शनिवार, २२ एप्रिल, २०२३

दिलू..!





आमचे गाव आमची माणसं ©️

दिलू..!

====================================

प्रिय बालमित्र दिलू ,मी काल तुला शेताच्या बांधावरून पार बेंबीच्या देठापासून ओरडून आवाज दिला अन् तूही तुझी दुचाकी थांबवून मला बघितल्यावर खूप आनंदित होऊन आलास..! मी ज्यावेळी तुला खूप मोठ्ठ्याने आवाज दिला, त्यावेळी माझ्या सोबत असलेली माझी पत्नी देखील चक्रावून गेली की, ' हे एवढे मोठ्याने कुणाला ओरडून आवाज देऊ राहिले..?' मात्र भेट झाल्यावर ज्यावेळी मित्रा दिलू , तुझी ओळख माझ्या पत्नीला करून दिली त्यावेळी तिलाही समजले की, ही मैत्री जुनी आहे अन् त्यात अघळपघळपणा आहे. 

जे जुने नाते असते, तिथं जास्त प्रमाणात मानवी भाव भावनांची नवनिर्मिती करण्याची गरज पडत नाही. जुन्या नात्यात आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातील ठेवा जतन करून ठेवलेला असतो. जुन्या जाणत्या नात्याला खूप जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज पडत नाही. म्हणून जुनी नाती दीर्घकाळ टिकत असावीत. बालमित्र हे असेच जुने नाते असते, जे दीर्घकाळ टिकणारे असते.तिथं जास्त प्रमाणात स्पष्टीकरण द्यायची गरज पडत नाही.आपण किती शाहजूक आहोत हे फक्त आपल्या बालमित्रांनाच माहीत असते. इतर नाती यापासून कोसोदूर असतात. मी स्वतः ला खूप नशीबवान समजतो की, मला असे खूप जिवलग बालमित्र भेटले ज्यांच्या जवळ अगदी हृदयातून व्यक्त होत गेलो अन् तेही व्यक्त होत गेले. आपल्याला ठिकाण्यावर आणण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपले आई वडील अन् बालमित्रात असते असे माझे ठाम मत आहे.कारण ही नाती आपल्या आयुष्यातील सर्वात जुनी नाती असतात. जसे आम्ही काही बालमित्र ज्यावेळी एकमेकांना भेटत असतो, त्यावेळी एकमेकांना ठिकाण्यावर आणण्याचे कार्य करत असतो. आम्हीही माणूस आहोत, आमच्या कडूनही चुका होत असतात. आमच्या चुकांना ठिकाण्यावर आणणारे आम्हा काही बालमित्रांचे आई वडील आज हयात नाहीत, मात्र आम्हा एकमेकांना ठिकाण्यावर आणणारे जिवलग बालमित्र आहेत जे ही भूमिका निभावत असतात..! ज्यांच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यात थोडेफार दोरीत राहू शकलो, शकतो अन् शकू..! मात्र असे खूपच कमी माणसं असतात, ज्यांच्या आयुष्यात बालमित्र सोडून आयुष्यातील प्रवासात जे इतर मित्र भेटले , ज्यांच्यात अशी नात्याची निर्मिती झाली. मात्र अशांचे प्रमाण खूप अत्यल्प आहे.
 
मित्रा दिलू, आपण थोड्या वेळात गतकाळातील आयुष्याच्या कित्येक गोधड्या उधडून काढल्या. त्या आठवणीतील कित्येक गोधड्या उधडून काढत असताना एकजण त्यावेळी आपल्या दोघांच्याही विचारांच्या धाग्यात यायचा अन् तो म्हणजे आपला खूप जिवलग बालमित्र स्व.शाम मुरलीधर शेळके..! प्रिय बालमित्र स्व. शाम हा आजही आपल्यात आहे, त्याचं दर्शन आपल्या अनेक मित्रांच्या भेटीत होत असते. फक्त अशावेळी शाम प्रत्यक्ष नसतो, तर अप्रत्यक्ष उपस्थित असतो. त्याची उपस्थिती आठवणीच्या रूपाने असते.

मला आयुष्यात ऐश्वर्य असणारे माणसं भेटली, पण ऐश्वर्यसंपन्न असणारी फारच मोजकी भेटली. माझ्या मते फक्त ऐश्वर्य असणारी माणसं अहंकारी असतात. त्यांच्यात अनेक दृश्य अदृश्य अहंकारी वृत्तीचा अहंकार असतो.मात्र ऐश्वर्यसंपन्न माणूस हा मनाने खूप श्रीमंत असतो.तिथं दृश्य अदृश्य स्वरूपातील अहंकार औषधालाही सापडत नाही. खूप अघळपघळ स्वभाव असतो अशा गोड माणसांचा..! त्यात आमचा प्रिय मित्र दिलू नक्कीच आहे. आज आपली खूप कमी वेळ भेट झाली,पण त्या भेटीत खूप काही बोललो..! आग्रहाचं खूप निमंत्रण झालं, पण वेळ नव्हती..! आपल्या गतकाळात ज्या पार्ट्या ( येथे पार्ट्या याचा अर्थ त्या तश्या ओल्या अर्थाने अर्थ अपेक्षित नाही अन् राजकीय अर्थाने तर अजिबात नाही. कारण आम्ही काही बालमित्र भेटल्यावर अन् त्यात मी सहभागी असल्यावर या अशा दोन्ही पार्ट्यांना आम्ही कोलतो..!) असो, आपल्या गतकाळात ज्या पार्ट्या अर्थात दाळ बट्टीच्या केल्या होत्या , तो आग्रह आज तू पुन्हा केलास,पण मित्रा मला पुढील प्रवासासाठी उशीर झाला असता..! त्यामुळं आपल्या आपल्या सोयीच्या पार्टीचे नियोजन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. भविष्यात तो योग नक्कीच जुळून आणू. मी तुला आज तेच सांगितले की, दाळ बट्टीची पार्टी करू मात्र त्यावेळी एक खंत असेल अन् ती म्हणजे त्यात प्रिय बालमित्र स्व. शाम शेळके सहभागी नसेल..!

प्रिय बालमित्र दिलू उपाख्य दिलीप सूराशे या माझ्या बालमित्रावर मी माझ्या ब्लॉगवर यापूर्वी देखील एक लेख लिहिलेला आहे.दिलीप सारखे क्रिकेट खेळाडू ग्रामीण भागात खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. दिलीपला जर नव्वदच्या दशकात योग्य ते मार्गदर्शन लाभले असते तर खात्रीने सांगतो, हाच आमचा प्रिय मित्र दिलीप, वरच्या स्तरावर एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला गेला असता.मात्र परिस्थिती अन् परिसर यामुळे असे होऊ शकले नाही. पालखेड येथील गतकाळातील आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघाचा दिलीप ओपनर फलंदाज होता. तसेच आमच्या पालखेड गावात माझ्या पाहण्यात फारच मोजकी अशी माणसं आहेत ,ज्यांच कधीही कुणाशीही भांडण झालेलं नाही, त्यात हा माझा प्रिय बालमित्र दिलीप सुराशे एक आहे..!

असो, मित्रा दिलू, भेटू पुन्हा कधीतरी..! 😊🙏🏻

वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २३/४/२०२३, रविवार.

रविवार, १६ एप्रिल, २०२३

आयुष्याच्या संध्याकाळचे सखा अन् सखी..!


 


चिंतन ©️


आयुष्याच्या संध्याकाळचे सखा अन् सखी..!


===================================


काल दिनांक १५/४/२०२३, शनिवार रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील समर्थनगर परिसरातील  वरद विनायक गणेश चौकात उभा होतो. रखरखत्या उन्हात वर्दळ काहीशी कमीच होती. मला माझ्या घराकडे जाण्याची ओढ लागली होती.इतक्यात एक वृद्ध जोडपे माझ्या बाजूला येऊन थांबले.त्यांच्या हातात पिशवी होती.त्यातील कागदांवरून ती फाईल दवाखान्याची वाटत होती. ते वृद्ध जोडपे खूप थकलेले जाणवत होते. सिग्नल लागल्यावर ते वृद्ध जोडपे  रस्त्याच्या पलीकडे चालत चालत गेले.


माणसाच्या वार्धक्यातील व्यथांचे , प्रश्नांचे काहूर माझ्या मनात यायला लागले. कोण असतील हे वयोवृध्द स्री अन् पुरुष..? यांच्या सोबत कुणी तरुण - तरुणी किंवा  कुणी प्रौढ  का नसेल..? थोर साहित्यिक वि. वा.शिरवाडकरांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार हेच का ते..? अजुनही नटसम्राट आपल्या वार्धक्यातील आयुष्याची संहिता आयुष्याच्या रंगमंचावर सादर करत आहेत का..? जसे त्या स्वाभिमानी नटसम्राटावर त्याच्याच पिल्लाने म्हणजेच त्याच्या  मुलीने चोरीचा आळ घेतला अन् त्या स्वाभिमानी गणपतराव बेलवलकरांची जी तडफड त्यावेळी झाली होती ती आयुष्याची फडफड अजूनही सुरूच आहे का..? तडफड देणारा मुलगा किंवा मुलगी असते यात तिसरं अजुन कुणी असतं का..? असे नानाविध प्रश्नांचे काहूर माजले होते. 


इतक्यात माझी पत्नी आली अन् आम्ही दोघेही घराकडे निघालो.मात्र निघण्याच्या अगोदर माझ्या पत्नीला त्या दोन वृध्दांना दुरून दाखवून कदाचित आपल्या वार्धक्यात होणारी अवस्था  दाखवली अन् आपणच आपल्या आयुष्यात कसे एकमेकांचे सखा अन् सखी आहोत याची जाणीव करून दिली. जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत त्याच्या मायारुपी आयुष्याची कुणीच खात्री देऊ शकत नाही.जो पर्यंत  माणूस हयात असतो तो पर्यंत मानवी स्वभाव अन् त्याची माया याविषयी कुणीही भविष्याची शाश्वती देऊ शकत नाही हेच अंतिम सत्य..!


थोर साहित्यिक वि. वा.शिरवाडकरांनी नटसम्राटाच्या माध्यमातून त्यांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार म्हणजेच त्यांची पत्नी ज्यावेळी रंगमंचावर आणले त्यावेळी ते वृद्ध दांपत्य या भूतलावरील समस्त वृद्धांचे प्रतिनिधित्व करणारे ठरले. फक्त फरक इतकाच होता की, काहींच्या  वृद्धापकाळातील व्यथा ह्या गणपतराव बेलवलकर अन् त्यांच्या सरकारासारख्या  तीव्र होत्या,तर काहींच्या व्यथा ह्या आतल्या आत घुसमटत होत्या.आणखी एक प्रकार यात होता अन् तो म्हणजे आपलं म्हातारपण कोणत्या तरी बालकात, विधात्यात रमवून आयुष्याची संध्याकाळ करून रात्रीच्या कायमच्या विसाव्याला जाणारे..! यापेक्षा वेगळं काही वि. वा.शिरवाडकरांनी नटसम्राटाच्या माध्यमातून त्यांचे मानसपुत्र गणपतराव बेलवलकर अन् त्यांचे सरकार यांच्या वार्धक्यातून दाखवलं नाही.


एक पुरुष अन् एक स्री जो पर्यंत पती पत्नीच्या नात्यात ऐन तारुण्यात, प्रौढ वयात असतात तो पर्यंत त्यांच्यातील वि.स. खांडेकरांना अभिप्रेत असलेली प्रेमाची छटा, प्रेमाचं वलय, समाजमान्य असणारी  वासना यात ते दोघेही स्री अन् पुरुष रममाण होऊन आयुष्याच्या गुलाबी रंगाच्या पावसात भिजत असतात.मात्र जेंव्हा याच आयुष्याचा  ग्रीष्म ऋतू सुरू होतो अन् मग तारुण्यातील ते गुलाबी दिवस आठवल्या शिवाय माणसाच्या हाती काहीच नसतं हेच खरं..! वार्धक्यात कोणत्याही पती किंवा पत्नीला आपला जोडीदार हा खूप हवाहवासा वाटू लागतो. वार्धक्यातील एकमेकांची ही ओढ शारीरिक आकर्षणाची , वासनेची नसते. तर ती ओढ फक्त आणि फक्त एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना सखा अन् सखी या नात्यातून शोधण्याची असते.ही दोघेही वार्धक्यात एकमेकांचा  आधार शोधत आसतात.


कोणत्याही पतीची पत्नी ,त्याच्या अगोदर स्वर्गवासी झाली तर त्याचं हक्काचं स्वयंपाक घर  सुणं सुणं होऊन जातं.याला अत्यल्प अपवाद असतात, ज्यांना सून , लेकी सारखी मिळते तेंव्हा अख्खी हयात स्वयंपाक घर हक्काचं असतं. मात्र तरी देखील अशा विदुर पुरुषाची आयुष्याची संध्याकाळ ही एकटीच असते..! त्या संध्याकाळी तो विदुर पुरुष आपल्या प्रिय पत्नीच्या कित्येक आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वतः ला झुलवत ठेवून मनाची गुलाबी बाजू टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आठवणीत त्या विदुर पुरुषाच्या डोळ्यांच्या कडा नेहमी ओल्या होत असतात, आपल्या स्वर्गीय पत्नीच्या वियोगात..!


आणि जर एखाद्या स्रीचा मग तिचा वयोगट कोणताही असो, पती  तिच्या अगोदर स्वर्गवासी झाला तर तिच्या आयुष्यातील शृंगार नाहीसा होतो.उरतो फक्त देव घरातील फुलांचा बहर तोही देव पूजेसाठी..! स्वतः साठी ती शृंगार करू शकत नाही,कारण तिच्या शृंगाराचा चाहता आता हयात नसतो, ज्याची तिला सदैव आस असते, तो आसवं पुसणारा हयात नसतो.तिला तिचे वियोगातील अश्रू पिऊन घ्यावे लागतात. पती अगोदर स्वर्गवासी झाल्यावर पत्नी आपल्या पतीच्या वियोगात, आठवणीत आपलं आयुष्य जसं मीराबाई ने युगंधर  समोर नसताना पूजले तसे पूजन आपल्या पतीचे करत असते, मनातल्या मनात..! गोकुळातील युगंधराला, चित्तोडगडच्या संत मीराबाईने आठवणीत श्रद्धेने हृदयात पुजलं, अगदी तसेच ती विधवा पत्नी आपल्या पतीला पुजत असते.


असो, पती पत्नीच्या एकमेकांच्या वियोगाच्या वेदनेचा हुंदका खूप मोठा असतो, फक्त तो वेदनेचा हुंदका त्यातील जो या इहलोकात मागे राहतो त्यालाच देता येतो..! इतरांना त्यातील वेदना जाणवणार नाही,कारण वेदना ही ज्याने त्यानेच जाणून घ्यायची सोय त्या विधात्याने केलेली आहे.


ता.क. - मला व माझ्या धर्मपत्नीला  काल एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्याच्या संध्याकाळी  चालणारे सखा अन् सखी असलेले जोडपे दिसले. त्या वृद्ध जोडप्यांचे  म्हातारपण प्रत्येक विवाहित स्री अन् पुरुषाला आहेच..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १६/४/२०२३, रविवार.

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

आशेच्या भांगाची नशा भारी..!


 


चिंतन ©️


आशेच्या भांगाची नशा भारी..!


===================================


नागराज आण्णा मंजुळे, हा माणूस जे काही सादर करतो ते एकदम जब्राट असतं. प्रत्येक सादरीकरणात सामाजिक आशय ठासून भरलेला असतो.त्या आशयाला संवेदना, घुसमट इत्यादी अनेक मानवी भावनांचे कांगोरे असतात.पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, झुंड अन् आता घेऊन आलाय घर बंदूक बिरयानी - आशेच्या भांगाची नशा भारी..!

घरातल्या बंदुकीच्या धाकात बिरयानी एकदम भारी चवदार जमून आली आहे.


नागराज आण्णा मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटांचे वैशिष्टये म्हणजे त्यात अचूक ठिकाणी , अचूक वेळी मर्मावर बोट ठेवणारी अचूक दृश्य होय. घर बंदूक बिरयानी मध्ये देखील ही अचूकता, अचूक वेळी मर्मावर बोट ठेवणारी दाखविण्यात नागराज आण्णा मंजुळे माझ्या मते यशस्वी झाला आहे. घर बंदूक बिरयानी मधील मला जाणवलेली अचूक वेळी अचूक दृश्य पुढील प्रमाणे होय..


या चित्रपटात ज्यावेळी श्रीमंत राजकीय बापाची टवाळखोर तरुण मुलं धुडगूस घालत असतात, त्यावेळी तिथं पोलीस अधिकारी राया पाटील ( नागराज आण्णा मंजुळे) यांची एन्ट्री होते.त्या टवाळखोर तरुणांना राया पाटील धो धो धुतो.त्यावेळी त्यातील एक तरुण, राया पाटील यांना निर्ढावलेल्या आवाजात पुढील आशयाचा संवाद म्हणतो की, " तुम्हाला माहित नाही माझा बाप कोण आहे..?"

यावर राया पाटील ( नागराज आण्णा मंजुळे) त्याला पुढील आशयाचे प्रत्त्युत्तर देतो "आम्ही एकाच बापाला ओळखतो..!" 

असे म्हणून तो राया पाटील बाजूला होतो अन् त्याच्या पाठीमागे सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतो.

या दृष्यातून नागराज आण्णा मंजुळे यांनी अचूक वेळी, कमीत कमी दृश्यात अचूकता टिपली आहे.


दुसरा प्रसंग पुढील प्रमाणे होय..

राजकीय नेत्याच्या घरी वंचित समाजातील हलगी वाजविणारे लोक कलाकार हलगी वाजवत असतात. त्यांना त्यांच्या कलेचा मोबदला तर दूर, उलट त्यांच्या हलगीला फोडल्या जाते. त्यांना अपमानित केल्या जाते. त्याच ठिकाणी थोड्या वेळाने राजकीय पुढाऱ्यांचे निर्ढावलेले तरुण राया पाटील यांना अपमानित करून माफी मागायला लावतात.राया पाटील माफी देखील मागतो.मात्र अतिरेक होतो. राया पाटील तिथून बाहेर पडतो.बाहेर ते वंचित लोक कलाकार हिरमुसल्या सारखे बसलेले असतात.राया पाटील यांच्या लक्षात येते की, यांचा घोर अपमान त्या तरुणांनी अन् राजकीय नेत्याने केलेला असतो.त्यावेळी राया पाटील त्या हलगी वादकांना एकदम भारी हलगी वाजवायला सांगतो अन् त्या राजकीय नेत्याला अन् तिथल्या तरुणांना बदड बदड बदडतो. त्यावेळी हलगी वादकांनी हलगीचा जो ठेका धरला आहे तो निव्वळ अप्रतिम आहे. त्या प्रत्येक ठेक्यात वंचित समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला म्हणून आनंद दर्शवण्यात आला आहे.


राया पाटील यांचं अन् त्यांच्या पत्नीचे खटके उडत असतात.मात्र राया पाटील यांचं त्यांच्या पत्नीवर निस्सीम प्रेम असते.आपल्या पत्नीला चहा बनवून देणारा हळव्या मनाचा राया पाटील अन् ज्यावेळी दोघे मतभेदांमूळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात ते राया पाटील भिन्न भिन्न मानसिकतेत असतात. एकटे राहणारे राया पाटील यांना जंगलात डाकूंना पकडण्यासाठी जायचे असते, त्यावेळी ते एक कप चहा पितात अन् दुसरा चहाचा कप तसाच ठेवून जातात.आपल्या प्रिय पत्नीवर असणाऱ्या निस्सीम प्रेमाची ती सवय त्यातून अचूकपणे दर्शवली आहे.


घर बंदूक बिरयानी चित्रपटात विनोदी पद्धतीने नक्षलवाद , पोलीस, त्यांचं कुटुंब, समाजव्यवस्था इत्यादी अनेक बाबींवर भाष्य करण्यात आले आहे.या चित्रपटातील गुरा नावाची एक डाकू व्यक्तिरेखा आहे. तो त्याच्यावर झालेला अन्याय, समाजव्यवस्थे विरुद्ध त्याची चीड आकाश ठोसर समोर मोठमोठ्याने व्यक्त करतो. त्यावेळी आकाश ठोसर याला समजत नाही की, हा त्याची ही चीड माझ्या समोर कशाला व्यक्त करत आहे म्हणून. आकाश ठोसर वैतागून जातो. आपली खदखद जिथं व्यक्त करायला हवी तिथं व्यक्त करायला हवी असा रोख आकाश ठोसर याचा असतो. यातून योग्य तो संदेश गेला आहे.आपली खदखद योग्य त्या ठिकाणी व्यक्त करायला हवी.नसता ती नाहक बडबड ठरते. मात्र या दृश्यातून मनातली खदखद व्यक्त झाली.


घर बंदूक बिरयानी मधील काही दृश्य आजच्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्त्व करतात. प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात प्रशासकीय व्यवस्था अन् त्यात भरडला जातो तो इतर..! याच अत्यंत प्रभावी सादरीकरण चित्रपटाच्या शेवटी ज्यावेळी जंगलात डाकू विरुद्ध पोलीस यांच्यात चकमक सुरू असते त्यावेळी दर्शविलेले आहे.राया पाटील सारखे प्रामाणिक अधिकारी हे सर्व बघून चक्रावून जातात.


नागराज आण्णा मंजुळे हे आपल्या चित्रपटातून सामाजिक समस्येवर अचूक बोट ठेवतात. जसे फॅन्ड्री चित्रपटाच्या शेवटी जसा जब्या हातात दगड घेऊन मारतो दाखवले आहे.तो दगड जातीयवादी समाजव्यवस्थेला फेकून मारलेला असतो. घर बंदूक बिरयानी मध्ये देखील समाजव्यवस्था व त्यातील समस्या इत्यादींवर अचूक भाष्य करणारे अनेक दृश्य आहेत.


बाकी चित्रपटाच्या शेवटी आमदाराचा स्विय सहायक म्हणून किशोर कदम यांची एन्ट्री अन् त्यांचे संवाद याच चित्रपटाच्या पुढील भागाची उत्कंठा नक्कीच वाढवतात.


प्रिय नागराज आण्णा मंजुळे, घर बंदूक बिरयानीच्या पुढील भागाची प्रचंड उत्सुकता वाढीस लागली बरं का..! 

कारण, आशेच्या भांगाची नशा भारी..!👌😊


वंदे मातरम्..!


एक रसिक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १२/४/२०२३, बुधवार.

रविवार, ९ एप्रिल, २०२३

मित्रा,आप्पा..!


 


आमचे गाव आमची माणसं ©️


मित्रा,आप्पा..!


====================================


थोर लेखक सुहास शिरवळकर यांनी दुनियादारी हे पुस्तक लिहिलं खरं, मात्र याच दुनियादारी पुस्तकातील प्रत्येक पात्र मला माझ्या आयुष्यात भेटत गेले.याचे संपूर्ण श्रेय जाते ते माझा जीवलग बालमित्र स्व.शाम मुरलीधर शेळके यालाच..! माझ्या अन् माझ्या काही बालमित्रांच्या आयुष्यात स्व.शाम शेळके नसता तर आमच्या आयुष्याची दुनियादारी कधी बहरलीच नसती हे ते सर्व मित्र दिवसाच्या चोवीस तासात अन् वर्षाच्या तीनशे पासष्ट अथवा तीनशे सहासष्ट दिवसात कधीही मान्य करतील. याच आयुष्याच्या प्रवासात जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके मुळे अजुन काही मित्रांचा प्रवेश झाला,त्यात राजू दाजी शेळके पाटील अन् आप्पा जाधव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.


माझा जिवलग बालमित्र स्व. शाम मुरलीधर शेळके मुळे प्रिय मित्र आप्पा जाधव, प्रिय मित्र राजू दाजी शेळके अन् असे काहीजण जे पालखेड येथे शामच्या आयुष्याचा अतूट घटक होते ते माझ्या आयुष्यात मित्र या कक्षेत सामील झाले.


या सर्वांना बघितले की, शाम ची खूप आठवण येते. आप्पा जाधव, राजू पाटील दाजी, इत्यादी सर्व मित्रमंडळी खूपच चांगल्या स्वभावाची आहेत. प्रिय मित्र स्व.शाम अन् त्याच्या अवती भोवती वावरणाऱ्या या सर्व मित्रांमुळे माझ्या आयुष्याचे असे वर्तुळ पूर्ण झाले जे की, पूर्ण होण्यात तारुण्याचा अन् त्या तारुण्यात भेटलेल्या अनेक सुखद क्षणांचा पसारा पूर्ण झाला.


आयुष्यात फक्त गुळमुळीत अन् गुळमट मित्र असून चालत नाही.तर माझ्या मते मित्र हे आपल्याला कोणत्याही रुपात स्वीकारणारे असावेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याशी नाळ जोडलेली असावेत.अगदी आपल्या ढोंगी पदाच्या ढोंगी अहंकाराच्या गुर्मीत असणाऱ्या आयुष्याला लाथाडणारे असावेत. मी शिक्षक म्हणून जरी नोकरीला लागलो होतो,तरी देखील स्व.शाम अन् त्याच्या अवती भोवती असणाऱ्या मित्रांच्या गराड्यात मला कधीच जाणवले नाही की,मी एक शिक्षक आहे किंवा मी नोकरीला लागलेलो आहे.मी स्वतः ला नशीबवान समजतो की, स्व.शाम शेळके, राजू दाजी शेळके, आप्पा जाधव इत्यादी काही मित्रांमध्ये मला नेहमी आयुष्याचा आनंद लुटता आला, जो अमाप संपत्ती देऊन सुध्दा जगाच्या कोणत्याही बाजारात मिळणार नाही. स्व. शाम शेळके यांच्या मुळे जे मित्र अन् मैत्री माझ्या आयुष्यात लाभली ती सदैव मला शाम वगळता इतर सर्वजण " मास्तर " या नावाच्या उल्लेखाने उल्लेखित करायची. मात्र त्यात निव्वळ अनौपचारिक नात्याच्या ओलाव्यात ती मास्तरकी फिरत राहिली अन् फिरत राहील यात तिळमात्र शंका नाही.


प्रिय मित्र आप्पा जाधव असो किंवा राजू दाजी शेळके पाटील असो ही मित्र अगदी बांधावर बसून सर्व रंगांच्या छटांचे फुगे उडवून यांच्या सोबत गप्पांचे फड रंगवावेत अशा मैफिलीतील आहेत. याचं संपूर्ण श्रेय जाते ते देखील स्व.शाम शेळके यालाच..! आप्पा जाधव असो किंवा राजू दाजी शेळके असो यांना ज्या ज्यावेळी भेटतो , त्या त्यावेळी स्व.शाम शेळके याची प्रकर्षानं आठवण येते. ज्यांना आपला इतिहास, भूगोल माहीत असतो तिथं मनमोकळेपणाने बोलायला माणूस कंजुषी करत नाही. आपल्याला एखादे पद मिळाले किंवा आपण आर्थिक बाबतीत थोड्या फार प्रमाणात स्थिर झालो किंवा आपण आपल्या कामात स्थैर्य प्राप्त केले किंवा आपण नोकरीला लागलो तरी त्यात तेच निव्वळ अनौपचारिक मैत्रीचे नाते राहते जे मनाला अघळपघळ आनंद देते.माणसाच्या आयुष्यात आपल्या भूतकाळाशी प्रतारणा करणारे, आपल्याच ढोंगी अहंकाराच्या गुर्मीत वावरणारे देखील काहीजण असतात.भले ते वयाने मोठे असो अथवा समवयस्क असो अथवा आपल्या वयापेक्षा लहान असो. वयाच्या या तिन्ही प्रकारात अन् आपल्याच तोऱ्यात वावरणारे देखील असतात.मात्र स्व. शाम शेळके, आप्पा जाधव, राजू दाजी शेळके इत्यादी काही मित्रांना बघितले की, आयुष्यातील सर्व बेगडी गोष्टी उन्मळून पडतात अन् शिल्लक राहतो तो फक्त आणि फक्त मैत्रीचा वटवृक्ष..!


प्रिय आप्पा जाधव तुला आज जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी प्रत्यक्ष उपस्थित नाही.पण आपले दाजी राजू पाटील शेळके यांच्या हस्ते तुझा आज जन्मदिनाच्या निमित्ताने सत्कार झालेला फोटो बघितला अन् माझी मलाच तिथं माझी उपस्थिती असल्याची जाणीव झाली..! खूप दिवसांपासून आपली भेट नाही.स्व. शाम शेळके याच्या अंत्यविधी वेळी छत्रपती संभाजीनगर येथे आपली भेट झाली होती.येत्या काळात आपली भेट होईल अशी आशा करूया..!🙏🏻😊


असो, प्रिय मित्र आप्पा जाधव तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा..!🌹


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ९/४/२०२३, रविवार.

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

हुरहूर

 मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


हुरहूर..!


====================================


दिनांक २/४/२०२३, रविवार रोजी दुपारनंतर लासूर स्टेशन येथे सपत्नीक गेलो होतो.निमित्त होतं माझे कौटुंबिक स्नेही प्रिय बंधू संग्राम कुंटे यांच्या स्व.वडिलांच्या स्वर्गवास नंतर सांत्वनपर गृहभेट..!


गृहभेट झाल्यावर मी अन् माझी पत्नी पुढील प्रवासासाठी करंजगावला निघणार तोच रस्त्यात एका चाळिशी उलटलेल्या व्यक्तीने मला आवाज दिला.मी दुचाकी थांबवली.ती व्यक्ती माझ्या जवळ आली अन् मला म्हणाली..

" का हो सर, इतक्या दिवस कुठे होता तुम्ही..? लई दिवसांनी दिसू राहिले, तुमच्या हरित क्रांती प्रतिष्ठानने  लई भारी काम केलं..!"

मी त्या समोरच्या व्यक्तीला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरंच  ओळखत नव्हतो. पण मी त्यांना ओळख आहे असं दाखवून इतक्या दिवसांपासून लासूर स्टेशन येथे न दिसण्याचे कारण सांगितले. जवळ जवळ दहा मिनिटे मी त्या व्यक्तीशी बोलत होतो.माझी पत्नी बाजूला उभी राहून ऐकत होती. अखेर मला पुढे जाण्याची घाई असल्याने मी त्या व्यक्तीचा " राम राम " म्हणून निरोप घेतला.


मी रस्त्याने माझ्या पत्नीला सांगितले की, " बघ, नेहमी दिसणारी व्यक्ती कित्येक दिवसांपासून  एखाद्या व्यक्तीला दिसली नाही तरी हुरहूर लागते.मात्र असेही असते की, एखाद्या  अपरिचित  व्यक्तीला , त्यांच्या दृष्टीने परिचित असलेली व्यक्ती  दिसली नाही तरी हुरहूर लागते. दिसणं अन् न दिसणं या दोन शब्दांच्या मधील क्षण म्हणजेच आयुष्य..! आता ,बघ या व्यक्तीला मी ओळखत पण नाही,पण तो मला ओळखतो.म्हणजेच त्याला मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत या ना त्या निमित्ताने दिसत असेल.कित्येक दिवस झाले मी दिसलो नाही अन् त्यांचं मन साशंक झाले. एखादी व्यक्ती कित्येक दिवसांपासून कुणाला दिसली नाही.कोणताही संपर्क झाला नाही किंवा प्रसारमाध्यमांतून दिसली नाही की, मन हुरहूर करू लागते.हा मानवी वर्तनाचा मानवी मनाला हुरहूर करायला लावणारा प्रकार कोविडच्या आगमनानंतर विशेष करून जाणवू लागला आहे. 


कित्येक माणसं न दिसल्याने खरचं मनाला हुरहूर लागते. आपण जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत लासूरगाव रस्त्याने मी पायी असो अथवा दुचाकीवर , माझे त्यांच्याकडे लक्ष असो अथवा नसो संजय भाऊ शर्मा मला बघून त्यांच्या दुकानातून मोठ्याने " वंदे मातरम् गुरुजी..!" अशी हाक द्यायचे. आज जेंव्हा आपली गाडी संजय भाऊ शर्मा यांच्या दुकानासमोरून गेली तेंव्हा ती हुरहूर मनाला लागून गेली..! कारण संजय भाऊ शर्मा आज हयात नाहीत. त्यांचं दिसणं होतं, आज दिसणं नाही या दरम्यान जे क्षण होते तेच आयुष्य..! "


आमची दुचाकी रस्त्याने मार्गक्रमण करत करत 

करंजगाव, ता. वैजापूर येथील कोळसे पाटील यांच्या वस्तीवर पोहोचली होती. माझे कौटुंबिक स्नेही आदरणीय कोळसे सर यांच्या वयोवृध्द मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वनपर गृहभेट दिली अन् पुन्हा पुढील प्रवासाला लागलो.


मनात हुरहूर या शब्दाने पिंगा घातला होता.आत्मचिंतन विचारचक्र सुरू होते. " A Wednesday या हिंदी चित्रपटात एक खूप छान दृश्य आहे. मुंबई येथे दररोज लोकलने एकाच मार्गावर प्रवास करणारे प्रवासी असतात. त्यांचं एकमेकांना दररोजचे भेटणे होत असते. काहींचे दररोजचे  भेटणे फक्त एकमेकांकडे स्मित हास्य करून होत असते.त्या दैनिक प्रवासातील एक तरुण प्रवासी , आपल्या सोबत दररोज प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला  म्हणजेच नसिरुद्दीन शहा यांना आपल्या हाताच्या बोटातील अंगठी  काहीही न बोलता फक्त हाताची बोटे दाखवून स्मित हास्य करतो. ते जेष्ठ नागरिक नसिरुद्दीन शहा ओळखतात की , त्या तरुणाची एंगेजमेंट झाली आहे अन्  त्याची निशाणी तो मोठ्या कौतुकाने आपल्याला  दाखवत आहे. ते ज्येष्ठ नागरिक देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन फक्त स्मित हास्य करून त्याला शुभेच्छा देतात. मात्र कित्येक दिवस जातात तो तरुण त्या दररोजच्या लोकल प्रवासात दिसत नाही. मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू होतो अन् एका दररोज दिसणाऱ्या मात्र व्यक्तिगत परिचय नसलेल्या नात्याचा शेवट होतो.दररोजच दिसणं थांबून जातं.


" आम्ही अंधारीला दररोज जाणारे काही प्रवासी बसने प्रवास करणारे कायमचे होतो आणि आजही आहोत. त्या बसमध्ये शक्यतो दररोज दोन जण कंडक्टर अन् ड्रायव्हर  फिक्स असायचे. दोघेही मुस्लिम..! खूपच प्रेमळ माणसं..! आमच्या दररोजच्या प्रवासातील मी  किंवा डॉ. गिरी सर किंवा भगिनी शिक्षिका.  एकजण जरी आला नाही तरी फोन करून आम्हाला संपर्क करतील, आम्ही  येई पर्यंत बस थांबवतील आम्ही आलो की मग निघतील.इतकं घट्ट प्रेमाचे नाते निर्माण झाले होते.विशेषत: माझ्यासाठी हमखास फोन करायचे.कारण त्यांना माहित होते मला मुख्य बस स्टँडवर दुरून यावे लागते म्हणून..! एक वर्षापूर्वी पासून  दोघेही दिसेना.मला नेहमी हुरहूर लागून असायची की, हे दोघेही चाचा आता आपल्या बसमध्ये का येत नसावेत..? अखेर काही महिन्यांपूर्वी मला त्या जोडीगोळीतील कंडक्टर चाचा , छत्रपती संभाजीनगर मुख्य बस स्थानकात पुणे बस मध्ये दिसले.मी त्यांच्याकडे धावत जाऊन खुशाली विचारली अन् आता तुम्ही दोघेजण आता अंधारी मार्गे बस मध्ये का येत नाहीत असे विचारले.यावर त्या चाचांच्या डोळ्यात अश्रू आले अन् मला म्हणाले..

" गुरुजी, हमारा ड्रायव्हर साथीदार कोविड में चल बसा | हम अंधारी के तरफ साथ साथ काम पर रहते थे | अब उधर आने को दिल नही करता | उधर आये तो दोस्त की बहुत याद आती हैं..!" मी कंडक्टर चाचा यांचे सांत्वन केले अन् मुख्य बस स्थानकात काही वेळ गप्पा मारल्या.आम्ही एकमेकांनी पुढील प्रवासासाठी निरोप घेतला, पुन्हा भेटण्यासाठी..!


माणसाचे दररोजचे एकमेकांना दिसणं हेच आयुष्य..! एखादा माणूस कायमचा जेंव्हा दिसत नाही तो क्षण किंवा तिथून पुढचं आयुष्य सगळं पूर्वीच्या आठवणींवर व्यतीत करायचे असते. परिचित अथवा अपरिचित व्यक्तीला बघून आपल्याला त्या भेटीच्या वेळी काही वेळ का होईना बरं वाटतं. वरील मजकुरात उल्लेख केला आहे ते पुन्हा उल्लेखित करतो.. नेहमी दिसणारी व्यक्ती कित्येक दिवसांपासून आपल्याला दिसली नाही तरी हुरहूर लागते.मात्र असेही असते की एखाद्या  अपरिचित  व्यक्तीला , त्यांच्या दृष्टीने परिचित असलेली व्यक्ती  दिसली नाही तरी हुरहूर लागते. दिसणं अन् न दिसणं या दोन शब्दांच्या मधील क्षण म्हणजेच आयुष्य..!


ता. क. - दिसणं अन् न दिसणं या दरम्यान जे क्षण असतात तेच आयुष्य..! 


वंदे मातरम्


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३/४/२०२३, सोमवार