मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" आमचे,आदरणीय बापू, संजय जाधव पाटील सर..!"
==================================
त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे..!त्यांच्या सानिध्यात आम्ही व्यतीत केलेला कालखंड ,जगातली माणसं कशी ओळखायची हे शिकवून गेला..! त्यांच्या सहवासात जेंव्हा आम्ही होतो,तेंव्हा त्यांनी आम्हाला सख्ख्या भावासारखा जीव लावला..! त्यांच्यातील सामाजिक भान अन् माणसांची जाण ,आयुष्यात खूप काही शिकवून गेली..! आमच्या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होते,अन् आहे..! त्यांची आपल्यातील असणाऱ्या सर्व सामान्य माणसाला जवळ करण्याची प्रेमळ साद आपलीशी करून गेली..! जगात अनेकांच्या बाह्यांगात, अंतर्मनात तऱ्हेतऱ्हेचा अहंकार बऱ्याचदा जवळून तर कधी दुरून पाहायला मिळाला, मिळत आहे..! पण आमचे आदरणीय बापू या सर्वांना नक्कीच अपवाद होते अन् आहेत..! आमच्यासाठी नेहमीसाठी आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे,आदरणीय बापू..! अर्थात संजय जाधव पाटील ( सर ) वारेगाव- किनगावकर ( ता. फुलंब्री )
कालखंड नव्वदच्या दशकातील..!
मी तर त्यावेळी नोकरीला देखील लागलेलो नव्हतो.माझे थोरले बंधू सुनील भाऊ, हडको ,औरंगाबाद येथे राहत होते. बंधू अविवाहित होते.सुनील भाऊ, एका खाजगी कंपनीत काम करत असे.माझे डी. एड झाल्यावर मीही, झेपेल ते काम करण्याच्या उद्देशाने काही दिवस सुनील भाऊ कडे गेलो होतो. अर्थात झेपेल ते काम करण्याची गरज पडलीच नाही,कारण शिक्षक म्हणून नोकरी लवकर लागली होती..! मात्र याच कालखंडात औरंगाबाद येथील तत्कालीन आमचे सख्खे शेजारी म्हणून आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्याशी अतिशय जवळून संपर्क आला..!
आम्ही म्हणायला औरंगाबाद शहरात राहत होतो पण,आदरणीय बापूंच्या अतिशय प्रेमळ स्वभावामुळे शहरातील ' लिमिटेड ' जीवनाचा अनुभव कधी आलाच नाही.आदरणीय बापूंचा स्वभाव मुळात अतिशय प्रेमळ..! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय जाधव सर,यांचा मुळ पिंड खेड्यातील असल्याने आमच्यातील अनौपचारिक नात्यातील संबंध वृद्धिंगत होत गेले..!आदरणीय जाधव सरांनी आम्हा दोघाही भावंडांना खूप जीव लावला..! एखाद्याला जीव लावणं आणि एखाद्याशी ओळख असणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो.आम्हाला बापूंनी जीव लावलेला आहे..! अगदी त्यांच्या घरातलं जेवणाचं ताट आमच्यासाठी बऱ्याचदा हक्काने तयार असायचे..! बहुतांशी संध्याकाळी आदरणीय जाधव सर उपाख्य बापू,आमच्या रुममध्ये आयुष्यातील अनुभवांवर आमच्याशी गप्पा करायचे..!
आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, तसे मुरब्बी शिक्षकी नेते..! राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची मुहुर्तमेढ आदरणीय जाधव सर यांनीच रोवली..! मी तसा वैयक्तिक कोणत्याही शिक्षक संघटनेचा अधिकृत सदस्य नव्हतो आणि सध्याही नाही..! पण काही शिक्षक संघटनेतील काही माणसं, मला सदैव आपली जाणवली,म्हणून वैयक्तिक अशा ,माझ्या दृष्टीने ग्रेट असणाऱ्या शिक्षक नेत्यांच्या निव्वळ प्रेमात होतो अन् आहे..! त्या मोजक्या ग्रेट शिक्षक नेत्यांपैकी आदरणीय संजय जाधव पाटील सरांचे स्थान सदैव सर्वोच्च स्थानी आहे..! त्याचं कारणही तसंच आहे..! माणसाच्या आयुष्यात पहिलं जे काही असतं, ते ,कोणताही भावूक माणूस ,त्याच्या आयुष्यात त्या पहिल्याला सदैव हृदयाच्या गाभाऱ्यात हळुवारपणे पुजत असतो..! अगदी असंच काहीसं, माझ्याही आयुष्यात शिक्षक होण्याच्या मार्गावर असतानाच आदरणीय जाधव सरांसारखे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व भेटले,त्यामुळे त्यांच्यावरील एक शिक्षक नेता म्हणून असलेलं पाहिलं प्रेम तहहयात राहील यात तिळमात्र शंका नाहीच..! मी नोकरीलाही नव्हतो तेंव्हा नव्वदच्या दशकात आदरणीय जाधव सरांच्या सोबत, त्यांच्या तत्कालीन शिक्षक संघटनेसाठी, आलेल्या शिक्षकांची सरबराई करण्याची संधी मिळाली हे माझे नशीब..! ठिकाण होते सिद्धार्थ उद्यान औरंगाबाद..!
आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू,यांनी मराठवाडा पदवीधर शिक्षक निवडणूक देखील लढवलेली आहे. माणसातील पहिल्या प्रेमासाठी कोणताही माणूस आसक्त असतो,अगदी त्याच भावूक नात्याने आदरणीय जाधव सरांसाठी अदृश्य सेवा करण्याची संधी त्यावेळी मिळाली हे देखील माझे नशीबच..!
आदरणीय संजय जाधव सरांना आमच्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, आणि आमच्याही वडिलांना आदरणीय संजय जाधव सरांचा खूप अभिमान वाटतो..! आजही कधी कधी आमचे वयोवृध्द तीर्थरूप वडील, आदरणीय बापूंची आवर्जून आठवण काढतात अन् नेहमी म्हणतात...
" संजय जाधव सरांच्या सारखा निगर्वी शिक्षक नेता सापडणे मुश्किल..! आपल्या घरातला माणूस, लई माणुसकी संजय जाधव सरांना..! "
माझे इ. स.२००० मध्ये ज्यावेळी लग्न जमले होते त्यावेळी आदरणीय संजय जाधव पाटील सरांना, माझ्या लग्नपत्रिकेच्या पहिल्याच पानावर श्रद्धेने स्थान दिले होते..! कारण आमच्यासाठी आदरणीय संजय जाधव पाटील सर , घरातलीच प्रेमळ आणि श्रद्धेय व्यक्ती होती..! आजही आमच्या लग्नाची ती लग्नपत्रिका जपून ठेवलेली आहे..! माझ्या लग्नाच्या दिवशीच वैजापूर येथील शिक्षक पतपेढीचा प्रचार सुरू होता.त्या अतिशय धामधुमीतून , शाम भाऊ राजपूत आणि आदरणीय संजय जाधव पाटील सर लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते..! विशेष म्हणजे आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू, माझ्या लग्नाच्या दिवशी थेट, वाटी ( वधू वर यांना निरोप देई पर्यंत) लावणेपर्यंत हक्काने उपस्थित होते ,हे त्यांच्यातील असलेली सर्व सामान्य माणसाला आपला अमूल्य वेळ देण्याची नैतिकता दर्शविते..! लासूर स्टेशन येथील माझ्या घरी आदरणीय बापू,ज्यावेळी आले होते,त्यावेळी आम्हा उभयतांची अगदी मोठ्या भावासारखी आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस आम्हाला सुखावून गेली होती..!
आदरणीय संजय जाधव पाटील सर उपाख्य बापू यांच्यासारखी ग्रेट माणसं, माणसातील माणुसकीच्या संस्कृतीच्या वहनाचे , वृद्धिंगत होण्याची कार्य करत आहेत म्हणून तर बरीच सर्व सामान्य माणसं आजही ,अशा माणसात ' आपला माणूस ' शोधण्याचा प्रेमळ प्रयत्न करत असतो..! जसे की आम्ही आदरणीय संजय जाधव सरांमध्ये शोधतो आणि अनुभवतो सुध्दा..! 🙏🌹
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : ९ सप्टेंबर २०२०, गुरुवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा