सोमवार, १४ जुलै, २०२५

कसोटी क्रिकेटचे यश - स्लीप झेल अन् चिवट फलंदाजी..!


 


आमचे गाव आमची माणसं ©️


कसोटी क्रिकेटचे यश - स्लीप झेल अन् चिवट फलंदाजी..!


=====================


साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी आम्ही बालवयात होतो तेंव्हा पालखेड पासून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावरील महालगाव येथून मोठ्या पुरुषांचा क्रिकेट संघ पालखेड येथे कसोटी क्रिकेट सामना खेळायला यायचा. क्रिकेट सामना कॉर्क ( अत्यंत टणक असलेला चेंडू ) चेंडूवर खेळला जायचा. महालगाव क्रिकेट संघाचे नेतृत्व Dr. थावरे तर पालखेड येथील क्रिकेट संघाचे नेतृत्व आदरणीय स्व.रामकृष्ण पाटील रोठे करायचे.


ज्यावेळी पालखेडच्या संघाचे क्षेत्ररक्षण असायचे त्यावेळी सामन्यात स्लीप मध्ये आदरणीय Dr. दिलीप शेळके यांचं स्थान पक्के असायचे. Dr. दिलीप शेळके म्हणजे अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक होते. Dr. दिलीप शेळके यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीत एकदाही झेल सोडला नव्हता. पालखेडच्या तत्कालीन क्रिकेट कसोटी सामने जिंकण्यात Dr. दिलीप शेळके यांचं अमूल्य असे योगदान असायचे.कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्लीपची जागा अत्यंत महत्त्वाची असते.


Salute आदरणीय Dr. दिलीप भाऊ शेळके..!🙏🏏


सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स - ( इंग्लंड ) येथील कसोटी सामन्यात भारताच्या यशस्वी जैस्वालने स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना सहज घेता येणारे तब्बल तीन झेल सोडून दिले. कसोटी क्रिकेट मध्ये एक एक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो.म्हणून त्याला कसोटी म्हणतात. लीड्स कसोटी सामना आपण हारलो. तो सामना आपण पराभूत होण्यात यशस्वी जयस्वालचा मोठा हातभार लागला होता. 


कसोटी क्रिकेट सामन्यात अत्यंत चिवटपणे फलंदाजी करावी लागते.संयम, सातत्य अन् एकाग्रता यांचं मानसिक मिश्रण फलंदाज अन् गोलंदाजांना कसोटी सामन्यात कृतीतून दाखवून द्यावे लागते.विशेषत: फलंदाजांना..! 


महालगाव क्रिकेट संघाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पालखेड क्रिकेट संघाचे प्रारंभीचे फलंदाज ( ओपनर ) असायचे आदरणीय सदाशिव आण्णा जगताप अन् दुसरे असायचे आदरणीय स्व. गजानन निकम उर्फ गजा भाऊ निकम..! सदाशिव आण्णा जगताप अन् गजा भाऊ निकम अत्यंत चिवटपणे फलंदाजी करत असायचे. विशेषतः गजा भाऊ निकम..! सकाळी फलंदाजीला आलेला गजा भाऊ निकम दिवसाखेर नाबाद असायचा.धावा हळूहळू काढायचा, पण एकदा का फलंदाजीचा खुट्टा गाडला की, महालगावच्या गोलंदाजांना गजा भाऊ निकम यांना बाद करणे अत्यंत कठीण जायचे. अजून एक विशेष म्हणजे स्व.गजा भाऊ निकम, महालगावच्या वेगवान गोलंदाजांच्या बहुतांशी चेंडूला अगदी जागच्या जागीच सुरक्षात्मक पद्धतीने खेळायचा. यामुळं महालगावचे गोलंदाज, क्षेत्ररक्षक अन् Dr. थावरे वैतागून जायचे. विशेष म्हणजे विना हेल्मेट क्रिकेट खेळल्या जायचे..!


सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना काल दिनांक १४ जुलै २०२५ रोजी लॉर्डस ( लंडन ) येथे काल संपन्न झाला.त्यात आपण फक्त २२ धावांनी पराभूत झालो. या सामन्यात रवींद्र जडेजाने एका बाजूने अत्यंत चिवटपणे फलंदाजी केली,मात्र त्याला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजांनी अजिबात साथ दिली नाही.थोडीफार साथ दिली ती गोलंदाजांनी..! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद सिराज यांनी काहीवेळ टिकून राहण्याची अत्यंत कौतुकास्पद भूमिका निभावली. मात्र ज्यांच्यावर खरी जबाबदारी होती ते भारतीय फलंदाज पटपट बाद होत गेले अन् फक्त १९३ धावांचे ध्येय आपण गाठू शकलो नाही.


Salute आदरणीय स्व. गजानन भाऊ निकम उपाख्य गजा भाऊ..!🙏🏏


खेळ आहे, त्यात हार - जीत असतेच.मात्र हार तेंव्हा जिव्हारी लागते जेंव्हा क्षमता असून अन् हातातोंडाशी जिंकत आलेला सामना जिंकला जात नाही.


असो, सध्याची भारत विरुद्ध इंग्लंड ' तेंडुलकर - ॲंडरसन कसोटी क्रिकेट मालिका ' क्रिकेटच्या इतिहासात नक्कीच मानाचे स्थान प्राप्त करील यात तिळमात्र शंका नाही..!🏏


आठवणी आपल्या जिवलग मैत्रीणी असतात.फक्त त्यांच्यावर निस्सीम प्रेम करता आलं पाहिजे..! कसोटी क्रिकेटचे यश - स्लीप झेल अन् चिवट फलंदाजी याविषयीची प्रासंगिक आठवण आली , म्हणून व्यक्त झालो बाकी काहीही नाही.


वंदे मातरम् 🏏


कसोटी क्रिकेटचा निस्सीम चाहता - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© 


सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १५/७/२०२५, मंगळवार ( शुभ सकाळ)

शनिवार, ५ जुलै, २०२५

श्रद्धा , विचार अन् आठवणी


 

मला प्रवासात भेटलेली माणसं ©️


श्रद्धा , विचार अन् आठवणी


======================


माझी स्व.आई अत्यंत धार्मिक होती. न चुकता दररोज सकाळ संध्याकाळ पालखेड गावातील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात जायची. मंदिरातून आल्यावर अगदी साध्या कुंकवाच्या करंड्यात असलेला साखरेचा प्रसाद घरातील सदस्यांना देत असायची. तो साखरेचा प्रसाद एकदम भारी , महागडा अजिबात नव्हता,पण त्यात अत्यंत पावित्र्य सामावलेले असायचे. 


माझी स्व. आई जो पर्यंत हयात होती, तो पर्यंत माझे स्व.वडील धार्मिक बाबतीत फारसे रमले नाहीत. माझ्या स्व.वडिलांचा धर्मापेक्षा कर्मावर अत्यंत विश्वास होता. माझ्या स्व. वडिलांचा धर्मापेक्षा कर्मावर अत्यंत विश्वास असण्याचे कारण त्यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक वटवृक्षाखाली हालाखीच्या परिस्थितीत ' कमवा व शिका ' या उक्तीतून घेतलेलं शिक्षण होते.


माझी आई स्वर्गवासी झाल्यावर माझ्या स्व. वडिलांनी धार्मिकता काही प्रमाणात अंगिकारली. टीव्हीवरील रामायण, महाभारत, बाबा महाराज सातारकर , रेडिओवरील भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी यांचा मन की बात इत्यादी मूल्यवर्धित कार्यक्रमांचा श्रद्धेने आनंद घेऊ लागले. वास्तविक माझे स्व.वडील कोपरगाव येथे त्यांच्या महाविद्यालयीन वयोगटात असताना राष्ट्र सेवा दलाचे सदस्य होते. कोपरगाव तालुक्यात गावोगावी माझे वडील अन् त्यांचे तरुण मित्र मंडळी सायकलवर प्रवास करून राष्ट्र सेवा दलाचे काम करत असत.त्याचवेळी माझ्या स्व.वडिलांचे महाविद्यालयीन मित्र कंगले आण्णा ( वैजापूरकर ) हे कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असत. कंगले आण्णा अन् माझे वडील यांच्या विचारधारा भिन्न होत्या,मात्र वैयक्तिक मैत्रीचे संबंध कायम टिकून राहिले.


काळाच्या ओघात माझा लग्नाचा सोयरे संबंध कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे झाला. त्या नंतर तेथील औताडे पाटील अन् रोहमारे पाटील घराण्यातील काही वयोवृध्द ज्येष्ठांच्या गप्पांच्या बैठकीत माझे स्व.वडील त्यांच्या महाविद्यालयीन काळातील कित्येक आठवणी त्यांच्या जवळ व्यक्त करत असायचे. 


वरील आठवण व्यक्त करण्याचा उद्देश एकच की, वरील एका ओळीत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या ' मन की बात ' याचा उल्लेख केल्याने एखाद्याचा राजकीय / अराजकीय गैरसमज दूर व्हावा हा प्रांजळ अन् प्रगल्भ हेतू होय. जिथं जे योग्य आहे तिथले योग्य ते वेचावे अन् बाकीच्यांना दुर्लक्षित करावे हा मूलमंत्र माझ्या स्व.वडिलांनी कृतीतून दिला.


दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो आला की, माझे स्व.वडील त्या फोटोला व्यवस्थित कापून ते जिथं नेहमी बसत असत त्याठिकाणी भिंतीवर चिकटवून द्यायचे. लासूर स्टेशन अन् छ्त्रपती संभाजीनगर स्थित घरी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रातील विठू माऊली माझ्या स्व.वडिलांच्या नित्य नियमाच्या ठिकाणी भिंतीवर चिकटवून तो फोटो जो पर्यंत सुव्यवस्थित राही तो पर्यंत विराजमान होत असत.


काळाच्या ओघात माझ्या स्व.वडिलांचा स्वर्गवास झाला. आताही दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो येत असतो. आता आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात विठू माऊलीचा मोठा फोटो आला की,त्या फोटोला व्यवस्थित कापून माझे स्व. वडील जिथं नेहमी बसत असत त्याच ठिकाणी भिंतीवर चिकटवून द्यायची आत्मिक अन् श्रद्धेय जबाबदारी मी सांभाळत आहे.


श्रद्धा , विचार अन् आठवणी या तिघांची एकमेकात योग्य ती सांगड घातली की,माणूस खऱ्या अर्थानं प्रगल्भ होतो. माणूस एकमेव असा प्राणी आहे जो या तिघांची एकमेकात सांगड गुंफून आपल्या पूर्वजांना आपल्या वर्तमानात नेहमी जिवंत ठेवू शकतो. मृत्यू तर शाश्वत सत्य आहे. मात्र ज्या ज्येष्ठांवर आपलं सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून केलेलं निस्सीम प्रेम असतं, त्यांच्या आठवणींवर जर अजून जास्त निस्सीम प्रेम केलं की, आपले पूर्वज नेहमी आपल्याच सोबतच असतात याची अनुभूती येते. हा माझा स्वानुभव आहे. 


यात पण एक मेख आहे. प्रत्यक्ष सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून न करता , ज्येष्ठांना त्रास देणाऱ्यांना ज्येष्ठांच्या आठवणी अशा स्री अन् पुरुषाला जिवंतपणी आयुष्यभर छळतात..!


असो, आज आषाढी एकादशी आहे. आजच्या वर्तमानपत्रात देखील विठू माऊलीचा छानसा फोटो छापून आला आहे. त्या फोटोला व्यवस्थित कापून माझे वडील नेहमी जिथं बसत असत तिथं बाजूला असलेल्या भिंतीवर विठू माऊलीच्या फोटोला चिकटवून दिला आहे.  


जय हरी माऊली 🙏

वंदे मातरम् 


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ६/७/२०२५, रविवार ( आषाढी एकादशी )