गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

" इसकी वजह बस तुम ही तुम हो..!"




" इसकी वजह  बस तुम ही तुम हो..!"

======================================

भारतातील तत्कालीन काळातील जवळजवळ ५६२ संस्थांनांना आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अखंड भारतात सामील करणारे खरे राष्ट्रपिता  सरदार वल्लभभाई पटेल यांची आज दिनांक ३१/१०/२०१९ रोजी जयंती आहे.त्यानिमित्त त्यांच्या अतुलनीय कार्याला विनम्र अभिवादन..!

सरदार वल्लभभाई पटेल जर नसते तर आम्ही मराठवाड्याचे नागरिक कदाचित अजुन एखाद्या पाकिस्तानचे दुर्दैवी नागरिक राहिलो असतो..!पण नियतीने आम्हाला असे होण्यापासून वाचवले..! आम्हा मराठवाडाकरांच्या आजच्या असण्याचे संपूर्ण  राजकीय श्रेय सरदार वल्लभभाई पटेल व सामरिक श्रेय तत्कालीन महान भारतीय सैनिकांना जाते..!

" आज हम मराठवाडाकर, भारतीय  हैं...!
इसकी वजह  बस तुम ही तुम हो..!
बाकी  गुलाब के  फुल  🌹थे..! "

तसेच आज दिनांक ३१ ऑक्टोंबर २०१९ पासून आपल्या भारतात जम्मू आणि काश्मीर व लडाख ही दोन नवी केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे अस्तित्वात आलेली आहेत..!आता भारतात एकूण ९ केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे अस्तित्वात आहेत..! याचे संपूर्ण राजकीय श्रेय आपल्या भारताचे सध्याचे महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय अमित भाऊ शहा  यांना जाते..! तसेच सामरिक श्रेय आपल्या महान भारतीय सैनिकांना जाते..! त्याबद्दल या सर्वांचे अंतःकरणातून अभिनंदन..आणि खूप खूप धन्यवाद..!

अखंड भारत अमर रहे..!
अतुल्य भारत..!
वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:३१ ऑक्टोंबर २०१९

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

" एक आठवण..आमच्या बालपणीच्या दिवाळीची..!"




चिंतन
" एक आठवण..आमच्या बालपणीच्या दिवाळीची..!"
===================================

लहानपणी आम्ही काही बालमित्र...दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजन झाले..की दुसऱ्या दिवशी आमच्या पालखेड गावातील काही श्रीमंतांच्या गल्लीत सकाळी सकाळीच उठून जायचो..!
कारण....
त्या श्रीमंतांनी काल लक्ष्मीपूजन झाल्यावर जे खूप सारे फटाके फोडलेले असायचे,त्यातील जे काही फटाके वात न शिलगल्यामूळे फुटलेले नसायचे..ते हुडकून हुडकून गोळा करायचो..! अन् मग मोठ्या फुशारिने तेच गोळा करून आणलेले फटाके फोडायचो..!☺ त्यात एक वेगळाच आनंद मिळायचा..जो आजच्या हजार रुपयांच्या खरेदी केलेल्या फटक्यात मिळत नाही..!

आज ह्या आठवणी माझ्या मुलांना सांगितल्या की,त्यांना खरं वाटत नाही..! ही परिस्थिती सर्वत्र आहे..! त्यात आजच्या माझ्या सारख्या अनेक पालकांच्या मुलांचा दोष नाही..! आज या मुलांना ते चटकेच माहीत नाही..! ते हुडकणं माहीत नाही..! आयुष्यात जीवन जगत असताना बसलेला चटकाच‌ खूप काही शिकवून जातो..!

आमची पिढी फार काही जुनी नाही,आम्ही अजून बऱ्यापैकी तरुण आहोत..!☺ मात्र आज असे आमच्या पिढीला नक्कीच वाटते की,आमच्या काळातील बऱ्याच गोष्टी या म्हाताऱ्या होत चालल्या आहेत..! गेल्या तीस.. चाळीस वर्षांत समाजात खूप मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे आलेली आहेत..! माणसाने आधुनिक तंत्रज्ञांनांच्या साहाय्याने खूप प्रगती केली,मात्र ज्या गोष्टी तीस ..चाळीस वर्षांपूर्वी होत्या त्यातील ममत्व संपल्यात जमा झाले आहे..!

आज मला किंवा माझ्या सारख्या अनेक माझ्या खेड्यातील मित्रांना ,ज्यांचा मूळचा पिंड खेड्यातील आहे, पण ते शहरात स्थायिक झाले आहेत..! त्यांना शहरात राहायला अन् वागायला खूप मर्यादा येतात..! कारण आम्ही आमच्या खेड्यात सगळं कसं मोकळं..चाकळं  वागून आलेलो आहे..! कोणत्याही गल्लीत कितीही वाजता फिरणे,कोणाच्याही ओट्यावर कधीही बसणे इत्यादी अनेक बाबी ह्या आमच्या काळात सहज होत्या..! त्यात कुणालाच अजिबात संशय येत नव्हता..! आज याच बाबी खेड्यात देखील सहजपणे होताना दिसत नाही..! कारण आजकाल खेड्यात देखील शहराने शिरकाव केला आहे..!☺ आमच्या काळातील खेडं ,आजच्या काळात खेड्यात देखील पाहायला मिळत नाही हे देखील खेड्यातील सामाजिक वास्तव आहे..!

आमचा भूतकाळ आमचा पिच्छा सोडत नाही..! आम्ही त्याच मोकळ्या चाकळ्या‌  वर्तनाने वर्तन करायला गेलो की,आमच्या विषयी संशय निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते..! शहरात सगळं कसं...सिस्टॅमॅटीक..!☺ या अशा सिस्टॅमॅटीक वातावरणात मनाची कधी कधी कुचंबणा होते..! यातही  मूळच्या शहरातील असणाऱ्या लोकांना पूर्णपणे दोष देता येणार नाही..! आज मुळात सगळा माणूसच बदलत चाललेल्या सामाजिक वातावरणामुळे गूढ होत चालला आहे,त्यामुळे मूळच्या शहरातील माणसांच्या मनात देखील सिस्टॅमॅटीकपणा येणारच..!

पण...यात आमच्या सारख्या मूळच्या खेड्यातील अनेकांना नाहक सिस्टॅमॅटीक राहावे लागू राहिले त्याचे काय...?☺

वंदे मातरम्..!

एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२९/१०/१९,भाऊबीज..!

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

" चपाती आहे का..? कोड्यास आहे का..? "




** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" चपाती आहे का..?   कोड्यास आहे का..? "
___________________________________________

आज दिनांक २७/१०/२०१८ रोजी  संध्याकाळी माझा प्रिय  बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के याच्या निमंत्रणावरून औरंगाबाद शहरातील एका कोपऱ्यात धार्मिक कार्यक्रमा निमित्त प्रसाद घेण्यासाठी गेलो होतो.
( प्रसाद याचा येथे अर्थ  पोट भरून  जेवण करणे..असा अभिप्रेत आहे😂)
प्रसाद घेण्यासाठी पंगती बसल्या.मीही बसलो..! पत्रवाळी व त्यात एक..एक खाद्य पदार्थ वाढणाऱ्या माणसा,मुलांकडून वाढल्या जाऊ लागले.एकदाचे सर्व पदार्थ वाढून झाले अन् सुरू झाले जेवण...!

एक शहरी मुलगा हातात स्टीलचे घमेले घेऊन...म्हणत येत होता.....
" पोळी. .पोळी...पाहिजे का पोळी...?"
असे म्हणत..म्हणत तो मुलगा माझ्या समोर आला अन् मलाही म्हणाला..
" काका, पोळी पाहिजे का..?"
मी म्हणालो, " पोळी नको,चपाती आहे का..?"
तो मुलगा- " नाही काका..!"
मी- " अरे छोट्या, पोळीलाच चपाती म्हणतात..दे अर्धी ..चपाती..!"
तो मुलगा गालातल्या गालात हसला अन् पुढे निघाला.
तो मुलगा पुढे वाढत...वाढत गेला..पण आता तो प्रत्येकाला म्हणत होता...
" चपाती..पाहिजे..का..चपाती..?"

थोड्या वेळाने दुसरा एक शहरी मुलगा म्हणत..म्हणत येत होता..
" भाजी..पाहिजे का..भाजी..?"
माझ्या समोर आला अन् मलाही म्हणाला...
" काका, पाहिजे का भाजी..?"
मी त्याला म्हणालो, " भाजी नको, कोड्यास आहे का..?"
तो मुलगा- " नाही काका..भाजी आहे..!"
मी- " अरे छोट्या, भाजीलाच कोड्यास असेही म्हणतात..!
पण खेड्यात म्हणतात..!!"
हा मुलगा मात्र पुढे वाढत जातांना भाजीच म्हणत गेला.

अखेर जेवण सुरू झाल्यावर माझा मित्र माझ्या जवळ आला अन् बसला...! माझ्या मित्राला हा किस्सा मी सांगितला. खेड्यातील मराठीतील बरेच शब्द आज शहरातून जवळ..जवळ हद्दपार झाल्यात जमा झाले आहेत.आजच्या शहरातील बऱ्याच मुलांना ,निदान आमच्या पिढीला खूपच जवळचे वाटणारे खेड्यातील मराठी शब्द परिचयाचेच नाहीत.
रा.रं.बोराडे, शंकर पाटील यांच्या सारखे मराठी ग्रामीण साहित्यकार आज लेखन करत नाहीत..अन् अशांचे मराठी साहित्य आजच्या शालेय पाठ्यक्रमात देखील पाहिजे तितक्या प्रमाणात नाहीत...!

आम्हाला  लेखक शंकर पाटील यांचा बहुदा इ.९ वी ला " वळीव " नावाचा धडा होता. काय अप्रतिम ग्रामीण भाषा शैली त्यात व्यक्त केली होती..! सगळं कसं अस्सल  मातीतील  वाटायचे..!
दुर्दैव आजच्या मुलांचे शहरातील..अन् काही प्रमाणात खेड्यातील सुध्दा..! कारण खेड्यात सुध्दा ३० ते ४० वर्षांपूर्वीचे अस्सल ग्रामीण मराठी शब्द आजच्या खेड्यातील मुलांना माहीत नाही..!

मराठी माझी मायबोली...!
तिची अशी दशा कुणी अन् का केली..?
मी काही महिन्यांपासून औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे.जिथे पहावं तिथं  व्यावसायिक ठिकाणी हिंदीत बोलावं लागतं.मी ओढून... ताढून बोलतो..पण..मराठी मध्ये बोलल्यास समोरचा फार ..फार कन्हुन....कुथुन मराठीत बोलतो...किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो...!
हिंदीला माझा आक्षेप नाही....पण..
मराठी जास्त प्रमाणात का वापरल्या जात नाही औरंगाबाद येथे..?

बहुदा आपल्यावर पूर्वीच्या असलेल्या मोगलाईच्या अमीट छापाची ती निशाणी असावी..!
सुंभ जळाला पण पिळ..अजुन बाकी आहे..😂
कधी कधी असे खरचं वाटते की, माननीय राज ठाकरे साहेब हे जे मराठी भाषा विषयी बऱ्याचदा बोलताहेत ते कटू सत्य आहे..!
काळाच्या पुढे जाऊन सत्य बोलणारे ते एक उत्कृष्ट  सामाजिक भाष्य करणारे नेते आहेत..!

ता.क.:  येत्या परवाच्या सोमवारी मी माझ्या  अंधारी प्रशालेत एक संवाद रुपी चर्चा सत्र वर्गात मुलांमध्ये आयोजित करणार आहे.त्याचा इतिवृत्तांत कळवतो नंतर..!
प्रतीक्षा..!

वंदे मातरम्..!

एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:  २७ ऑक्टोबर २०१८

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

" शिक्षणाचा व नैतिक आचरणाचा काहीच संबंध नसतो..!"



*** मला प्रवासात भेटलेली माणसं..! ***

" शिक्षणाचा व नैतिक आचरणाचा काहीच संबंध नसतो..!"

________________________________________________
           
आज दिनांक २६ /१०/२०१७ रोजी आत्ताच सकाळी दक्षिण भारतातील रेनिगुंठा रेल्वे स्थानकावर स्वतःचे तोंड धुण्यासाठी एक अनोळखी खेडवळ वयोवृद्ध व अनोळखी उच्च शिक्षित महिला, नळ असलेल्या ठिकाणी माझ्या बाजूला उभे होते.त्या वयोवृद्ध आजोबांनी बाटलीत पाणी घेऊन दूर जाऊन दात,तोंड स्वच्छ केले.

त्याचवेळी त्या उच्च शिक्षित महिलाने जिथे नळाचे पाणी पडते तिथेच दात धुऊन दंत पेस्टची पिचकारी मारली..! पुन्हा तोच ब्रश ,तिथेच नळाला धुण्यासाठी लावला..!शेवटी मला राहवले नाही मी त्या महिलेला विनंतीवजा हिंदी शब्दात सांगितले की..
 " यह जो आप कर रही है,यह गलत है..!"
ती पुरुषी पोशाखातील उच्च शिक्षित महिला माझ्याकडे क्रोधित नजरेने बघून तोंडामध्ये पेस्ट असूनही मला म्हणाली...
" तुमको क्या करने का है..?"

मी निशब्द झालो..!काय बोलावं आता..?  अजुन काहीं सभ्य भाषेत बोलावं तरी संविधानाचे दिलेल्या एकेरी कायद्याच्या धकापोटी चूप बसलो..!☺
एक ते दृश्य..जे आजोबा कुणीही न सांगता दूर जाऊन तोंड स्वच्छ करत होते अन् ही पुरुषी पोशाखातील (उच्च शिक्षित..?) महिला जे पाणी प्यायचे होते तिथेच टूथ पेस्ट ची पिचकारी मारत होती..!

 शेवटी " शिक्षणाचा व नैतिक आचरणाचा काहीच संबंध नसतो..!"
हे  माझे मीच तयार केलेले सुवचन माझ्या समोर घडलेली प्रत्यक्ष अती लघु फिल्म बघितल्यावर पटले..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

प्रसंग स्थळ: रेनिगुंठा रेल्वे जंक्शन, आंध्रप्रदेश.

दि.२६/१०/२०१७

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

" उबाळे मामा, राम.. राम..! "









***  मला प्रवासात भेटलेली माणसं..!  ***

" उबाळे मामा, राम.. राम..! " 
_______________________________________________

माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील खूप मायाळू व्यक्तिमत्त्व..आदरणीय उबाळे मामा..!

मी या शाळेत उपस्थित झालो अन् अनेकानेक मानवी घटकांना खूप जवळून पाहण्याचा योग येत गेला..अन् येत आहे..!
वास्तविक मी बदली प्रक्रियेत अंधारी गाव मागितले नव्हते..पण 
शासनाच्या बदली धोरणाने दिले अन्  स्विकारले..! दररोज जेंव्हा मी शाळेत सकाळी पहिल्यांदा प्रवेश करतो,तेंव्हा आदरणीय मामांना माझी नजर पहिल्यांदा शोधत असते.मामा दिसल्या बरोबर...मामांचा हात हातात घेऊन म्हणतो....

" उबाळे  मामा..राम..राम...! "

अशी प्रेमाची साद घालून मामांचा हात,हातात घेऊन माझ्या अंधारी शाळेतील दिवसाला सुरुवात होते. ज्या दिवसापासून मी या शाळेत हजर झालो आहे तेंव्हा पासून ते आजतागायत असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी माझा मामांना हातात हात घेऊन 
" राम..राम " झाला नाही..! यदाकदाचित सकाळी मामा दिसले नाहीच तर शाळा सुरू झाल्यावर वर्गातून पुन्हा बाहेर येऊन मामांना  शोधून
" राम..राम...मामा.." असे म्हणतोच..!

मामांचे बोलणे खूप भावते मला..! मामांचेच नाही तर ग्रामीण भागातील सगळ्याचा भारतीयांचे बोलणे खूप जवळचे वाटते,कारण माणूस जिथून आलेला असतो,तो त्याचा भूतकाळ त्याला सतत भेटत असतो वर्तमानात..! फक्त त्या भेटणाऱ्या वर्तमानातील भूतकाळाला ओळखले की खूप हलकं...हलकं वाटतं..! माझा प्रारंभ खेड्यातून झाला आहे.त्यामुळं खेडेगाव अन् त्या गावातील माणसं आपल्या घरातीलच वाटतात.त्यांना कुठेतरी आपल्याच आळीत ,मंदिरात,शेतात,गावातील चावडीत पाहिल्यासारखे वाटत असतात.अन् त्यांच्याशी बोलण्याचा ,आपलंस करण्याचा मोह आवरत नाही.

उबाळे मामा असेच मला माझा माझ्या जन्मभूमी पालखेड येथील भूतकाळ रूपाने पुन्हा वर्तमानात भेटले.अशीच माणसं माझ्या गावात माझ्या बालपणी आम्ही पाहिलेली आहेत. कधी आमच्या आळीत,कधी पारेश्वर महादेवाच्या मंदिरात,कधी गावाच्या चावडीत, तळ्यापाळी तर कधी शाळेच्या परिसरात..! सारख्या वर्तनाची माणसं भेटली की माणसाच्या अनेकानेक स्मृती जाग्या होऊन जातात..! जशा आदरणीय उबाळे मामा यांना पाहिल्यावर  मला जाणवते.

उबाळे मामा काथ्याचे विणकाम करायला खूप हुशार माणूस.. मी खास मामांची आठवण म्हणून एक काथ्याची पाय पुसनी देखील बनवून घेतली. इतकं सुंदर व मापात विणकाम आहे ...की.. पाहतच राहावे. मामांचे खूप कौतुक वाटते. उबाळे मामांचे अजुन वैशिष्टये आहे अन् ते म्हणजे शाळेतील प्रत्येक वर्गाच्या चाव्या अचूक ओळखायचे  कौशल्य..! उबाळे मामा यांना दिसायला फार फार कमी आहे. खूपच अल्प दृष्टी असूनही मामा ,शाळेच्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या कुलूप,आपल्या किल्ल्यांच्या गुच्छातून अचूक किल्ली फक्त हाताने स्पर्शून ,ओळखून त्या कुलूपा उघडतात. मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे.खूप आचंबित होण्यासारखं कौशल्य आहे हे...!

असे आमचे मामा अन् त्यांचे अजब कौशल्य..!

वंदे मातरम्..!

ता.क.:   आपली माणसं..!

लेखक :  नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २६ ऑक्टोबर २०१८

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

वीर झारा




वीर झारा...!
================================

वीर झारा हा एकमेव असा हिंदी चित्रपट होता,ज्यातील अतिशय कर्णमधुर गाणी ज्यांना संगीत दिले होते स्व. मदन मोहन यांनी..आणि....
स्व.मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महान दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्या सुमधुर बंदिशी त्यांचे हक्क विकत घेऊन आपल्या विर झारा या चित्रपटात इ.स्.२००४ सारी उपयोगात आणल्या होत्या..!  थोडक्यात एखाद्या संगीतकाराच्या मृत्यूनंतर त्याच्या संगीताला एखाद्या चित्रपटात उपयोगात आणण्याचे हे दुर्मिळ उदाहरण..!

या चित्रपटात खूपच भावूक प्रेमकथा चित्रित केली होती.ज्यात नायक ,भारतीय असतो अन् नायिका पाकिस्तानी..! नायक ,नायिकेला भेटायला पाकिस्तान मध्ये जातो पण गुप्तहेर म्हणून त्याला अटक होते.त्याची प्रेयसी त्याला भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करते..पण भेट होत नाही.अखेर पाकिस्तान मधील एक महिला वकील राणी मुखर्जी त्यांची केस न्यायालयात लढते..अन् त्यांच्या बाजूने निकाल लागतो.पण तो पर्यंत नायक अन् नायिका खूप वृध्द झालेले असतात.

निस्सीम प्रेमाची आसक्ती अन्  स्वच्छ ओढ असते त्यामुळे ते प्रेमीयुगलांचे मिलन होते..त्यांच्या म्हातारपणी..!

थोडक्यात खरे अन् स्वच्छ प्रेम वय अन् सौदर्य पाहत नाही तर ते पाहते फक्त  स्वच्छ भावना अन् त्यातील पावित्र्य..!
खूपच सुंदर कथा तेवढ्याच भावुकतेने चित्रित केली आहे.वास्तविक मला शाहरुख खान एक नट म्हणून  आवडत नाही पण कथेच्या प्रेमामध्ये तो खूप आवडला होता.नायिका म्हणून प्रीती झिंटा हिने लाजवाब काम केले आहे...!


या चित्रपटाचे दिग्दर्शक होते,यश चोप्रा..! ज्यांनी अतिशय साध्या ,सोप्या प्रेमकथा आपल्या चित्रपटात अतिशय सुरेख,भावूकतेने अन्  प्रेमाच्या उत्कटतेने सादर केल्या..! आज ती  नजाकत कोणत्याही दिग्दर्शकाला जमत नाही..!
कारण तत्कालीन काळातील खऱ्या अर्थानं भावविश्वात खऱ्या पात्रांना त्याच खऱ्या प्रेमकथेत गुंफून सादर करण्याचे कसब जमले ते यश चोप्रा यांनाच...सिलसिला या सदाबहार हिंदी चित्रपटात..!☺

वंदे मातरम्..!

एक तरल रसिक लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २४/१०/२०१९

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

" मिस यू... प्रिय बुजगावणे..! "☺






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" मिस यू... प्रिय बुजगावणे..! "☺
==================================
उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार आहे.मी शाळेत जाण्यासाठी दररोज सकाळी औरंगाबाद बस स्थानकावर जात असे अन् मला हे  प्रिय बुजगावणे नक्की भेटत असायचे..अगदी न चुकता..!☺

आता उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार अन् आता हे खड्ड्यात उभे केलेले बुजगावणे मला आता दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत भेटणार नाही या विरहाने मी खूप दुःखी झालो आहे..! नियतीने माझ्या आयुष्यात ऐन चाळीशीनंतर एक बुजगावणे आणले त्या बद्दल त्याला उभे असणाऱ्या खड्ड्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच..!☺ रस्त्याच्या ऐन मधोमध असणाऱ्या सुंदर अशा खड्ड्यातील बुजगावणे ज्याने कुणी उभे केले असेल त्याला त्रिवार धन्यवाद..! कारण त्या अज्ञात व्यक्तीमुळे माझे अन् या सुंदर अशा खड्ड्यातील बुजगावणे चे एक अव्यक्त नाते निर्माण झाले..!

मी मूळचा खेड्यातला असल्याने मला शहरात ,त्यातल्या त्यात एका सुंदर अशा खड्ड्यात पहिल्यांदा दिनांक  ७ ऑक्टोंबर २०१९ रोजी बुजगावणे पाहून खूप आनंद वाटला..! खेड्यातील अशा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तू शहरात दिसल्या की,माझ्या सारख्या अनेक प्युवर खेडूतांना‌ खेड्यातील काही वस्तूंचे प्रदर्शन  पाहून नक्कीच खेड्यातील दिवस आठवतात..!
खूप खूप धन्यवाद शहरवासीयांनो.. आमच्या खेड्यातील आमचे प्रिय बुजगावणे या शहरात उभे केल्याबद्दल..! या शहरात,आपल्या खेड्यातील कुणीतरी  आहे हे पाहून मन भरून आले..ते आज २२ ऑक्टो.२०१९पर्यंत..!

प्रिय बुजगावण्या आता आपली भेट थेट शाळा सुरू झाल्यावर होईल..! तो पर्यंत कुठेही जाऊ नकोस..! तसा अधून मधून मी तुला सहपरिवार एखाद्या दिवशी भेट द्यायला नक्की येईल..!  तो पर्यंत काळजी घे...!

ता.क.: एकाच खड्यात असणाऱ्या दोन्ही बुजगावण्यांचे छायाचित्र वरील लेखात उल्लेखित भिन्न तारखेला काढलेले आहेत..!

वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: २२/१०/२०१९




रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

" तू.. आणलं याला किंमत...हाय..!"



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

तू.. आणलं याला किंमत...हाय..!"
  
===================================

आज दिनांक २०/१०/२०१९ रोजी दुपारी धुंवाधार पाऊस सुरू होता.
मी रस्त्याने माझ्या वाहनात चाललो होतो.
माझ्या खूप पुढे एक वयोवृध्द आजोबा रस्त्याने  पावसात चिंब भिजून पायी चालले होते.त्यांना ओव्हर टेक करून चार पाच चार चाकी वाहने पुढे निघून गेली होती.माझे वाहन त्या आजोबांच्या जवळ आले.
मला रहावले नाही.
मी थांबून त्यांना वाहनात बसून घेतले.
त्यांच्या रंग रुपावरून वारकरी सांप्रदाय मधील होते.
अगदी माझ्या सर्वात मोठ्या सख्ख्या चुलत्यासारखे स्व. कचरू आण्णा पालखेडकर यांच्या सारखेच दिसत होते.आमचे आण्णा पण वारकरी सांप्रदायिक होते..!

थरथरते ओलेचिंब शरीर वाहनात बसले होते.
माझ्या पत्नीने त्यांना अंग पुसण्यासाठी आमच्याकडील कोरडा रूमाल दिला.
त्यांना पुढे फक्त १५० ते २०० मीटर पर्यंतच जायचे होते.
त्यांचे ठिकाण आले,अन् मला म्हणाले....
" भाऊ, पांडुरंगा सारखा भेटलास रे..! "
एवढे बोलून ते आजोबा माझ्या धाकट्या मुलाला १० रू.द्यायला लागले..!
मी त्यांना लगेच थांबवून म्हणालो...
" बाबा, अहो,हे काय करताय..? नका देऊ पैसे..!"
आजोबा म्हणाले- " अरे,लेका...लई गाड्या गेल्या ,पण तूच थांबला रे ..! राहू दे..माऊलीचा प्रसाद म्हणून..!"
मी म्हणालो- " बाबा,मी तुम्हाला फार थोडेच अंतर घेऊन आलो..त्यात काय विशेष..! नका देऊ रुपये..राहू द्या..!"
बाबा- " अरे ,तू..कितीक लांब घेऊन आला,ह्याला नाय किंमत...! तू.. आणलं याला किंमत...हाय..!"

किती मोजक्या शब्दांत आजोबांनी आजच्या समाजव्यवस्थेच्या रुक्ष होत चाललेल्या मुर्दाड व्यवस्थेवर अचूक वेध घेतला होता..!

अखेर वयोवृध्द बाबांचे फक्त १५० ते २०० मीटर पर्यंतच असलेले नियोजित ठिकाण आले अन् माझ्या पत्नीच्या मदतीने बाबांना आडोशाला सावकाश उतरुन दिले..!
उतरुन दिल्यानंतर ते आजोबा माझ्याकडे पाहून दोन्ही हात जोडून म्हणाले.....
"राम...राम ..भाऊ...दम्मानं जाय..!"
मी- ' राम..राम...बाबा..जा..आता...सावकाश...!"

मी माझ्या नियोजित ठिकाणी आलो...तर तिथं आत्ताच मघाशी त्या आजोबांना ओव्हर टेक करून आलेली वाहनं अन् त्यातून फक्त दोघे किंवा तिघे जन उतरताना मी पाहत होतो.म्हणजेच त्या गाड्यांमध्ये आजोबांना बसण्या एवढी जागा शिल्लक होती..! त्या ठिकाणी सर्व भारी भारी गाड्या अन् लई श्रीमंत जाणवणारी माणसं होती. आता ही भारी भारी गाड्या अन् श्रीमंत जाणवणारी माणसं इथे येऊन देवाधर्माच्या गोष्टी ऐकत होते...करत होते..!
माझे मन प्रचंड उदिग्न झाले होते..! 
असा असतो...देवधर्म...?
असे असतात माणसं..?
हे विठुरायाचे संस्कार...?

अजिबात नाही..!खरा विठोबा तो त्या...चिंब पावसात येत होता..! त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही अगदी कमी अंतराच्या सेवेच्या मोबदल्यात १० ₹ देऊ करत होता..!आम्ही मात्र इकडेच त्या विठुरायाला शोधत होतो..! इथेही विठुराया असेलही पण अगोदर त्या पावसात भिजून पायी येणाऱ्या ओल्याचिंब विठोबाला पूजन करायचे राहूनच गेले..!त्या आजोबांनी देऊ केलेल्या फक्त १०₹ ने कित्येकांच्या मुस्काटात लगावली  होती.माझ्या खिश्यात असणाऱ्या पैशांना ती न दिसणारी मुस्काटात पार जमून बसली होती..!

जय हरी माऊली..!
विठ्ठल..विठ्ठल...!

वंदे मातरम् ...!

त्या वयोवृध्द आजोबांना माझ्या वाहनात घेऊन जाण्याचे स्थळ: औरंगाबाद ते अहमदनर महामार्गावरील रामेश्वर मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील  कमान ते रामेश्वर मंदिर,  गोदावरी नदी( कायगाव).

स्वानुभव लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1



" खर्डण असलेलं बेसन...व्वा...!"




" खर्डण असलेलं बेसन...व्वा...!"
=================================
खवय्ये अन् त्यांचे आवडते खाद्य पदार्थांचे मेनू व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतात..! असायलाच हवे..कारण आपण समृद्ध अशा लोकशाहीतील खवय्ये नागरिक आहोत म्हंटल्यावर..! महाराष्ट्रात भिन्न भिन्न प्रदेशानुसार भिन्न भिन्न खाद्य पदार्थ तेथील माणसं आवडीने खातात..! मात्र अख्ख्या महाराष्ट्राला जर कोणता एक खाद्य पदार्थ एकसंघ ठेवत असेल तर तो आहे.......
खर्डण असलेलं बेसन....!☺

महाराष्ट्रातील बहुतांश भागातील सर्व सामान्य माणसाच्या खाद्य संस्कृती मधील सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ कुठला असेल तर तो हाच...खर्डण असलेलं बेसन...!कमीत कमी वेळेत अन् जिभेवर चव रेंगाळून टाकणाऱ्या सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ  देखील हाच खर्डण असलेलं बेसन..!

आमच्या सर्व सामान्य कुटुंबातील सर्व सामान्य खवय्ये असणाऱ्या सर्वच माणसांना या खर्डण असलेलं बेसनावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो..!☺ या खर्डण असलेलं बेसनाच्या चवीत एक वेगळ्याच प्रकारची लज्जत असते..! त्या खाद्य पदार्थातील सार त्यात जमा झालेला असतो..!

खर्डण कोणतेही असू द्या...त्या खर्डण मुळेच त्याच्या वरील सर्वच घटकांना महत्त्व आलेले असते..! हे तेच खर्डण असते जे स्वतःला पार दमण करून घेऊन वरच्या स्तरावरील अनेकांना चवदार दिवस आणत असते..! म्हणून सर्वांनी त्या सर्वच क्षेत्रातील स्वतः ला भाजून पोळून अन् चटके सोसून घेणाऱ्या अनेकानेक खर्डण असणाऱ्यांची काळजी घ्यायला हवी..!

कोणत्याही खाद्य पदार्थातील तळाच्या शेवटी असणाऱ्या खर्डणला खाताना माणूस आतुरलेला असतो..! अशा खवय्येंच्या जिभेवर अन् त्यातल्या त्यात त्यांच्या चेहऱ्यावर अमृत प्राशन करत असल्याचे भाव नक्कीच जाणवतात...हा माझा स्वानुभव आहे..! खाद्य पदार्थातील संस्कृतीच्या देवतेने स्थायुरूप पदार्थांचे अमृत असेच बनवले असेल याचा चवदार चवीने विश्वास वाटतो..!

ज्यांना कुणाला मला जाणवलेल्या सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ खर्डण असलेलं बेसन खाण्याची जर यदा कदाचित तीव्र इच्छा झाली असेल तरच त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा..! कारण या खर्डण असलेलं बेसनाच्या चवीत बराच महाराष्ट्र सहज सापडतो..! हा देखील माझा स्वानुभव आहे बरं का..!

ता.क . खाद्य पदार्थ माणसाला एक माणूस म्हणून पटकन एकत्र आणतात..!☺

वंदे मातरम्..!
खर्डण असलेल्या चवदार बेसणावर चवदार प्रेम करणारा लेखक
: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२०ऑक्टोंबर २०१९

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

" असे प्रवेशद्वार, प्रत्येक शिवमंदिरात असावे..! "




चिंतन

" असे प्रवेशद्वार, प्रत्येक शिवमंदिरात असावे..! "
________________________________________________

आज २० ऑक्टोबर २०१७ रोजी काशी विश्वनाथ महादेव मंदिर ,कोपरगाव येथे सहपरिवार दर्शन करण्यासाठी जाण्याचा योग आला.तेथील शिव मंदिरात एक बाब मला खूप आवडली..!

मुख्यत:  बहुतांशी शिवमंदिरात प्रवेश करण्याचे जे प्रवेशद्वार असते,ते कमी उंचीचे असते.आत गाभाऱ्यात प्रवेश करतांना वाकून प्रवेश करावा लागतो.असे करतांना बऱ्याच वेळा भाविकांचे डोके , प्रवेशद्वाराच्या वरील बाजूवर आदळते.आणि त्यामुळे वेदना,जखमा देखील होतात..!

मात्र कोपरगाव स्थित काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूवर तेथील सन्माननीय व्यक्तींनी ,भाविकांना वरील प्रमाणे त्रास होऊ नये म्हणून नरम स्पंज युक्त गादी बसवली आहे.त्यामुळे वयोवृद्धांना,व इतर भाविकांना दर्शनास जातांना व येतांना वरील उल्लेख केल्याप्रमाणे त्रास होत नाही..!

इतर ठिकाणच्या शिव मंदिर तिर्थाच्या ठिकाणी देखील (जेथील प्रवेश द्वार कमी उंचीचे आहे तिथे) अशी व्यवस्था केली तर खूप सुखकारक होईल..!

अशी सुखकारक व्यवस्था कोपरगाव स्थित शिव मंदिरात केल्याबद्दल विश्वस्थांचे खूप खूप धन्यवाद...!
                  
ता.क.: शिव मंदिरातून बाहेर येतांना माझे वयोवृद्ध वडील..व त्यांच्या डोक्याच्या वर मुख्य प्रवेशद्वाराला स्पंज युक्त गादी बसविलेली जागा..!
वरील फोटोची क्लिक वडील व माझ्या मुलाच्या नकळत काढली आहे..!
              
वंदे मातरम् 

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

        
 दि.२०/१०/२०१७

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

" आमच्या काळी असे होते..!"





चिंतन


                                    " आमच्या काळी असे होते..!"

=======================================

आज  दिनांक १६ /१०/२०१३ रोजी भल्या सकाळी नेहमीप्रमाणे भटकंती करायला गेलो..अन् नेहमीप्रमाणे..खळखळून वाहणाऱ्या शिवणा नदीत पाय धुवून अन् आई दाक्षायणी मातेच्या कळसाचे दर्शन घेतले..! तेथे स्नान करणाऱ्या एका तरणाबांड मुलाला माझा एक फोटो काढायला सांगितला..! कारण मला पूर्णपणे माहीत आहे की,आज मी सुंदर अशा निसर्ग संपन्न वातावरणात उभा आहे,तेच निसर्ग संपन्न वातावरण काही वर्षांनीं कदाचित नसेल..!
म्हणून येणाऱ्या काळात मी जिथं उभा आहे तसलं वातावरण नसेल अन् हा फोटो अती दुर्मिळ असणाऱ्या वातावरणातील छायाचित्रांच्या श्रेणीत गणल्या जाईल...!

माझा या छायाचित्रातील प्रसंग २०१३ सालचा भल्या सकाळचा आहे..! ज्यावेळी मी लासूर स्टेशन येथील माझ्या घरापासून ते शिवना नदीपर्यंत नियमितपणे  नदीच्या पाण्यात पाय धुवून घरी परत यायचो..त्यावेळी..! बऱ्याचदा माझ्या सोबत श्री. सिताराम हाडके पाटील असायचे..! ते भल्या सकाळी याच शिवना नदीच्या पाण्यात स्नान करून आई दाक्षायानी मातेच्या दर्शनासाठी जात असे..!

असे असणारे फोटो व त्याकाळातील असे वास्तवातील जीवन..इतिहासजमा होत आहे..!माझ्या काळातील म्हातारी माणसं असं म्हणतात की,
" आमच्या काळी असे होते....तसे होते...! "
असं ही जुनी जाणती माणसं म्हणाल्यावर आमच्या पिढीला ते खरं वाटत नाही..! मात्र ते खरं असे..!
आता आमच्या पिढीला त्यांच्याच काळात असे म्हणायची वेळ आली आहे की,
" गेल्या काही वर्षापूर्वी असे होते..तसे होते...!"
आमचं हे म्हणणं आमच्या आजच्या पिढीतील लेकरांना देखील खरं वाटणार नाही,पण तेही खरंच आहे..!

नद्या माणसांकडे आल्या नाहीत,तर माणूस नद्यांकडे गेला..!☺
काही दिवसानी येणारी पिढी असेही म्हणू शकते की,
" एक होती नदी..!"
ही परिस्थिती फक्त शिवना नदी पुरती मर्यादित नाही,तर अशीच परिस्थिती बहुतांशी नद्यांच्या बाबतीत झाली आहे अन् होत आहे..!

ता क.: नदी जीवनदायिनी आहे..!

स्थळ: शिवना नदी, दाक्षायानी माता मंदिर परिसर,लासुरगाव.

वंदे मातरम्

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १६/१०/२०१३

(एक आठवण..दिनांक १६/१०/२०१३ ची..!
आज दिनांक १६/१०/२०१९ रोजी पुनर्रप्रकाशित..!)

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

" पोक्त, समवैचारिक व्यक्तिमत्त्व: वालतुरे भाऊ..!"






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

" पोक्त, समवैचारिक व्यक्तिमत्त्व: वालतुरे भाऊ..!
==================================

मी काल दिनांक १५ ऑक्टोंबर २०१९ रोजी संध्याकाळी तापडिया रंगमंदिर औरंगाबाद येथे गेलो होतो.निमित्त होते,श्रद्धेय स्व.प्रल्हादाजी अभ्यंकर व्याख्यानमाला ऐकण्यासाठी  दरवर्षी उपस्थित राहणारा एक श्रोता म्हणून..!मी माझ्या जागेवर बसलो होतो,व्याख्यान प्रारंभ व्हायला वेळ असल्याने मोबाईल मध्ये उद्याच्या व्याख्यान संदर्भात काही माहिती पाहत होतो.
इतक्यात माझ्या शेजारून मला आवाज ऐकू आला...
" का...रे..नंदन...?"
मी चमकुन बाजूला पहिले तर आदरणीय मधुकरराव पा. वालतुरे भाऊ येऊन बसले होते..! मी क्षणाचाही विलंब न करता भाऊंचे आदराने दर्शन घेतले.यानंतर आदरणीय भाऊ मला लगेच म्हणाले...
" मला पूर्ण खात्री होती,तू आज नक्की भेटशील..अन् ते खरं ठरलं..!"
मी भाऊंना आदरतिथ्य करण्याविषयी चौकशी केली पण भाऊंनी नम्रपणे नकार दिला..!

भाऊंचे माझ्या प्रती असलेले प्रेम मला वेळोवेळी जाणवत आलेले आहे.त्यात फक्त आणि फक्त प्रेम होते,दुसरे काहीही नाही..! आपुलकीनं जवळ घेऊन आमच्यातील समवैचारिक सांस्कृतिक नात्याच्या बाबतीत नक्कीच त्यावेळी चर्चा होत असते. जेंव्हा जेंव्हा भाऊंची अन् माझी भेट झाली त्यावेळी भाऊंनी माझ्या लिखाणाला भरभरून दाद दिलेली मी ऐकत आलेलो आहे.आजही भाऊंनी पुन्हा माझ्या लिखाणाबद्दल तेच कौतुकाचे शब्द उल्लेखित केले.
" नंदन, तुझा फेसबुकवरील प्रत्येक लेख मी आवर्जून वाचतच असतो.विशेषकरून तू, गावाकडच्या लोकांच्या विषयी लिहीत असलेले लेख मला गावच्या आठवणीत घेऊन जातात..! काही खाद्य पदार्थांचे लेख देखील तोंडाला पाणी आणतात..! खूप छान लिखाण करतो..! लिहीत रहा..!" आमच्यात असलेल्या समवैचारिक नात्यातील असलेल्या नात्याची प्रत्येक वेळी होणारी भेट त्याच  समवैचारिक नात्याला अजुन समृध्द करत असते.जशी आज झालेल्या भेटीत भाऊंचा तोच वैचारिक प्रगल्भ गुण आमच्या प्रेमळ भेटीत जाणवला..!

आदरणीय मधुकरराव पाटील वालतुरे भाऊ..!

सध्या जिल्हा परिषद औरंगाबाद येथे एक धडाडीचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहे.उत्कृष्ट वक्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण..! आज आदरणीय भाऊ एक शिक्षक म्हणून निवृत्त जीवन जगत आहेत..! आदरणीय वालतुरे भाऊ म्हणजे....
एक पोक्त नेतृत्व..!
एक अभ्यासू नेतृत्व..!
आपलंसं करणारे नेतृत्व..!
वक्तृत्व अन् कर्तृत्व याचा सुरेख संगम असलेले नेतृत्व..!
सरकारी शिक्षण क्षेत्रात ,सहकार क्षेत्र कसं आपल्या संघटन कौशल्याने प्रगतीपथावर न्यायचे याचे उत्कृष्ट उदाहरण..! गंगापूर तालुक्यात आज सरकारी शिक्षण क्षेत्रात ज्या भिन्न शिक्षक संघटना अस्तित्वात आहेत त्यातील  नेतृत्व आदरणीय भाऊंच्याच तालमीत तयार झालेले आहे.लोकशाहीतील विचार स्वातंत्र्याचे काहींचे मार्ग जरी भिन्न झाले असतील मात्र त्यांचा प्रारंभ हा आदरणीय भाऊंच्याच तालमीत झालेला आहे ..!

आदरणीय वालतुरे भाऊ,यांचे जन्मगाव नेवरगाव,ता.गंगापूर..! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक पितृतुल्य ज्येष्ठ स्वयंसेवक स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर यांनी देखील जन्मभूमी नेवरगाव..! त्यामुळे भाऊंवर संघाचे संस्कार बालपणापासूनच झाले.भाऊंनी त्यांच्या तारुण्यातील काही काळ पुण्याच्या परिसरात संघाचे काम करण्यासाठी व्यतीत केलेला आहे.संघटन कौशल्याचे संस्कार मिळाल्याने भाऊंनी आपल्या याच कौशल्याच्या बळावर शिक्षकांचे देखील  प्राथमिक शिक्षक संघाच्या रूपाने संघटन उभे करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे..!कोणतेही संघटन उभे करण्यासाठी एका नेतृत्वाच्या अंगी जे गुण असावे लागतात ते नेतृत्वगुण भाऊंच्या नेतृत्वात आहे..! मी या बाबतीत माझे प्रिय मित्र राजेश हिवाळे सरांना म्हणालो पण होतो की, " तुम्हीं,भाऊंच्या नेतृत्वगुणांचा बारकाईने अभ्यास करा..! त्यांच्या संस्कारात तयार व्हा..! गेल्या कित्येक वर्षांपासून गंगापूर तालुक्यातील शिक्षकांना आपल्या नेतृत्व कौशल्याने आपलसं करणारे नेतृत्व भाऊ आहेत..! "

मी जो पर्यंत गंगापूर तालुक्यात एक सर्व सामान्य शिक्षक म्हणून कार्यरत होतो तो पर्यंत वेळ मिळेल तेव्हा  भाऊंची भेट घेत होतो..एक स्वयंसेवक या सांस्कृतिक प्रेमाच्या नात्याने..!प्रत्येक भेट मला समृध्द करत होती.माझी स्व.आई ज्यावेळी स्वर्गवासी झाली होती त्यावेळी भाऊंनी माझे केलेले सांत्वन माझ्या मनाला खूप धीर देऊन गेले होते..!

व्याख्यानमालेतील आजचे पुष्प संपल्यानंतर भाऊंच्या सोबत बाहेर पडलो.भाऊंच्या सोबत एक स्वयं छायाचित्र काढले.ते काढत असताना  सध्या माझ्या मोबाईलची तब्येत अस्वस्थ असल्याने ते काही नीट येईना..! त्यावर भाऊंनी मला शाब्दिक कोटी केली...
"अरे, मला किती वेळा मोबाईल समोर हसायला लावतो..!"☺
ही शाब्दिक कोटी ऐकताना मला खूप हसू आले..! कारण मराठी भाषेतील शाब्दिक कोट्या मनाला टवटवीत करून जातात..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:१६ऑक्टोंबर २०१९

" विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र,रामेश्वरम्..! "



चिंतन

" विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र,रामेश्वरम्..! "



====================================
                                                 
दि.२७/१०/२०१७ रोजी दुपारपर्यंत आम्ही धार्मिक तीर्थक्षेत्र रामेश्वर महादेव दर्शन,आटोपून पुन्हा  रामेश्वर मंदिर परिसरात आलो होतो.खूप जोरजोरात पाऊस सुरू झाला..!माझ्या सोबत वयोवृद्ध माणसं होती.मनात शंका आली की, " विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र" दर्शन होते की नाही..? ज्या व्यक्तीने स्वतःसाठी काहीही मागे न ठेवता , सर्व काही देशासाठी अर्पण केले त्या महामानवाच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन होते की नाही..? मनात अशा असंख्य प्रश्नांचे काहूर  माजले होते..!

आम्ही मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या एका दुकानासमोर आडोश्याला थांबलो होतो.दुपार झाली होती.पाऊस उघडण्याचे नाव घेत नव्हता..! तरीही आम्ही सर्वांनी नक्की ठरवले होते की,डॉ.कलाम साहेबांच्या समाधी स्थळी जायचे म्हणजे जायचेच..! अखेर....पाऊस थांबला..! खूप आनंद झाला..! पटकन वाहनाची व्यवस्था करून आम्ही रामेश्वरम् ते मदुराई या राष्ट्रीय महामार्गहून वाहनातून निघालो..!अवतीभोवतीचा परिसर बघत होतो.निव्वळ समुद्री वालुकामय जमीन..!याच परिसरात कलाम साहेब खेळले,बागडले,प्राथमिक शिक्षण घेतले..किती पुण्यभूमी आहे ही...!

 अंदाजे वीस मिनिटांनी आम्ही  " Dr.A.P.J.Abdul kakam national memorial " येथे पोहचलो..! आतुरता होती...भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या माझ्या पिढीने पाहिलेल्या,ऐकलेल्या ,अनुभवलेल्या सर्वात महान महामानवाच्या समाधी दर्शनाची..! मुख्य दरवाजावर गेल्यावर कडक सूचना मिळाली..." मोबाईल का उपयोग समाधी के आसपास करना सक्त मना है..! " आम्ही सर्वजण प्रवेशित झालो. प्रवेश झाल्या झाल्या प्रवेशित मार्गावर ,भिंतीवर काहीसे उंच असलेल्या भिंतीवर कलाम साहेब यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षणांचे फोटो लावलेले होते..!मी फोटो पाहण्यात दंग होणार ,इतक्यात चि.नमन,मला म्हणाला, " दादा, आपण पहिल्यांदा कलाम साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊ..! "  मी माझा फोटो दर्शन कार्यक्रम बंद केला.समोर चालत होतो,मुख्य दर्शनी ठिकाणी डॉ.कलाम साहेब विणा वादन करत आहे,या स्थितीतील  खूप छान ,सुंदर शिल्प दिसले..!कलाम साहेब यांना विणा वादन खूप आवडायचे..!त्यांची ती आवड दर्शनी भागावर दिसल्यावर आपण एका महान रसिक सारस्वताच्या भेटीला जात आहोत याचा आनंद होत होता..!

मुख्य गर्भ गृहात आलो.डॉ.कलाम साहेब , चिरनिद्रा धारण करून समाधिस्त झालेले पुण्यतिर्थ नजरेस पडले..!समाधी स्थळावर हिरवा ,सुंदर नक्षीकाम असलेला कपडा होता..! तो साक्ष देत होता की," कलाम साहेबांनी तहहयात या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी संपूर्ण जीवन अर्पित केले याचे..!"  तिथे अनेकजण समाधी स्थळाला  उभे राहून,दोन्ही हात जोडून वंदन करत होते.मला ती कृती सुध्दा खुज्जी वाटू लागली..!मी व चि.नमन ने आपण आपल्या विठुरायाचे जसे साष्टांग दंडवत करून लोटांगण घालून दर्शन घेतो,अगदी तसेच  लोटांगण घालून साष्टांग दंडवत करून भारतमातेच्या माझ्या पिढीने पाहिलेल्या या " विज्ञान पुरुषाचे "  दर्शन घेतले..!आमची दर्शन करण्याची विनम्र कृती पाहून तेथील संरक्षक असलेले पुरुष ,महिला आचंबित नजरेने आमच्याकडे पाहू लागले..!मी अंदाज लावला, बहुदा असे दर्शन करणारा हा " भक्त " ही मंडळी पहिल्यांदाच पाहत असावा...!आमची दर्शन करण्याची ही " महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची विनम्र वंदना " तेथील दक्षिण भारतीयांना नवीन होती..! शेवटी, आमच्याकडे भेट देण्यासाठी आलेल्यांपैकी एक जण पटकन माझ्या जवळ आला व म्हणाला, " आप महाराष्ट्र से हो क्या..?" मी म्हणालो "" हां,आपने कैसे पहाचाना..?" त्यावर त्या व्यक्तीचे उत्तर कायम मनात घर करून गेले..!तो मराठीत म्हणाला
" महाराष्ट्रातील सर्वसामान्य वारकऱ्यांनी संपूर्ण विश्वाला दिलेली ही अमूल्य,विनम्र वंदन करण्याची देणगी आहे..!आणि अशी वंदना महाराष्ट्रातील माणूसच पुढे येऊन पहिल्यांदा करतो..!" हे ऐकुन मी सदगदित झालो.ते बंधू जळगाव शहरातील होते..!खूप आनंद वाटला, एका मराठी,माणसाला ,एका मराठी माणसाने त्यांच्या संस्कृतीवरून ओळखण्याचा..!

काही वेळानंतर माझे वयोवृध्द वडील,सासरे,दोन्ही मुले व माझी पत्नी तेथील फोटो पाहण्यात मशगुल झाले..! मी मात्र स्तब्ध,निश्चलपने समाधी समोर उभा होतो..!
                                                                         
आणि विचारचक्र सुरू झाले,वंदनीय डॉ.कलाम साहेबांच्या अतुल्य आयुष्याचे चिंतन करण्यास..! मोठ्या उंचीचा हा महान माणूस..! आपल्या पिढीचे नशीब की या थोर विभूतीस आपल्याला पहावयास मिळाले...! रामेश्वरम् मध्ये असतांना लहानपणी कलाम साहेब वडीलांसोबत,कधी बहिणीच्या पती सोबत रामेश्वरम मंदिरात  जात असे..!  वडीला,सोबत नित्यनियमाने नमाज अदा करायचे..! पण या सर्व कृतीमध्ये कूठेही कर्मठपणा जाणवला नाही.कलाम साहेबांची शिक्षणासाठी असलेली तळमळ आजच्या नवतरूण व विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे. महान कवी गुलजार साहेब यांच्या धीरगंभीर आवाजात असलेली कलाम साहेबांनी लिहिलेली बायोग्राफी जी , मी ऐकलेली आहे,तिचा शब्द न शब्द माझ्या कानात ऐकू येऊ लागला..!राहून-राहून वाटत होते की,राष्ट्र,राष्ट्रसेवा काय असते याचा पाठ प्रस्तूत करण्यासाठी ईश्वरीय शक्ती प्रत्येक काळात अनेक महानुभवांना भूतलावावर पाठवत असतो.

कलाम साहेब स्वत:म्हणतात की,"लोक असा तर्क लावतात की,विज्ञानाचे विद्यार्थी ईश्वरीय शक्तीला मानत नाही;परंतू माझे असे मत आहे की, मी विज्ञानाचा विद्यार्थी होतो म्हणून मला त्या अदृश्य शक्तीला अनुभवता आले.."

काळाच्या पूढे विचार करणारा व भारत महासत्ता २०२०ची स्वप्न दाखवणारा हा महान माणूस...! १०बाय१२च्या खोलीत पूस्तकांसमवेत संसार थाटलेला विद्वान माणूस किती महान होता याची प्रचिती येते..! नाहीतर आज भल्या मोठमोठ्या घरात पूस्तके म्हणजे "अतिअल्पसंख्याक " प्रवर्गात असल्यागत आहे...!भारताचे विज्ञान राष्ट्रपती म्हणून विक्रम साराभाईंची मोठ्या अभिमानाने गूणगाण करणारा थोर माणूस..! वर्तमानपत्र वाटप असो की,वडीलांना नावाडी कामात मदत ....कधीच कामाची लाज बाळगू दिली नाही..!कलामांचे वडील निरक्षर होते; परंतू जीवणाच्या ज्ञानाविषयी विद्वान..! कलाम साहेबांनी तहहयात आपल्या निरक्षर वडीलांना आदर्श मानून व त्यांच्या तत्वांना प्रमाण मानून आयूष्यात भारताला कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवले..!

आपले आई, वडील ,बहिणीचे पती यांना न विसरणारे कलाम..! कसे विसरणार...?  त्यांना आईपासून निरक्षर जरी असली तरी प्रेम कसे द्यावे हे शिकायला मिळाले..! वडीलांपासून तत्व,कामात लाज न बाळगणे,व बहिणीच्या पतीपासून कष्ट कसे करावे हे अनुभवले..! एकदा कलामांना शिक्षणासाठी पैसे कमी पडतात.घरची परिस्थिती खूपच गरीब.अशावेळी त्यांची बहिण जोहरा स्वतचे सूवर्ण अलंकार विकून भावास शिक्षणासाठी पैसे देते हा प्रसंग आपली भारतीय संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते. मग ती संस्कृती वेगवेगळ्या धर्मात ,विविध नैतिक मूल्यांद्वारे वेळोवेळी दिसत असते..! अशा या महान भारताच्या महान सूपूत्राची बायोग्राफी-(आत्मचरित्र) गूलजारजींच्या आवाजात नक्की ऐका मित्रांनो..!

जी माणस गरीब परिस्थितीतून तावून सूलाखून निघतात अश्या अनेक थोर माणसांचे आयूष्य नेहमी सर्व मानव जातीला प्रेरणादाई  असते..! लाल बहादूर शास्री,डॉ.आंबेडकर,कलाम साहेब,नरेंद्र मोदीजी इ.गरीबीतून वर आलेली ही माणस आजच्या भारतीयांसमोर निश्चितच आदर्शवत आहेत..!

शेवटी डॉ.कलाम साहेबांच्या कार्यकर्तूत्वास सलाम करून तिथून मी निघालो...! तिथे कलाम साहेब यांच्या बालवयाचे ,त्यांच्या गावाचे,जे चित्र ,चित्रकाराने रेखाटलेले होते ते मनात घर करून गेले..! अनेक फोटो बघत असतांना आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या सोबतचा कलाम साहेबांचा फोटो पाहून,इथे    " आपला मराठी माणूस " कुणीतरी आहे याचा खूप मोठा भावनिक  आधार वाटला..!

 माझे सर्वात आवडते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो पाहून " दोन महान समकालीन तपस्वींची  भेट "   माझ्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे..!  कलाम साहेबांनी उपयोगात आणलेल्या काही वस्तू तिथे मांडलेल्या होत्या.त्यात दोन सफारी सुट,एक बूट व एक अगदी साधी स्लीपर चप्पल इ.खूप मोजक्या वस्तू होत्या..!वास्तविक कलाम साहेब यांनी ज्यावेळी राष्ट्रपती भवन सोडले त्यावेळेस ज्या वस्तू सोबत घेतल्या,त्याच वस्तू इथे पहावयास मिळाल्या..!किती मोजक्या गरजा ,होत्या या थोर पुरुषाच्या..!

अंतर्गत विविध वस्तू,छायाचित्रे पाहून झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.बाहेर फोटो काढण्यास परवानगी होती..!बाहेर डॉ.कलाम साहेबांचा अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळा होता.तसेच कलाम साहेबांनी भारताला दिलेली संरक्षक कवच कुंडले " अग्नी क्षेपणास्त्र " ची उंच प्रतिकृती मोठ्या अभिमानाने उभी केली होती..!आम्ही बाहेरील डॉ.कलाम साहेबांच्या पुतळ्यास विनम्र वंदन केले..! आणि एक सुखद,भावूक,चिरकाल स्मरणात राहील अशी
 " विज्ञान पुरुष तीर्थक्षेत्र " ची भेट संपवून परत निघालो..!
 
वंदे मातरम्..!
एक प्रवासी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

रामेश्वरम् तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा दिनांक: २७ ऑक्टोंबर २०१७

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

" ढोंगी एकांगी पुरोगामी..अन् आरोग्यदायी कोजागिरी..!☺



चिंतन

" ढोंगी एकांगी पुरोगामी..अन् आरोग्यदायी कोजागिरी..!☺




______________________________________________

आज हिंदू धर्मियांचा " कोजागिरी पौर्णिमा " हा उत्सव साजरा होत आहे..!

अजुन कसा एखादा तथाकथित पुरोगामी या हिंदू धर्मातील उत्सवावर टीका , टिप्पणी करेना..!
बहुदा मध्यरात्री किंवा उत्तररात्री टीका ,टिप्पणी करण्याचा त्यांचा मनोदय असेल..!

आजकाल फक्त हिंदू धर्मातील उत्सव ,परंपरेवर टिका टिप्पणी केली की ,संबंधितांना लगेच " पुरोगामी " ही सन्मानाची बिरुदावली चिकटली जाते..किंवा कुणीतरी बहाल करतात..!हे तथाकथित ढोंगी एकांगी पुरोगामी फक्त हिंदू धर्मातील सण उत्सव परंपरा यांच्यावरच टीका टिप्पणी करत असतात...!
इतर धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरा या बाबत यांच्या मुखाला दाभनाने शिवल्या जाते..!

कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.आपल्या शरीराला आरोग्यदायी अन् पौष्टिक पदार्थ एकत्र करून दूध उकळून प्राशन करण्याचा पवित्र दिवस..!त्याच दुधात आरोग्यदायी शीतल ,थंड चंद्राचा प्रकाश मिसळून त्याची लज्जत अजुन वाढते..!वाढलेल्या पित्त प्रकोपावर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आरोग्यदायी दूध उकळून पिल्याने फरक पडतो..!

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ,पृथ्वीच्या जवळ आलेला असतो..!त्यामुळे चंद्राचा शीतल प्रकाश पृथ्वीवर इतर दिवसांच्या मानाने जास्त प्रमाणात पडलेला असतो.आपल्या पूर्वजांनी याच भौगोलिक घटनेचा मानवाच्या आरोग्यासाठी आरोग्यवर्धक परिमाण साधण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पौष्टिक पदार्थ एकत्र करून दूध उकळून पिण्याची एक आरोग्यवर्धक प्रथा सुरू केली..!

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी  शेतकरी दादाने पिकविलेल्या नवीन धान्याचे याच दिवशी पूजन करण्याची प्रथा आहे.हिंदू धर्मातील प्रत्येक सण उत्सव आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत.आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणारे सर्व सण उत्सव आहेत..!

ता.क.: निसर्ग, आरोग्य विज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे हिंदू धर्मातील विविध सण,उत्सव..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!
दिनांक: २३ ऑक्टोंबर २०१८

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

" सर्व सामान्यांची परिवहन.. व त्यातील प्रवासी..! "







**  मला प्रवासात भेटलेली माणसं..! **

" सर्व सामान्यांची परिवहन.. व त्यातील प्रवासी..! "
______________________________________________

सर्व सामान्यांची परिवहन बस ज्यात सर्व तऱ्हे तऱ्हेचे विविध तऱ्हा असलेली इरसाल ,नमुनेदार माणसं सोमवार ते शनिवार मला हमखास सापडतात..! ते पूर्वीही होते अन् आताही आहेत..!मी ज्यावेळी लासूर स्टेशन ते एकलहेरा बसने ये..जा करायचो त्यावेळी मी या सर्व मानवांना छानपैकी वाचलेले आहे.अर्थात त्यावेळी प्रवास मार्ग कमी अंतराचा होता अन् कधी मधी होता त्यामुळं अशी जिवंत माणसं वाचायला कमी वेळ मिळाला..!

आता मात्र माझे या बाबतीत प्रमोशन झाले आहे..!😂 म्हणजे माझ्या सध्याच्या शाळेत जाण्याचे  अन् येण्याचे अंतर खूप वाढले आहे अन् त्यात नियमितपणा पण आला आहे.त्यामुळे  ही असली माणसं दररोज न चुकता माझ्या नजरेत येतात अन्  वाढत जातो माझा, माझ्या भोवती येणाऱ्या माणसांचा पसारा..!

धन्यवाद २७/२ चा बदली शासन निर्णय..! तुझ्यामुळे त्यातल्या त्यात मी Random round मध्ये गेल्यामुळे मला हे जिवंत माणसं वाचण्याचे परम सुख मिळत आहे..! परम सुख याकरिता म्हणतोय की,आता माझा प्रवासाचा कॅनव्हास मोठा झाला आहे..अगदी मोठ्ठ्या चित्रपट गृहासारखा..! पूर्वी कसा दूरदर्शनच्या कॅनव्हास सारखा होता..!

माझ्या सकट जी सर्व सामान्य भारतीय माणसं आहेत त्यांचे प्रवासात भेटायचे हे खूप चवदार प्रवासी ठिकाण आहे. चवदार म्हंटल्यावर बऱ्याच खवय्यांना आश्र्चर्य वाटले असेल..!😂 चवदार चव काय फक्त गोड,आंबट इ.चवीपुरतीच थोडी असते..!
त्या चवदार चवींमध्ये अनेक चवी असतात.

त्या कोणकोणत्या...?
तर या अन् बसा मग बस मध्ये अन् घ्या मोफत त्या सर्व चवदार चवींचा आस्वाद..फक्त नाकाने..! गुटखा,तंबाखू, खर्डा, बार एखादा अतिशय गुपचूपपणे चोरून बिडी पिनाऱ्याच्या धुराचा, त्यांच्या तोंडाचा वास या बसमध्ये सदैव वास करत असतो..! आणि हो ते वांती, ओकारी करणारे राहिलेच की..! त्यांच्या शिवाय बस अन् बसमधील प्रवास पूर्ण होऊच शकणार नाही इतकं त्यांचं अन् बस चे नाते घट्ट  आहे..! ते नाते कधी..कधी बसच्या दारात तर कधी खिडकीत,तर चक्क कधी एखाद्या प्रवासाच्या अंगाखांद्यावर प्रेमाने आलिंगन देताना आढळून येते..!😂

मला माझ्या एका मित्राने म्हंटले आहे की, जो व्यक्ती परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करतो त्याला सहसा अॅलर्जी नावाचा आजार होत नाही..! खरं काय अन् खोट काय..माहीत नाही.पण एक मात्र नक्की की, जे माणसं बस मध्ये नेहमी प्रवास करतात त्यांना सगळ्याच वासाची सवय होऊन जाते अन्  त्यांची वास सहन करण्याची प्रतिकार क्षमता वाढते..हा माझा स्वतः चा अनुभव आहे..!😂 थोडक्यात वासांच्या बाबतीत ही माणसं समृध्द होत जातात..!😂

असो, आता आवरतं घेतो..नाहीतर माझे हे वर्णन ऐकून जी माणसं बस मध्ये नेहमी प्रवास करत नाहीत त्यांना अॅलर्जी व्हायची...माझ्या या लेखाची..!😂

ता.क.: बस मध्ये एवढं काही असूनही आपल्या सर्व सामान्य
माणसांना सेवा देणाऱ्या त्या सर्व वाहक, चालकांना माझे विनम्र वंदन..! खरचं ग्रेट आहेत ही माणसं..!

वंदे मातरम्..!

लेखक व बस मधील प्रवासी:  नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव, पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १२ ऑक्टोबर २०१८
स्थळ: बस..!
वेळ: आत्ताची..!

ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..☺





मला प्रवासात भेटलेली माणसं..!

ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..☺
=================================

आज  दिनांक ११/१०/२०१९ रोजी मी रजेवर होतो,कारण माझ्या एका दाढीची देखभाल अन् दुरुस्ती करायची होती.लहानपणी गुळ खूप खाल्ला  आताही खातो म्हणा..पण लई कमी..! चहा मात्र ३१ वर्षापासून पीत नाही..! तर...त्या काळात खाल्लेल्या गुळाचा प्रताप एका दाढीवर दिसू लागला होता,म्हणून एका सरकारमान्य दाताच्या दवाखान्यात त्याच दाढीची देखभाल अन् दुरुस्ती करायला गेलो होतो.

तिथं दोन डॉ. भगिनी  होत्या.मी तेथील उतरत्या सिट वर अर्धवट स्थितीत जाग्या अवस्थेत झोपलो.माझे तोंड उघडून एक डॉ.भगिनी उपचार करू लागली.माझ्या बाजूलाच एका खुर्चीवर दुसरी डॉ.भगिनी बसलेली होती.ती आपल्या हातातील मोठ्या मोबाईल वर काहीतरी पाहत होती.ही बाजूला बसलेली दुसरी डॉ.भगिनी बहुदा माझ्यावर उपचार करत असलेल्या डॉ. भगिनीनी सिनियर होती..!

माझ्या दाढीवर उपचार सुरू झाला.इतक्यात त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीचा मोबाईल मध्यम आवाजात खणखणला..अन् त्यावर रिंगटोन वाजू लागली......
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
मी वेदना होत असतानाही  काही क्षण आनंदी झालो.माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनी ला काहीतरी समस्या निर्माण झाली अन् त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनिकडे  सल्ला घेण्यासाठी गेली..इतक्यात पुन्हा त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीचा मोबाईल ची आलेल्या कॉल ची बेल वाजली......
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ती बेल वाजत असतानाच त्यांनी माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला योग्य ते मार्गदर्शन केले..अन् पुन्हा आपल्या जागेवर बसल्या मोबाईल पाहत..!

पुन्हा माझ्या दाढीवर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला काहीतरी समस्या निर्माण झाली अन् त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीकडे सल्ला घेण्यासाठी गेली.ती दुसरी डॉ.भगिनी  पुन्हा माझ्या कडे आली अन् इतक्यात पुन्हा त्याच  डॉ.भगिनीचा मोबाईल ची आलेल्या कॉल ची बेल वाजली......
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ही बेल सुरू असतानाच माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनी ला मार्गदर्शन करून त्या सिनियर डॉ.भगिनी बाजूला जाऊन बसल्या..!

हे सगळं सुरू असताना माझ्या मनात विचार येत होता की,
यांच्या या...
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!" च्या नादात माझ्या जीव की प्राण  असणाऱ्या दाढीवर भलताच चुकीचा उपचार झाला तर मला अन्नाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही..!☺
मी उपचार होई पर्यंत गुप गुमाण पडून राहिलो...
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ही रिंगटोन अधून मधून ऐकत ऐकत..!😂

अखेर माझ्या दाढी वरील उपचार झाला,माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला " धन्यवाद ताई..!" असे म्हणून बाहेर पडू लागलो इतक्यात पुन्हा त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीच्या मोबाईल वर पुन्हा मध्यम आवाजात रिंगटोन ऐकू आली.....
"ढींक  चिक ढिंक  चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"😂

वंदे मातरम्..!

स्वतः वर अनुभव आलेला लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:११ऑक्टोंबर २९१९,शुक्रवार.

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..!"




चिंतन

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..!"
=======================================



  

चिंतन ©️

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..! "

====================================

 रेखाजींनी सौदर्य व सशक्त अभिनयाने चित्रपट सृष्टीवर सदाबहार जादू केली. प्रेम व त्यातील सर्वोच्च मर्यादा याचा अति सुंदर मिलाप म्हणजे अमिताभजी व रेखाजी यांचे ऐकिवात असलेलं नितांत सुंदर आत्मिक ओढ असलेले प्रेम..! या दोघांच्या निस्सीम प्रेमाच्या कथा प्रत्यक्षात खऱ्या किती अन् खोट्या किती हे त्या दोन जीवांनाच माहीत. मात्र रसिक प्रेक्षकांनी रेखा अन् अमिताभ बच्चन यांच्या या ऐकिवात असलेल्या प्रेमकथेवर भरभरून प्रेम केले हे मात्र प्रेमळ सत्य..! या दोघांना व जया भादुरी यांना एकत्रित तेही तत्कालीन वास्तवात असलेल्या सत्य कथेत जिवंत अभिनय करून घेण्याचे धाडस सिलसिला या चित्रपटाद्वारे  दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केले. हा चित्रपट आजही खूप सुंदर व तरल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.हे धाडस वास्तवात उतरविण्याचे कसब फक्त यश चोप्रा यांच्यातच होते हे मात्र त्रिकालाबाधित सत्य..!

आज कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकात अशी ऐकण्यात आलेली वास्तविक सत्य कथा,सत्य असणाऱ्या जिवंत पात्रांना घेऊन सुंदर कलाकृती निर्माण करण्याचे धाडस नाही..! बहुदा अशी स्वच्छ मनांची व वास्तविकता असलेली सुंदर तरल कथाच अस्तित्वात नसावी. किंवा जरी यदा कदाचित अशी जिवंत सुंदर कथा वास्तवात असेल तर त्यातील पात्रात ती निस्सीम प्रेम भक्ती नसावी.. जी ...की रेखाजी व अमिताभ बच्चन यांच्या मध्ये होती अन् आहे..!

 सिलसिला चित्रपटानंतर रेखा व अमिताभजी यांचे ऐकिवात असलेलं प्रेम व भावना अव्यक्तच राहिल्या..त्या आजतागायत..!अशी अव्यक्त सत्य प्रेमकथा व अभिनेत्री पुन्हा होणे नाही. माझ्या मते अव्यक्त प्रेमाची ही अजरामर कथा ती ही वास्तविक पात्रांभोवती गुंभली. हे दोघेही जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत या दोघांच्या कलेवर निस्सीम प्रेम करणारे चाहते  या दोघांवर भरभरून प्रेम नक्कीच करत राहतील यात तिळमात्र शंका येते.

एकमेकांच्या सन्मानासाठी दूर झालेल्या प्रेमकथा खूपच दुर्मिळ..! त्यात रेखाजी व अमिताभ बच्चन यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. प्रेम ही गोष्ट कधीही बाजारात विकाऊ नव्हती अन् नसणार..! ज्यांनी ज्यांनी ईश्वरीय देणगी प्रेमाचा पवित्र भाव बाजारात आणला त्यांच्या आयुष्याचे धिंडवडे झालेले आहेत अन् होतील सुध्दा हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

 प्रेम ही त्या जगाच्या नियंत्याने मानवाला दिलेली सर्वात सुंदर भक्तिपूर्ण भेट आहे. त्या भक्तिपूर्ण भेटीचे ज्याला पावित्र्य  समजले त्यालाच समजले. बाकीचे त्यात अश्लीलता , वासना शोधत राहिले अन् ज्यांना त्यात भक्तिपूर्ण भाव समजले ते त्यात ईश्वराला शोधत राहिले, पावित्र्य शोधत राहिले. रेखाजी अन् अमिताभ बच्चनजी यांनी त्यात पावित्र्य शोधले अन् अजरामर झाले त्याच जगाच्या नियंत्याच्या या भावविश्वात एक अजरामर प्रेमयुगल म्हणून..!

आज आपण पाहतोय, हल्लीच्या काही तद्दन फालतू नट,नट्या, आपल्या चारित्र्याचे स्वतः हून धिंडवडे उडवताना पाहतोय. पण ही जुनी कलेवर ,कलाकारांवर निस्सीम प्रेम करणारी माणसं अव्यक्त प्रेमात तहहयात राहणे यांनी पसंद केले पण एकमेकांची खाजगी प्रकरणे वेशीवर टांगून स्वतः च्या प्रेमाचे बाजारीकरण यांनी कदापि केले नाही. नव्हे..नव्हे..अशी पिढी संपल्यातच  जमा आहे.

असो, आज अभिनेत्री रेखाजींचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा..! 🌹

वंदे मातरम्

ता.क.: कृपया या माझ्या लेखाकडे कडे निव्वळ  कला, रसिकता,भावुकता, नितळ मनाच्या नात्याने पहावे..ही नम्र अपेक्षा..! 🙏🏻
वाकड्यात घुसू नये..!
                                                                           
 एक तरल भावनिक रसिक  : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक:१०/१०/२०१७

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

" आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!"☺




आमचे गाव आमची माणसं..!

" आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!"☺




===================================

अंदाजे आमच्या इ.चौथी पर्यंतच्या वयोगटापर्यंत लहानपणी मी आणि माझे गल्लीतील बालमित्र  पालखेड येथे दसरा या सणाच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी दसरा या  सणाच्या दिवशी गल्लीतील सगळ्याच मोठ्या माणसांचे दर्शन घ्यायचो..त्यावेळी खूप गमंती व्हायच्या..!

ही मोठ्या वयाची माणसं ,त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या लहान मंडळी करिता आपले दोन्ही पाय जोडूनच ठेवायचे..!त्यांचे असे जोडलेले पाय कित्येक वेळ तसेच राहायचे..! कारण त्यांना माहीत होते की,येणारे भाविक भक्त खूप खूप आहेत म्हणून..!☺ त्यात मग दर्शनाला येणारा ओळखीचा आहे की नाही याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नसायचे..! आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!आला का..दर्शनाला दे...आपट्याचे पान..!!☺

आमच्या गल्लीतील मोठी माणसं आमच्या ओळखीची असायची..! ती मोठी वयाची माणसं पण आम्हाला ओळखायची..!
पण.........
जेंव्हा आम्ही आमची गल्ली सोडून गावाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गल्लीतील मोठ्या माणसांचे  भटकंती करत..करत..दर्शन घ्यायला जायचो तेंव्हा  त्यांची ना...ओळख ना..पाळख...! दिसले पाय टेकव डोकं..! दिसले पाय टेकव डोकं..!! असा क्रम सुरू व्हायचा...!☺
बऱ्याचवेळा तर दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची ट्रॅफिक जॅम होऊन जायची..! दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची सगळ्यात जास्त ट्रॅफिक जॅम आमचा प्रिय बालमित्र शाम शेळके याच्या‌ घराकडील मोठ्या माणसांचे दर्शन घेत असताना व्हायची..! तिथं दगडी जोत्यावर बरीच वयोवृध्द माणसं दोन्ही पाय जोडूनच बसलेली असायची..!

आता काळ बदलला आहे. आजची पिढी सुशिक्षित झाली आहे.आज दसऱ्याच्या दिवशी आमच्या बालपणी दर्शनासाठी होणारी ट्रॅफिक जॅम अजिबात होत नाही..!
कशी होणार ट्रॅफिक जॅम..?
प्रत्येक गावातील तो निरागसपणा हरवला आहे..!
प्रत्येक गावातील माणसांना यंत्र शांत बसू देत नाही..!
प्रत्येक गावातील माणसांना खेड्यात राहून शहरासारखं राहायची सवय लागली आहे..!
या बाबतीत शहरातील आजची परिस्थिती न व्यक्त केलेलीच बरी..! शहरात तर कुणी एखादा खेड्यातलं सारखं मोकळं चाकळं वर्तन करायला गेलाच तर अशा व्यक्तीकडे पाहताना शहरातील माणसं  तुच्छ नजरेने किंवा...." काय गावंढळ माणूस आहे हा..!" अशा
" सुशिक्षित नजरेने " पाहतात..!

असो,
आज विजयादशमी उत्सव आहे..! त्यानिमित्त आम्ही बालमित्रांनी आमच्या बालपणी आमच्या पालखेड गावातील ज्या..ज्या ओळखीच्या आणि सर्वात महत्त्वाचे ज्या..ज्या अनोळखी मोठ्या वयाच्या माणसांचे दर्शन घेतले त्यांची आज खूप खूप आठवण आली..! त्या सर्वांना साष्टांग दंडवत..! तुमचे आशीर्वाद असेच  आमच्या पाठीमागे असू द्या..आमच्यातील एक खेडूत कधीही मृत न होऊ देण्यासाठी..!

वंदे मातरम्..!

 एक खेडूत लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ८ ऑक्टोंबर २०१९, दसरा..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

" तू समजुन घेणारा जिवलग मित्र माझा नितीन...! "




" मला प्रवासात भेटलेली माणसं..! "

 " तू समजुन घेणारा जिवलग मित्र माझा नितीन...! "







_____________________________________________

तू समजुन घेणारा..!
तू स्वच्छ मनाचा..!
तू आमच्या काळी होतास राजबिंडा..अर्थात आजही आहेस..!
तू मित्रावर व मैत्रीवर भरभरून प्रेम करणारा..!
तू माझ्या शिक्षकी आयुष्याच्या प्रारंभाचा गोड साक्षीदार..!
तू अन् मी बऱ्याच बाबतीत साम्य...अल्पसे अपवाद..!
तू माझ्या शिक्षकी आयुष्याच्या वाटेवर भेटलेला खूप गोड मित्र..!
तू केले कलेवर व रसिकतेवर भरभरून प्रेम..!
तू अन् आम्ही नाही विसरणार तो रम्य काळ..!
तू त्यात होतास शीर्ष स्थानी..!
तू तोच होतास..ज्याला बघून मला आजही कुणा एखाद्या बापाने आपल्या गोंडस मुलीला मांडीवर घेतलं की तूच नजरेसमोर येतो अन् नजरेसमोर येते तुझी गोड परी..!
तू तोच बाप आहेस..ज्याचा आदर्श घ्यावा त्या सर्व बापांनी,ज्यांना सुंदर परी सारख्या कन्या असतात ..!
तू तोच आहेस मित्रा, एका बापानं आपल्या मुलीवर कसं अन् किती प्रेम करावं याचं मूर्तीमंत प्रतीक..!
तू तोच आहेस..ज्यानं आपल्या लेकीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचं ऐश्वर्य वाहिलं..!

का..कुणास ठावूक ... मला प्रत्येक मुलीच्या बापात तूच दिसतो..!
बहुदा मी एका मुलीच्या आयुष्यातील बाप रुपी असणाऱ्या देवाला प्रत्यक्ष पाहिल्याचा तो भक्तीचा परिणाम असावा..!
असा बाप अन् त्या बापावर निस्सीम प्रेम करणारी कन्या होणे नाही..!

दीदी आम्हाला तुझी आजही खूप खूप आठवण येते गं..!
तू माझा कधीकाळी सख्खा शेजारी होतास..!
तू कधीकाळी माझ्या नोकरीचा अतूट हिस्सा होतास..!
तू कधी माझ्या सर्व...सर्व भावना ओळखून घेणारा होतास..!
मला जळगावच्या शाळेत नाही करमले तर मधल्या सुट्टीत भिसेवाडीला तुझ्याकडे येणारा मीच होतो..!
तू आजही बऱ्याच बाबतीत लाजाळू आहेस पण...मलाच माहीत आहे की तू खरचं किती लाजाळू आहेस..!
तू खूप खूप नशीबवान आहेस मित्रा..तुला माझ्या ताईंसारखी अर्धांगिनी मिळाली..!
माझी ताई तुझ्या आयुष्यात नसती आली तर...तुझ्या सारख्या निव्वळ भावनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला हे आयुष्य एखाद्या मरुभूमी सारखे भासले असते..हे मात्र नक्की..!
खर की नाही..?

मित्रा नितीन,
पुन्हा एकदा तेच गतकाळातील लासुरगाव केंद्रांतर्गत आपण व्यतीत केलेले दिवस यावेत,
पुन्हा त्याच अनेकानेक आठवणींचे क्षण ओथंबून यावेत,
पुन्हा तोच चिखलाचा रस्ता, त्यावरून येणे जाणे व्हावेत अन पुन्हा त्याच भिसेवाडीच्या शाळेत निवांत भेटावे,
पुन्हा त्याच लासुरगावातील मुक्कामाचे रम्य क्षण यावेत,
पुन्हा तोच तिरुपती बालाजी प्रवास यावा,
पुन्हा तेच जळगाव, नागपूर येथील शिक्षक संघाचे अधिवेशन अन् त्यायोगे झालेला सुखद प्रवास व्हावा,
पण....

नियती, आयुष्यातील गतकाळातील आठवणीत फक्त रमवणे शिकवते, तेच जसेच्या तसेच क्षण पुन्हा येत नाही..! आयुष्यात असतात फक्त आणि फक्त गतकाळातील रम्य, सुखद आणि दुःखद  आठवणींचा महापूर..!
त्यात आपल्या सारख्यांनी यथेच्छ डुबकी मारायची असते, फक्त भावनेवर निस्सीम प्रेम करण्यासाठी..!

आपल्या त्याच गतकाळातील आयुष्यात आपल्याला पुत्रवत जपणारे स्व. सावळे सर, स्व.टोणपे ( जहागीरदार ) सर , स्व. रगडे सर, स्व. बनकर सर, स्व.एस.एम.जाधव सर, स्व.ठोंबरे सर यांचा सहवास पुन्हा आपल्या शिक्षकी आयुष्यात लाभला नाही..! कारण ही सर्व महान माणसं देवाघरी गेल्यावर पुन्हा यांच्या सारखी अस्सल प्रेमळ माणसं भेटलीच नाही..!😔🙏🏻

असो, खूप काही व्यक्त व्हावे वाटते, पण यथावकाश नंतर नक्कीच लिहिल यावर..! 🌹🙏🏻


असाच गोड राहा मित्रा..सदा सर्वदा..!
राहणारच...कारण तू ..नितीन बाजीराव पगार आहेस..!

ता. क. - दिनविशेष...! असाच गोड राहा..!

वंदे मातरम् 

नितीनचा मित्र व लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव©️ 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1



दिनांक:८ ऑक्टोबर २०१८

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

" निवांतपणाची समृद्ध वैचारिक भेट...! "




 मला प्रवासात भेटलेली माणसं..! 

" निवांतपणाची समृद्ध वैचारिक भेट...! "





_______________________________________________

आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका ,
( अखिल भारतीय क्रीडा भारती तथा माजी अधिकारी मुंबई महानगर पालिका )

तुम्ही दिनांक २२ सप्टेंबर २०१८ रोजी एवढ्या दुरहुन थेट ठाणेहुन लासुर स्टेशन येथे येणार असे मला सांगितले अन् आपल्या वैचारिक प्रगल्भतेनुसार मला निघण्यापूर्वी सहज विचारले..
" नंदन, आपली उद्या किंवा परवा लासूर स्टेशन येथे भेट होऊ शकते का..?"
मी - " काका ,उद्या नाही; पण परवा रात्री नक्कीच..होईल..मी येईल रेल्वेने लासूर स्टेशन येथे..!"
काका- " ठीक आहे,भेटू मग..!"

या वरील संवादातून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, समोरच्याचे नियोजन बघून , आपले नियोजन करणे..हे आदरणीय काकांच्या आयुष्यातील मला आवडलेलं मूल्य..! त्यांना माहीत आहे की,माझी बदली  सध्या दूर आहे.हा आता लासूर स्टेशन येथे राहत नाही,पण याची भेट तर नक्कीच घ्यायची त्या शिवाय लासूर स्टेशन येथून पुन्हा ठाण्याला जायचे नाही..! दोन पुरुषांमधील वैचारिक प्रगल्भ समृद्धीची ती ओढ होती जी आम्हाला भेटण्यास प्रवृत्त करत होती..!

मी व काकांचे लासूर स्टेशन येथे वास्तव्य असताना ४ ते ५ वर्ष संपर्क राहिला.पण तो फक्त संपर्क न राहता ती एक आत्मीय ओढ निर्माण करून गेली दोघांच्या हृदयात..! माझ्या मित्र परिवारातील ज्येष्ठ मित्र म्हणुया या नात्याला..! लासूर स्टेशन येथे वास्तव्यास असताना लासुरगाव रोड लगत केलेलं  वृक्षारोपण अन् वृक्षसंवर्धनाचे कार्य कायमस्वरूपी हृदयात घर करून राहिले आहे. काकांच्या मार्गदर्शनाखाली हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन अंतर्गत झालेलं कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणादायी झालेलं आहे.त्यात काकांचा सिंहाचा वाटा आहे.🌳

मला लासूर स्टेशन येथे जायला रात्र झाली.पण काका,तुम्ही माझ्यासाठी निवांतपणे अशा ठिकाणी बसलात की,जेथे फक्त आणि फक्त अहंकार नसलेली माणसचं बसू शकतात..! तिथे ना चटई होती ना काही काही अंथरायाला..! अस्वच्छ मातीवर बसून  तिथे फक्त तुम्ही अन् मीच होतो अन् सोबत होता समृद्ध वैचारिक अथांग सागर..! कदाचित आपल्या दोघात आत्मिक ओढ निर्माण करून समृद्ध मैत्री होण्याचे दोघांचे हेच एकमेव कारण असावे..!
निवांतपणे गप्पा आटोपल्या नंतर आदरणीय काकडे पा.साहेब,( काका)लासूर स्टेशन यांच्या घरी गेलो.तुमची पण लासूर स्टेशन येथून नंदीग्राम एक्स्प्रेस ची निघण्याची वेळ झाली अन् माझ्याही नंदीग्राम एक्स्प्रेस ची औरंगाबाद कडे निघण्याची वेळ झाली.

रेल्वे स्टेशन वर आल्यावर सुध्दा तेच वडीलकेचे मला सांगणे केलेत तुम्ही..

" जपून जा..! तुझी एक्स्प्रेस येते आहे आता..!  काळजी घे..!"

" हो ..! " म्हणून निरोप घेतला अन् रात्री १२ वा.घरी आलो.मी पोहचेपर्यंत काका ही त्यांच्या  मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवासात माझ्या पोहचण्याबद्दल खुलासा विचारत होते..!

 ता.क.: ही कमावलेली छोटीशी संपत्ती होती माझ्या आयुष्यातील..! याच संपत्तीवर तर मी मनापासून प्रेम करतो अन् करत राहणार..!

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

आदरणीय काकांसोबत भेटीचा दिनांक: २२ सप्टेंबर २०१८,

" सर,नवरात्रीचे उपवास का करतात..?"


 









चिंतन ©️

" सर,नवरात्रीचे उपवास का करतात..?"

===================================

मी जेंव्हा पासून माझ्या सध्याच्या शाळेत उपस्थित झालेलो आहे,तेंव्हा पासून मला पालखेड येथील काही व माझ्या डी एड च्या काही मित्रांसोबत घालविलेला प्रत्येक क्षण भेटत आहे..अन् भेटणार आहे. कारण येथील काही माझी मुलं अगदी त्याच माझ्या जुन्या काळातील काही मित्रांसारखी आहे.. जमिनीवरील...!

मला नवरात्रीचे उपवास आहेत हे माझ्या एका मुलाला समजले.मग काय ..एक दिवस माझ्याकडे आला अन् मला म्हणाला......
" सर,तुम्हाला पण नवरात्रीचे उपवास अन् मला बी...!
या मग इकडच, सोबतच बसू आपण फराळ करायला..! "
असं नितीन तायडे हा माध्यमिक वर्गातील माझा मुलगा मला म्हणाला..!

आम्ही थेट शाळेच्या मैदानावर असलेला एक कोपरा निवडून तिथं अजुन काही नेहमी जेवायला बसणाऱ्या मुलांच्या सोबत सुरू केले...फराळ..नऊ दिवस..! अर्थात इतर वेळीही यांच्या सोबत मी कधी मधी जेवण करत असतोच. या छायाचित्रातील सगळेच उपासकरु नाहीत. माझ्या अगदी समोर बसलेला माध्यमिक वर्गातील नितीन तायडे अन् मीच तेवढा उपासकरु..! बाकीचे मस्तपैकी चाटून पुसून जेवण करणारे खवय्ये..!

यातील माझ्या एका विद्यार्थ्याने मला फराळ करताना विचारले की,
" सर,नवरात्रीचे उपवास का करतात..?"
मी त्याला सांगितले की,
" बेटा, हिंदू धर्मातील प्रत्येक सण,उत्सव ,परंपरा यामागे निसर्गाशी नाते सांगणारे आरोग्य विज्ञान आहे..! जसे की ,हे नवरात्रीचे उपवास..!"
विद्यार्थी- ' कसं काय सर..?"
मी त्यांना सांगितले की,
" हे पहा, नवरात्र उत्सव साधारणतः ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.त्यावेळी निसर्गातील ऋतु बदल होत असतो.हा ऋतू बदल होत असताना ज्याला आपण ऑक्टोंबर हिट असे म्हणतो ती भयंकर स्वरूपात निर्माण झालेली असते.म्हणजेच त्या हिट मुळे आपल्या शरीरात पित्त प्रकोप वाढलेला असतो.याच काळात जर आपण लई काही काही खाल्ले तर अजुन पित्त प्रकोप वाढून आपल्याला अजुन त्रास होतो.आपल्या पूर्वजांनी स्री शक्तीची उपासना करत असताना याला आरोग्य विज्ञानाची जोड देऊन याच काळात उपवास करण्याच्या आरोग्यदायी परंपरेला प्रारंभ केला. जसे या काळात कमी आहार अन् हलका आहार घेणे, पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवणे इ. जेणेकरून पित्त प्रकोप कमी वाढेल किंवा वाढणार नाही. शेवटी आपण किती ही पथ्य पाळले तरी एक शरीर म्हणून आपण आजारी पडणारच पण ते शरीर सतत आजारी पडण्याला बराच प्रतिबंध या अशा अनेक उत्सवातील आरोग्य विज्ञानामुळे शक्य होतो..!"

यावर अजुन एका मुलाने प्रतिप्रश्न केला की,
" सर, मग देवीचेच पूजन का बर..?"
मी म्हणाले...
" देवीचे पूजन करण्याचा उद्देश असा की, स्री चा सन्मान व्हावा, आपल्या समाजात स्री कडे पाहण्याला एक भक्तीची , श्रद्धेची नजर असावी..! स्री एक शक्ती आहे,म्हणून तिचे पूजन व्हावे , आदी शक्ती म्हणून तिला नऊ दिवस प्रतिनिधिक स्वरूपात मानाचे स्थान देऊन पूजन करणे अन् तेच पूजन आपल्या मनात संपूर्ण वर्षभर असावे हा या नवरात्रीच्या देवीचा पूजन करण्याचा उद्देश..! जगात फक्त आपल्याच भारत देशाला मातेचे स्थान देऊन एक प्रकारे सर्व स्री समुदायाचे पूजन करण्याचे मूल्य त्यातून प्रदर्शित होते..!  

तसेच नवरात्रीच्या निमित्ताने महिलांच्या दररोजच्या घर अन् कुटुंब या मर्यादित क्षेत्रातील वातावरणाला जोड म्हणून आनंद,उल्हास अन् मनोरंजन व्हावे म्हणून गरबा दांडिया खेळ आयोजित केला जातो.जेणेकरून महिलांचा आनंदोत्सव साजरा होऊन त्यांचे भावविश्व अजुन प्रफुल्लित होईल.त्याचा फायदा त्यांच्या भावविश्वाला,पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला होतो, कारण कोणताही खेळ ,कोणत्याही मनाला अन् शरीराला ताजा ,टवटवीत ,प्रफुल्लित करत असतो..! "

नवरात्र उत्सव हा स्री शक्तीचा उत्सव आहे. माझ्या मते गरबा दांडिया महिलांनीच एकत्रीत साजरा करायला हवा.जिथं महिला गरबा दांडिया खेळत असतील तिथं पुरुषांनी अतिक्रमण करू नये.ज्या पुरुषांना देखील गरबा दांडिया खेळायला आवडत असेल त्यांनी आपली चूल वेगळी मांडायला हवी.जेणेकरून महिलांना, महिलांच्या समवेत अनौपचारिक नाते संबंध निर्माण होऊन अंतर्मनातील आनंद खऱ्या अर्थानं व्यक्त करता येईल. हे माझे वैयक्तिक मत आहे.कुठेही स्री पुरुष समानतेच्या बौद्धिक गप्पा करणाऱ्यांची मते भिन्न असू शकतात. मात्र माझ्या मते सर्वच ठिकाणी स्री पुरुष समानतेच्या बौद्धिक गप्पा कृतीतून यशस्वी होत नसतात. हे माझे वैयक्तिक मत आहे.

हिंदू धर्मातील प्रत्येक उत्सवांकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उपाख्य तात्याराव सावरकर यांना अभिप्रेत असलेल्या विज्ञानवादी हिंदू धर्म या नजरेने पाहावे..! या विविध सणांच्या वेळी आढळणाऱ्या काही अनिष्ट रूढी परंपरा,अंधश्रद्धा यांचा अंगीकार अजिबात करू नका..! यामुळे खरा हिंदू धर्म अन् त्यातील निसर्ग पूजन, विज्ञाननिष्ठ आरोग्य दुर्लक्षित राहून जाते..! या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा मुळे चुकीचा संदेश समाजात जातो..!"

या सगळ्या गप्पांच्या ओघात आमच्या डब्ब्यात असलेले फराळ संपले होते.आम्ही सर्व जण पुन्हा निवांत तिथंच बसून बाजूला जी दांडग्या तब्येतीची मुलं कब्बडी खेळत होती त्यांच्या खेळाचा आनंद घेऊ लागलो. त्यांच्या दांडग्या खेळावर नंतर लिहिलंच मी..!☺

ता.क.: निसर्ग, आरोग्य विज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे हिंदू धर्मातील विविध सण,उत्सव..!

वंदे मातरम्..!

आईचा उपासक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: ५ ऑक्टोंबर २०१९, नवरात्र उत्सव