रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४

जन सहयोगाची गोड गोड दिवाळी..!


 


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


जन सहयोगाची गोड गोड दिवाळी..!


===============================


माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग, व्यक्ती अन् त्याच प्रसंगाच्या अन् व्यक्तीच्या भाव विश्वात डोकावून पाहणारी मनं जेंव्हा कुणाला आपलंसं करतात, तेंव्हा प्रेमळ हृदय खुदकन हसायला लागते. ज्या मायेनं ओथंबून भिजलेल्या अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील भावूक अन् कष्टाळू मनाचा आनंद द्विगुणित होतो तेंव्हा खऱ्या गोड गोड दिवाळीची चाहूल अन् अनुभूतीही आपसूक येते.अशा कष्टाळू मनाला जेंव्हा कुणीतरी आपली बहीण समजून, आपल्याच कुटुंबातील सदस्य समजून अगदी मनापासून गोडधोड काहीतरी देतो तेंव्हा अजूनही जाणीवा जिवंत असणाऱ्या मनात प्राण आहे याची प्रचिती येते.


जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर येथील सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )परिसरात हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केलेले आहे. अर्थात दुष्काळाचा शिक्का बसलेल्या मराठवाड्यात असे कार्य उभे करणे जरा कठीणच होते. मात्र ध्येयवेडी माणसं अजूनही या भूतलावर कुठे ना कुठेतरी आपले कार्य निष्काम कर्मयोगी भावनेने सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. त्याचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रगल्भ नेतृत्व तथा जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे होय. 


अनेक सामाजिक संस्था कार्यरत असतात.अनेकांचे कार्यही कौतुकास्पद असते. मात्र कौतुकास्पद कार्याला जेंव्हा निष्काम कर्मयोगी भावनेने जपलं जातं तेव्हा फार मोजक्या सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं आपलं सामाजिक उत्तरदायित्व निभावत असतात. यासाठी जन सहयोग सामाजिक संस्था नक्कीच कौतुकास पात्र आहे. कोविडचा कालखंड असो की, रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई.या सर्व संकटावर मात करत जन सहयोग सामाजिक संस्थेने हजारो देशी वृक्षांना जपलं, वाढवलं आहे. आता हेच कार्य छत्रपती संभाजीनगरचे सिमोलंघन करून सुरू आहे. हे काम करत असताना जाणीव जागृत ठेवून कार्य केल्या गेले हे अत्यंत महत्त्वाचे कार्य ठरले आहे. जाणीव ठेवून जेंव्हा एखादं कार्य होते, तेंव्हा विधात्याचे खरे अस्तित्व त्या सर्व सामान्य परिस्थितीतील मनांत दिसून येते.


उद्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या सणात स्री शक्तीचे पूजन अन् त्याच स्री शक्तिकडून पुरुषाचे औक्षण करण्याची आपल्या महान संस्कृतीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. विधात्याने  या भूतलावर निर्माण केलेली सर्वात पवित्र शक्ती स्री आहे. स्रीचेच अस्तित्व आपल्याला विविध सण , उत्सव परंपरा इत्यादी आनंदोत्सव साजरा करायला प्रवृत्त करत असते. त्या आनंदात आपण स्री शक्तीचे पूजन, दर्शन, सेवा इत्यादी ऋणानुबंध जोडणारे मानवी मूल्य जोपासत आलेलो आहोत. आज दिनांक २७/१०/२०२४, रविवार रोजी जन सहयोग सामाजिक संस्थेने आपले नैतिक मूल्य अजून उंचावत दिवाळीच्या पूर्व संध्येला स्री शक्तीला वंदन करून गोडधोड देऊन अन् खऱ्या लक्ष्मीला , लक्ष्मी देऊन सन्मानित केले आहे. या सर्वोत्तम नैतिक उपक्रमाचे श्रेय जाते ते आमच्या जन सहयोग सामाजिक संस्थेचे प्रमुख अन् जिवलग मित्र प्रशांत भाऊ गिरे यांना..! 


जन सहयोग सामाजिक संस्थेचे कार्य उभे करण्यात अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतील महिलांचे देखील योगदान राहिलेले आहे. कोणत्याही कार्याला जेंव्हा रूपडं येते, तेंव्हा त्या रूपडं आलेल्या कार्याला त्याच्या बाल्यावस्थेत मायेने जोपासणाऱ्या मनाला न विसरणारी माणसं जन सहयोग सामाजिक संस्थेच्या परिवारात आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील माता भगिनींना दिवाळीच्या पूर्व संध्येला भाऊबीज म्हणून दिलेली जाणीव असलेली कष्टाची लक्ष्मी अन् गोडधोड वस्तू श्रद्धेने भेट दिल्या. तेंव्हा हजारो वृक्षांना मनापासून आनंद नक्कीच झाला असेल. आपापल्या कुटुंबासाठी खऱ्या लक्ष्मी असणाऱ्या अनेक लक्ष्मींच्या भावूक मनात मायेचा ओलावा निर्माण झाला. आपला कुणीतरी श्रद्धेने सन्मान करत आहे ही भावना त्या सर्व माय माऊलींना सुखावून गेली. माझ्यामते मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय सामाजिक वातावरणातील स्री अन् पुरुषांचा कुणी सन्मान केला तर ती सन्मानित होणारी व्यक्ती आनंदित नक्कीच होत असेल, मात्र हृदयातून फारशी काही आनंदाने भावविभोर होत नसते.त्याचं कारण कळत नकळतपणे कधी ना कधीतरी कुणी ना कुणीतरी अशांचा सन्मान समाज  करत असतो. यामुळं सन्मानाच्या या बाबी अशांच्या आयुष्यात कधीतरी येऊन गेलेल्या असल्यामुळे मनाच्या सवयीचा भाग होऊन जातात. याउलट अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री अन् पुरुषांचा जर कुणी यथोचित सन्मान केला तर अशी मने आनंदाने अत्यंत भावविभोर होतात. आपलाही कुणीतरी श्रद्धेने सन्मान करतो आहे ही बाब अशांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडते, आपलीही कुणीतरी दखल घेत आहे, आपल्यातील आर्थिक, सामाजिक न्युनगंड अवस्थेला दूर करून कुणीतरी आपल्याला, सन्मानित करत आहे हा भाव खऱ्या अर्थानं सर्व सामान्य परिस्थितीतील मंनाना अत्यंत सुखावून जातो. त्यात जर सन्मानित होणारी अत्यंत सर्व सामान्य परिस्थितीतील स्री असेल तर तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या जातात.याची प्रचिती आज जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व सामान्य परिस्थितीतील स्री शक्तीचा सन्मान करताना जाणवली. स्री ही भावनेची देवता आहे याची जाणीव होते.


दिवाळी भेट गोडधोड सोहळ्यात आम्ही जन सहयोग सामाजिक संस्थेतील सर्व सदस्य मोठ्या गोडधोड मनाने सहभागी झालो होतो. 

होणारच..! त्याचं कारण, आमचा कुटुंब प्रमुख मधासारखा गोड गोड आहे. नाव त्याचं प्रशांत भाऊ गिरे..!


ता.क. - सर्व सामान्य परिस्थितीतील अनुभवलेल्या जाणीवा, जिवंत असे पर्यंत जिवंत असतात.


असो, सर्वांना जन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त मनःपूर्वक गोड गोड शुभेच्छा..!


स्थळ - शेळी मेंढी प्रक्षेत्र परिसर पडेगाव - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


वंदे मातरम्  🌳


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

(सदस्य - जन सहयोग सामाजिक संस्था छत्रपती संभाजीनगर. )


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २७/१०/२०२४, रविवार



मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "


 


____________________________________________


मी प्रथमतः नम्रपुर्वक हे स्पष्ट करू इच्छितो की, खालील छायाचित्रात मी ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या जवळ , खूप जवळ बसलेलो असलो तरी भाऊंशी काहीही चर्चा केलेली नाही.

हल्ली कोणत्याही थोर,मोठ्या माणसांच्या नुसता जवळ जरी एखादा कुणी उभा राहिला तरी असले कित्येक माणसं , वर्तमापत्राद्वारे किंवा विविध तांत्रिक प्रसार माध्यमांवर असे मजकूर लिहितात की, 

" अमक्या...अमक्या शी अमक्या अमक्या विषयावर चर्चा करताना अमके..किंवा तमके..! "


असो,माझ्या व आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या एकमेकांसोबत असलेल्या छायाचित्रा बाबत माझ्या वतीने केलेले नम्रपूर्वक स्पष्टीकरण समाप्त झाले.

____________________________________________


मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


" आदरणीय भाऊ तोरसेकर, एक समृद्ध विचारांचे प्रगल्भ विद्यापीठ..! "

__________________________________________


ज्येष्ठांच्या संगतीचा मला पहिल्यापासून छंद..! माझ्या आयुष्यातील आता पर्यंत सहवासात आलेल्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांपासून मी सतत काहीतरी शिकत आलो.त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना बोलते केले होते त्यांच्या गत अनुभवांचा खजिना खोलायला..!


आज दिनांक २१/१०/२०१८ रोजी मात्र माझ्या समोर असे ज्येष्ठ नागरिक उभे होते, ज्यांच्या सिद्धहस्त लेखनीचा तर मी प्रचंड चाहता होतोच...पण दिनांक २१/१०/२०१८ रोजी त्याच लेखणीच्या जादुगाराला प्रत्यक्ष याची देही याची डोळा व कानी ऐकण्याची व पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.


ज्येष्ठ पत्रकार व लेखक आदरणीय भाऊ तोरसेकर यांना ऐकलं अन् एखाद्या विषयावर मुद्देसूद ,परखड विवेचन कसे असावे ,एखाद्या पत्रकाराची पत्रकारिता कशी असावी,त्यातील मुद्द्यांचे विवेचन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण..माझ्या व उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.


बहुदा परखड पत्रकार स्व. आचार्य अत्रे यांच्या बऱ्याच परखड विचारांचे सोने असेच त्याकाळी श्रोत्यांनी लुटले असणार.


माझ्या सारखी कित्येक माणसं विचारांवर , प्रचंड श्रद्धा बाळगून असतात.एखाद्या व्यक्ती वरील श्रद्धा कालपरत्वे बदलत असते,पण त्याच अशा कित्येक राष्ट्र पुरुषांच्या प्रगल्भ विचारांना कधीही अन् कुणीही मृत करूच शकत नाही.कारण विचार हे चिरंजीव असतात. विचार हे सदैव तरुण असतात..! मात्र ते विचार फक्त तरुण,चिरंजीव असून भागणार नाही तर..


ते विचार नदीतील वाहणाऱ्या पाण्या सारखे निर्मळ असावे..!


विचार एखाद्या वनराईने नटलेल्या पर्वतासारखे असावे..!

विचार हे पहाटेच्या मंद सुगंध देणाऱ्या हळुवार गार वाऱ्यासारखे असावे..!


विचार हे एखाद्या नववधू सारखे असावे, ज्या प्रमाणे नववधू आतुर असते,आपल्या भावी आयुष्या विषयी..!

ओढ असते तिला आपल्या होऊ पाहणाऱ्या सुंदर स्वप्ना विषयी..!


विचारांचे ही अगदी तसेच असावे..त्या विचारांना ओढ असावी आपल्यातून निर्माण होणाऱ्या उज्वल भविष्या विषयी..!


विचार हे एखाद्या क्षत्रियाचा तेज निर्माण करणारे असावे..!

विचार हे निरागस देखील असावे पण पोरकट कदापि नसावे..!


मी आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या सर्वार्थाने परिपूर्ण असणाऱ्या पोक्त विचारांचे सोने मी यथेच्छ लुटले.भाऊंची मिश्किल शैली, प्रत्येक मुद्द्यांचे सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडून गेली. 


 आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या खूप जवळ जाऊन मला त्याच्या साध्या सरळ वागण्याचे कमालीचे कौतुक वाटले.अगदी साधी राहणी.श्रोत्यांना आपलंस करणं, इ.अनेक गुण वैशिष्टे मला भावून गेली.भाऊंच्या जवळ जाऊन त्यांच्या मध्ये असलेली विद्वत्ता व नम्रता जवळून पाहिली.गर्दी खूप होती.भाऊ प्रत्येकाला काहीसा वेळ देत होते.


आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसाला एखाद्या ग्रेट माणसाचा वैचारिक स्पर्श हा परीस स्पर्शाहुन श्रेष्ठ असतो.मी दूर झालो..अन् दुरून न्याहाळत राहिलो त्या अतिशय सामान्य राहणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाला,आदरणीय भाऊ तोरसेकर यांना..! मला विशेष आनंद याचा आहे की, आदरणीय भाऊ तोरसेकर माझ्या सुटसुटीत फेसबुक मित्रयादीत आहे..! 🌹


ता.क.: एखाद्या विद्वान माणसाला फक्त एक ते दीड तास ऐकणे म्हणजे एक संपूर्ण ग्रंथ वाचण्यासारखे असते.

मी दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी एक ग्रंथ मन लावून वाचला,ऐकला अन् प्रत्यक्ष पहिला देखील..!


वंदे मातरम्..!🙏


आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या लेखणीचा नियमित वाचक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


प्रसंग स्थळ: तापडिया नाट्य मंदिर,औरंगाबाद.


निमित्त - स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला


प्रसंग दिनांक: २१ ऑक्टोबर २०१८ आणि..

लेखन दिनांक - २२/१०/२०१८