शनिवार, ३० मार्च, २०२४

एका मंदिराला बघून जाणवलं..!


 










चिंतन ©️

एका मंदिराला बघून जाणवलं..!

==================================

देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांची प्रेमकथा अजरामर आहे. याच त्रिकोणी प्रेमकथेला चौथा कोन देखील आहे, त्याचं नाव आहे कच..!

थोर लेखक वि. स. खांडेकर यांनी ही अजरामर प्रेमकथा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ' ययाति ' द्वारे वाचकांच्या समोर अप्रतिम शब्द सामर्थ्याने प्रस्तुत केलेली आहे. त्याचं प्रेमकथेतील देवयानी, ययाति अन् शर्मिष्ठा यांच्यातील नात्याविषयी बऱ्याचदा बोलले जाते, मात्र तितकसं कच विषयी कुणी व्यक्त होत नाही. वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये कच विषयी  लिहिलं आहे.

याच चौकोनी प्रेमकथेत दैत्य गुरू शुक्राचार्य यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरते. दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं विश्वातील बहुदा एकमेव असलेलं एक मंदिर कोपरगाव , जिल्हा - अहिल्यादेवीनगर ( अहमदनगर ) येथे आहे. सदरील मंदिर कोपरगाव ते शिर्डी रस्त्याच्या डाव्या बाजूला काहीसे आत मध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कोपरगाव बेट येथे आहे. तेथे दैत्य गुरू शुक्राचार्य यांचं मंदिर आहे. मी बऱ्याचदा त्या ठिकाणी भेट दिली आहे. अर्थात त्याला निमित्त ठरले थोर लेखक वि. स. खांडेकरांनी ययाति मध्ये व्यक्त केलेली कथा..!

काळासोबत व काळाच्याही पुढे जाऊन मानवी वर्तनांचे अचूक वेध घेणारी दूरदृष्टी वि.स. खांडेकर या थोर लेखकास निसर्ग विधात्याने निसर्गदत्त दिली होती. वि. स. खांडेकरांचे लेखन म्हणजे मानवी मनाचे अचूक शब्दबध्द रेखाटलेले शब्दरूपी चित्र..! खांडेकरांचे साहित्य वाचतांना ती भाषाशैली पटकन वाचल्यावर कधीच अर्थबोधीत होत नाही. तर त्यांचे साहित्य वाचन करतांना हवी असते एकाग्रता व एकांतपणा..!  माझ्या मते ययाति हे साहित्य,  साहित्य विश्वातील अथांग महासागरच आहे. असा महासागर ज्यात प्रेम, वासना, शौर्य, सौंदर्य, अहंकार, करूणा, इ. मानवीय भावभावनांचे रस ओथंबून ओतलेय त्यात..! ययाति मधील प्रत्येक शब्द खूप विचारपूर्वक वाचल्यावर कळते काय अफाट सिध्दहस्त दैवी देणगीचा  किमयागार होता हा माणूस...! काळाच्या पूढे जाऊन भूतकाळातील पौराणिक पात्रांना आजच्या वर्तमानात शोधणारा महान लेखक ययाति मधून आपल्याला भेटतो.

शर्मिष्ठा,देवयानी, ययाति , कच अन् दैत्य गुरू शुक्राचार्य यांना आपल्या सहज सुंदर लेखणीच्या माध्यमातून समस्त रसिकांच्या हृदयात उतरवणारे खांडेकर..! काम, वासना अन् प्रेम यातील नाजुकशी किनार आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केली ती ययाति द्वारे..! ययाति हे जरी पुरातन पात्र असेल,मात्र तोच ययाति कित्येक कालखंडापासून समस्त मानवजातीचे प्रतिनिधित्व करत आलेला आहे अन् करत राहणार आहे.

ययाति ने मानवाच्या कोणत्या मानवी वर्तनाचे प्रतिनिधित्व केले...?
तर माझ्या मते....
ययाति हा प्रत्येक मानवातील वासनेचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील शौर्याचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील रसिकतेचे प्रतिनिधित्व करणारा  पुरुष..!
ययाति हा प्रत्येक मानवातील, स्री जाती विषयी आसक्ती बाळगणारा  पुरुष..!
सौंदर्यावर भाळून त्यात उध्वस्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येक माणसाचे प्रतिनिधित्व देखील याच ययाति ने निभावले...!

मराठी भाषेला, साहित्याला उंचीवर नेणारा प्रेमळ मनाचा अन् मानवी भावना आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा थोर लेखक म्हणजेच वि.स. खांडेकर होय..! 🙏🏻

ययाति चे मुख्य लिखाण संपल्यावर त्यातील शेवटचे जे सारांश असलेले काही प्रकरणे वि. स.खांडेकर यांनी लिहिलेले आहेत ते फक्त आणि फक्त एक सिद्धहस्त लेखकच करू शकतो. मानवी भाव भावनांचे त्यात गहनातले गहन भाव त्यात व्यक्त केल्या गेले आहेत. विशेष म्हणजे स्री, वासना, पुरुष त्याचे होणारे अधःपतन इत्यादी अनेक विषयांना वि. स.खांडेकर यांनी ययाति मध्ये आपल्या लेखणीतून अधोरेखित केलेले आहे.

ता. क. दैत्य गुरू शुक्राचार्य मंदिरात मजकूर लिहिलेले काही फलक आहेत. त्यांचे फोटो सदरील लेखाच्या सोबत प्रदर्शित करत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या मजकूर असलेल्या फोटोंचे  करावे. म्हणजे सदरील स्थळाचे महत्त्व लक्षात येईल.

असो, शुभ दुपार मित्रांनो..! 🙏🏻

वंदे मातरम्

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ३० मार्च २०२४, शनिवार.

रविवार, २४ मार्च, २०२४

" स्वातंत्र्यवीर सावरकर "


 


चिंतन ©️


" स्वातंत्र्यवीर सावरकर "


===================================


काल सह परिवार रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा हिंदी चित्रपट बघितला. चित्रपट बघताना अन् घरी आल्यावर कित्येक वेळा डोकं सुन्न झाले होते. भारतमातेच्या या सुपुत्राला ज्या अत्यंत त्रासदायक यातना सोसाव्या लागल्या, जो कौटुंबिक क्लेश सोसावा लागला, जो त्याग करावा लागला तो आता पर्यंत विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचण्यात आलेला होता, पण ते वाचण्यात आलेलं सर्वकाही चित्रपटाच्या माध्यमातून बघितलं अन् डोळ्याच्या कडा पाणावल्या अन् डोकं सुन्न झाले होते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नियती इतका कसा काय अन्याय करू शकते हा प्रश्न सतत मनात येत होता. एखाद्या पुस्तकातून एखाद्याच्या यातना, वेदना वाचण्यात येतात. मात्र त्याच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यातना , वेदना ज्यावेळी एखाद्या दृक श्राव्य साधनाच्या माध्यमातून आपण याचि देही याचि डोळा बघतो तेंव्हा आपलं हृदय पिळून निघते. अभिनेता रणदीप हुड्डा हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील तात्याराव सावरकर यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत. या अभिनेत्याने वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे.


चित्रपटाच्या सुरुवाती पासून ते मध्यांतरापर्यंत चित्रपटाचा वेग काहीसा कमी आहे, मात्र मध्यांतरानंतर ज्यावेळी वंदनीय तात्याराव सावरकर सेल्युलर जेल मध्ये प्रवेशित होतात तेंव्हापासून चित्रपटाने जो काही वेग घेतला तो अगदी शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. ज्यावेळी तात्याराव सावरकर अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये जातात, तिथून पुढे अभिनेता रणदीप हुड्डा यांनी असा काही अप्रतिम अभिनय केला आहे की, आपण साक्षात तात्याराव सावरकरांनाच बघत आहोत याची अनुभूती येते. क्लोज कॅमेरा वर्क अन् त्या अँगल मध्ये रणदीप हुड्डा यांनी प्रत्येक क्षणातील आपल्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम साकारले आहेत. विशेषतः जेल मधील इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर स्वाभिमानाने व्यक्त होणे , जेलरच्या विरुद्ध होणारी उद्विग्नता , अंधार कोठडीतील होणारी जीवाची तगमग इत्यादी अनेक प्रसंग आपल्याला चित्रपट बघताना खुर्चीवर खिळवून ठेवतात. बऱ्याच प्रसंगात मन अगदी गहिवरून येते. काही प्रसंग मनाला अत्यंत वेदना देऊन जातात. चित्रपट बघताना एक प्रेक्षक म्हणून आपली ही स्थिती होते, तर प्रत्यक्षात वंदनीय तात्याराव सावरकर यांची त्यावेळची परिस्थिती किती वेदनादायक असेल याची जाणीव होते. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील अभिनयाचे जे सर्वोच्च शिखर रणदीप हुड्डा यांनी आपल्या जिवंत अभिनयाने गाठलेले आहे ते सेल्युलर जेल मधील प्रत्येक क्षणातील अभिनयातून गाठलेले आहे. ज्यावेळी जेल मध्ये तात्याराव सावरकर यांना भेटायला त्यांच्या धर्मपत्नी येतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर चष्मा नसतो.नजर अंधुक झालेली असते. धूसर नजरेच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी होणारी चर्चा दोघांच्या नात्यातील भावूक नात्याला उंचीवर घेऊन जाते. जेल मधील भेटीची वेळ संपल्यावर माई सावरकर निघतात अन् अगदी शेवटच्या क्षणी तात्याराव सावरकरांना चष्मा प्राप्त होतो. चष्मा लावल्यावर आपली धर्मपत्नी दिसणार मात्र तो पर्यंत माई सावरकर दरवाजाचा उंबरठा ओलांडून गेलेल्या असतात. आपल्या पत्नीला पाठमोरे बघून तात्याराव सावरकर यांच्या आयुष्यातील अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी आपल्या अभिनयाने अप्रतिम व्यक्त केली आहे. या छोट्याश्या प्रसंगातून वंदनीय तात्याराव सावरकर यांच्या अख्ख्या आयुष्याची अपूर्णता रणदीप हुड्डा यांनी कळत नकळतपणे व्यक्त केली आहे. ग्रेट सॅल्युट..!


एखाद्या नाटकातील स्वगत आपण एक नाट्यरसिक म्हणून बऱ्याचदा बघत आलेलो आहोत.मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणदीप हुड्डा यांनी तात्याराव सावरकर यांच्या भूमिकेच्या द्वारे हिंदू अन् हिंदुत्व याचे बौद्धिक विवेचन क्लोज कॅमेरा मध्ये जेल मध्ये असताना आपल्या चेहऱ्यावरील अभिनयाच्या द्वारे उत्तमरित्या सादर केले आहे.


ज्या अभिनेत्याने वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या चित्रपटात निभावली आहे ती भूमिका देखील लक्षात राहण्याजोगी आहे. भारत पाकिस्तान फाळणी, दंगलीच्या वेळी होणारी उद्विग्नता, होणारी संवादफेक संबंधित अभिनेत्याने खूपच छान प्रकारे प्रस्तुत केली आहे.


महात्मा गांधी अन् तात्याराव सावरकर यांची रत्नागिरी येथे घरी जी भेट होते त्यावेळचा अतिशय संयत अभिनय रणदीप हुड्डा यांनी सादर केला आहे. त्या प्रसंगातील शाब्दिक करारीपणा अप्रतिम आहे. दोन्ही व्यक्तिमत्वांमधील शाब्दिक बौद्धिक द्वंद्व विचार करायला प्रवृत्त करते.


चित्रपटाच्या शेवटी जे पॉप रॅप पद्धतीने गाणं सुरू होते त्याची खरंच आवश्यकता होती का..? हा प्रश्न मला पडला. पॉप रॅप पद्धतीच्या गाण्याऐवजी हृदयाला भिडणारं , सुमधुर चालीतील गाणं असायला हवे होते असे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतः वंदनीय तात्याराव सावरकर थोर साहित्यिक शब्दप्रभू होते. त्या अनुषंगाने अर्थपूर्ण गाणं चित्रपटाच्या शेवटी असायला हवे होते.


असो, रणदीप हुड्डा अभिनित अन् दिग्दर्शित ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' या चित्रपटाच्या माध्यमातून थोर साहित्यिक, समाजसेवक, जाज्वल्य विचारांचे महामेरू अशा भिन्न भिन्न भावनांना चित्रपटाच्या माध्यमातून वंदनीय तात्याराव सावरकर यांना बघितल्याचा अनुभव आला.


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २४ मार्च २०२४, रविवार

रविवार, १७ मार्च, २०२४

देवभूमी भाग क्रमांक १३ ( अंतिम भाग)



 





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️

(अंतिम भाग क्रमांक  १३ )

===================================

रामपूर येथून दिनांक २२ मे २०२३ रोजीच्या सकाळी ६:३० आमची बस निघाली होती. उंचच उंच पर्वतरांगा मधील रस्त्याच्या कडेला बस, जीप इत्यादी वाहनांची गर्दी होती. आमची बस काहीशी उंच घाटात गेल्यावर रामपूर , सोनप्रयाग, गौरी कुंड अन् बाबा केदारनाथ या सर्वांना अगदी हृदयातून त्रिवार वंदन केले.माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. आपण पुन्हा कधी बाबा केदारनाथला भेटायला येऊ का.. हा प्रश्न  मनात आला. तेही आज रोजी जे माझे संपूर्ण कुटुंब आहे त्या सर्वांच्या सोबत तेही पायी चालत जाऊन येणे पुन्हा कधी आयुष्यात होईल का.. हा भावूक प्रश्न मनात आला होता. काही प्रश्नांना उत्तरे माहीत नसतात. असे प्रश्न आयुष्यात फक्त उत्सुकता अन् आतुरता निर्माण करण्यासाठी असतात.  आता सोनप्रयाग दिसेनासे झाले होते. आता नजरेच्या टप्प्यात फक्त आणि फक्त उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. नजरेत मावणार नाहीत एवढ्या खोल खोल दऱ्या रस्त्याच्या कडेला दिसत होत्या. केदारनाथ येथे जाण्यासाठी हरिद्वार ते सोनप्रयाग दरम्यान बसने प्रवास केला होता. त्या प्रवासातील रस्त्यांपेक्षाही आताचा रामपूर ते बद्रीनाथकडे जाणारा रस्ता अतिशय भयंकर, उंचच उंच पर्वतरांगा मधून, दऱ्याखोऱ्यातून , नागमोडी वळणं घेत आमचा प्रवास सुरू होता. बसच्या खिडकीतून खाली दरीत डोकावून पाहिलं की, मृत्यू आपल्याला बोलावत आहे असेच भासत होते. इतक्या त्या दऱ्या अतिशय खोलवर भीतीदायक होत्या. रस्ताही काही ठिकाणी अरुंद, पर्वताच्या कपारीतून कोरून काढलेल्या मार्गाने आमचा प्रवास पुढे पुढे चालला होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ अन् पुन्हा बाबा केदारनाथ ते गौरी कुंड तसेच सोनप्रयाग जीप स्टँड ते रामपूर असा पायी प्रवास अगोदरच झालेला होता,त्यामुळं पायातील वेदना होत होत्याच. त्यात आता बसमध्ये निव्वळ बसून राहिल्यामुळे पोटरी अन्  मांडीत शिथिलता येऊन वेदना अजून वाढल्या होत्या. दुपारी १ वाजता आमची बस ज्यांना जेवणं करायची आहेत त्यांच्यासाठी एका हॉटेलच्या परिसरात रस्त्याच्या कडेला थांबली होती. बसमधून उतरताना एक एक पाऊल वेदनेमुळे संपूर्ण पायाला हळूहळू पुढे नेत होते. दाक्षिणात्य पदार्थ असलेले काही खाद्य पदार्थ विकत घेऊन आमची जेवणं उरकली होती. आमची बस दुपारी १:३० वाजता, पुन्हा बद्रिनाथकडे निघाली होती.

मजल दर मजल करत अन् हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगातील अतिशय खडतर घाटातील नागमोडी वळणे घेत असलेला रस्ता पार करत आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साधारणतः ६ वाजता बद्रीनाथ येथे पोहोचलो होतो. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. अतिशय कडाक्याची थंडी होती. पायात बूट होते, अंगात स्वेटर , डोक्यावर थंडीची टोपी होती तरी देखील संपूर्ण शरीर प्रचंड थंडीमुळे पार थिजून गेले होते. रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे मनोभावे दर्शन घेतले. एक एक पाऊल टाकताना पायात पोटरी अन् मांडीत येणारे गोळे प्रचंड वेदना देऊ लागले होते. यापूर्वी माझ्या आयुष्यात पायाच्या वेदना काय असतात याची प्रत्यक्ष जाणीव येऊन गेलेली आहे. मी माध्यमिक शाळेत असताना आम्ही काही बालमित्र पालखेड येथील ग्राम दैवत श्री. पारेश्वर महादेवाच्या यात्रेच्या वेळी गावापासून दक्षिण दिशेला साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर गोदावरी आहे. आम्ही  गोदावरी नदीतून ऐन मध्यरात्री पवित्र जल घेऊन अख्खी रात्र ते पहाटेपर्यंत पळत तर कधी वेगाने पायी चालत पालखेड येथे येत असायचो. गावात आल्यावर  सकाळी महादेवाच्या मिरवणुकीत गोदावरी नदीतून आणलेले पवित्र जल श्रद्धेने नेऊन महादेवाच्या पिंडीवर श्रद्धेने अर्पण करत असायचो. त्यावेळी अनवाणी पायी जाणे-येणे झालेले होते. त्यावेळी पायाच्या होणाऱ्या प्रचंड वेदना काय असतात याचा अनुभव गाठीशी होता. मात्र तो प्रवासा सपाट मैदानी प्रदेशातील होता. त्यावेळी चढणीचा होणारा अनुभव नव्हता. आता वयाच्या अनुषंगाने अन् उंचच उंच पर्वतरांगा पायी प्रवास केल्यामुळे जाणवणारी वेदना प्रचंड वेदनादायी जाणू लागली होती. अतिशय उंचीचा तोही अतिशय खडतर रस्ता पार पाडल्यामुळे पायाच्या वेदना भयंकर होत होत्या. माझी धर्मपत्नी अन् दोन्ही मुलं मात्र अजूनही चालताना सहजपणे चालत होते. 

रात्री साधारणतः ९ वाजता बद्रीनाथ भगवंताचे दर्शन आटोपून आम्ही पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी निघालो होतो. सर्वांना भूक लागली होती. आम्ही एका हॉटेल मध्ये आलो होतो. मुलांनी त्यांच्यासाठी पोळी भाजीचे जेवणाचे ताट मागवले होते. मला फारशी भूक नव्हती. मॅगीच्या दोन प्लेट मी अन् माझ्या पत्नीसाठी मागवल्या. मी माझ्या आज पर्यतंच्या आयुष्यात पहिल्यांदा मॅगी नावाचा खाद्य पदार्थ नाईलाजाने खाऊ लागलो होतो.घरी शेवया कित्येकदा खाल्ल्या होत्या पण मॅगी नावाचा पदार्थ आयुष्यात पहिल्यांदाच खाऊ लागलो होतो. गरमागरम मॅगी खाल्ल्यामुळे थंडगार पडलेल्या घश्याला आराम पडला होता.आमची जेवणं उरकली होती. सोबत गरम पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या. मुक्कामाच्या ठिकाणी साधारणतः रात्रीच्या वेळी १० वाजता पोहोचलो होतो. उद्या पहाटे ४ वाजता सर्वांनी उठून आवरून सावरून हरिद्वारकडे मार्गस्थ व्हायचे आहे असे सर्वांना सांगितले.मुक्कामाच्या बाजूलाच अलकनंदा नदीच्या वेगवान पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय थंडगार वातावरणात अन् विष्णू भगवंताच्या सानिध्यात आम्ही सर्वजण पटकन झोपी गेलो.

दिनांक २३ मे २०२३ रोजीची  पहाट झाली होती.ठरल्याप्रमाणे सर्वजण पहाटे ४ वाजता उठून आवरून सावरून मुक्कामाच्या ठिकाणाहून पहाटे ५:३० वाजता  बद्रीनाथ येथील पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या बस स्टँडकडे मार्गस्थ झालो. पायाच्या वेदना आता ओळखीच्या झाल्या सारख्या वाटू लागल्या होत्या.पुढे पडणारे प्रत्येक पाऊल आपल्या सोबत वेदनेला सोबतच घेऊन पडू लागले होते. परिसर अन् परिस्थितीमुळे होणारी शारीरिक अन् मानसिक वेदना आपली सखी, मैत्रीण होऊन जाते असे मी माझ्या मनाला ,  माझ्या पत्नीला व दोन्ही मुलांना सांगितले. वेदना रुपी मैत्रिणीला आपल्याला सोबत ठेवावेच लागणार होते, त्याचं कारण वेदना रुपी असलेली मैत्रीण ही या इथल्या परिसर अन् परिस्थितीमुळे आपल्या आयुष्यात आलेली होती. ज्यानं त्यानं आपापल्या वेदना रुपी मैत्रिणीला स्वीकार करून स्वतः ला तिच्या सहवासाला सहन करायचं असा वास्तववादी विचार स्वीकारून आम्ही चालू लागलो होतो. आम्ही सकाळी ६ वाजता बद्रीनाथ येथील बस स्टँड जवळ पोहोचलो होतो. तिथं चौकशी केली असता समजले की, बस उपलब्ध नव्हती, त्यामुळं आम्ही खाजगी जीप मध्ये बसून हरिद्वारच्या दिशेनं सकाळी ७ वाजता मार्गस्थ झालो. तो खाजगी जीपवाला पण पटकन निघायला तयार होईना. अखेर खूप गयावया करून, विनंती करून तो जीपवाला हरिद्वारकडे निघण्यास तयार झाला होता. बद्रीनाथ ते हरिद्वार हा प्रवास साधारणतः तेरा ते ते पंधरा तासांचा असणार होता.

काल दिनांक २२ मे २०२३ रोजीचा संपूर्ण दिवसभर बसमध्ये बसून बसून अन् आज दिनांक २३ मे २०२३ रोजी पुन्हा जीप मध्ये दिवसभर बसून बसून शरीर अजून ठणकायला लागणार होते याचा खात्रीशीर अंदाज आला होता. आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. ज्या मार्गावर मृत्यू आपल्याला खुणावत आहे अशा भासणाऱ्या अतिशय खोल खोल दऱ्याखोऱ्या ,उंचच उंच पर्वतरांगा दिसत होत्या. शरीर थकले होते ,पण मन अजूनही टवटवीत होते. ते सतत रस्त्याच्या कडेला असलेल्या निसर्गरम्य परिसरात आपल्या डोळ्यांना भिरभिर फिरवून त्या विधात्याच्या अस्तित्वाला नजरेत सामावून घेत होते. दुपारच्या वेळी जेवणासाठी एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो. जेवणं आटोपल्यावर पुन्हा एकदा हरिद्वारकडे मार्गस्थ झालो. रात्री साधारणतः ९ वाजता हरिद्वार येथे आम्ही पोहोचलो. हरिद्वार येथे उतरल्या उतरल्या जोराच्या पावसाने आमचे स्वागत केले. हरिद्वार येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीची जेवणं झाल्यावर अतिशय थकलेल्या शरीराला झोप आवश्यक वाटू लागली होती. आम्ही कुंभ नगरी हरिद्वार येथे आलो होतो. आपल्या कित्येक पूर्वजांनी आपापल्या सानिध्याने ज्या नगरीला पूनित केले होते त्या हरिद्वार नगरीत आम्ही पोहोचलो होतो. बाबा केदारनाथ अन्  बद्रिनाथ भगवान यांना श्रध्येने स्मरण करून बिछान्यावर पडल्यापडल्या आम्हाला पटकन झोप लागली.

दिनांक २४ मे २०२३ ची पहाट झाली होती. झोपेतून उठून सकाळची दिनचर्या आटोपली होती.मुलं थोडी उशिरा उठली होती. भागीरथी, अलकनंदा अन् मंदाकिनी या नद्यांच्या एकत्रित पवित्र जलाचा या भूमीवर जिथून सपाट मैदानी प्रदेशात प्रवेश होतो त्या हरिद्वार नगरीतील गंगेच्या परिसरात आम्ही आलो होतो. आम्ही हरी की पैडी येथे गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचलो होतो. दुपारी आई गंगेच्या पवित्र पाण्यात आम्ही सर्वांनी स्नान केले. काही आप्तस्वकीय अन् काही जिवलग स्नेही यांना श्रध्येने देण्यासाठी कॅन मध्ये पवित्र गंगाजल घेतले होते. परिसरातील देव देवतांचे दर्शन झाले होते. गंगेच्या त्याच परिसरात काही माणसं जुने नाणी, शिक्के विक्री करायला बसलेले होते. त्यांच्याकडून काही नाणी विकत घेतली. हरी की पैडी पासून पायी चालत चालत परिसर बघत बघत पुढे चालू लागलो होतो. रस्त्याच्या कडेला अतिशय मधुर कचोरी जिलेबी रबडीचे दुकान दिसले. आम्ही तिथं मस्तपैकी गोड गोड कचोरी  रबडी जिलेबी खाल्ली. त्या मिठाई दुकानाचे दुकानदार मालक वयस्कर होते.स्वभावाने खूपच तापड जाणवत होते. आम्ही दुपारी तीन वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. संध्याकाळी पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर जायचे होते.संध्याकाळी गंगेची आरती करीता उपस्थित राहायचे होते. दोन तास आराम केला होता. 

संध्याकाळी आम्ही गंगेच्या किनाऱ्यावर हरी की पैडी येथे गंगेच्या आरती करीता पोहोचलो होतो.हजारो भक्त आरती मध्ये सहभागी झाले होते. हिंदू संस्कृतीत निसर्ग पूजनाला अत्यंत महत्त्व आहे.नव्हे नव्हे निसर्ग पूजा हाच हिंदू धर्माचा आत्मा आहे. फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी  परंपरा सुरू केली ती आजही सुरू आहे अन् अनंत काळापर्यंत सुरूच राहील. निसर्गाचे अनंत उपकार समस्त मानवी आयुष्यावर आहेत याची जाणीव ठेवून आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे स्मरण अन् वेळोवेळी श्रद्धेने केलेले पूजन त्याचं द्योतक आहे. त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आई गंगेची , तिच्या पवित्र जलाची, त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई गंगेची होणारी आरती..!  ज्या आई गंगेच्या किनाऱ्यावर मानवी संस्कृती अन् सभ्यता बहरली, याचं आई गंगेच्या किनाऱ्यावर आर्ष कालीन कालखंड, प्राचीन भारताचा दैदिप्यमान इतिहास कित्येक भारतीयांनी आपल्या शौर्याने अन् विद्वत्तेने समृध्द केला होता. आज त्याच निसर्गाच्या देणगीला , गंगेच्या पवित्र पाण्याला आम्ही हजारो भक्तांच्या उपस्थित श्रद्धेने पूजन करून वंदन करू लागलो होतो. हरिद्वार येथील आई गंगेची आरती याचि देही याचि डोळा आम्ही बघून कृतार्थ झालो होतो.

हरिद्वार येथे गल्ली बोळात हिंडताना अनेक मिठाईची दुकानं दिसली. तिथंली मिठाई,  मलईदार मसाला दूध, दुधाचे इतर मस्तपैकी पदार्थ अन् रबडी जिलेबी असे जिभेला पाझर फुटणारे पदार्थांची रेलचेल दिसली. सर्वांवर यथेच्छ ताव मारला होता.

काही वस्तूंची खरेदी केल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो.बाबा केदारनाथ अन् बद्रिनाथ भगवान यांना स्मरण केले. त्या विधात्याने मानवी संस्कृतीला विकसित करण्यासाठी आई गंगेला या भूतलावर अवतीर्ण केले होते, त्या परिसरात आम्ही आमच्या आयुष्यातील काही भाग व्यतीत करत होतो. या विश्वाच्या स्थितीचा मालक बद्री विशाल अन् याच सृष्टीच्या अंताचा स्वामी बाबा केदारनाथ महादेव यांच्या भेटीमुळे आयुष्याचे अध्यात्मिक सार्थक झाल्याचा भाव हृदयात येत होता. या देवभूमीतील वास्तव्य असलेला आपला प्रवास संपवून  आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या प्रापंचिक आयुष्यात प्रवेश करून घेण्यासाठी निघण्याची वेळ आली होती. ज्याला त्याला त्या विधात्याने दिलेल्या भूमिका निभावण्यासाठी त्याच त्या दैनंदिन जीवनात प्रवेशित होण्याची वेळ आली होती. उत्पत्ती, स्थिती अन् लय म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना श्रद्धेने स्मरण करून आम्ही हरिद्वार येथील मुक्कामाच्या ठिकाणी पुण्य भूमीत निद्रेच्या स्वाधीन झालो होतो. उद्यापासून पुन्हा सुरू  होणारा परतीचा प्रवास अन् आयुष्य, आम्हा सर्वांच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वाट बघत होते.

बाबा केदारनाथ की जय..!
हर हर महादेव..!

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १७ मार्च  २०२४,  रविवार

[ देवभूमी या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखमालेतील  अंतिम भाग क्रमांक १३ वा समाप्त. ]

गुरुवार, ७ मार्च, २०२४

देवभूमी भाग क्रमांक १२


 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️


 देवभूमी..! 🕉️

(भाग क्रमांक १२ )


===================================


पावसाला सुरुवात झाली अन् आमची अजून तारांबळ उडाली. काल दिनांक २०/५/२०२३ रोजी बाबा केदारनाथाचे दर्शन झाल्यानंतर आज म्हणजेच दिनांक २१ मे २०२३ रोजीचा परतीचा पायी प्रवास देखील सुखरूप व्हावा अशी अपेक्षा होती. अपेक्षा फक्त अतिशय थंडगार हवा अन् त्यात होणारा अतिशय थंडगार पाण्याचा पाऊस, यापासून संरक्षण मिळावे अशी अपेक्षा होती. बाकी शारीरिक वेदना होणार होत्याच. रामबाडा आम्ही पार केले होते अन् पावसाला सुरुवात झाली होती.थोरला चिरंजीव नमनच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे रेन कोट होते,ते बाहेर काढून पटकन परिधान केले. बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरातून निघून आम्ही अर्धे अंतर पार केले होते. वेगवान उतरणीच्या रस्त्यामुळे गुडघे अन् पायाच्या बोटा मागील तळपाय यावर जास्त भार पडल्यामुळे त्रास व्हायला लागला होता. आता वेदना , पाऊस अन् अतिशय भयंकर थंडी यामुळे आम्ही त्रासदायक परिस्थितीतून गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो होतो. अधून मधून एखादे छोटेसे दुकान दिसायचे. मस्तपैकी तळलेले गरमागरम पकोडे दिसायचे, मात्र जिभेवर संयम राखणे आवश्यक होते. जिभेच्या मोहाला बळी पडून संपूर्ण शरीराला अस्वस्थ करणे निदान या पहाडी प्रदेशात योग्य नव्हते. 


आता दुपारचे चार वाजले होते. काळया ढगांनी अंधार दाटून आला होता. घोडे, खेचर , डोलीवाले , पाठीवर लोकांना ने आण करणारे माणसं यांना तिथं पिठ्ठू असे म्हणतात ते, पायी प्रवास करणारे अशा सगळ्यांनी मार्ग गर्दीने ओसंडून वाहत होता. बहुतांशी प्रवासी बाबा केदारनाथ कडून येऊन गौरी कुंडकडे जाणारे होते. पाय खूपच दुखू लागले होते.मात्र पावसाच्या धाकामुळे आम्ही वेदनेकडे लक्ष न देता अंतर कसे कमी होईल याकडे लक्ष केंद्रित केले होते. साधारणतः साडे चार वाजता पावसाचा जोर कमी झाला, मात्र पावसामुळे पायातले बूट ओले होऊन तळ पाय गारठून गेले होते.मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलांनी काहीवेळ थांबायचे ठरवले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोटेखानी हॉटेल बाहेर आम्ही थांबलो. आतमध्ये जाणे योग्य वाटले नाही, कारण आमच्या अंगावरील रेन कोट पूर्णतः ओला झालेला होता.त्या हॉटेल मधील थोडीफार जागा जी कोरडी होती ती आम्ही आत गेल्यामुळे ती जागा अजून ओली झाली असती. दुपारच्या दोन वाजता आम्ही अमूल लस्सी पिलेलो होतो. त्यानंतर रस्त्याने अधून मधून पतंजली बिस्कीट खाऊन आताच्या चार वाजेपर्यंत चालत आलो होतो. आता घश्यात कोरड पडली होती. पुन्हा अमूल लस्सी पिण्यासाठी विकत घेतली.तिथल्या दुकानात थंडपेय फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नव्हती, कारण आजूबाजूचे वातावरण नैसर्गिकरीत्या अतिशय थंडगार होते. लस्सी पिऊन झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या साधारणतः ४:१५ वाजता गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो.


हळूहळू पावसाचा जोर ओसरला होता. आजूबाजूला उंचच उंच पर्वतरांगा असल्यामुळे लवकर अंधार दाटून आला होता. संध्याकाळचे सहा वाजले होते. दुपारचे साडे बारा ते संध्याकाळचे सहा दरम्यान आम्ही अतिशय उतरणीच्या रस्त्यावरून चालत येऊन गौरी कुंड येथील एकमेव असणाऱ्या बाजारपेठेतील गल्लीत पोहोचलो होतो. अरुंद गल्ली अन् तीही लोकांनी खूपच दाटीवाटीने फुलून गेली होती. आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळच्या ६:३० वाजता पोहोचलो होतो. पूर्णतः अंधार दाटून आला होता. खूपच थंडी जाणवत होती. रूम मध्ये गेल्या गेल्या सर्वांना सांगितले की, एकदम कुणीही बसू नका. नाहक पायाची नस ताणून पायात कळ येऊ शकते.हळूहळू बसा. अंगावरील रेन कोट बाजूला काढून ठेवले. आम्ही चौघांनी साधारणतः एक तास निपचित पडून आराम केला. आराम देखील वेदनादायी वाटू लागला होता. पाय वेदनेने खूपच ठणकत होते. आम्ही जिथे मुक्कामी थांबलो होतो, त्याच्या बाजूलाच गौरी कुंड होते. बाजूला जे गौरी कुंड होते, तिथले पाणी नैसर्गिकरित्या गरम आहे. विशेष म्हणजे आजूबाजूचा परिसर पूर्णतः थंड आहे. त्याच गौरी कुंडच्या बाजूला मंदाकिनी नदी आपल्या अतिशय थंडगार पाण्यासह वाहते. आता रात्रीचे आठ वाजले होते. गौरी कुंड मध्ये स्नान करणे धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले गेलेले आहे. त्यामुळं आम्ही गौरी कुंड मध्ये स्नान करण्यासाठी निघण्याची तयारी करू लागलो. आवश्यक ते वस्त्रे घेतली अन् जिन्याच्या पायऱ्या उतरून गौरी कुंडकडे मार्गस्थ झालो. एक एक पाऊल पुढे टाकतांना पायाची पोटरी अन् मांडीत गोळे येत होते. हळूहळू चालत आम्ही गौरी कुंड येथे पोहोचलो.


रात्रीचे नऊ वाजले होते. कडाक्याच्या थंडीत कित्येक भाविक गौरी कुंड परिसरात पूजा , आरती, मंत्रोच्चार इत्यादी धार्मिक विधी करण्यात मग्न झालेले होते. या संपूर्ण विश्वात त्या विधात्याने ज्या काही चमत्कारिक गोष्टी बनविलेल्या आहेत, त्यापैकी गौरी कुंड येथील गरम पाण्याचे कुंड होय. काल दिनांक २० मे २०२३ रोजी आम्ही पायी गौरी कुंड ते बाबा केदारनाथ अन् पुन्हा आज दिनांक २१ मे २०२३ रोजीचा बाबा केदारनाथ ते गौरी कुंडकडे परतीचा प्रवास हिमालयातील उंचच उंच पर्वतरांगा चढून - उतरून पूर्ण केला होता. तोच अतिशय खडतर, अतिशय जोखमीचा अन् उंचीचा रस्ता पायी चढल्या उतरल्यामुळे संपूर्ण पाय वेदनेने ठणकत होते. गौरी कुंड मधील गरम पाण्याच्या कुंडात प्रवेश केल्या केल्या गरम पाण्यामुळे शरीराला खूप आराम वाटू लागला होता. कडाक्याच्या थंडीत अन् तेही वेदनादायक शरीराला गरम पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे पायाच्या वेदना खूपच कमी झाल्या होत्या. गौरी कुंड मध्ये स्नान करताना माझ्या मनात विचार आला की, बहुदा बाबा केदारनाथाला असे वाटले असेल की, पायी प्रवास करून भक्तांना माझ्याकडे येताना अन् जाताना शारीरिक वेदना होणार. त्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी तर बाबा केदारनाथाने गरम पाण्याचे कुंड निर्माण केले तर नसेल ना..? धाकटा चिरंजीव नयनने मला आवाज दिला अन् माझे विचारचक्र थांबले. गरम पाण्याच्या कुंडातून बाहेर यावेसे वाटत नव्हते,पण रात्रीची वेळ वाढू लागली होती. गौरी कुंड येथील स्नान अन् धार्मिक विधी आटोपून पुन्हा आम्ही रूमवर आलो. रात्रीचे दहा वाजले होते. अगदी हलके जेवणं केली. झोपण्यापूर्वी मी सर्वांना सांगितले की, उद्या पहाटे ३:३० वाजता उठायचे आहे. सकाळी साडे पाच वाजता आपण खाली सोनप्रयाग येथे पोहोचणे आवश्यक आहे. सर्वांनी होकार दर्शविला.मी, हर हर महादेव..! बाबा केदारनाथ की जय..! असा उच्चार केला.माझ्या पाठीमागे माझी पत्नी अन् दोन्ही मुलांनी देखील वरील उच्चार केला अन् झोपी गेलो. बाबा केदारनाथाच्या , हिमालयाच्या कुशीत झोपी जाताना आपल्या सोबत बाबा केदारनाथ आहे याची श्रद्धेय जाणीव हृदयात ठेवून डोळा कधी लागला ते कळलेच नाही.


दिनांक २२ मे २०२३, सोमवारची पहाट झाली होती. ठरल्या प्रमाणे पहाटे ३:३० वाजता आम्ही झोपेतून उठलो होतो. कडाक्याची थंडी काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा सर्वांना येऊ लागला होता. आवश्यक ते कामे आटोपल्यावर रूम मालकाची परवानगी घेऊन आम्ही पहाटे ४:३० वाजता जीप स्टँडकडे पायी निघालो. पायात अधून मधून गोळे येत होते. अखेर साधारणतः दीड किलोमिटर अंतर पायी चालल्यावर जीप स्टँड आले. जीप मध्ये बसून नागमोडी वळणं घेत घेत आमची जीप सोनप्रयागला पहाटे ५:३० वाजता पोहोचली. सोनप्रयाग येथील जीप स्टँडहुन पुन्हा पायी चालत रामपूर येथील बस स्टँड कडे पायी चालत निघालो. जीप स्टँड ते रामपूर हे अंतर साधारणतः तीन किलोमीटर होते. आता उजाडले होते. रस्त्याच्या बाजूला साधारणतः तीन ते चार किलोमीटर किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंतरापर्यंत भाविकांची रांग होती. ते सर्वजण गौरी कुंड मार्गे बाबा केदारनाथ कडे जाण्यासाठी आपापल्या हातात ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले कागद अन् इतर कागदपत्रे , झेरॉक्स घेऊन उभे होते. त्या सर्वांना जिथून गौरी कुंडकडे जीप निघतात त्या जीप स्टँड कडे जायचे होते.आम्ही काल रात्री सलगपणे थेट जीप स्टँड पर्यंत तेही रिमझिम पावसात रामपूर ते सोनप्रयाग येथील जीप स्टँड पर्यंत चालत पोहोचलो होतो. अपवाद फक्त एका ठिकाणी तेथील उपस्थित पोलिसांनी आमची तपासणी केली होती तेवढाच रीतसर अडथळा आला होता. आम्ही आता आज दिनांक २२/५/२०२३ रोजीच्या सकाळी रांगेत लोकांची जी प्रचंड गर्दी बघत होतो, ती बघून आपण किती नशीबवान ठरलो, आपल्याला सलगपणे जीप स्टँड पर्यंत सहजपणे जाता आले होते. आयुष्यात काही खडतर गोष्टी अंतर्मनातील श्रध्देने सहज सोप्या होऊन जातात हा भाव मनात येऊन गेला.


रामपूर येथील चहूबाजूने खूप मोठे गोलाकार असलेल्या बस स्टँड वर आम्ही पोहोचलो होतो. सकाळी ६:३० वाजता आमची बस उंचच उंच पर्वतरांगा ओलांडण्यासाठी अन् विष्णू भगवतांच्या स्थानाकडे, बद्रीनाथकडे मार्गस्थ झाली. आमची बस ज्यावेळी निघाली त्यावेळी मी श्रद्धेने जयघोष केला .माझ्यामागे इतरांनी देखील जयघोष केला..

बाबा केदारनाथ की जय..!

हर हर महादेव..!


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ८ मार्च २०२४, शुक्रवार महाशिवरात्री 


[ येणारा भाग क्रमांक १३ वा, हा देवभूमी या शीर्षकाखाली असलेल्या लेखमालेतील अंतिम भाग असेल. ]

क्रमशः