मला प्रवासात भेटलेली माणसं ©️
जीर्ण झालेल्या परसोडा फलकाची व्यथा..!😔
=====================
आज दिनांक १९/२/२०२६ गुरुवार रोजी प्रवासात असताना परसोडा रेल्वे स्टेशनवर निवांत उभा होतो. रेल्वे स्टेशन वरील जीर्ण झालेल्या, मात्र आपल्या अस्तित्वाची अजूनही उपस्थिती दर्शविणाऱ्या फलकाकडे निवांतपणे बघत होतो.जीर्ण झालेल्या, क्षीण होत चाललेल्या व्यक्ती, वस्तू / वास्तू सजीव असो अथवा निर्जीव त्यात भावार्थ शोधला की आत्मार्थ सापडतो. फक्त त्या सजीव अथवा निर्जीव व्यक्ती, वस्तू / वास्तुशी आपली कुठे ना कुठे तरी नाळ जुळलेली असावी लागते.असेच काहीसे मला त्या जीर्ण झालेल्या फलकाकडे बघून जाणवले.
रेल्वे स्टेशन वरील फलकावर लिहिलेल्या " परसोडा " या नावाला गतकाळातील याच ठिकाणच्या आठवणीत स्वतःला रमवून घेऊ लागलो होतो.
परसोडा..!
आमच्या बालपणातील अन् पौगंडावस्थेतील वयोगटाच्या काळातील आमच्या पालखेड गावाच्या परिसरातील एक महत्त्वाची बाजारपेठ असलेले गाव परसोडा..! याचं रेल्वे स्टेशनवर कित्येकदा बालपणी , पौगंडावस्थेतील हळुवार वयोगटात असताना येणे जाणे व्हायचे.कधी बालमित्रांच्या सोबत, तर कधी माझ्या स्व.तीर्थरूप आई दादाच्या सोबत..! आमच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रवासाचे महत्वाचे ठिकाण हेच परसोडा रेल्वे स्टेशन होते. पालखेड येथून पायी चालत येऊन परसोडा येथून रेल्वेने पुढील प्रवासाला कित्येक प्रवासी याच परसोडा रेल्वे स्टेशनने बघितलेले आहेत. कित्येक आठवणी याच परसोडा रेल्वे स्टेशनशी निगडित आहेत. विशेष म्हणजे परिसरातील कित्येक गावातील नागरिकांच्या सुख दुःखाचे साक्षीदार असलेले परसोडा रेल्वे स्टेशन आज जीर्ण अवस्थेत जाऊन आपल्या गतकाळातील प्रवाशांच्या आठवणींनी हुंदका देत आहे. तत्कालीन काळात पंचक्रोशीतील कित्येकांच्या शिक्षणात, आजारपणात , कित्येकांच्या शुभ कार्यासाठी जाण्यासाठी , येण्यासाठी याच परसोडा रेल्वे स्टेशनने तमाम नागरिकांची सेवा केलेली आहे.भौतिक वास्तूने आपल्याला दिलेला सहवास, आधार आठवला की मन भरून येते.आजरोजी प्रशासनाची कृतघ्नता म्हणून की अजून काय मात्र परसोडा रेल्वे स्टेशन खूप दुखी जाणवले.😔
माझ्या स्व.तीर्थरूप आईचे माहेर धुळे शहर होते. माहेर म्हटलं की बहुतांशी भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातील एक हळुवार कोपरा असतो. विवाहित अथवा विधवा स्त्रीचा वयोगट कोणताही असो, त्या माय माऊलीला आपलं माहेर तिच्या अख्ख्या हयातीत हळुवार मायेचा कोपरा बनून राहते. थोडक्यात काय तर, माझ्या स्व.आईच्या माहेरच्या आठवणींशी परसोडा रेल्वे स्टेशन एक महत्वाचा हळुवार मायेचा दुवा होते. तो भावनिक ऋणानुबंध आठवला की स्व.आईच्या सहवासातील , गतकाळाच्या प्रवासातील प्रेमळ आठवणी जाग्या होतात. आमच्या बालपणी पुढील प्रवासाला दळणवळणाच्या दृष्टीने परसोडा येथील रेल्वे स्टेशन अत्यंत मोलाची भूमिका निभावत होते. माझ्या स्व.आईला जेव्हा कधी धुळ्याला तिच्या माहेराला जायचे अथवा माहेराहून घरी पालखेड येथे परत यायचे असेल तर हेच परसोडा रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असायचे.पालखेड येथून कधी पायी तर कधी बैलगाडीने याच परसोडा रेल्वे स्टेशन वर आम्ही येत असायचो. तत्कालीन काळात मनमाड –छत्रपती संभाजीनगर ( तत्कालीन औरंगाबाद) लोहमार्गावर फारश्या रेल्वे धावत नसत. रेल्वेच्या नियोजित वेळापत्रकाच्या काही तास अगोदरच आम्ही याच परसोडा रेल्वे स्टेशनवर येऊन थांबत असायचो.बऱ्याचदा याच परसोडा रेल्वे स्टेशनवर मुक्काम करण्याची वेळ यायची. सुरक्षितता अन् आपलेपणाची भावना याच परसोडा रेल्वे स्टेशनने आम्हा तत्कालीन पंचक्रोशीतील नागरिकांच्या आयुष्यात जपल्या होत्या.
पालखेड येथील आम्हा बालमित्रांच्या अनेकानेक आठवणी या परसोडा रेल्वे स्टेशनशी जुळलेल्या आहेत.आम्ही पालखेड येथे माध्यमिक शिक्षण घेत होतो.आम्ही बालमित्र त्यात प्रामुख्याने मी स्वतः , डॉ.गणेश वाणी, डॉ. संजय राऊत आण्णासाहेब म्हस्के, बाळू माळी, स्व.शाम शेळके इत्यादींनी महाशिवरात्रीसाठी वेरूळ येथे जाण्याचे नियोजन केले होते.पिशव्या भरल्या अन् पहाटे पालखेडहून पायी चालत येऊन सकाळी सकाळीच परसोडा रेल्वे गाठले.परसोडा येथून सकाळच्या पॅसेंजरने निघून दौलताबाद रेल्वे स्टेशन वर उतरून तिथून पुढे जसे जमेल तसे वेरूळ मुक्कामी जाण्याचे नियोजन केले होते.रेल्वे प्रवासाची उत्कंठा वाढली होती.तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार मनमाडहून रेल्वे परसोडा रेल्वे स्टेशनवर आली होती.पूर्वीही अन् आताही परसोडा रेल्वे स्टेशनवर, रेल्वेच्या दरवाज्याला समांतर असलेला प्लॅटफॉर्म नव्हता अन् नाही. जमिनीवरून उंच रेल्वेच्या डब्यात शिरताना रेल्वे डब्याच्या दरवाजाच्या पायऱ्या चढताना उतरताना दमछाक व्हायची. रेल्वे आल्या आल्या त्यावेळी आम्ही पटपट पिशवीसह डब्ब्यात चढलो होतो.आमचा जिवलग बालमित्र डॉ.गणेश वाणी याने त्याची पिशवी रेल्वेच्या डब्याच्या दारात आत फेकून दिली अन् तो डब्ब्यात उंच पायरी चढून शिरणार इतक्यात रेल्वे निघाली.पिशवी आत अन् गणेश रेल्वेच्या समांतर पळू लागला होता. कितीही प्रयत्न केला असता तरी गणेशकडून डब्ब्यात चढणे अशक्यच होते.आमचा जिवलग बालमित्र स्व.शाम शेळके सर्वात अगोदर रेल्वे डब्यात चढला होता.शामने हात देऊन गणेश वाणीला आतमध्ये घेण्याचा यशस्वी न होणारा प्रयत्न केला, मात्र गणेश रेल्वे डब्याला समांतर फक्त पळतच राहिला अन् अखेर त्याची गाडी हुकली..!आम्ही दौलताबाद येथे उतरलो. गणेशची पिशवी दोन दिवस वेरूळ येथे सांभाळून पुन्हा घरी पालखेड येथे आल्यावर त्याची त्याला प्रसादासह परत केली होती.आजही जेंव्हा कधी परसोडा रेल्वे स्टेशनवर जाणे येणे होते तेंव्हा तिथला जसा आहे तसाच प्लॅटफॉर्म बघून आमच्या बालमित्राने रेल्वेच्या सोबत लावलेल्या शर्यतीची आठवण येते.मी परसोडा रेल्वे स्टेशन वरील जीर्ण झालेल्या फलकाकडे बघून गतकाळातील आठवणीत रमून स्वतःला तिथं शोधत होतो.
इतक्यात परसोडा रेल्वे स्टेशन वरून एक वयोवृद्ध जेष्ठ व्यक्तिमत्व माझ्याजवळून त्यांच्या मार्गाने पायी जात होते. ते जेष्ठ काका पुढे गेले अन् पुन्हा मागे वळून माझ्याकडे आले.एकदम माझा हात हातात घेऊन मला अत्यंत मायेने म्हणाले..
" तुम्हाला कुठं तरी पाहिल्यासारखे वाटते राव..! ( काही क्षण विचार करून) तुम्ही पालखेडचे ना..? तुमचे चुलते नेहमी आमच्या घरी छानलाल शेत वस्तीवर पंचांग घेऊन यायचे. त्यांना येणे झाले नाही तर आम्ही आणायला जायचो.तिथी, सणवार,जन्मकुंडल्या सांगायचे..!"
मी एकदम आश्चर्यचकित झालो होतो.त्या तीर्थस्वरूप काकांना मी या अगोदर कधीच भेटलेलो नव्हतो, मात्र आपल्या पूर्वजांच्या देहयष्टी अन् देहबोलीवरून त्यांनी माझ्या ओळखीचा अचूक अंदाज लावला होता.मी त्या आदरणीय काकांना विनम्रपणे प्रणाम केला.बराचवेळ तीर्थस्वरूप छानलाल काकांसोबत अनौपचारिक गप्पा झाल्या. त्या गप्पात माझे चुलते स्व. भाऊसाहेब काका जाधव यांच्या विद्वत्तेविषयी छानवाल काका भरभरून बोलले.अखेर अत्यंत आत्मियतेने छानवाल काकांनी घरी येण्याचे निमंत्रण देऊन निरोप घेतला. मी विचार करू लागलो होतो.आपल्या पूर्वजांच्या आठवणींनी मनात गहिवर झाला होता.जुनी जाणती पिढी फक्त बघून आत्मीयतेने ओळख देणारी..! आपुलकीने अन् आत्मियतेने स्वतःहून हक्काने बोलणारी तीर्थस्वरूप छानलाल राजपूत काकांसारखी बहुदा ही शेवटची पिढी असावी.काही माणसं काही क्षण जरी भेटली तरी एक अख्खा कालखंड भेटल्याची अनुभूती देऊन जातात. याची अनुभूती मला तीर्थस्वरूप छानवाल काकांना भेटल्यावर आली होती.
इतक्यात रेल्वेची उद्घोषणा (अनाउन्समेंट) झाली अन् माझे विचारचक्र थांबले.रेल्वे आली अन् मी रेल्वेच्या डब्यात उंच चढून जाणाऱ्या पायऱ्या चढून रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. माझ्या पिढीचे बालपण ते आजची माझ्या पिढीची प्रौढावस्था या दरम्यान परसोडा रेल्वे स्टेशनवर काहीच बदल झाला नव्हता.उलट परसोडा रेल्वे स्टेशन आपल्या अंतिम घटका मोजत आहे की काय यांचं दुःख मनात घेऊन माझा पुढील प्रवास सुरु झाला होता.रेल्वेच्या डब्यात बसल्यावर खिडकीतून बाहेर बघितल्यावर पुन्हा तो जीर्ण अवस्थेत असलेला " परसोडा " नावाचा फलक दिसला. अत्यंत दुःखी जाणवला. तो जीर्ण झालेला मात्र कोणे एकेकाळी कित्येकांच्या नजरा त्यावर खिळलेला फलक देखील रुदन करू लागला होता.कित्येक वर्षांनी परसोडा रेल्वे स्टेशन वरील त्या जीर्ण झालेल्या फलकाला कुणीतरी आपुलकीने भेटल्याने त्या फलकाचा गहिवर मला जाणवला होता.तो जीर्ण झालेला परसोडा रेल्वे स्टेशन वरील फलक माझा कुणीतरी कधीतरी जिर्णोद्धार करील अन् विश्वगुरु व्हायला निघालेल्या भारताच्या प्रवासात कृतज्ञतेने मलाही सामील करुन घेईल असा भाव तो परसोडा फलक व्यक्त करू लागला होता याची मला मनोमन जाणीव झाली होती.
वंदे मातरम्
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक : १९/०२/२०२६, गुरुवार
शिव जयंती


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा