#मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" कृती छोटी पण, प्रेरक नक्कीच आहे..! "
===============================
" सर, तुम्ही ७ डिसेंबर ला कुठे गेले होते हो..?"
माझ्या जवळ येऊन हळू आवाजात या अभिषेक सखाराम तोडकरने मला विचारले.
मी- " अरे,बेटा..माझ्या जन्मगावाची यात्रा होती त्या दिवशी..! म्हणून मी त्यारोजी रजेवर होतो..! का..काय झाले..? "
अभिषेक - " काय...सर...माझा वाढदिवस होता ना त्या दिवशी..! "
मी - " अरे ,व्वा...! अभिनंदन बेटा..!"
आमच्यातील हा संवाद सुरू असताना अभिषेकला मला काहीतरी सांगायचे होते पण तो सांगू..का...नको...या द्विधा मनःस्थितीत असल्याचे मला जाणवले.मी त्याला म्हणालो..
" काय रे...काय झाले..? कुणी काही बोलले का तुला..? "
अभिषेक - " नाही हो सर..!"
मी - " मग काय झाले..?"
अभिषेक माझ्याजवळ आला अन् म्हणाला..
" सर,ते तुम्ही मागे म्हणाले होते ना..की आमचा कुणाचा वाढदिवस असला तर त्या दिवशी केक, चॉकलेट वर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशातून काहीतरी घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना द्या म्हणून..!"
मी -" अरे..हा..म्हणालो होतो..! "
अभिषेक - " सर,मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी..४० ₹ चे पेन आपल्याच शाळेच्या बाजूला असणाऱ्या लहाण्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ३ रीच्या विद्यार्थ्यांना वाटले..!"
मी काहीवेळ त्याच्याकडे पाहताच राहिलो..अन् विचार करू लागलो की, मुलं त्यांच्या गुरुजींच्या प्रत्येक नैतिक मूल्यांच्या शिकवणीवर किती बारीक लक्ष ठेवत असतात. या अभिषेकने असे काही अप्रतिम कार्य केले होते की,जे..जे मोठी सुशिक्षित माणसं कुणाच्याही वाढदिवसाला स्वतःच्या किंवा इतरांच्या चेहऱ्याला केक फासतात त्यांना सणसणीत चपराक लगावली होती.
मला खूप खूप आनंद झाला होता. मी ज्या..ज्या छोटछोट्या नैतिक मूल्यांची रुजवणुक माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये करू लागलो होतो...त्याला आता कुठे खूप सुंदर असा अंकुर फुटायला लागला होता.मला हेच अपेक्षित होते. भले असे करणाऱ्यांची संख्या कमी असेल पण प्रारंभ झाला होता हे काय थोडे होते का...? भले त्यांच्या या कृती जगाच्या दृष्टीने खूप अती सामान्य असेल पण छोट्या कृतीतूनच मोठी कार्य सहज होत असतात. एकाजनाचे प्रेरक कार्य..निदान पाच जणांना तरी प्रेरित करत असते यावर माझा ठाम विश्वास आहे.
मी ज्यावेळी अंधारी प्रशालेत जून २०१८ मध्ये हजर झालो होतो ,त्यावेळी मला या शाळेत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये एक नवीनच प्रकार पाहायला मिळाला होता.
तो असा..
या शाळेत ज्या मुलामुलींचा वाढदिवस साजरा होत असे,ते बरेच मुलं मुली केक वर्गात आणत असे अन् दणक्यात वाढदिवस साजरा करत असे.मला प्रश्न पडत असे की,या मुलामुलींना १०० ते १५० ₹ चा केक घ्यायला यांच्या घरचे पैसे कसे काय देऊ शकतात..? मुलांना चॉकलेट वाटप करणे समजू शकतो पण..वर्गात केक आणून..?
मी त्यावेळी या मुलांना त्यांच्या या साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाबद्दल प्रत्यक्ष उपदेशाचे काहीसे रागावून डोस दिले नाही ; कारण पौगंडावस्थेतील वयोगटातील मुलांना पटकन अशा अनेक गोष्टी सहजपणे लवकर मुद्दामहून समजत नाही. 😊 कारण हा वयोगट आयुष्यातील सर्वात संवेदनशील वयोगट असतो. जोषपूर्ण आयुष्याचा प्रारंभ इथूनच सुरू होतो. मात्र आपण वाढदिवसाला नेमके काय काय करायला हवे याबाबतीत तासिका झाल्यावर सांगत असे.त्याचाच हा खूप चांगला परिणाम होता..की अभिषेकने त्याच्या वाढदिवसाला वर्गात केक आणून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा लहान मुलांना काहीतरी अभ्यास उपयोगी वस्तू त्याने दिली होती.
प्रिय अभिषेक याने वर्गात केक न आणता दुसऱ्या एका चांगल्या कृतीतून स्वतःचा वाढदिवस साजरा करायला प्रारंभ तर केला होता,याचा मला खूप खूप आनंद झाला होता. कोणताही चांगला प्रारंभ हाच येणाऱ्या काळातील चांगल्या कृतींचा प्रारंभ बिंदू असतो. म्हणून प्रिय अभिषेकची ही छोटीशी कृती अंधारी प्रशालेतील बाकीच्या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार होती,जी मुलं अन् मुली वर्गात केक आणून आपला वाढदिवस दणक्यात साजरा करत होती..! प्रत्येक वर्गात मी गेल्यावर अभिषेकने वाढदिवसाच्या दिवशी काय केले, याचे आवर्जून विद्यार्थांना सांगत होतो. याचा दृश्य परिणाम असा झाला की, अशा प्रकारांना आळा बसला.
खूप खूप अभिनंदन बेटा अभिषेक..!🌹
वंदे मातरम्.. !
ता.क.: कृती छोटी आहे...पण अनुकरणीय नक्कीच आहे. अभिषेकला या छान कार्याबद्दल पतंजली बिस्कीट पुडा बक्षीस दिला.
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
प्रसंग दिनांक: ७/१२/२०१८
लेखन दिनांक: २० डिसेंबर २०१८


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा