चिंतन ©️
" महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो..! '
====================================
आज महान तत्ववेत्ता आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांचा जन्मदिन आहे.( ज. दि. ११/१२/१९३१)
त्यानिमित्त त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेला प्रथमतः विनम्र अभिवादन..!🙏
संपूर्ण मानवी वैचारिक सिद्धांतात माझ्या मते फक्त तिघेच असे पूर्णार्थाने सक्षम प्रगल्भ तत्त्वचिंतक झालेले आहेत. ते तिघेजण पुढील प्रमाणे होय.
(१) श्रीकृष्ण,
(२) सिद्धार्थ उपाख्य गौतम बुद्ध,
(३) आचार्य रजनीश उपाख्य ओशो..!
विशेष म्हणजे वरील तिघाही तत्ववेत्त्यांची बौद्धिक मिमांसा भिन्न भिन्न आहे, मात्र वास्तववादी आहे.
एखाद्यावर समाज एका विशिष्ट विचारसरणीचा शिक्का मारतो, पण वास्तवात समाजातील काहीजण जसे समजतात त्यापेक्षा एका वेगळ्याच वैचारिक उंचीवरील काही तत्त्वचिंतक असतात. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आचार्य रजनीश उपाख्य ओशो होय.
ओशो यांच्या ' संभोगातून समाधीकडे ' या पुस्तकामुळे त्यांच्यावर अश्लीलतेचा शिक्का समाजव्यवस्थेने मारला. अर्थात असा शिक्का मारण्यात याच समाजव्यवस्थेतील प्रगल्भ वाचक अन् विचार करणारे नव्हते,तर पिढ्यानपिढ्या एका बंदिस्त अन् चाकोरीबद्ध वैचारिक अन् धार्मिक क्षेत्रातील मानवी घटक होते. ' संभोगातून समाधीकडे ' असे पुस्तकाचे शीर्षक आहे म्हंटल्यावर त्यात निव्वळ अश्लीलतेचा भरणा असेल अशी चूक समाजातील काही मानवी घटकांनी केली अन् खूप गदारोळ झाला. संपूर्ण विश्वातील मानवाला आपल्याच पूर्वजांनी खजुराहो , कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेच्या द्वारे स्री अन् पुरुष यांच्या भावोत्कट नात्याचा परिचय करून दिला आहे. मी या दोन्ही ठिकाणी भेट दिलेली आहे. खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेला बघितल्यावर लक्षात येते की, आपले पूर्वज किती उच्च कोटीच्या वैचारिक उंचीवरील होते. अर्थात खजुराहो अन् कोणार्क येथील अद्वितीय शिल्पकलेत ज्यांनी फक्त आणि फक्त अश्लीलता बघितली , अशांच्या वैचारिक क्षमतेला मर्यादा आल्या. मात्र ज्यांनी याच शिल्पकलेत आपल्या पूर्वजांची प्रगल्भता बघितली , मग पटते की, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी किती प्रगल्भतेने एवढे मोठे कार्य आपल्या पिढीसाठी करून ठेवलेले आहे.
इतिहास साक्षीला आहे, जेंव्हा जेंव्हा परंपरागत वैचारिक सिद्धांताला छेद देणारे विचार कुणी व्यक्त करतो किंवा करते त्या त्यावेळी अशा विचारवंतांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलेले आहे.ओशो ही याला अपवाद ठरले नाही.
अतिशय कुशाग्र बुद्धीच्या बळावर अन् आपल्यातील अलौकिक वाकचातुर्याच्या सामर्थ्यावर आचार्य रजनीश यांनी समाज व्यवस्थेला हादरवून सोडले होते. ओशो यांची पुस्तकं अन् विविध व्याख्याने माणसाच्या मेंदूला सृजनशील अन् प्रगल्भ नक्कीच बनवतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आचार्य रजनीश यांनी त्याकाळी जे काही विचार व्यक्त केले होते ते त्याकाळच्या प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंना पटणारे नव्हते. याचा अर्थ असाही होत नाही की, आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जे जे व्यक्त केले आहे ते आपण पूर्णतः मान्यच करावे..! असे जर होत असेल तर मग आपण ओशो यांच्या मूळ सिध्दांताचेच अनुकरण करत नाही असा त्याचा अर्थ होतो. आपल्या तर्कसंगत बुध्दीच्या पटलावर प्रत्येक विचार, सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींचे जीवन इत्यादी अनेकानेक बाबींना ज्यावेळी आपण पडताळून आपली मते तयार करतो तेंव्हाच प्रगल्भ समाजाची स्थापना होते. प्रत्येकात गुण आहेत तसे दोषही आहेत.फक्त एकांगी मते व्यक्त करू नये असाच सार आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांच्या बऱ्याच विचारात जाणवतो.
आचार्य रजनीश उपाख्य ओशो यांनी जी मते व्यक्त केली, ती पूर्णतः वस्तुनिष्ठ होती. वस्तुनिष्ठ यासाठी म्हणतोय की, ओशो यांनी ज्याच्यात जे योग्य आहे त्याचे समर्थन अन् विवेचन केले,मात्र त्याचवेळी ज्याच्यात जे अयोग्य आहे त्यावर कोणतीही भीडभाड न ठेवता विवेचन केले. प्रत्येकात जशी योग्यता असते, अगदी तशीच प्रत्येकात अयोग्यता देखील असते.याच वस्तुनिष्ठ वैचारिक बैठकीत ओशोंनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला समाजाच्या समोर प्रस्तुत केले.
सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशोंनी संवेदनशील बनवलं नाही. याउलट सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना ओशो यांनी आपल्या प्रगल्भ वैचारिक सिध्दांतांद्वारे श्रोत्यांच्या अन् वाचकांच्या समोर प्रस्तुत केले. मी इ. स. १९९९ मध्ये ओशो यांचं ' गांधीवाद एक व्यथा ' हे पुस्तक वाचले होते.खूपच सैद्धांतिक मांडणी या पुस्तकात ओशो यांनी केलेली आहे. मी मागील आठवड्यात औरंगाबाद शहरातील पुस्तकांच्या विविध दुकानात ' गांधीवाद एक व्यथा ' या पुस्तकाची चौकशी केली,पण कुठेही हे पुस्तक उपलब्ध नव्हते. महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्व होते,पण त्यांनी अंगिकारलेला गांधीवाद अन् त्यातून निर्माण झालेली समाजव्यवस्थेची व्यथा याचे खूप अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात ओशो यांनी केलेलं आहे.
असो ओशोवर खूप काही व्यक्त करता येईल,पण आटोपते घेतो, कारण सगळेच वाचक प्रगल्भ वाचक नसतात..!🙏🏻
ता.क.: जून १९९८ पासून ओशो साहित्य संपर्कात आहेच. !
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: ११/१२/२०२२, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा