शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

" अंतर्मनातील भाषा..! "


 


चिंतन ©️


" अंतर्मनातील भाषा..! "


===============================


आज दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी रात्री रेल्वे  स्टेशन,औरंगाबाद येथे पोहचलो..! आम्ही एखादा गरजवंत दिसतो का..याचा शोध घेत होतो.त्यातील बरेज जन रेल्वे स्टेशन बाहेर झोपलेले आढळले.


इतक्यात एक वयोवृद्ध माणूस थंडीने कुडकुडत बसलेला दिसला.! दोन्ही पाय छातीजवळ आणून अन् डोके त्यात घुसून ते  वयोवृद्ध बाबा बसले होते.आम्ही त्यांच्याजवळ गेलो..अन् त्यांना म्हणालो...

" बाबा,जेवण झाले का..?"

वयोवृद्ध बाबा- " नाही रं भाऊ..दुपारपासून भूक लागली हाय..! काही हाय का..?"

नमन - " बाबा,ही पुरण पोळी,भजे ,कुरडई,भात अन् आमटी घ्या..! गरमच आहे..!"

त्या बाबांनी खूप आनंदाने पटकन उभे राहून जेवणाचे पदार्थ घेतले..!

इतक्यात दुसरा एकजण आला अन् त्यातील काही पदार्थ त्याला दिले.तो मला म्हणाला...

" साहेब, लई उपकार केले तुम्ही..लई भूक लागली व्हती कव्हापासून..!लई टायमावर आले तुम्ही..!"

मी म्हणालो..." भाऊ,मला साहेब नका म्हणू..मला अवघडल्या सारखे वाटते..! 

एवढे बोलून तो दुसरा इसम जेवण घेऊन बाजूला निघून गेला.त्या वयोवृद्ध बाबांना नमन म्हणाला...

" बाबा, थंडीचे काही पांघरायला आहे का..?"

वयोवृद्ध बाबा - " नाही ना रे भाऊ...लई थंडी वाजू राहिली..!

नमन - " बाबा, हे घ्या पांघरायला..!"

वयोवृद्ध बाबा  - " लई उपकार केले भाऊ तू..! कुठले हाय तुम्ही..?कोण हाय तुम्ही..?"

मी- " भाऊ, आम्ही इथलेच आहोत..आणि आम्ही भारतीय आहोत..!"


त्यांनी दोन्ही हात जोडून मनातून खूप खूप धन्यवाद मानले..! मनाची भाषा पटकन समजून जाते..! ती तेंव्हाच समजते जेंव्हा कोणतीही कृती मनातून केल्या जाते..! आम्ही फार काही मोठी महागडी गोष्ट  त्यांना दिली नव्हती..! पण जी दिली होती ती अंतर्मनातून दिली होती.कारण आम्ही निव्वळ मध्यमवर्गीय सर्व सामान्य मराठी कुटुंबातील सर्व सामान्य परिस्थितीतून आलेली माणसं आहोत..!


मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे स्थायिक होतो तो पर्यंत आम्ही आजच्या दिवशी दरवर्षी लासूर स्टेशन येथील सूरज मेडिकल येथील ओट्यावर रात्री मुक्कामी असणाऱ्या निराधार चंदू बाबांना  घरी बनवलेले जेवण नेऊन द्यायचो. तसे प्रत्येक सणाच्या दिवशी द्यायचो,पण दरवर्षी एक जानेवारी रोजी नक्कीच द्यायचो..! आज रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथील या वयोवृद्ध बाबांना दिले अन्  लासूर स्टेशन येथील वयोवृद्ध चंदू बाबांची आठवण आली..! 


लासूर स्टेशन येथील सूरज मेडिकल दुकानाच्या ओट्यावर नेहमी बसणाऱ्या निराधार वयोवृद्ध चंदू बाबांची जी सेवा सूरज मेडिकलचे मालक ,माझ्या तीर्थरूप वडिलांचे मित्र तिर्थस्वरुप चंपालाल काका शेठ कर्णावट व त्यांचे चिरंजीव  यांनी केली त्या बद्दल त्यांना माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून विनम्र वंदन..! तसे त्यांना त्यावेळी मी बऱ्याचदा म्हणत असे. 🙏🏻

 

आमच्या या पोस्टचा मूळ हेतू आत्मप्रसिध्दी हा नसून..आपल्या कुवतीनुसार वंचितांना काहीतरी द्यावे हा स्वच्छ हेतू आहे, हे कृपया सर्व वाचकांनी नम्रपुर्वक समजून घ्यावे ही नम्र अपेक्षा..!🙏


वंदे मातरम्..!


ता.क.: प्रिय मित्र तथा आमचा थोरला चिरंजीव बेटा नमन,

तुला ज.दि.नि.म.पू.शू.! 🌹


शुभेच्छुक - आम्ही कुटुंबीय..!


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १ जानेवारी २०१९

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

" जिव्हाळ्याच्या माणसांचे एकत्रीकरण..! "


 





मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

" जिव्हाळ्याच्या माणसांचे एकत्रीकरण..! "

=============================

लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद..!
पंचक्रोशीतील गावांची व्यापारी पेठ..! मी येथे माझे जन्मगाव पालखेड, ता. वैजापूर येथून इ. स.२००२ मध्ये स्वतः च्या घरात वास्तव्यास आलो. लासूर स्टेशन तसे आमच्या पालखेड पासून साधारणतः १५ किलोमिटर अंतरावर,त्यामुळं पूर्वाश्रमीचा परिचयाचा भाग होता.
 
दिवसामागून दिवस जात होते. इ.स.२०१३-१४ मध्ये याच लासूर स्टेशन येथे एक जेष्ठ व्यक्तिमत्व आपल्या सहचारिणी सोबत वास्तव्यास आले.त्यांच्या सहचारिणी लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या, आणि ते जेष्ठ व्यक्तिमत्व मुंबई महानगर पालिका मधील सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकारी होते. त्यांचं नाव होतं, तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका..! ते मूळचे राहणार डोंबिवली , मुंबई येथील होते.

मी दररोज पहाटे लासुरगाव रस्त्याने फिरायला जायचो, त्याचवेळी तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका देखील यायचे.मी आपला एकटाच मांगीलाल शेठ यांच्या बर्फाच्या कारखान्याच्या ओट्यावर जशा जमेल तशा शारीरिक कसरती करत असायचो. मी तिथून घरी आलो की, माझ्या घराच्या आसपास असणारा कचरा गोळा करायचो अन् त्याची जाळपोळ करत असायचो.अर्थात आसपासची काही माणसं कचरा फेकून द्यायची अन् पुढील उपक्रम मी करत असायचो.काही दिवस निघून गेल्यावर एक दिवस मी सकाळी फिरून घरी आल्यावर, साधारणतः सकाळी ६ वाजता माझ्या घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला.मी दरवाजा उघडला तर बाहेर तेच जेष्ठ व्यक्तिमत्व उभे होते, जे मला दररोज पहाटे दिसायचे. मी लगेच त्यांना म्हणालो ..
" नमस्कार काका...! या ना आत मध्ये..!!"
असं म्हणून काका घरात आले, निवांत बसले. दररोज सकाळी फिरण्याची सवय, कचऱ्याची जाळपोळ इत्यादी विषयी चर्चा झाली अन् काकांनी मुख्य विषय काढला..
" आपण याच लासुरगाव रस्त्यालगत झाडे लावूया, अजुन कुणी तयार झाले तर बरेच आहे,आणि मला खात्री आहे,नक्कीच माणसं उभे राहतील, आपण काम सुरू तर करू..!"
मी लगेच होकार दिला अन् दुसऱ्या दिवशी काकांनी लासूर स्टेशन येथील काही तरुणांना सकाळी सोबत घेतले अन् झांबड शेठ, आदरणीय मोडके सर यांच्या घरापासून झाडे, लावण्यास सुरुवात केली. पहाटे फिरून आल्यावर सकाळी आम्ही खड्डे खणून त्यात झाडे लावू लागलो.दररोज सकाळी साधारणतः ८ वाजेपर्यंत हे काम सुरू असायचे.त्यानंतर माझी शाळेत जायची तयारी करावी लागत असायची,त्यामुळं मी घरी निघून जायचो अन् उर्वरित सदस्य देखील घरी निघून जायचे. हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील सर्व सदस्यांचे निस्वार्थ सेवेने केलेल्या कार्याचं ऋण फक्त निसर्गच उतरवू शकतो,एवढं महान कार्य या सर्व सदस्यांनी केलेलं आहे..! 

एक दिवस आम्ही करत असलेल्या या एकत्रित संघटन कार्याचं नामकरण केलं अन् ते म्हणजे ' हरित क्रांती प्रतिष्ठान - लासूर स्टेशन ' कोणत्याही गोष्टीला नाव मिळालं म्हणजे, ते नाव जपावं लागतं हा अगदी साधा नियम ,त्यामुळं आम्हा सर्व हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील सदस्यांवरील जबाबदारी अजुन वाढली होती. आमचा दररोजचा दैनिक क्रम ठरला होता. मी पहाटे फिरून आल्यावर हरित क्रांती प्रतिष्ठानचे बहुतांशी मित्र स्वतः हून अमक्या अमक्या ठिकाणी येऊन वृक्षरोपण अन् संवर्धन हा उपक्रम सुरू झाला.

लासूर स्टेशन येथे, लासुरगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठी आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान चे सर्व सदस्य झोकून देऊन काम करू लागलो.या कामात कडक कपडे घालून काम होणार नव्हते, कारण बऱ्याच ठिकाणी गटारीचे पाणी होते,काही ठिकाणी डुकरांच्या वसाहती होत्या. या सर्वांवर मात करून तिथं वृक्षारोपणासाठी खड्डे घेऊन त्यांचं संगोपन करावं लागणार होते.पण आमच्यात कुणीही कडक कपडे घातलेला सदस्य नसल्याने आम्ही तेही कार्य दररोज सकाळी यशस्वीपणे पूर्ण केले होते.

काम वाढत चालले होते.झाडांना जी ट्री गार्ड असायची ती बांबूची असायची.आम्ही बांबू , तार अन् हिरव्या रंगाचं जाळीदार कापड विकत आणून आठवड्यातील एक दिवस लासूर स्टेशन येथील माझ्या घराच्या समोरील जागेत ट्री गार्ड स्वतः बनवू लागलो.थोडक्यात माझ्या घराच्या समोरील जागेत आमच्या हरित क्रांती प्रतिष्ठानचा ट्री गार्ड चा डेपोच तयार झाला होता.तयार झालेली ट्री गार्ड त्याच दिवशी किंवा इतर दिवशी झाडांच्या भोवती लावत असायचो.या सर्व कामात तीर्थस्वरुप क्षीरसागर काका नेहमी कृतीतून अन् मार्गदर्शकाच्या भूमिकेत सोबत असायचे. 

दररोज हे काम करत असताना यात सहभागी असणारे आम्ही सर्व मित्र अगदी मराठी भाषेतील सर्व चवींनी युक्त अशा अधून मधून कोपरखळ्या देखील मारायचो.त्यात बऱ्याचदा लोकशाहीर दादा कोंडके आवर्जून असायचे.कोणतेही काम करत असताना त्यात विनोद, हास्य, खेळकरपणा नसेल तर ते कार्य निरस होते.कोणत्याही कार्यात जर विनोद नसेल तर ते कार्य पूर्ण होऊच शकत नाही.मात्र कोणत्याही कार्यात विनोद,हास्य, मजाक करताना आपल्यातील जो चराचर व्यापलेला अहंकार असतो ना त्याला पार दूर कुठेतरी फेकून द्यावे लागते तरच निर्भेळ आनंद मिळतो, नसता उगीचच गैरसमज होऊन मानवी नात्यात दुरावा निर्माण होतो.

काळाच्या ओघात तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांनी लासूर स्टेशन येथील जेष्ठ नागरिकांच एक संघटन उभे केले, " स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ " या ज्येष्ठांच्या बऱ्याच कार्यक्रमात जाण्याचा , व्यक्त होण्याचा योग यायचा.

मागील आठवड्यात तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांनी मला फोन केला अन् सांगीतले की,मी दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी लासुर स्टेशन येथे डोंबिवलीहुन येत आहे,भेटूया पुन्हा..! " मी रजा टाकून नक्कीच येईल काका..!" असं सांगितलं. अखेर काल दिनांक १८/१२/२०२१, शनिवारी लासूर स्टेशन येथे जाण्याचा, सस्नेह भेटीचा योग जुळून आला.स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघातील सर्व जेष्ठ नागरिकांशी आदरयुक्त भेटण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली.या प्रत्येक जेष्ठांमध्ये खूप सारे अनुभवाचे बोल होते, जे की,मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत यांच्या संगतीत राहून घेत राहिलो.लासूर स्टेशन येथे माझे तरुण मित्रांपेक्षा हीच जूनी जाणती माणसं जिवलग मित्र होती..! यांच्याशी होणारा प्रत्येक सत्संग मला माझ्या भावी आयुष्यासाठी संचित धन म्हणून मिळायचा.माझी वैयक्तिक विचारधारा अशी आहे की, भले नवीन तरुण माणसं आधुनिकतेची झुल पांघरून आधुनिकतेच्या बढाया मारत असतील,पण याच नवीन ( तरुण ) माणसांना,आपल्या आयुष्याचा खरा मतितार्थ जर कुणी अगदी मोफत सांगत असतील तर ती हीच जेष्ठ नागरिक आहेत..! भले ती कुठेही असू द्या.

काल भेटीचा अजुन दुग्धशर्करा योग असा की, तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका यांच्या धाकट्या चिरंजीवांचे मागील काही दिवसापूर्वी विवाह झाला होता.त्यानिमित्त उभयतांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा शुभ प्रसंग देखील जुळून आला.कमलाकर काका अन् त्यांच्या कुटुंबीयांनी रुचकर जेवणाचे नियोजन केले होते.मस्तपैकी रुचकर जेवणावर ताव मारत,गप्पांच्या मैफिलीत जिव्हाळ्याच्या माणसांचे एकत्रीकरण झाल्याचा, केल्याचा आत्मिक समाधानाचा भाव मनात घेऊन मी पुन्हा औरंगाबादच्या दिशेने घरी निघालो.तत्पूर्वी जिव्हाळ्याच्या माणसांचा,तीर्थस्वरूप कमलाकर क्षीरसागर काका अन् त्यांचे कुटुंबीय यांचा आयुष्याचा स्वल्पविराम देऊन निरोप घेतला, पुन्हा कधीतरी असेच भेटण्यासाठी..!🌹🙏🏻

लासूर स्टेशन येथील हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत केलेले वृक्षारोपण अन् त्यांचे संवर्धन याचे सर्वात मोठे कृतियुक्त श्रेय जाते ते तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका यांनाच..! लासूर स्टेशन येथे लासूरगाव रस्त्याच्या कडेला जी काही वृक्ष आज वाढ होऊन डोलत आहे, ती सर्व वृक्ष तीर्थस्वरुप कमलाकर क्षीरसागर काका यांना हृदयातून प्रेमपूर्वक धन्यवाद देत असतील..!🌳🙏🏻

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

लेखन दिनांक -१९/१२/२०२१, रविवार

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

"श्रध्येय, रायभान बाबा त्रिभुवन..! "







आमचे गाव आमची माणसं ©️


" श्रध्येय, रायभान बाबा त्रिभुवन..! "


=============================


प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात अशी काही माणसं येऊन जातात, की त्यांच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्याच्या पुढील आयुष्यासाठी सुखकर होऊन जाते. अशा येणाऱ्या माणसांमध्ये कुणी शिक्षक म्हणून येतं,तर कुणी मित्र म्हणून येतं तर कुणी पालक म्हणून येतं..! प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणाऱ्या या सगळ्यांचं येणं भिन्न भिन्न कारणाने असतं, मात्र ही येणारी माणसं त्या विद्यार्थांना आपल्या आयुष्यात खूप काही देऊन जातात.


आमच्या पालखेड गावातील जवळ जवळ दीड तप,म्हणजे जवळ जवळ सतरा अठरा वर्षे कालखंडातील एका पिढीतील ' काहीजण ' आपल्या आयुष्यात शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक इत्यादी अनेक क्षेत्रात यशस्वी झाली. त्यातल्या त्यात शैक्षणिक अर्हता मिळवून या कालखंडातील पिढीला आपल्या आयुष्यात जे स्थैर्य प्राप्त झाले,त्यामागे त्या कालखंडातील पिढीचे पालक, शाळेतील शिक्षक , शाळेतील मित्र इत्यादी नक्कीच कारणीभूत होते यात तिळमात्र शंका नाही. पण या सर्वांच्या वर श्रेष्ठ असणारा एक अढळ ध्रुव तारा होता, ज्यांच्या सानिध्यामुळे आमच्या पालखेड गावातील जवळ जवळ दीड तप कालखंडातील एक पिढी सतत तेजोमय होत राहिली.

 

आमचे ते शिक्षक होते का..?

आमचे ते मित्र होते का..?

आमचे ते पालक होते का..?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही काही विद्यार्थी तरी आजही हमखास देऊ शकतो..!


अढळ ध्रुव ताऱ्या सारख्या महान माणसाचे आमच्या आयुष्यात स्थान हे, शिक्षक, मित्र अन् पालक यांचं अतिशय सुंदर मिश्रण असलेलं नातं होतं . त्या नात्याला आम्ही प्रेमानं अन् अतिशय आदराने नाव दिले होते, आदरणीय रायभान बाबा..! उपाख्य रायभान त्रिभुवन सर..!!


कोण होते स्वर्गीय रायभान बाबा त्रिभुवन..?


आम्हा काही मित्रांसाठी रायभान बाबा त्रिभुवन आयुष्यात भेटलेले सर्वोत्तम शिक्षक होते. त्यांचं अध्यापन करणं , आदरणीय भगत सरांची आठवण करून द्यायचं..! रायभान बाबा त्रिभुवन आमच्या काळात अधिकृत शाळेतील शिक्षक नव्हते,पण शिकवणी वर्गात शिकवत असताना अधिकृत शाळेचं स्मरण, विस्मरणात न्यायला नक्कीच भाग पाडणारं त्यांचं अध्यापन असायचं..! इतकं समरसून अन् आत्मियतेनं अध्यापन करणारं थोर व्यक्तिमत्व लाभले, म्हणून आम्ही मित्र, आपापल्या आयुष्यात शिक्षण घेऊन स्थैर्य प्राप्त करू शकलो हे शाश्वत सत्य आहे.


आदरणीय रायभान बाबा अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. अतिशय गरीब कुटुंबातील माणूस, पण आपल्या विद्वत्तेने आपल्या आयुष्यात विद्वत्तेचा कुबेर असलेला हा महान माणूस कौटुंबिक आयुष्यात आर्थिकदृष्ट्या खूप गरीब होता. आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन आमच्या पालखेड गावात ऐंशीच्या दशकात अन् नव्वदच्या दशकातील काही कालखंडात नसते तर....?


पालखेड मधील जवळ जवळ दीड तप कालखंडाच्या पिढीतील काही तरुण अन् तरुणी शैक्षणिक क्षेत्रात खूप मागे पडली असती. पालखेड गावातील ऐंशीच्या दशकात अन् नव्वदच्या दशकात जी जी तरुण मुलं शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात स्थिर झाली, त्यात आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात यात वंदनीय जी. एम. भगत सरांचे देखील खूप मोठे योगदान नक्कीच होते. विशेष म्हणजे ही दोन्ही महान माणसं, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर परम श्रद्धा बाळगून होते..!🙏🏻


रायभान बाबा त्रिभुवन..!

आमच्या पालखेड गावात ऐंशी अन् नव्वदच्या दशकात एकमेव एकखांबी शिकवणी वर्ग सुरू होता. ते शिकवणी वर्ग सुरू केले होते, आदरणीय रायभान बाबा त्रिभुवन यांनी. रायभान बाबा त्रिभुवन यांना ' बाबा ' हे उपाख्य नामकरण का पडले माहीत नाही. आमच्या अगोदरचे विद्यार्थी मित्र अन् रायभान त्रिभुवन यांचे समवयस्क मित्र त्यांना बाबा म्हणत,म्हणून सगळं गाव त्यांना ' रायभान बाबा ' याच नावाने उल्लेखित करू लागले.


आदरणीय रायभान बाबा अगदी पहाटेच उठून सगळं आवरून शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी तयार असायचे.अफाट बुद्धिमत्तेचा शिक्षक आदरणीय रायभान बाबा होते. पण बऱ्याचदा आपण बघतो जिथं विद्वत्ता असते,तिथं आर्थिक स्थैर्य रुसून विद्वत्तेचा अपमान करत असते. आदरणीय रायभान बाबा आम्हा विद्यार्थ्यांकडून शिकवणी वर्गाचे प्रति माह २०₹ घ्यायचे. काळाच्या ओघात त्यात सत्तर ऐंशी रुपये पर्यंतच वाढ होत गेली. त्यात पण जी मुलं आर्थिक बाबतीत कमकुवत होती, त्यांच्याकडून रायभान बाबा पैसे घेत नसायचे.


आदरणीय रायभान बाबा सकाळी साधारणत: सात वाजता शिकवायला सुरुवात करायचे.शिकविण्यात खूप प्रगल्भता अन् ओघावतेपणा असायचा. त्याकाळी आमच्या पालखेड गावात आदरणीय रायभान बाबा यांचे शिकवणी वर्गाच्या जागा अधून मधून बदलत असायच्या. ज्या ज्या ठिकाणी शिकवणी वर्ग सुरू असायचे ती घरे निव्वळ मातीची असायची. शिकवणी वर्ग प्रामुख्याने माझ्या आजोबांचे मित्र स्व.कारभारी काका देवराव पा. जाधव, गावातील तत्कालीन पिठाची गिरणी दुकानदार आण्णाभाऊ वडाळे,माझा प्रिय बालमित्र आण्णासाहेब म्हस्के या सर्वांच्या घराच्या बाजूला असलेली खोलीत सुरू असायचे. या शिकवणी वर्गाला आमच्या वर्गातील बाहेरगावाहून देखील आमचे मित्र यायचे.त्यात प्रामुख्याने संजय उगले, अशोक उगले दहेगावकर , हंसराज भुजाडे कनकसागज आणि इतर काहीजण. आम्हा सर्व वर्गमित्रांचे ध्येय एकच होते अन् ते म्हणजे शिक्षण..! 


आदरणीय स्व. रायभान बाबा यांनी जे शिक्षण आम्हा विद्यार्थ्यांना दिले, आज त्याचेच फळ आहे की, आम्ही काही वर्गमित्र आपापल्या आयुष्यात शिक्षण घेऊन समाधानी नक्कीच आहोत. 


ज्यावेळी आदरणीय रायभान बाबा यांचं लग्न जमलं त्यावेळी त्यांनी माझ्या तीर्थरूप स्व.वडिलांना लग्नाचे आवर्जून निमंत्रण दिले होते. ते ज्यावेळी निमंत्रण द्यायला घरी आले होते त्यावेळी आमच्या पालखेड येथील तत्कालीन छोट्याश्या घरात आदरणीय रायभान बाबा यांचे स्वतः माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी मनोभावे पूजन करून त्यांना नारळ ,टोपी अन् रुमाल दिला होता. आजही तो प्रसंग माझ्या नजरेत अन् स्मरणात आहे. माझ्या आयुष्यात मी, माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना एकमेव त्याच वेळी गावातील कुणा एखाद्या भावी वर असणाऱ्या तरुणाला स्वतः ओवाळतांना पाहिले होते. माझ्या मते त्याचं एकमेव कारण असावं, आदरणीय रायभान बाबा यांचं गावातील पौगंडावस्थेतील मुलांच्या शिक्षणासाठी झोकून देणे असावे. तसेच अतिशय गरीब परिस्थितीतून माझ्या वडिलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका अंतर्गत स्वतः ला सिद्ध केले होते .हाच सामाजिक जाणिवेचा धागा या दोघांना एकमेकांच्या सन्मानासाठी जवळ करत होता.


 आदरणीय रायभान बाबा यांचं लग्न नव्वदच्या दशकात जि.प.प्रशाला लासुर स्टेशन , ता गंगापूर येथील मुख्य इमारतीच्या पाठीमागील मैदानात होते.मी स्वतः आदरणीय रायभान बाबा यांच्या सोबत एक जवळचा प्रेमळ वऱ्हाडी म्हणून लासूर स्टेशन येथे मुक्कामी गेलो होतो. मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे वास्तव्यास होतो तो पर्यंत अधून मधून माझ्या दोन्ही मुलांना सदरील ठिकाणी घेऊन जायचो अन् आदरणीय रायभान बाबा यांचं माझ्या अन् माझ्या काही मित्रांच्या आयुष्यातील मौल्यवान अस्तित्वा विषयी तिथं निवांत बसून सांगायचो.तिथं झालेल्या आदरणीय रायभान बाबा यांच्या लग्नाच्या आठवणी देखील सांगायचो..! माझ्या दृष्टीने हे सुध्दा एक पर्यटनच असायचे.फक्त या पर्यटनात माझ्या आयुष्यातील एका महान गुरूच्या म्हणजेच आदरणीय रायभान बाबा यांच्या आठवणींचा गहिवर असायचा.


आदरणीय स्व.रायभान बाबा आज हयातीत नाही,पण त्यांनी आम्हा मित्रांना शिक्षणाचे जे बाळकडू दिले आहे, ते संजीवन अमृताचे थेंब होऊन आमच्या हयातीत असे पर्यंत अमरत्व प्राप्त करून राहतील यात तिळमात्र शंका नाहीच..!


नियती ज्यावेळी आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला आपल्यातून कायमचे हिरावून घेते त्यावेळी अशी व्यक्ती निसर्गाच्या सान्निध्यात कुठेतरी कोणत्यातरी अस्तित्वाच्या स्वरूपात नक्कीच असते असे मला वाटते.माझ्या वैयक्तिक आयुष्यातील ज्या ज्या अतिशय मौल्यवान व्यक्तींनी या इहलोकातून कायमचा निरोप घेतला आहे ती मोजकी माणसं, आजही आपल्या आसपासच विविध आठवणीच्या रूपाने सजीव आहेत..!🙏🏻


आदरणीय स्व. रायभान बाबा, तुम्ही जिथं कुठे असाल तिथं तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांची नक्कीच आठवण करत असणार ही खात्री वाटते.


आदरणीय स्व. रायभान बाबा आपणास आम्हा काही वर्गमित्रांकडून नम्रपुर्वक जय भीम..!🙏🏻🌹


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


फोटो स्रोत - डॉ. बाबासाहेब त्रिभुवन


दिनांक - २७/११/२०२१,शनिवार.





शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

" संयमित माणसाचे लक्षण,सीताफळ खाणं..!" 😋

 



चिंतन ©️

"  संयमित माणसाचे लक्षण,सीताफळ खाणं..!" 😋

==============================

खऱ्या संयमी माणसाची ओळख सीताफळ खातानांच होत असते..! कारण, सीताफळ खाणं हे ताप्पड माणसाचं कामच नाही.सीताफळ खाताना सगळं कसं संयमित वर्तन त्यातल्या त्यात तोंडातले संयमित वर्तन ठेवावे लागते तेंव्हा कुठे सुमधुर आनंद प्राप्त होतो..! हेच सीताफळ खाण्याचे काम  ताप्पड माणसाने केलेच, तर एकतर त्याची स्वतः ची चिडचिड होऊ शकते किंवा तोंडाच्या आतील दात अन् जीभ यांच्यात द्वंद्व निर्माण होऊन तोंडातील अपघात होऊ शकतो..!

सीताफळ खाताना   एका एका शत्रूला ( सीताफळाच्या बिया ) शोधून, गरागरा गोलगोल फिरून त्याला खिंडीतून हाकलून द्यावे लागते.एकेका शत्रूला युद्ध भूमीवरून हाकलून दिल्यावर शत्रूने आपल्या सभोवती  गुंडाळलेली मधुर संपदा प्राप्त होते अन् मग तेंव्हा कुठे विजयश्री खेचून आणल्याचा आनंद सोहळा साजरा होतो..!

सगळेच शत्रू  कठीण कवच धारण करून जीभ अन् दात यांच्याशी गरागरा गोलगोल लढाई करणारे नसतात. तर काही शत्रू हे खूपच नम्र असतात. जीभ अन् दात यांच्या समोर सपशेल शरणागती पत्करून स्वतः ला जीभ अन् दाताच्या स्वाधीन करतात..!

ज्याला कुणाला सीताफळ खायचे असेल त्याला खाद्य संस्कृतीच्या विश्वातील सुनील गावस्कर किंवा राहुल द्रविड  व्हावे लागते, तेंव्हाच कुठे संयमित वर्तन ठेवून टुकुक टुकुक एकेका चेंडूला तडकवून विजय मिळतो. सीताफळ खाताना वीरेंद्र सेहवाग होऊन जमत नाही..!

सीताफळाच्या विरुद्ध हे युद्ध वर्षभर सुरू नसते.साधारणत: हिवाळ्याच्या दिवसांत यात रंगत चढते..!आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी परिसरात सीताफळाच्या भरपूर स्पर्धा दरवर्षी विशेष  करून आयोजित केल्या जातात..! निदान मराठवाडा या बाबतीत तरी नशीबवान म्हणावा..! कारण सीताफळाच्या झाडांना नैसर्गिक पाणी मिळाले तरी ते बिचारे गुप गुमाणपणे वाढते अन् खवय्यांची भूक शांत करते..! नशीब, सीताफळ पाणथळ भागातील इतर सुमधुर फळांसाठी, पिकांसाठी आंदोलन करत नाही..!🙏🏻

असो, आता पुरे करतो अन् शिल्लक राहिलेले सीताफळ संयमित वर्तन ठेवून मस्तपैकी खाऊन टाकतो..!😋🙏🏻

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक -२४/१०/२०२१, रविवार



गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

" पहिला शिक्षक मित्र - शाम भाऊ राजपूत "



 



#मला प्रवासात भेटलेली माणसं ©️

" पहिला शिक्षक मित्र - शाम भाऊ राजपूत "

===================================

माझ्या शिक्षकी आयुष्यातील सर्वात पहिला शिक्षक नेता अन् पहिला शिक्षक मित्र प्रिय शाम..! उपाख्य शाम भाऊ..!

 माणसाच्या आयुष्याच्या रंगमंचावर पहिलं आलेलं काहीही असो ते भावूक माणसांच्या आयुष्यात चिरकाल स्मरणात सदैव टवटवीत असते. हा निकष मुर्दाड माणसांच्या बाबतीत लागू पडत नाही. कारण मुर्दाड मनाची माणसं आपल्या आयुष्यातील भेटलेल्या पहिल्या कोणत्याही गोष्टीना सहजपणे विसरून जातात. मात्र जी माणसं आपल्या आयुष्यातील सर्वात पाहिल्या कोणत्याही गोष्टीना खूप आत्मीयतेने लक्षात ठेवतात,हृदयात घर करून ठेवतात तीच माणसं पहिल्या भेटलेल्या प्रत्येक बाबींवर निस्सीम प्रेम करत असतात. जसं की,माझ्या शिक्षकी आयुष्यातील वाटेवर भेटलेला पहिला शिक्षक नेता अन् पहिला शिक्षक मित्र प्रिय शाम भाऊ..! तसे बघितले तर मी शिक्षक म्हणून नोकरीला लागण्यापूर्वी आदरणीय संजय जाधव पाटील उपाख्य बापू हे अगोदर भेटले होते,पण अधिकृत शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर पाहिला शिक्षक नेता मित्र म्हणून लाभला अन् ते म्हणजे प्रिय शाम भाऊ राजपूत..!

मी अन् शाम भाऊ तसे शिव भाऊ..! परसोडा गाव अन् त्या गावातील सर्व शिक्षकांनी माझ्या वडिलांवर खूप खूप प्रेम केलं. नव्हे.. नव्हे या गावातील सर्व शिक्षकांनी माझ्या वडिलांना खूप जीव लावला. तत्कालीन काळातील तीर्थस्वरुप फुलसिंग दादा राजपूत ( शाम भाऊचे वडील) , सुधा बापू धाडबळे, शिवाजी काका धाडबळे सर, रमेश काका धाडबळे सर..! त्यानंतरच्या पिढीत प्रिय राजू भाऊ कवडे सर, शाम भाऊ राजपूत,लक्ष्मीकांत धाडबळे उपाख्य कांतू आबा सर, सुनील धाडबळे सर‌‌..! या सर्वांच्या माझ्या तीर्थरूप वडिलांच्या प्रती असणाऱ्या ऋणानुबंधनातुन त्या नात्यात माझ्या कडून नेहमी आदराने पाहिल्या गेले. वरील उल्लेखित सर्वजणांचे फक्त मायेचं अन् आपुलकीचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही हे शाश्वत सत्य आहे.या सर्वांनी माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांवर निस्सीम प्रेम केले. जे आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात, त्यांच्यावर आपण निस्सीम प्रेम करावं या मताचा मी..!

शाम भाऊ अन् माझी नेमणूक सोबतचीच..! मला ज्या दिवशी शिक्षक पदाचा नेमणूक आदेश आला, त्याच दिवशी माझे स्व.वडील मला म्हणाले होते..
" तू जेंव्हा वैजापूर पंचायत समिती मध्ये जाशील तेव्हा शाम राजपूत नावाचा ,तुझ्याच वयाच्या आसपास असणाऱ्या नवीन नियुक्त शिक्षकाची भेट घे. मी फुलासिंग दादा राजपूत यांच्याशी बोललो आहे..!"
मी " बरं..!" म्हणून जून १९९५ मध्ये वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयात गेलो.तेंव्हा पहिल्यांदा शाम भाऊ राजपूत यांची भेट झाली. शाम भाऊ राजपूत सोबतच लक्ष्मीकांत धाडबळे उपाख्य कांतू आबा देखील होते.त्यावेळी कांतु आबाच्या हाताला काहीतरी जखम झालेली असल्याने पट्टी बांधून हजर व्हायला आलेले होते.आम्हाला साधारणतः सात दिवस दररोज उपस्थिती लावण्यासाठी पंचायत समिती वैजापूर कार्यालयात जावे लागत होते.अखेर आम्हा सर्वांना शिक्षक म्हणून अधिकृत नोकरीचे गाव मिळाले अन् आम्ही आमच्या नोकरीच्या गावी प्रथम नेमणूक आदेश घेऊन हजर झालो.

माझे तीर्थरूप वडिल भिवगाव , ता. वैजापूर येथे कार्यरत असताना बोर नदीला कधी पुर असला की, माझे वडील परसोडा ,ता.वैजापूर येथेच आदरणीय शिवाजी काका धाडबळे सर यांच्या घरी मुक्कामी थांबायचे. हक्काने जीव लावणारे समस्त परसोडाकर शिक्षक माझ्या तीर्थरूप वडिलांच्या आयुष्यात कायम शीर्षस्थानीच राहिले. आदरणीय फुलसिंग दादांचा एक भक्कम आधार होता माझ्या स्व. वडिलांना..!

ज्यादिवशी आदरणीय शिवाजी काका धाडबळे सर स्वर्गवासी झाले त्या दिवशी मी अन् माझे वडील परसोडा येथील शिवाजी काकांच्या शेतात गेलो होतो.ज्या शिक्षक मित्राचे सर्वोच्च स्थान माझ्या वडिलांच्या आयुष्यात होते, त्यांच्या अंत्यसंस्कार स्थळी गेल्यावर माझ्या वडिलांना अतिशय शोक अनावर झाला होता.तिथेच बाजूला शाम भाऊ राजपूत बसलेले होते.माझे वडील शाम भाऊ राजपूत यांच्या खांद्यावर डोके ठेवून खूप रडले होते.मी पहिल्यांदा माझ्या कणखर वडिलांना अश्रू ढाळतांना बघत होतो अन् समोर शाम भाऊ राजपूत माझ्या वडिलांचे सांत्वन करत होते.अश्रू ढाळत असताना विश्वासाने एखाद्याचा खांदा मिळावा लागतो अन् तो विश्वासू खांदा प्रिय शाम भाऊ राजपूत यांच्या रूपाने माझ्या तीर्थरूप वडिलांना त्या ठिकाणी मिळाला होता.मी तेंव्हा विचार केला की, शाम भाऊ राजपूत सारखा माणूस, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून जाणवला होता.

काळाच्या ओघात जेंव्हा जेंव्हा शाम भाऊ राजपूत अन् माझ्या वडिलांची भेट व्हायची तेंव्हा तेंव्हा शाम भाऊ राजपूत कितीही गर्दीत , कामात असू द्या, माझ्या तीर्थरूप वडिलांचे दर्शन घायचेच..! हा संस्कार शाम भाऊंना जाणिवेतून आलेला होता. घरी आल्यावर माझे वडील मोठ्या अभिमानाने सांगायचे..
" फुलसिंग दादांचा पोरगा ,खूप आदर करतो, नेहमी त्याच्या सोबत रहा..!"


शाम भाऊ राजपूत यांनी त्यांच्या शिक्षकी आयुष्यात असे काही निष्ठावान शिक्षक मिळविले, ज्यांची निष्ठा इतर ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात आढळते. हीच शाम भाऊ राजपूत यांची कमाई होती अन् आयुष्यभर राहील. बाकी यापेक्षा दुसरं काही अनमोल असूच शकत नाही अन् त्या श्रीमंतीचे हकदार प्रिय शाम भाऊ राजपूत नक्कीच आहेत.पद, प्रतिष्ठा अन् पैसा माणसाला बऱ्याचदा संकुचित करतो,पण शाम भाऊ राजपूत यांनी त्यांच्या निष्ठावान शिक्षक मित्रांसाठी या बाबी कोसोदुर ठेवल्या आहेत, यातच त्यांचं श्रेष्ठत्व आहे. माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर हा त्या अनेक निष्ठावान शिक्षक मित्रांपैकी एक आहे याचा मला अभिमान वाटतो..!

शाम भाऊ राजपूत यांचं आयुष्याच्या आनंदावर निस्सीम प्रेम आहे.सतत एकाच पठडीत न राहता, स्वतः साठी आवर्जून वेळ काढतात अन् मस्तपैकी आनंदाचे पर्यटन करतात.शाम भाऊ राजपूत यांचा मूळ बाज ग्रामीण असल्याने स्वतच्या गावावर निस्सीम प्रेम करणारा माणूस..!

माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत परसोडा येथेच वैद्यकीय सेवा करत असल्याने बऱ्याचदा तिथल्या कोणत्याही समाजाच्या लग्नाला निमंत्रण नसलेला पण बालमित्राच्या सोबत जाणे व्हायचे.जरी यदा कदाचित मी डॉ.संजय राऊत सोबत एखाद्या लग्नाला नसलो तर, शाम भाऊ राजपूत हमखास विचारायचे...
" डॉक्टर, नंदन का बरं आला नाही..?"
यात हक्काचे अन् निव्वळ मित्राचे नाते जाणवत असायचे.

असो, स्वतच्या कुटुंबावर, मित्रांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मित्राला ,प्रिय शाम भाऊ राजपूत यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

एकच नम्र अपेक्षा व्यक्त करतो, जसे आहात तसेच रहा, मित्रांसाठी..! राहणारच हा विश्वास आहे..!

ता.क. - सदरील छायाचित्रात माझ्या सोबत प्रिय मित्र शाम भाऊ राजपूत अन् माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.संजय राऊत आहेत. निमित्त होते, शाम भाऊ राजपूत यांच्या नातेवाईकाचे लग्न..!

वंदे मातरम्..!

लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक -२३/९/२०२१, गुरुवार.

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

" प्रेमळ गणेशराव देशपांडे सर..! "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..! ©️


" प्रेमळ गणेशराव देशपांडे सर..! "


====================================


माझ्या शिक्षकी पदाच्या कारकिर्दीत लाभलेल्या सर्वोत्तम मित्रांपैकी गणेशराव देशपांडे सर..!


सरांची आज दिनांक १० ऑगस्ट २०१६ रोजी जिल्हाबदली होऊन ते गावाजवळ गेल्याचे समजले,खूप दू:ख झाले.एका अतिषय जीवलग मित्राचा सहवास आता लाभणार नाही.सरांचे आणि माझे कौटूंबिक संबंध होते.मी व देशपांडे सर ज्यावेळेस वैजापूर तालूक्यात,शेजारी-शेजारी गावात सोनवाडी व राहेगाव केंद्र,लासूरगाव,या.वैजापूर येथे नोकरीस होतो तेव्हा बहूतांशी प्रशिक्षणास आम्ही सोबतच असायचो.वैजापूरहून येतांना हमखास पालखेडला जायचो.माझी स्वर्गवासी आई रूचकर स्वयंपाक करायची.सरांना माझ्या आईने केलेला स्वयंपाक खूप आवडायचा.


माझी किंवा सरांची कोणतीही अडचण असो आम्ही सतत एकमेकांना सहकार्य करत होतो.मला आजही चांगले स्मरणात आहे,३१ मार्च २००३रोजी मध्यरात्री माझा थोरला मूलगा चि.नमनला तो दिड वर्षाचा असतांना तापेत झटका आला होता.मी व देशपांडे सर लासूर स्टेशन येथे शेजारी राहत होतो.एवढ्या रात्री देशपांडे सर अन् मी शेजारील लासुरगावात जाऊन इंगळे भाऊ यांची जीप घेऊन आलो होतो. देशपांडे सर देखील मध्यरात्री आमच्या सोबत औरंगाबादला आले होते. डॉ. खनाळे हॉस्पिटल औरंगाबाद येथे आम्हाला पोहोचवून सर, रात्री पुन्हा घरी परत गेले होते. पुन्हा दूस-या दिवशी देखील आले होते..! खरच सर, ते तूमचे आपलेपणाचे वागणे माझ्या मनाला खूपच भावले अन् कायमचे अढळ स्थान प्राप्त करून गेले..!देशपांडे सर लासूर स्टेशन येथे संध्याकाळी माझ्या घराकडे फिरायला यायचे तेव्हा भानवाडी रेल्वे गेट जवळ बसून आम्ही दोघेच तासन तास गप्पांच्या विश्वात रमून जायचो..!


मागील काही महिण्यांपासून देशपांडे सर लासूर स्टेशन येथे त्यांच्या घरी एकटेच राहत होते.मी रात्री त्यांच्या घरी जात असे.त्या वेळी सर,वेगवेगळी गाणी ऐकवत असे.सरांनाही अद्रकचा कडक चहा प्यावासा वाटला तर सर,हक्काने माझ्या घरी यायचे.इतकी हक्काने त्रास देणारी मैत्री आमच्यात निर्माण झाली होती.अर्थात ती मैत्री जीवंत असे पर्यंत असणारच..परंतू त्यात सहवास नसणार..!


देशपांडे सरांचा स्वभाव म्हणजे अजातशत्रू..! मी कधीच सरांना कोणासोबत भांडतांना पाहिले नाही.सिधा-साधा स्वभाव..चटकन् कूणावरही विश्वास ठेवणारा माणूस...!देशपांडे सर, तूम्ही गावाकडे गेलात याचे मला दू:ख आहे परंतू तूमच्या कौटूंबिक जबाबदारीच्या हेतूने हा निर्णय योग्य आहे.फक्त एक ठामपणे सांगतो की,तूमच्या सारखा मित्र होणे नाही..आठवण काढत जा...आणि हो...भविष्यात कौटूंबिक सूख,दू:खच्या वेळी अवश्य हाक द्या...!


मी जि.प.प्रा.शा. सोनवाडी, केंद्र - लासुरगाव, ता. वैजापूर येथे कार्यरत होतो, अन् ढेकु नदीच्या पलीकडे राहेगाव येथे गणेशराव देशपांडे सर कार्यरत होते. दोन्ही गावांचे अंतर साधारणतः अर्धा किलोमीटर आहे. एकदा बऱ्यापैकी विनोद झाला होता. पावसाळ्याचे दिवस होते.आमची दुपारी केंद्र स्तरावर बैठक होती. ढेकू नदीला कमरे इतके पाणी आलेले होते.देशपांडे सरांनी त्यांची दुचाकी आमच्या शाळेत लावली अन् पायी चालत नदीच्या पाण्यातून जाऊन त्यांच्या शाळेत गेले.पुन्हा थोड्या वेळाने आमच्या शाळेत आले ,तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत किर्द त्यांच्याच शाळेत राहून गेली.पुन्हा सर, नदीतून चालत जाऊन किर्द घेऊन आले.आता त्यांच्या दुचाकीची चावी त्यांच्याच शाळेत राहून गेली होती. शेवटी सरांनी ती चावी वसंत राऊत सरांना आणायला सांगितली अन् माझ्या दुचाकीवर आम्ही पुढील बैठकीसाठी केंद्रीय शाळेत गेलो होतो. कामाच्या तणावात माझ्यासह बऱ्याच जणांना असा विसरण्याचा अनुभव येत असतो, जो गणेशराव देशपांडे सरांना आला होता.


काही काळानंतर गणेशराव देशपांडे सरांची बदली माझी जन्मभूमी पालखेड येथे झाली होती.देशपांडे सरांचा स्वभाव अजातशत्रू अन् अगदी सिधा साधा..! माझा प्रिय बालमित्र शेख फारुख बागवान हा त्यावेळी पालखेड केंद्रातच कार्यरत होता.मी देशपांडे सरांच्या पश्चात माझा बालमित्र शेख फारुख सर याला, देशपांडे सरांच्या निर्मळ स्वभावाची पूर्ण कल्पना दिली अन् त्यांना पुरेपूर मदत करण्याचे आग्रहाने सांगितले होते. जो पर्यंत देशपांडे सर माझी जन्मभूमी पालखेड येथे कार्यरत होते तो पर्यंत माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याने मी अपेक्षा केल्या पेक्षाही खूप जास्त प्रमाणात गणेशराव देशपांडे सरांना सहकार्य केले होते.विशेष म्हणजे माझा प्रिय बालमित्र शेख फारुख सर याचे वडील तीर्थस्वरुप शेख गौस चाचा यांनी अगदी स्वतच्या लेकरासारखे देशपांडे सरांना जीव लावला होता.मी अधून मधून पालखेड येथे जायचो त्या त्या वेळी शेख फारुख याच्या घरी मायेची भेट घेण्यासाठी हमखास जायचो. शेख फारुख सर याच्या कुटुंबाचे आमच्या कुटुंबावर थेट आमच्या आजोबांच्या काळापासून सौख्य असल्याने मी, ती निव्वळ मायेची अन् ऋणानुबंधाची परंपरा टिकवून ठेवून होतो. गेल्या गेल्या शेख फारुख याचे वडील मला म्हणायचे..

" जाधव, तू टेन्शन मत ले, देशपांडे हमारा बच्चा है..! गाव मे मेहफुज है वो..!!"

हे ऐकल्यावर समाधान वाटायचे.सरकारी नोकरी करताना आपल्या गावातून माझ्या जिवलग मित्राला, देशपांडे सरांना जे सहकार्य प्रिय बालमित्र शेख फारुख सर अन् त्याच्या कुटुंबाकडून मिळाले ते देशपांडे सरांच्या अन् माझ्याही चिरकाल स्मरणात नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही..!


शेवटी राहवत नाही म्हणून म्हणतो की, देशपांडे सरांच्या गायनशैलीला योग्य व्यासपीठ मिळाले नाही.जर ते योग्य व्यासपीठ मिळाले असते तर देशपांडे सरांची गायन क्षेत्रात उत्तूंग भरारी उंच गेली असती, एवढा सरांचा स्वर मंजुळ आहे..!


असो,आपल्या मित्रत्वाच्या सहजीवनात माझ्याकडून कळत-नकळत तूमच्या भावविश्वास ठेच पोहचली असेल तर मनोभावे क्षमा करावी..! 🙏🏻

                                             

वंदे मातरम्.!


तूमचा जीवलग मित्र:नंदन विष्णूपंत जाधव पालखेडवाले, ह.मु. लासूर स्टेशन, ता. गंगापूर


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १० ऑगस्ट २०१६

स्थळ: आमचं घर - लासूर स्टेशन.

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

" आनंदाचा स्रोत, आदरणीय भावराव पाटील शेळके..!"


 

आमचे गाव, आमची माणसं


" आनंदाचा स्रोत, आदरणीय भावराव पाटील शेळके..!"


====================================


माणसाचं आयुष्य सतत या ना त्या कारणाने नैराश्यात सापडलेले असते.कधी हे नैराश्य स्वनिर्मित असते तर कधी हेच नैराश्य अवतीभोवतीच्या मानवी घटकांच्या विकृत वागण्याने आलेले असते. अशा भिन्न भिन्न प्रकारच्या मानवी नैराश्याच्या पेकटात लाथ मारून स्वतच्या आसपास देखील अजिबात येऊ न देणारी माणसं हल्लीच्या जगात अतिशय अल्पसंख्यांक होत चालली आहेत..! अशी माणसं अखंड आनंदाचा स्रोत असतात.अशी माणसं सदाबहार या मानवी स्वभावाच्या वर्तनात येत असतात. अशी अतिशय दुर्मिळ मानवी स्वभावाच्या वर्तनाची माणसं ज्याच्या सानिध्यात आली, त्याने बरेचसे मानवी मनोरुग्णाच्या आजारांना नक्कीच पळवून लावलेले असते..!


वरील उल्लेखित सदाबहार मानवी वर्तनाचे अन् आपल्या सदैव आनंदी स्वभावाचे अगदी चपखल उदाहरण आमच्या पालखेड गावात आहे,अन् त्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे आदरणीय भावराव पाटील शेळके..!


जसजशी माणसाने विज्ञानाच्या मदतीने प्रगती केली किंवा आधुनिकतेचे फॅड बोकाळले तसतसे कित्येक माणसांच्या मनाच्या व्यथा वाढतच गेल्या. अशा कित्येक मनोरुग्णांना, उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एखाद्या डॉ. मनोविकारतज्ज्ञांकडे जाऊन स्वतच्या मनाची तपासणी करून घ्यावी लागते..!   या अशा अनेक मानवी व्यथांवर अन् मनोरुग्णांवर  प्रेमळ अन् सदाबहार औषध आमच्या पालखेड गावात आहे अन् ते  म्हणजे आदरणीय भावराव पाटील शेळके..! 


मी लहानचा मोठा वयाने झालो,पण अद्याप पर्यंत तरी आदरणीय भावराव पाटील शेळके यांना कधीही नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसांच्या मानवी मनाचे प्रतिनिधित्व करताना पाहिलेले नाही..! हे मत फक्त वैयक्तिक माझेच नसून आमच्या पालखेड गावातील ज्यांनी ज्यांनी आदरणीय भावराव पाटील शेळके यांचं सानिध्य मिळविलेले आहे त्या सर्वांचं असणारच त्यात तिळमात्र शंका नाही..!


आदरणीय भावराव पाटील शेळके सध्या शरीराच्या वयाने थकले आहेत,पण त्यांचं मनाचं वय आजही शंभर देवनंदाच्या मनानांही लाजवेल असे चिरतरुण आहे. आदरणीय भावराव पाटील शेळके यांना मी किंवा माझ्या समकाळातील कुणी एखादा तरुण भेटला अन् त्या भेटीत सर्व चवींची बरसात झाली नाही, असे कधीही होणारच नाही..! अशी ही माणसं, निख्खळ  आयुष्यावर प्रेम करणारी असल्याने यांनाच मानवी आयुष्याचा खरा अर्थ समजलेला आहे असे वाटते.  आयुष्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या अतिषयी मोजक्या माणसांचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय भावराव पाटील शेळके  यांच्या रूपाने  ग्रेट व्यक्तिमत्व आमच्या पालखेड गावात आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो..!🙏🏻


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्याशी संवादात.. आचार्य अत्रे यांचे मार्मिक शालजोडे सापडतील..! लोकशाहीर दादा कोंडके यांच्या संवादाची झलक पाहायला मिळेल..! थोर लेखक शंकर पाटील यांची जी तळमळ ग्रामीण जीवनाविषयी होती ती पाहायला मिळेल..! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुश्राव्य भजनांची सुरेल मैफिल ऐकायला मिळेल..! एखाद्याच्या वर्तनावर परखड पण चपखल बसणारे भाष्य ऐकायला मिळेल..! एवढेच नव्हे तर आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचे भाष्य देखील ऐकायला मिळेल..! वास्तविक आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी वरील उल्लेखित साहित्यिकांचे ,विचारवंतांचे विचार ऐकलेले ,वाचलेले नाही,पण उपजत समयसूचकता अन् गुण असल्याने सहज सोप्या शब्दात भाष्य करण्याची त्यांची शैली निव्वळ अप्रतिम आहे..!


आमच्या पालखेड गावात मी तिथे वास्तव्यास होतो तेंव्हा तीन भजनी मंडळे होती.श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ अन् ब्रम्हानंदी भजनी मंडळ..! या तिन्ही भजनी मंडळाच्या कळत नकळतपणे आपापसात स्पर्धा असायच्या..! कोण किती सुश्राव्यपणे भजने गातो या बाबतीत प्रत्यक्षात नाही,पण अप्रत्यक्षपणे ही स्पर्धा असायची.या तिन्ही भजनी मंडळांपैकी श्री.पारेश्वर भजनी मंडळ, श्री.रोकडीया हनुमान भजनी मंडळ वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून विविध संतांच्या अभंग रचना शास्त्रीय पद्धतीने गायन करत असायचे.पण ब्रम्हानंदी भजनी मंडळ यांचे गायन अन् अभंग रचना प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध गीतांवर आधारित असायच्या. जे मित्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध प्रकारच्या गीतांच्या चाली ऐकून असतील त्यांना लक्षात आले असेलच की, एका विशिष्ट ठेक्यावर अन् उंच स्वरात त्या गीतांचे गायन करावे लागते. आमच्या पालखेड गावातील ब्रम्हानंदी भजनी मंडळाची धुरा प्रामुख्याने सांभाळली होती ती ,आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी..! उंच आवाजात अन् सुश्राव्य चालीत विविध ब्रम्हानंदी भजने गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! मी स्वतः या भजनांचा निस्सीम चाहता होतो ,आहे अन् राहील.गावात जेंव्हा ब्रम्हानंदी भजनी मंडळाची कुणाच्या घरी भजने असायची तेंव्हा त्याचा रसास्वाद कधी मधी एक श्रवणीय प्रेक्षक म्हणून घेतला आहे. या भजनांची एक पद्धत आहे,ती अशी की, जेंव्हा एखादी अभंग रचना संपली की, मध्येच एक चारोळी पद्धतीची एक सुश्राव्य चालीत रचना उंच स्वरात गायिल्या जायची..! पूर्णपणे नीट आठवत नाही पण त्यापैकी काही शब्द पुढीलपैकी असायचे..


"बोलो भाई, माता पिता की जय,

बोलो भाई सब संतन की जय,

सियावर रामचंद्र की जय..!"


आणि वरील उंच स्वरातील रचना गावी ती आदरणीय भावराव पाटील शेळके यांनीच..! पहाडी आवाजात अन् सुश्राव्य चालीत ऐकण्याची मज्जाच वेगळी असायची..!


माझ्या तीर्थरूप आईचा स्वर्गवास झाल्यावर तेरावा विधी झाल्यानंतरच्या रात्री आम्ही आमच्या पालखेड येथील घरी ब्रम्हानंदी भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते.त्यावेळी आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी गायिलेले विविध भजने ऐकण्याची शेवटची संधी मला मिळाली होती..! जवळ जवळ पहाटेच्या चार वाजेपर्यंत भजने सुरू होती अन् त्या भजनांचे मुख्य आधारस्तंभ होते, आदरणीय भावराव पाटील शेळके..!


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या विषयीची एक आठवण माझ्या हृदयात कायमची कोरल्या गेलेली आहे ,ती पुढीप्रमाणे..


मी त्यावेळी नोकरीला लागलेलो नव्हतो. साधारणतः जानेवारी १९९५ च्या आसपासचा प्रसंग आहे. मी आमच्या पालखेड गावातील एका केश कर्तन दुकानात डोक्याची कटिंग करायला गेलो होतो. कटिंग करायला त्या दुकानात खुर्चीवर बसलो, इतक्यात गावातील एक व्यक्तीने उंच स्वरात संवाद करत  मला खुर्चीवरून उठवले कारण त्या व्यक्तीला अगोदर कटिंग करायची होती. मीही कोणताही आढावेढा न करता खुर्चीवरून उठलो होतो.मात्र दुकानाच्या बाहेर उभे असलेले आदरणीय भावराव पाटील शेळके यांना ही गोष्ट आवडली नाही.ते दुकानात आले अन् मला म्हणाले..

" तू, खुर्चीवरून कम्हून उठला..? तुझा नंबर आहे तूच बस..! तुला कोण उठून देतो ते मी पाहतो..!"

आदरणीय भावराव पाटील शेळके यांनी असे म्हंटल्यावर खुर्चीवर बसलेली व्यक्ती निमूटपणे उठली अन् मी त्याच खुर्चीवर बसलो अन् माझी कटिंग करून घेतली होती. हा प्रसंग काहींच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, पण माझ्या मते असेच इतर विषयाशी निगडीत प्रसंग अन् याच अशा प्रसंगात कळत नकळतपणे उभी राहणारी माणसं, , माझ्या सारख्या स्वयंघोषित अजातशत्रू माणसांच्या हृदयात  कायमचे सन्मानाचे अढळ स्थान मिळवून  असतात. मला खुर्चीवरून उठवून देणारी व्यक्ती सध्या हयात नाही, पण मला पुन्हा स्थान मिळवून देणारे आदरणीय भावराव पाटील शेळके अगदी ठणठणीत आहे..! मी भविष्यात पालखेड गावात कदाचित स्थायिक होणारही नाही, पण आदरणीय भावराव पाटील शेळके यांचा वडिलकीच्या प्रेमळ, मायाळू अन् वयाने ज्येष्ठ असूनही नेहमी मित्रत्वाचे नाते जपणाऱ्या आठवणींचा सहवास कायमचा माझ्या हृदयात असेल ,अगदी सन्मानाने..!🙏🏻


आदरणीय भावराव पाटील शेळके यांच्या सारख्या आनंदी वृत्तीच्या अन् चहुमुखी व्यक्तीच्या आयुष्यभर  प्रेमात राहावं असं  हे ,ग्रेट व्यक्तिमत्व आहे..!माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आदरणीय भावराव पाटील शेळके यांना त्रिवार वंदन..!

🙏🏻🙏🏻🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ८ ऑगस्ट २०२१, रविवार.

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"



चिंतन


" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"


===================================


दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी अमावस्या असा काही सण,उत्सव आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!

 

गटारी अमावस्या हे नामकरण धूम्रपान करणाऱ्या काही लोकांनी केले आहे...! दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची) म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏


कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...! वेळी च सावध व्हा.. उद्या धूम्रपान करणारे अन् न करणारे देखील काही विकृत माणसं म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!


तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏


तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..!


त्या पिणाऱ्यांच्या दारू पिण्याविषयी काहीही हरकत नाही..! तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, फक्त गटारी अमावस्या हे नामकरण योग्य नाही हाच मुख्य मुद्दा आहे. 


अंधारावर विजय मिळविणा-या प्रकाशाचे पूजन..दिप अमावस्या या नावाने ओळखले जाते..! आषाढातील अमावास्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते..! जे दिवे आपल्या आयुष्यात प्रेरणेचा उजेड देतात,त्याच दिव्यांचे स्वच्छ धुवून पुसून पूजन करण्याचा आजचा पवित्र उत्सव..! 


दिव्यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात ऋण असते..! हा तोच दिवा असतो, जो प्रकाश देताना जात,पंथ धर्म इ.विविध प्रकारचा भेदभाव अजिबात करत नाही..! दिव्यांच्या प्रकाशाने सर्वजण उजळून निघतात..! त्याच दिव्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा पवित्र उत्सव... आषाढ अमावस्या दिपपूजा...!


आम्ही पालखेडला असतांना बालपणी श्री.पारेश्वर महादेव मंदिर,संत जनार्दन स्वामी आश्रमात दिपप्रज्वलन करून दिप-पूजन करायचो..! माझी स्व.आई , दरवर्षी,घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची,नंतर चौरंग, किंवा पाटावर सर्व दिवे मांडून त्यांचे पूजन करायची..! त्या निमित्ताने स्व.आईची आज, खूप आठवण आली..! आईच्या स्वर्गवासानंतर आमच्या कुटुंबात ही जबाबदारी अर्थातच माझ्या धर्मपत्नीने सांभाळली आहे..!


ता.क.: जुनाट सवयी एकदम बदलत नसतात,थोडा दम मारावा लागतो..!☺


वंदे मातरम्...!!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ जूलै २०१७
 

गुरुवार, २९ जुलै, २०२१

" सांत्वनपर गृहभेट - नागपूर ...! "


 


मला प्रवासात भेटलेली माणसं..!


" सांत्वनपर गृहभेट ...! "


=====================================


" आई, तू स्वतः ला एकटी समजू नकोस..!आम्ही ही तुझी मुलं तुझ्या सोबत आहोत..!"


असं म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या आईला मायेनं जवळ केलं होतं..!


 दिनांक २९ जुलै २०१८ रोजी सांत्वनपर गृहभेटीचे निमित्त होते आमचा प्रिय मित्र,वर्गमित्र मनोहर दशरथ गावडे याचे स्वर्गीय वडील, दशरथ काका गावडे यांच्या नागपूर येथील मूळ घरी निधनानंतर त्यांच्या घरी भेट देण्याचे..! काकांचे वृध्दापकाळात येणाऱ्या आजाराने निधन झाले..अन् आमच्या मित्रावर, त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली..!


आपली भारतीय संस्कृती हेच शिकविते की,कुणाच्या शोकावस्थेत जर आपला भावनिक आधार दिला गेला तर तो आधार, आयुष्याला पुन्हा उभे राहायला बळकटी देऊन जातो..! 


आम्ही मनूच्या घरी दिनांक २९ जुलै २०१८ रोजी संध्याकाळी पोहचल्या..पोहचल्या , मनु ची आई, दुखाश्रू ढाळत आमच्या जवळ येऊन बसली..!माऊलीचा ,आयुष्याचा जोडीदार गेल्यामुळे ती खूप भावूक झाली..अन् आपल्या भावनांना वाट करून दिली आमच्याजवळ..!मला राहवले नाही.मी लगेच माऊली जवळ जाऊन बसलो,आईच्या पाठीवर हात ठेवला.आमच्या सर्व मित्रांच्या एकच भावना होत्या.....


" अगं, आई..तू स्वतः ला एकटी समजू नकोस! आम्ही ही तुझी मुलं तुझ्या सोबत आहोत..!"


खूप हायसं वाटलं माऊलीला..! आई,शेवटी म्हणाली..

" पोरांनो,लई लांबून आलात रे..! " माझ्या मनूच्या प्रेमाखातर आला..! आई,शोकमग्न झाली होती..! मी पुन्हा..पुन्हा आईच्या पाठीवर हात ठेवून तिच्या मुलाचा भावनिक आधार तिला देऊ पाहत होतो..! माझ्या सोबत आलेले आम्ही सर्व मनु चे जिवलग मित्र,सचिन अजमेरा,विनोद पाटील,सुभाष ठेंगडे पा. व संजय होळकर पा. ही सर्व आईला प्रत्येक क्षणाला भावनिक आधार देत होती..!


शेवटी मी एकांतात विचार करू लागलो की, माणसाच्या आयुष्यात सत्ता, संपत्ती,पद प्रतिष्ठा पेक्षा भावना खूप काही देऊन जाते.ज्याचे मोल कशातच नसते.आम्ही केवळ आमच्या प्रिय मित्राच्या भावनिक नात्यापोटी,त्या माऊलीच्या ,आमच्या प्रती असणाऱ्या भावनिक ओढी पोटी इतक्या दुरहून..थेट औरंगाबादहून ...इथं नागपूर ला आलो होतो..! ही त्या निस्सीम भावनेची तर किमया होती..! काहिंकडे खूप काही असते..पण..भावनाशून्य जगून अशी माणसं सजीवातील मुर्दाड निर्जीवा सारखी आयुष्य जगत असतात..!


आमच्या प्रिय मित्राच्या मनोहरच्या हृदयात असलेल्या भावनेशी,आईच्या हृदयात असलेल्या भावनेशी...आमच्या भावनेची ही झालेली " सांत्वनपर गृहभेट " खूप काही देऊन गेली..! 

वंदे मातरम्..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


सांत्वनपर गृहभेट दिनांक: २९ जूलै २०१८

स्थळ: नागपूर ( विदर्भ )

शनिवार, २४ जुलै, २०२१

" गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |



चिंतन


" गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |


=============================


जेंव्हा जेंव्हा माझ्या दाढीतील दिसणारा एक एक पांढरा केस, मला माझ्यातील ययाति ची आठवण करून देतो,

तेंव्हा तेंव्हा मी प्रौढ होत जातो |


तो पांढरा केस, कित्येक गुलाबी आठवणींना धूसर करतो,

त्याच्याकडे पाहून जीव कासावीस होऊन जातो |


गतकाळातील दाढीतील काळ्याभोर केसांच्या रम्य आठवणी जाग्या होऊन जातात,

त्याच केसांच्या प्रेमळ आठवणीत आजचे पांढरे केस सुखावून जातात |


ऐन तारुण्यात याच दाढीत हजारो केस, निव्वळ होते काळे,

आता त्या आठवणींना उराशी बाळगून मी आजच्या पांढऱ्या केसांना रोज कुरवाळे |


काळे केस, तारुण्य प्रदर्शित करतात,

तर..

पांढरे केस, आपल्यातील प्रौढत्वाची जाणीव करून देतात |


केस तेच असतात, फक्त त्यांचे रंग बदलतात ,

त्याचं रंगांच्या अर्थाची परिभाषाचे भाव देखील आपल्याला खूप काही जाणीव करून देतात |


माणसांच्या वर्णात, पांढऱ्यांना असतो मान,

केसांच्या विश्वात काळ्यांचा होत असतो सन्मान,

माणसाच्या अशा कित्येक विकृतींनी माणुसकी शरमेने खाली घालते आपली मान |


गेले ते काळे केस, राहिल्या त्यांच्या काळया आठवणी |

आता आयुष्य याच पांढऱ्यांच्या सोबत पडत आहे अंगवळणी !


ता.क. - मी काही पट्टीचा कवी नाही, पण वरील कविता जशी जमेल तशी लिहिली आहे अन् आत्ताच पोस्ट करत आहे, काळया पांढऱ्या रंगाची दाढी असणाऱ्या रसिक मायबापांच्या चरणी..! 😊🙏🏻


वंदे मातरम्..!


एक तात्पुरता कवी - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील कविता कॉपीराइट केलेली असून या कवितेचे संपूर्ण हक्क याच कवीकडे आहेत.)


दिनांक - २५/७/२०२१, रविवार
 

गुरुवार, २२ जुलै, २०२१

" मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!"


 


आमचे गाव, आमची माणसं..!


" मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!"


=============================


इ. स.१९८७,


स्थळ : पालखेड येथील स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांचे गावातल्या रसिकांनी खचाखच भरलेले घरगुती व्हिडिओ थिएटर,


तिकीट दर : २ ₹ ,


चित्रपट : प्यासा सावन,


गीताचे बोल : " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...


आमच्या पालखेड गावात त्याकाळी करमणुकीचे साधन स्व.तीर्थस्वरूप दौलत काका कुमावत यांचे गावातल्या रसिकांनी खचाखच भरलेले घरगुती व्हिडिओ थिएटर होते.सदरील व्हिडिओ थिएटर साधारणतः पंधरा बाय वीस आकाराच्या खोलीत होते.दररोज संध्याकाळी वैजापूर येथून व्हिडिओ कॅसेट यायची. कॅसेट आल्यावर आम्ही काही अती रसिक मित्र, व्हिडिओ थिएटर बाहेरील फळ्यावर कोणत्या चित्रपटाचे नाव लिहितात याची आतुरतेने वाट पहायचो.आपल्या आवडीच्या नटाचे किंवा नटीचे चित्रपट असले की, संध्याकाळी ६ ते रात्री ९ चा शो पाहण्यासाठी उतावीळ होऊन जायचो..! मोबाईल, टिव्ही सारखी घरगुती करमणुकीची साधने नसल्याने व्हिडिओ थिएटर हेच आम्हा रसिकांचे मनोरंजन स्थळ असायचे..!


मग प्राथमिक शाळेत होतो. तेंव्हा इतर काही करमणुकीची साधने नसल्याने दौलत काका कुमावत यांचे व्हिडिओ थिएटर सर्व रसिक मित्रांसाठी आवडीचे ठिकाण असायचे.मला चांगले आठवते, ज्यादिवशी प्यासा सावन हा हिंदी चित्रपट स्व.दौलत काका कुमावत यांच्या व्हिडिओ थिएटर मध्ये लागला होता त्यावेळी याच खोलीत हाच चित्रपट पाहण्यासाठी तत्कालीन सरपंच आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर ( हल्ली मुक्काम वैजापूर ) माझ्याच बाजूला बसलेले होते.माझे वय ऐंशीच्या कालखंडातील प्राथमिक शाळेतील असल्याने त्याकाळी प्यासा सावन चित्रपट अन् त्याची कथा त्यातील अर्थ लक्षात येत नव्हता.पण माझ्या बाजूला बसलेले आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर हा चित्रपट पाहताना अधून मधून कौतुकाचे शब्द व्यक्त करायचे..! विशेषतः " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" या गीताच्या वेळी तर या जेष्ठ रसिकांच्या आनंदाला उधाण यायचे..!


माझे किंवा माझ्या समकालीन मित्रांचे वय ऐंशीच्या कालखंडातील प्राथमिक शाळेतील असल्याने त्याकाळी प्यासा सावन चित्रपट अन् त्याची कथा वगैरे फारसा त्यातील अर्थ लक्षात आला नव्हता पण, याच चित्रपटातील " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" या अतिशय सुमधुर गीताने आमच्यावर देखील मोहिनी घातली होती हे मात्र नक्की..! त्याचं कारणही तसंच होतं..! या गीताची चाल सुमधुर होती..! 


आजही जेंव्हा कधी " मेघा रे, मेघा रे, मत परदेश जा..रे...!" हे गीत ऐकतो तेंव्हा तेंव्हा स्व.दौलत काका कुमावत यांची, त्यांच्या व्हिडिओ थिएटरची, आदरणीय स्व.बाबू काका मराठे , आदरणीय डॉ.दिलीप शेळके अन् आदरणीय एन.के.गायकवाड सर यांची नक्कीच भावूक आठवण येते..! रसिक अन् भावूक माणसांच्या आयुष्यात ज्या गोष्टींची भुरळ पडलेली असते, त्या गोष्टी अन् त्या गोष्टी ज्यांच्या सोबत व्यतीत केलेल्या आहेत अशा माणसांच्या आठवणी दीर्घकाळ स्मरणात राहतात हे माझ्या स्वानुभवावरून सांगतो..!


ता.क. : जी मज्जा त्या २ ₹ मध्ये येत होती, ती आत्ताच्या हाय फाय चित्रपटगृहात नाही येत..! कारण......

त्याकाळी सगळं कसं मर्यादेत होतं..! 


" वो भी एक दौर था और ये भी एक दौर हैं..!" 


वंदे मातरम्...!


फुटू क्लिक बाय : धाकटा..!


सदरील फुटू स्थळ - औरंगाबाद शहराचा एक कोपरा..!


आजचे नैसर्गिक नयनरम्य दृश्य पाहून जुन्या आठवणीत रमलेला एक खेडूत रसिक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२/७/२०२०

रविवार, १८ जुलै, २०२१

😊 " वाचन..! " 😊


 

चिंतन


☺ वाचन..! ☺


==================================


पुस्तकांचे वाचन असले की,माणसं वाचायला सहज सोपी जातात..!मला अशा वाचकांची खूप कीव येते की,जे म्हणतात किंवा ज्यांची अशी पक्की मानसिकता असते की,

" मी अमुक..अमुक..विचारांचे ,साहित्यिकांचे साहित्य वाचत नाही किंवा टाळतो..!" वगैरे.


माझे तर वैयक्तीक मत असे आहे की,सर्व प्रकारचे चतुरस्र वाचन हवे..!जेणेकरून कोणता लेखक त्याच्या लेखन प्रपंचात काय..काय दिवे..मेणबत्त्या, चिमण्या लावत आहे किंवा अंधार पाडत आहे..हे हमखास समजते..!


जी माणसं सर्वच प्रकारचे साहित्य वाचण्यास टाळतात..माझ्या मते अश्या माणसांनचा आपल्या विचारांवर आत्मविश्वास नसतो..!त्यांना भीती वाटत असते की,अमुक..अमुक साहित्य वाचल्याने ते माझ्यावर हावी होईल की काय...याचे..!


अपंग असतात ही माणसं..विचाराने..! त्यांना भीती वाटते की,मी जे साहित्य वाचत आहे,त्याचे विचार माझ्यावर अतिक्रमण करेल की काय..! आपले वाचन राजहंसा सारखे असावे..! जे हवं व इष्ट आहे तेच ग्रहण करणे.. व बाकीच्यात असूनही ते पद्धतशीरपणे टाळणे..!


" सर्वच प्रकारचे साहित्य " वाचल्याने " सर्वच प्रकारचे माणसं " खूप खूप सोप्पी जातात वाचायला..!😂


 मी ,माझी जन्मभूमी पालखेड,आयुष्यातील दीड तपाची कर्मभूमी लासूर स्टेशन, सध्याची कर्मभूमी औरंगाबाद, आयुष्यातील प्रवासादरम्यान भेटलेली माणसं, शिक्षक म्हणून व्यतीत केलेल्या वैजापूर,गंगापूर व सिल्लोड तालुक्यातील शाळा व तेथील विविध 

" सर्वच " मानवी घटक यांचे मस्तपैकी वाचन करत आलेलो आहे..!☺


अगदी असंच,आपल्या आयुष्यात अशी माणसं नको...तशी माणसं नको..हेही योग्य नाही..! उलट आपण अशा " सर्वांच्या "सहवासात, भले तो अल्प का असेना पण असा सहवास असावाच..! अशांच्या संगतीत राहून खूप छान वाचन करता येते..अशांचे..!जे दुर्गुण आपल्यात नाही त्यांचे मोफत प्रात्यक्षिक समोरच्यावर होताना ,होणाऱ्या परिणामांची मस्त मेजवानी असते ती आत्मपरीक्षण करण्याची..! मी स्वतः अधून मधून 😂 मात्र या उपक्रमात ज्यांच्या जवळ प्रचंड संयम आहे अशांनीच सहभाग नोंदवावा..!

नसता....


ता.क.: काजल की कालीख खुद को लग जाने की संभावना बहुत होगी..!😂


वंदे मातरम्..!


सर्वांच्या संगतीत राहणारा व आतापर्यंत संयम ठेवण्याचा प्रयत्न करणारा लेखक: 

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १९ जूलै २०१८

" प्रेमळ अभिनेता, राजेश खन्ना उपाख्य काका...! "



चिंतन


" प्रेमळ अभिनेता, राजेश खन्ना उपाख्य काका...! "


==================================


" ज़िन्दगी के सफर में गुज़र जाते है जो मकाम..

वो फिर नहीं आते..

वो फिर नहीं आते...!"


खरंच या माणसानं, सत्तरच्या दशकात माणसाला भरभरून जगायला शिकवलं..! त्याच बरोबर आयुष्याची चित्तरकथा देखील विविध गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केली..!


ज्याला कुणाला अती प्रचंड प्रमाणात नैराश्य आले आहे..त्या इसमाने एकतर आचार्य अत्रे लिखित " मी कसा झालो..!" हे पुस्तक वाचावे किंवा सदाबहार अभिनेता राजेश खन्ना अभिनित " आनंद " चित्रपट पाहावा..! ही दोन उत्कृष्ट औषधे आहेत..स्वतच्या  गोड आत्म्याची हत्या करणाऱ्याचा  विचार आणनाऱ्यांसाठी..!


" बाबू मोशाय, आनंद मरा नही करते, आनंद मरते नहीं..!"


तरुणांना अन् तरुणींना आपल्या विशिष्ट शैलीमुळे काकांनी आपल्या प्रेमात आकंठ बुडायला लावले होते. एखाद्या अभिनेत्यावरील रसिक प्रेक्षकांतील तरुणींच्या प्रेमाची परिभाषाच काकांनी बदलून टाकली होती. असं वाचण्यात आलं आहे की, त्याकाळी कित्येक तरुणींनी आपल्या रक्ताने काकांना प्रेमपत्रे लिहिली होती. राजेश खन्ना यांची कार निघून गेल्यावर त्याच कारच्या चाकाच्या खाली आलेली माती त्याकाळच्या तरुणी स्वतच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं म्हणून लावत असे..!  एवढं निख्खळ प्रेम फक्त आणि फक्त राजेश खन्ना उपाख्य काकांच्याच वाट्याला आले होते. 


हिंदी चित्रपट सृष्टीत असे काही मोजके अभिनेते होऊन गेले अन् आहेत, ज्यांची नृत्यशैली खास त्यांचीच म्हणून ओळखल्या जाते.त्यात प्रामुख्याने स्व.भगवान दादा, धर्मेंद्र आणि स्व.  राजेश खन्ना उपाख्य काका..! काकांच्या नाचण्यात एक लाजाळूपणा अन् प्रेमळपणा जाणवायचा.एक हात वर अन् एक हात कमरेच्या बाजूला घेऊन वाकडी मान करून नाचण्याची नजाकत काही औरच असायची काकांची..!👌एखाद्या अभिनेत्यावर तरुणींनी जीवापाड प्रेम करावं अन् ते फक्त आणि फक्त काकांच्या वाट्याला यावं हे एकमेव उदाहरण आहे..!  भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीत हे अढळ स्थान काकांच्याच नशिबी अद्याप तरी कायम आहे..!🌹


हाच सर्वांचा प्रेमळ  माणूस, त्याच्या सर्वोच्च यशोशिखरावर असताना, हिंदी चित्रपट सृष्टीतील दुसऱ्या सुपरस्टारची म्हणजेच अमिताभ बच्चन यांची दणक्यात एन्ट्री झाली अन् हळूहळू काकांची ती नाजाकत लोप पावत गेली..! आयुष्याच्या शेवटी हा महान अभिनेता एकटाच राहिला..! अगदी मृत्यू पावल्यावर देखील ,त्याच्या जिवंतपणीच्या अजरामर ' आनंद ' चित्रपटातील त्याच्याच मृत्यू नंतरचा संवाद, खऱ्या आयुष्यातील खऱ्या मृत्यू नंतर उपस्थित सर्वांना त्याच्याच इच्छेखातर ऐकवून गेला..!😔

राजेश खन्ना यांना यश पचवता आले नाही.यशाच्या शिखरावर असताना धूम्रपान, कामाच्या प्रती असणारी बेपर्वाई इत्यादी अहंकारी वृत्तीने राजेश खन्ना यांना यशोशिखरावरून प्रेक्षकांनी जमिनीवर आदळवले.


ता.क.: आज राजेश खन्ना उपाख्य काकाजी यांचा स्मृतिदिन आहे..!( मृत्यू दिनांक - १८/७/२०१२ ) त्यानिमित्त राजेश खन्ना उपाख्य काकांना विनम्र अभिवादन..! 🙏🏻🌹


वंदे मातरम्..!


राजेश खन्ना उपाख्य काकांचा एक चाहता :नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: १८ जूलै २०२१, रविवार

 

रविवार, ११ जुलै, २०२१

" वारकरी बंधुची, मोफत दाढी सेवा ..! "


 


चिंतन


" वारकरी बंधुची, मोफत दाढी सेवा ..! "


================================

                                                                                                 आपल्या महाराष्ट्रात हिंदू धर्मातील महान वारकरी संप्रदायात, धार्मिक उत्सवांमध्ये प्रत्येकजण ,आपापल्या क्षमतेनुसार ,कौशल्याने समाजसेवेचे योगदान देण्याची महान परंपरा आजतागायत राखून आहे..! मला याची प्रचीती ह.भ.प.गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह,मुंबई-नागपूर, लासूर स्टेशन महामार्गालगत इ.स.२०१७ साली साजरा झालेल्या धार्मिक उत्सव स्थळी आली होती..!


मी त्यावेळी लासूर स्टेशन येथे राहत होतो.सदरील अखंड हरिनाम सप्ताह स्थळ,लासूर स्टेशन पासून ५ किलोमीटर अंतरावर आयोजित करण्यात आला होता.मी सहपरिवार दररोज संध्याकाळी एक स्वयंसेवक या नात्याने तिथं शाळेतून आल्यावर जात होतो.सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी केशकर्तन करणाऱ्या वारकरी बंधूने सप्ताह स्थळी येणाऱ्या भाविक भक्तांची दाढी करून देण्याकरिता अगदी मोफत सेवा सुरू केली होती..!सदरील केश कर्तन दुकान फार काही आलिशान नव्हते,पण ही सेवा पुरविणाऱ्या सेवेकरी माणसाची मनाची श्रीमंती जगातील सर्वोत्तम श्रीमंती नक्कीच जाणवत होती..! या सेवेकरी बंधूने याच हरिनाम सप्ताह स्थळी नुसते इकडून तिकडे अन् तिकडून इकडे फिरणाऱ्या काही सफेदपोष असणाऱ्यांना आपल्या कृतीतून चपराक लगावली होती .! आसपास ही सेवा पुरविणारे बंधू दिसतात का याचा शोध घेतला पण खूप खूप गर्दीमुळे दिसले नाही..! मला पण पंगत वाढायला जायची घाई असल्याने मी लवकर तिथून निघालो.


दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर हात पाय तोंड धुवून पुन्हा त्याच स्थळी गेलो असता तिथं सदरील वारकरी बंधूची मोफत केश कर्तन सेवा दुकान दिसले नव्हती..! बहुदा त्या हरिनाम सप्ताह स्थळी ऐन मधोमध सदरील दुकान लावल्याने कुणीतरी त्यांना दुसऱ्या जागी दुकान लावायला सांगितले असेल..!


पूर्णत:समर्पण भावनेने,आपल्या क्षमतेनुसार,कौशल्यानुसार 

" सेवा " करणा-या त्या सेवेकरीचे कार्य बघून या महान वारकरी संप्रदायातील सेवेकरी परंपरेची प्रत्यक्ष बघून खात्री पटली..! 


आज दिनांक १२ जुलै २०१९ रोजी आषाढी एकादशी आहे..! त्यानिमित्त या महान परंपरेला सर्व सामान्य वारकरी बंधू भगिनी ,अनेक संतजन यांनी आपापल्या परीने,सर्व सामान्य माणसा करिता याचे दारे उघडी केलेली आहे...!

त्या सर्वांना विनम्र वंदन..!


वारकरी सांप्रदाय याचमुळे श्रेष्ठ आहे..!


वंदे मातरम्..!

जय हरी माऊली..!


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


सदरील छायाचित्र स्थळ: ह.भ.प.गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह,मुंबई-नागपूर, लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद महामार्ग

इ.स.जुलै- ऑगस्ट २०१७


दिनांक: १२ जूलै २०१९, आषाढी एकादशी.

बुधवार, ७ जुलै, २०२१

" ती..!"


 

चिंतन


                        " ती...! "



===================================


आज दिनांक ८ जुलै २०१८ रोजी भल्या सकाळी आम्ही N3...एका निवांत स्थळी,एका अंतर्गत रस्त्यावर..!

सोबतीला होती..ती..!


तब्बल दहा वर्षांपासून तिने मला भल्या सकाळी दररोज लासुर स्टेशन पासून ते आजतागायत अगदी निष्ठेने साथ दिली आहे..!अर्थात त्या पूर्वीही असेच साथ देणारे होते...पण..तुझ्या इतका दीर्घ सहवास..इतर कुणालाही माझ्या बरोबर निभावता आलाच नाही..!


ती सकाळी सोबत नसली की...अख्खा दिवस आळसात जातो..!इतकं तीच अन् माझं नात घट्ट जुळलं आहे..!

एका चिमुकल्याला त्याच्या या भूतलावर आगमनाच्या वेळी तू आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब दिली आहे हे कसे विसरू मी..?


तर अशी ती..! 

जीने मला दररोज भल्या सकाळी साथ दिली..ती काळाच्या ओघात अस्वस्थ होत चालली आहे..! पण काय करणार तुझं अन् माझं इतकं नात घट्ट जुळले आहे की,तुला एखाद्या भल्या सकाळी जर सोबत नाही घेतले तर.. तो संपूर्ण दिवस..खूप आळसाचा,कंटाळवाणा जातो..!


तुझा रंग काळा सावळा आहे..! काळा सावळा रंग..हा मध्यमवर्गीयांना( सौंदर्याने मध्यमवर्गीय..!) हवाहवासा वाटणारा रंग..!त्या रंगाला ना कधी अहंकाराचा गर्व चढतो...ना कधी...न्यूनगंड..! तो नेहमी समांतर असतो..आपल्या आयुष्यात..! अर्थात सर्वच धवल रंग गर्वाचे असतात असे कदापि नाही बरं का..! ते ही खूप चांगले असतात..! सखे, तू आता तुझ्या वयोमानानुसार हळूहळू तुझ्या वार्धक्याकडे चालली आहेस,पण तुझ्या त्याही वार्धक्यातील सौंदर्यावर मी अविरत प्रेम करत राहणार याबाबतीत तू निश्चिंत राहा..! सखे, तू होतीस म्हणून आज मी जसा आहे तसा असतो..! सखे, तू नसती तर मीही माझ्या देहाच्या व्याधींना कधीचेच कवटाळून बसलेलो असतो..! अर्थात माझ्याही देहाला आयुष्याच्या प्रवासात कधी ना कधी तरी व्याधी जडणाराच..! पण माझ्या वार्धक्यातील त्या व्याधींवर देखील तू प्रेम करतच राहशील याची खात्री वाटते, कारण तुच तर माझी पहाटेची, सकाळची प्रिय सखी आहेस..!


कित्येक वर्षांपासून तू माझी प्राणपणाने साथ दिली आहे..भल्या सकाळी..! आता एकच आशा करतो की,तुझी अशीच साथ जी..लासूर स्टेशन येथे भल्या सकाळी लासूरगाव रोड वरील आदरणीय मांगीलाल शेठ यांच्या बंद पडलेल्या बर्फाच्या कारखान्याचा ओटा असो...कधी भानवाडी रस्त्याला असणारे स्व.हारकचंदजी छाजेड कांदा मार्केट चे प्रशस्त मैदान असो...त्या..त्या सर्व ठिकाणी तूच मला माझे आज पर्यंतचे आरोग्य निरामय ठेवण्यास खूप मदत केली आहे ..तशीच यापुढेही असू दे..!


माझ्या घरातील पुढील पिढी तुझा उपयोग करून आपला स्वार्थ साधेल की नाही याबाबत काही सांगता येणार नाही..! आशा करूया ते तुझा किंवा तुझ्या कुळातील पुढील वारशांचा नक्कीच उपयोग करतील..त्यांच्या स्वतच्या भविष्याकरिता..! पण यात मला शंका वाटते ,कारण आजची पिढी " मॉडर्न " आहे..!☺


तुझी तब्येत काळाच्या ओघात अस्वस्थ होत आहे याची मला जाणीव आहे..सखे..! पण काय करणार माझा मुळात स्वभाव कृतघ्न नाही गं...! मी तुला , जो पर्यंत तुझ्यात शेवटचा श्वास असेल तो पर्यंत सांभाळणार..!कारण तुझ्यामुळे माझे आजचे स्वास्थ बरे आहे..!उद्या किंवा वयोमानारूप ते पुढे कसे होईल हे त्या नियंत्यालाच माहीत..!

 

" गोड फळाला कीड लवकर लागते..!" असे एक वचन महान लेखक वि.स.खांडेकर लिखित " ययाती " या पुस्तकात मी बऱ्याचदा वाचले आहे..! माणसाला उद्देशून खांडेकरांनी हे सुवचन लिहिले होते, आणि मी माणूस आहे..! पण तरीही एक मात्र नक्की की,ते माझे भविष्यातील शारीरिक रूप कसेही असू दे..! तू मात्र माझ्या सदैव स्मरणात राहशील..! जरी अत्यवस्थ अवस्थेत झाली तरीही तू नेहमी माझ्या घरात राहशील..!


अशी ती माझी प्राण प्रिय शाल..!


याच शालीत माझा धाकटा मुलगा चि.नयन याचा तब्बल दहा वर्षापूर्वी जन्म झाला होता,त्यावेळी त्याला इच्यातच गुंडाळून पहिल्यांदा आणले होते..! बाळाच्या कामातील तुझा उपयोग संपल्यावर मी याच शालीवर बसून भल्या सकाळी मी दररोज काही योगासने ,त्रोटक व्यायाम करत आहे..! अर्थात पूर्वीही करत होतो..पण " ती " ही त्यावेळी सोबत नव्हती..! सदरील छायाचित्रात " ती " माझ्या खांद्यावर विसावलेली आहे..!☺ कुणावर तरी निष्ठेने अन् चिरंतन प्रेम करावं या सिध्दांतावर माझी श्रद्धा आहे ग सखे..! 🌹


ता.क. - सुरुवातीला शृंगारिक वाटणारे पण.....

नंतर एखाद्या रेशमाच्या दोऱ्याचा गुंता उलगडत जावा..असे उत्कंठावर्धक लेखन प्रकारातील एक छोटासा प्रयत्न..केला आहे..!

कृपया वाचकांनी निर्भेळ वाचनाचा शृंगारिक पण कृतज्ञता मूल्याचा आनंद घेत...घेत वाचावे..!

वाकड्यात शिरू नये..!🙏😊


वंदे मातरम्..!


लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक : ८ जुलै २०१८

स्थळ: औरंगाबाद.

सोमवार, ५ जुलै, २०२१

" ती, लेमन गोळी..! "😋


 


चिंतन


" ती, लेमन गोळी..! "😋

__________________________________________


ती गोड आहे, दिसायला देखील छान आहे..! थोडी कडक आहे,पण तिच्यात गोडवा असल्याने तिच्यातील कडकपणा सुसह्य होऊन जातो..! तिचा सुसह्यपणा जसजसा नरड्याच्या आतमध्ये जाईल तसतसा तिच्यातील गोडवा अजुन वाढतच जातो..! तिच्यातील गोडवा आंबट शौकीनांसाठी सर्वोत्तम मेजवानीच आहे. तिला जिभेवर चघळत असताना जो स्वर्गीय आनंद मिळतो ,तो तिला एकाच दणक्यात तिच्या शरीराचे लचके तोडून मिळत नाही..! तीनं तिचा रंग अजूनही बदललेला नाही त्यामुळं तिची तिच्या रंग रुपावरील निष्ठा वाखाण्याजोगी नक्कीच जाणवते..! तिचा तो केशरी रंग जेंव्हा माझ्यासारख्याला दिसतो तेंव्हा माझ्या जिभेतील विश्वामित्र आपला संयम सोडून आपल्या लाळग्रंथीद्वारे तिला आपलेसे करण्याचा मेनकारुपी प्रयत्न करतो..! ती जेव्हा जिभेवर रेंगाळते तेंव्हा माझ्यासारख्याला ती जो पर्यंत जिभेवर आहे तो पर्यंत... 

" स्वर्गसुख हेच आहे, स्वर्गसुख हेच आहे, स्वर्गसुख हेच आहे..!" असेच जाणवत असते. अगदी बालपणापासून ते आजतागायत तिच्यातील त्या गोडव्यावर अविरत चवदार आंबट प्रेम टिकवून ठेवून मी एकनिष्ठतेचं उदाहरण समस्त आंबट शौकीनांच्या समोर उदाहरण प्रस्तुत केलेलं नाही, तर तुम्हीही तिला जिभेवर रेंगाळत ठेवून असंच तिच्यावर प्रेम करा हे दाखवण्याचा चवदार प्रयत्न केला आहे..! 


आज दिनांक ६ जुलै २०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानकावर खूप दिवसांनी लेमन गोळी खायला मिळाली..! गोळी खाद्य पदार्थ मधील माझी सर्वात आवडती खायची गोळी..लेमन गोळी..! लहानपणी मी पालखेड येथे आमच्या गावातील किराणा दुकानदार स्वर्गीय आदरणीय पंडित आबा ऋषिपाठक,स्व.आदरणीय विठ्ठल काका जैन, स्वर्गीय सुभाष शेठ छाजेड यांच्या दुकानातून लेमन गोळी हमखास घ्यायचो..अन् मस्तपैकी खायचो..! 😋


आज,जुन्या काळातील बहुतांशी खाद्य पदार्थांमध्ये बदल झाला आहे,त्यात नवनवीन चवी समाविष्ट झाल्या आहेत..!पण लेमन गोळी आजही आपली तिची तीच गुणवत्ता टिकवून आहे, हे मला आज प्रत्यक्ष खाल्यावर पुन्हा समजले..! 


ही लेमन गोळी,कुठेही नाही मिळालीच तर कोणत्याही बस स्थानकावर नक्कीच मिळते..!ज्याला खायची तीव्र इच्छा झाली असेल त्यांनी कोणत्याही बस स्थानकावर संपर्क साधावा..! 


ज्यांना कुणाला " इतर काहीही बचाबचा खाऊन,किंवा पिऊन " स्वतच्या आसपास काही सेंटिमीटर पर्यंत वायू प्रदूषण करण्याची सवय आहे, त्यांना ही लेमन गोळी अजिबात आवडणार नाही..!

 

ता.क. - प्रस्तुत उजवा तळहात माझाच आहे..!


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: ६ जुलै २०१८

रविवार, २० जून, २०२१

" जिवलग बालमित्रा, रमेश ..! "


 

आमचे गाव आमची माणसं..!


" जिवलग बालमित्रा, रमेश ..! "


===================================


खूप जिवलग बालमित्र रमेश भानुदास गायकवाड..! मूळ रा.पालखेड, ह.मु. औरंगाबाद


आज तुझ्या काळजाचा तुकडा ,रेणुका दिदीचे शुभ मंगल कार्य पार पडले..! एका वधू पित्याची होणारी भावनिक घालमेल मी, दिवसभर पाहत होतो.येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणारा वधू पिता अन् त्याच सरबराईत स्वतः चे देहभान हरपून गेलेला माझा खूप जिवलग बालमित्र रमेश ,हे दोन्ही रूपं निव्वळ समर्पण भावनेने तू आज जगलास मित्रा..! स्वतः ला आपल्या लाडक्या लेकीच्या मंगल कार्यात जो कुणी वधू पिता समर्पण भावनेने आलेल्या गेलेल्यांची आत्मीयतेने पूजन करत असतो, त्यावेळी तो वधू पिता, त्या समस्त वधू पित्यांच्या कृतीतून व्यक्त केलेल्या भावनांचे प्रतिनिधित्व करत असतो..! मित्रा रमेश, आज तू, त्या समस्त पित्यांचे खूप आत्मीयतेने अन् तितक्याच भावुकतेने प्रतिनिधित्व केलेस..!


याच माझ्या जिवलग बालमित्र रमेश वर मी यापूर्वीच माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिलेला आहे.


विश्वास अन् रमेश ,या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू..! एखाद्या व्यक्तीवर आपल्या आई वडीलांसारखा डोळेझाकून विश्वास ठेवावा ,अगदी त्याच योग्यतेचा माझा प्रिय बालमित्र तथा वर्गमित्र रमेश..! माझ्या आयुष्यात काही मित्र असे आहेत की,ज्यांच्यावर मी, जो विश्वास माझ्या आई वडिलांवर ठेवायचो,त्याच तोडीचे असे ते मित्र आहेत..! त्यात जिवलग बालमित्र रमेश गायकवाड, डॉ.संजय राऊत आणि डॉ.गणेश पा. वाणी सर्वोच्च स्थानी आहेत..! योगायोग असा की, याच लेखात ज्यावेळी मी माझा जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी याचा उल्लेख करत होतो , नेमक्या त्याचवेळी गणेश वाणी याचा मला फोन आला..! काही योगायोग माणसाच्या आयुष्यात नात्यांची खोली दर्शवितात..! ज्या विश्वासाने आपण आपल्या आई वडिलांच्या स्वाधीन आपल्या सर्वस्वाला करतो, अगदी त्याच विश्वासाने आपण आपल्या सर्वस्वाला मित्रांच्या स्वाधीन करावे अन् निश्चिंत राहावे..! हा विश्वास अन् त्या योग्यतेची माणसं, सहज भेटत नसतात..! त्यासाठी नशीब अन् नैतिकता वागण्यातून निर्माण करावी लागते..!


प्रिय बालमित्र रमेश, हा माझ्या स्व.वडिलांचा आदर्श होता, यावरून रमेशची योग्यता सहज लक्षात येईल..! ज्या कठीण अन् गरिबीच्या विवंचनेतून दोघांनीही स्वतः ला समाजात उभे केले होते,माझ्या मते हेच एकमेव कारण दोघांच्याही निस्सीम मैत्रीचे होते. माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी माझ्या मोजक्या मित्रांना खांद्यावर हात टाकून शाबासकी दिली होती, त्यात प्रिय बालमित्र रमेश हा एक होता..! 


ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांच्या आयुष्यात सर्व सामान्य माणसांची किंमत काय असते, याविषयी व्यक्त व्हायचे झाल्यास त्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. ग्लॅमर अन् चकाकी असलेली माणसं, सर्व सामान्य माणसाला आपली कधीच जाणवत नाही..! अशी माणसं राहून राहून परकी जाणवतात.अशा माणसांच्या आयुष्याचा होरा अन् तोरा हा सर्व सामान्य माणसाला सतत परकेपणाची जाणीव करून देत असतो..! फक्त अशी जाणीव करून देणं कधी दृश्य स्वरूपात असते तर कधी सुप्त स्वरूपात..! मी अशा ग्लॅमर अन् चकाकी असलेल्या माणसांपासून मनाने दुरुन डोंगर साजरे या पद्धतीने राहतो..!

 

माझा हा खूप जिवलग बालमित्र रमेश, जगाच्या दृष्टीने असणाऱ्या तथाकथित ग्लॅमर ,चकाकी असलेल्या आयुष्याचा घटक नाही. प्रिय बालमित्र रमेश, याचे एक चहाचे दुकान, औरंगाबाद येथील मुकुंदवाडी बस स्टॉप वर आहे..!प्रिय बालमित्र रमेश खूप कष्टातून इथपर्यंत आला आहे.मी जेंव्हा पासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो होतो तेंव्हा पासून माझे स्व.तीर्थरूप वडील मला याच्या चहाच्या हॉटेलवर घेऊन जायला सांगायचे अन् मग मीही माझ्या संपूर्ण कुटुंबासह जायचो..! वास्तविक माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांनी आयुष्यात कधी बाहेर हॉटेलमधील चहा, नाष्टा केला नाही,पण या नियमाला प्रिय बालमित्र रमेश अपवाद असायचा..! प्रिय बालमित्र रमेश याची भेट झाली, की माझ्या स्व.तीर्थरूप वडिलांना खूप मोकळे वाटायचे..! जणू त्यांचा बालमित्रच भेटला..! माझ्या दृष्टीने तो एक मानसोपचार असायचा, एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंतर्मनावर केलेला..! जो पर्यंत माझे स्व.तीर्थरूप वडील हयात होते तो पर्यंत जेंव्हा जेंव्हा प्रिय बालमित्र रमेश आमच्या घरी यायचा तेंव्हा तेंव्हा आम्हा कुणालाही अगोदर भेटण्याऐवजी सर्वप्रथम माझ्या तीर्थरूप वडिलांना भेटायचा..!


आज ज्यावेळी मी प्रिय बालमित्र रमेश यांच्या कन्येच्या लग्न सोहळा आटोपून माझ्या घरी निघताना निरोप घेत होतो,त्यावेळी आम्हा दोघांचेही डोळे भरून आले होते..! आमच्या त्या दोघांच्या भावूक प्रसंगात आम्हा दोघांनाही आमच्या जिवलग नात्याची अन् आम्हा दोघांच्या स्व.आई वडिलांची जाणीव जाणवत होती..! शेवटी माणसाच्या आयुष्यात यापेक्षा दुसरे काही असते का..? माझ्या मते अजिबात नाही..! मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी भावूक माणसांना जगातील सर्वात श्रीमंत बनवत असतात..! अशीच मोजकी माणसं अन् मोजक्या आठवणी माणसाला मानसिक रोग होण्यापासून दूर ठेवण्यासाठी संजीवनी औषधाच्या मात्रांच्या रूपाने उपयोगी पडतात..! आमच्या सर्वोच्च भावूक नात्याला माझी पत्नी बाजूला उभे राहून पाहत होती..!


असो, चि.सौ.का.रेणुका दीदी अन् जावई बापू आपणास आजच्या शुभ मंगल प्रसंगाच्या अन् पुढील वैवाहिक आनंदी आयुष्याच्या माझ्या कुटुंबाकडून मनःपुर्वक शुभेच्छा..!🌹🌹🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


विवाह सोहळा दिनांक - २०/६/२०२१, रविवार.

सोमवार, १४ जून, २०२१

" आम्हाला वाढू द्या..जगू द्या..!"🌳


 


चिंतन


" आम्हाला वाढू द्या..जगू द्या..!"🌳🌳🌿🌱🍀🌳🌳


=========================


मी आज दिनांक १५ जून २०१९ रोजी भल्या सकाळी जन सहयोग परिवार औरंगाबाद च्या वतीने वृक्षारोपण अन् संवर्धन करण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंड, गोलवाडी फाटा, सैनिकी क्षेत्र येथे गेल्यावर खूप कोवळी अन् लुसलुशीत पाने नजरेत भरली..!


पान होतं पिंपळाचं...!🍃🍃🍃

त्या पानाच्या मनातील भावना अन् संवेदना मला म्हणू पाहत होते की,

" आम्ही आता पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राण्याच्या म्हणजेच माणसांच्या सानिध्यात प्रवेश करण्यास सज्ज झालो आहे..! आमच्या हिरव्यागार सौंदर्यानं मोहित होऊन,आमच्या सर्वांगावर आमचे विविध सगे,सोयरे जसे की, किडे, मुंग्या, मुंगळे,पक्षी इ.आपापली संस्कृती वाढवतील..! मला त्या नयनरम्य संस्कृतीला अजुन फुलवायला, जोपासायला माझे अख्खे आयुष्य वेचायला आवडेल अन् ते कार्य मला खूप खूप समाधान देऊन जाईल..!


पण.....माझे हेच हिरवेगार नयनरम्य सौंदर्य पाहून कुणीतरी नराधम माझ्याकडं आकृष्ट होईल अन् माझ्या या कोवळ्या, लुसलुशीत सौंदर्यावर,माझ्या वाढलेल्या सौंदर्यावर त्याच नराधमाने विकसित केलेले हत्यार चालवून माझी हत्या करील..! मी जरी मुका असलो तरी माझ्या सर्वांगातून माझ्या वेदना फुटून माझे मुक रुदन सुरू होईल..!माझ्या सर्वांगावर ज्यांनी..ज्यांनी आपली संस्कृती जोपासली,ती सर्व माझी सगे सोयरे त्याच वेळेला अनाथ होऊन ,ते सुध्दा दुःखाच्या काळ्याशार डोहात गडप होतील..!


मला फक्त आणि फक्त देणं माहीत आहे...अन् पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राण्याला म्हणजेच माणसाला फक्त आणि फक्त माझ्याकडून घेणं माहीत आहे..! किती हा कृतघ्नपणा..?


पण..मी अन् माझे इतर कुळातील इतर वृक्ष आम्ही "जनसहयोग परिवार औरंगाबाद च्या " सानिध्यात स्वतः ला खूप सुरक्षित समजतो..! त्याचे कारण या परिवारातील प्रत्येक सदस्य आम्हा सर्व वृक्षांना आमच्यापैकीच एकजण वाटतो..! ज्या ज्यावेळी जनसहयोग परिवार चे सदस्य आमच्या सानिध्यात येतात,त्यावेळी आम्ही खूप आनंदित होऊन जातो.आम्हाला झालेला आनंद आम्ही व्यक्त करू शकत नाही पण जनसहयोग परिवार चे सदस्य तो आमचा आनंद समजून घेऊन,अंतर्मनात जाणून आम्हाला आंजारतात.. गोंजारतात..!यावेळी आम्हाला आकाश ठेंगणं होतं..! 


निसर्गाच्या त्या विधात्याकडं आम्हा सर्व वृक्षांची 🌳🌳एकच मागणी आहे अन् ती म्हणजे...

" या पृथ्वीवर जिथं..जिथं आमचे इतर वृक्ष भाऊबंद ,इतर कुळातील वृक्ष असतील त्यांना आमच्या प्रेमळ जनसहयोग परिवार सारखे मायाळू सदस्य त्यांच्या सानिध्यात लाभू दे..!"


वंदे मातरम्🌳🇮🇳🌳


लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


सौजन्य: जनसहयोग परिवार औरंगाबाद🌳🌱🌿


स्थळ: गोलवाडी फाटा, डंपिंग ग्राउंड सैनिकी क्षेत्र वाळूज रोड, औरंगाबाद


दिनांक: १५ जून २०१९ ची रम्य सकाळ.

गुरुवार, १० जून, २०२१

" अखेर माझे स्वप्न पूर्ण झालं..! " ☺


 



"आमचे गाव आमची माणसं..!"

" अखेर माझे स्वप्न पूर्ण झालं..! " ☺

==================================

काही स्वप्न माणसाच्या आयुष्यात कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेली असतात..!त्यातल्या त्यात जी स्वप्न बालपणापासून मनात बाळगून असतात ती जर प्रौढ वयात पूर्ण झाली तर...

अख्खं आता पर्यंत जगलेलं आयुष्य सार्थकी झाल्या सारखं वाटतं..! आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺
असंच माझे एक बालपणापासूनचं स्वप्न होतं की,
" मी हातात पाण्याची नळी धरून कधी ते पाणी भांड्यात किंवा  जमिनीवर त्या नळीद्वारे पाणी कधी तरी टाकील..!"
पण दिनांक ७ जून २०१९ पर्यंतचे  माझे सगळे आयुष्य याच स्वप्नाची वाट पाहण्यात गेले..!आणि अखेर तो गोड दिवस उजाडला...७ जून २०१९ रोजी.. !

निमित्त होतं आमच्या जनसहयोग परिवार औरंगाबाद च्या वतीने वृक्षारोपण करण्यात  आलेल्या झाडांना पाणी देण्याचं..! माझं हे स्वप्न पूर्ण करून दिल्या बद्दल आमच्या जनसहयोग परिवार चे प्रमुख प्रिय प्रशांत भाऊ गिरे , इतर सदस्य व पाण्याचे टॅन्कर चालक प्रिय नाना भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद..!🙏🏻

आता बऱ्याच वाचक मित्रांना मुख्य प्रश्न  पडला असेल की, 
" एवढं क्षुल्लक स्वप्नं पूर्ण व्ह्यायला इतके दिवस कसे काय लागू शकतात..?"
तर अशांसाठी मी फ्लॅश बॅक मध्ये जाऊन आमच्या प्युवर दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्याची चित्तरकथा सांगतो..!

----------------------
मी पालखेडला लहानाचा मोठा झालो...तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...! त्यावेळी पाणी विकत मिळण्याची सुविधा नव्हती, म्हणून गावाबाहेरील आडावरून पाणी शेंदून आणण्याशिवाय पर्यायच नव्हता..! त्यावेळी आमच्या कुणाही भावंडांचे लग्न झालेले नसल्याने माझी आई गावाबाहेरील आडावरुन पाणी शेंदुन आणायची..!
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

दिवसामागून दिवस जात होते. पालखेड गावात,घरी तसे नळ होते म्हणा...कधी मधी इतकुसं पाणी येण्या पुरते..! ते पण खोल खड्ड्यात उतरून पाणी भरावे लागे..! कुणी  एखादा पाहुणा आला तर मोठ्ठ्या कौतुकाने सांगायला...
" आमच्याकडे नळाला पाणी येते बरं का...!" 
पण जर का तो पाहुणा मुक्कामी राहिलाच तर सगळे बिंग फुटायचे,  कारण नळ  फक्त फुशारकी मारण्याचे दृश्य साहित्य होते..!☺ मग काय...पाहुण्यांच्या बाया सुध्दा पाणी आणायला..घरातील स्रीयांसोबत आडावर....! ☺
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

मी नोकरीला लागल्यावर आमच्याकडे मोटार सायकल राजदूत गाडी होती.  तिच्यावर कॅनने, गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या परसराम रोठे पाटील यांच्या शेतातून पाणी आणू लागलो..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

पालखेड गावाच्या पश्चिमेला बाळाबाई  क्रिकेट मैदानाच्या जवळ के. टी.त्रिभुवन भाऊ यांच्या घरासमोर एक हातपंप होता..! तिथूनही मी सायकलवर तीस लिटरच्या कॅन अडकवून पाणी आणू लागलो..! त्यावेळी मला सोबत असायचे...प्रमोद राऊत ( बबलू ) ,गणेश भेंडे ही धडधाकट तरणाबांड मुलं..! गणेश भेंडे व प्रमोद राऊत ही दोन्ही मुले पाणी हापसायला लई तरबेज..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

मी लासूर स्टेशन येथे माझ्या आयुष्यातील १६ वर्ष काढली, तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...आणि त्याचा मला खूप खूप अभिमान  देखील वाटतो..! अभिमान वाटण्याचे कारण असे की, पालखेड येथील तीव्र पाण्याची टंचाई भाग क्रमांक १ हाच पुढे लासूर स्टेशन येथे भाग क्रमांक २ ने सुरू झाला होता..!☺
इथे पण...नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!

आता काही महिन्यापासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे...! आता तशी पूर्वी इतकी  पाण्याची तीव्र टंचाई नाही पण गतकाळातील जाणीव नक्कीच आहे..पाणी जपून वापरण्याची..! पण ते नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच होतं..!

अखेर ते बालपणापासून मनात बाळगून असलेलं स्वप्न दिनांक ७ जून २०१९ रोजी पूर्ण झाले..! आता कुठं माझे आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺  आम्ही जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज- औरंगाबाद रोड , औरंगाबाद येथे जवळ जवळ पाच एकर मध्ये अंदाजे सात हजार पूर्णपणे देशी झाडे लावलेली आहेत.अखेर त्या झाडांना पाणी देण्याचं, निमित्त ठरले ,नळीने पाणी देणे..!

आजही कुणी नाहक पाण्याचा नळीद्वारे गल्लीत सडा मारताना किंवा इतर ठिकाणी वाह्यात पाणी वाया घालतांना पहिलं की, पालखेड अन्  लासूर स्टेशन येथील प्युवर दुष्काळी दिवस आठवतात अन् ते पाणी वाया घालवण्यात स्वतः ला पान कोंबडा किंवा पान कोंबडी समजणाऱ्या नर,नारायणीला या  गावी सोडून द्यावं वाटतं..!☺

असो, पुनश्च एकदा प्रिय प्रशांत भाऊ गिरे व जन सहयोग परिवार औरंगाबाद आपले खूप खूप धन्यवाद..! आपण माझे बालपणापासूनचे  "नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न पूर्ण करू दिल्या बद्दल..! मी आपले हे उपकार जो पर्यंत माझ्या शरीरात पाणी आहे तो पर्यंत विसरणार नाही..!🙏🏻☺

ता.क.: जे कुणी नर किंवा नारायणी पाण्याचा वाह्यात गैरवापर करत असतील अशांना प्युवर दुष्काळी भागात कित्येक महिने राहायला पाठवावं वाटतं..!

वंदे मातरम्..!

एक प्यूवर दुष्काळी भागातील लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वृक्षारोपण व संवर्धन स्थळ : गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज - औरंगाबाद रोड , औरंगाबाद.

दिनांक: ११ जून २०१९, मंगळवार.