मला प्रवासात भेटेलेली माणसं ©️
देवभूमी..! 🕉️
(भाग क्रमांक ८ )
===================================
केदारनाथ पर्वत रांगेत असलेली शांतता अन् कडाक्याची शीतलता मनाला अन् शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. आम्ही नंदी बेस कँप सोडून बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने निघालो होतो.आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते.साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर बाबा केदारनाथ मंदिर होते. परिसरातील शांतता मनाला अन् त्याच परिसरात हिमालयाच्या उत्तुंग थंडगार शिखरांमूळे,त्यातल्या गारव्यामुळे निर्माण झालेली शीतलता शरीराला स्वतः पुरती मर्यादित करू पाहत होती. चालण्याचा वेग मंदावला होता.मात्र ज्याच्या दर्शनाची ओढ लागलेली होती, ती ओढ अंगात बळ निर्माण करत होते. कुणाच्या विषयी असलेली ओढ आपल्या मनाला अन् शरीराला अजुन टवटवीत अन् तरतरीत करते याची अनुभूती येऊ लागली होती. मनाच्या संवेदना जागृत असलेल्या माणसाला कुणाच्या विषयी लागलेली ओढ, आपल्या ध्येयाकडे ओढीत नेते हा आत्मिक अनुभव यायला लागला होता. ओढ असल्याशिवाय प्रेमाची, अध्यात्माची अन् आत्मिक आनंदाची अनुभूती येत नाही. यातील अध्यात्मातील आत्मिक आनंदाची अनुभूती घेण्यासाठी आमची पावलं दिनांक २० मे २०२३ रोजीच्या संध्याकाळी केदारनाथ मंदिराच्या दिशेने झपझप पडू लागली होती.
आजूबाजूला भाविकांची पायी वर्दळ दिसू लागली होती. आम्ही आमच्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या भयंकर थंडीचा अनुभव घेत होतो. उजव्या ,डाव्या अन् समोरच्या बाजूला हिमालयाचा उत्तुंग पर्वत येणाऱ्या भाविकांच्या स्वागताला नम्रपणे उभा आहे असा भासू लागला होता. संपूर्ण दिवसभर केदारनाथ घाटी चढल्यामुळे पायात खूप थकवा आलेला होता, पण आता त्याच थकव्याला आजच्या शेवटाकडे आम्ही घेऊन चाललो होतो.रस्ता सपाट होता.हळूहळू दुरून बाबा केदारनाथ मंदिराचा कळस दिसू लागला होता. मंदिराचा परिसर नजरेच्या टप्प्यात येऊ लागला होता.बाजूला खळखळ वाहणारी मंदाकिनी नदीच्या पाण्याचा आवाज कानी पडत होता. आम्ही दर्शनाचे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले होते , त्याची पावती त्याच परिसरात असलेल्या एका कँप मध्ये दाखवली अन् पुढे मुख्य मंदिर परिसरात जाण्यास परवानगी मिळाली होती.छोटासा पुल ओलांडून आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेशित झालो होतो.
आयुष्यात जे स्वप्न माझ्या बालपणी , पौगंडावस्थेतील वयोगटात बघितले होते ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. आयुष्यात कधीतरी एकदा बाबा केदारनाथाचे दर्शन घेईल हे साधे भोळे स्वप्न उराशी बाळगून या क्षणापर्यंत आयुष्याची वाटचाल सुरू होती. बाबा केदारनाथ मंदिर परिसरातील जो सपाट जमिनीचा भूभाग होता तो आता आला होता.मी पायातील बुट बाजूला काढले अन् बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर माझे मस्तक श्रद्धेने टेकवले अन् आपोआप माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.काही क्षण त्याच नतमस्तक अवस्थेत एकचित्त होतो. माझ्या बाजूला उभे असलेले आमची दोन्ही मुलं अन् माझी पत्नी यांनी देखील श्रद्धेने बाबा केदारनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या पायरीवर आपापले मस्तक श्रद्धेने टेकवले होते. काही वेळाने मी माझे मस्तक बाबा केदारनाथ मंदिराच्या दिशेने केले अन् पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझ्या पत्नीने मला सावरले होते.तिलाही माझ्या डोळ्यातील श्रद्धेय अश्रूंचा अंदाज आला होता.ती देखील गहिवरुन गेली होती. आपण आपल्या आयुष्यात जे स्वप्न बघत असतो,ते जेंव्हा मोठ्या मेहनतीने साकारले जाते तेंव्हा डोळ्यातून येणारे अश्रू त्याच अमृताचे जलकण असतात, जे विधात्याने भूतलावर पाठवलेले असते. मी माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच या पवित्र अन् श्रद्धेय भावूक अनुभवांचा अनुभव घेत होतो. माझे स्व.आई - वडील स्वर्गवासी झाल्यानंतर ज्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते, ते अश्रू अन् आज या क्षणी बाबा केदारनाथाच्या पायरीवर मस्तक ठेवल्यावर डोळ्यात आलेले अश्रू माझ्यातील आत्म्याला अनेक आठवणीत घेऊन गेले होते. अश्रू तेंव्हाच डोळ्यात येतात, जेंव्हा काहीतरी श्रद्धेय दिसणाऱ्या चैतन्याला आपण बघत असतो किंवा पुन्हा कधीही न दिसणाऱ्या आपल्या आयुष्यातील प्रेमळ चैतन्याला आपण आठवून जाणून घेत असतो. याक्षणी माझ्या डोळ्यातील अश्रू हे माझ्या समोर जे चैतन्यमय बाबा केदारनाथाचे शिवालय दिसू लागले होते त्यामुळं येऊ लागले होते.मला हा असा अनुभव यापूर्वी अनेक देवस्थानांचे दर्शन घेतले पण त्यावेळी आला नव्हता. माझ्या पत्नीने अन् मुलांनी मला त्या श्रद्धेय भावूक प्रसंगातून सावरले अन् आम्ही थेट मंदिराच्या अगदी जवळील परिसरात गेलो.
सूर्य कधीचाच मावळला होता.मात्र हिमालयाच्या उत्तुंग पर्वत रांगेतील पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या उजेडात अजूनही आजूबाजूला पुसटसा उजेड जाणवत होता. बाबा केदारनाथाला अर्पण करायचे पूजेचे सामान परिसरातील दुकानातून खरेदी केले. आमच्या पायातील बुट त्याच दुकानदाराच्या दुकानात बाजूला काढून ठेवले अन् दर्शनाच्या रांगेत थेट सर्वात मागे जाऊन उभे राहिलो होतो.आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. हिमालयाच्या कुशीत असलेली अतिशय क्रूर, हो क्रूरच..! अतिशय क्रूर थंडी शरीराला थिजून टाकू लागली होती. काहीवेळ अनवाणी पायांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो पण पाच सहा मिनिटांनी पायाखालील अतिशय थंडगार जमिनींचे थंडगार चटके तळपायाला बसू लागले होते.आयुष्यात चटका अन् उष्णता हे समीकरण अनुभवलेले होते,पण आज पहिल्यांदाच थंडीमुळे देखील चटका बसू शकतो याचा अनुभव येऊ लागला होता. मी आमच्या समोरील रांगेत उभे असणाऱ्या बऱ्याच भाविकांच्या पायात बुट घातलेले बघत होतो.मी चि. नमन यास सांगितले की, आपण ज्याठिकाणी आपले बुट काढून ठेवलेले आहेत तिथून ते घेऊन ये.पायात बुट घातले तरच आपल्याकडून पुढे चालणे शक्य होईल.नसता नाही..! दोन्ही मुलं पुन्हा मुख्य मंदिराच्या परिसरात गेले अन् त्या दुकानाच्या ठिकाणाहून आमचे बुट घेऊन आले.आम्ही सर्वांनी पायात पुन्हा बुट घातले अन् याचं दर्शनाच्या रांगेत थेट मंदिराच्या अलीकडे बुट काढून पुढे अनवाणी पायांनी जाण्याचे ठरवले.
दर्शनाच्या रांगेत उभे असणाऱ्या सर्वच भक्तांना थंडीने गारठून टाकले होते.आम्ही दर्शनाच्या रांगेत संध्याकाळी सव्वा सहा वाजता उभे राहिलो होतो.हळूहळू पुढे पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो. उभे राहून राहून पायात गोळे येऊ लागले होते.पहाटे साडे तीन ते या क्षणापर्यंत सरासरी उभेच होतो.फक्त साधारणतः एक तास आराम केला होता. प्रचंड चढणीच्या प्रवासामुळे पायात त्राण उरले नव्हते,पण बाबा केदारनाथाच्या ओढीने ते त्राण पळून जात होते.आभाळातून अधून मधून पाण्याचे अतिशय थंडगार थेंब अंगावर पडत होते.दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था नव्हती,त्यामुळे उभे राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता रात्रीचे आठ वाजले होते.संध्याकाळच्या सव्वा सहावाजे पासून आम्ही उभेच पुढे पुढे दर्शनाच्या रांगेत सरकत होतो. रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास आम्ही अगदी मुख्य मंदिराच्या जवळ आलो होतो.पायातील बुट बाजूला काढले अन् हळूहळू पुढे मार्गस्थ होऊ लागलो होतो.
रात्रीच्या सव्वा नऊ वाजता आम्ही बाबा केदारनाथाच्या मुख्य दरवाजात पाऊल ठेवले अन् एक वेगळ्याच शाश्वत अनुभूतीची जाणीव झाली. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या वास्तूची,मंदिराची उभारणी या अतिशय दुर्गम भागात केली होती तिथं पाऊल ठेवताच त्या आपल्या पूर्वजांना अंतर्मनातून साष्टांग दंडवत केला. काय असतील ती माणसं, ज्यांनी बाबा केदारनाथाला या हिमालयाच्या अतिशय दुर्गम भागात सुरक्षित केले होते. महादेवाला सुरक्षित करणारे ते कोण..? कारण तोच महादेव सर्वांना सुरक्षित ठेवतो.पण भाबडी समजूत सहज मनात आली होती. भाविकांच्या गर्दीने बाबा केदारनाथ मुख्य मंदिर फुलून गेले होते. आतमध्ये पाच पांडवांच्या क्रमवार मूर्ती होत्या.जे पांडव बाबा केदारनाथाच्या अस्तित्वाला निमित्त ठरले होते ते त्याच बाबा केदारनाथाच्या मुख्य मंदिरात श्रद्धेने विराजमान झालेले होते. वैराग्याच्या भेटीला, मानव जातीचा प्रतिनिधित्त्व करणारा माझ्या सारखा, माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखा अतिशय क्षुल्लक भक्त बाबा केदारनाथाच्या समोर आला होता.उत्पत्ती स्थिती अन् लय हे या सजीव सृष्टीचे कधीही न संपणारे चक्र..! त्यापैकी लय अर्थात मृत्यू जो की , शाश्वत सत्य आहे त्याचा स्वामी बाबा केदारनाथाच्या, भोलेनाथाच्या सानिध्यात आम्ही पोहोचलो होतो.एकटक बघत बघत डोळ्यात बाबा केदारनाथाला साठवून घेतले. दर्शन रांगेत उभे होतो तेंव्हा पासून जो मंत्र घोष अंतर्मनात सुरू होता त्याचे सार्थक आत्मिक समाधान लाभले होते.मनातून केलेले समर्पण आत्मिक आनंद देऊन गेले होते.
मानवी संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मानव जातीला ज्याने माणूस म्हणून जगायला शिकवले होते तो शिव शंकर..!
माणसाच्या आयुष्यात जसा जन्माचा आनंद व्यक्त केला जातो, अगदी त्याच मानवाच्या आयुष्यात चिरंतन शाश्वत सत्य असणाऱ्या मृत्यूची जाणीव करून देणारा शिव शंकर..!
मानवाच्या आयुष्याच्या प्रवासातील अंतिम ठिकाण स्मशान भूमी अन् तिथला स्वामी शिव शंकर..!
तुम्ही कोण कुठले का असेना, शेवटी तुम्हाला माझ्या दरबारात यावेच लागेल,त्या दरबाराचा स्वामी शिव शंकर..!
बुध्दी थकल्यावर अध्यात्माचा प्रांत सुरू होतो.त्या अंतिम प्रांताचा स्वामी शिव शंकर..!
माझ्या, तुमच्या ,सर्वांच्या आयुष्याचा अंतिम साक्षीदार बाबा केदारनाथ महादेवाचे आम्ही नतमस्तक होऊन दर्शन घेतले अन् थोडेसे बाजूला झालो. मी यापूर्वी वेरुळ येथे अनुष्ठान केले होते. त्यावेळी जप करण्यासाठी जी रुद्राक्ष माळ उपयोगात आणली होती ती बाबा केदारनाथ गर्भगृहात असलेल्या पुजारी यांना विनंती करून तिथल्या श्रध्येयांना स्पर्श करून द्यायला सांगितली.त्यांनी माझी नम्र विनंती ऐकली. पवित्र स्पर्श झालेली रुद्राक्ष माळ पुन्हा मला तिथल्या पुजाऱ्यांच्या मार्फत परत मिळाली अन् आम्ही बाबा केदारनाथाच्या मंदिरातून बाहेर पडलो. आता रात्रीचे दहा वाजले होते.बाहेर येताच अतिशय थंडीमुळे दातावर दात आदळायला सुरुवात झाली होती.
वंदे मातरम्..!
हर हर महादेव..!🙏🏻🕉️🙏🏻
एक प्रवासी लेखक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - २४ ऑक्टोंबर २०२३, मंगळवार ( विजयादशमी )
क्रमशः




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा