बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा अन् आठवणी..!



 


#आमचे गाव आमची माणसं ©️


तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा अन् आठवणी..!


====================


आज दिनांक ५/११/२०२५ रोजी आमच्या घरी तुलसी विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अक्षरा दीदी , आराध्या दीदी , खुशी दीदी,  मुगदीया बाबा , शेजारचं कुटुंब , अन् आम्ही कुटुंबीय असे एकंदरीत वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. सदरील विवाह सोहळ्याला मंगलाष्टके u tube वरील सुश्राव्य स्वरातील होते. ज्यावेळी मंगलाष्टके सुरू होते त्यावेळी माझा प्रिय बालमित्र अजय काळे गुरू याची आठवण आली. 


माझ्या बालपणी ते माध्यमिक वयोगटात असे पर्यंत आमच्या पालखेड येथील घरी माझी स्व.आई तुळशीच्या लग्नाच्या दिवशी पूजनाची तयारी करत असायची. ज्या दिवशी तुळशीचे लग्न आहे त्यादिवशी जिथं तुलसी विवाह संपन्न होणार आहे त्या जागेला आमच्या घराच्या शेजारच्या क्षीरसागर काकू किंवा गल्लीतील अश्रभ चाचा शेख यांच्या घरी असलेल्या गाईचे शेण आणून सारवून घेत असायची.माझ्या आईची तब्येत काहीशी स्थूल होती, मात्र माझी स्व.आई, धार्मिक काहीही असलं की देहभान विसरून धार्मिक कार्य बडेजाव न करता व्यवस्थित कसं होईल याची पुरेपूर काळजी घेत असायची.श्रद्धा अन् भक्ती देहभान विसरायला लावते याचं ते उदाहरण होते.संध्याकाळ झाली की, आमच्याच गल्लीतील कोपऱ्यावर राहत असलेल्या तीर्थस्वरुप स्व.पोपटराव काका ऋषिपाठक यांना तुळशीचे लग्न लावायला, मंगलाष्टके म्हणायला, पूजा करायला बोलावण्यासाठी मी पळत पळत जाऊन घेऊन यायचो.स्व.पोपटराव काका ऋषिपाठक यांच्या आवाजात मंगलाष्टके संपन्न झाली की, माझी स्व.आई उपस्थित प्रत्येकाच्या तळहातावर खडी साखरेचा प्रसाद द्यायची. आज मी पन्नाशशीच्या उंबरठ्यावर आहे. माझ्या आईचा स्वर्गवास होऊन दहा वर्षे झाली आहे. माझ्या स्व.आईने दिलेल्या खडी साखरेच्या प्रसादाची गोडी पुन्हा पुढील आयुष्यात कधी लाभली नाही अन् लाभण्याची अजिबात शक्यता नाही.त्याचं कारण आता अन् भविष्यात अनेकानेक मधुर , मिष्टान्न अन्न म्हणुन लाभले अन् लाभेल मात्र त्यात आईच्या हाताची अमृत चव नाही अन् नसेल..! आईचा सहवास , आईने स्वतःच्या हाताने बनवून आपल्याला खाऊ घातलेले जेवण भावूक स्री अन् पुरुषाच्या अंतिम श्वासापर्यंत सोबतच असते.गतकाळातील आईचा सहवास अन् आईने स्वतः बनवून आपल्याला खाऊ घातलेले जेवण किंवा दिलेला तीर्थप्रसाद , आईच्या पश्चात तिच्या लेकराला संजीवन अमृताची आठवण सदैव करून देत असतो.हा माझा स्वानुभव आहे.


आज आमच्या घरी तुलसी विवाह निमित्त माझ्या धर्मपत्नीने पूजनाचे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मांडले. घरातील तुळशीला व्यवस्थितपणे मांडून माझ्याच पत्नीने तुळशीला मिऱ्या बांधून साडी नेसली. तुळशीला योग्य ते अलंकार घातले होते. आजच्या तुलसी विवाह निमित्त तुळश अतिशय सुंदर अन्  पावित्र्यात न्हाऊन अत्यंत देखणी दिसत होती.एका स्रीने दुसऱ्या एका स्रीच्या सन्मानाचा केलेला साज शृंगार होता गतकाळातील तो अन् वर्तमानातील हा..!


आज आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी तुलसी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींना दिवाळीचे फराळ श्रध्येने देण्यात आले. अन्न प्रसाद खाऊन झाल्यानंतर सर्वांनी तुलसी अन् देवघरातील बाळ कृष्ण यांचे मनोभावे दर्शन घेतले.


श्रीकृष्ण हा सर्व मानव जातीचा सखा होता आहे अन् सदैव राहील. एखाद्याच्या आयुष्यात वयाची बंधने झुगारून कुणीतरी सखा असणं अन् त्या  पवित्र नात्याला जपणं याचा आदर्श एकमेव श्रीकृष्ण हाच होता अन् राहील.


असो, एकंदरीत कुठलाही फारसा बडेजाव न करता आमच्या घरी तुलसी विवाह संपन्न झाला.


तसेच आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे.आम्ही बालपणी आमच्या गावातील श्री. पारेश्वर महादेवाच्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री संपूर्ण मंदिरात पणत्यातील दिवे लावत असायचो. सोबत माझे जिवलग बालमित्र सोमनाथ गायकवाड, रमेश गायकवाड, विजय गायकवाड, राजू निकम , विष्णू पगार, संजय राऊत , गणेश वाणी, आण्णासाहेब म्हस्के, नंदकिशोर जाधव, स्व.शाम शेळके अन् अनेकानेक मित्र या उत्सवात सहभागी होत असायचो. ते आयुष्य निरागस आयुष्य होते.निरागसतेत आनंद प्राप्त होतो अन् आम्ही तत्कालीन बालमित्र त्याचा आनंद घेऊन तेवढ्या क्षणांना जगून आनंदीत होत असायचो.


माझ्यासह बाहेरगावी स्थायिक झालेल्या काही बालमित्रांच्या आयुष्यातील भुतकाळ अन् तिथलं वास्तव्य पुन्हा वर्तमानात अथवा भविष्यात पालखेड गावात कधी आयुष्यात लाभेल का नाही याची खात्री नाही.काळाच्या ओघात आम्हा काही बालमित्रांचे गाव पाठीमागे सुटले , मात्र तिथल्या आठवणी सदैव सोबत आहेत अन् राहतील.


जय श्रीकृष्ण 

वंदे मातरम् 


लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक - ५/११/२०२५, बुधवार 

त्रिपुरारी पौर्णिमा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा