शनिवार, २१ मे, २०२२

" बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच..! "


 


चिंतन ©️


" बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच..! "


===================================


माणूस जन्मतः भटका आहे. काहींच्या आयुष्यात सामाजिक जीवनप्रणाली नुसार भटके आयुष्य त्याच्या माथी आले..! माणूस सतत त्याच्या आयुष्याचं स्थैर्य त्याच्या प्रवासात शोधत राहिला.जिथं त्याला स्थैर्य प्राप्त झाले तिथं त्यानं आपलं बस्तान बसवलं.जिथं माणूस स्थिर झाला तिथं त्यानं आपली माणसं आपल्या भोवती आपल्या स्वभावानुसार जमा केली.जमा होणारी माणसं ,माणसाच्या स्वभावानुसार जमा होत गेली.प्रेमळ स्वभाव, प्रेमळ माणसं आपल्या भोवती जमा करत गेला तर संकुचित वृत्तीचा स्वभाव संकुचित मनोवृत्तीच आपल्या भोवती जमा करत गेला..! आपला स्वभाव आपल्या सभोवती असणाऱ्या मनोवृत्तींना आपल्याकडे निमंत्रित करत गेला हेच माणसाच्या सामाजिक प्राणी असाण्याचं निमित्त ,बाकी दुसरं काहीही नाही..!


बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच हे मी याच साठी म्हणतोय की, बुऱ्हाणपूर हे आजचं शहर मला ,माझ्या स्व.आईला, माझ्या आईच्या आईला म्हणजेच माझ्या आजीला जी आजही शंभरीच्या आसपास असून हयात आहे तिला खूप जवळचं वाटत होते अन् आजही वाटत आहे.बुऱ्हाणपूर जरी आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश मध्ये असले तरी ते आमच्या सारख्या आयुष्याची भटकंती करणाऱ्या अनेक माणसाचं प्रतिनिधीत्व करणारे गाव वाटतं..!


माणसाच्या आयुष्यातील नात्याचा प्रारंभ त्याचा अनेक पूर्वजांकडून होत असतो.जिथं पर्यंत त्याला आपले पूर्वज ठावूक असतात, तिथं पर्यंत तो त्यांचं मूळ शोधत जात असतो.जसं माझ्या स्व.वडिलांचं मूळ नेवासा जिल्हा अहमदनगर इथपर्यंत ठावूक असल्याने वडिलांच्या कडील मूळ नेवासा गावापर्यंत येऊन थांबते.अगदी तसेच माझ्या आई आजीचे मूळ गाव हेच बुऱ्हाणपूर आहे,जे की, आजच्या मध्यप्रदेश राज्यात येते.


माझ्या आई आजीचे नाव तिच्या आई वडिलांकडील आडनावानुसार सुशीलाबाई ठाकरे होय. याच बुऱ्हाणपूर गावात माझ्या आई आजीचा जन्म झाला.याच बुऱ्हाणपूर गावात माझ्या आई आजीचे एकोणिसाव्या शतकातील विसाव्या दशकातील शेवटच्या कालखंडात अन् तिसाव्या दशकातील सुरुवातीच्या कालखंडात शिक्षण झाले.माझी आई आजी त्याकाळची इयत्ता सहावी उत्तीर्ण आहे. याच बुऱ्हाणपूर गावात त्याकाळी माझ्या आई आजीच्या वडिलांचे घर होते काळाच्या ओघात कुटुंबाचे स्थलांतर झाले अन् बुऱ्हाणपूरशी निगडित फक्त आठवणी शिल्लक राहिल्या.माझ्या दृष्टीने माझी आई आजी प्रचंड बुध्दीमान व्यक्ती आहे. माझ्या स्व.वडिलांच्या अन् माझ्या स्व.आईच्या सर्व नातेवाईकांच्या गोतावळ्यात फक्त एकमेव माझी आई आजीच सर्वात बुध्दीमान व्यक्ती आहे असे मला वाटते. त्याचं कारण आजही कित्येक संस्कृत श्लोक ,हिंदू धर्मातील विविध ग्रंथाच्या ओळी तिच्या मुखोदगत आहेत.हिंदी ,इंग्रजी अन् मराठीवर देखील प्रभुत्व आहे.अर्थात आज शंभरीच्या आसपास असल्याने त्यात फरक जाणवतो,पण ती जेंव्हा ठणठणीत होती तेंव्हा तो बुध्दीचा प्रभाव मला तिच्या भेटी वेळी सतत जाणवायचा.


बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच असं आपल्या समस्त मराठी माणसाला वाटण्याचं अजुन एक कारण असे की, याच बुऱ्हाणपूरला हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे यांचा पदस्पर्श झालेला आहे.हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले.तेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणले ते सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी..! याच हिंदवी स्वराज्याचे स्वतः च्या प्राणापेक्षाही जास्त संरक्षण केले ते छत्रपती संभाजी महाराजांनी.अन् याच हिंदवी स्वराज्याच्या सीमा थेट दिल्ली पर्यंत आपल्या अजोड युद्ध कौशल्याने विस्तारल्या त्या थोर पहिले बाजीराव पेशवे यांनी..! याच थोर पहिले बाजीराव पेशव्यांचा पदस्पर्श माझी जन्मभूमी पालखेड , ता.वैजापूर येथे देखील झालेला आहे, याचा जेवढा अभिमान वाटतो जितकाच अभिमान राऊंनी याच बुऱ्हाणपूर मार्गे दिल्लीवर अंकुश ठेवला होता त्याचा वाटतो..! 


मला असे वाटते की, मध्ययुगीन भारताच्या इतिहासात कोणत्याही एखाद्या सेनानीने आपलं साम्राज्य विस्तारण्यासाठी , आपल्या धन्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली सर्वोत्तम अन् यशस्वी भटकंती म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान पहिले बाजीराव पेशवे यांनी केलेली बुऱ्हाणपूर मार्गे भटकंती होय..!


म्हणून म्हणतो,बुऱ्हाणपूर, आपलं वाटतं, वाटतं नव्हे आहेच, कारण या गावाशी माझी वैयक्तिक रक्ताशी निगडित भावूक आठवण जुळलेली आहे. बुऱ्हाणपूर आपलं वाटण्याचं दुसरं कारण असं की, याच बुऱ्हाणपूरला पहिले बाजीराव पेशवे यांचा पदस्पर्श झालेला आहे..!


प्रत्येक माणूस भटका आहे, फक्त काहींनी आपली भटकंती आपलं शौर्य , युद्ध कौशल्यने आपलं अतुलनीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी केली तर काहींनी आपली भटकंती आपल्या सामाजिक आयुष्यानुसार केली..!


ता.क. - सदरील लेख आत्ताच धावत्या आगगाडीत लिहिलेला आहे.अक्षर चूकभूल क्षमस्व..!🙏🏻


वंदे मातरम्..!


लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक - २२ मे २०२२, रविवार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा