शनिवार, १८ जानेवारी, २०२५

भाजी निवडण्याचे मोजके फायदे ( फक्त पुरुषांसाठी )


 


चिंतन ©️


भाजी निवडण्याचे मोजके फायदे

( फक्त पुरुषांसाठी )


==================================


१) स्वतःच्या कुटुंबात पुरुषांनी भाजी निवडल्यामूळे पुरुषांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.


२) भाजी निवडल्यामुळे स्वतःच्या घरात पुरुषांचा पुरुषी अहंकार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.


३) पुरुषांची स्वतःच्या कुटुंबात नेहमी चिडचिड होत असल्यास, त्याचवेळी हिरवीगार भाजी निवडण्यास द्यावी किंवा पुरुषाने स्वतःहून भाजी निवडण्यास घ्यावी.भाजीची पाने निवडता निवडता स्वतःची चिडचिड काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.


४) पुरुषाने स्वतःच्या घरी भाजी निवडलेली असल्यामुळे स्वतःच्या घरातील स्त्रीने बनविलेल्या भाजीत चवदारपणा येतो हा मानसिक आनंद प्राप्त होतो.


५)  पुरुषाने स्वतःच्या घरी भाजी निवडलेली असल्यास स्वतःच्या कुटुंबातील दररोज स्वयंपाक बनविणाऱ्या महिलेचे दररोजचे सुगरण योगदानाचे महत्त्व समजून येते. 


६) पुरुषाने आपणही आपल्या स्वतःच्या कुटुंबात भाजी निवडल्यामूळे स्वतःच्या कुटुंबातील आईला, पत्नीला, बहिणीला अथवा इतर वंदनीय महिला नात्याला मदत केल्याचा ' एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ' हा अध्यात्मिक भाव अंतर्मनात सदैव जागृत असतो. 


७) एका अर्थानं स्वतःच्या कुटुंबात पुरुषाने भाजी निवडणे हा देखील एक कौटुंबिक धर्म आहे.भाजी निवडणे या धर्माचे पालन केल्यामुळे कुटुंबातील नात्यात टवटवीत आत्मिक आनंदाची अनुभूती येते.


८) पुरुषाने स्वतःच्या कुटुंबात भाजी निवडल्यामूळे ' माझ्यामुळे कुटुंबाचे पानही हलत नाही '  हा पुरुषी अहंकार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.


८) पुरुष स्वतःच्या कुटुंबात भाजी निवडण्यास बसल्यावर त्याच हिरव्यागार पाले भाजीची तयार होणारी सुगरण भाजी खाण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. यातून स्वकष्टाने प्राप्त होणाऱ्या उत्कंठावर्धक आनंदाची अनुभूती येते.


९) भाजीची पानं निवडताना  सडकी अन् अहितकारक पानं बाजूला काढल्यामुळे सामाजिक जीवन जगताना देखील सडक्या बुध्दीची अन् सामाजिक अहितकारक माणसं कशी बाजूला करायची किंवा त्यांना टाळून त्यांना कसे दुर्लक्षित करायचे हे कौशल्य अत्यल्प प्रमाणात प्राप्त करता येते.


१०) स्वतःच्या घरी भाजी निवडल्यानंतर एका बाजूला जमा झालेली उपयुक्त हिरवीगार पाने अन् दुसऱ्या बाजूला त्याच भाजीचा  जमा  झालेला टाकावू कचरा जमा होतो. यातून आयुष्याची दोन रूपे समजून घेण्यास मदत होते.


११) हिरवीगार भाजी निवडताना त्याच भाजीला आधार देणाऱ्या हिरव्यागार  खोडाचे  अनन्यसाधारण महत्व  दिसून येऊन यातून कुटुंबातील आधार देणाऱ्या व्यक्तींचे महत्व लक्षात येते.


१२) पुरुषांनी स्वतःच्या घरी भाजी निवडल्यामूळे , त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील निवडक माणसांना निवडण्याचे कौशल्य प्राप्त होण्यास मदत होते.


१३ पुरुषांनी भाजी निवडल्यामूळे असलेला काही गर्व अन् नसलेल्या काही भ्रामक समजुती दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.


तूर्तास फक्त पुरुषांसाठी  भाजी निवडण्याचे मोजके फायदे समाप्त करत आहे.😊🙏🌿☘️🌱🍀


वंदे मातरम् 


बालपणापासून ते आजतागायत स्वतःच्या घरी अधून मधून भाजी निवडणारा एक पुरुष - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - १९/१/२०२५, रविवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा