रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

देवभूमी..! 🕉️ (भाग क्रमांक २)


 








मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️

 देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक २)

===================================

आम्ही नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर दुपारी साधारणतः दोन वाजता पोहोचलो होतो. आमचा थोरला चिरंजीव नमन त्याच्या शैक्षणिक ठिकाणाहून रेल्वेने परस्पर निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथे अगोदरच सकाळी पोहोचलेला होता. त्याच्याशी माझा संपर्क झाल्यावर त्याला सांगितले की, " आम्हाला यायला अजून वेळ आहे.तो पर्यंत तुला जेवढी जीवाची दिल्ली करून घ्यायची असेल तेवढी करून घे..!म्हणजेच जेवढं हिंडून फिरून यायचे असेल तेवढं हिंडून फिरून ये..!" नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते दिल्ली रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासासाठी चार चाकी ओम्नी वाहनाची व्यवस्था केली. त्या गाडीचा वाहन चालक बोलका जाणवला होता. रस्त्याने जाताना अधून मधून अवतीभोवतीच्या विविध स्थळांची माहितीही सांगत होता. रस्त्याच्या बाजूला विशेष उल्लेख करून त्याने सांगितले की, या बाजूच्या जागेवर शेकडो एकर जमिनीवर विविध राजकीय नेत्यांचे समाधीस्थळे आहेत. अर्थात त्याने हिंदीत सांगितले होते. एवढ्या प्रचंड मोठ्या शहरात फक्त समाधी स्थळांसाठी एवढी मोठी जमीन अधिग्रहित केलेली होती हे बघून अन् ऐकून आपण व्यक्तिपूजेच्या किती आहारी जाऊन मर्यादित भौतिक सुविधांचा किती अमर्याद वापर केला आहे याची जाणीव झाली. आम्ही तो परिसर दुरूनच वाहनातून बघत होतो. थोरला चिरंजीव नमन याच्याशी संपर्क होऊन आम्ही एकत्रित दिल्ली रेल्वे स्टेशनवर जमा झालो होतो.

दुसऱ्या दिवशी हरिद्वार येथे सकाळी उतरल्यावर पुढील प्रवास बसने होणार होता. पुढील प्रवास जोखमीचा होता याची जाणीव सोबतच्या सर्वांना करून दिली होती. आमची बस हरिद्वार येथून निघाली होती. ऋषिकेश मध्ये आल्यावर ट्रॅफिक जॅम मध्ये आम्ही अडकलो होतो.जवळ जवळ अर्धा तास बस जागच्या जागीच उभी होती.अखेर मार्ग मोकळा झाला अन् पुढील प्रवास सुरू झाला होता. जसजसा प्रवास पुढे सुरू होता, तसतसा घाटातील उंच पर्वत आपल्या अंगावर येतो की काय याची भीतीयुक्त जाणीव होत होती. नागमोडी वळणं अन् बाजूला खोल दरी, तसेच अलकनंदा नदीचे विस्तीर्ण पात्र सोबतच होते. देवभूमी उत्तराखंड मधील बघत असलेला परिसर अन् तिथली माणसं निसर्गाने किती राकट बनवलेली होती हे बघत बघत प्रवास सुरू होता. मी प्युवर दुष्काळी भागातील , मराठवाड्यातील असल्यामुळे नदीतील पाणी बघून या परिसरातील माणसं किती नशीबवान आहेत याची जाणीव होत होती. मात्र निसर्ग एका हाताने देतो अन् दुसऱ्या हाताने घेतो याची प्रचिती येत होती. नदी अन् पावसाचे मुबलक पाणी होते, मात्र जमीन शेती करण्यायोग्य नव्हती..! फार कमी उत्पन्नावर इथल्या लोकांचे आयुष्य आनंददायी आहे हे त्यांच्या देहबोली वरून दिसत होते. 

आमची बस दुपारी प्रवासी लोकांच्या जेवणासाठी थांबली होती. आम्ही सर्वजण जेवणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात गेलो. जिथं आम्ही जेवणं करायला थांबलो होतो त्या हॉटेलच्या अगदी बाजूलाच कडेला साधारणतः दीड दोन हजार फूट खोल दरी होती. त्या खोल दरीकडे अन् जेवणाच्या ताटातील खाद्य पदार्थांकडे बघत बघत जेवण करावे लागणार होते. भीती अन् आनंद याचे समिश्र भाव आमच्या मनात होते. जेवण यायला थोडा वेळ बाकी होता म्हणून मी वैयक्तिक थोडावेळ बाहेर गेलो अन् तिथल्या काही पुरुषांना तिथल्या विरोधाभासी असलेल्या भौगोलिक परिस्थिती विषयी बोलते केले होते. एकीकडे खूप पाऊस, मात्र शेती करण्यायोग्य जमीन फारशी नाही यामुळे तुमच्या भागात नागरिकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागते का..? नैराश्यातून आत्महत्येचे प्रसंग घडतात का..? याविषयी बोलते केले होते.अर्थात हा संवाद हिंदीत होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तरं काही प्रमाणात मला आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील लोकांच्या मानसिकतेचे जाणवले. तिथल्या काही पुरुषांनी जे उत्तर दिले त्याचा सारांश असा होता की, " आमच्या गरजा अन् खर्च कमी आहेत.अगदी कमी प्रमाणात शेती पासून अन् हंगामी व्यवसायातून जे उत्पन्न मिळते त्याचा आवाका बघून आम्ही आमचा वर्षभराचा खर्च करत असतो. उधळपट्टी करत नाही. त्यामुळं आमच्या कुटुंबात आत्महत्या होई पर्यंत ताणतणाव होत नाही..!" 
देवभूमी उत्तराखंड पर्वतरांगांमधील लोकांसोबतच्या चर्चेतील हे उत्तरे ऐकून मला आमच्या भौगोलिक प्रदेशातील याउलट असणाऱ्या समाजव्यवस्थेचं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते.यावर जर आज मी वास्तववादी व्यक्त झालो तर आपलीच माणसं आपल्याला दूषणं द्यायला भिणार नाहीत हेही जाणवलं.परिस्थिती पेक्षा भाकड प्रतिष्ठेला खूप जास्त महत्त्व देणारी माणसं असली की असेच होते.

आमची जेवणं आटोपली होती. जेवणातील खाद्य पदार्थ जगविणारी होती. पुढचा प्रवास सुरू झाला होता. आता देवभूमी उत्तराखंड मधील उंचच उंच पर्वत रांगा आजूबाजूला दिसत होत्या. तिथला शांत अन् रमणीय परिसर बघून या संपूर्ण विश्वातील पहिला योग गुरू, ध्यान मूर्ती महादेवाचे याचं परिसरात असलेल्या अस्तित्वाची श्रद्धेय अनुभूती होत होती. हा तोच शिव शंकर आहे, ज्याने योग अन् , ध्यान अन् लय याची अनुभूती समस्त मानव जातीला दिली होती. प्रवासात दिसणाऱ्या खोल खोल दऱ्या बघून आपण क्षणाक्षणाला मृत्यूच्या दाढेतून प्रवास करत आहोत हे अनुभवत होतो.हा अनुभव येणारच होता, कारण आम्ही केदारनाथ बाबाच्या चरणी लीन होण्यासाठीच चाललो होतो. तोच तर या योगाचा, ध्यानाचा अन् मृत्यूचाही इष्ट श्रद्धेय होता..!

वंदे मातरम्
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻

एक भटका प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - २८ ऑगस्ट २०२३, श्रावण मास, सोमवार.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा