण विकृती याचा तत्कालीन मराठी भाषेच्या अर्थाने  चांगल्या स्वभावाचे असाच आहे. सदगुण विकृती याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेऊ नये ही नम्र अपेक्षा.

वंदे मातरम्🙏🏻

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक -१३/९/२०२२, मंगळवार
 

 

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

आज अखेर शिक्कामोर्तब झाले..!


 

#चिंतन ©️


आज अखेर शिक्कामोर्तब झाले..!


=====================


माझे फेसबुक मित्र सौरभ भाऊ रत्नपारखी ( नाशिक -  एस टी महामंडळ अधिकारी ) यांच्या कार्यालयात दिग्दर्शक लक्ष्मणजी उतेकर यांनी आज भेट दिल्याची  फेसबुक पोस्ट बघितली / वाचली अन् मी मागे एकदा वाचलेल्या बातमीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले.


स्व. विठाबाई नारायणगावकर या महान सारस्वताला पुन्हा एकदा आजच्या रसिक माय बापाच्या समोर प्रस्तुत करण्याचे पुण्य लक्ष्मणजी उतेकर ( छावा चित्रपटाचे दिग्दर्शक )  यांच्या नशिबी लिहिल्या जाणार आहे. निमित्त होते, या महान सारस्वताच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करायचे भाग्य..!


तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर..!


गरोदर होती, तरी देखील रसिक माय बापाच्या इच्छेखातर स्टेजवर नाचली..!

कळा खूप असह्य झाल्या, अखेर बाळाला जन्म देण्यासाठी स्टेजच्या मागे गेली..!

आहे त्या परिस्थितीत बाळा जन्म दिला अन् ती माय माऊली ओली बाळंतीण त्याही अवस्थेत पुन्हा स्टेजवर आली अन् आपली कला सादर करून कलेच्या इतिहासात अजरामर झाली.


भारत चीन युद्धाच्या वेळी आपलं तीन महिन्याचे लेकरू घरी नातेवाईकाकडे ठेवून ती माय माऊली ओली बाळंतीन आपल्या भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कडाक्याच्या थंडीत भारत चीन सीमेवर कला सादर करण्यासाठी गेली.


सामाजिक भेदाचे चटके सोसत सोसत जगली, तेही स्वाभिमानाने..!


त्या माय माऊलीच्या विदारक आयुष्याला जगाच्या समोर यशस्वीपणे आणण्यात संपादक आदरणीय माधव गडकरी साहेब अन् वृत्त निवेदक स्व.प्रदीपजी भिडे यांचं खूप मोठे योगदान होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेखिका आदरणीय दुर्गा भागवत यांनी स्व. विठाबाई नारायणगावकर यांना त्यांच्या आर्थिक तंगीच्या  काळात ज्यावेळी आर्थिक मदत केली होती त्यावेळी साक्षात कुबेर , कुबेर झाला असेल..!


स्व. विठाबाई नारायणगावकर या महान सारस्वताविषयी लिहिण्यासारखं खूप काही आहे.नंतर नक्कीच लिहिल. 


लक्ष्मणजी उतेकर दिग्दर्शित ' विठा ' या चित्रपटाची अत्यंत उत्सुकता आहे.


ता.क. - समाज, कलेला देखील सामाजिक भेदभावात बघत असतो. हा देखील जातीयवाद होता अन् आहे..!


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३/९/२०२५, बुधवार