"आमचे गाव आमची माणसं..!"
" अखेर माझे स्वप्न पूर्ण झालं..! " ☺
==================================
काही स्वप्न माणसाच्या आयुष्यात कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेली असतात..!त्यातल्या त्यात जी स्वप्न बालपणापासून मनात बाळगून असतात ती जर प्रौढ वयात पूर्ण झाली तर...
अख्खं आता पर्यंत जगलेलं आयुष्य सार्थकी झाल्या सारखं वाटतं..! आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺
असंच माझे एक बालपणापासूनचं स्वप्न होतं की,
" मी हातात पाण्याची नळी धरून कधी ते पाणी भांड्यात किंवा जमिनीवर त्या नळीद्वारे पाणी कधी तरी टाकील..!"
पण दिनांक ७ जून २०१९ पर्यंतचे माझे सगळे आयुष्य याच स्वप्नाची वाट पाहण्यात गेले..!आणि अखेर तो गोड दिवस उजाडला...७ जून २०१९ रोजी.. !
निमित्त होतं आमच्या जनसहयोग परिवार औरंगाबाद च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्याचं..! माझं हे स्वप्न पूर्ण करून दिल्या बद्दल आमच्या जनसहयोग परिवार चे प्रमुख प्रिय प्रशांत भाऊ गिरे , इतर सदस्य व पाण्याचे टॅन्कर चालक प्रिय नाना भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद..!🙏🏻
आता बऱ्याच वाचक मित्रांना मुख्य प्रश्न पडला असेल की,
" एवढं क्षुल्लक स्वप्नं पूर्ण व्ह्यायला इतके दिवस कसे काय लागू शकतात..?"
तर अशांसाठी मी फ्लॅश बॅक मध्ये जाऊन आमच्या प्युवर दुष्काळी परिस्थितीचे प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्याची चित्तरकथा सांगतो..!
----------------------
मी पालखेडला लहानाचा मोठा झालो...तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...! त्यावेळी पाणी विकत मिळण्याची सुविधा नव्हती, म्हणून गावाबाहेरील आडावरून पाणी शेंदून आणण्याशिवाय पर्यायच नव्हता..! त्यावेळी आमच्या कुणाही भावंडांचे लग्न झालेले नसल्याने माझी आई गावाबाहेरील आडावरुन पाणी शेंदुन आणायची..!
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!
दिवसामागून दिवस जात होते. पालखेड गावात,घरी तसे नळ होते म्हणा...कधी मधी इतकुसं पाणी येण्या पुरते..! ते पण खोल खड्ड्यात उतरून पाणी भरावे लागे..! कुणी एखादा पाहुणा आला तर मोठ्ठ्या कौतुकाने सांगायला...
" आमच्याकडे नळाला पाणी येते बरं का...!"
पण जर का तो पाहुणा मुक्कामी राहिलाच तर सगळे बिंग फुटायचे, कारण नळ फक्त फुशारकी मारण्याचे दृश्य साहित्य होते..!☺ मग काय...पाहुण्यांच्या बाया सुध्दा पाणी आणायला..घरातील स्रीयांसोबत आडावर....! ☺
तेंव्हा पण नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!
मी नोकरीला लागल्यावर आमच्याकडे मोटार सायकल राजदूत गाडी होती. तिच्यावर कॅनने, गावापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या परसराम रोठे पाटील यांच्या शेतातून पाणी आणू लागलो..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!
पालखेड गावाच्या पश्चिमेला बाळाबाई क्रिकेट मैदानाच्या जवळ के. टी.त्रिभुवन भाऊ यांच्या घरासमोर एक हातपंप होता..! तिथूनही मी सायकलवर तीस लिटरच्या कॅन अडकवून पाणी आणू लागलो..! त्यावेळी मला सोबत असायचे...प्रमोद राऊत ( बबलू ) ,गणेश भेंडे ही धडधाकट तरणाबांड मुलं..! गणेश भेंडे व प्रमोद राऊत ही दोन्ही मुले पाणी हापसायला लई तरबेज..!
तेंव्हाही नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!
मी लासूर स्टेशन येथे माझ्या आयुष्यातील १६ वर्ष काढली, तीव्र पाणी टंचाई सोसत..सोसत...आणि त्याचा मला खूप खूप अभिमान देखील वाटतो..! अभिमान वाटण्याचे कारण असे की, पालखेड येथील तीव्र पाण्याची टंचाई भाग क्रमांक १ हाच पुढे लासूर स्टेशन येथे भाग क्रमांक २ ने सुरू झाला होता..!☺
इथे पण...नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं..!
आता काही महिन्यापासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे...! आता तशी पूर्वी इतकी पाण्याची तीव्र टंचाई नाही पण गतकाळातील जाणीव नक्कीच आहे..पाणी जपून वापरण्याची..! पण ते नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न अपूर्णच होतं..!
अखेर ते बालपणापासून मनात बाळगून असलेलं स्वप्न दिनांक ७ जून २०१९ रोजी पूर्ण झाले..! आता कुठं माझे आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटतं..!☺ आम्ही जन सहयोग सामाजिक संस्था औरंगाबाद अंतर्गत गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज- औरंगाबाद रोड , औरंगाबाद येथे जवळ जवळ पाच एकर मध्ये अंदाजे सात हजार पूर्णपणे देशी झाडे लावलेली आहेत.अखेर त्या झाडांना पाणी देण्याचं, निमित्त ठरले ,नळीने पाणी देणे..!
आजही कुणी नाहक पाण्याचा नळीद्वारे गल्लीत सडा मारताना किंवा इतर ठिकाणी वाह्यात पाणी वाया घालतांना पहिलं की, पालखेड अन् लासूर स्टेशन येथील प्युवर दुष्काळी दिवस आठवतात अन् ते पाणी वाया घालवण्यात स्वतः ला पान कोंबडा किंवा पान कोंबडी समजणाऱ्या नर,नारायणीला या गावी सोडून द्यावं वाटतं..!☺
असो, पुनश्च एकदा प्रिय प्रशांत भाऊ गिरे व जन सहयोग परिवार औरंगाबाद आपले खूप खूप धन्यवाद..! आपण माझे बालपणापासूनचे "नळीद्वारे पाणी भरण्याचे स्वप्न पूर्ण करू दिल्या बद्दल..! मी आपले हे उपकार जो पर्यंत माझ्या शरीरात पाणी आहे तो पर्यंत विसरणार नाही..!🙏🏻☺
ता.क.: जे कुणी नर किंवा नारायणी पाण्याचा वाह्यात गैरवापर करत असतील अशांना प्युवर दुष्काळी भागात कित्येक महिने राहायला पाठवावं वाटतं..!
वंदे मातरम्..!
एक प्यूवर दुष्काळी भागातील लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वृक्षारोपण व संवर्धन स्थळ : गोलवाडी फाटा सैनिकी क्षेत्र, छावणी डंपिंग ग्राउंड , वाळूज - औरंगाबाद रोड , औरंगाबाद.
दिनांक: ११ जून २०१९, मंगळवार.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा