रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

आठवणी दाटून आल्या


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


' आठवणी दाटून आल्या '


=================================


सदरील फोटो प्रत्यक्षातील कुठला आहे माहीत नाही. सोशल मीडियावर प्राप्त झाला. सदरील फोटो बघून मन गहिवरून आले अन् आठवणी दाटून आल्या.


सदरील फोटो बघितल्यावर प्रामुख्याने दोन बाबी क्षणात नजरेच्या पटलावर आल्यात. त्या क्रमवार पुढीलप्रमाणे..


१) मी वाचलेले थोर लेखक धनंजय किर लिखित ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' पुस्तक अन् त्यातील परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या चटकन डोळ्यासमोर आलेत. परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी डोळ्यात तेल घालून रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खाली अभ्यास केला.दारिद्र्य अन् वंचित आयुष्याला शिक्षण घेऊन तिलांजली देऊन संपूर्ण मानव जातीला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून वंदनीय बाबासाहेब नावारूपाला आले. परम वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्यासाठी आहे त्या परिस्थितीत शिक्षण घेतले अन् विश्वातील एक अतिशय विद्वान व्यक्तिमत्त्व त्यातून आकारास आले.


दुसरे उदाहरण देण्यापूर्वी नम्र पूर्वक व्यक्त होतो की, दुसरे उदाहरण तुलना नसून फक्त अत्यंत बिकट परिस्थितीत केलेला अभ्यास याचं मुद्द्याबाबत वाचकांनी समजून घ्यावा ही नम्र अपेक्षा.


२) माझे स्व.तीर्थरूप वडील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोपरगाव येथे साधारणतः साठच्या दशकात होते. घरून कोणताही आर्थिक पाठिंबा अजिबात नव्हता.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 'कमवा आणि शिका' या ब्रीद वाक्याला प्रमाण मानून माझे तीर्थरूप वडील कॉलेजहून आल्यावर कोपरगाव स्थित आजच्या विष्णू चित्रपटगृहाच्या अलीकडील कोपऱ्यावर तत्कालीन असणाऱ्या हॉटेल मध्ये वेटर अन् भांडी धुण्याचे काम करत असायचे. रात्र झाली की, बाजूलाच असलेल्या विष्णू चित्रपटगृहासमोरील सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करायचे. अभ्यास झाला की, पुन्हा हॉटेलवर मुक्कामी यायचे. हॉटेलवर लाईटची सोय नव्हती. साधा दिवा ( चिमणी ) असायची. हा दिनक्रम जवळजवळ दोन वर्ष सुरू होता. जो पर्यंत माझे स्व. तीर्थरूप वडील हयात होते तो पर्यंत अधून मधून त्यांच्या प्राथमिक, माध्यमिक अन् महाविद्यालयीन आयुष्यातील अतिशय खडतर प्रवासातील आठवणी आमच्या सोबत व्यक्त व्हायचे. जानेवारी २००० मध्ये मी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना आवर्जून कोपरगाव येथे सदरील ठिकाणांची भेट घेण्यासाठी घेऊन गेलो होतो. माझ्या तीर्थरूप वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये काम केले होते, तिथं ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी तिथे हॉटेल नव्हते.मात्र बदल झालेली इमारत होती.तिथं गेल्यावर गतकाळातील आठवणी जाग्या होऊन माझ्या तीर्थरूप वडिलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या तीर्थरूप वडिलांचे डोळे ओले झालेले त्यावेळी बघितले होते. विष्णू चित्रपटगृहाच्या परिसरात गेल्यावर गतकाळातील आठवणी जाग्या होऊन काही वेळ माझे तीर्थरूप वडील त्या ठिकाणी उभे होते. गतकाळातील लाईट खांब अस्तित्वात नव्हता, मात्र परिसर तर तोच होता.जिथं रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या प्रकाशात माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी अभ्यास करून आपलं कर्तुत्व सिध्द केले होते.त्यावेळी तिथला परिसर माझ्या वडिलांनी पायी फिरून त्या परिसराला आपल्या हृदयात श्रद्धेने बंदिस्त केले होते. ती भेट एखाद्या तीर्थस्थळाला भेट दिल्याची आत्मिक शांती माझ्या वडिलांच्या आत्मिक मनाला देऊन गेली होती. ज्या ठिकाणी भेट दिल्यावर आपला खडतर भूतकाळ, भावूक भूतकाळ अन् श्रद्धेय भूतकाळ आठवणींच्या स्वरूपात भेटतो, त्यावेळी त्या खडतर, भावूक अन् श्रद्धेय मनाच्या देव्हाऱ्यात भावनेच्या गहिवरलेल्या तारा नक्कीच छेडल्या जातात.त्यातून आठवणींचे स्वर गुंजन करू लागतात. त्यातून बऱ्याचदा भावनेचा बांध फुटतो अन् त्या काळात मन वर्तमानात न राहता पुन्हा त्याच गतकाळातील आठवणीत रमून जाते. जसे की, ज्यावेळी माझे स्व.तीर्थरूप वडील कोपरगाव येथे त्यांच्या गतकाळातील स्थळांच्या आठवणीत रमून गेले होते.


आजही काही प्रसंग, फोटो, व्हिडिओ बघितले की, त्यांची तार कुठेतरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात छेडल्या जाते. त्या प्रसंगाचा, फोटोचा अन् व्हिडिओचा कळत नकळतपणे संदर्भ अन् सांधर्म्य आपल्या पूर्वजांच्या स्मृतींशी जुळल्या जातो. त्यातून आठवणींचा पसारा उलगडला जातो. त्या आठवणीत ज्यांना आपण आदर्श मानतो ते कित्येकजण चटकन डोळ्यासमोर येतात. बिकट परिस्थितीत कुणी तरी स्वतः ला सिध्द केलेल्या आठवणी मनाला गहिवर निर्माण करतात. विशेषतः ज्यांचं आयुष्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अन् आश्रित म्हणून व्यतीत झालेलं असतं, अशांच्या आठवणी मनात गहिवर निर्माण करतात.


माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी श्रीरामपूर येथेही अत्यंत बिकट परिस्थितीत घेतलेल्या महाविद्यालयीन आयुष्यावर वडील हयात असताना मी फेसबुकवर पाच भाग लिहिलेले आहेत. मात्र ते ब्लॉगवर प्रकाशित केलेले नाहीत. भविष्यात त्याला पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचा मनोदय आहे.श्रीरामपूर येथे आम्ही सह परिवार वडिलांच्या सोबत, त्यांच्या गतकाळातील आठवणींच्या ठिकाणी भेट दिली होती.


वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ८/९/२०२४, रविवार