मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
" माझ्या स्व.वडिलांचे विश्वासू - डी.यू. घोडके सर
===================================
जेंव्हा कुणी एखादी व्यक्ती आपल्या आई वडिलांचा सन्मान करत असते, तेंव्हा जाणून घ्यावे की, अशा व्यक्तींना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी जाणीव असते. याच जाणिवेच्या पातळीवरील एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो अन् ते म्हणजे आदरणीय ज्ञानेश्वर उत्तमराव पाटील घोडके सर..!
माझ्या स्व. तीर्थरूप वडिलांच्या शिक्षकी आयुष्यात जे काही अत्यंत विश्वासू सहकारी लाभले त्यापैकी एकजण म्हणजे आदरणीय श्री .डी.यू. घोडके सर..! जुन्या जाणत्या लोकांचा विश्वास संपादन करणे आजच्या काळातील विश्वास संपादन करण्याएवढे सहज सोपे नसायचे. तावून सुलाखून बघितल्या शिवाय जुनी जाणती माणसं सहसा कुणावर विश्वास ठेवत नसायची. आदरणीय श्री .डी.यू. घोडके सर माझ्या वडिलांच्या अत्यंत विश्वासू सहकारी शिक्षकांपैकी एक होते. माझे स्व.वडील दहेगाव ता. वैजापूर येथे मुख्याध्यापक म्हणून जवळ जवळ बारा वर्षे सेवेत होते. त्या कार्यकाळात अन् वडिलांच्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यात अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून तीर्थस्वरुप श्री. श्रीराम तात्या उगले, आदरणीय श्री. आर. टी. धाडबळे सर, स्व. आदरणीय एस.आर. धाडबळे सर ( रा.परसोडा ) अन् आदरणीय श्री.डी.यू. घोडके सर करंजगावकर यांचा माझे वडील बऱ्याचदा माझ्याजवळ अभिमानाने उल्लेख करत असायचे. हा विश्वास फक्त प्रशासकीय कामासाठीपुरता मर्यादित नसायचा. त्या विश्वासाची व्याप्ती एकमेकांच्या कौटुंबिक आयुष्यापर्यंत निर्माण झालेली होती.
माझ्या तीर्थरूप वडिलांनी त्यांच्या अख्ख्या शिक्षकी आयुष्यात अगदी साध्या खताच्या गोणी पासून बनवलेली पिशवी प्रवासात वापरली. निव्वळ अगदी साधी पिशवी असायची.माझे वडील जि.प.प्रा.शा. दहेगाव ता. वैजापूर येथे मुख्याध्यापक म्हणून असताना देखील अशीच साधी पिशवी माझ्या स्व. वडिलांच्या सोबत असायची. तत्कालीन माझ्या वडिलांचे सहकारी आदरणीय डी.यू. घोडके सर यांनी खूप आग्रह केला अन् डी.यू. घोडके सर यांनी एक हँड बॅग माझ्या वडिलांना नव्वदच्या दशकात दहेगाव येथे एकत्र कार्यरत असताना सप्रेम भेट म्हणून दिली. काही दिवस फक्त आणि फक्त डी.यू. घोडके सर यांच्या प्रेमाखातर त्यांनी दिलेली हँड बॅग माझ्या वडिलांनी वापरली. मात्र काही दिवसांनी पुन्हा आपली साधी पिशवी वापरायला सुरुवात केली. हा विषय सांगायचा मुख्य उद्देश असा की, माझ्या तीर्थरूप वडिलांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत कुणाकडूनही बक्षीस अथवा सप्रेम भेट म्हणून कोणतीही वस्तू अथवा इतर काहीही घेतले नाही. फक्त त्याला अपवाद ठरले आदरणीय श्री. डी.यु. घोडके सरांनी दिलेली हँड बॅग..! आजही ती हँड बॅग मी जपून ठेवलेली आहे, एक आठवण म्हणून..! ती हँड बॅग या दोघांच्या प्रेमळ अन् आदरयुक्त नात्याची सतत आठवण करून देत असते.
जो पर्यंत माझे वडील हयात होते तो पर्यंत आदरणीय श्री.डी.यू. घोडके यांच्या सहकार्य वृत्तीचा अन् आपुलकीचा नेहमी उल्लेख करत असायचे. विशेषतः ज्या पद्धतीने अन् जबाबदारीने डी.यू. घोडके सरांनी त्यांच्या दोन्ही धाकट्या भावंडाना स्वतः च्या मुलांसारखे जपले, त्यांना त्यांच्या आयुष्यात स्थिरता प्राप्त करून दिली, याविषयी माझे वडील माझ्याजवळ बऱ्याचदा भरभरून बोलत असायचे. माझे वडील , आदरणीय श्री.डी.यू. घोडके सरांच्या या कौटुंबिक जबाबदार आयुष्याचे साक्षीदार होते. एखाद्या कुटुंबात , त्यातल्या त्यात भावंडात राम असणे काय असते हे आदरणीय श्री. डी.यू. घोडके सरांकडे बघून पटते. माझ्या स्व. वडिलांच्या कौटुंबिक आयुष्यात तीर्थस्वरुप श्री. श्रीराम तात्या उगले, आदरणीय श्री. आर. टी. धाडबळे सर, स्व. आदरणीय एस.आर. धाडबळे सर ( रा.परसोडा ) अन् आदरणीय श्री.डी.यू. घोडके सर करंजगावकर यांचे स्थान सदैव खूप उंचीचे राहिले. हक्काने आवाज देऊन एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी ही सर्व माणसं होती. आजच्या तांत्रिक सोशल मीडियाच्या जमान्यात ही गतकाळातील एकमेकांच्या सामाजिक अन् कौटुंबिक जाणीवा जाणून असलेली ही पिढी संपल्यात जमा होत आहे की काय असा प्रश्न आजच्या काळात पडतो. ज्यांच्या जमिनीवरील अन् कुठलाही अहंकार नसलेल्या जाणीवा जागृत असतात त्यांच्याच आयुष्यात स्व. व्ही.सी. जाधव सर ( माझे वडील), तीर्थस्वरुप श्री. श्रीराम तात्या उगले, आदरणीय श्री. आर. टी. धाडबळे सर, स्व. आदरणीय एस.आर. धाडबळे सर ( रा.परसोडा ) अन् आदरणीय श्री.डी.यू. घोडके सर करंजगावकर यांच्या सारखी जिवाभावाची माणसं येतात.विशेष म्हणजे शेवट पर्यंत या सर्वांनी एकमेकांच्या आयुष्यात त्याच हक्काने मदत केली, साथ दिली, हक्काने मार्गदर्शनही केले. फक्त शाळे पुरत्या प्रशासकीय नात्यात ही माणसं गुरफटली नाहीत. त्याही पलीकडे आपण एकमेकांचे कुणीतरी आहोत ही जाणीव या सर्वांनी आयुष्यभर जपली.
आदरणीय श्री. डी.यू. घोडके सर यांचा स्वभाव शिक्षकी आयुष्यात प्रामाणिक असलेला..! वेळेच्या बाबतीत असो की प्रशासकीय बाबी या सर्व बाबतीत श्री. डी.यू. घोडके सर प्रामाणिकपणे शिक्षकी आयुष्य जगले. आज दिनांक २९/२/२०२४, गुरुवार रोजी आदरणीय श्री. डी.यू. घोडके सर आपण शिक्षण क्षेत्रातून प्रशासकीय औपचारिकता म्हणून सेवानिवृत्त होत आहात, मात्र एक ज्येष्ठ कौटूंबिक स्नेही म्हणून सदैव जिव्हाळ्याच्या अन् मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता अन् सदैव असणार आहात..!
आदरणीय श्री.डी.यू. घोडके सर आपणास प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच्या पुढील निरामय आरोग्यदायी अन् प्रफुल्लित आयुष्यासाठी माझ्या कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!🙏🏻🌹
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २९/२/२०२४, गुरुवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा