आमचे गाव आमची माणसं..!
"आमच्या गावचे दाजी - सोपान दाजी..! "
================================
या संपूर्ण पृथ्वीवर कुठेही सहसा सहजपणे सापडणार नाहीत असे खूप चांगली माणसं आमच्या पालखेड गावात आहेत. माझ्या प्राथमिक शाळेच्या वयोगटापासून ते आज पर्यंत आमची समकालीन किंवा ज्येष्ठ माणसं लई भारी ..! ज्या.. ज्या माणसांचा प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क आला त्या सर्व माणसांच्या सगळ्यांनी प्रेमात पडावे अशी प्रेमळ माणसं आमच्या पालखेड गावात आजही आहेत..! आत्ताच्या पोरांचा काही अनुभव नाही..! त्यामुळं ती कशी आहेत हेही माहीत नाही..!😊
असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे सोपानराव धुळसुंदर..! ज्यांना आम्ही सगळे समकालीन पालखेडकर " सोपान दाजी " या नावाने हाक मारतो..! सोपानराव ,यांची सासुरवाडी आमच्याच पालखेड गावातील..ज्येष्ठ नागरिक आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या घरची..! काळाच्या ओघात अन् माणसांच्या प्रेमापायी सोपान दाजी,पालखेड गावातच रमले,जावई झाले अन् मस्तपैकी स्थिरावले सुध्दा..!
मला ,माझ्या प्राथमिक शाळेच्या वयोगट पासून ते नोकरी लागे पर्यंत क्रिकेटचा लई मोक्कार मध्यम स्वरूपाचा नाद होता.कालांतराने आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघातील बरेच खेळाडू बाहेरगावी स्थायिक झाले,त्यामुळे आमचा संघ बऱ्याच प्रमाणात खिळखिळा झाला होता. आमचे सोपान दाजी,क्रिकेट खेळायला फार काही तरबेज नव्हते,पण क्रिकेट खेळायची लई लई मोक्कार हौस..! आता सगळ्यांना माहीत आहे की, हौस काय काय खाते ते..!😊
आमच्या पालखेड गावात,गावातील ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेव भगवान यात्रेच्या निमित्ताने म्हणजेच कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आमच्याही अंगातील क्रिकेटचा किडा वळवळायला लागायचा..! पण....आमच्यातील बहुतांशी मित्र बाहेरगावी स्थायिक झाल्याने गावात क्रिकेटची टीम कोण तयार करील..? कोण सगळं हॅण्डल करील..? या अनेक समस्यांमुळे आमचा क्रिकेटचा किडा वळवळ करत असून सुध्दा आम्ही काहीजण आमच्या " भावना " अक्षरशः मारून टाकायचो..!😊
पण म्हणतात ना...तुमच्या जर कुणा विषयी प्रामाणिक भावना असतील तर ती भावनेची देवता किंवा देव तुमच्या मदतीला कुणाला तरी पाठवून देतो...अगदी तसंच झालं..!😊
इकडं गावात सोपान दाजी यांना क्रिकेटची लई मोक्कार हौस होतीच..! पण त्यांना त्यांच्या संघात खेळाडू भेटत नसायचे..! बहुदा त्याचे कारण गावातील बाकीच्या खेळाडूंना असं वाटतं असेल की..
"सोपान दाजी यांनाच धड खेळता येत नाही अन् हे काय आमची कँप्टनशीप करतील..?"
पण नियतीनं आमच्या सारख्या अनेक उघड्यांना- नागड्यांना,दुसऱ्या एका उघड्या- नागड्या जवळ आणायचे ठरवले होते..!😊
(आता इथं " उघड्या-नागड्या " याचा अर्थ कुणीही सहारा न देणारे असा अभिप्रेत समजावा..! नाहीतर उगीचच एखादा वाचक आमच्या वस्रांच्या अनुषंगाने पहायचा..!😊)
सोपान दाजी यांनी आम्हा बाहेरगावी स्थायिक असणाऱ्या पण क्रिकेटचा मोक्कार किडा असणाऱ्यांशी संपर्क केला.त्यात प्रामुख्याने मी स्वतः , बाळु माळी ( जि.प.शिक्षक जालना ), डॉ.संजय राऊत ( परसोडा), आण्णासाहेब म्हस्के ( बजाजनगर), भावराव कोल्हे ( औरंगाबाद) हे होतो.यात आण्णासाहेब म्हस्के जर सोडला तर बाकी आम्हा इतरांचे शरीर पूर्वी सारखे चपळ राहिले नव्हते..! चेंडू जवळून जाताना ,त्याच्याकडे एकटक पाहत रहावं असं आमचं शरीर झाले होते..!😊 मात्र आमच्या सोपान दाजींचा आमच्यातील क्षमतेवर प्रचंड विश्वास होता..! गावातीलच एक ज्येष्ठ खेळाडू आदरणीय श्रीराम मुलमुले ( तात्या ) यांचाही समावेश आमच्या संघात केला होता.थोडक्यात आमचा क्रिकेट संघ म्हणजे ,राजकुमार संतोषी दिग्दर्शित " चायना गेट " चित्रपटा सारखा होता..!😊 या चित्रपटातील सगळे कलाकार वयोवृध्द होते..! पण शत्रूवर विजय मिळविणारे होते..!
सोपान दाजी यांनी आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं अन् आपल्या क्रिकेट टीमचे नाव " रामजाने क्रिकेट संघ " असे राहील असे सांगितले. मी म्हणालो...
" दाजी,आपून दुसरं नाव ठेवू ना..!"
यावर सोपान दाजी म्हणाले - " आपुन मुद्दाम रामजाने नाव ठेवले आहे,कारण हारे तो भी रामजाने और जिते तो भी रामजाने..!" 😊
सोपान दाजी या आमच्या कँप्टनचं हे लॉजिक ऐकून आम्ही बरेच टेंशन फ्री झालो होतो.😊 कारण....
"हारे भी तो रामजाने और जिते भी तो रामजाने..!" 😊
आम्ही जीवतोडून प्रत्येक सामना खेळत होतो.गावातल्या भल्या भल्या टीमला आम्ही पाणी पाजत जिंकत चाललो होतो.त्याच मुख्य कारण आमचा कँप्टनचं आम्हाला एकदम फ्री ,तणावमुक्त खेळायला परवानगी देणं हेच होतं..! आमच्या रामजाने संघात सर्वात चपळ अन् सर्वात लहान खेळाडू होता संजय जनार्दन निकम होता..! त्याच्यावर उर्वरित खेळाडूंची लई भिस्त होती..! आमच्या
रामजाने क्रिकेट टीमला सगळ्यांनी कमी लेखलं होते,पण आम्ही थेट सेमी फायनल पर्यंत धडक मारली होती..!
सोपान दाजी यांनी आम्हा सगळ्यांना खूप धीर दिला अन् पुन्हा म्हणाले....
"हारे भी तो रामजाने और जिते भी तो रामजाने..!" 😊
सेमी फायनलला आमच्या समोर आमचीच पूर्वाश्रमीची टीम शिवशक्ती क्रिकेट टीम होती .त्यात भानू मामा जगदाळे हा तेजतर्रार गोलंदाज होता अन् अतिशय शैलीदार फलंदाज दिलीप सूराशे होता.आम्ही सुरुवातीला फलंदाजी केली.समोरच्या टीमला किती टार्गेट दिलं ते नीट आठवत नाही..! पण बऱ्यापैकी टार्गेट दिलं होते..!
ज्यावेळी आमच्या प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुरू झाली,त्यावेळी त्यांचे निम्मे फलंदाज बाद केले होते. पण शैलीदार फलंदाज दिलीप सुराशे एक बाजू लावून खेळत होता.अखेर माझ्या एका चेंडूवर त्याचा उंच झेल थेट सीमारेषेवर उडाला..! नेमका तिथं संजय निकम उभा होता.आम्हाला प्रत्येकाला खात्री होती की,आता दिलीप आउट होणारच...! पण..........
संजुकडून झेल सुटला..! आम्ही सगळे नाराज झालो.मात्र आमचे कँप्टन सोपान दाजी,संजूच्या जवळ गेले,त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणाले.....
" अरे संजू नाराज होऊ नको ,कारण............
"हारे भी तो रामजाने और जिते भी तो रामजाने..!" 😊
अखेर आम्ही सेमी फायनल हरलो.पण आमच्या आयुष्यात जी सकारात्मकतेची ऊर्जा आमच्या कँप्टनने ठासून भरली होती ती आयुष्यभर पुरेल एवढी जमा झाली होती..!
आजही मी जेंव्हा दरवर्षी आमच्या पालखेड गावातील ग्रामदैवताच्या यात्रेला जातो तेंव्हा आमच्या रामजाने क्रिकेट टीमच्या आमच्या खूप आवडत्या कँप्टनला आवर्जून भेटतोच..! ज्यावेळी आमच्यातील चपळाई संपली होती त्यावेळी आमच्या सोपान दाजी यांनी आम्हाला त्यांच्यातील खेळकर स्वभावाने ताजे टवटवीत केले होते.दुसऱ्याला धीर कसा द्यावा हे याच आमच्या सोपान दाजी पासून शिकायला मिळाले..!आज सोपान दाजी , गावातच एक छानशी पान टपरी टाकून त्या व्यवसायात मस्तपैकी मजेत आहे..! त्यांना ज्यावेळी भेटायला जातो त्यावेळी ते खूप खूप खूप आग्रहाने बडी सोपची पुडी देतातच..! मी ही त्यांना प्रत्येकवेळी म्हणत असतो......
"हारे भी तो रामजाने और जिते भी तो रामजाने..!" 😊
वंदे मातरम्..!
सोपान दाजींच्या नेतृत्वात क्रिकेट खेळलेला रामजाने क्रिकेट टीमचा एक खेळाडू लेखक :
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ४ मार्च २०२०, बुधवार.