शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ११ )







मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️


 देवभूमी..! 🕉️

(भाग क्रमांक  ११ )


===================================


बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरातून निघताना मन अगदी गहिवरुन येत होते. जिथं आपलं मन मोकळं होतं, जिथं आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवतं, जिथं अस्तित्व कुणाच्या तरी अधीन होऊन समरसून गेलेलं असतं, जिथं प्रेम, भक्ती हृदयातून व्यक्त केलेली असते,  जिथं आपली संपूर्ण चेतना समोरच्या अस्तित्वाला श्रद्धेने समर्पित केलेली असते, अशा ठिकाणाहून निरोप घेताना मन , त्या त्यावेळी अंतर्मनातून अश्रू ढाळत असते. त्या भावूक मनाला कुणीही, कितीही समजावून सांगूनही ते आपलं रुदन सुरूच ठेवत असते. आम्ही  बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात, बाबा केदारनाथाच्या गर्भगृहात आपलं मन मोकळं केलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आपलं कुणीतरी असल्या सारखं जाणवलं होतं.बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आमचं मन बाबा केदारनाथला अधीन होऊन समरसून गेलेलं होतं. या अखिल विश्वातील सर्वात सुंदर असणारा भाव म्हणजे प्रेम अन् भक्ती..! त्या प्रेमाचा अन् भक्तीचा भाव बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात जाणवला होता. हा भावूक अनुभव आमच्या हृदयातून निघता निघता निघत नव्हता. मात्र   मानवी आयुष्याला त्याग अन् निरोप यांना सोबत घेऊनच आपलं आयुष्य व्यतीत करायचे असते हा शाश्वत विचार स्वीकारून त्या पवित्र  स्वर्गीय हवा वाहणाऱ्या परिसराचा निरोप घेतला होता. मी सह परिवार बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसराला निरोप दिला होता.निरोप हा पुन्हा कधीतरी भेट होण्यासाठीच दिला जातो यावर माझा विश्वास होता.  बाबा केदारनाथचा निरोप घेताना मी अगोदरच बाबा केदारनाथाला अगदी हृदयातून व्यक्त झालो होतो की,  " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..!  तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!" हे व्यक्त केलेले विचार राहून राहून मनात येत होते, तसतसे आमची पावलं आता बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून बरीच पुढे आली होती.


थोरला चिरंजीव नमन हा सर्वात पुढे चालू लागला होता. आम्हाला आता पुन्हा हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील केदार घाटी पुन्हा पायी चालत चालत जाऊन उतरून गौरी कुंड येथे पोहोचायचे होते. चालता चालता नमन एकदम थांबला अन् रस्त्याच्या उजव्या बाजूला बघत मला म्हणाला..

" दादा, तिकडं जेवण वाटप सुरू आहेत. आपण प्रसाद घेऊ अन् मग केदार घाटी उतरायला सुरुवात करू..!"

माझ्या नियोजनात गौरी कुंड ते नंदी बेस कँप अन् पुन्हा उतरताना बाबा केदारनाथ मंदिर परिसर ते गौरी कुंड या पायी प्रवासात जेवण करणे नव्हते. त्याचं कारण, जेवणामुळे शरीराला जडत्व येईल किंवा पोट बिघडण्याची शक्यता होती.या कारणामुळे फक्त आणि फक्त द्रव पदार्थ घेऊन पायी प्रवास नियोजित होता. मी थोरला चिरंजीव नमन याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.धाकटा चिरंजीव नयन याने थोरल्याच्या स्वरात स्वर मिळवला अन् मला बोलते केले.मी माझ्या पत्नीकडे बघून विचारले..

" तुझे काय मत आहे ,हे दोघं म्हणतात तसं प्रसादाचे जेवण करून पुढील प्रवासाला  लागायचे की, रस्त्यात लस्सी, सरबत प्यायचे..?"

यावर माझ्या पत्नीने लगेच उत्तर दिले...

" मुलं म्हणतायेत तर आपण जेवणं करू अन् मग पुढील पायी प्रवासाला सुरुवात करू..!"

 माझ्या पत्नीच्या होकारानंतर आम्ही चौघे जण ज्या बाजूला लंगर सुरू होते तिकडे जाऊ लागलो.


जिथं जेवणं सुरू होती, तिथं पोहोचल्यावर लक्षात आले की, अतिशय कडाक्याच्या थंडीत शीख पंथातील काही तरुण स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लंगर मधील भोजन प्रसाद वाटप करत होते. आम्ही रांगेत उभे राहून आम्ही ताटात भोजन प्रसाद घेतला अन् काहीसे दूर एका कट्ट्यावर जेवण करायला बसलो. काही वेळात जेवणं उरकली. तिथल्या बांधवांचे आभार मानले अन् दुपारच्या साडे बारा वाजता आम्ही गौरी कुंड कडे पायी मार्गस्थ झालो.  रस्ता आता ओळखीचा झालेला असल्यामूळे अंतिम ठिकाण कुठे अन् किती दूर आहे याचा अंदाज घेऊन आम्ही झपझप पावलं टाकत केदार घाटी उतरू लागलो होतो.केदार घाटीची उतरंड बऱ्याच ठिकाणी तीव्र होती, त्यामुळं उतरतांना पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. गौरी कुंड पासून बाबा केदारनाथकडे येताना केदार घाटी चढताना गुढग्यावर अन् मांडीवर ताण खूप पडला होता. आता बाबा केदारनाथ ते गौरी कुंड उतरतानाच्या  पायी प्रवासात पायाच्या तळव्याच्या पुढील भागावर प्रचंड ताण पडत होता. आम्ही काल दिनांक २०/५/२०२३ रोजी गौरी कुंड येथून दोन काठ्या सोबत घेतलेल्या होत्या. गौरी कुंड ते बाबा केदारनाथकडे चढणीच्या रस्त्यावर काठीची गरज पडली नव्हती.मात्र बाबा केदारनाथ ते गौरी कुंडकडे येताना अतिशय उतरणीच्या रस्त्यावर सोबत घेतलेल्या काठीचे महत्त्व लक्षात येऊ लागले होते. काठीचा खूप आधार वाटू लागला होता. अरुंद रस्त्याने वर चढून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढलेली असल्याने घोड्यांचा धक्का बसू नये म्हणून खूप कडेने आम्ही चालू लागलो होतो.काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता.रस्त्यावर घोड्यांच्या विष्ठेमुळे त्यात पुन्हा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल खूप झाला होता. पाय निसटून पडण्याचा धोका खूप होता. पायी उतरणारे काही भाविक पडत देखील होते. खेचर / घोड्यावर बसून वर चढून जाणाऱ्यांपेक्षा वरतून खाली गौरी कुंड कडे उतरणारे खेचर / घोडे बऱ्याच ठिकाणी पाय निसटून पडत होते. घोड्यावर खेचरावर बसलेले काही भाविक देखील खाली पडताना आढळून येऊ लागले होते. उतरणाऱ्या एका घोड्याने आमचा धाकटा चिरंजीव नयन यास धक्का दिला. इतक्यात नयनला त्याच्या आईने पटकन पकडले. जर यदा कदाचित नयन यास त्याच्या आईने पटकन पकडले नसते तर बाजूला असणाऱ्या दरीत नयन हमखास पडला असता. खूप अघटीत घडले असते.त्या धक्क्यामुळे नयन खूप घाबरुन गेला होता. आता आम्ही चालण्याचा क्रम बदलला होता. सर्वात पुढे मी , माझ्या मागे नयन , त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी थोरला चिरंजीव नमन अशा क्रमाने आम्ही गौरी कुंड कडे पायी प्रवास सुरू केला होता. थंडीचा कडाका खूपच जास्त प्रमाणात जाणवू लागला होता.


उतरताना काही ठिकाणी काही मार्ग आम्ही जुना निवडला होता. जो मार्ग जून २०१३ मधील विध्वंसक त्रासदी मध्ये वाहून गेला होता, तो मार्ग काही ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडताना काहीसा जवळचा होता त्यामुळं जुन्या मार्गाचा वापर करू लागलो होतो. मात्र जुना मार्ग बांधणीचा अजिबात नव्हता. निव्वळ दगड धोंडे, खाच खळगे, खड्डे इत्यादी समस्यांनी भरलेला होता. नव्या अन् जुन्या रस्त्याच्या अंतरात फारसा फरक नव्हता.आम्हाला निघून दीड तास झाला होता.थकवा आला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात आम्ही थांबलो. अमूल लस्सी पिलो.थांबल्यामुळे मांडीत गोळे यायला लागले होते. आता दुपारचे सव्वा दोन वाजले होते. अधून मधून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. प्रचंड गारठा होता. बसल्यावर थंडीची तीव्रता जास्तच जाणवायला लागली होती. लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारच्या सव्वा दोन वाजता पुन्हा पुढे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. 


अतिशय तीव्र उताराच्या अरुंद रस्त्याने आम्ही चौघेजण उतरू लागलो होतो. इतक्यात माझ्या जॅकेटच्या आतील शर्टच्या खिशातील मोबाईल खणखणला. अरुंद रस्ता, त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची, घोड्यांची गर्दी त्यामुळं मी आलेला कॉल घेतला नाही. भीती वाटत होती, आपण आलेला कॉल घ्यावा अन् बोलताना किंवा मोबाईल खिशातून काढताना एखाद्या घोड्याने धक्का दिला तर...काय होईल यामुळे मी कॉल घेतला नाही. काही वेळापूर्वी नयनला घोड्याचा धक्का बसला होता. नशीब, त्याच्या आईने नयनला पटकन पकडले. त्या प्रसंगानंतर आम्ही खूपच सावधपणे पुढील रस्ता मार्गक्रमण करू लागलो होतो. पुन्हा कॉल आला. कुणाचा कॉल आहे हे बघून घ्यावा असे वाटले. आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबलो. आलेला कॉल अनोळखी होता.मी कॉल उचलला . एकलहेरा ता.गंगापूर येथील माजी विद्यार्थीनीचा तो कॅला होता. दीदीचे लग्न होते अन् मला आवर्जून लग्नाला या सर असं आग्रहाचं निमंत्रण तिने दिले होते. त्या माजी विद्यार्थीनीच्या लग्न तिथीला मी हजर राहू शकणार नव्हतो, कारण तेंव्हा मी इकडेच उत्तराखंड प्रवासातात राहणारा होतो. त्यामुळं दीदीला सर्व परिस्थिती सांगितली अन् लग्नास अनुपस्थित राहण्याचे कारण सांगितले. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अन् कॉल बंद केला. मोबाईलची रेंज खूप कमी होती. अधून मधून फोन कॉल कट होत होता. इतक्यात लगेच दुसरा कॉल आला.हा कॉल ओळखीचा होता. जळगाव येथील माजी विद्यार्थी प्रकाश शिंदे याचा तो कॉल होता. कॉल घेतला अन् प्रकाशने त्याच्या घर भरणी करीता आवर्जून निमंत्रण दिले. मात्र प्रकाशला देखील प्रवासाची परिस्थिती सांगितली. रेंज खूपच कमी होती. अखेर कॉल वरील बोलणे बंद केले. पुन्हा मोबाईल जॅकेटच्या आत मध्ये ठेवून दिला.आकाशात काळया ढगांनी दाटी करायला सुरुवात केली होती. आमच्या बॅग मध्ये आम्हा चौघांचे  रेन कोट होते.जरी यदा कदाचित पाऊस सुरू झालाच तर रेन कोट परिधान करून पुढील पायी प्रवास करावा लागणार होता.पावसाच्या चाहूल मुळे आम्ही लवकरात लवकर पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो.


रामबाडा दृष्टीक्षेपात आले होते. शरीरात प्रचंड थकवा जाणवू लागला होता. मांडीत अन् पोटरीत गोळे येऊ लागले होते. त्यात रस्ता पूर्णतः किंवा अर्धा मोकळा नव्हता. येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चालणे अजून अडचणीचे ठरू लागले होते. रामबाडा आले म्हणजे आपण अर्ध्या अंतरावर पोहोचलो असा अर्थ होता. गौरी कुंड ते बाबा केदारनाथ मंदिर या पायी प्रवासातील अंतरावरील रामबाडा हे ठिकाण ऐन मध्यावर आहे. रामबाडाहुन बाबा केदारनाथ कडे जाताना रस्त्याची अतिशय उंचीची चढण आहे.याचाच अर्थ बाबा केदारनाथ कडून रामबाडाकडे येताना रस्त्याची उतरंड अतिशय तीव्र उतरण आहे. थोडक्यात रामबाडा पासून बाबा केदारनाथ कडे अन् बाबा केदारनाथ पासून रामबाडाकडे जाताना अन् येताना पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी ठरते. शरीराच्या अन् मनाच्या परीक्षेत आम्ही सहभागी होऊन गौरी कुंड कडे मार्गस्थ झालो होतो. शरीर खूप थकले होते, मात्र मन अजूनही टवटवीत होते. आयुष्याचे सगळे प्रवास मनाच्या सुदृढ क्षमतेवरच होत असतात याला प्रमाण मानून आम्ही आमच्या थकलेल्या शरीराला ,आमच्या अजूनही टवटवीत असणाऱ्या मनाने ताजेतवाने केले होते. 

इतक्यात पावसाला सुरुवात झाली....


वंदे मातरम्..!

हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻


एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३०  डिसेंबर  २०२३, शनिवार.


क्रमशः

 

रविवार, १० डिसेंबर, २०२३

देवभूमी - भाग क्रमांक १०







 





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  १० )

===================================

२१ मे २०२३ ची पहाट झाली होती. रात्रभर शांत झोप झाली नव्हती. तरी देखील पहाटे उठण्याची सवय असल्यामुळे नियमित वेळेला जाग आली होती. मुलं झोपलेली होती.मी अन् माझी धर्मपत्नी केदारनाथ येथील नंदी बेस कॅम्पच्या बाहेर आलो. पहाटेचे साडे चार वाजलेले होते. आजूबाजूला पांढरा शुभ्र हिमालयाचा उत्तुंग पर्वत असल्याने फारसा अंधार जाणवत नव्हता. थंडी मात्र जीवघेणी होती. पुन्हा नंदी बेस कॅम्प मध्ये आलो अन् पहाटेच्या पाच वाजता दोन्ही मुलांना झोपेतून उठवले. नंदी बेस कॅम्पच्या समोरील बाजूला शुश्रुषा / प्रात:विधी ची सोय होती.पहाटे साधारणतः एक तासात आम्ही अगदी फ्रेश होऊन आम्ही पुन्हा त्याच हॉटेल मध्ये आलो होतो जिथं आम्हाला मध्यरात्री आम्ही संकटात असताना एका देव माणसाने प्यायला कोमट पाणी दिले होते. मात्र मध्यरात्री ज्या व्यक्तीने कोमट पाणी प्यायला दिले होते ती व्यक्ती तिथं दिसत नव्हती.दुसरी एक महिला भगिनी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना पाणी, चहाची सोय करून देऊ लागली होती. माझ्या पत्नीने चहा घेतला अन् आम्ही उर्वरीत तिघांनी फक्त कोमट पाणी पिले. आता सकाळचे सात वाजले होते.बाजूलाच एका पत्र्याच्या शेड मध्ये एक दवाखाना अन् औषध विक्री केंद्र होते. तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सेवा करत होते. ते माणसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात नव्हते, मात्र त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून समजले होते की ते संघाचे स्वयंसेवक आहेत अन्  फक्त सेवाभाव म्हणून भाविकांची सेवा करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची एवढ्या प्रचंड थंडीत दिली जाणारी निस्वार्थ सेवा बघून त्यांच्या कार्याला विनम्र वंदन केले. केदारनाथ मंदिराच्या परिसरात मुक्कामी असलेल्या भक्तांची संख्या कमी प्रमाणात असल्याने रस्त्याने अजून तरी वर्दळ दिसत नव्हती. आम्ही पुन्हा नंदी बेस कँप येथे पोहोचलो.  काल  झालेला प्रचंड थकवा , रात्रीच्या आरामामुळे काही प्रमाणात कमी झाला होता. तसे बघितले तर रात्रभर शांत झोप अशी लागलीच नव्हती. एखाद्या फ्रिज मध्ये आपल्याला कुणीतरी रात्रभर ठेवले आहे याचं मानसिकतेत आमच्या शरीराने  रात्रभर आराम केला होता. नंदी बेस कॅम्प सोडण्यापूर्वी तिथल्या कर्मचाऱ्यांचे  या अशा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये देत असलेल्या विनम्र सेवे बद्दल विनम्र आभार व्यक्त करून आम्ही नंदी बेस कॅम्प मधून साधारणतः सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला होता. बाबा केदारनाथ मंदिर साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर होते.

आयुष्यात सकाळी पहिल्यांदा आजूबाजूला पांढर शुभ्र हिमालयाचा विस्तीर्ण परिसर डोळ्याचे पारणे फेडत होता.महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंग मंत्रांतील' हिमालये तू केदारम ' या ओळींची आठवण आली अन् आपोआप मुखातून हर हर महादेव असा जयघोष बाहेर पडला होता. माझ्या मागे सर्वांनी मोठ्या आवाजात हर हर महादेव असा जयघोष केला. समोर दूरवर बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. आमच्या उजव्या, डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा विस्तीर्ण अन् उत्तुंग पर्वत होता. आता हा हिमालय पर्वत आमचा मित्र असल्यासारखा जाणवू लागला होता. एखाद्याच्या सहवासात काही क्षण , वेळ गेला की, त्याच्याशी मानवी मनाची एक भावनिक विण तयार होते. आम्ही काल दिनांक २० मे २०२३ च्या दुपार पासून ते आज २१ मे २०२३ च्या या आत्ताच्या सकाळच्या क्षणापर्यंत याचं हिमालयाच्या सानिध्यात होतो. हिमालय म्हणजे बाबा केदारनाथ अन् बाबा केदारनाथ म्हणजे हिमालय हे घट्ट नाते आमच्या सोबत होते. काल बाबा केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात दर्शन घेतले होते, त्यामुळं आज बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घ्यायचे ठरले होते. सकाळचे नऊ वाजले होते. मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता.अतिशय वेगवान प्रवाह होता.पुल ओलांडून आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो होतो. बरेच भक्तगण हवाई मार्गाने येत होते. मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली होती. बाबा केदारनाथ मंदिराचे कळस दर्शन घेतले. मी सोबत संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी  संग्रहित केलेली विविध मंत्रांची नित्य नियम विधी पुस्तिका आणलेली होती. त्यात ऋग्वेद, सामवेद, शिव रक्षा, इत्यादी मधील मंत्र पुष्पांजली होती. त्यातील बहुतांशी भाग मुखोदगत होता, तरी पण सदरील पुस्तिकेत बघून आम्ही सर्वजण बाबा केदारनाथ मंदिराच्या बाजूला बसून नित्य नियम विधीचे श्रद्धेने वाचन केले.

बाबा केदारनाथ मंदिराचा ज्यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी  जिर्णोद्धार केला होता त्या थोर विभूतीच्या, विद्वत्तेच्या, साधुत्वाच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे आम्ही मार्गस्थ झालो होतो. जसजसे परम पूज्य वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांचे समाधी स्थळ जवळ येऊ लागले होते, तसतसे तिथला परिसर नियोजित अन् वर्तुळाकार बांधकामाने सुशोभित दिसू लागला होता. आज तिथला परिसर जो काही सुनियोजित बांधकाम अवस्थेत दिसत होता त्याचे संपूर्ण श्रेय एका देव माणसाला होते. भारताचे पंतप्रधान वंदनीय नरेंद्र मोदीजी यांच्या अपार श्रद्धेने अन् विकसित हेतूने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात वंदनीय आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचा विकास झाला आहे. आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाकडे वर्तुळाकार मार्गाने आम्ही काहीसे खोलवर असणाऱ्या ठिकाणी पोहोचलो होतो. आमच्या समोर आदी शंकराचार्य स्वामी यांची भव्य मूर्ती होती. ज्या थोर विभूतीने आपल्या बौद्धिक अन् वाकचातुर्याने त्याकाळी हिंदू संस्कृतीचा ध्वज उंच फडकवला होता त्या थोर साधुत्वाच्या समाधी स्थळी आम्ही शांतचित्ताने उभे राहिलो होतो. साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचा कालखंड, त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सुख सुविधा, त्यावेळची इथली परिस्थिती सगळं काही अंतर्मनात येऊ लागले होते. कोणत्या अदभुत शक्तीने झपाटलेली माणसं असेल ही..? श्रद्धेच्या कोणत्या शिखरावर विराजमान झालेली माणसं असेल ही..? अखंड भारत पादाक्रांत करून आपल्या विचारांना प्रसारित करत असताना कोणती दिव्य शक्ती आदी शंकराचार्य यांच्या सोबत वावरत असेल..? या अशा कित्येक अनाकलनीय , गूढ प्रश्नांचे काहूर माझ्या मनात उठलं होतं.आपण अशा अदभुत विद्वत्तेच्या, शक्तीच्या समोर नतमस्तक होतोय यापेक्षा दुसरं अजून काय हवं एका श्रद्धेय मनाला..!  आदी शंकराचार्य स्वामी यांनी साधारणतः एक हजार वर्षापूर्वी अखंड भारत पादाक्रांत करून अन् हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे अदभुत कार्य तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा कोणती तरी नैसर्गिक  दिव्य शक्ती सोबत असते. आमच्या सारखे कित्येकजण आजच्या काळातील विविध वाहनाच्या मदतीने गौरी कुंड पर्यंत आले होते. काहीजण गौरी कुंड पासून ते बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात पायी चालत आले होते. एवढी सुख सुविधा असताना देखील आम्ही अन् आमच्या सारखे आलेले सर्व भक्तगण शारीरिक थकव्याने गळून गेलो होते. त्याकाळी आजच्या सारखी कोणतीही आधुनिक सुविधा नसताना हिमालयाच्या कुशीत बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणे हा तुमच्या आमच्या सर्व सामान्य लोकांच्या मानसिकतेच्या पलिकडचा विषय आहे. आपण फक्त त्या अदभुत अन् महान व्यक्तिमत्वांच्या कार्यासमोर , त्यांच्या स्मृतीस्थळासमोर फक्त नतमस्तक व्हायचे असते.जिथं विज्ञान संपते तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होते असे कुठेतरी माझ्या वाचण्यात आले होते. त्याची अध्यात्मिक प्रचिती याची देही याचि डोळा येऊ लागली होती.मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं बऱ्याच वेळ आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी असणाऱ्या आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्ती समोर एकाग्रतेने उभे होतो.

थोड्या वेळानं तिथं असणाऱ्या पुरोहितांच्या हस्ते आम्ही आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळी , आदी शंकराचार्य स्वामी यांच्या मूर्तीच्या सानिध्यात विधी पूजा  केली. वीस पंचवीस मिनिटे मंत्रपुष्पांजली,विधी पूजा सुरू होती. मंत्रपुष्पांजली,विधी पूजा आटोपल्या नंतर आम्ही गुरूंचे अन् आदी शंकराचार्य स्वामी यांच्या समाधी स्थळाचे मनोभावे दर्शन घेतले. सकाळचे अकरा वाजले होते. गौरी कुंड कडे पुन्हा पायी चालत जाण्याचे नियोजन होते.बाबा केदारनाथ मंदिर ते गौरी कुंड हा पायी प्रवास होणार असल्यामुळे त्या प्रवासाला अंदाजे सात ते आठ तास लागणार होते. दुपारी बारा वाजता जरी आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे पायी प्रवासाला सुरुवात केली तरी रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही गौरी कुंड येथे पोहोचू शकणार होतो. त्यामुळं आम्ही आता लवकरात लवकर बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून गौरी कुंड कडे मार्गस्थ होण्याचा एकमताने निर्णय घेतला.

पुन्हा एकदा आम्ही बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात आलो. शेवटचे पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला, मंदिराला, बाबा केदारनाथ महादेवाला हृदयात श्रद्धेने बंदिस्त केले. माझ्या डोळ्याचा कडा पाणावल्या होत्या. आपण आपल्या जिवलगाला सोडून जात आहोत हा भावूक श्रद्धेय भाव माझ्या अंतर्रमनात आला होता. अतिशय थंडगार असणाऱ्या तिथल्या जमिनीवर आम्ही सर्वजण साष्टांग दंडवत करून बाबा केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झालो होतो. निरोपाचा क्षण , भावूक मनाला गहिवरून सोडतो. आपण आपल्या इष्टाला, आपल्या श्रध्येयाला, ज्यांच्या भेटीचे स्वप्न मी माझ्या पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर बाबा केदारनाथाला निरोप देताना माझे सर्व शरीर अतिशय थंडगार वातावरणात अजून थंडगार झाले होते. भेट आणि निरोप हा मानवी शाश्वत आयुष्याचा भाग आहे. असा भाग जो कोणत्याही मानवी आयुष्याला चुकलेला नाही.आपल्या आवडत्या व्यक्तीची, स्थळाची भेट होताना मनाला आनंद मिळतो मात्र त्याच आवडत्या व्यक्तीचा, स्थळाचा निरोप घेताना मन गहिवरून जाते. हा भावनिक अनुभव त्यांनाच येतो ज्यांचं मन अन् तन कुठेतरी अगदी अंतर्मनातून गुंतलेले असते. भक्तांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही बाबा केदारनाथ मंदिर परिसरातून हळूहळू पुढे पुढे चालू लागलो होतो. एखादे लहान बाळ किंवा एखादं प्रेमळ मन जसे आपल्या आवडत्या व्यक्तीला निरोप दिल्यानंतर पुन्हा पुन्हा जसे मागे वळून त्या आवडत्या व्यक्तीकडे , स्थळाकडे पाहत असते, तशी अवस्था माझी, माझ्या पत्नीची अन् दोन्ही मुलांची झाली होती. आम्ही जसेजसे बाबा केदारनाथ मंदिर परिसर सोडून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो होतो तसतसे आम्ही अधून मधून बाबा केदारनाथ मंदिराच्या कळसाला बघत होतो. 

बाबा केदारनाथ मंदिर परिसराला निरोप देताना मी माझ्या मनात  बाबा केदारनाथला म्हणालो की, " बाबा केदारनाथ, पुन्हा कधी तरी आयुष्यात तुझ्या भेटीला येईल, कारण तुच तर या नश्वर देहाचा स्वामी आहेस..!  तूच तर शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूचा मालक आहेस. बाबा केदारनाथ तुला भेटायला या नश्वर देहासह येईल किंवा या नश्वर देहाशिवाय, मृत्यू नंतर..! मात्र भेटायला नक्की येईल..!

आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्याने जयघोष केला...

" हर हर महादेव..!" 🙏🏻🕉️🙏🏻
" बाबा केदारनाथ की जय..!"
" श्री. पारेश्र्वर महादेव की जय..!"
" सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय..!"
 " वंदे मातरम्..!"

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १०  डिसेंबर  २०२३, रविवार

क्रमशः



शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

ॲनिमल


 


चिंतन ©️


ॲनिमल


===================================


अखेर एका माणसाने ॲनिमल बघितला अन् संदीप भाऊ रेड्डी वांगा हे राम गोपाल वर्मा यांचं नेक्स्ट व्हर्जन आहे यापेक्षा दुसरं काही विशेष जाणवलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत राम गोपाल वर्मा यांनी सर्वप्रथम टोकाचा हिंसाचार रसिकांच्या समोर सत्या या चित्रपटाद्वारे दाखवला होता. ती मालिका राम गोपाल वर्मा यांनी पुढे त्यांच्या कित्येक चित्रपटात दाखवली. आक्रमक अन् गुन्हेगारी मानवी आयुष्यातील प्रत्येक मानवी घटकांचा स्वभाव, कला, कौशल्य इत्यादी बाबींचे नेक्स्ट व्हर्जन मधील सादरीकरण म्हणून संदीप भाऊ रेड्डी यशस्वी झाले आहेत असे वाटते..


ॲनिमल चित्रपटात रणबीर कपूरने छान अभिनय केला आहे. माणसातील पुरुषी वर्चस्वाच्या , वयाच्या विविध छटा सादर केल्या आहेत. रश्मिका मंदाना या नटीने देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेषतः ज्यावेळी तिला समजते की, आपल्या नवऱ्याचे ( रणबीर कपूर) बाहेरच्या स्री सोबत अनैतिक संबंध आहेत.त्यावेळी रश्मिका मंदानाने सादर केलेला अभिनय छान वाटला. त्यावेळी तिने आपल्या नवऱ्याला दिलेले उत्तर त्या नवऱ्यांना आहे ज्यांचे स्वतः ची पत्नी सोडून इतर स्री बरोबर बाहेरख्याली अनैतिक संबंध असतात.बऱ्याचदा एक स्री आपल्या नवऱ्याचे बाहेरच्या स्री सोबतचे अनैतिक संबंध मारून मुटकून सहन करते. जरी तिने विरोध केला तरी तो विरोध बऱ्याचदा पेल्यातील वादळ ठरते. मात्र एखाद्या स्रीने जर आपल्या नवऱ्याला फक्त सांगितले किंवा माहीत झाले की, तिचेही पर पुरुषाच्या सोबत बाहेरख्याली अनैतिक संबंध आहेत तर त्यावेळी पुरुषी मनोवृत्ती आक्रमक होऊन स्री वर हिंसा करू पाहते.ही पुरुषी आक्रमक मनोवृत्ती पूर्वी,आज अन् भविष्यात देखील वेळोवेळी समाजात बटबटीतपणे दिसून आलेली होती, आहे अन् दिसून येत राहील. अनैतिक संबंध या विषयावर ॲनिमल चित्रपटात प्रखर भाष्य केले आहे. त्या अभिनयाच्या प्रसंगात रश्मिका मंदाना अन् रणबीर कपूर भाव खाऊन गेले आहेत.


बाप अन् मुलाच्या भावविश्वाचा पसारा देखील ॲनिमल मध्ये आहे. प्रत्येक बाप अन् मुलगा यांनी स्वतः ला आपल्या एकमेकांच्या आयुष्यात ठेवून आत्मचिंतन करायला हवे यावर भाष्य केले आहे. बरीच उत्तरे सापडतात. 


आपला मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये यांनी थोडक्यात पण दमदार अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटात नाना पाटेकर नंतर एखाद्या मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपट अभिनेत्याच्या डोळ्याला डोळा भिडवून केलेला अभिनय जाम भारी आहे.


बॉबी देओल यांना चित्रपटात कमी वेळ मिळाला आहे, पण जो वेळ मिळाला आहे तो वेळ आपल्या मुक अभिनयाने उंचीवर नेला आहे.


चित्रपट प्रेक्षकांना एक सवय आहे, जी या चित्रपटाच्या वेळी पण मला दिसून आली. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू झाली की, बहुतांशी प्रेक्षक उठून निघून जायला प्रारंभ करतात. मी मात्र अगदी शेवट पर्यंत थांबून कलाकृती बघत असतो. ॲनिमल चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली सुरू होती अन् अगदी बोटावर मोजण्या इतकेच प्रेक्षक चित्रपटगृहात होते. चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली संपली अन् सर्वात शेवटी काही वेळ जो काही अंगावर येणारा रक्तपात दिसून आला आहे तो प्रसंग बघून लोकेश कनगराज यांच्या विक्रम चित्रपटाच्या अगदी शेवटी थैमान घालणाऱ्या रक्तपाताची आठवण करून गेला.


ऐंशीच्या दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील मणिरत्नम दिग्दर्शित अन् कमल हसन अभिनित एक सर्वोत्तम चित्रपट आहे वेलू नायकन..! वेलू नायकनचा जर रिमेक करायचा झाला तर त्यात कमल हसनची वेलू नायकन डॉनची भूमिका आजच्या पिढीतील सर्व अभिनेत्यांपैकी रणबीर कपूरच सर्वोत्तम प्रकारे वेलू नायकन सादर करू शकतो. एक रसिक प्रेक्षक म्हणून मला असे वाटते. 


असो, शुभ रात्री मित्रांनो..! 🙏🏻😊🌹


वंदे मातरम् 


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९/१२/२०२३, शनिवार.

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

शौर्य तीर्थक्षेत्र भेट - हुतात्मा तुकाराम ओंबळे "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


" शौर्य तीर्थक्षेत्र भेट - हुतात्मा तुकाराम ओंबळे "

_________________________________________

                                                          

आम्ही मे २०१७ च्या सुरुवातीच्या आठवड्यात मी, माझी पत्नी अन् दोन्ही मुलं धार्मिक तीर्थक्षेत्र, आधुनिक तीर्थक्षेत्र यांचे मनोभावे दर्शन व वैज्ञानिक कुतूहलापोटी प्रत्यक्ष दर्शन घेऊन आलो. मे २०१७ च्या परतीच्या प्रवासात वेरावल -गुजरातहून दुपारी १:२०ला रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सकाळी ७:३४ला पोहचली.सकाळी फ्रेश झालो व मुंबईचा वडा पावचा नाश्ता केला.वास्तविक ज्योतिर्लिंग सोमनाथला जातांना ज्यावेळी मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उतरलो होतो;त्यावेळी तेथील गर्दी पाहून व गतकाळातील याच ठिकाणी आपल्या अस्मितेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या स्मृति जाग्या झाल्या होत्या. परंतु सोमनाथला जातानाच्या प्रवास नियोजनात मुंबईचे आधुनिक तीर्थक्षेत्र-तारांगण व विज्ञान केंद्र दर्शन होते.आणि त्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतलाही. सोमनाथहून येतानांच्या प्रवास नियोजनात दर्शन घेण्याची व नतमस्तक होण्याची सारखी हुरहूर लागली होती.


 एका असामान्य तीर्थक्षेत्राची, एका असामान्य शूरवीराच्या प्राणाच्या बलिदानाने पूनित झालेल्या " शौर्य तीर्थक्षेत्र " ला भेट देण्याची...! ते " शौर्य तीर्थक्षेत्र " होते सिंधू सागराच्या किनाऱ्यावरील गिरगाव चौपाटीच्या मुख्य रस्त्यालगत..!आणि त्या शौर्य तिर्थक्षेत्राचे वंदनीय शौर्य पूरूष होते..."हुतात्मा तुकाराम ओंबळे साहेब( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)...!! 


 टॅक्सीतून उतरून आम्ही अथांग सिंधू सागराला नजरेत सामावून घेतले.मुख्य रस्त्यावर आलो.एका शहर पोलिसाला मी विचारले 

" साहेब,इथे शौर्य पूरूष तुकाराम ओंबळेजींचे स्मारक कुठे आहे..?" माझा हा प्रश्न ऐकुन ते शहर पोलिस आश्चर्यचकित व अभिमानास्पद नजरेने माझ्याकडे काही क्षण बघतच राहिले.मग काही क्षणानंतर त्यांनी प्रेमाने ,आत्मीयतेने आमची चौकशी केली.मी त्यांच्या मानसिकतेचा बरोबर अंदाज लावला की, बहुदा हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या स्मारकाची चौकशी केल्याने त्यांना खूप आनंद झाला होता.आम्हाला दुरून ते ठिकाण दाखवून ते आपल्या सेवेसाठी गेले.


गिरगाव चौपाटीवरील मुख्य रस्त्यालगतच ते "शौर्य स्थळ " होते.आम्ही सर्वजण मी ,माझी पत्नी,थोरला मुलगा चि.नमन व धाकटा मुलगा चि.नयनने त्या महान ,देशरक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या थोर सुपुत्रास विनम्र वंदन केले.याच ठिकाणी आपल्या शत्रू राष्ट्राने (त्याला राष्ट्र म्हणायच्या सूध्दा स्थितीत ते सध्या नाही..) पाकिस्तानने दि.२६/११/२००८ रोजी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठविलेल्या अजमल कसाब नावाच्या राक्षसी अतिरेक्याला जिवंत पकडले होते ...हुतात्मा तुकाराम ओंबळेजींनी.मात्र त्या नराधमाने ओंबळेजींना बंदुकीच्या गोळ्यांंनी घायाळ केले होते.स्वतः घायाळ होवून सूध्दा ओंबळेजींनी क्रूरकर्मा दहशतवादी कसाबला आपल्या वज्रबाहूपाशातून सोडले नव्हते.


अखेर तो क्रूरकर्मा जिवंत पकडला गेला; परंतु भारतमातेचा थोर सुपुत्र तुकाराम ओंबळेजी धारातीर्थी पडले..! धारातीर्थी पडले ते सर्वसामान्य मुंबईकरांचे,भारतवासियांचे प्राण वाचविण्यासाठी..! हे विचारचक्र माझ्या मनात चालू होते.त्या "शौर्य तीर्थक्षेत्राला "पूनश्च एकदा वंदन करून आम्ही पुन्हा त्याच शहर पोलिसांकडे आलो.कारण आमचा टॅक्सी थांबा तेथे होता. मुंबईच्या भीषण गरमीत,खूप जाम करणा-या वाहनांना मार्ग दाखवित आपली सेवा ते शहर पोलिस साहेब इमानेइतबारे करत होते. उष्णतेची परवा न करता. त्यांची व माझी फक्त नजरभेट झाली. त्यांना पाहून मला माझ्या सावलीतील नोकरीचा असणारा पोकळ गर्व पार गलितमात्र झाला. मनोमनी त्यांनाही वंदन केले.त्या शहर पोलिस साहेबांच्या नजरेत " आमचा कुणीतरी सन्मान केला, शौर्य तिर्थक्षेत्राला भेट देऊन ...!" हा आत्मगौरवाचा भाव मला जाणवला. एवढ्या घाईत देखील त्यांनी आमच्याकडे बघून स्मित केले.आम्हाला खूप आनंद झाला होता.


आमची या "शौर्य तीर्थक्षेत्राला" भेट दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. "शौर्य तीर्थक्षेत्र " हुतात्मा तुकाराम ओंबळेजींच्या पुतळ्याखालील लिहिलेल्या ओळी मनात म्हणत होतो... 

                                                               

" प्राणाचे देऊनी बलिदान..वाचविले असंख्य प्राण... हे शूरवीरा ,आपणास मुंबईकरांचा प्रणाम..!"🙏🏻

                                

वंदे मातरम्..!

                                                      

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


लेखन दिनांक:२५ मे २०१७

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

देवभूमी भाग क्रमांक ९




 







मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ९ )

===================================

रात्रीचे दहा वाजले होते. हिमालयातील थंडी काय असते याचा प्रत्यय यायला लागला होता.अधून मधून ओलसर थेंब अंगावर पडत होते. संध्याकाळी सव्वा सहा वाजता दर्शनाच्या रांगेत उभे राहून अखेर रात्री दहा वाजता बाबा केदारनाथाचे मनोभावे दर्शन झाले होते. एकतर साधारणतः पहाटे पाच ते दुपारच्या सव्वा दोन वाजे पर्यंत अत्यंत चढणीचा मार्ग चढत चालल्याने पाय पूर्णतः थकून गेले होते. त्यात पुन्हा संध्याकाळी सव्वा सहा ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दर्शनाच्या रांगेत उभे राहिल्याने पावलं हळूहळू पडायला लागली होती. आमची दोन्ही मुलं मात्र फारसे थकलेले जाणवत नव्हते.आता आम्ही पूर्णपणे शरीर गोठून टाकणाऱ्या हिमालयातील थंडीच्या स्पर्शात मंदिराच्या बाहेरील परिसर होतो. पोटात सगळेच प्राणी ओरडायला लागले होते.खूप भूक लागली होती.मंदिर परिसरातील एका हॉटेल मध्ये जेवणाचे ठरवले. जेवणाची ऑर्डर दिली.त्या हॉटेल मध्ये खूप गर्दी होती. वीस मिनिटांनी आमची जेवणाची थाळी आली. खूप भूक लागलेली असल्यामुळे आम्ही अधाशीपणे त्यावर तुटून पडलो.पहिला घास तोंडात गेल्या गेल्या दोन्ही मुलं, मी अन् माझी पत्नी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागलो.त्या बघण्याच्या अर्थ एकच होता अन् तो म्हणजे जेवणाच्या ताटातील भात पूर्णतः आंबून गेलेला होता.फक्त गरमागरम होता इतकेच..! तिथं त्या दुकानदाराला याबाबतीत मी म्हणालो पण त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की,
" साब, ताजा किया है, अभी अभी | खाना हैं तो खाव, नही तो बाजू मे रखो |चलो बाजू हटो, बहुत भीड हैं |

जास्त डोकं लावण्यात अर्थ नव्हता.आम्ही भात बाजूला केला अन् उर्वरीत भाजी अन् पोळी खाऊन आमचं जेवण पूर्ण केले.पिण्यासाठी दोन लिटर कोमट असलेले पाणी प्रत्येकी १२०₹ दराने विकत घेऊन आमची तहान भागवून घेतली. आता रात्रीचे अकरा वाजले होते. आम्ही पुन्हा एकदा बाबा केदारनाथ मंदिर परिसरात आलो अन् मनोभावे कळस दर्शन घेतले. तिथं काही  साधूंनी पत्र्याच्या डब्यात शेकोट्या पेटविलेल्या होत्या. त्या साधूंच्या एकंदरीत देहबोली वरून ते शीघ्रकोपी जाणवत होते.उशीर होतोय असे वाटले अन् आम्ही पुन्हा नंदी बेस कँप कडे हळूहळू पावलं टाकत टाकत मार्गस्थ झालो.

अंधार रात्री मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज शांतता भंग करत होता.हीच ती मंदाकिनी नदी जिच्या रुद्रावतारामूळे जून २०१३ मध्ये हा संपूर्ण परिसर उध्वस्त झाला होता.त्यात त्या माऊली मंदाकिनी नदीचा काहीही दोष नव्हता. निसर्गाच्या सान्निध्यात किंवा निसर्गावर जेंव्हा जेंव्हा मानव निर्मित बाबी अतिक्रमण करतात तेंव्हा तेंव्हा आई मंदाकिनी किंवा निसर्गातील इतर कोणतेही घटक रुद्रावतार धारण करणारच..! पायाला ठेच लागल्याने माझे विचार चक्र थांबले.नशीब, पायात बुट होता, नसता उजव्या पायाची बोटं नक्कीच रक्तबंबाळ झाली असती. अंधार असल्यामुळे आम्ही नंदी बेस कँप रस्ता परिसरात भेटत असणाऱ्या लोकांना विचारत विचारत अखेर मुख्य रस्त्याला लागलो होतो. इतक्यात एक पठ्ठया आमच्याकडे आला अन् म्हणाला...
" शाब, घोडा चाहिए क्या ? नीचे गौरी कुंड चलने का है क्या?
मी माझ्या मोबाईल मध्ये वेळ बघितली , रात्रीचे ११:२० वाजले होते.मी विचार करू लागलो, एवढी रात्र झाली आहे अन् हा पठ्ठया एवढ्या अंधारात अन् अतिशय कडाक्याच्या थंडीत कसं काय घेऊन जाणार..?
आम्हाला तर काही जायचे नव्हते,पण मी सहज म्हणून त्या पठ्ठयाला विचारले..
" भैय्या, इतनी ठंड और अंधेरेमे आप कैसे जा सकोगे?"
तो व्यक्ती मला  म्हणाला..
" तुमको क्या करने का है, मैं लेके जाऊंगा |
आम्हाला जायचे नव्हते, त्यामुळं मी नकार दिला. वास्तविक एवढ्या रात्री अंधारात घोडे प्रवास बंदी होती,तरी देखील ही माणसं काही प्रवाशांच्या जीवाशी खेळत होती.

आम्ही ११:३० वाजता नंदी बेस कँप मधील आमच्या तंबू मध्ये पोहचलो होतो. आमच्या बिछान्यावर पडल्यापडल्या शरीर एकदम शांत अवस्थेत गेले होते. अंगावर घेण्यासाठी जी व्यवस्था होती,  चैन ओढून बंद करण्याची पिशवी म्हणू शकतो आपण त्यास तिच्यात शिरून आम्ही पहुडलो होतो.आयुष्यात कधीही एवढी थंडी शरीराला माहीत नव्हती, त्यामुळं शरीर कधी एकदा सकाळ होईल अन् कधी सूर्य नारायणाच्या प्रकाशात जाईल या प्रतीक्षेत पहुडले होते. परिसरात शांतता पसरली होती.अधून मधून घोड्यांच्या गळ्यातील घंटीचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्र उलटून गेली होती.मध्यरात्री नंतर दिनांक २१ मे २०२३ ला प्रारंभ झाला होता.रात्री दोन वाजता मला तहान लागली होती.थंडी खूप होती,पण पाणी कमी पिल्यामुळे घशात कोरड पडली होती.मी माझ्या पत्नीला उठवले अन् बाटलीत पाणी आहे का या विषयी विचारले.पाणी नव्हते. दोन्ही मुलं शांत झोपी गेले होते.अखेर मी अन् माझी पत्नी बाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या दुकानात पाणी विकत भेटते का हे बघायचे ठरवले.मी अन् माझी पत्नी सोबत बाहेर पडलो. नंदी बेस कँप रस्त्याच्या बाजूला एक छोटे हॉटेल होते.तिथं एक पुरुष अंगावर उबदार कपडे घेऊन बसलेला दिसला.तिथं आम्ही गेलो अन् प्यायला  विकत कोमट पाणी मिळेल का ? असे विचारले. साधे पाणी पिल्या जाणारच नव्हते, इतकी भयंकर थंडी होती.मला पूर्ण खात्री होती की, एकतर खूप रात्र आहे, त्यात समोरचे गिऱ्हाईक अडलेले आहे ही परिस्थिती ओळखून तो दुकानदार माझ्याकडून जास्तीचे पैसे घेणार याची खात्री होती. गरज माणसाला व्यवहार शून्य बनवते याचा प्रत्यय मला याक्षणी येत होता.दुकानदाराने स्वतः पैसे सांगण्याच्या अगोदरच मी त्यांना म्हणालो..
" भैय्या, बहुत ठंडी हैं, एक लिटर गुणगुणा पाणी दिजिये | मैं २०० ₹ देने के लिये तैयार हुं | 
माझे बोलणे ऐकल्यावर तो दुकानदार माझ्याशी बोलला..
" साब , ज्यादा नही लुंगा | जितना आने जाने का खर्चा आता है, वही मिलाकर दीजिये | सिर्फ ८०₹ दीजिये | आप बहुत थके हुए लग रहे हो | और चाहिए तो लिजीए|

मी खूप आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होतो.कारण इथे साधी पाण्याची बाटली ८०₹ मिळत होती.मघाशी एक लिटर कोमट पाणी बाटली १२० ₹ ला मिळाली होती.या व्यक्तीने मला कोमट पाणी करून एक लिटर पाण्याची बाटली फक्त ८० ₹  किमतीत दिली होती. कोमट पाणी असलेल्या दोन लिटरच्या बाटल्या घेतल्या. तिथून निघताना त्या पुरुषाकडे श्रद्धेने बघून तिथून आम्ही निघालो. 

आम्ही पुन्हा नंदी बेस कँप मधील आमच्या तंबूत परतलो अन् झोपी गेलो.त्यावेळी रात्रीचे २:३० वाजले होते. मात्र माझ्या मनात कोमट पाणी प्यायला दिलेल्या त्या देव माणसाविषयी पुढील ओळी‌ येऊ लागल्या होत्या...
' पता नहीं  किस रूप में आकर नारायण मिल जायेगा,
निर्मल मन के दर्पण मे वह राम के दर्शन पायेगा |'

वरील ओळी माझ्या अंतर्मनात येत होत्या, त्याविषयी माझ्या पत्नीला देखील सांगितले.त्यानंतर माझे शरीर कधी झोपी गेले हे समजलेच नाही.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - १२  नोव्हेंबर  २०२३, रविवार ( लक्ष्मीपूजन )

क्रमशः


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

दुःखद अश्रू


 


मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


दुःखद अश्रू..!


==================================


काल दिनांक ८/११/२०२३ रोजी शाळेचा शेवटचा दिवस होता.त्यामुळं काहीसे उशिरा शाळेतून निघणे झाले होते. साधारणतः पाच वाजता आळंद येथून बसमध्ये बसलो होतो.बस निघाली. पन्नाशी असलेल्या वयोगटातील एक जोडपे देखील आळंदहुन बसमध्ये बसले होते.अगदी थोडेसे अंतर गेल्यावर कंडक्टरच्या लक्षात आले की, त्या जोडप्यातील पुरुष खूप दारू पिलेला आहे. कंडक्टरने त्या पुरुषाला खाली उतरण्यासाठी सांगितले. तो पुरुष दारू पिलेला असल्याने त्याच्या अंगात नसलेलं बारा हत्तीचे बळ आलेलं होतं.नाही नाही म्हणत तो पुरुष त्या कंडक्टरलाच उलट उद्धट सारखे बोलायला लागला. त्या दारू पिलेल्या पुरुषाच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते.ती माऊली आपल्या दारुड्या नवऱ्याला शांत राहण्यास सांगत होती,पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.काही पुरुषाची जातच मुळी आपल्या बायकोवर दादागिरी करणारी हलकट जमात आहे. त्यात अशा व्यसनी पुरुषांचा प्रवर्ग खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.


अखेर कंडक्टर साहेबांनी बळजबरी त्या दारुड्या पुरुषाला खाली उतरवून दिले.त्याच्या मागोमाग त्याची सोशिक पत्नी डोळ्यात अश्रू घेऊन उतरली. रस्त्याच्या कडेला दोघेही बसले. तिचा नवरा असल्यामुळे तिला आपल्या नवऱ्याला सोडून जाता येणार नव्हते. नवरा किती पण वाईट वागू द्या, नवऱ्याच्या सोबत निमुटपणे अश्रू ढाळत राहणारी आपली भारतीय स्री..! मग ती भारतातील कोणत्याही जाती धर्माची असू द्या..! ती स्री आपल्या दारुड्या नवऱ्याला हाताला धरून त्याला समजावून सांगत होती. ते समजूतदारपणाचे वाक्य बोलत असताना त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.ते दृश्य पाहून मला खूपच वाईट वाटले.माझ्या भावनेचा कांगोरा गहिवरून गेला होता.मी विचार करू लागलो की, दारुडा नवरा असलेल्या स्रीच्या मनाच्या संवेदना खूपच दुर्दैवी ठरतात. तिला त्या संवेदना हक्काने व्यक्त करता येत नाहीत. अशा महिला आपल्या दुर्दैवी आयुष्याला जबाबदार असणाऱ्या दारुड्या नवऱ्याच्या दुःखाला आपल्या अश्रू द्वारे मोकळी वाट करून देत असतात. तिला अशा राक्षसी वृत्तीच्या नवऱ्याच्या समोर आपल्या कोणत्याही भावना व्यक्त करताच येत नाहीत. 


लग्न झालेली स्री जेवढं आपल्या पती जवळ व्यक्त होत असते, तेवढं ती इतर नात्याजवळ होत नाही.आणि नवराच जर आपल्या भावना समजून घेणारा नसेल तर..

समाजात वावरताना अपमानित वर्तन करून वागणारा असेल तर... 

अशा स्रीया आजही राम गणेश गडकरी लिखित ' एकच प्याला ' नाटकातील सिंधू सारख्या दुःखाच्या हिंदोळ्यावर आपलं आयुष्य जगत असतात.थोर नाट्य लेखक राम गणेश गडकरी यांच्या ':एकच प्याला ' नाटकातील असलेले तळीराम , सुधाकर आजही समाजात वावरताना सभ्यपणाचे आव आणून आपल्या सिंधूला कौटुंबिक आयुष्यात अतिशय दुःख देत असतात. फक्त अशा कित्येक सिंधू आपल्या दुःखाला जाहीर होऊ देत नाही. कारण कुटुंबाची जबाबदारी अन् जाणीव फक्त आणि फक्त त्या त्या कुटुंबातील स्रीलाच जास्त प्रमाणात असते. जबाबदारी माणसाला सोशिक बनवते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. आजही समाजात राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटकातील सुधाकर, तळीराम दिसतात. जसा राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटकातील सुधाकर आपल्या तथाकथित प्रतिष्ठेच्या आयुष्याला समाजात दाखवत असताना आपल्या आयुष्यात एकच प्याला जवळ करतो अन् त्यात होरपळ होते सिंधूची..! 


मी साधारणतः प्राथमिक इयत्तेत असेल, तेंव्हा आमच्या पालखेड गावातील महादेवाच्या यात्रेच्या निमित्ताने सादर केलेलं राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटक बघितलेले आहे. त्यात सुधाकर अन् सिंधूची अजरामर भूमिका निभावली होती अनुक्रमे आदरणीय तुळशीदास मुलमुले पा. आणि आदरणीय अशोकराव पा. वाणी यांनी..!आमच्या गावात संगीतप्रधान नाटकातील माझ्या पिढीने पाहिलेल्या सर्वोत्तम अभिनयाच्या दोन व्यक्तिरेखा याचं दोघांनी सादर केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यावेळी त्या एकच प्याला नाटकातील अर्थ फारसा समजला नव्हता.मात्र पुढे आयुष्यातील प्रवास करताना त्याच एकच प्याला मधील कित्येक सुधाकर , सिंधू अन् तळीराम भेटत गेले. मग त्या त्यावेळी असे जाणवू लागले की, ' अरे, यांना तर आपण आपल्या बालपणी आपल्याच गावात एकच प्याला नाटकात सुधाकर, सिंधू अन् तळीरामाच्या रुपात बघितलेले आहे.' समाजातील कित्येक सुधाकर एकच प्याला जवळ करून आपल्या आयुष्यातील सिंधूला अपमानित करत जगत असतात. अशावेळी सिंधू निमुटपणे अश्रू ढाळत आपलं दुर्दैवी आयुष्य व्यतीत करत असते.जसे की आज मला आळंद येथे याचा प्रत्यय आला.

ज्यांच्या आयुष्यात भावनाशून्य नातं आलं अशा कित्येक डोळ्यात दुःखद अश्रू अनावर होतात. फक्त काही अश्रू दिसून येतात तर काही अश्रूंना डोळे पिऊन घेतात.


ता.क. - स्री ही भावनेची देवता आहे.


फोटो स्रोत - गुगल.


वंदे मातरम्

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ९/११/२०२३, गुरुवार.

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

प्रेमळ मित्र डॉ.योगेश राजपूत सर


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


प्रेमळ मित्र  - डॉ.योगेश राजपूत सर.!


___________________________________________


स्थळ बदलले की,भाषा बदलते, परिसर बदलतो, एकंदरीत बदललेला परिसर आपल्याला खूप काही नवनवीन गोष्टी अगदी मोफत देतो. त्यात माणसं अन् त्यांचे स्वभाव आलेच.नियतीने मुक्तहस्ताने उधळण करून ही माणसांची ,माणसं भेटण्याची सोय करून ठेवली आहे फक्त...त्याचा कोण अन् कसा आनंद घेतो हे ज्या..त्या..माणसावर अवलंबून असते. मी मात्र मला भेटलेल्या प्रत्येक माणसाला सहसा सोडीत नाही..! कारण माझा माझ्या सर्व सामान्य आयुष्याचा एक सर्वसाधारण सिध्दांत आहे की.......

" माणसानं माणसावर जातपात विरहित नितांत प्रेम करावं..! अर्थात स्वभावाला अनुरूप किंवा त्याच्या आसपास कुणी असेल तरच त्याचा आनंद घ्यायचा आनंद काही औरच असतो..! नाही कुणी असा भेटला तर.. चला पुढे...गुपचूप..! "


माझी काहीही ओळख...ना...पाळख...असलेल्या भौगोलिक परिसरात..म्हणजेच अंधारी हायस्कूल येथे बदली झाली अन् हुरहूर होती...दररोजच्या प्रवासात कुणीतरी... " आपलं " भेटेल का... याची..! पण माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात पदोपदी नियतीने असे कित्येक माणसं पाठवून दिले अन् मला पुन्हा आयुष्यात नवीन माणसं सामील करायला अजून एक दार उघडून दिले..!


डॉ.योगेश राजपुत सर..!

मला अंधारी च्या प्रवास मार्गावर भेटलेले अतिशय गोड स्वभावाचे व्यक्तिमत्त्व..! एकदम जमिनीवर वर्तन असलेला हा माणूस..! वास्तविक डॉ.योगेश राजपुत सर क्लास टू दर्जाचे वैद्यकीय अधिकारी आहेत; पण या माणसाला त्या पदाचा व विद्वत्तेचा अजिबात गर्व नाही.आणि असली माणसं मला जाम आवडतात.


एकदा आमची बस फुलंब्री येथे बंद पडली होती.आम्ही सर्व प्रवासी खाली उतरून बस ला दे धक्का देऊ लागलो..तर..डॉ.साहेब हे पदाचा अहंकार मनात न आणता ते ही दे धक्का देऊ लागले होते. नाहीतर आजकालची नवीन पिढी...यांचं सगळचं कसं टाईट.. फिट..कडक इस्त्री चा मामला. नुसती याला..त्याला वाकड्यात घुसून अक्कल पाजळणारी..! पण डॉ.योगेश राजपुत त्याला नक्कीच अपवाद आहेत.


मागे एकदा एका आंदोलनाच्या दरम्यान सर्व बस बंद होत्या. डॉ.योगेश राजपुत सर मला स्वतः फोन करून विचारायचे...

" सर,तुम्ही आता कुठे आहात..? आज बस बंद आहेत चला माझ्या गाडीवर जाऊया..!" 

एवढं आत्मीयतेने संवाद साधून आपलंस करणारा ग्रेट माणूस..!

डॉ. योगेश राजपुत यांच्यात अन् माझ्यात आठवड्यातून बहुतेक वेळा सध्याच्या..पूर्वीच्या...अन्...भविष्यात होऊ पाहणाऱ्या अनेकानेक चर्चेच्या मैफिली होतात. पण त्या पोरकट अन् माझंच खरं या श्रेणीतल्या कधीच नसतात. असतात..प्रगल्भ विचाराने सजलेल्या..! प्रगल्भ विचाराने सजलेला खूप चांगला माणूस..खूप छान नवीन मित्र..!


आज माझ्या या नवीन आदरणीय मित्राचा जन्मदिन आहे..!

खूप खूप शुभेच्छा डॉ.साहेब..!


ता.क.: डॉ.साहेब, उद्या कोणत्या बसने जायचे आहे..?😊


वंदे मातरम्..!


डॉ.योगेश राजपुत यांचा प्रवासी मित्र: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १/११/२०१८

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

शरदाचे चांदणे..!









 



चिंतन ©️


शरदाचे चांदणे..!


आयुष्यात काही माणसं अमावस्येच्या अंधार रात्री सारखी भेटली. त्यांनी अंधार अन् त्यातून  स्वतः चे उध्वस्त  होणारे आयुष्य  शिकवलं.


आयुष्यात काही माणसं अशीही भेटली जी चंद्राच्या शीतल छायेत स्वतः चे देहभान हरपून स्वतः चा अन् आपल्या भावोत्कट मनाचा विकास करायला त्यांनी शिकवलं..!


शेवटी,आनंदाचे अन् माणसाच्या मनाचे नाते तरी काय असते हो..?

आनंद अन् मन या दोन्हीत दृढ भाव असतो तो भावूक मनाचा अन्  त्या भावूक विश्वात सापडलेल्या निर्मळ मनाचा.


निर्मळ मन, असे कुठेही अन् कुणालाही भेटत नसते.त्यासाठी स्वतः ला, स्वतः विषयी अत्यंत प्रामाणिक अन् कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल प्रकाशमय असावे लागते.


शरदाच्या शीतल चांदण्यात आपलं मन , दुधाच्या मधुर चवी सारखे अन् खडी साखरेच्या पाकात भिजून जाणारे बेभान होणारे असावे लागते.


मनात असणारी न्यूनता अन् त्यातून निर्माण होणारी मानवी उद्विग्नता का होते समजावून सांगण्यासाठी अन् समजून घेण्यासाठी आपल्यातली आपली आई सदैव जिवंत असावी लागते.


मनाची अन् भावनेची देवता अशीच एकमेकांच्या हातात हात धरून आयुष्याचा प्रवास करत असते.

त्या प्रवासात त्यांच्या सोबत असते ती शरदाच्या चांदण्यातील शीतलता  अन् कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाची मधुरता.


असो, आज शरदाच्या चांदण्यात न्हावून निघणारी कोजागिरी पौर्णिमा आहे. ज्यांचं मन आपल्या आई सारखं प्रेमळ अन् निर्मळ आहे त्यांना आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल अन् दुधात विरघळलेल्या खडी साखरे सारख्या गोड गोड शुभेच्छा..!😊🌹🙏🏻


ता. क. - वरील लेखन गद्य आहे की पद्य हे ज्याने त्याने आपापल्या परीने ठरवावे अन् वाचनाचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच्या गोड गोड दूधा सारखा आनंद मानून घ्यावा.


सदरील दुधाचा फोटो, हरिद्वार येथील एका दुग्धालयातील आहे. मी स्वतः क्लिक केलेला आहे.


वंदे मातरम्


नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २८/१०/२०२३, शनिवार, ( कोजागिरी पौर्णिमा)

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

आम्ही बॅक बॅंचर..!😊


 


मला प्रवासात भेटलेली माणसं.©️


आम्ही बॅक बॅंचर..!😊


===============================


मला वैयक्तिक प्राथमिक, माध्यमिक अन् उच्च शिक्षण घेत असताना जो आनंद बॅक बॅंचर म्हणून लाभला तो आनंद त्या त्या कालखंडात पुढे अथवा मध्यभागी बसून लाभला नाही. बॅक बॅंचर म्हणून काहीतरी ग्रहण करणे सर्वार्थाने सहज अन् सोपे जाते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझ्या माध्यमिक वयोगटातील वर्गात शिक्षण घेत असताना जे काही मोजके जिवलग बॅक बॅंचर बालमित्र होते, त्यात प्रामुख्याने भागिनाथ गोरे, आण्णासाहेब म्हस्के, शेख खाजा बागवान, स्व.शाम शेळके , संताराम काळे ( खिर्डीकर ) ,काकासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर घेर अन् लक्ष्मण बोरसे. ( हे तिघेही रा.जळगाव ता. वैजापूर ) लक्ष्मणला आम्ही ' लखु ' या नावाने उल्लेखित करत असायचो.अर्थात आजही त्यात बदल झाला नाही. याचा अर्थ आमच्या वर्गात पुढे बसणारे चांगले नव्हते असे अजिबात नाही.ती सर्वजण खूप चांगली मित्र मंडळी होती अन् आहेत.पण माझ्या मते बॅक बॅंचर मध्ये जी मज्जा असायची ती इतरत्र आयुष्यात लाभली नाही अन् आजही लाभत नाही हा माझा स्वानुभव आहे.


लखु तसा मूळचा पळसवाडी, ता. खुलताबाद येथील राहणारा.पण मामाच्या गावाला म्हणजेच जळगाव ता. वैजापूर राहायला होता.मामा तरी कोण..? त्याच्याच वयाचा अन् आमचा वर्गमित्र ज्ञानेश्वर घेर..! दोघेही मामा भांजे जळगावहुन पायी तर कधी सायकल वर पालखेड येथे माध्यमिक शाळेत येत असत. 


वर उल्लेखित केलेली भागिनाथ गोरे, आण्णासाहेब म्हस्के, शेख खाजा बागवान, स्व.शाम शेळके , संताराम काळे ( खिर्डीकर ) ,काकासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर घेर अन् लक्ष्मण बोरसे. लक्ष्मण बोरसे अन् मी स्वतः ( बॅक बॅंचर मधील अजून कुणी राहिले असेल तर, कुणीतरी सांगा रे भो..! ) आम्ही निदान वर्गात बसताना अन् मैदानावर हिंडताना सोबत असायचो. वर्गातील इतरही जिवलग मित्र मंडळी होती,पण ती नेहमी पुढे किंवा मध्यभागी बसत असायची.त्यामुळं बॅक बॅंचर म्हणून अध्ययन करताना अन् कुणीतरी शिक्षकाने अध्यापन करत असताना जो आनंद घेता यायचा तो आमच्या पुढच्यांना मिळत नसे.त्यावर आनंददायी हक्क आमचाच असायचा असे वाटायचे. आता बॅक बॅंचर म्हणून असा कोणत्या मुलखाचा आनंद मिळायचा याचा अनुभव जे कुणी बॅक बॅंचर म्हणून विद्यार्थी दशेत आयुष्य जगले त्यांनाच ठाऊक..! तो आनंद आम्हा बालमित्रांपैकी एकाने भूगोलाच्या पुस्तकात शोधला. नव्हे नव्हे भूगोलाचे पुस्तक आनंद निर्मितीचे उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य होते हे आमच्या तत्कालीन वर्गातील फारच कमी मित्र जाणून होते. वर्गात फरशीवर खाली बसून आम्ही आमचं पौगंडावस्थेतील हळुवार वय जगलो. अर्थात पौगंडावस्थेतील हळुवार वय जगत असताना वर्गातली सगळी मित्र मंडळी कुणालाही नाहक उपद्रव होणार नाही या अर्थाने पोटभरून जगली यात तिळमात्र शंका नाहीच..! त्यात खोडकरपणा असायचा,पण उपद्रवी मूल्य नसायचे.


लक्ष्मण पाटील बोरसे उपाख्य लखु आज बजाजनगर येथे स्वयंपाकाच्या विविध संसाधनासह एक उत्कृष्ट आचारी अन् मंडप असलेलं भांडवल सांभाळून आपलं कौटुंबिक आयुष्य सुखाने जगत आहे. आम्ही काही वर्षापूर्वी आमच्या वर्गमित्रांचे जे स्नेह मिलन पालखेड येथील महादेवाच्या मंदिरात आयोजित केले होते, त्यावेळी लखु आपल्या संपूर्ण कुटुंबासह आवर्जून उपस्थित होता. आम्ही जो आमच्या वर्गातील मित्रांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता, त्याचा पहिला निकष हाच होता की, जे कुणी वर्गातील बॅक बॅंचर म्हणून आयुष्य जगले होते, त्यांना पहिलं हक्काचे अन् आग्रहाचे सह परिवार उपस्थित राहण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते. विशेष म्हणजे सर्वजण आपापल्या कुटुंबासह त्यावेळी उपस्थित राहिले होते.


आयुष्याची दोरी हळूहळू आपला पीळ ढिला करत चालली आहे. प्रत्येक दिवस येतो अन् असाच निघूनही जातो.त्या प्रत्येक दिवशी आपल्या गतकाळातील आठवणी आपल्या वर्तमानात आपल्या आयुष्यात भेटलेल्या प्रवाशांच्या सोबत व्यतीत होऊन निघून जात आहेत. पाठीमागे उरतो तो फक्त आणि फक्त सहवासातील सुखद अनुभव..! आम्ही कसे होतो अन् आम्ही सध्या काय आहोत हे आमच्या आम्हालाच माहीत. आम्हाला बॅक बॅंचर म्हणून जगण्यात जो आनंद आयुष्यात लाभला तो आज आयुष्याच्या पुढ्यात येऊन आपल्या आठवणींना उभा करत असतो. कोणत्याही क्षेत्रात मुळात बॅक बॅंचर म्हणून जगत असताना ग्लॅमर भेटलेले नसते. मात्र त्याच बॅक बॅंचर या ठिकाणी सर्वात पाठीमागे बसून आपल्या पुढच्यांचे निरीक्षण, अवलोकन करून स्वतः मध्ये थोडेफार आत्मचिंतन करण्याचं अगदी थोडेफार का होईना ज्ञान प्राप्त होते हा माझा स्वानुभव आहे.


असो, मित्रा लखु, भेटत राहू..! त्याचं बॅक बॅंचर म्हणून असलेल्या अनौपचारिक नात्याने..! कारण त्यात कोणत्याही प्रकारचे ग्लॅमर नसते.


ता.क. - लखुशी कुणाला त्याच्या कौशल्याच्या बाबतीत सेवा म्हणून संपर्क करायचा असेल तर आमच्या फोटोच्या मागे भिंतीवर त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला आहे. झूम करून बघा..!


वंदे मातरम्


एक बॅक बॅंचर - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक - २५/१०/२०२३, बुधवार.

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

देवभूमी भाग क्रमांक ८





मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ८ )

===================================

केदारनाथ पर्वत रांगेत असलेली शांतता अन् कडाक्याची शीतलता मनाला अन् शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. आम्ही नंदी बेस कँप सोडून बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने निघालो होतो.आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते.साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर बाबा केदारनाथ मंदिर होते. परिसरातील शांतता मनाला अन् त्याच परिसरात हिमालयाच्या उत्तुंग थंडगार शिखरांमूळे,त्यातल्या गारव्यामुळे निर्माण झालेली शीतलता शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. चालण्याचा वेग मंदावला होता.मात्र ज्याच्या दर्शनाची ओढ लागलेली होती, ती ओढ अंगात बळ निर्माण करत होते. कुणाच्या विषयी असलेली ओढ आपल्या मनाला अन् शरीराला अजुन टवटवीत अन् तरतरीत करते याची अनुभूती येऊ लागली होती. मनाच्या संवेदना जागृत असलेल्या माणसाला कुणाच्या विषयी लागलेली ओढ, आपल्या ध्येयाकडे ओढीत नेते हा आत्मिक अनुभव यायला लागला होता. ओढ असल्याशिवाय प्रेमाची, अध्यात्माची अन् आत्मिक आनंदाची अनुभूती येत नाही. यातील अध्यात्मातील आत्मिक आनंदाची अनुभूती घेण्यासाठी आमची पावलं दिनांक २० मे २०२३ रोजीच्या संध्याकाळी केदारनाथ मंदिराच्या दिशेने झपझप पडू लागली होती.

आजूबाजूला भाविकांची पायी वर्दळ दिसू लागली होती. आम्ही आमच्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या भयंकर थंडीचा अनुभव घेत होतो. उजव्या ,डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा उत्तुंग पर्वत येणाऱ्या भाविकांच्या स्वागताला नम्रपणे उभा आहे असा भासू लागला होता. संपूर्ण दिवसभर केदारनाथ घाटी चढल्यामुळे पायात खूप थकवा आलेला होता, पण आता त्याच थकव्याला आजच्या शेवटाकडे आम्ही घेऊन चाललो होतो.रस्ता सपाट होता.हळूहळू दुरून बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. मंदिराचा परिसर नजरेच्या टप्प्यात येऊ लागला होता.बाजूला खळखळ वाहणारी मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता. आम्ही दर्शनाचे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले होते , त्याची पावती त्याच परिसरात असलेल्या एका कँप मध्ये दाखवली अन् पुढे मुख्य मंदिर परिसरात जाण्यास परवानगी मिळाली होती.छोटासा पुल ओलांडून आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेशित झालो होतो.

आयुष्यात जे स्वप्न माझ्या बालपणी , पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. आयुष्यात कधीतरी एकदा बाबा केदारनाथाचे दर्शन घेईल हे साधे भोळे स्वप्न उराशी बाळगून या क्षणापर्यंत आयुष्याची वाटचाल सुरू होती. बाबा केदारनाथ मंदिर परिसरातील जो सपाट जमिनीचा भूभाग होता तो आता आला होता.मी पायातील बुट बाजूला काढले अन् बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर माझे मस्तक श्रद्धेने टेकवले अन् आपोआप माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.काही क्षण  त्याच  नतमस्तक  अवस्थेत एकचित्त होतो. माझ्या बाजूला उभे असलेले आमची दोन्ही मुलं अन् माझी पत्नी यांनी देखील श्रद्धेने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर आपापले मस्तक श्रद्धेने टेकवले होते. काही वेळाने मी माझे मस्तक बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने केले अन् पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझ्या पत्नीने मला सावरले होते.तिलाही माझ्या डोळ्यातील श्रद्धेय अश्रूंचा अंदाज आला होता.ती देखील गहिवरुन गेली होती. आपण आपल्या आयुष्यात जे स्वप्न बघत असतो,ते जेंव्हा मोठ्या मेहनतीने साकारले जाते तेंव्हा डोळ्यातून येणारे अश्रू त्याच अमृताचे जलकण असतात, जे विधात्याने भूतलावर पाठवलेले असते. मी माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच या पवित्र अन् श्रद्धेय भावूक अनुभवांचा अनुभव घेत होतो. माझे स्व.आई - वडील स्वर्गवासी झाल्यानंतर ज्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते, ते अश्रू अन् आज या क्षणी बाबा केदारनाथाच्या पायरीवर मस्तक ठेवल्यावर डोळ्यात आलेले अश्रू माझ्यातील आत्म्याला अनेक आठवणीत घेऊन गेले होते. अश्रू तेंव्हाच डोळ्यात येतात, जेंव्हा काहीतरी श्रद्धेय दिसणाऱ्या चैतन्याला आपण बघत असतो किंवा पुन्हा कधीही न दिसणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रेमळ चैतन्याला आपण आठवून जाणून घेत असतो. याक्षणी माझ्या डोळ्यातील अश्रू हे माझ्या समोर जे चैतन्यमय बाबा केदारनाथाचे शिवालय दिसू लागले होते त्यामुळं येऊ लागले होते.मला हा असा अनुभव यापूर्वी अनेक देवस्थानांचे दर्शन घेतले पण त्यावेळी आला नव्हता. माझ्या पत्नीने अन् मुलांनी मला त्या श्रद्धेय भावूक प्रसंगातून सावरले अन् आम्ही थेट मंदिराच्या अगदी जवळील परिसरात गेलो.

सूर्य कधीचाच मावळला होता.मात्र हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या उजेडात अजूनही आजूबाजूला पुसटसा उजेड जाणवत होता. बाबा केदारनाथाला अर्पण करायचे पूजेचे सामान परिसरातील दुकानातून खरेदी केले. आमच्या पायातील बुट त्याच दुकानदाराच्या दुकानात बाजूला काढून ठेवले अन् दर्शनाच्या रांगेत थेट सर्वात मागे जाऊन उभे राहिलो होतो.आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. हिमालयाच्या कुशीत असलेली अतिशय क्रूर, हो क्रूरच..! अतिशय क्रूर थंडी शरीराला थिजून टाकू लागली होती. काहीवेळ अनवाणी पायांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो पण पाच सहा मिनिटांनी  पायाखालील अतिशय थंडगार जमिनींचे थंडगार चटके तळपायाला बसू लागले होते.आयुष्यात चटका अन् उष्णता हे समीकरण अनुभवलेले होते,पण आज पहिल्यांदाच थंडीमुळे देखील चटका बसू शकतो याचा अनुभव येऊ लागला होता. मी आमच्या समोरील रांगेत उभे  असणाऱ्या बऱ्याच भाविकांच्या पायात बुट घातलेले बघत होतो.मी चि. नमन यास सांगितले की, आपण ज्याठिकाणी आपले बुट काढून ठेवलेले आहेत तिथून ते घेऊन ये.पायात बुट घातले तरच आपल्याकडून पुढे चालणे शक्य होईल.नसता नाही..! दोन्ही मुलं पुन्हा मुख्य मंदिराच्या परिसरात गेले अन् त्या दुकानाच्या ठिकाणाहून आमचे बुट घेऊन आले.आम्ही सर्वांनी पायात पुन्हा बुट घातले अन् याचं दर्शनाच्या रांगेत थेट मंदिराच्या अलीकडे बुट काढून पुढे अनवाणी पायांनी जाण्याचे ठरवले.

दर्शनाच्या रांगेत उभे असणाऱ्या सर्वच भक्तांना थंडीने गारठून टाकले होते.आम्ही दर्शनाच्या रांगेत संध्याकाळी सव्वा सहा वाजता उभे राहिलो होतो.हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो. उभे राहून राहून पायात गोळे येऊ लागले होते.पहाटे साडे तीन ते या क्षणापर्यंत सरासरी उभेच होतो.फक्त साधारणतः एक तास आराम केला होता. प्रचंड चढणीच्या प्रवासामुळे पायात त्राण उरले नव्हते,पण बाबा केदारनाथाच्या ओढीने ते त्राण पळून जात होते.आभाळातून अधून मधून पाण्याचे अतिशय थंडगार थेंब अंगावर पडत होते.दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था नव्हती,त्यामुळे उभे राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता रात्रीचे आठ वाजले होते.संध्याकाळच्या सव्वा सहावाजे पासून आम्ही उभेच पुढे पुढे दर्शनाच्या रांगेत सरकत होतो. रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास आम्ही अगदी मुख्य मंदिराच्या जवळ आलो होतो.पायातील बुट बाजूला काढले अन् हळूहळू पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो.

रात्रीच्या सव्वा नऊ वाजता आम्ही बाबा केदारनाथाच्या‌ मुख्य दरवाजात पाऊल ठेवले अन् एक वेगळ्याच शाश्वत अनुभूतीची जाणीव झाली. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या वास्तूची,मंदिराची उभारणी या अतिशय दुर्गम भागात केली होती तिथं पाऊल ठेवताच त्या आपल्या पूर्वजांना अंतर्मनातून साष्टांग दंडवत केला. काय असतील ती माणसं, ज्यांनी बाबा केदारनाथाला या हिमालयाच्या अतिशय दुर्गम भागात सुरक्षित केले होते. महादेवाला सुरक्षित करणारे ते कोण..? कारण तोच महादेव सर्वांना सुरक्षित ठेवतो.पण भाबडी समजूत सहज मनात आली होती. भाविकांच्या गर्दीने बाबा केदारनाथ मुख्य मंदिर फुलून गेले होते. आतमध्ये पाच पांडवांच्या क्रमवार मूर्ती होत्या.जे पांडव बाबा केदारनाथाच्या अस्तित्वाला निमित्त ठरले होते ते त्याच बाबा केदारनाथाच्या मुख्य मंदिरात श्रद्धेने विराजमान झालेले होते. वैराग्याच्या भेटीला, मानव जातीचा प्रतिनिधित्त्व करणारा माझ्या सारखा, माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखा अतिशय क्षुल्लक भक्त बाबा केदारनाथाच्या समोर आला होता.उत्पत्ती स्थिती अन् लय हे या सजीव सृष्टीचे कधीही न संपणारे चक्र..! त्यापैकी लय अर्थात मृत्यू जो की , शाश्वत सत्य आहे त्याचा स्वामी बाबा केदारनाथाच्या, भोलेनाथाच्या सानिध्यात आम्ही पोहोचलो होतो.एकटक बघत बघत डोळ्यात बाबा केदारनाथाला साठवून घेतले. दर्शन रांगेत उभे होतो तेंव्हा पासून जो मंत्र घोष अंतर्मनात सुरू होता त्याचे सार्थक आत्मिक समाधान लाभले होते.मनातून केलेले समर्पण आत्मिक आनंद देऊन गेले होते. 

मानवी संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मानव जातीला ज्याने माणूस म्हणून जगायला शिकवले होते तो शिव शंकर..!
 माणसाच्या आयुष्यात जसा जन्माचा आनंद व्यक्त केला जातो, अगदी त्याच मानवाच्या आयुष्यात चिरंतन शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूची जाणीव करून देणारा शिव शंकर..!
 मानवाच्या आयुष्याच्या प्रवासातील अंतिम ठिकाण स्मशान भूमी अन् तिथला स्वामी शिव शंकर..! 
तुम्ही कोण कुठले का असेना, शेवटी तुम्हाला माझ्या दरबारात यावेच लागेल,त्या दरबाराचा स्वामी शिव शंकर..!
 बुध्दी थकल्यावर अध्यात्माचा प्रांत सुरू होतो.त्या अंतिम प्रांताचा स्वामी शिव शंकर..! 
माझ्या, तुमच्या ,सर्वांच्या आयुष्याचा अंतिम साक्षीदार बाबा केदारनाथ महादेवाचे आम्ही नतमस्तक होऊन दर्शन घेतले अन् थोडेसे बाजूला झालो. मी यापूर्वी  वेरुळ येथे अनुष्ठान केले होते. त्यावेळी जप करण्यासाठी जी रुद्राक्ष माळ उपयोगात आणली  होती ती बाबा केदारनाथ गर्भगृहात असलेल्या पुजारी यांना विनंती करून तिथल्या श्रध्येयांना स्पर्श करून द्यायला सांगितली.त्यांनी माझी नम्र विनंती ऐकली. पवित्र स्पर्श झालेली रुद्राक्ष माळ पुन्हा मला तिथल्या पुजाऱ्यांच्या मार्फत परत मिळाली अन् आम्ही बाबा केदारनाथाच्या मंदिरातून बाहेर पडलो. आता रात्रीचे दहा वाजले होते.बाहेर येताच अतिशय थंडीमुळे दातावर दात आदळायला सुरुवात झाली होती.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २४ ऑक्टोंबर २०२३, मंगळवार ( विजयादशमी )

क्रमशः



 

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

पार्थिवन की लिओ दास..?


 


चिंतन ©️


पार्थिवन की लिओ दास..?


=================================


आपला क्रूर बाप अन् आपल्या त्याच क्रूर बापाचा भाऊ यांचा काळाकुट्ट भूतकाळ..!

त्याचं काळाकुट्ट भूतकाळातील आपलं क्रूर आयुष्य..!

काळाच्या ओघात आपला क्रूर भूतकाळ विसरू पाहणारा लिओ दास..!

वर्तमानात आपल्या छोट्याश्या लेकीवर निस्सीम प्रेम करणारा बाप..!

वर्तमानातील आपलं कुटुंब अन् त्याची जबाबदारी पार पाडू पाहणारा कुटुंब प्रमुख..!

भूतकाळातील क्रूर आयुष्य जगून वर्तमानात सज्जनतेचे आव आणून जगू पाहणारा कुटुंब प्रमुख..!

मात्र तो क्रूर भूतकाळ वर्तमानकाळात पिच्छा न सोडणारा..!

तो क्रूर भूतकाळ वर्तमानकाळात वेळोवेळी भेटत असतो अन् त्यात ससेहोलपट होते ती वर्तमानातील कुटुंबाची..!

थलपती विजयने लिओ दास चांगला सादर केला आहे. 


कैथी अन् त्यातला डिल्ली, 

विक्रम अन् त्यातला रोलॅक्स

अन् आता लिओ ,त्यात भेटणारा कैथी मधील पोलीस हवालदार अन् सर्वात शेवटी पुन्हा भेटणारा विक्रम...! हेच तर वैशिष्ट्ये आहे, दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या चित्रपटांचे..! प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रत्येक चित्रपटात कुठे ना कुठे तरी भेटून आपला संदर्भ अधोरेखित करून जाते..! काही चित्रपट हे त्या त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसाठी बघायचे असतात.त्यापैकी लोकेश कनगराज हे एक आहेत.


लोकेश कनगराज यांच्या आता पर्यंतच्या प्रत्येक चित्रपटातलं वैशिष्ट्ये म्हणजे त्यातलं क्रौर्य, त्यातील क्रूर व्यक्तिरेखांची क्रूरता, व्यक्तीरेखांचा संशयास्पद वावर अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅक ग्राउंड संगीत..! बॅक ग्राउंड संगीत हा लोकेश कनगराज यांच्या प्रत्येक चित्रपटाचा आत्मा आहे.लिओ मध्ये देखील बॅक ग्राउंड संगीताचा प्रभाव चित्रपटाच्या अगदी सुरुवाती पासून ते अंतिम क्षणापर्यंत दिसून येतो.


लिओ चित्रपटातील बरीच दृश्ये ही क्रुरतेचा कळस आहेत.अंगावर येणारी आहेत.बहुदा त्यामुळं हा चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे असं वाटतं.


दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ज्या प्रकारे अंडरवर्ल्डचे क्रूर आयुष्य आपल्या विविध चित्रपटाच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारे सादर केले आहे.अगदी त्याच प्रकारे ड्रग, अमली पदार्थ आणि त्या विश्वातील क्रूर आयुष्य दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या प्रत्येक चित्रपटात बघायला मिळते. विजय द मास्टर, कैथी, विक्रम अन् आता लिओ हे चित्रपट त्याचे उत्तम उदाहरणे आहेत. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाचे चाहते असणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी लिओ बघायला हरकत नाही.


ता.क. - समाजातील बरीच माणसं आपलं वर्तमानातील आयुष्य जगत असताना पार्थिवन की लिओ दास..या द्विधा मनःस्थितीत जगत असतात. क्रूर अन् दुसऱ्याला वेदना देणारा भूतकाळ हा वर्तमानकाळासोबत सतत वावरत असतो. त्यापासून कुणाचीही सुटका नाहीच..! 

हाच लिओ आहे..!


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २०/१०/२०२३, शुक्रवार.

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक ७ )





 



मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक  ७ )

===================================

दिनांक २० मे २०२३ शनिवार रोजी हिमालयातील केदारनाथ पर्वत रांगेतील केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या खडतर प्रवास रस्त्याच्या चढाई असलेल्या शेवटच्या टप्प्यात आम्ही आता चढाई करू लागलो होतो. काही वेळापूर्वी दुपारी दीड वाजता राजस्थान मधील भेटलेल्या आजीच्या रुपात एक ऊर्जेचा स्रोत भेटला होता. त्यामुळं शरीर जरी थकले असे जाणवत होते,मात्र मन ऊर्जेच्या प्रवाहात पुढे पुढे जा असे म्हणू लागले होते. आयुष्यात भेटलेल्या अशा अनेक ऊर्जेच्या स्रोतांचा आपल्या आयुष्यात प्रेरक शक्ती म्हणून उपयोग होऊन पुढे मार्गक्रमण करण्यास उपयोग होतो हे जाणवायला लागले होते.वरतून येणाऱ्या खेचर घोड्यांची वर्दळ प्रचंड वाढली होती. त्या प्रचंड वर्दळीचा मोबाईल मध्ये फोटो काढावा असे वाटले,पण मोबाईल हातात धरून फोटो क्लिक करायला जागा उपलब्ध होत नव्हती. जरी यदा कदाचित फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता, तर मोबाईल त्या गर्दीत कुणाचा तरी धक्का लागून खाली पडण्याची पुरेपूर खात्री होती. खिशातला मोबाईल हातात घ्यायला गेलेला हात पुन्हा हातातल्या काठीवर आला होता.

आता काहीसा सपाट जमिनीचा भूभाग लागला होता.आम्हा सर्वांना खूपच दम लागला होता.मात्र घाम येत नव्हता.घाम येणार तरी कसा..? अतिशय कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती.पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून निघाल्या नंतर पहिल्यांदाच सपाट जमिनीचा भूभाग दिसू लागला होता.समोर खेचर घोड्यांची खूप गर्दी दिसू लागली होती. खेचर घोडे अन् त्यांना सोबत घेऊन ने आण करणारे माणसं यांनी तिथला परिसर फुलून गेला होता.घोडा पडाव नजरेच्या समोर होता. हुश्श..! म्हणून आम्ही काही क्षण तिथं उभे राहिलो. जास्त वेळ तिथं थांबून जमणार नव्हते.नियोजित स्थळी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते.आता दुपारचे दोन वाजून दहा मिनिटे झाली होती.मागील थांब्याच्या  ठिकाणाहून साधारणतः दुपारी पावणे दोन वाजता सुरू केलेला पायी प्रवास घोडा पडाव पर्यंतचा खूपच चढणीचा दुपारच्या दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत अखंड सुरू होता.गौरी कुंड येथून पहाटे पाच वाजता सुरू केलेल्या प्रवासापासून ते घोडा पडाव पर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यात केलेल्या प्रवासांपैकी शेवटचा टप्पा जास्त वेगात पार पडला होता.आम्ही नंदी बेस कँप येथे पोहोचलो होतो.ज्या स्थळी मुक्कामी थांबायचे होते तिथं चौकशी केल्यानंतर आम्हाला आमच्या नियोजित तंबूच्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी पोहोचून दिले. नंदी बेस कँप मधील तंबूत पोहोचल्या बरोबर आम्ही चौघांनी आपापल्या जागा ताब्यात घेतल्या. तिथल्या विभागातर्फे तंबूत एकूण दहा जणांच्या मुक्कामाची सोय होती. कडक स्पंज असलेली गादी अन् अंगावर घ्यायला उबदार वाटणारी, मात्र प्रत्यक्षात प्रचंड थंडगार असलेली पिशवी प्रत्येकाला मिळालेली होती. या अंथरूण पांघरूणाने आपल्याला उब मिळेल यावर माझा विश्वास बसेना.त्याचं कारण असलेली कडाक्याची थंडी अन् अतिशय थंडगार पडलेले अंथरूण पांघरूणाचे कपडे..! रात्र थंडीच्या वैऱ्याची होणार याची जाणीव झाली होती.अंगावर जे घ्यायचे होते,ती एक प्रकारची पिशवीच होती. आपले पाय अगोदर त्यात टाकायचे, मग शरीराचा उर्वरीत भाग हळूहळू त्यात ढकलायचा अन् मग आपल्या चेहऱ्याच्या जवळ येणाऱ्या त्या पिशवीच्या चैनीने पूर्ण डोक्या पर्यंत ती पिशवी बंद करायची.अशी एकंदरीत पांघरुण घेऊन झोपायची सोय झालेली होती. अतिशय थंड प्रदेशात आपल्या भारतीय सैनिकांना या अशाच पांघरूण घेणाऱ्या कपडयांची सोय केलेली असते असे तिथल्या व्यक्तीने सांगितले. आम्ही नंदी बेस कँप मधील तंबूत बरोबर दुपारच्या 2:28 वाजता पोहोचलो होतो. पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेला पायी प्रवास दुपारच्या दोन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत झाला होता. म्हणजेच नऊ तास अठ्ठावीस मिनिटं एवढा एकूण वेळ आम्ही हिमालयातील पर्वत रांगा चढत चढत नंदी बेस कँप पर्यंत आलो होतो. मी माझ्या मोबाईल मधील स्टेप्स counting म्हणजेच आपण किती पावलं चाललो आहोत याची सेटिंग गौरी कुंड येथून निघतानाच सुरु केलेली होती. पाऊल क्रमांक एक पासून सुरू झालेला पायी प्रवास केदारनाथ मंदिर परिसरातील नंदी बेस कँप पर्यंत  33,667  एवढ्या पावलांचा झाला होता. गौरी कुंड ते नंदी बेस कँप पर्यंत एकूण अंतर जवळ जवळ वीस किलोमिटर आहे. नंदी बेस कँप पासून बाबा केदारनाथ मंदिर अजून दोन किलोमिटर अंतरावर होते.

थोरला चिरंजीव नमन याने तंबूत पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या पाठीवर असलेली वजनदार सॅक बॅग पहिली खाली टाकली.आम्हा चौघात सर्वात जास्त त्रास त्याला झाला होता,पण त्याने तो व्यक्त केला नव्हता.आता मात्र त्याने त्याच्या पाठीवरचे ओझे उतरवून तो त्याच्या गादीवर बसला होता. धाकटा चिरंजीव नयन मात्र फारसा थकल्याचे दिसत नव्हता.मी अन् माझी पत्नी मात्र खूप थकलो होतो.मी सर्वांना सांगितले की, " आपण एक  तास आराम करणार आहोत. आराम झाल्यानंतर एक तासानंतर बाबा केदारनाथ महादेवाच्या दर्शनाला जाणारा आहोत.आता पटकन झोपून घ्या..!" माझ्या सांगण्याकडे फारसे कुणीच गांभीर्याने बघत नव्हते.मी सर्वांची मानसिकता ओळखली होती.सर्वांच्या मानसिकतेत मला एकच उत्तर जाणवले होते की, " आता कुठं आम्ही पोहोचलो आहोत अन् यांचं  झालं पुन्हा  सुरू पुढील प्रवासाचे..! " मात्र मला पुढील नियोजित नियोजन सांगणे आवश्यक होते अन् ते मी माझे काम केले होते. त्याचं कारण केदारनाथ मंदिर परिसरातील हवामान कधी बदलेल याचा काहीच नेम नव्हता.त्यामुळं जेंव्हा सुरळीत हवामान मिळेल तेंव्हा बाबा केदारनाथाचे दर्शन घेणे अत्यावश्यक होते. वेळ, परिसर  अन् परिस्थिती  बघून काही निर्णय घ्यावे लागतात याची जाणीव असल्याने माझे कर्तव्य मी केले होते. काही वेळातच दोन्ही मुलं थंडगार असलेल्या उबदार पिशवीत शिरून झोपी गेली होती. खूपच कडाक्याची थंडी पडलेली होती. पहाटे साडे तीन वाजता आम्ही उठलेलो होतो. डोळ्यावर आता झापड यायला लागली होती. कधी डोळा लागला कळलेच नाही.

दुपारी तीन वाजता आम्ही झोपी गेलो.शांत झोप कशाची येते..? खूपच कडाक्याच्या थंडीमुळे अधून मधून जाग येत होती.अखेर दुपारी चार वाजता मी सर्व प्रथम झोपेतून उठलो.क्रमवार इतरांना उठवले. साडे चार वाजता आम्ही नंदी बेस कँप परिसर मधून बाहेर पडलो होतो.बाहेर आल्या बरोबर अतिशय थंडगार वारा अंगाला स्पर्श करून शरीर थिजून टाकू लागला होता.बाहेर आल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतली.थोडेसे कोमट असलेले पाणी संबंधित दुकानदारांकडून खरेदी केले होते.८०₹ ला एक लिटर पाण्याची बाटली होती.त्याच दुकानात आमच्या बाजूला उभा असलेला एक पुरुष संबंधित दुकानदाराशी गरम पाण्याच्या भावावरून हुज्जत घालू लागला होता.त्या दुकानदाराने थेट सोनप्रयागहुन इथपर्यंत अतिशय उंच पहाड चढून विविध वस्तू  आणण्याच्या त्रासाबाबत अन् भाडे बाबत संबंधित वाद घालणाऱ्या व्यक्तीला परिस्थिती समजावून सांगितली होती.तरी देखील तो व्यक्ती वाद घालतच होता.मला त्या वाद घालणाऱ्या व्यक्तीचा खूप राग आला होता. या दुकानदारांना कोणत्या परिस्थितीत, किती खडतर प्रवास करून तेही कुणाच्यातरी किंवा स्वतः च्या अंगाखांद्यावर विविध वस्तू दुकानात विक्री करायला ठेवाव्या लागत होत्या. सोनप्रयाग किंवा उत्तर काशी येथून खूप उंचावर असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरात विविध वस्तू दुकानात विक्रीला ठेवणे  याचा प्रवासाचा खर्च खूप होता.तो खर्च संबंधित दुकानदार काढून घेणारच होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या उंचीवरील भौगोलिक प्रदेशात आपल्याला काही जीवनावश्यक वस्तू मिळत होत्या हे खूप महत्त्वाचे होते. समोरचा दुकानदार कोणत्या परिस्थितीत आपली सेवा करत आहे किंवा आपल्याला सुविधा पुरवत आहे याची जाणीव निदान केदारनाथ यात्रेतील  सर्व प्रवाश्यांनी तरी ठेवायला हवी असे मला वाटते. माझ्या मते केदारनाथ यात्रेला येणाऱ्या सर्वांनी आपलं व्यावहारिक ज्ञान किंवा आपली व्यावहारिक अक्कल मैदानी प्रदेश अन् तिथं सहज उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठाच्या ठिकाणी पाजाळायला हवी..! या इथे अतिशय बिकट भौगोलिक प्रदेशात आपली व्यावहारिक अक्कल गुप गुमान ठेवायला हवी. असा विचार मी माझ्या पत्नीला अन् मुलांना सांगितला अन् आम्ही पुढे केदारनाथ बाबाच्या दर्शनाला संध्याकाळच्या वेळी मार्गस्थ झालो होतो.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ८ ऑक्टोंबर २०२३, रविवार.

क्रमशः


शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

देवभूमी 🕉️ भाग क्रमांक ६





 


मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ६ )

===================================

केदारनाथ घाटी चढताना आता जास्तच प्रमाणात पायात थकवा जाणवायला लागला होता.आम्ही दिनांक २० मे २०२३, शनिवारी पहाटे पाच वाजता गौरी कुंड येथून सुरू केलेली पायी तीर्थयात्रा रामबाडा येथे सकाळी अकरा वाजता पोहोचली होती. तिथून पुन्हा सव्वा अकरा वाजता निघून पुढील प्रवास सुरू केला होता. पायी प्रवासातील भयंकर चढाई अन् त्यात अतिशय थंड हवामान, यामुळं चालताना वेग मंदावला होता. आमचा धाकटा चिरंजीव नयनचे चालणे मात्र त्याच जोशात होते, जे की पहाटे पाच वाजता सुरू केले होते.सकाळच्या सव्वा अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या प्रवासात कमी रुंदीच्या अन् दगडाचे पक्के कच्चे बांधकाम असलेल्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या , घोड्यांच्या धक्क्यांनी आम्ही अधून मधून स्वतः ला वाचवत चाललो होतो.तरी देखील एखादा पायी प्रवासी म्हणा किंवा घोड्यावरील प्रवासी, यांचा धक्का बसतच होता.त्यातल्या त्यात घोड्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या बुटांचा धक्का बसतच होता. पडून गेलेल्या पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावर चिखल झाला होता. तो चिखल मातीचा नव्हता, तर येणाऱ्या जाणाऱ्या घोड्यांच्या विष्ठेमुळे झाला होता.बऱ्याचदा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या घोड्यांच्या पायांच्या दबाई मूळे तो चिखल आमच्या पँटवर, कपड्यांवर उडू लागला होता. अधून मधून त्याच रस्त्यावर तो चिखल एका बाजूला ओढून रस्ता सुरळीत करणारे स्वच्छता कामगार आढळून येत होते.

आता दुपारचे एक वाजले होते.पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या शरीरात थकवा अन् त्यातल्या त्यात घशाला कोरड पडली होती. पाणी पिण्या ऐवजी लस्सी पिऊ असे सर्वानुमते ठरले.पावसाची बुरबुर सुरू झाली होती. नंतर पुन्हा ती बुरबुर बंद झाली. भयंकर थंडी जाणवायला लागली होती.रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये आम्ही थांबलो.अमुल लस्सी पिऊन झाले होते. आराम खूप करावसा वाटत होता,पण अजून ध्येय टप्प्यात आले नव्हते.अमुल लस्सी पिऊन झाल्यावर आम्ही दुपारी सव्वा वाजता पुन्हा केदारनाथ मंदिराच्या दिशेने पायी निघालो.काही अंतर गेल्यावर बर्फाचे खूप मोठे ग्लेशियर रस्त्याच्या बाजूला दिसले.त्याच बर्फाच्या ग्लेशियरचे आच्छादन पार खाली रस्त्यावर आलेले होते. तिथला रस्ता अतिशय निसरडा अन् धोकादायक होता.काठीचा आता खूप मोठा उपयोग होणार होता. त्या परिसरात काही सुरक्षा रक्षक येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना धोक्याची सूचना ,मार्गदर्शन अन् मदत करत होते. आम्ही गौरी कुंड ते इथपर्यंतच्या प्रवासातील सर्वात मोठ्या धोकादायक मार्गावर आलेलो होतो. रस्त्यावर पसरलेल्या त्या बर्फाच्या ग्लेशियरवर दोन मार्ग तयार केलेले होते.एक खालून होता, तर एक मार्ग त्याच्याच बाजूला असलेल्या पण उंचावरून होता.खालच्या बर्फाच्छादित रस्त्यावर घोड्यांच्या खेचरांच्या विष्ठेमूळे चिखल होता तसेच घोडेस्वार, पालखी, पायी प्रवासी यांची खूप गर्दी होती. तर त्याच्याच बाजूला असलेल्या उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावर फक्त आणि फक्त बर्फच बर्फ होता. पायी प्रवासी कमी संख्येने दिसत होते. आम्ही सर्वानुमते उंचावरील बर्फाच्छादित रस्त्यावरून पुढे हळूहळू जाण्याचे ठरवले.सर्वात पुढे थोरला चिरंजीव नमन, त्याच्या मागे धाकटा चिरंजीव नयन, त्याच्या मागे माझी पत्नी अन् सर्वात शेवटी मी असा क्रम चालण्याचा नक्की केला.पावलं हळूहळू टाकत टाकत त्या अतिशय निसरड्या बर्फाच्छादित रस्त्यावरून आम्ही पुढे पुढे चाललो होतो. त्याचं रस्त्यावर काहीजण येणारे जाणारे प्रवासी देखील होते,पण त्यांची संख्या मर्यादित होती.जर यदा कदाचित पायाखालचा बर्फ ठिसूळ निघाला तर आपण हमखास तिथं पडणार याची पुर्णतः जाणीव होती.नुसते पडणार नव्हतो,तर बाजूला असलेल्या खूप खोल दरीत आपला कायमचा मुक्काम होणारा ही भीती मनात होती.एक एक पाऊल टाकत टाकत त्या रस्त्याच्या शेवटी आलो. उतरणीच्या ठिकाणी बसत बसत उतरलो अन् पुढील दगडाच्या रस्त्याने मार्गस्थ झालो.

दुपारचे दीड वाजले होते.आम्ही सर्वानुमते रस्त्याच्या कडेला असलेल्या ओलसर अन् थंडगार दगडी ओट्यावर बसलो. वरतून वय वर्ष नव्वदच्या आसपास असलेली एक वयोवृध्द स्री पायी येताना आम्हाला दिसली.तिच्या सोबत एक प्रौढ वयातील पुरुष अन् स्री होती.ते आमच्याच बाजूला येवून बसले. माझ्या बाजूला येऊन तो प्रौढ वयातील पुरुष अन् ती वयोवृध्द आजी बसली. ती प्रौढ वयातील स्री माझ्या पत्नीच्या अन् मुलांच्या बाजूला येऊन बसली होती. माझ्यातली चौकस वृत्ती जागी झाली. काही वेळ गेल्यावर त्या आजीला मी हिंदीतून विचारले..

" दादी, कहा से आये हो..?"
दादी - " अरे, भैय्या मैं राजस्थान से आई हुं | ये मेरी लडकी हैं और ये मेरे दामादजी हैं | 

मी त्या आजीच्या जावयाकडे पाहून म्हणालो - " हर हर महादेव साब..!" 
त्यांनी प्रत्युत्तर दाखल हर हर महादेव म्हंटले. यानंतर त्या आजीची मुलगी माझ्याशी अन् माझ्या पत्नीशी बोलू लागली..
" हमारी इच्छा थी की, हमारी माताजी को केदारनाथ बाबा के दर्शन करके लावू | आज वो इच्छा पुरी हो गयी | 
मी त्या आजीच्या मुलीस म्हणालो - " आपको भाई नहीं है क्या ?"
आजीची मुलगी म्हणाली - " नहीं, मैं अकेली हूं | हमारे पिताजी बहुत साल पहले गुजर गये हैं | मेरे पती इंजिनियर हैं, और हम राजस्थान के राजसमंद जिले के हैं | अभी हम राजस्थान होकर आये हैं, और साथ में मेरी माँ को लेकर आये हैं | 
मी पुन्हा त्या आजीला विचारले..
" दादी, भोलेनाथ का दर्शन हुआ क्या..? भीड थी क्या..?"
दादी - " अरे, भैय्या पूछो मत, कितनी भीड हैं | बहुत भीड हैं |
मी - " आप दर्शन के लिये कब आये थे ?"
दादी - " हम कल सुबह गौरी कुंड से निकले थे | कल रात को उपर रुके और आज फिर दर्शन कर के निकले हैं |
मी - ' गौरी कुंड से घोडे पर सवार होकर आये होंगे..?"
दादी - " काहे का घोडा..? मैं चलने को थकती नहीं बेटा..! उपर केदारनाथ बाबा के पास पहाड चढकर आने के लिये घोडा, खेचर तुम जैसे जवानो को लगता हैं, मुझे नही !
असे म्हंटल्यावर ती आजी खळखळून हसली. त्या आजीचे मनमोहक हास्य बघून माझ्या मनाला एक प्रकारची नवचेतना मिळाली होती. आपण एखाद्या बालकाच्या, तरुणीच्या किंवा स्री च्या मनमोहक हास्याच्या प्रेमात पडतो. ते हास्य पुरुषाला अजून जगायला प्रेरित करत असते. मात्र मी या वयोवृध्द आजीच्या हास्याच्या प्रेमात पडलो होतो.त्या हास्यात का कुणास ठाऊक मला माझ्या स्व. आईचं खूप मायाळू हास्य जाणवलं होतं. त्या आजीच्या हास्याने पुढील उर्वरीत खूप उंचीच्या चढणीच्या प्रवासाला आम्हा सर्वांना नवसंजीवनी मिळाली होती. जगात आईचं सुमधुर हास्य कोणत्याही लेकराला आयुष्याच्या प्रेमात पडायला मानसिक औषध म्हणून कित्येक पिढ्यानपिढ्या उपयोगी पडत आलेलं आहे हा विचार माझ्या मनात येऊन गेला.माझ्या स्व.आईच्या निधनानंतर असे मायाळू हास्य कधी बघितल्याचे किंवा अनुभवता आलेच नाही .आज पुन्हा एकदा याचं केदारनाथ बाबाच्या, हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेत या आजीच्या रुपात श्रद्धापूर्वक ते प्रेमळ हास्य बघायला मिळाले होते. माझी स्व.आई तर या आजीच्या रूपातून अन् तिच्या सुमधुर मायाळू हास्यातून माझ्या अन् माझ्या कुटुंबियांच्या समोर तर आली नसेल ना..? हा भाबडा पण मायाळू भाव माझ्या मनात आला होता. माणसाचे मन कुठल्या कुठं जाते.पण मनाला आवर पण घालता येत नसतो हेही खरं. मन जे म्हणतं त्यात बऱ्याचदा सत्यता देखील असते यावर माझा तरी ठाम विश्वास होता अन् आहे.

आजीचे बोलणे ऐकून माझ्यातला थोडाफार तारुण्याचा अन् असलेल्या प्रौढ वयातील तब्येतीचा अहंकार तिथल्या तिथंच गळून गेला. माझ्याही पेक्षा माझ्या थोरल्या मुलाचा ऐन तारुण्याचा अहंकार तर कुठल्या कुठं पळून गेला.आम्ही कुटुंबीय एकमेकांकडे बघत होतो अन् आमच्या थकव्याला लपवू बघत होतो, कारण आमच्या बाजूला तारुण्याला लाजवेल असे तारुण्य बसलेले होते अन् ते त्या आजीच्या रुपात होते. केदारनाथ बाबाच्या दर्शनाला तरुण अन् प्रौढ वयातील माणसं घोड्यावर खेचरावर बसून येत जात होती त्यांच्या मुखात सणसणीत चपराक त्या राजस्थानच्या आजीने आपल्या कृतीतून लगावली होती. केदारनाथ पहाडावरील प्रवासातील प्रवासी ज्या घोड्यावर प्रवासी बसून जात येत होते त्या सर्वांकडे मी बघत होतो अन् पुन्हा एकटक त्या कणखर आजीकडे श्रद्धेने बघत होतो. जखमी घोड्यांच्या दिसणाऱ्या अन् न दिसणाऱ्या वेदनांची होणारी आग प्रत्यक्षात त्या मुक्या प्राण्यांना व्यक्त करता येत नव्हती, पण त्या आजीने आपल्यातील दृढ निश्चयाने अन् उत्तम जीवनशैलीने शारीरिक आरोग्य कसे असावे याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत केले होते. त्या सन्माननीय भक्तांचा निरोप घेण्यापूर्वी मी त्यांना विचारले की,
" केदारनाथ बाबा का मंदिर अभी कितना दूर हैं ?"
यावर त्या आजीचा जावई म्हणाला - " अगर बिना रूके चलेंगे तो आधा पाऊण घंटे मे आरामसे पहुचेंगे!"

आता दुपारचे दीड वाजून गेले होते. आम्ही पुन्हा सर्वानुमते ठरवले की, आता कुठेही न थांबता चालत राहायचं. रस्त्याने मार्गस्थ प्रवाशांची गर्दी खूप झाली होती.त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही दगडाच्या ओबड धोबड रस्त्याने बाबा केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो.कोणतेही ध्येय जवळ आले की, मनाचा अन् शरीराचा वेग, वेगवान होतो याची अनुभूती येऊ लागली होती.

वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २९ सप्टेंबर २०२३, शुक्रवार

क्रमशः