बुधवार, ३ मे, २०२३

निरागस प्रेमाचं प्रतीक - नर्गिस उपाख्य फातिमा रशीद..!


 


चिंतन ©️


निरागस प्रेमाचं प्रतीक -  नर्गिस उपाख्य फातिमा रशीद..!


=================================


हिंदी चित्रपटसृष्टीला नव्हे नव्हे समस्त कला सृष्टीला सौंदर्याच्या बाबतीत काही सौंदर्याला शाप लाभलेला आहे. जिथं सौंदर्य  येतं तिथं त्याच्या मागोमाग  शापित सौदर्य देखील दपक्या पावलांनी येत असते.


याचं मूर्तीमंत उदाहरण द्यायचे झाल्यास गतकाळातील तीन उदाहरणे देता येतील. ती पुढीलप्रमाणे आहेत..

स्व.मीनाकुमारी उपाख्य महजबीन बानो , स्व. मधुबाला उपाख्य मुमताज जहाँ बेगम दहलवी  अन् स्व. नर्गिस उपाख्य फातिमा रशीद..! या तिन्ही शापित सौंदर्यात एका बाबतीत एकासमानता  होती अन् ती म्हणजे दुभंगलेले प्रेम..! सौंदर्य शापित असते असं बऱ्याचदा वाटते. याची खात्री तेंव्हा वाटते जेंव्हा एखाद्या लोभस सौंदर्याला जेंव्हा नियती आयुष्य पूर्णपणे आनंदात जगू देत नाही तेंव्हा..! सौंदर्याला कुणीतरी चुरगुळून फेकून देतं तर कधी कधी सौंदर्याला नियती पुरेपूर जगू देत नाही..! 


स्व. नर्गिस उपाख्य फातिमा रशीद यांच्या सौंदर्याच्या वाट्याला नियतीने पुरेपूर आयुष्य दिले नाही.मात्र जे आयुष्य दिले त्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व दिले अन् ते म्हणजे सुनील दत्त साहेब..!नर्गिस यांच्या आयुष्यात सुनील दत्त जर आले नसते तर नर्गिसचे आयुष्य वाळवंटातील काटेरी झुडूपासारखे नक्कीच झाले असते. ऐकीवात असणाऱ्या कथानुसार राजकपूर अन् नर्गिस यांचं मैत्रीच्या प्रेमाचं रोपटे चांगलं बहरलं होतं, पण ते त्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर काही होऊ शकले नाही.इथेच मनाची होरपळ सुरू झाली अन् त्या होरपळीच्या वाटेवर सुनील दत्त यांच्या सारखा गुलाब पाण्याचा शिडकावा व्हावा तसा सुनील दत्त यांचा प्रवेश नर्गिस यांच्या आयुष्यात झाला.


स्त्रीचं मन तिला भावलेल्या पुरुषाच्या शरीरापेक्षा , त्या पुरुषाच्या मनाच्या नंदनवनात गुंजन करत असते हेच स्रीचे भावनिक मानसशास्त्र आहे, बाकी दुसरं काहीही नाही. स्रीला तिच्या प्रेममयी आयुष्यात फक्त शरीरसुख नको असते. तर  पुरुषाच्या भावनेच्या सागरात तिला विहार करायला तिचे मन आतुरलेले असते. याबाबतीत नर्गिस उपाख्य फातिमा रशीद नशीबवान म्हणायला हवी, कारण सुनील दत्त यांच्या सारखा प्रेमळ पुरुष पती म्हणून तिला लाभला. या बाबतीत अगोदर उल्लेखित केलेल्या स्व.मीनाकुमारी उपाख्य महजबीन बानो अन् स्व. मधुबाला उपाख्य मुमताज जहाँ बेगम दहलवी   सौंदर्यवती शापित ठरल्या.


मात्र पूर्णतेत देखील अपूर्णता असते अन् त्यालाच माणसाचे आयुष्य म्हणतात हे नर्गिसच्या. बाबतीत पुरेपूर लागू पडते.सुनील दत्त यांच्या सारखा प्रेमळ अन् सुसंस्कृत पुरुष पती नियतीने दिला खरं, मात्र त्याच नियतीने ऐन तारुण्यात आयुष्याला आजारापणाचे ग्रहण लावून दिले. स्व.मीनाकुमारी उपाख्य महजबीन बानो अन् स्व. मधुबाला उपाख्य मुमताज जहाँ बेगम दहलवी या  सौंदर्यवती शापित ठरल्या. त्यांच्या वेदना व्यक्त करायला ना स्वतः चे कुटुंब जवळ होते ना ज्याच्या खांद्यावर प्रेमाने डोके ठेवून व्यथा व्यक्त करावा असा पुरुष..! ज्यावेळी आपल्या मनातलं दुःख व्यक्त करायला प्रेमाचं प्रेमळ कुणी जवळ नसतं तेंव्हा सगळं जग खायला उठल्या सारखं जाणवतं..! मनाच्या द्वंद्वात अशी  स्री अन् पुरुष दोघेही आतून पार खचून जातात. स्व.मीनाकुमारी उपाख्य महजबीन बानो अन् स्व. मधुबाला उपाख्य मुमताज जहाँ बेगम दहलवी या दोघीही  मनाच्या या द्वंद्वात खूपच दुर्दैवी ठरल्या. मात्र नियतीने नर्गिसला या बाबतीत श्रीमंत बनवलं होतं. नर्गिसची ही श्रीमंती तिचा प्रेमळ अन् सुसंस्कृत पती सुनील दत्त होता.


स्रीचं पुरुषावर असणारे प्रेम हे शरीरसुखासाठीच नसते, तर ते प्रेम समोरचा पुरुष आपल्या भावना किती प्रमाणात समजून घेतो अन् आपल्याला एखाद्या लेकरा सारखा किती जीव लावतो यावर ते अवलंबून असते.सुनील दत्त यांनी नर्गिस यांना मोठ्या अपघातात वाचवले अन् नर्गिस यांच्या मनाच्या गाभाऱ्यात सुनील दत्त यांचं एखाद्या देवा सारखं पूजन व्हायला सुरुवात झाली. मुळात सुनील दत्त एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यात पुन्हा त्यांनी त्याच आपल्या चांगुलपणातून नर्गिस यांचा प्राण वाचवला होता.त्या प्रसंगापासून नर्गिस यांच्या आयुष्यात जे प्रेमाचे रोपटे वाढू लागले, त्यातील  भ्रमर एकमेव सुनील दत्त हेच होते.


आयुष्य सगळं सुरळीत सुरु होते. मात्र मी अगोदर उल्लेखित केल्या प्रमाणे पूर्णतेत देखील अपूर्णता असते अन् त्यालाच माणसाचे आयुष्य म्हणतात हेच नर्गिस यांच्या बाबतीत लागू पडले. मुलामुलींनी संसार बहरलेला असतानाच नर्गिस उपाख्य फातिमा रशीद यांना कॅन्सर झाला अन् ऐन तारुण्यात आयुष्याचा प्रवास शेवटाकडे फार लवकर गेला.कोणत्याही स्रीला तिच्या ऐन तारुण्यात गोंडस पिल्ले अन्  देखणा सुसंस्कृत पती या इहलोकात मागे सोडून जावं लागणं फार वेदनादायी असते. ती अतिशय भयानक वेदना नर्गिस उपाख्य फातिमा रशीद यांनी याचि देही याचि डोळा बिछान्यावर पडून अनुभवली.


आई असलेल्या नात्यांचं आपल्या आयुष्यातून जर फार लवकर कायमचे निघून जाणे झालेच तर त्या आईच्या पश्चात राहणाऱ्या काही मुलांच्या आयुष्यात निवडुंगाच्या काटेरी झुडूपांची उगवण जास्त प्रमाणात होते हे अनेक उदाहरणावरून दिसून येते. फक्त कुणा पोरक्या मुलाच्या आयुष्यात येणारी काटेरी निवडुंग ही स्वभावात येतात तर कुणाच्या आयुष्यात इतर बाबतीत..! याला एक आई म्हणून नर्गिस अन् एक मुलगा म्हणून संजय दत्त देखील अपवाद ठरला नाही.


अभिनेत्री ,  एक मातृत्व अन् पत्नी म्हणून नर्गिस उपाख्य फातिमा रशीद यांच्या आयुष्याच्या प्रवासात  पूर्णतेत देखील अपूर्णता राहून गेली.ऐन उमेदीच्या वयात या इहलोकातून निघून जावे लागले. नर्गिस यांना आपल्या पाठीमागे आपला सुसंस्कृत पती अन् गोंडस मुलं सोडून अन् स्वतः च्या आयुष्यातील वेदना सोबत घेऊन जाव्या लागल्या.


असो, आज शापित सौदर्य, आयुष्याच्या प्रवासात  पूर्णतेत देखील अपूर्णता राहून गेलेलं सौंदर्य नर्गिस उपाख्य फातिमा रशीद यांचा स्मृतिदिन आहे. ( मृत्यू दिनांक - ३ मे १९८१) 

त्यानिमित्त या प्रेमळ शापित सौंदर्याला अन् त्यातील कलासक्त अभिनयाला विनम्र अभिवादन..!🙏🏻🌹


वंदे मातरम्


एक रसिक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - ३ मे २०२३, बुधवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा