चिंतन ©️
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त...
================================
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे..!
लेकरांच्या हृदयात अन् लेकरांच्या सोबत व्यतीत करता आलं पाहिजे..!
नियती आपल्याला प्रत्येक क्षण जगायला भरभरून देते,
फक्त त्याचा मनमुरादपणे आनंद लुटता आला पाहिजे..!
मोठेपणाच्या , पदाच्या अहंकाराच्या गराड्यात सतत मरण्यापेक्षा, बेगडी प्रतिष्ठा फेकून देता आल्या पाहिजे..!
सुख अन् दुःख सोबतच असते , फक्त त्यावर फुंकर घालता आली पाहिजे..!
मनाला हवा असतो असा सहवास, जिथं त्या विधात्याची अनुभूती यायला हवी.
ती अनुभूती येऊ द्यायची असेल तर निरागस मनांच्या सहवासात काही क्षण का होईना व्यतीत करता यायला पाहिजे..!
आजकाल त्या विधात्याच्या अस्तित्वाची अनुभूती कुठं लाभत असेल तर ती याच निरागस मनांच्या सहवासात जाणवते, त्या ईश्वरीय अनुभूतीचा आनंद घेता आला पाहिजे..!
सततच्या पुस्तकी अकलेच्या कांद्याची होळी करता येऊन कधीतरी मनाच्या निर्भेळ यशाची चव चाखता आली पाहिजे..!
याच्या , त्याच्या ,माझ्या , तुझ्या आयुष्याला कधीतरी पूर्णविराम लागणारच आहे, फक्त आयुष्यातील स्वल्पविराम शोधता आला पाहिजे..!
येणाऱ्या वार्धक्यात जर काही आठवायचे असेल तर आजच्या वर्तमानात काहीतरी गोड आठवणी शिलकीत जमा करायला पाहिजे..!
कोणताही शिक्षक कोणताही विद्यार्थी कधीही म्हातारा होता नसतो, फक्त त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण चिरंजीव करता आला पाहिजे..!
कुणीतरी एखाद्या दिवशी येतो अन् कायमचे मूल्यमापन करून जातो, त्यापेक्षा त्या निरागस मनांच्या दररोजच्या व्यथा अन् कथा समजून घेता आल्या पाहिजे..!
मनाचा अभ्यास अन् मनाची खोली शोधता आली पाहिजे अन् त्यातून उज्वल मनाची श्रीमंती तयार करता यायला पाहिजे..!
नुसते चौकटीत राहून रोबोट सारखं जगण्यापेक्षा , जिवंत माणसासारखं देखील जगता यायला पाहिजे..!
समोरच्या मनाची अवस्था जाणून त्या निरागस मनाच्या पटलावर मनाचं कोंदण लिहिता यायला पाहिजे..!
आणि हो, आयुष्य खूप सुंदर आहे,फक्त जगता आलं पाहिजे..!😊🙏🏻🌹
असो, आज नियतीने निरागस मनांच्या सहवासात आयुष्यातील काही क्षण व्यतीत करण्याची संधी दिली..!
फोटो स्थळ : कान्होबा मंदिर, अंधारी सिल्लोड
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: ३/२/२०२३, शुक्रवार.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा