शनिवार, २८ मार्च, २०२०

" लक्ष असू द्या..! "



चिंतन

" लक्ष असू द्या..! "
====================================
                                                         

भारतीय समाजकारणात जर विशिष्ट मानवी घटकांची        " तात्पुरती अती नम्रता " दिसण्याचा ऋतु  जर कोणता असेल तर  तो ऋतु म्हणजे...लोकशाहीचा सण होय..! हे सण गल्ली ते दिल्ली पर्यंत मोठ्ठ्या कौतुकाने अन् कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह साजरे होतात..!  या सणांच्या काळात तात्पुरती अती नम्रता असलेल्या माणसांच्या मुखी एकच सर्व मान्य वाक्य असते अन् ते म्हणजे...
" लक्ष असू द्या..!"

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असे अनेक ऋतु आले अन् गेले..! पण प्रत्येक ऋतुमधील " तात्पुरती अती नम्रता "  हे मूल्य रूपी झाड आजही आपले सर्वोच्च स्थान टवटवीतपणे राखून आहे..!😊  बरं, या ऋतुंच्या काळात, या लोकशाहीच्या सणांच्या काळात  "तात्पुरती अती नम्रता" या पिकाची जोमाने वाढ होते...! अगदी ज्या झाडांच्या ओंब्या कधीच जमिनीला स्पर्श करूच शकत नाहीत, त्यासुद्घा धरती मातेचे,पुत्रांचे ,दीन दुबळ्यांचे  दर्शन घेण्यासाठी आपल्या उंचीचा अहंकार "तातुरता" बाजूला सारून " तात्पुरती अती नम्रता " दाखवून .. त्यांचे दर्शन घेतांना आपल्याला दिसतात..! 😊 एकदा का लोकशाहीतील सणांचा हा मौसम संपला की, नंतर तेच झाड दिसतं पण भारी..भारी हरितपट्ट्यात..! जिथं सर्वसामान्य वाटसरू जाऊ शकत नाही..! किंवा जरी सर्व सामान्य माणूस किंवा कार्यकर्ता गेलाच तरी त्याला तिथं काम मिळतं चटया अंथरण्याचे व त्यावर हुरडा मळून किंवा खळं करून  देण्याचे ..!😊

 खरिप,रब्बी पिके जशी त्या..त्या हंगामात बहरून नंतर वाळून जातात आणि पुन्हा तीच पिके बहरण्यासाठी वाट पाहावी लागते..पुढच्या मौसमाची..! असच काहीसं होतं..!                                                                                              अर्थात काही पिके बारमाही,बहुवार्षिक असतात  जे की ,सदैव अंतकरणातून नम्र असतात तो भाग वेगळा..! ही तीच बारमाही,बहुवार्षिक पिके असतात जी "अती नम्रता " हे मूल्य  नेहमी ताजेतवाने ठेवतात..! अन् अशा पिकांना बाजारभाव देखील उत्तम मिळतो बरं का..! कारण ती विशिष्ट हंगामापुरती बहरत नाही..! तर ती असतात नेहमी टवटवीत..! अगदी ऊसासारखी गोड..गोड..!हल्ली लोकशाहीच्या सणांमध्ये अशी पिके कमी प्रमाणात वाढतात..! 

काही पिके तर आंब्यासारखी वर्षातून एकदाच येतात पण आपल्या अवीट गोडीची गोडी सोडून जातात..! आणि हो काही पिकांचे वाण असे असतात की,त्यांची स्वतः ची अजिबात काहीही ओळख ना पाळख ,ना स्वतः चा काही ब्रँड तरीही ते वाण फक्त अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झाल्यामुळे, अमक्या अमक्या जातीचे वाण असल्याने त्या वाणाला लई मोठ्ठा भाव मिळतो बाजारात..! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झालेल्या वाणांना लई जोरदार मागणी होती..आणि आजही आहे हे विशेष..! दिवसेंदिवस अशा वाणांना बाजारभाव कमी भेटू राहिला आहे. हे नवीन बाजारपेठेतील नव्या गिऱ्हाईकांच्या फक्त वाण गुणवान पाहिजे या निकषामुळे साध्य होऊ राहिले आहे..! या अशा वाणांना ,कसेही करून बाजारात विकण्याचे मनसुबे यांचे हक्काचे गिऱ्हाईक मोठ्या अभिमानाने करत असतात..!

माझे वडील तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव ( वय वर्ष ८२),हे मला एकदाच म्हणाले होते की,
" आयुष्यात कधीही कुणाचेही हक्काचे गिऱ्हाईक होऊ नको..!"  मला माझ्या वडिलांचे हे बौध्दीक संस्कार ,असे फक्त दुसऱ्याच्या नावावर मार्केट मध्ये विकायला आलेले वाण , किंवा फक्त अमक्या अमक्या बियाणांच्या पोटी विकसित झालेल्या वाणांना पाहिले की पटकन आठवते ... !
  .                                                                                                      असो,आज आमच्या घरातील उमेदवार चिरंजीव नयन शारदा नंदन जाधव यांचा जन्मदिन आहे..! ते अती नम्र होऊन तुम्हाला नमस्कार करत आहेत.. त्यांचा  काहीतरी स्वार्थ  साध्य होई पर्यंत तरी...!
एकदा का त्यांचा स्वार्थ साध्य झाला की, मग..पुन्हा भेट होईल.... कधी होईल..हे सर्व कार्यकर्त्यांना चांगले माहित आहे..!😊

ता.क.: आणि हो...आमचा हा उमेदवार फक्त माझा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करू नका किंवा त्याचे कौतुकही करू नका..! त्याचे स्वतः चे काही कर्तृत्व जर त्याने भविष्यात समाजात निर्माण केले तरच त्याला नमस्कार करा..!🙏 त्याचे कौतुक करा किंवा त्याच्यावर प्रेम करा..! उगीचच माझ्या नावावर याचे उसने कौतुक करू नये..लोकशाही मधील सणांमधील काही  तात्पुरत्या अती नम्र उमेदवारासारखे..!

लक्ष असू द्या..!🙏🤗

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२८ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा