चिंतन ©️
पुरण पोळी...!
=====================================
आपला भारत देश हा पृथ्वीवरील एकमेव असा देश आहे की,जेथे वेगवेगळ्या सण-उत्सवांनूसार शाकाहारी खाद्य पदार्थ बनविण्याची चांगली परंपरा आहे.आजचेच बघा होळी सण म्हटला की,डोळ्यासमोर अग्नित भस्म होत असलेल्या गोवऱ्या,लाकूडांऐवजी चटकन समोर येते ती पूरणपोळी..!
आपले भारतीय लोक खवय्येगिरी करिता जगप्रसिध्द आहे.त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भारतीय महिला..! भारतीय महिला कमालीच्या सूगरण..! माझ्या मते भारतीय सूगरण महिला व काही पूरूष मंडळीमूळेही सण-उत्सवांना लज्जत आलेली आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य पदार्थांना चवदार व वैशिष्टयपूर्ण बनविले प्रथमत:या महिलांनीच....!
जेव्हा एखादी ' भारतीय महिला ' स्वयंपाक करण्यास बसते तेव्हा ती एखाद्या ईश्वरीय शक्तीचे मन लावून पूजन,स्तवन करावे त्या तल्लिनतेने स्वयंपाकरूपी कलेत रमून जाते.या तल्लिनतेच्या भक्तीत काही पूरूषही (माझ्यासारखे) रमून जातात..! काहिही खाण्यापेक्षा काहितरी खाल्लेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. खमंग,चवदार,जीभेवर रेंगाळणारे,नाव ऐकल्या बरोबर जीभेचा संयम सूटणारे खाद्य पदार्थ बनविले ते आपल्या भारतीय महिलांनीच व काही पूरूषांनी..! तेही शाकाहारी पदार्थ...!
माझी स्व.आई, पुरण पोळी खूपच रुचकर बनवायची. माझे लग्न होण्यापूर्वी अन् तिच्या अन्य सूना नव्हत्या त्यावेळी मी जेंव्हा कधी आईला म्हणायचो की,
" आई,आज पुरण पोळी करते का..?"
या माझ्या इच्छेखातर ती लगेच तयारीला लागायची. मुळात मला गोड पदार्थ आवडतात अन् त्यातही जर आईच्या हातची चव जर पुरण पोळीला लागली तर त्या गोडव्याचा गोडवा अमृताहुन श्रेष्ठ वाटायचा. काळाच्या ओघात माझी आई वयोमानानुसार थकली पण अगदी तिच्याच हातची पुरण पोळीची सुगरण चव माझ्या धर्मपत्नीच्या हाताला लाभली..! त्याचे कारण माझी सासूबाई अतिशय रुचकर पुरणपोळी बनवितात. माझ्या पत्नीने सुगरण कौशल्य तिच्या आईकडून शिकून घेतले..!
मूळातच वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा शोध लावला तो खवय्ये असणाऱ्या माणसांनीच...! " डाएट " वर असणाऱ्या माणसाला असे संशोधन व शोध करताच येऊ शकत नाही, कारण अशांचे तोंड अन् जीभ खूप जपून वागत असते. अशी माणसं फक्त विविध चवदार ,खमंग विशेषत: शाकाहारी पदार्थांचे फक्त नयनसूख घेऊ शकतात. मी मागे वाराणसीला गेलो होतो. तेंव्हा तेथील गल्लीबोळात विविध शाकाहारी खाद्य पदार्थांची रेलचेल होती, तेही माफक दरात..! वाराणसीत सकाळी...सकाळी गरमागरम चवदार पदार्थ खाल्यानंतरचा आनंद हा खवय्ये असणा-यांसाठी एक सुवर्ण खाद्य पर्वणीच..! त्याचा मनमुरादपणे जिभेचे चोचले पुरवून पुरवून मी आनंद लुटलेला आहे.😋
घरचं जेवण अन् त्याला आपल्या आईच्या हातचा जर ईश्वरीय स्पर्श झाला तर असे अन्न अमृताचेच रूप असते. घरच्या जेवणात आईच्या मायेचा ओलावा असतो.असा ओलावा , ज्यात आयुष्यभर मायेच्या ऋणात राहून माणूस त्या ऋणातून कधीही मुक्त होऊ इच्छित नाही. अर्थात मायेच्या जाणीवा जागृत असणाऱ्यांचीच ही भावना असते. माझ्या स्व.आईने तिच्या सासरच्या आयुष्याच्या प्रारंभी चुलीवर स्वयंपाक बनवला.त्यात देखील पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. काळाच्या ओघात विद्युत शेगडी वर स्वयंपाक बनवला त्यात देखील पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. आईच्या वार्धक्यात तिच्या आयुष्यात गॅस आला. गॅस हाताळण्यात माझी स्व. आई काहीशी निरक्षरच होती. तिच्या सूना येण्यापूर्वी गॅस सुरू अन् बंद करण्याची जबाबदारी मीच सांभाळत असे. गॅस जरी आला तरी तिच्या स्वयंपाकात पुरण पोळीच्या अमृताची गोडी होती. काळ बदलला, तशी खाद्य पदार्थ बनविण्याची साधने बदलली.मात्र साधने जरी बदलत गेली तरी त्यातील आईच्या सुगरण हाताची चव कधीही बदलली नाही. पुरण पोळीचा गोडवा अन् त्यातील अमृत संपले असे जाणवलंच नाही.
असो,आज होळी सण आहे..! माझा आवडता खाद्य पदार्थ पूरणपोळी मी आज चाटून पूसून खाणार आहे, तूम्हीही खा..! त्यानिमित्त सर्व शाकाहारी खवय्ये असणाऱ्या खवय्यांना पूरणपोळी खाण्यासाठी मनःपूर्वक चवदार शूभेच्छा..!😋
ता.क. - आपल्या महाराष्ट्रात होळी अन् पुरण पोळी यांचं एकमेकांवर जीवापाड गोड गोड चवदार प्रेम आहे..!😋
वंदे मातरम्
पुरण पोळी वर जीवापाड प्रेम करणारा खवय्या लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १२ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा